व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्ही देवाबरोबर चालाल का?

तुम्ही देवाबरोबर चालाल का?

तुम्ही देवाबरोबर चालाल का?

‘आपल्या देवासमागमे राहून नम्रभावाने चाला.’मीखा ६:८.

१, २. यहोवाला आपल्याबद्दल असलेल्या भावनांची तुलना, आपल्या मुलाला चालायला शिकवणाऱ्‍या पित्याशी कशाप्रकारे केली जाऊ शकते?

नुकतेच कसेबसे उभे राहायला शिकलेले बाळ आपल्या आईचे बोट धरून पहिले पाऊल टाकते. ही असते साधीशीच गोष्ट, पण आई व बाबांसाठी मात्र हा एक महत्त्वाचा क्षण असतो. या एका क्षणातच ते भविष्याकरता कितीतरी स्वप्ने रंगवतात. लवकरच तो दिवस येणार असतो, जेव्हा त्यांचे मूल त्यांचा हात धरून त्यांच्यासोबत चालू लागणार असते, आणि आईबाबा त्या दिवसाची आतूरतेने वाट पाहत असतात. आपल्या मुलाला भविष्यात जे काही मार्गदर्शन व आधार लागेल तो त्याला पदोपदी पुरवण्याची त्यांची इच्छा असते.

यहोवा देवालाही पृथ्वीवरील आपल्या मुलांबद्दल अशाच भावना आहेत. इस्राएल किंवा इफ्राइम राष्ट्रातील आपल्या लोकांविषयी त्याने एकदा असे म्हटले: “मीच एफ्राइमास चालावयास शिकविले, मी त्यांस आपल्या कवेत वागविले . . . मानवी बंधनांनी, प्रेमरज्जूंनी, मी त्यांस ओढिले.” (होशेय ११:३, ४) आपल्या बाळाला चालायला शिकवणाऱ्‍या, त्याची पावले डगमगल्यास लगेच त्याला आपल्या कवेत घेणाऱ्‍या एका प्रेमळ पित्याशी यहोवाने स्वतःची तुलना केली. आपला मूळ पिता यहोवा आपल्याला चालायला शिकवू इच्छितो. आणि आपण एकेक पाऊल टाकत प्रगती करत असताना, तो आनंदाने आपल्या पाठीशी उभा राहतो. या लेखाच्या मुख्य वचनात सांगितल्याप्रमाणे आपण खरोखरच देवासोबत चालू शकतो! (मीखा ६:८) पण देवासोबत चालण्याचा काय अर्थ होतो? आपण त्याच्यासोबत का चालावे? त्याच्यासोबत चालणे कसे शक्य आहे? देवासोबत चालल्याने कोणते आशीर्वाद आपल्याला मिळतील? या चार प्रश्‍नांची उत्तरे आपण एकेक करून पाहूया.

देवासोबत चालण्याचा काय अर्थ होतो?

३, ४. (क) देवासोबत चालण्याचे शब्दचित्र इतके वैशिष्ट्यपूर्ण का आहे? (ख) देवासोबत चालण्याचा काय अर्थ होतो?

अर्थात, हाडामांसाचा मनुष्य शाब्दिक अर्थाने यहोवासोबत चालू शकत नाही कारण यहोवा एक आत्मिक व्यक्‍ती आहे. (निर्गम ३३:२०; योहान ४:२४) त्याअर्थी, मानव देवासोबत चालू शकतात असे बायबल सांगते तेव्हा याचा लाक्षणिक अर्थ घेतला पाहिजे. हे एक शब्दचित्र आहे, जे कोणत्याही राष्ट्राच्या किंवा सांस्कृतिक पार्श्‍वभूमीच्या व्यक्‍तीला डोळ्यापुढे उभे करता येईल. शिवाय या रूपकाला काळाच्या सीमा नाहीत. कारण एकमेकांसोबत चालणाऱ्‍या दोन व्यक्‍तींची संकल्पना कोणत्याही ठिकाणच्या व कोणत्याही युगातल्या व्यक्‍तीला समजण्यास कठीण जाणार नाही. या शब्दचित्रातून एक प्रकारची जवळीक किंवा आपुलकीची भावना व्यक्‍त होते, नाही का? या भावना आपल्याला देवासोबत चालण्याचा काय अर्थ होतो हे समजून घेण्यास मदत करतात. पण आता आपण याचा अर्थ आणखी स्पष्टपणे समजून घेण्याचा प्रयत्न करूया.

तुम्हाला हनोख व नोहा हे विश्‍वासू पुरूष आठवत असतील. ते देवाबरोबर चालले असे त्यांच्याविषयी का लिहिले आहे? (उत्पत्ति ५:२४; ६:९) बायबलमध्ये “चालणे” हा शब्द, विशिष्ट मार्गाने आचरण करणे या अर्थानेही वापरला आहे. हनोख व नोहा यांनी आपल्या जीवनात यहोवाच्या इच्छेनुरूप असलेल्या मार्गाने आचरण करण्याचे निवडले. त्यांच्या काळातल्या इतर लोकांप्रमाणे ते नव्हते; कारण त्यांनी यहोवाचे मार्गदर्शन स्वीकारले आणि त्याच्या आज्ञांनुसार ते चालले. त्यांनी देवावर भरवसा ठेवला. पण याचा अर्थ त्यांच्या जीवनातले सर्व निर्णय यहोवाने घेतले असे म्हणता येईल का? नाही. यहोवाने मानवांना इच्छास्वातंत्र्य दिले आहे. आणि देवाने दिलेल्या या स्वातंत्र्याचा उपयोग आपण आपल्या समजबुद्धीने करावा अशी त्याची इच्छा आहे. (रोमकर १२:१, २) पण जीवनातले निर्णय घेताना जरी आपण स्वतःच्या समजबुद्धीचा वापर करतो तरीसुद्धा यहोवाची बुद्धी आपल्यापेक्षा कितीतरी पटीने श्रेष्ठ आहे हे नम्रपणे ओळखून आपण त्याचे मार्गदर्शन स्वीकारतो. (नीतिसूत्रे ३:५, ६; यशया ५५:८, ९) तर या अर्थाने, जीवनाचे मार्गाक्रमण करताना, आपण यहोवाच्या सोबतीने हा प्रवास करतो.

५. येशूने, आपले आयुष्य गजभर वाढवण्याविषयी का उल्लेख केला?

बायबलमध्ये बरेचदा एखाद्याच्या आयुष्याची तुलना प्रवासाशी केलेली आहे. कधीकधी ही तुलना अगदी उघडपणे तर काही ठिकाणी ती काहीशी अप्रत्यक्षरितीने केलेली आढळते. उदाहरणार्थ, येशूने म्हटले: “चिंता करून आपले आयुष्य गजभर वाढवावयास तुमच्यापैकी कोण समर्थ आहे?” (मत्तय ६:२७, NW) हे शब्द वाचल्यावर कदाचित तुम्ही बुचकळ्यात पडाल. व्यक्‍तीच्या ‘आयुष्याबद्दल’ बोलताना येशूने काळ मोजण्याची संज्ञा न वापरता, ‘गज’ ही अंतर मोजण्याची संज्ञा का वापरली? * साहजिकच येशू जीवनाची तुलना प्रवासाशी करत होता. दुसऱ्‍या शब्दांत तो असे सांगू इच्छित होता, की आपण कितीही चिंता करत बसलो तरीही जीवनाच्या प्रवासात एका पावलाचे अंतरही आपल्याला वाढवता येत नाही. तर मग, आपण देवाबरोबर किती काळ चालत राहणार हे आपल्या हातात नाही असे समजावे का? मुळीच नाही! यासंदर्भात आणखी एक प्रश्‍न उद्‌भवतो, तो असा, की आपण देवाबरोबर का चालावे?

आपण देवाबरोबर का चालावे?

६, ७. अपरिपूर्ण मानवांना कशाची नितान्त आवश्‍यकता आहे आणि ही गरज पूर्ण करण्याकरता आपण यहोवाकडे का वळावे?

आपण यहोवा देवाबरोबर का चालले पाहिजे याचे एक कारण यिर्मया १०:२३ यात स्पष्ट केले आहे: “हे परमेश्‍वरा, मला ठाऊक आहे की मनुष्याचा मार्ग त्याच्या हाती नाही, पावले नीट टाकणे हे चालणाऱ्‍या मनुष्याच्या हाती नाही.” मानव या नात्याने आपल्याजवळ स्वतःचे जीवन मार्गदर्शित करण्याचे सामर्थ्य नाही, किंबहुना असे करण्याचा हक्कही आपल्याला नाही. आपल्याला मार्गदर्शनाची नितान्त आवश्‍यकता आहे. जे देवापासून स्वतंत्र होऊन मन मानेल त्या मार्गाने जाण्याचे निवडतात ते आदाम व हव्वा यांनी केलेली चूक करत असतात. या पहिल्या जोडप्यानेही चांगले काय व वाईट काय हे स्वतःहून ठरवण्याचा हक्क आपल्याला आहे असे गृहित धरले. (उत्पत्ति ३:१-६) हा हक्क आपल्या “हाती नाही.”

जीवनाच्या प्रवासात आपल्याला मार्गदर्शनाची गरज आहे असे तुम्हालाही नाही का वाटत? दररोज आपल्याला असंख्य लहानमोठे निर्णय घ्यावे लागतात. यांपैकी काही निर्णय कठीण असतात; त्यांचा आपल्या भविष्यावर व आपल्या प्रिय व्यक्‍तींच्या भविष्यावर परिणाम होऊ शकतो. पण विचार करा, आपल्यापेक्षा अमर्यादपणे अनुभवी व बुद्धिमान असलेली एक व्यक्‍ती हे निर्णय घेताना आपल्याला प्रेमळ मार्गदर्शन देण्यास तयार आहे. पण दुःखाची गोष्ट म्हणजे, आजच्या जगात बहुतेक लोक स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून निर्णय घेतात. नीतिसूत्रे २८:२६ यात दिलेल्या सत्याकडे ते पूर्णपणे दुर्लक्ष करतात: “जो आपल्या मनावर भरवसा ठेवितो तो मूर्ख, पण जो सुज्ञतेने चालतो त्याचा बचाव होतो.” मानवाच्या कपटी हृदयावर भरवसा ठेवल्यामुळे येणाऱ्‍या संकटांपासून यहोवा आपल्याला बचावू इच्छितो. (यिर्मया १७:९) त्याची इच्छा आहे की आपण सुबुद्धीने मार्गाक्रमण करावे व आपला बुद्धिमान मार्गदर्शक व शिक्षक या नात्याने आपण त्याच्यावर भरवसा ठेवावा. जेव्हा आपण असे करतो तेव्हा आपले जीवन सुरक्षित राहते व आपल्याला समाधान व तृप्ती लाभते.

८. पाप व अपरिपूर्णता स्वाभाविकपणे मानवांना कोठे नेत आहे, पण यहोवाची आपल्याबद्दल काय इच्छा आहे?

आपण देवाबरोबर का चालावे याचे आणखी एक कारण म्हणजे, आपण किती काळ चालत राहू इच्छितो याच्याशी हे संबंधित आहे. बायबलमध्ये एक कटू सत्य व्यक्‍त करण्यात आले आहे. एका अर्थाने सर्व अपरिपूर्ण मानव एकाच ठिकाणी वाटचाल करत आहेत. म्हातारपणात येणाऱ्‍या निरनिराळ्या कठीण परिस्थितीविषयी उपदेशक १२:५ म्हणते: “मनुष्य आपल्या अनंतकालिक निजधामास चालला आहे, आणि ऊर बडवून रडणारे गल्ल्यागल्ल्यांतून फिरतील.” हे ‘अनंतकालिक निजधाम’ म्हणजे काय? पाप व अपरिपूर्णता स्वाभाविकपणे आपल्याला जेथे नेत आहे ते ठिकाण अर्थात, कबर. (रोमकर ६:२३) पण यहोवाची अशी इच्छा आहे की आपले जीवन हे केवळ पाळण्यापासून कबरेपर्यंतचा एक खडतर प्रवास असू नये. (ईयोब १४:१) जर आपण देवाबरोबर चालत राहिलो तरच आपण त्याच्या मूळ उद्देशानुसार—सर्वकाळ चालत राहू. हीच तुमचीही इच्छा नाही का? तर मग, यासाठीच तुम्हीही तुमच्या पित्यासोबत चालत राहिले पाहिजे.

आपण देवासोबत कसे चालू शकतो?

९. काहीवेळा यहोवा आपल्या लोकांच्या दृष्टिआड का झाला होता पण यशया ३०:२० यानुसार त्याने त्यांना कोणते आश्‍वासन दिले?

आपल्या या चर्चेतला तिसरा प्रश्‍न सर्वात जास्त लक्ष देण्याजोगा आहे. तो म्हणजे आपण देवासोबत कशाप्रकारे चालू शकतो? याचे उत्तर यशया ३०:२०, २१ यात आपल्याला सापडते: “यापुढे तुझे शिक्षक दृष्टिआड राहणार नाहीत; तुझ्या डोळ्यांना तुझे शिक्षक दिसतील. हाच मार्ग आहे; याने चला, अशी वाणी तुमच्या मागून कानी पडेल; मग तुम्हाला उजवीकडे जावयाचे असो किंवा डावीकडे जावयाचे असो.” हे शब्द अतिशय दिलासा देणारे आहेत. २० व्या वचनातील यहोवाच्या शब्दांनी त्याच्या लोकांना आठवण करून दिली असेल की जेव्हा ते त्याच्या विरोधात गेले तेव्हा तो जणू त्यांच्या दृष्टिआड झाला होता. (यशया १:१५; ५९:२) पण इथे यहोवाला दृष्टिआड झालेले नव्हे तर आपल्या विश्‍वासू लोकांच्या अगदी डोळ्यासमोर उभे असलेले चित्रित केले आहे. जणू एखादा शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांसमोर उभे राहून त्यांना काहीतरी धडा शिकवतो आहे.

१०. तुमच्या महान शिक्षकाची वाणी कशाप्रकारे, “तुमच्या मागून कानी पडेल?”

१० पण २१ व्या वचनात एक वेगळेच चित्र रेखाटलेले आहे. येथे यहोवा आपल्या लोकांच्या मागून चालत आहे व कोणत्या मार्गाने चालले पाहिजे हे त्यांना सांगत आहे असे दिसते. बायबलचा अभ्यास करणाऱ्‍या विद्वानांनुसार, मेंढपाळ कशाप्रकारे आपल्या मेंढरांच्या मागून चालतो व त्यांना हाक मारून योग्य मार्ग दाखवतो व चुकीच्या मार्गाने जाण्यापासून आवरतो यावर हे वर्णन आधारित असावे. हे शब्दचित्र आपल्याकरता कशाप्रकारे अर्थपूर्ण आहे? आपण जेव्हा मार्गदर्शनाकरता देवाच्या वचनाचा अभ्यास करतो तेव्हा खरे पाहता आपण हजारो वर्षांपूर्वी लिहून ठेवलेले शब्द वाचत असतो. काळाच्या ओघात जणू हे शब्द आपल्या मागून येत आहेत. पण ते ज्या काळात लिहिण्यात आले होते तेव्हाइतकेच आजही समर्पक आहेत. बायबलमधील मार्गदर्शन आपल्याला दैनंदिन निर्णय घेण्यास साहाय्य करू शकते आणि येणाऱ्‍या अनेक वर्षांपर्यंत आपल्या जीवनाचा मार्ग निश्‍चित करण्यासही ते आपल्याला मदत करू शकते. (स्तोत्र ११९:१०५) आपण हे मार्गदर्शन मिळवण्याचा व त्यानुसार आचरण करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा यहोवा आपला मार्गदर्शक बनतो. जणू आपण देवाबरोबर चालत असतो.

११. यिर्मया ६:१६ या वचनानुसार, यहोवाने आपल्या लोकांकरता कोणते प्रेमळ शब्दचित्र रेखाटले पण त्यांनी कसा प्रतिसाद दिला?

११ आपण खरोखरच देवाच्या वचनाला इतक्या जवळून आपले मार्गदर्शन करू देत आहोत का? अधूनमधून याबाबतीत आत्मपरीक्षण केले पाहिजे. असे करण्यास आपली मदत करू शकेल अशा एका शास्त्रवचनाकडे लक्ष द्या: “परमेश्‍वर म्हणतो, चवाठ्यावर उभे राहून पाहा आणि पुरातन मार्गांपैकी कोणता म्हणून विचारा; सन्मार्गाने चाला; अशाने तुमच्या जिवास विश्रांति मिळेल.” (यिर्मया ६:१६) हे शब्द कदाचित आपल्याला एखाद्या प्रवाशाची आठवण करून देतील, जो दुमार्गी रस्त्याजवळ थांबून योग्य मार्ग विचारतो. आध्यात्मिक अर्थाने, इस्राएलमधील यहोवाच्या विद्रोही लोकांनाही असेच करण्याची गरज होती. त्यांना ‘पुरातन मार्ग’ शोधून पुन्हा तो मार्ग धरण्याची गरज होती. तो ‘सन्मार्ग’ म्हणजे ज्यावरून एकेकाळी त्यांचे विश्‍वासू पूर्वज चालले होते व ज्यावरून चालताना त्यांचे राष्ट्र अविचारीपणे भरकटले होते. दुःखाची गोष्ट म्हणजे, यहोवाने प्रेमळपणे आठवण करून दिल्यावरही इस्राएल राष्ट्र अडून राहिले. त्याच वचनात पुढे म्हटले आहे: “पण ते म्हणाले, आम्ही चालणार नाही.” आधुनिक काळात मात्र, देवाच्या लोकांनी त्याच्या या सल्ल्याला प्रतिसाद दिला आहे.

१२, १३. (क) ख्रिस्ताच्या अभिषिक्‍त अनुयायांनी यिर्मया ६:१६ यातील सल्ल्याला कसा प्रतिसाद दिला आहे? (ख) आपण आज कोणत्या मार्गाने चालत आहोत याविषयी आत्मपरीक्षण कसे करू शकतो?

१२ एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून ख्रिस्ताच्या अभिषिक्‍त अनुयायांनी यिर्मया ६:१६ यातील सल्ला स्वतःकरता उपयोगात आणला आहे. एक समूह या नात्याने त्यांनी ‘पुरातन मार्गांत’ परतण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला आहे, किंबहुना यात त्यांनी पुढाकार घेतला आहे. धर्मत्यागी ख्रिस्तीधर्माचे अनुकरण न करता, ते येशूने स्थापित केलेल्या व सा.यु. पहिल्या शतकात त्याच्या विश्‍वासू अनुयायांनी ज्यांचा पुरस्कार केला त्या ‘सुवचनांच्या नमुन्याला’ ते जडून राहिले आहेत. (२ तीमथ्य १:१३) आजपर्यंत, हे अभिषिक्‍त जन एकमेकांना तसेच ‘दुसऱ्‍या मेंढरांपैकी’ असलेल्या आपल्या साथीदारांना ख्रिस्ती धर्मजगताने पूर्णपणे त्यागलेल्या आरोग्यदायी, आनंदी जीवनमार्गाचे अवलंबन करण्यास मदत करत आहेत.—योहान १०:१६.

१३ यथाकाळी आध्यात्मिक अन्‍न पुरवण्याद्वारे विश्‍वासू दास वर्गाने लाखो लोकांना ‘पुरातन मार्ग’ शोधण्यास व देवाबरोबर चालण्यास मदत केली आहे. (मत्तय २४:४५-४७) तुम्ही या लाखो लोकांपैकी आहात का? जर असाल, तर या मार्गातून भरकटून स्वतःच्याच इच्छेनुसार निवडलेल्या मार्गावर चालण्याचे टाळण्याकरता तुम्ही काय करू शकता? यासाठी वेळोवेळी थांबून आपण जीवनात कोणत्या मार्गाने वाटचाल करत आहोत याचे परीक्षण करणे शहाणपणाचे ठरेल. जर तुम्ही बायबल व बायबलवर आधारित असलेली प्रकाशने विश्‍वासूपणे वाचत असाल व अभिषिक्‍त जनांनी आयोजित केलेल्या आध्यात्मिक शिक्षणाच्या कार्यक्रमांना उपस्थित राहात असाल तर तुम्ही देवाबरोबर चालण्याकरता क्रमवार प्रशिक्षण घेत आहात. आणि जेव्हा तुम्हाला देण्यात आलेल्या सल्ल्याचे तुम्ही नम्रपणे पालन करता तेव्हा तुम्ही खरोखरच देवाबरोबर, ‘पुरातन मार्गाने’ चालत असता.

‘जो अदृश्‍य आहे त्याला पाहत असल्यासारखे’ चाला

१४. जर यहोवा आपल्याकरता वास्तविक असेल तर आपण जे निर्णय घेतो त्यांवरून हे कशाप्रकारे दिसून येईल?

१४ यहोवासोबत चालण्याकरता, तो आपल्या दृष्टीने वास्तविक असला पाहिजे. यहोवाने प्राचीन इस्राएलातील विश्‍वासू जनांना आठवण करून दिली होती की तो त्यांच्या दृष्टिआड नव्हता. आजही तो महान शिक्षकाच्या रूपात आपल्या लोकांसमोर स्वतःला प्रकट करतो. यहोवा तुमच्या दृष्टीने खरोखरच इतका वास्तविक आहे का की जणू तुमच्यासमोर उभे राहून तुम्हाला मार्गदर्शन करत असल्याचे तुम्ही त्याला पाहू शकता? देवासोबत चालण्याकरता इतकाच दृढ विश्‍वास असण्याची गरज आहे. मोशेला असा विश्‍वास होता, कारण “जो अदृश्‍य आहे त्याला पाहत असल्यासारखा त्याने धीर धरला.” (इब्री लोकांस ११:२७) जर यहोवा आपल्याकरता वास्तविक असेल तर मग कोणतेही निर्णय घेताना आपण साहजिकच त्याच्या भावनांचा विचार करू. उदाहरणार्थ आपण कधीही वाईट वर्तन करून मग ते ख्रिस्ती वडिलांपासून किंवा आपल्या कुटुंबियांपासून लपवण्याचा प्रयत्न करणार नाही. उलट, कोणीही पाहात नसते तेव्हा देखील आपण देवासोबत चालत राहण्याचा प्रयत्न करू. प्राचीन काळातील राजा दावीद याच्यासारखा आपणही असा निश्‍चय करू की “मी आपल्या घरी सरळ अंतःकरणाने वागेन.”—स्तोत्र १०१:२.

१५. ख्रिस्ती बंधू व भगिनींसोबत सहवास केल्याने यहोवा आपल्याकरता अधिक वास्तविक कसा बनू शकतो?

१५ आपण अपरिपूर्ण, दैहिक प्राणी आहोत आणि जे आपल्या डोळ्यांनी दिसत नाही त्यावर विश्‍वास ठेवणे आपल्याला कधीकधी कठीण जाते हे यहोवा समजून घेतो. (स्तोत्र १०३:१४) पण या कमजोरीवर मात करण्याकरता तो आपल्याला मदत करतो. उदाहरणार्थ, त्याने पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांतून “आपल्या नावाकरिता काही लोक” एकत्रित केले आहेत. (प्रेषितांची कृत्ये १५:१४) खांद्याला खांदा लावून देवाची सेवा करत असताना आपल्याला एकमेकांकडून धैर्य मिळते. एखाद्या आध्यात्मिक भावाला किंवा बहिणीला त्याच्या किंवा तिच्या विशिष्ट कमजोरीवर मात करण्याकरता किंवा एखाद्या कठीण परीक्षेला तोंड देण्याकरता कशाप्रकारे मदत केली हे ऐकल्यावर देव आपल्याला आपोआपच अधिक वास्तविक वाटू लागतो.—१ पेत्र ५:९.

१६. येशूबद्दल ज्ञान घेतल्याने आपल्याला देवासोबत चालण्यास कशी मदत मिळेल?

१६ सर्वात महत्त्वाचे म्हणजे यहोवाने आपल्याकरता त्याच्या पुत्राचे उदाहरण पुरवले आहे. येशूने म्हटले: “मार्ग, सत्य व जीवन मीच आहे; माझ्याद्वारे आल्यावाचून पित्याकडे कोणी येत नाही.” (योहान १४:६) पृथ्वीवरील येशूच्या जीवनाचा अभ्यास करणे हा यहोवाला आपल्या दृष्टीत अधिक वास्तविक बनवण्याचा सर्वात उत्तम मार्ग आहे. येशूच्या प्रत्येक शब्दातून व कृतीतून त्याच्या स्वर्गीय पित्याच्या व्यक्‍तिमत्त्वाचे व मार्गांचे हुबेहूब प्रतिबिंब उमटले. (योहान १४:९) आपण जीवनात लहानमोठे निर्णय घेतो तेव्हा येशूने ही बाब कशी हाताळली असती याचा आपण काळजीपूर्वक विचार केला पाहिजे. आपण असा काळजीपूर्वक व प्रार्थनापूर्वक विचार केला आहे हे जर आपल्या निर्णयावरून दिसून येत असेल तर आपण ख्रिस्ताच्या पदचिन्हांचे अनुकरण करत आहोत असे म्हणता येईल. (१ पेत्र २:२१) परिणामस्वरूप, आपण देवाबरोबर चालत आहोत.

कोणते आशीर्वाद मिळतील?

१७. जर आपण यहोवाच्या मार्गाने चाललो तर आपल्या जिवास कशाप्रकारे “विश्रांति” मिळेल?

१७ यहोवा देवाबरोबर चालणे म्हणजे एक समाधानी जीवन जगणे. ‘सन्मार्ग’ शोधण्याविषयी यहोवाने आपल्या लोकांना काय सांगितले होते, तुम्हाला आठवते का? त्याने म्हटले: “सन्मार्गाने चाला; अशाने तुमच्या जिवास विश्रांति मिळेल.” (यिर्मया ६:१६) या ‘विश्रांतीचा’ काय अर्थ होतो? ऐषोआरामाचे जीवन? नाही. यहोवा याहीपेक्षा श्रेष्ठ असे काहीतरी आपल्याला देऊ करतो, जे श्रीमंतातल्या श्रीमंत माणसालाही क्वचितच लाभते. जिवास विश्रांती मिळणे म्हणजे आंतरिक शांती, खरा आनंद, समाधान व आध्यात्मिक तृप्तता अनुभवणे. आपण जीवनात सर्वात उत्तम मार्ग निवडला आहे या आत्मविश्‍वासातून ही विश्रांती उत्पन्‍न होते. सध्याच्या कष्टमय जगात अशाप्रकारची मानसिक शांती अगदी दुर्मिळ झाली आहे!

१८. यहोवा तुम्हाला कोणता आशीर्वाद देऊ इच्छितो आणि तुमचा काय संकल्प आहे?

१८ अर्थात, जीवनाचा प्रवास करायला मिळणे, मग तो कमी अंतराचा प्रवासच का होईना, पण तो देखील मुळात एक अतिशय मौल्यवान वरदान आहे. पण हा प्रवास जोमदार तारुण्यापासून कष्टदायक म्हातारपणापर्यंतचा एक लहानसा प्रवास असावा अशी यहोवाची इच्छा नव्हती. उलट, तुम्हाला सर्वात अद्‌भुत वरदान देण्याची यहोवाची इच्छा आहे. त्याची इच्छा आहे की तुम्ही त्याच्याबरोबर सर्वकाळ चालत राहावे! मीखा ४:५ यात हे अतिशय सुरेख शब्दांत व्यक्‍त केले आहे: “सर्व राष्ट्रे आपापल्या दैवतांच्या नावाने चालत आहेत; पण आम्ही परमेश्‍वर आमचा देव याच्या नावाने सदासर्वकाळ चालू.” तुम्ही हे वरदान मिळवू इच्छिता का? यहोवा ज्याला “खरे जीवन” म्हणतो ते जीवन तुम्हाला हवेहवेसे वाटते का? (१ तीमथ्य ६:१९) तर मग आज, उद्या व चिरकाल यहोवाबरोबर चालत राहण्याचा दृढ निश्‍चय करा! (w०५ ११/१)

[तळटीप]

^ परि. 5 काही बायबल भाषांतरांत या वचनात “गजभर” म्हणण्याऐवजी “क्षणभर” (दी एम्फॅटिक डायग्लॉट्‌) किंवा “घटकाभर” (चार्ल्स बी. विल्यम्स यांचे अ ट्रान्सलेशन इन द लँग्वेज ऑफ द पीपल) हे शब्द वापरले आहेत. पण मूळ भाषेत वापरलेल्या शब्दाचा अर्थ निश्‍चितच एक गज म्हणजेच जवळजवळ १८ इंच असा आहे.

तुमचे उत्तर काय?

• देवाबरोबर चालण्याचा काय अर्थ होतो?

• आपण देवाबरोबर चालणे गरजेचे आहे असे तुम्हाला का वाटते?

• देवाबरोबर चालण्यास तुम्हाला कशामुळे मदत मिळेल?

• जे देवाबरोबर चालतात त्यांना कोणते आशीर्वाद लाभतात?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२९ पानांवरील चित्र]

बायबलच्या पानांतून आपल्याला यहोवाची वाणी मागून कानी पडते, “हाच मार्ग आहे”

[३१ पानांवरील चित्र]

सभांतून आपल्याला आध्यात्मिक अर्थाने यथाकाळी खावयास मिळते