व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवा आपला मेंढपाळ आहे

यहोवा आपला मेंढपाळ आहे

यहोवा आपला मेंढपाळ आहे

“परमेश्‍वर माझा मेंढपाळ आहे; मला काही उणे पडणार नाही.”—स्तोत्र २३:१.

१-३. दाविदाने यहोवाची तुलना मेंढपाळाशी केली यात नवल का नाही?

यहोवा आपल्या लोकांची काळजी कशी घेतो याचे वर्णन करण्यास तुम्हाला सांगितले तर तुम्ही कसे वर्णन कराल? आपल्या विश्‍वासू सेवकांची तो ज्या कोमलतेने काळजी वाहतो त्याची तुलना तुम्ही कशाशी कराल? ३,००० वर्षांपूर्वी स्तोत्रकर्ता राजा दावीद याने यहोवाचे अतिशय सुरेख वर्णन केले. आपल्या तरुणपणाच्या व्यवसायाच्या आधारावर, दाविदाने यहोवाचे वर्णन करण्याकरता एक रूपक निवडले.

तरुणपणी दावीद मेंढपाळ होता. तेव्हा मेंढरांची काळजी घेण्याबद्दल त्याला बरीच माहिती होती. मेंढरांना एकटे सोडल्यास ते सहज वाट चुकू शकतात किंवा चोरांना किंवा हिंस्र पशूंना बळी पडू शकतात हे त्याला चांगले माहीत होते. (१ शमुवेल १७:३४-३६) काळजी घेणारा मेंढपाळ असल्याखेरीज मेंढरांना हिरवीगार कुरणे व खायला गवत सापडणार नाही. दाविदाच्या नंतरच्या आयुष्यात, तरुणपणी मेंढरांना जंगलांतून नेताना, त्यांचे संरक्षण करताना व त्यांना चारताना आलेले अनेक अनुभव त्याला आठवले असतील.

यहोवा आपल्या लोकांची कशी काळजी घेतो याविषयी लिहिण्यास दाविदाला प्रेरित करण्यात आले तेव्हा त्याला मेंढपाळाचे उदाहरण आठवले यात काही आश्‍चर्य नाही. दाविदाने लिहिलेल्या २३ व्या स्तोत्राची या शब्दांनी सुरुवात होते: “परमेश्‍वर माझा मेंढपाळ आहे. मला काही उणे पडणार नाही.” हे विधान अगदी योग्य का आहे हे आपण पाहूया. मग स्तोत्र २३ च्या आधारावर आपण अशा निरनिराळ्या मार्गांचा विचार करूया, ज्यांद्वारे यहोवा आपल्या लोकांची मेंढपाळाप्रमाणे काळजी घेतो.—१ पेत्र २:२५.

अचूक तुलना

४, ५. मेंढरांच्या गुणवैशिष्ट्यांचे बायबलमध्ये कशाप्रकारे वर्णन केले आहे?

बायबलमध्ये यहोवाचे वर्णन करण्याकरता निरनिराळ्या पदांचा उपयोग केला आहे, पण त्यांपैकी “मेंढपाळ” म्हणून केलेले वर्णन सर्वात हळवे आहे. (स्तोत्र ८०:१) यहोवाला मेंढपाळ म्हणणे उचित का आहे हे समजून घेण्याकरता आधी आपण दोन गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत: पहिली, मेंढरांचे स्वाभाविक गुण आणि दुसरी, चांगल्या मेंढपाळाला करावी लागणारी कामे व त्याचे आवश्‍यक गुण.

बायबलमध्ये बरेचदा मेंढरांच्या गुणवैशिष्ट्यांचा उल्लेख आढळतो. उदाहरणार्थ, मेंढपाळाच्या प्रेमळ वागणुकीला लगेच प्रतिसाद देणारे (२ शमुवेल १२:३), गरीब स्वभावाचे (यशया ५३:७), व असहाय्य (मीखा ५:८) असे त्यांचे वर्णन केलेले आढळते. बरीच वर्षे मेंढरांचे संगोपन केलेल्या एका लेखकाने म्हटले: “काही लोकांना वाटते त्याप्रमाणे मेंढरे स्वावलंबी असतात हे खरे नाही. उलट इतर कोणत्याही जनावरांपेक्षा त्यांच्याकडे सतत लक्ष द्यावे लागते व त्यांची अतिशय दक्षतेने काळजी घ्यावी लागते.” प्रेमळ मेंढपाळ नसल्यास हे असहाय्य प्राणी जिवंत राहू शकत नाहीत.—यहेज्केल ३४:५.

६. प्राचीन काळातील मेंढपाळाच्या सर्वसामान्य दिवसाचे एका बायबल शब्दकोशात कशाप्रकारे वर्णन केले आहे?

प्राचीन काळी मेंढपाळाचा सर्वसामान्य दिवस कसा जाई? बायबलच्या एका शब्दकोशात असा खुलासा केला आहे: “पहाटेच तो कळपाला मेंढवाड्यातून बाहेर काढी व त्यांच्या पुढे पुढे चालून त्यांना कुरणापर्यंत नेई. इथे तो दिवसभर त्यांच्यावर लक्ष ठेवी. एकही मेंढरू वाट चुकून कळपापासून दूर जाऊ नये याची तो काळजी घेई. त्याची नजर चुकवून एखादे मेंढरू इतरांपासून दूर गेले व हरवलेच, तर ते सापडेपर्यंत तो त्याचा शोध घेई व त्याला परत आणी. . . . रात्री तो कळपाला मेंढवाड्यात परत घेऊन येई व मेंढवाड्याच्या दारातून एक एक मेंढरू काठीखालून आत जात असताना तो त्यांना मोजून एकही हरवलेले नाही याची खात्री करी. . . . बरेचदा हिंस्र पशूंच्या व चोरांच्या भीतीमुळे त्याला रात्रभर मेंढवाड्याचे राखण करावे लागे.” *

७. कधीकधी मेंढपाळाला अधिक सहनशीलतेने व कोमलतेने का वागावे लागायचे?

कधीकधी मेंढरांशी, विशेषतः गाभण मेंढ्यांशी व कोकरांशी खूपच सहनशीलतेने व कोमलतेने वागावे लागते. (उत्पत्ति ३३:१३) बायबलवरील एका संदर्भ ग्रंथात असे म्हटले आहे: “सहसा दूर कोठेतरी डोंगरांत एखादी मेंढी पिलाला जन्म देते. त्या असहाय्य क्षणांत मेंढपाळ तिचे रक्षण करतो आणि नवजात कोकराला हळुवार उचलून मेंढवाड्यात परत आणतो. काही दिवस, त्याला स्वतःहून चालायला येईपर्यंत मेंढपाळ त्याला आपल्या हातात किंवा ढगळ झग्याच्या घड्यांमध्ये उचलून नेतो.” (यशया ४०:१०, ११) चांगल्या मेंढपाळात कणखर व कोमल गुणांचा मेळ असणे गरजेचे होते हे यावरून स्पष्ट होते.

८. यहोवाविषयी आत्मविश्‍वास बाळगण्याची कोणती कारणे दावीद सांगतो?

“परमेश्‍वर माझा मेंढपाळ आहे”—हे आपल्या स्वर्गीय पित्याचे अगदी योग्य वर्णन नाही का? स्तोत्र २३ चे परीक्षण करताना आपण पाहू की देव कशाप्रकारे एखाद्या मेंढपाळासारखाच कधी कणखरपणे तर कधी कोमलपणे आपली काळजी वाहतो. १ ल्या वचनात दावीद आत्मविश्‍वास व्यक्‍त करतो की आपल्या मेंढरांना काहीही ‘उणे पडू’ नये म्हणून देव सर्व आवश्‍यक तरतुदी करेल. पुढील वचनांत, दावीद असा आत्मविश्‍वास बाळगण्याकरता तीन कारणे सांगतो: यहोवा आपल्या मेंढरांचे मार्गदर्शन करतो, संरक्षण करतो व त्यांचे पालनपोषण करतो. यांपैकी प्रत्येक गोष्टीची आपण एकेक करून चर्चा करू.

‘तो मला नीतिमार्गांनी चालवितो’

९. दावीद कोणते शांतीदायक चित्र रेखाटतो आणि मेंढरे अशा ठिकाणी कसे येऊ शकतात?

पहिले म्हणजे यहोवा आपल्या लोकांचे मार्गदर्शन करतो. दावीद लिहितो: “तो मला हिरव्यागार कुरणात बसवितो; तो मला संथ पाण्यावर नेतो. तो माझा जीव ताजातवाना करितो; तो आपल्या नावासाठी मला नीतिमार्गांनी चालवितो.” (स्तोत्र २३:२, ३) मेंढरांचा एक कळप हिरव्यागार कुरणात शांतपणे पहुडला आहे—दावीद येथे तृप्तता, विश्रांती व सुरक्षिततेची भावना व्यक्‍त करणारे चित्र रेखाटतो. ‘कुरण’ असे भाषांतर केलेल्या इब्री शब्दाचा अर्थ “एक सुखावह ठिकाण” असाही होऊ शकतो. साहजिकच मेंढरे स्वतःहून असे ठिकाण शोधू शकत नाही की जेथे त्यांना अगदी शांतपणे विश्रांती घेता येईल. त्यांचा मेंढपाळच त्यांना अशा ‘सुखावह ठिकाणी’ नेऊ शकतो.

१०. देवाला आपल्याबद्दल खात्री आहे हे तो कशाप्रकारे दाखवतो?

१० आज यहोवा कशाप्रकारे आपले मार्गदर्शन करत आहे? एक मार्ग म्हणजे त्याचे स्वतःचे उदाहरण. त्याचे वचन आपल्याला “[देवाचे] अनुकरण करणारे व्हा” असे प्रोत्साहन देते. (इफिसकर ५:१) या शब्दांच्या संदर्भात कनवाळूपणा, क्षमाशीलता व प्रीती यांसारख्या गुणांचा उल्लेख केलेला आढळतो. (इफिसकर ४:३२; ५:२) हे मोहक गुण आपल्या वागणुकीतून व्यक्‍त करण्याच्या बाबतीत निश्‍चितच यहोवा स्वतः सर्वात उत्तम आदर्श आपल्यापुढे मांडतो. त्याचे अनुकरण करण्यास सांगून तो आपल्याकडून अवाजवी अपेक्षा करत आहे का? नाही. उलट ही देवप्रेरित आज्ञा या गोष्टीचा एक अद्‌भूत पुरावा आहे की देवाला आपल्याबद्दल आत्मविश्‍वास वाटतो. कशाप्रकारे? आपल्याला देवाच्या प्रतिरूपात निर्माण करण्यात आले आहे. त्याअर्थी, आपल्याठायी नैतिक गुण आहेत आणि आध्यात्मिक गोष्टींबद्दल आस्था बाळगण्याची क्षमता आहे. (उत्पत्ति १:२६) यहोवाला हे माहीत आहे की आपण अपरिपूर्ण असलो तरीही आपल्याजवळ त्याचे गुण आत्मसात करण्याची कुवत आहे. जरा विचार करा—आपल्या प्रेमळ देवाला खात्री आहे की आपण त्याच्यासारखे होऊ शकतो. जर आपण त्याचे अनुकरण केले तर तो आपले मार्गदर्शन करेल. जणू तो आपल्याला ‘संथ पाण्याच्या’ सुखावह ठिकाणी नेईल. हिंसाचाराने भरलेल्या या जगात राहात असतानाही आपण “निर्भय” राहू आणि देव आपल्याबाबतीत संतुष्ट आहे या जाणिवेमुळे आपल्याला एक अद्‌भुत शांती अनुभवायला मिळेल.—स्तोत्र ४:८; २९:११.

११. आपल्या मेंढरांचे मार्गदर्शन करताना यहोवा कशाची दखल घेतो आणि आपल्याकडून तो जी अपेक्षा करतो यावरून हे कशाप्रकारे दिसून येते?

११ यहोवा अतिशय हळुवारपणे व सहनशीलतेने आपले मार्गदर्शन करतो. मेंढपाळ आपल्या मेंढरांची दुर्बलता लक्षात घेतो आणि म्हणून, ‘त्यांच्याने चालवेल तसा तो हळूहळू’ त्यांना नेतो. (उत्पत्ति ३३:१४) त्याचप्रकारे यहोवा देखील आपल्या मेंढरांना, ‘त्यांच्याने चालवेल तसे’ नेतो. आपल्या क्षमतांची व परिस्थितीची तो दखल घेतो. खरे पाहता, तो आपल्याला हळूहळू चालवतो, आपल्या सामर्थ्यापेक्षा अधिक तो आपल्याकडून कधीही अपेक्षा करत नाही. तो एवढीच अपेक्षा करतो की आपली सेवा मनःपूर्वक असावी. (कलस्सैकर ३:२३) पण समजा वयोमानामुळे आता तुम्ही पूर्वीइतके करू शकत नसाल तर? किंवा गंभीर आजारपणामुळे तुम्हाला जास्त काही करता येत नसेल तर? देव मनःपूर्वक सेवेची जी अपेक्षा करतो त्याचे हेच तर वैशिष्ट्य आहे. कारण कोणत्याही दोन व्यक्‍ती सारख्या नसतात. तेव्हा मनःपूर्वक सेवा करण्याचा अर्थ असा होता की देवाच्या सेवेत तुम्हाला जितके शक्य आहे तितके तुम्ही आपली संपूर्ण शक्‍तीसामर्थ्य लावून, जास्तीतजास्त करावे. दुर्बलतेमुळे आपला वेग कमीजास्त झाला तरीही यहोवा आपल्या मनःपूर्वक उपासनेची कदर करतो.—मार्क १२:२९, ३०.

१२. यहोवा आपल्या मेंढरांना ‘चालवेल तसे’ नेतो हे मोशेच्या नियमशास्रातील कोणत्या उदाहरणावरून दिसून येते?

१२ यहोवा आपल्या मेंढरांना ‘चालवेल तसे’ नेतो याचे एक उदाहरण म्हणजे मोशेच्या नियमशास्त्रात पापार्पणे देण्याविषयी सांगितलेले नियम. यहोवाला कृतज्ञ हृदयातून प्रेरित झालेली उत्तम प्रतीची अर्पणे हवी होती. पण त्यासोबतच, अर्पण देणाऱ्‍याच्या ऐपतीप्रमाणे या बलिदानांची विभागणी करण्यात आली होती. नियमशास्त्रात असे सांगितले होते: “त्याला कोकरू देण्याची ऐपत नसेल तर त्याने . . . दोन होले अथवा पारव्याची दोन पिले . . . आणावी.” जर दोन पारवे देण्याचीही त्याची ऐपत नसेल तर? तर तो “सपीठ” अर्पण करू शकत होता. (लेवीय ५:७, ११) यावरून हे दिसून येते की अर्पण देणाऱ्‍याच्या अवाक्याबाहेर जे होते त्याची यहोवाने अपेक्षा केली नाही. देव बदलत नाही. त्याअर्थी आपल्याला हे जाणून सांत्वन मिळू शकते की तो कधीही आपल्या शक्‍तीपलीकडे असलेल्या गोष्टींची अपेक्षा आपल्याकडून करत नाही; उलट, आपण आपल्या परीने जे काही देतो ते तो आनंदाने स्वीकारतो. (मलाखी ३:६) खरोखर, अशा समजूतदार मेंढपाळाच्या मार्गदर्शनानुसार चालणे किती आनंददायक आहे!

“मी . . . कसल्याहि अरिष्टाला भिणार नाही कारण तू माझ्याबरोबर आहेस”

१३. स्तोत्र २३:४ यात दावीद कशाप्रकारे आणखी आपुलकीने यहोवाला संबोधतो आणि यात काही नवल का नाही?

१३ दावीद आपल्या आत्मविश्‍वासाचे आणखी एक कारण सांगतो: यहोवा आपल्या मेंढरांचे संरक्षण करतो. दावीद लिहितो: “मृत्युच्छायेच्या दरीतूनहि मी जात असलो तरी कसल्याहि अरिष्टाला भिणार नाही, कारण तू माझ्याबरोबर आहेस; तुझी आंकडी व तुझी काठी मला धीर देतात.” (स्तोत्र २३:४) दावीद आता आणखी आपुलकीने आपल्या भावना व्यक्‍त करतो आणि यहोवाला “तू” या सर्वनामाने संबोधतो. यात नवल काही नाही कारण देवाने त्याला संकटांत कशाप्रकारे धीर धरण्यास मदत केली याविषयी दावीद येथे सांगत आहे. दावीद आपल्या जीवनात अनेक संकटमय दऱ्‍यांतून गेला होता—कित्येकदा त्याचा जीव धोक्यात होता. पण त्याने कधीही स्वतःला भीतीने गाफील होऊ दिले नाही कारण देव आपल्याबरोबर आहे, त्याची “आकडी” व “काठी” आपली मदत करण्यासाठी सुसज्ज आहे याची त्याला जाणीव होती. या संरक्षणाच्या जाणिवेने दाविदाला सांत्वन दिले आणि साहजिकच यामुळे तो यहोवाच्या आणखी जवळ आला. *

१४. यहोवा देत असलेल्या संरक्षणासंबंधी बायबल कोणते आश्‍वासन आपल्याला देते पण याचा काय अर्थ होत नाही?

१४ आज यहोवा आपल्या मेंढरांचे कशाप्रकारे संरक्षण करतो? बायबल आपल्याला आश्‍वासन देते की कोणतेही विरोधी मग ते पिशाच्च असोत वा मानव ते कधीही त्याच्या मेंढरांना या पृथ्वीवरून नाहीसे करण्यात यशस्वी होऊ शकणार नाहीत. यहोवा कधीही असे घडू देणार नाही. (यशया ५४:१७; २ पेत्र २:९) पण आपला मेंढपाळ सर्व संकटांपासून आपले रक्षण करेल असा याचा अर्थ होत नाही. मानवांना सर्वसामान्यपणे ज्या परीक्षांना तोंड द्यावे लागते त्या परीक्षा आपल्यालाही अनुभवाव्या लागू शकतात आणि सर्व खऱ्‍या ख्रिश्‍चनांप्रमाणे आपल्यालाही विरोधाला तोंड द्यावे लागते. (२ तीमथ्य ३:१२; याकोब १:२) काही प्रसंग आपल्यावर असे येतात जेव्हा आपण जणू ‘मृत्यूछायेच्या दरीतून’ जात असतो. उदाहरणार्थ, छळामुळे किंवा आजारपणामुळे आपण मृत्यूच्या अगदी दाराशी येऊन पोचू शकतो. किंवा कदाचित आपली एखादी प्रिय व्यक्‍ती मृत्यूच्या अगदी समोरासमोर येते, आणि कदाचित मृत्यूला बळीही पडू शकते. जीवनातल्या त्या सर्वात अंधाऱ्‍या क्षणांत आपला मेंढपाळ आपल्याजवळ असतो आणि तो आपले संरक्षण करतो. कसे?

१५, १६. (क) आपल्यासमोर येणाऱ्‍या समस्यांना तोंड देण्यास यहोवा आपली कशी मदत करतो? (ख) परीक्षांना तोंड देताना यहोवा आपल्याला मदत करतो हे दाखवण्याकरता एक अनुभव सांगा.

१५ यहोवा चमत्कारिकरित्या आपल्या वतीने कार्य करण्याचे आश्‍वासन आपल्याला देत नाही. * पण एक गोष्ट मात्र निश्‍चित आहे: आपल्याला कोणत्याही समस्यांना तोंड द्यावे लागले तरीसुद्धा तो त्यांच्यावर मात करण्यास आपल्याला मदत करेल. तो “नाना प्रकारच्या परीक्षांना” तोंड देण्याकरता आपल्याला सुबुद्धी देऊ शकतो. (याकोब १:२-५) मेंढपाळ फक्‍त हिंस्र प्राण्यांना पिटाळून लावण्यासाठीच आपल्या आकडीचा किंवा काठीचा उपयोग करत नाही; तर कधीकधी आपल्या मेंढरांना योग्य दिशेने नेण्याकरता त्यांना तो हळूच काठीने ढोसणी देतो. यहोवा पण आपल्या विशिष्ट परिस्थितीत मदतदायी ठरू शकेल अशा बायबल आधारित सल्ल्याचे पालन करण्याकरता कदाचित एखाद्या सहविश्‍वासू भावाच्या अथवा बहिणीच्या माध्यमाने अशीच “ढोसणी” देऊ शकतो. शिवाय यहोवा आपल्याला धीर धरण्याकरता ताकद देऊ शकतो. (फिलिप्पैकर ४:१३) त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे तो आपल्याला ‘पराकोटीचे सामर्थ्य’ देऊ शकतो. (२ करिंथकर ४:७) देवाचा आत्मा आपल्याला सैतानाने आपल्यावर आणलेल्या कोणत्याही परीक्षेत धीर धरण्यास समर्थ बनवू शकतो. (१ करिंथकर १०:१३) यहोवा सदोदीत आपली मदत करण्यास तयार आहे हे जाणून आपल्याला सांत्वन मिळत नाही का?

१६ होय, आपल्याला कोणत्याही अंधाऱ्‍या दरीतून जावे लागले तरीही आपल्याला एकटे चालण्याची गरज नाही. आपला मेंढपाळ आपल्यासोबत आहे आणि आपल्याला सुरुवातीला समजणारही नाही अशा मार्गांनी तो आपल्याला मदत करतो. मेंदूचा कर्करोग झालेल्या एका ख्रिस्ती वडिलांचा अनुभव पाहा: “सुरुवातीला, यहोवा मला कशाचीतरी शिक्षा देतोय, त्याचे माझ्यावर प्रेम नाही असे मला वाटू लागले हे मी कबूल करतो. तरीपण मी ठरवले, काही झाले तरी यहोवाकडे पाठ फिरवायची नाही. त्याऐवजी मी आपल्या सर्व काळज्या-चिंता यहोवाजवळ बोलून दाखवल्या. आणि खरोखरच यहोवाने मला मदत केली. कित्येकदा माझ्या भावाबहिणींच्या माध्यमाने त्याने माझे सांत्वन केले. बऱ्‍याच बांधवांनी गंभीर आजारपणाला तोंड देण्यासंबंधी त्यांचे अनुभव सांगितले व उपयोगी सल्ला दिला. अशाप्रकारच्या टिपण्या ऐकल्यावर मला जाणवायचे की आपण ज्या अनुभवातून जात आहोत तो काही असामान्य नाही. बांधवांनी दिलेली व्यावहारिक मदत, कधीकधी मनाला स्पर्शून जाणारी त्यांची दयाळू कृत्ये या सर्वांवरून मला खात्री पटली की यहोवा माझ्यावर नाराज नाही. अर्थात मला या आजारपणाशी झुंजत राहावे लागणार आणि याचा शेवट काय होणार हे मला माहीत नाही. पण मला खात्री आहे की यहोवा माझ्याबरोबर आहे आणि या परीक्षेतून जाण्यास तो शेवटपर्यंत मला मदत करत राहील.”

“तू . . . माझ्यापुढे ताट वाढितोस”

१७. स्तोत्र २३:५ यात दावीद यहोवाचे कसे वर्णन करतो आणि मेंढपाळाच्या उदाहरणांत व या उदाहरणात विरोधाभास का नाही?

१७ दावीद आपल्या मेंढपाळाविषयी आत्मविश्‍वास बाळगण्याचे तिसरे कारण सांगतो: यहोवा आपल्या मेंढरांचे पालनपोषण करतो व त्यांना विपुलतेने सर्वकाही पुरवतो. दावीद लिहितो: “तू माझ्या शत्रूंच्या देखत माझ्यापुढे ताट वाढितोस; तू माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करितोस; माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे.” (स्तोत्र २३:५) या वचनात दावीद आपल्या मेंढपाळाचे वर्णन एका उदार यजमानाच्या रूपात करतो जो विपुल मात्रेत खाण्यापिण्याच्या उत्तम वस्तू पुरवतो. प्रेमळ मेंढपाळ आणि उदार यजमानाच्या या दोन रूपकांत कोणताही विरोधाभास नाही. कारण चांगल्या मेंढपाळालाही हिरवीगार, गवताळ कुरणे आणि भरपूर पाणी असलेली ठिकाणे कोठे आहे हे माहीत असावे लागते; म्हणूनच त्याच्या कळपाला “काही उणे पडणार नाही.”—स्तोत्र २३:१, २.

१८. यहोवा उदार आहे हे कशावरून दिसून येते?

१८ आपला मेंढपाळ उदार देखील आहे का? यात काही शंका नाही! आपल्याला किती दर्जेदार, किती विपुल प्रमाणात व किती वैविध्यपूर्ण आध्यात्मिक अन्‍न उपलब्ध आहे याचा विचार करा. विश्‍वासू व बुद्धिमान दासाच्या माध्यमाने यहोवाने आपल्याकरता उपयुक्‍त प्रकाशने, तसेच सभा, संमेलने व अधिवेशने यांकरवी उद्‌बोधक आध्यात्मिक कार्यक्रम पुरवले आहेत व या सर्व तरतुदींमुळे आपल्या आध्यात्मिक गरजा भागवल्या जातात. (मत्तय २४:४५-४७) निश्‍चितच आध्यात्मिक अन्‍न अगदी विपुल प्रमाणात उपलब्ध आहे. ‘विश्‍वासू व बुद्धिमान दासाने’ कोट्यवधी बायबल व बायबल आधारित प्रकाशने तयार केली आहेत आणि ही प्रकाशने आता ४१३ भाषांतून उपलब्ध आहेत. यहोवाने हे आध्यात्मिक अन्‍न अगदी ‘दुधापासून’ म्हणजे मूलभूत बायबल शिकवणुकींपासून ‘जड अन्‍नापर्यंत’ म्हणजेच गहन आध्यात्मिक माहितीपर्यंत विविध रूपांत सादर केले आहे. (इब्री लोकांस ५:११-१४) परिणामस्वरूप, आपल्याला जेव्हा समस्यांना तोंड द्यावे लागते अथवा निर्णय घ्यावे लागतात तेव्हा अगदी आपल्याला ज्याची गरज असते ते अचूक साहित्य आपल्याला मिळू शकते. हे आध्यात्मिक अन्‍न नसते तर आपण काय केले असते? खरोखर आपला मेंढपाळ अतिशय उदार आहे!—यशया २५:६; ६५:१३.

“परमेश्‍वराच्या घरात मी चिरकाल राहीन”

१९, २०. (क) स्तोत्र २३:६ यात दावीद कोणता आत्मविश्‍वास व्यक्‍त करतो आणि हाच आत्मविश्‍वास आपणही कसा व्यक्‍त करू शकतो? (ख) पुढच्या लेखात कशाविषयी चर्चा केली जाईल?

१९ आपला मेंढपाळ व पोषण करणारा यहोवा देव कशाप्रकारे आपली काळजी वाहतो यावर मनन केल्यानंतर दावीद शेवटी असे म्हणतो: “खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दया ही लाभतील; आणि परमेश्‍वराच्या घरात मी चिरकाल राहीन.” (स्तोत्र २३:६) असे म्हणताना दाविदाचे हृदय गतकाळातील घटना आठवून कृतज्ञतेने भरून येते व तो पूर्ण विश्‍वासाने भविष्याकडे पाहतो. पूर्वीच्या या मेंढपाळाला पूर्णतः सुरक्षित वाटते कारण त्याला माहीत आहे की जोपर्यंत तो आपल्या स्वर्गीय मेंढपाळाच्या जवळ राहील, जणू त्याच्या घरात राहील तोपर्यंत यहोवा प्रेमळपणे त्याची काळजी वाहत राहील.

२० तेविसाव्या स्तोत्रात लिहिलेल्या सुरेख शब्दांबद्दल आपण किती कृतज्ञ आहोत! यहोवा कशाप्रकारे आपल्या लोकांचे मार्गदर्शन, संरक्षण व पालनपोषण करतो हे किती उत्कृष्ट पद्धतीने दाविदाने मांडले! दाविदाचे मनस्वी उद्‌गार बायबलमध्ये आपल्याकरता जपून ठेवण्यात आले आहे जेणेकरून आपणही आत्मविश्‍वासाने यहोवाला आपला मेंढपाळ समजावे व त्याच्याकडे दृष्टी लावावी. होय, जोपर्यंत आपण यहोवाच्या जवळ राहू तोपर्यंत तो एका प्रेमळ मेंढपाळाप्रमाणे “चिरकाल” आपला संभाळ करील. पण त्याची मेंढरे या नात्याने आपली जबाबदारी ही आहे की आपण आपला महान मेंढपाळ यहोवा याच्यासोबत चालावे. याचा काय अर्थ होतो हे आपण पुढच्या लेखात पाहणार आहोत. (w०५ ११/१)

[तळटीपा]

^ परि. 13 दाविदाने रचलेल्या अनेक स्तोत्रांत त्याने संकटांतून आपल्याला सोडवल्याबद्दल यहोवाची स्तुती केली.—उदाहरणार्थ, स्तोत्र १८, ३४, ५६, ५७, ५९ व ६३ यांचे उपरिलेखन पाहावे.

^ परि. 15 टेहळणी बुरूज ऑक्टोबर १, २००३ अंकातील “ईश्‍वरी हस्तक्षेप—आपण कशाची अपेक्षा करू शकतो?” हा लेख पाहा.

तुम्हाला आठवते का?

• दाविदाने यहोवाची तुलना एका मेंढपाळाशी केली हे योग्यच का आहे?

• यहोवा कशाप्रकारे आपले समजूतदारपणे मार्गदर्शन करतो?

• यहोवा आपल्याला परीक्षांना तोंड देण्यास कशाप्रकारे मदत करतो?

• यहोवा उदारपणे आपल्या गरजा भागवतो हे कशावरून दिसून येते?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२४ पानांवरील चित्र]

इस्राएलातील मेंढपाळाप्रमाणे यहोवा त्याच्या मेंढरांचे मार्गदर्शन करतो