व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

दुसरा इतिहास पुस्तकातील ठळक मुद्दे

दुसरा इतिहास पुस्तकातील ठळक मुद्दे

यहोवाचे वचन सजीव आहे

दुसरा इतिहास पुस्तकातील ठळक मुद्दे

दुसरा इतिहास पुस्तकातील अहवाल सुरू होतो तेव्हा शलमोन इस्राएलवर राज्य करत असतो. या पुस्तकाचा शेवट पारसचा राजा कोरेश याने बॅबेलोनातील बंदिवान इस्राएलांना म्हटलेल्या या शब्दांनी होतो: “स्वर्गीचा देव परमेश्‍वर याने पृथ्वीवरील सर्व राज्ये मला दिली आहेत व मला आज्ञा केली आहे की यहूदातील यरुशलेमेत माझ्याप्रीत्यर्थ एक मंदिर बांध. तर तुम्हापैकी त्याच्या सर्व लोकातील जो कोणी असेल—त्याच्याबरोबर त्याचा देव परमेश्‍वर असो—त्याने तेथे जावे.” (२ इतिहास ३६:२३) सा.यु.पू. ४६० साली एज्रा याजकाने लिहून पूर्ण केलेल्या या पुस्तकात ५०० वर्षांचा—सा.यु.पू. १०३७ पासून सा.यु.पू. ५३७ पर्यंतचा अहवाल आहे.

कोरेशच्या आज्ञेमुळे यहुद्यांना जेरूसलेमला परत येऊन तेथे यहोवाची उपासना पुनःस्थापित करण्याची संधी मिळते. पण अनेक वर्षे बॅबिलोनच्या बंदिवासात घालवल्यामुळे अनेक दुष्परिणाम झाले आहेत. जेरूसलेमला परतलेल्या इस्राएलांना आपल्या राष्ट्राच्या इतिहासाविषयी फारशी माहिती नाही. दुसरा इतिहास या पुस्तकात दाविदाच्या राजघराण्यातील राजांच्या शासनकाळात घडलेल्या घटनांचे सविस्तर वर्णन आढळते. यातील वृत्तान्त देखील लक्ष देण्याजोगे आहेत कारण यांत खऱ्‍या देवाच्या आज्ञेत राहिल्यामुळे मिळणारे आशीर्वाद व त्याच्या आज्ञांचे उल्लंघन केल्यामुळे होणारे दुष्परिणाम स्पष्ट होतात.

राजा यहोवाकरता मंदिर बांधतो

(२ इतिहास १:१–९:३१)

यहोवा, राजा शलमोनाला त्याच्या विनंतीनुसार बुद्धी व ज्ञान देतो व त्यासोबतच भरपूर धनसंपत्ती व सन्मानही देतो. राजा शलमोन यहोवाच्या नावाप्रीत्यर्थ जेरूसलेम येथे एक भव्य मंदिर उभारतो आणि यामुळे लोक “आनंदित, हर्षितचित्त” होतात. (२ इतिहास ७:१०) शलमोन “धन व शहाणपण या बाबतीत पृथ्वीवरल्या सर्व राजाहून श्रेष्ठ [होतो].”—२ इतिहास ९:२२.

इस्राएलवर ४० वर्षे राज्य केल्यावर शलमोन ‘आपल्या पितराजवळ जाऊन निजतो व त्याचा पुत्र रहबाम त्याच्या जागी राजा होतो.’ (२ इतिहास ९:३१) शलमोन खऱ्‍या उपासनेपासून मार्गभ्रष्ट होण्याविषयी एज्राने लिहिले नाही. राजाविषयी त्याने केवळ या नकारात्मक गोष्टींचा उल्लेख केला की त्याने ईजिप्तमधून स्वतःकरता बरेच घोडे मिळवले आणि त्याने फारोच्या मुलीशी विवाह केला. अशारितीने इतिहासकार एज्रा सकारात्मक दृष्टिकोनातून हा अहवाल सादर करतो.

शास्त्रवचनीय प्रश्‍नांची उत्तरे:

२:१४—या वचनात कारागीराची वंशावळ १ राजे ७:१४ येथे दिलेल्या वंशावळीपेक्षा वेगळी का आहे? पहिले राजे यात कारागीराची आई ‘नफताली वंशांतील एक विधवा’ असल्याचे सांगितले आहे कारण तिचा पती या वंशाचा होता. पण ती स्वतः मात्र दान वंशाची होती. तिच्या पतीच्या मृत्यूनंतर तिने सोरच्या एका माणसाशी विवाह केला होता आणि याच विवाहानंतर कारागीराचा जन्म झाला होता.

२:१८; ८:१०—या वचनांत असे म्हटले आहे की मजूरांवर नेमलेल्या देखरेख्यांची व नायकांची संख्या ३,६०० व २५० इतकी होती पण १ राजे ५:१६; ९:२३ यांनुसार त्यांची संख्या ३,३०० व ५५० इतकी होती. या संख्यांमध्ये हा फरक का आहे? नायकांची विभागणी ज्याप्रकारे करण्यात आली आहे त्यामुळे हा फरक असावा. कदाचित दुसरा इतिहास यात ३,६०० विदेशी व २५० इस्राएली नायक असा फरक दाखवला आहे तर पहिले राजे यात ३,३०० अंमलदार व ५५० उच्च श्रेणीचे नायक असा फरक केला आहे. याचे कारण काहीही असो, नायक म्हणून कार्य करणाऱ्‍यांची एकूण संख्या मात्र ३,८५० इतकीच होती.

४:२-४—गंगाळसागराच्या खाली बैलांच्या आकृत्यांचा वापर का करण्यात आला? शास्त्रवचनांत शक्‍तीचे प्रतीक म्हणून बैलांचा उल्लेख करण्यात आला आहे. (यहेज्केल १:१०; प्रकटीकरण ४:६, ७) बैलांच्या आकृत्यांचा वापर योग्यच होता कारण या बारा तांब्याच्या बैलांवर जवळजवळ ३० टन वजनाचा “गंगाळसागर” ठेवण्यात आला होता. या उद्देशाकरता बैलांच्या प्रतीकाचा वापर केल्यामुळे दहा आज्ञांपैकी असलेल्या दुसऱ्‍या आज्ञेचे उल्लंघन झाले नाही कारण त्या आज्ञेनुसार उपासनेकरता कोणत्याही प्रतिमेचा वापर करण्यास मनाई होती.—निर्गम २०:४, ५.

४:५—गंगाळसागरात एकूण किती पाणी मावे? काठोकाठ भरल्यावर गंगाळसागरात तीन हजार बथ म्हणजेच ६६,००० लीटर पाणी मावे. पण सहसा यात एकूण क्षमतेपेक्षा दोन तृतीयांश पाणीच असे. पहिले राजे ७:२६ यात म्हटल्याप्रमाणे: “त्यात दोन हजार बथ [४४,००० लीटर] पाणी राहत असे.”

५:४, ५, १०—पूर्वीच्या निवासमंडपातील कोणकोणते सामान शलमोनाने बांधलेल्या मंदिरात ठेवण्यात आले? पूर्वीच्या निवासमंडपातील केवळ एकच वस्तू शलमोनाने बांधलेल्या मंदिरात ठेवण्यात आली व ती म्हणजे कराराचा कोश. मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्यावर निवासमंडप गिबोनातून जेरूसलेमला नेण्यात आला व तेथेच ठेवण्यात आला.—२ इतिहास १:३, ४.

आपल्याकरता धडे:

१:११, १२. शलमोनाने देवाला केलेल्या विनंतीवरून असे दिसून येते की बुद्धी व ज्ञान मिळवण्याची त्याला मनस्वी इच्छा होती. आपल्या प्रार्थनांवरूनही आपल्या मनस्वी इच्छा कोणत्या आहेत हे दिसून येते. तेव्हा आपण कशाविषयी प्रार्थना करतो हे तपासून पाहणे सूज्ञतेचे चिन्ह आहे.

६:४. यहोवाच्या प्रेमदयेबद्दल व चांगुलपणाबद्दल आपल्याला मनापासून कदर वाटली पाहिजे व या भावनेने आपल्याला यहोवाला धन्य म्हणण्यास अर्थात प्रेमाने व कृतज्ञतेने त्याची स्तुती करण्यास प्रेरित केले पाहिजे.

६:१८-२१. मानवाने बांधलेल्या वास्तूत देव राहात नसला तरीसुद्धा यहोवाचे मंदिर हे त्याच्या उपासनेचे केंद्र ठरणार होते. आज यहोवाच्या साक्षीदारांची राज्य सभागृहे त्या त्या परिसरात खऱ्‍या उपासनेची केंद्रे आहेत.

६:१९, २२, ३२. यहोवाला प्रार्थना करण्याची संधी प्रत्येकाला खुली होती, मग तो राजा असो, एखादा दरिद्री माणूस असो किंवा प्रांजळपणे प्रार्थना करणारा एखादा विदेशी असो. *स्तोत्र ६५:२.

दाविदाच्या वंशावळीतील राजे

(२ इतिहास १०:१–३६:२३)

इस्राएलचे संयुक्‍त राष्ट्र दुभंगते—उत्तरेकडील दहा गोत्रांचे राज्य व दक्षिणेकडील यहुदा व बन्यामीन या दोन गोत्रांचे दुसरे राज्य निर्माण होते. सबंध इस्राएलातील याजक व लेवी राष्ट्राभिमानापेक्षा राज्याच्या कराराला एकनिष्ठ राहण्याचे ठरवतात आणि त्यामुळे ते शलमोनाचा पुत्र रहबाम याच्या पाठीशी उभे राहतात. मंदिर बांधून ३० वर्षेही पूर्ण होत नाहीत तर ते लुटले जाते.

रहबामानंतर झालेल्या १९ राजांपैकी ५ राजे देवाला विश्‍वासू राहतात, ३ सुरुवातीला विश्‍वासू राहतात पण नंतर अविश्‍वासू बनतात आणि एक राजा वाईट मार्गातून फिरून योग्य मार्गावर येतो. बाकीचे सर्व राजे यहोवाच्या नजरेत वाईट कृत्ये करतात. * यहोवावर भरवसा ठेवणाऱ्‍या पाच राजांच्या कारभारावर या पुस्तकात भर देण्यात आला आहे. हिज्किया राजाने कशाप्रकारे मंदिराच्या सेवा पूर्ववत सुरू केल्या व योशिया राजाने कशाप्रकारे वल्हांडणाचा मोठा सण साजरा केला याचा अहवाल वाचल्यावर जेरूसलेममध्ये यहोवाच्या उपासनेची पुनःस्थापना करण्यास उत्सुक असणाऱ्‍या यहुद्यांना निश्‍चितच खूप प्रोत्साहन मिळाले असावे.

शास्त्रवचनीय प्रश्‍नांची उत्तरे:

१३:५—“मिठाचा करार” या संज्ञेचा काय अर्थ होतो? मीठात पदार्थ टिकवण्याचा गुण असतो. त्यामुळे मीठ हे टिकाऊपणा व स्थैर्याचे प्रतीक बनले. तेव्हा “मीठाचा करार” एका स्थायी ठरावाला सूचित करतो.

१४:२-५; १५:१७—आसाने सर्व “उच्च स्थाने” काढून टाकली का? नाही, त्याने सर्व उच्च स्थाने काढली नाहीत असे दिसते. कदाचित त्याने केवळ जेथे खोट्या दैवतांची उपासना केली जात होती तीच स्थाने नष्ट केली असावीत व जेथे लोक यहोवाची उपासना करीत होते, ती स्थाने त्याने नष्ट केली नाहीत. आसाच्या कारकीर्दीच्या उत्तरार्धात पुन्हा एकदा उच्च स्थाने बांधली गेली अशीही शक्यता नाकारता येत नाही. ही उच्च स्थाने त्याचा पुत्र यहोशाफाट याने नष्ट केली. खरे पाहता, यहोशाफाटाच्या राज्यातही ही उच्च स्थाने पूर्णपणे नाहीशी झाली नाहीत.—२ इतिहास १७:५, ६; २०:३१-३३.

१५:९; ३४:६—इस्राएल राष्ट्राच्या फाळणीसंबंधी शिमोन वंशाची भूमिका काय होती? शिमोन वंशाला यहुदातील विविध ठिकाणे वतन मिळाल्यामुळे भौगोलिकदृष्ट्या शिमोन वंश यहुदा व बन्यामीनच्या राज्यात समाविष्ट होता. (यहोशवा १९:१) पण धार्मिक व राजकीय दृष्ट्या या वंशाने स्वतःला उत्तरेकडील राज्यात सामील केले. (१ राजे ११:३०-३३; १२:२०-२४) म्हणूनच शिमोनाची गणना दहा गोत्रांच्या राज्यात करण्यात आली.

३५:३—योशियाने कोणत्या ठिकाणाहून पवित्र कोश मंदिरात आणण्यास लावला? कराराचा कोश पूर्वीच्या एखाद्या दुष्ट राजाने मंदिरातून काढला होता किंवा मंदिराच्या डागडुजीचे काम चालले असताना योशियाने स्वतः तो दुसऱ्‍या कोणत्या सुरक्षित स्थानी नेऊन ठेवला होता याविषयी बायबलमध्ये सांगितलेले नाही. शलमोनाच्या काळानंतर कराराच्या कोशाचा एकमेव ऐतिहासिक उल्लेख योशियाने तो मंदिरात परत आणला तेव्हाचा आहे.

आपल्याकरता धडे:

१३:१३-१८; १४:११, १२; ३२:९-२३. यहोवावर विसंबून राहण्याविषयी या वचनांतून आपण एक अप्रतिम धडा शिकू शकतो!

१६:१-५, ७; १८:१-३, २८-३२; २१:४-६; २२:१०-१२; २८:१६-२२. विदेश्‍यांबरोबर किंवा विश्‍वासात नसलेल्यांसोबत संबंध जोडल्यामुळे दुःखद परिणाम घडून येतात. जगासोबत अनावश्‍यक संबंध टाळणेच सुज्ञतेचे आहे.—योहान १७:१४, १६; याकोब ४:४.

१६:७-१२; २६:१६-२१; ३२:२५, २६. गर्विष्ठपणामुळे राजा आसा याने आपल्या जीवनाच्या शेवटल्या वर्षांमध्ये दुराचरण केले. गर्विष्ठ प्रवृत्तीमुळे उज्जाचे पतन घडले. हिज्कियाने अविचारीपणे आणि कदाचित गर्विष्टपणामुळेच बॅबिलोनच्या प्रतिनिधींना आपला सगळा खजिना दाखवला. (यशया ३९:१-७) बायबल बजावून सांगते, की “गर्व झाला की नाश ठेवलेला; मनाचा ताठा अधःपाताचे मूळ होय.”—नीतिसूत्रे १६:१८.

१६:९. जे पूर्ण अंतःकरणाने यहोवाची सेवा करतात त्यांना तो साहाय्य करतो आणि त्यांच्याकरता आपले सामर्थ्य प्रकट करण्यास तो उत्सुक असतो.

१८:१२, १३, २३, २४, २७. मीखायाप्रमाणे आपणही यहोवाबद्दल व त्याच्या उद्देशांबद्दल बोलताना धैर्यवान व निडर असले पाहिजे.

१९:१-३. आपण यहोवाला राग येईल असे वागतो तेव्हा देखील तो आपल्यात चांगले गुण शोधण्याचा प्रयत्न करतो.

२०:१-२८. आपण खात्री बाळगू शकतो की आपण नम्रपणे यहोवाचे मार्गदर्शन मिळवण्याचा प्रयत्न केल्यास तो आपल्याला त्याची ओळख घडू देईल.—नीतिसूत्रे १५:२९.

२०:१७. ‘परमेश्‍वराचे तारण’ पाहण्याकरता आपण त्याच्या राज्याला सक्रिय पाठिंबा देण्याद्वारे “आपल्या स्थानी उभे राहिले” पाहिजे. स्वतःहून काही करण्याचा प्रयत्न करण्याऐवजी यहोवावर पूर्ण भरवसा ठेवून आपण “स्थिर उभे राहिले” पाहिजे.

२४:१७-१९; २५:१४. यहोवाश व त्याचा पुत्र अमस्या मूर्तिपूजेला बळी पडले. आजही मूर्तिपूजेचा मोह, विशेषतः तो लोभीपणा किंवा राष्ट्रप्रेमी वृत्ती यांसारख्या अप्रत्यक्ष रूपांत असतो तेव्हा तितकाच धोकेदायक ठरू शकतो.—कलस्सैकर ३:५; प्रकटीकरण १३:४.

३२:६, ७. ‘देवाची शस्त्रसामग्री धारण करून’ आध्यात्मिक युद्ध लढताना आपणही धैर्यवान व निश्‍चयी असले पाहिजे.—इफिसकर ६:११-१८.

३३:२-९, १२, १३, १५, १६. चुकीचा मार्ग सोडून जे योग्य ते करण्याचा दृढनिश्‍चयाने प्रयत्न करणारी व्यक्‍ती दाखवते की तिने मनापासून पश्‍चात्ताप केला आहे. ज्या मनुष्याने राजा मनश्‍शे इतकी दुष्टाई केली असेल त्याला देखील खऱ्‍या पश्‍चात्तापाच्या आधारावर यहोवाची दया अनुभवता येते.

३४:१-३. लहानपणी आलेले कोणतेही वाईट अनुभव देवाला जाणून घेऊन त्याची सेवा करण्याच्या मार्गात अडथळा बनण्याची गरज नाही. योशियाच्या सुरवातीच्या वर्षांत त्याच्या पश्‍चात्तापी आजोबाचा अर्थात मनश्‍शेचा चांगला प्रभाव त्याच्यावर पडला असेल. योशियावर जो काही चांगला प्रभाव पडला त्यामुळे उत्तम परिणाम घडून आले. हेच आपल्या बाबतीतही घडू शकते.

३६:१५-१७. यहोवा दयाळू व सहनशील आहे. पण त्याच्या दयेला व सहनशीलतेलाही सीमा आहेत. या दुष्ट व्यवस्थीकरणाचा यहोवा नाश करेल तेव्हा ज्या कोणाची बचावण्याची इच्छा असेल त्यांनी आताच राज्याच्या प्रचार कार्याला चांगला प्रतिसाद देणे आवश्‍यक आहे.

३६:१७, २२, २३. यहोवाचे वचन नेहमी खरे ठरते.—१ राजे ९:७, ८; यिर्मया २५:९-११.

एका पुस्तकातून कार्य करण्याची प्रेरणा

दुसरा इतिहास ३४:३३ यात म्हटले आहे: “इस्राएल लोक ज्या ज्या देशी होते तेथून योशीयाने सर्व अमंगळ वस्तु काढून टाकिल्या आणि जितके इस्राएल त्यास मिळाले तितक्या सर्वांस त्याने त्यांचा देव परमेश्‍वर याची उपासना करावयास लाविले.” योशिया कशामुळे असे करण्यास प्रवृत्त झाला? शाफान चिटणीस याने नुकताच सापडलेला यहोवाच्या नियमांचा ग्रंथ आणून जेव्हा राजा योशियाला दिला तेव्हा राजाने तो मोठ्याने वाचून दाखवण्याची आज्ञा केली. त्या ग्रंथातली वचने ऐकून योशीयाच्या मनावर इतका परिणाम झाला की त्याने आपल्या सबंध आयुष्यभर खऱ्‍या उपासनेच्या विस्ताराकरता आवेशाने कार्य केले.

देवाच्या वचनाचे वाचन व त्यावर मनन केल्याने आपल्याही मनावर गहिरा प्रभाव पडू शकतो. दाविदाच्या कुळातील राजांचा अहवाल वाचून त्यावर विचार केल्यामुळे, ज्यांनी यहोवावर भरवसा ठेवला त्यांच्या उदाहरणाचे अनुकरण करण्याचे व ज्यांनी असे केले नाही त्यांच्यासारखी वागणूक टाळण्याचे आपल्याला प्रोत्साहन मिळत नाही का? दुसरा इतिहास यातील मजकूर आपल्याला खऱ्‍या देवाला अनन्य भक्‍ती देण्याची व त्याला सदैव विश्‍वासू राहण्याची प्रेरणा देतो. यातील संदेश निश्‍चितच सजीव व सक्रिय आहे.—इब्री लोकांस ४:१२. (w०५ १२/१)

[तळटीपा]

^ परि. 9 मंदिराच्या उद्‌घाटनासंबंधी, व त्याप्रसंगी शलमोनाने केलेल्या प्रार्थनेसंबंधी प्रश्‍न टेहळणी बुरूज जुलै १, २००५ अंकातील पृष्ठे २८-३१ वर सापडतील.

^ परि. 1 यहुदाच्या राजांची क्रमवार यादी टेहळणी बुरूज, ऑगस्ट १, २००५ अंकातील पृष्ठ १२ वर दिली आहे.

[१८ पानांवरील चित्र]

गंगाळसागराच्या खाली असलेल्या बैलांच्या आकृत्या उचित प्रतीक का होत्या हे तुम्हाला माहीत आहे का?

[२१ पानांवरील चित्र]

योशियाला लहानपणी फारशी मदत मिळाली नाही तरीही तो मोठा होऊन यहोवाला विश्‍वासू राहिला