व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

नवीन पद्धतींचा वापर करण्यास व जुळवून घेण्यास तयार असा

नवीन पद्धतींचा वापर करण्यास व जुळवून घेण्यास तयार असा

नवीन पद्धतींचा वापर करण्यास व जुळवून घेण्यास तयार असा

“मी सर्वांना सर्व काही झालो आहे, अशा हेतूने की, मी . . . कित्येकांचे तारण साधावे.”—१ करिंथकर ९:२२.

१, २. (क) प्रेषित पौल कोणत्या अर्थाने परिणामकारक सेवक होता? (ख) आपल्यावर सोपवण्यात आलेल्या कार्यासंबंधी पौलाने आपला दृष्टिकोन कशाप्रकारे व्यक्‍त केला?

बुद्धिवंत असोत किंवा तंबू बनवणारे गरीब कामगार असोत, त्यांच्यासोबत तो तितक्याच सहजपणे बोलत असे. त्याचा युक्‍तिवाद एकीकडे उच्चपदस्थ रोमी अधिकाऱ्‍यांना तर दुसरीकडे फ्रुगी शेतकऱ्‍यांनाही पटे. त्याचे लिखाण उदारमतवादी ग्रीकांनाच नव्हे तर रूढीप्रिय यहुद्यांनाही प्रेरणादायक वाटे. त्याचा तर्कवाद बिनतोड होता आणि आपल्या प्रभावशाली भाषणाने तो लोकांच्या अंतःकरणाचा ठाव घेई. प्रत्येक व्यक्‍तीशी बोलताना तो परस्पर संमतीचा कोणता न कोणता मुद्दा शोधून बोलत असे, या उद्देशाने की निदान काहींना ख्रिस्तावर विश्‍वास करण्यास प्रेरित करता यावे.—प्रेषितांची कृत्ये २०:२१.

हा मनुष्य होता प्रेषित पौल. तो अतिशय प्रभावशाली व प्रगतीशील सेवक होता यात शंका नाही. (१ तीमथ्य १:१२) येशूकडून त्याला “परराष्ट्रीय, राजे व इस्राएलाची संतति ह्‍यांच्यासमोर [ख्रिस्ताचे] नाव घेऊन जाण्याकरिता” निवडण्यात आले होते. (प्रेषितांची कृत्ये ९:१५) आपल्यावर सोपवण्यात आलेल्या या कामगिरीबद्दल त्याचा कसा दृष्टिकोन होता? त्याने म्हटले: “मी सर्वांना सर्व काही झालो आहे, अशा हेतूने की, मी सर्व प्रकारे कित्येकांचे तारण साधावे. मी सर्व काही सुवार्तेकरिता करितो, अशासाठी की, मी इतरांबरोबर तिचा भागीदार व्हावे.” (१ करिंथकर ९:१९-२३) प्रचार करण्याच्या व बायबल अभ्यास चालवण्याच्या कार्यात अधिक परिणामकारक होण्याकरता आपण पौलाकडून कोणता धडा घेऊ शकतो?

मत परिवर्तन झालेला पौल आव्हानाला सामोरे जातो

३. मतपरिवर्तन होण्याआधी पौलाच्या ख्रिश्‍चनांबद्दल कशा भावना होत्या?

पौल हा मुळातच सहनशील, सहानुभूतिशील मनोवृत्तीचा आणि आपल्यावर सोपवलेल्या कार्याकरता अगदी सुयोग्य असा मनुष्य होता का? मुळीच नाही! शौल (ज्याला नंतर पौल हे नाव पडले) हा एकेकाळी धर्मांधतेने झपाटलेला होता. तो ख्रिस्ताच्या अनुयायांचा हिंसक छळ करत होता. तरुणपणी त्याने, स्तेफनाचा वध होण्यास संमती दिली होती. नंतर त्याने क्रूरपणे ख्रिश्‍चनांना हुडकून त्यांचा छळ केला. (प्रेषितांची कृत्ये ७:५८; ८:१, ३; १ तीमथ्य १:१३) तो सतत “प्रभूच्या शिष्यांना धमक्या देणे व त्यांचा घात करणे ह्‍याविषयींचे फूत्कार टाकीत होता.” केवळ जेरूसलेममधील विश्‍वासू जनांचा छळ करून त्याचे समाधान झाले नाही. त्यामुळे त्याने आपली द्वेषपूर्ण मोहीम उत्तरेतील दमिष्कापर्यंत पसरवली.—प्रेषितांची कृत्ये ९:१, २.

४. आपल्यावर सोपवलेले कार्य करण्याकरता पौलाला आपल्या विचारात कोणता फेरबदल करावा लागला?

पण मुळात, पौलाला ख्रिस्ती धर्माविषयी इतका द्वेष का होता? कदाचित हा नवा धर्म, यहुदी धर्मात बाहेरच्या, गैरयहुदी विचारांची भेसळ करेल अशी त्याला खात्री वाटत असावी. कारण पौल पूर्वी “परूशी” होता. या शब्दाचाच अर्थ “अलिप्त केलेला” असा होतो. (प्रेषितांची कृत्ये २३:६) तर मग, देवाने सर्व लोकांना—आणि त्यातल्या त्यात गैरयहुदी लोकांना ख्रिस्ताविषयीचा प्रचार करण्याकरता आपल्याला निवडले आहे हे पौलाला समजले तेव्हा त्याला किती जबरदस्त धक्का बसला असेल याची कल्पना करा! (प्रेषितांची कृत्ये २२:१४, १५; २६:१६-१८) परुशी लोक तर, ज्यांना ते पापी लोक समजत त्यांच्या पंक्‍तीलाही बसत नव्हते! (लूक ७:३६-३९) पौलाला आपल्या विचारसरणीचे परीक्षण करून, सर्व लोकांचे तारण व्हावे या देवाच्या इच्छेशी आपला दृष्टिकोन सुसंगत करण्याकरता नक्कीच बराच प्रयत्न करावा लागला असेल.—गलतीकर १:१३-१७.

५. आपण आपल्या सेवाकार्यात पौलाचे अनुकरण कसे करू शकतो?

आपल्यालाही असेच करावे लागू शकते. आपल्या आंतरराष्ट्रीय, बहुभाषिक प्रचार क्षेत्रात आपल्याला निरनिराळ्या पार्श्‍वभूमीचे लोक भेटतात. या लोकांबद्दल आपला दृष्टिकोन कसा आहे याचे परीक्षण करून त्यांच्याविषयी आपल्या मनात असलेला कोणताही पूर्वग्रह काढून टाकण्याचा आपण जाणीवपूर्वक प्रयत्न केला पाहिजे. (इफिसकर ४:२२-२३) आपल्याला जाणीव असो किंवा नसो, पण आपल्या विचारसरणीवर आपल्या सामाजिक व शैक्षणिक संगोपनाचा प्रभाव असतो. यामुळे आपले विचार व मनोवृत्ती पूर्वग्रहदूषित असण्याची शक्यता आहे. जर आपल्याला मेंढरांसमान लोकांना शोधून त्यांना मदत करायची असेल तर अशा प्रकारच्या भावनांवर मात करणे अत्यावश्‍यक आहे. (रोमकर १५:७) पौलानेही हेच केले. त्याने आपले सेवाकार्य विस्तारण्याचे आव्हान स्वीकारले. प्रेमाने प्रेरित होऊन त्याने परिणामकारकरित्या शिकवण्याची कौशल्ये आत्मसात केली. “परराष्ट्रीयांचा प्रेषित” असलेल्या पौलाच्या सेवाकार्याचा अभ्यास केल्यास आपल्याला दिसून येईल की तो प्रचाराच्या व शिकवण्याच्या कार्यात जागरूक, लवचिक व कल्पक होता. *रोमकर ११:१३.

पौलाचे प्रगतिशील सेवाकार्य

६. पौल आपल्या श्रोत्यांच्या पार्श्‍वभूमीसंबंधी कशाप्रकारे जागरूक होता आणि याचा काय परिणाम झाला?

आपल्या श्रोत्यांचे विश्‍वास व त्यांची पार्श्‍वभूमी यांविषयी पौल जागरूक होता. राजा अग्रिप्पा दुसरा याला संबोधून बोलताना पौलाने कबूल केले की राजा अग्रिप्पा हा ‘यहूद्यांच्या चालीरीती व त्यांच्या वादविषयक बाबी ह्‍यात विशेष जाणता’ होता. मग, अग्रिप्पा ज्या गोष्टी मानत होता त्याविषयीच्या आपल्या ज्ञानाचा निपुणतेने उपयोग करून पौलाने त्याच्याशी अशाच गोष्टींविषयी चर्चा केली की ज्या त्याला अगदी स्पष्टपणे समजत होत्या. पौलाचा युक्‍तिवाद इतका स्पष्ट व निःसंदिग्ध होता की अग्रिप्पा त्याला म्हणाला: “मी ख्रिस्ती व्हावे म्हणून तू थोडक्यानेच माझे मन वळवितोस!”—प्रेषितांची कृत्ये २६:२, ३, २७, २८.

७. लुस्त्रा येथील जमावाला प्रचार करताना पौलाने लवचिकता कशी दाखवली?

जागरूक असण्यासोबतच पौल लवचिक देखील होता. लुस्त्रा येथील लोक त्याला व बर्णबाला देव म्हणून त्यांची उपासना करू पाहत होते तेव्हा त्या जमावाची समजूत घालताना त्याने किती वेगळा पावित्रा घेतला याकडे लक्ष द्या. असे म्हटले जाते, की लायकोनियन भाषा बोलणारे हे लोक तितके शिकले सवरलेले नव्हते, शिवाय इतरांपेक्षा ते जास्त अंधविश्‍वासी होते. प्रेषितांची कृत्ये १४:१४-१८ यानुसार पौलाने सृष्टिसौंदर्याकडे व विपुल नैसर्गिक संपत्तीकडे लक्ष वेधून हे सर्व पुरवणारा खरा देवच सर्वात श्रेष्ठ आहे हे त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न केला. हा युक्‍तिवाद त्या लोकांना समजायला सोपा होता आणि त्यामुळे पौल व बर्णबा ‘आपणाला बलिदान करण्यापासून लोकांना आवरू’ शकले.

८. काही वेळा पौलाने आपल्या भावना उघडपणे व्यक्‍त केल्या तरीसुद्धा त्याने आपली लवचिकता कशाप्रकारे दाखवली?

अर्थात पौलही परिपूर्ण नव्हता आणि कधीकधी विशिष्ट गोष्टींबद्दल तो उत्कटपणे आपल्या भावना व्यक्‍त करत असे. उदाहरणार्थ, एके प्रसंगी जेव्हा त्याचा अपमान करण्यात आला आणि अन्यायीपणे त्याच्याशी व्यवहार करण्यात आला तेव्हा त्याने हनन्या नावाच्या एका यहुदी मनुष्याची चांगली खरडपट्टी काढली. पण जेव्हा त्याला सांगण्यात आले की त्याने खरे तर प्रमुख याजकाचा अपमान केला आहे, तेव्हा त्याने लगेच क्षमा मागितली. (प्रेषितांची कृत्ये २३:१-५) अथेनै शहरात पहिल्यांदा, “ते शहर मूर्तींनी भरलेले आहे असे पाहून त्याच्या मनाचा संताप झाला.” पण अरियपगात दिलेल्या भाषणात मात्र पौलाचा हा संताप जराही डोकावत नाही. उलट त्याने अथेनैकरांना त्यांच्याच व्यासपीठावरून संबोधले आणि “अज्ञात दैवताला” वाहिलेल्या त्यांच्या एका वेदीचा उल्लेख करून व त्यांच्या एका कवीचे शब्द उद्धृत करून त्यांच्याशी परस्पर संमतीच्या विषयावर संभाषण केले.—प्रेषितांची कृत्ये १७:१६-२८.

९. वेगवेगळ्या प्रकारच्या श्रोत्यांशी बोलताना पौलाने कल्पकतेचा कशाप्रकारे वापर केला?

वेगवेगळ्या प्रकारच्या श्रोत्यांशी बोलताना पौलाने उल्लेखनीय कल्पकता दाखवली. आपल्या श्रोत्यांच्या विचारसरणीला कोणत्या संस्कृती व वातावरणाने आकार दिला आहे हे त्याने लक्षात घेतले. रोमी ख्रिश्‍चनांना पत्र लिहिताना त्याने हे लक्षात घेतले की हे ख्रिस्ती त्या काळच्या सर्वात शक्‍तिशाली साम्राज्याच्या राजधानी शहरात राहात होते. तेव्हा या ख्रिश्‍चनांना पौलाने जे पत्र लिहिले त्यातील मुख्य मुद्दा हा होता की आदामाने केलेल्या पापामुळे अपरिपूर्णता आली पण ख्रिस्ताजवळ पापक्षालन करण्याचे सामर्थ्य असल्यामुळे त्याने आदामाच्या पापावर विजय मिळवला. रोमी ख्रिश्‍चन व त्यांच्या आसपासच्या लोकांच्या मनाला भावेल अशा भाषेत पौल त्यांच्याशी बोलला.—रोमकर १:४; ५:१४, १५.

१०, ११. पौलाने आपल्या श्रोत्यांच्या पार्श्‍वभूमीनुसार उदाहरणे कशाप्रकारे निवडली? (तळटीपही पाहावी.)

१० आपल्या श्रोत्यांना बायबलमधील गहन सत्ये समजावून सांगताना पौलाने काय केले? क्लिष्ट आध्यात्मिक संकल्पना स्पष्टपणे समजावून सांगण्याकरता सहज समजतील अशा उदाहरणांचा वापर करण्याचे कौशल्य प्रेषित पौलाला अवगत होते. उदाहरणार्थ, सबंध रोमी साम्राज्यात प्रचलित असलेली गुलामगिरीची प्रथा रोमच्या लोकांच्या ओळखीची होती हे पौलाला माहीत होते. किंबहुना तो ज्या लोकांना लिहीत होता त्यांच्यापैकी बरेचजण कदाचित स्वतः गुलाम असावेत. म्हणूनच पापाला अधीन व्हायचे की नीतीमत्त्वाला अधीन व्हायचे ही निवड करण्याच्या स्वातंत्र्याविषयीचा आपला युक्‍तिवाद आणखी पटण्याजोगा होण्याकरता, पौलाने गुलामगिरीचेच उदाहरण घेतले.—रोमकर ६:१६-२०.

११ एका संदर्भ ग्रंथानुसार, “रोमनांमध्ये, गुलामाच्या मालकाला कोणत्याही अटीविना त्या गुलामाला दास्यत्वातून मुक्‍त करण्याचा अधिकार होता. किंवा गुलाम आपल्या मालकाला विशिष्ट किंमत देऊन आपले स्वातंत्र्य विकत घेऊ शकत होता. तसेच मालकीचा हक्क एखाद्या दैवताला देण्यात आल्यास गुलामाला स्वातंत्र्य मिळू शकत होते.” स्वतंत्र झालेला गुलाम वेतन घेऊन आपल्या मालकाकरता पुढेही काम करू शकत होता. तर पापाच्या अधीन व्हावे की नीतिमत्त्वाच्या? हे निवडण्याचे व्यक्‍तीला स्वातंत्र्य असण्याबद्दल पौलाने लिहिले तेव्हा त्याने याच गुलामगिरीच्या प्रथेशी त्याची तुलना केली. रोममधील ख्रिश्‍चनांना पापाच्या दास्यत्वातून मुक्‍त करण्यात आले होते आणि आता त्यांच्यावर देवाची मालकी होती. ते देवाची सेवा करण्याकरता स्वतंत्र होते, पण त्यांची इच्छा असल्यास, ते आपल्या पूर्वीच्या मालकाची अर्थात पापाची चाकरी करण्याचेही निवडू शकत होते. हे साधेसेच पण ओळखीचे उदाहरण रोममध्ये राहणाऱ्‍या ख्रिश्‍चनांना आत्मपरीक्षण करायला लावणार होते, की ‘मी कोणत्या मालकाची चाकरी करत आहे?’ *

पौलाचे अनुकरण करणे

१२, १३. (क) निरनिराळ्या पार्श्‍वभूमींच्या श्रोत्यांच्या अंतःकरणापर्यंत आपला संदेश पोचवण्याकरता काय करण्याची गरज आहे? (ख) वेगवेगळ्या पार्श्‍वभूमीच्या लोकांना प्रचार करताना तुम्हाला कोणती पद्धत विशेष परिणामकारक असल्याचे दिसून आले आहे?

१२ निरनिराळ्या पार्श्‍वभूमींच्या आपल्या श्रोत्यांच्या अंतःकरणापर्यंत आपला संदेश पोचवण्याकरता, पौलाप्रमाणे आपणही जागरूक, लवचिक व कल्पक असले पाहिजे. आपल्या श्रोत्यांना सुवार्तेचा अर्थ स्पष्टपणे समजण्यास मदत करण्याकरता फक्‍त एकदा त्यांची उभ्या उभ्या भेट घेणे, तयार केलेला संदेश त्यांना सांगणे किंवा एखाद-दोन बायबल प्रकाशने त्यांना देणे इतक्यावरच आपण समाधान मानू इच्छित नाही. आपण त्यांच्या गरजा व विवंचना, त्यांच्या आवडीनिवडी, त्यांच्या मनात असलेल्या शंकाकुशंका व पूर्वग्रह ओळखण्याचा प्रयत्न करतो. याकरता बराच विचार व प्रयत्न करावा लागतो, पण सबंध जगभरात राज्याचे प्रचारक मोठ्या उत्सुकतेने हे साध्य करत आहेत. उदाहरणार्थ, हंगेरी येथील शाखा दफ्तराने असे वृत्त दिले: “इतर देशांतून आलेल्या लोकांनी स्थानिक प्रथांशी जुळवून घ्यावे अशी अपेक्षा करण्याऐवजी, आपले बांधव त्यांच्या चालीरिती व सवयींबद्दल आदर दाखवतात.” इतर ठिकाणचे साक्षीदारही हेच करत आहेत.

१३ पूर्वेकडील एका देशात बहुतेक लोकांना आरोग्य, मुलांचे संगोपन व शिक्षण या विषयांबद्दल आस्था वाटते. तेव्हा, या ठिकाणचे राज्य प्रचारक जगातली वाईट परिस्थिती किंवा इतर गुंतागुंतीच्या सामाजिक प्रश्‍नांवर चर्चा करण्याऐवजी वर उल्लेख केलेल्या विषयांकडेच लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतात. त्याचप्रकारे, संयुक्‍त संस्थानांतील एका मोठ्या शहरातील प्रचारकांना असे दिसून आले की त्यांच्या क्षेत्रातील एका विशिष्ट परिसरातील लोक भ्रष्टाचार, वाहतुकीच्या समस्या व गुन्हेगारी या विषयांबद्दल जास्त विचार करतात. तेव्हा या विषयांचा उपयोग करून साक्षीदारांना त्यांच्याशी सहज बायबल चर्चा सुरू करता येतात. परिणामकारक बायबल शिक्षक एक नियम आवर्जून पाळतात. तो म्हणजे, संभाषणाकरता कोणताही विषय निवडला तरीसुद्धा ते तो विषय सकारात्मक व प्रोत्साहनदायक पद्धतीने सादर करतात, बायबलमधील तत्त्वांचे व्यव्हारात पालन केल्यामुळे होणाऱ्‍या फायद्यांवर आणि भविष्यात देव कोणते आशीर्वाद देणार आहे यावर विशेष भर देतात.—यशया ४८:१७, १८; ५२:७.

१४. लोकांच्या वेगवेगळ्या गरजा व परिस्थितीनुरूप आपण आपल्या बोलण्याच्या पद्धतीत कशाप्रकारे फेरबदल करू शकतो?

१४ सेवाकार्यात आपण प्रथम भेटीत लोकांशी कसे बोलतो यातही आवश्‍यकतेनुसार बदल करणे उपयुक्‍त ठरेल कारण लोकांची सांस्कृतिक, शैक्षणिक व धार्मिक पार्श्‍वभूमी अतिशय वेगळी असते. ज्या लोकांना सृष्टिकर्त्यावर विश्‍वास आहे, पण ते बायबल मानत नाहीत अशा लोकांशी आपली बोलण्याची पद्धत आणि देवावर अजिबातच विश्‍वास नसलेल्या लोकांशी बोलण्याची पद्धत साहजिकच वेगळी असेल. धार्मिक प्रकाशने म्हणजे निव्वळ मतप्रसाराची साधने आहेत असे मानणाऱ्‍या व्यक्‍तीशी बोलताना, आणि दुसरीकडे बायबलच्या शिकवणुकी स्वीकारण्यास तयार असलेल्या व्यक्‍तीशी बोलताना आपण जी सादरता वापरू ती साहजिकच वेगळी असेल. तसेच आपण ज्यांच्याशी बोलतो त्यांची शैक्षणिक पातळीही लक्षात घेतली पाहिजे व त्यानुसार लवचिकता दाखवली पाहिजे. निपुण शिक्षक प्रत्येक परिस्थितीला साजेसा असणारा तर्कवाद व उदाहरणे वापरतील.—१ योहान ५:२०.

नव्या सेवकांना साहाय्य

१५, १६. नव्या सेवकांना प्रशिक्षण देण्याची गरज का आहे?

१५ पौलाला केवळ आपल्याच शिक्षण पद्धती सुधारण्याची इच्छा नव्हती. तरुण पिढीचे सेवक, उदाहरणार्थ तीमथ्य व तीत यांनाही परिणामकारक सेवक बनता यावे म्हणून त्यांना प्रशिक्षण देण्याची गरज पौलाने ओळखली. (२ तीमथ्य २:२; ३:१०, १४; तीत १:४) त्याचप्रकारे, आजही नव्या सेवकांना प्रशिक्षण देण्याची नितान्त गरज आहे.

१६ एकोणीसशे चवदा साली सबंध पृथ्वीवर जवळजवळ ५,००० राज्य प्रचारक होते. आज दर आठवड्याला सुमारे ५,००० नवीन लोकांचा बाप्तिस्मा होत आहे! (यशया ५४:२, ३; प्रेषितांची कृत्ये ११:२१) नवीन लोक ख्रिस्ती मंडळीशी सहवास करू लागतात आणि सेवाकार्यात सहभाग घेण्याची इच्छा प्रदर्शित करतात तेव्हा त्यांना प्रशिक्षणाची व मार्गदर्शनाची गरज असते. (गलतीकर ६:६) या नव्या शिष्यांना मार्गदर्शन करताना व प्रशिक्षण देताना आपण आपल्या थोर शिक्षकाचे अर्थात येशूचे अनुकरण केले पाहिजे. *

१७, १८. नव्या व्यक्‍तींना सेवाकार्यात आत्मविश्‍वास संपादन करण्यास आपण कशी मदत करू शकतो?

१७ येशूने आपल्या प्रेषितांना सरळ लोकसमुदायासमोर नेऊन त्यांच्याशी बोलायला सुरुवात करण्यास सांगितले नाही. प्रथम त्याने प्रचार कार्याचे महत्त्व त्यांना पटवून दिले आणि प्रार्थनापूर्वक मनोवृत्तीने हे कार्य करण्याचे त्यांना प्रोत्साहन दिले. यानंतर त्याने त्यांच्याकरता तीन महत्त्वाच्या गोष्टी पुरवल्या: एक जोडीदार, कार्य करण्यासाठी क्षेत्र आणि लोकांना सांगण्याकरता एक संदेश. (मत्तय ९:३५-३८; १०:५-७; मार्क ६:७; लूक ९:२,) आपणही हेच करू शकतो. स्वतःचे मूल असो, एखादा नवा विद्यार्थी असो किंवा बऱ्‍याच काळापासून प्रचार कार्यात सहभाग घेतला नाही अशी एखादी व्यक्‍ती असो; त्यांना प्रचार कार्यात साहाय्य करताना येशूने ज्याप्रकारे केले त्याचप्रकारे प्रशिक्षण पुरवण्याचा प्रयत्न करणे योग्य ठरेल.

१८ राज्याचा संदेश आत्मविश्‍वासाने सादर करण्याकरता, नवीन व्यक्‍तींना बरीच मदत देण्याची गरज असू शकते. तुम्ही त्यांना एखादी साधीशी, पण घरमालकाला भावेल अशी सादरता तयार करण्यास व तिचा सराव करण्यास मदत करू शकता का? क्षेत्रात गेल्यावर पहिल्या काही घरांत तुम्ही पुढाकार घ्या आणि नव्या व्यक्‍तीला तुम्ही कसे बोलता याचे केवळ निरीक्षण करू द्या. गिदोनाने ज्याप्रकारे आपल्यासोबत लढणाऱ्‍यांना म्हटले होते तसेच तुम्हीही म्हणू शकता: “माझ्याकडे पाहा, आणि मी करतो तसे करा.” (शास्ते ७:१७) मग पुढच्या घरी नवीन व्यक्‍तीला बोलण्याची संधी द्या. त्यांनी केलेल्या प्रयत्नाबद्दल त्यांची प्रशंसा करा आणि उचित प्रसंगी आणखी सुधारणा कशी करता येईल यासंबंधी थोडक्यात सूचना द्या.

१९. ‘आपली सेवा पूर्ण करण्याचा’ प्रयत्न करताना तुम्ही कोणता संकल्प केला आहे?

१९ ‘आपली सेवा पूर्ण करण्याकरता’ लोकांशी बोलण्याच्या पद्धतीत आवश्‍यकतेप्रमाणे फेरबदल करण्यास तयार असण्याचा आपण संकल्प करू या. तसेच नवीन सेवकांनाही असेच करण्याचे आपण प्रशिक्षण देऊ या. लोकांना आपण देवाविषयी जे ज्ञान देतो त्यामुळे त्यांचे जीवन वाचू शकते. हे जीवनदायक ज्ञान लोकांना देण्याचे आपले ध्येय किती महत्त्वाचे आहे हे लक्षात घेतल्यावर आपली खात्री पटते की ‘कित्येकांचे तारण साधावे अशा हेतूने सर्वांना सर्व काही’ होणे अतिशय अगत्याचे आहे. यासाठी आपण जे काही प्रयत्न करू त्यांचे निश्‍चितच सार्थक होईल.—२ तीमथ्य ४:५; १ करिंथकर ९:२२. (w०५ १२/१)

[तळटीपा]

^ परि. 5 पौलाच्या सेवाकार्यातून त्याचे हे गुण कशाप्रकारे दिसून येतात याची उदाहरणे प्रेषितांची कृत्ये १३:९, १६-४२; १७:२-४; १८:१-४; १९:११-२०; २०:३४; रोमकर १०:११-१५; २ करिंथकर ६:११-१३ या वचनांत आढळतील.

^ परि. 11 त्याचप्रकारे, देव व त्याचे आत्म्याने अभिषिक्‍त “पुत्र” यांच्यातल्या नव्या नातेसंबंधाविषयी स्पष्टीकरण देताना पौलाने रोमी साम्राज्यात राहणाऱ्‍या वाचकांना अगदीच ओळखीची असलेली एक कायदेविषयक संकल्पना वापरली. (रोमकर ८:१४-१७) रोममध्ये संत पौल (इंग्रजी) या पुस्तकानुसार, “दत्तक घेण्याची प्रथा ही मुळात रोमी प्रथा होती आणि रोमी लोकांच्या कुटुंबाविषयीच्या संकल्पनेशी निगडीत होती.”

^ परि. 16 सध्या, पायनियर साहाय्य कार्यक्रम यहोवाच्या साक्षीदारांच्या सर्व मंडळ्यामध्ये उपलब्ध आहे. या कार्यक्रमांतर्गत पूर्णवेळ सेवकांच्या अनुभवाचा व त्यांना मिळालेल्या प्रशिक्षणाचा कमी अनुभव असलेल्या प्रचारकांना साहाय्य पुरवण्यासाठी उपयोग केला जातो.

तुम्हाला आठवते का?

• आपण आपल्या सेवाकार्यात कोणकोणत्या मार्गांनी पौलाचे अनुकरण करू शकतो?

• आपल्या विचारसरणीत कोणता बदल करण्याची आवश्‍यकता असू शकते?

• आपला संदेश नेहमी सकारात्मक पद्धतीने सांगण्याकरता आपण काय करू शकतो?

• आत्मविश्‍वास संपादन करण्यासाठी नव्या सेवकांना काय करणे गरजेचे आहे?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२९ पानांवरील संक्षिप्त आशय]

प्रेषित पौल प्रचाराच्या व शिक्षणाच्या कार्यात जागरूक, लवचिक व कल्पक होता

[३१ पानांवरील संक्षिप्त आशय]

येशूने आपल्या शिष्यांना तीन महत्त्वाच्या गोष्टी पुरवल्या: जोडीदार, कार्य करण्याकरता क्षेत्र व लोकांना सांगण्याकरता संदेश

[२८ पानांवरील चित्रे]

आवश्‍यकतेनुसार फेरबदल करण्यास तयार असल्यामुळे पौल निरनिराळ्या लोकांशी परिणामकारक रित्या बोलू शकला

[३० पानांवरील चित्र]

परिणामकारक सेवक आपल्या श्रोत्यांची सांस्कृतिक पार्श्‍वभूमी लक्षात घेतात

[३१ पानांवरील चित्र]

प्रगतिशील सेवक नवीन व्यक्‍तींना सेवाकार्याकरता तयारी करण्यास साहाय्य करतात