व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“परमेश्‍वराचे मार्ग सरळ आहेत”

“परमेश्‍वराचे मार्ग सरळ आहेत”

“परमेश्‍वराचे मार्ग सरळ आहेत”

“परमेश्‍वराचे मार्ग सरळ आहेत; त्यांनी धार्मिक चालतील.”होशेय १४:९.

१, २. यहोवाने इस्राएल राष्ट्राला संघटित केले तेव्हा हे राष्ट्र कसे होते पण नंतर स्थिती कशी बदलली?

संदेष्टा मोशेच्या काळात यहोवाने इस्राएल लोकांना एका नीतिमान राष्ट्राच्या रूपात संघटित केले. पण सा.यु.पू. आठव्या शतकापर्यंत या राष्ट्राची नैतिकता अगदी रसातळाला गेली होती आणि या राष्ट्रातील लोक देवाच्या नजरेत अतिशय घृणास्पद पातके करत होते. होशेय अध्याय १० ते १४ यातून हे स्पष्ट होते.

इस्राएलची ढोंगीपणाची मनोवृत्ती बनली होती. दहा गोत्रांच्या या राज्यातील लोकांनी “दुष्टतेच्या पेरणीसाठी नांगरिले” आणि अधर्माची कापणी केली. (होशेय १०:१, १३) यहोवाने म्हटले: “इस्राएल लहान मूल असता त्याजवर माझी प्रीति बसली; मी त्याला आपला पुत्र म्हणून मिसरातून बोलाविले.” (होशेय ११:१) देवाने इस्राएलांना ईजिप्तच्या बंदिवासातून मुक्‍त केले होते तरीसुद्धा, त्यांनी मोबदल्यात यहोवाशी लबाडी केली व ते कपटीपणाने वागले. (होशेय ११:१२) म्हणूनच यहोवाने त्यांना असा सल्ला दिला: “तू आपल्या देवाकडे वळ; दया व न्याय यांचे पालन कर; आपल्या देवाची प्रतीक्षा करून राहा.”—होशेय १२:६.

३. देवाचा विरोध करणाऱ्‍या शोमरोनाच्या बाबतीत काय घडणार होते पण इस्राएल लोकांना देवाची दया कशी अनुभवता येणार होती?

देवाचा विरोध करणाऱ्‍या शोमरोनचा व त्याच्या राजाचा शेवटी नाश होईल असे यहोवाने भाकीत केले. (होशेय १३:११, १६) पण होशेयच्या भविष्यवाणीच्या शेवटल्या अध्यायाची सुरुवात या विनवणीने होते: “हे इस्राएला, परमेश्‍वर तुझा देव याजकडे वळ.” इस्राएलांनी पश्‍चात्ताप करून यहोवाच्या क्षमेची याचना केल्यास तो त्यांना दया दाखवण्यास तयार होता. अर्थात, यासाठी त्यांना “परमेश्‍वराचे मार्ग सरळ आहेत,” हे कबूल करून त्या मार्गांनी चालावे लागणार होते.—होशेय १४:१-६, ९.

४. आपण होशेयच्या भविष्यवाणीतील कोणत्या तत्त्वांवर विचार करणार आहोत?

होशेयच्या भविष्यवाणीच्या या भागात, आपल्याला देवासोबत चालण्यास साहाय्य करतील असे अनेक तत्त्व आढळतात. या तत्त्वांचे आपण परीक्षण करू या: (१) यहोवा केवळ निष्कपट मनोवृत्तीने केलेली उपासना स्वीकारतो, (२) देव आपल्या लोकांना एकनिष्ठ प्रीती दाखवतो, (३) आपण नेहमी यहोवाची आस धरली पाहिजे, (४) यहोवाचे मार्ग नेहमी सरळ असतात आणि (५) पापीजन परत यहोवाकडे वळू शकतात.

यहोवा केवळ निष्कपट मनोवृत्तीने केलेली उपासना स्वीकारतो

५. देव आपल्याकडून कशाप्रकारच्या सेवेची अपेक्षा करतो?

आपण यहोवाची पवित्र सेवा, शुद्ध व निष्कपट मनोवृत्तीने करावी अशी तो अपेक्षा करतो. पण इस्राएल राष्ट्र मात्र चांगले फळ न देणारी “निकृष्ट द्राक्षवेल” बनले होते. इस्राएलच्या रहिवाशांनी खोट्या उपासनेकरता “अनेक वेद्या” केल्या. या धर्मत्यागी लोकांनी, कदाचित अशुद्ध उपासनेकरता वापरण्यात येणारे मूर्तिस्तंभही उभारले. यहोवा त्यांच्या या वेद्या व मूर्तिस्तंभ नष्ट करेल असे भाकीत करण्यात आले.—होशेय १०:१, २, NW.

६. देवासोबत चालण्याकरता आपण कोणता गुण टाळला पाहिजे?

यहोवाचे सेवक कपटीपणाला मुळीच थारा देत नाहीत. पण इस्राएलांच्या बाबतीत काय घडले? ‘त्यांचे हृदय बेइमान’ म्हणजेच कपटी बनले! एकेकाळी, देवाला समर्पित असलेले लोक या नात्याने त्यांनी यहोवाशी करार केला होता. पण ते त्याच्याशी कपटीपणाने वागले. यावरून आपण काय शिकू शकतो? जर आपण स्वतःस देवाला समर्पित केले असेल तर मग आपण कपटी असू नये. नीतिसूत्रे ३:३२ अशी ताकीद देते: “परमेश्‍वराला कुटिलाचा वीट आहे. पण सरळांबरोबर त्याचे रहस्य आहे.” देवासोबत चालण्याकरता आपण “चांगल्या विवेकभावात व निष्कपट विश्‍वासात उद्‌भवणारी” प्रीती व्यक्‍त केली पाहिजे.—१ तीमथ्य १:५.

देव आपल्या लोकांशी एकनिष्ठ प्रीतीने वागतो

७, ८. (क) आपल्याला देवाची एकनिष्ठ प्रीती केव्हा अनुभवता येईल? (ख) आपल्या हातून गंभीर पाप घडले असल्यास आपण काय करावे?

जर आपण निष्कपट व सरळ मनाने यहोवाची उपासना केली तर आपल्याला त्याची प्रेमदया अर्थात एकनिष्ठ प्रीती अनुभवायला मिळेल. यहोवाच्या मार्गांतून भरकटलेल्या इस्राएलांना असे सांगण्यात आले: “तुम्ही आपणासाठी धार्मिकतेची पेरणी करा म्हणजे प्रेमाची कापणी कराल; पडीत जमीन नांगरून काढा; कारण परमेश्‍वराने येऊन तुम्हावर धार्मिकतेची वृष्टि करावी याकरिता त्याला शरण जाण्याचा हा समय आहे.”—होशेय १०:१२.

इस्राएलांनी पश्‍चात्ताप करून यहोवाचा शोध केला असता तर किती बरे झाले असते! मग त्याने संतुष्ट होऊन त्यांच्यावर “धार्मिकतेची वृष्टि” केली असती. आपल्या हातून एखादे पाप घडले असल्यास, आपण यहोवाचा शोध करावा, त्याच्याकडे क्षमेची याचना करावी आणि ख्रिस्ती वडिलांकडून आध्यात्मिक मदत मिळवण्याचा प्रयत्न करावा. (याकोब ५:१३-१६) तसेच आपण देवाच्या पवित्र आत्म्याचेही मार्गदर्शन मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण “जो आपल्या देहस्वभावासाठी पेरतो त्याला देहस्वभावापासून नाशाचे पीक मिळेल; आणि जो आत्म्यासाठी पेरतो त्याला आत्म्यापासून सार्वकालिक जीवन हे पीक मिळेल.” (गलतीकर ६:८) जर आपण ‘आत्म्यासाठी पेरले’ तर आपल्याला सदोदीत यहोवाची एकनिष्ठ प्रीती अनुभवायला मिळेल.

९, १०. होशेय ११:१-४ इस्राएलच्या बाबतीत कसे खरे ठरते?

यहोवा नेहमी आपल्या लोकांशी प्रेमळपणे व्यवहार करतो असा भरवसा आपण बाळगू शकतो. याचा पुरावा आपल्याला होशेय ११:१-४ यातून मिळतो. तेथे आपण असे वाचतो: “इस्राएल लहान मूल असता त्याजवर माझी प्रीति बसली; मी त्याला आपला पुत्र म्हणून मिसरातून बोलाविले. . . . ते बआलमूर्तीस बलि अर्पीत, कोरीव मूर्तीपुढे धूप जाळीत. मीच एफ्राइमास [इस्राएली लोकांस] चालावयास शिकविले, मी त्यांस आपल्या कवेत वागविले आणि मी त्यांस बरे केले, पण ते त्यांस ठाऊक नाही. मानवी बंधनांनी, प्रेमरज्जूंनी, मी त्यांस ओढिले; बैलाच्या गळ्यातले जोते सैल करणाऱ्‍यासारखा मी त्यांस झालो; त्यांस मी ममतेने खाऊ घातले.”

१० येथे इस्राएलची लहान मुलाशी तुलना केली आहे. यहोवाने मोठ्या प्रेमळपणे इस्राएलांना आपल्या कवेत घेऊन चालायला शिकवले. तो त्यांना “प्रेमरज्जूंनी” ओढत असे. किती हृदयस्पर्शी शब्दचित्र येथे रेखाटले आहे! तुम्ही आपल्या लहान मुलाला चालायला शिकवत आहात अशी कल्पना करा. तुम्ही त्याला आपल्या कवेत घेतले आहे. यहोवा तुमच्यावर इतक्याच कोमलतेने प्रेम करतो. “मानवी बंधनांनी व प्रेमरज्जूंनी” तुम्हाला आधार देण्यास त्याला आनंद वाटतो.

११. देव कशाप्रकारे “जोते सैल करणाऱ्‍यासारखा झाला?”

११ इस्राएलांशी व्यवहार करताना जणू ‘बैलाच्या गळ्यातले [“जाभाडावरले,” पं.र.भा. समास] जोते सैल करणाऱ्‍यासारखा [यहोवा] त्यांस झाला; त्यांस त्याने ममतेने खाऊ घातले.’ जनावराला चारा खाण्यास कठीण जाऊ नये म्हणून त्याच्यावरचे जू काढून टाकतात किंवा ते मागे सरकवतात. यहोवानेही इस्राएलांसोबत असाच व्यवहार केला. पण इस्राएलांनी स्वतःहून यहोवाच्या अधीनतेचे जू काढून फेकले तेव्हा त्यांच्यावर त्यांच्या शत्रूंचे जू आले व त्यांना जाचजुलूम सहन करावा लागला. (अनुवाद २८:४५, ४८; यिर्मया २८:१४) आपला प्रमुख शत्रू सैतान याच्या मुठीत सापडून त्याच्या जुवाखाली जाचजुलूम सहन करण्याची पाळी आपल्यावर कधीही येऊ नये. त्याऐवजी आपण एकनिष्ठपणे आपल्या प्रेमळ देवासोबत चालत राहू या.

सदोदीत यहोवाची आस धरा

१२. होशेय १२:६ या वचनानुसार देवासोबत चालत राहण्याकरता आपण काय करण्याची गरज आहे?

१२ देवासोबत चालत राहण्याकरता आपण सदोदीत त्याची आस धरली पाहिजे. इस्राएलांना असे सांगण्यात आले होते: “तू आपल्या देवाकडे वळ; दया व न्याय यांचे पालन कर; आपल्या देवाची प्रतीक्षा करून राहा.” (होशेय १२:६) दया व न्याय यांचे पालन करण्याद्वारे व ‘आपल्या देवाची प्रतीक्षा करत राहण्याद्वारे’ अर्थात नेहमी त्याचीच आस धरण्याद्वारे इस्राएलचे रहिवाशी हे दाखवू शकत होते की ते पश्‍चात्तापी हृदयाने यहोवाकडे परतले होते. आपण कितीही काळापासून यहोवासोबत चाललो असू तरीसुद्धा, आपण दया व न्याय यांचे पालन करण्याचा व देवाची सदोदीत आस धरण्याचा संकल्प करावा.—स्तोत्र २७:१४.

१३, १४. पौल होशेय १३:१४ या वचनाचा कशाप्रकारे उपयोग करतो आणि यामुळे आपल्याला यहोवाची आस धरण्याची प्रेरणा कशाप्रकारे मिळते?

१३ इस्राएलांविषयी होशेयने केलेल्या भविष्यवाणीतून आपल्याला देवाची आस धरण्याची विशेष प्रेरणा मिळते. यहोवाने म्हटले: “मी त्यांना मृतलोकांच्या सत्तेतून उद्धरीन, मी त्यांना मरणापासून खंडून घेईन; अरे मरणा, तुझ्या पीडा कोठे आहेत? अरे मृतलोका, तुझ्याजवळचा विध्वंस कोठे आहे?” (होशेय १३:१४, पं.र.भा.) यहोवा त्यावेळी इस्राएलांना शारीरिक मृत्यूपासून बचावणार नव्हता पण भविष्यात तो मृत्यूला कायमचा गिळंकृत करून त्याचे वर्चस्व नष्ट करणार होता.

१४ अभिषिक्‍त ख्रिस्ती बांधवांना लिहिताना पौलाने होशेयच्या भविष्यवाणीतले शब्द उद्धृत केले: “हे जे विनाशी त्याने अविनाशीपण परिधान केले, आणि हे मर्त्य त्याने अमरत्व परिधान केले, असे जेव्हा होईल तेव्हा ‘मरण विजयात गिळले गेले आहे’ असा जो शास्त्रलेख आहे तो पूर्ण होईल. अरे मरणा, तुझा विजय कोठे? अरे मरणा, तुझी नांगी कोठे? मरणाची नांगी पाप, आणि पापाचे बळ नियमशास्त्र आहे; परंतु जो देव आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपणाला जय देतो त्याची स्तुति असो.” (१ करिंथकर १५:५४-५७) यहोवाने येशूला मरणातून उठवले आणि यावरून आपल्याला हा दिलासा व ही हमी मिळते की देवाच्या स्मृतीत असणाऱ्‍या सर्वांचे पुनरुत्थान केले जाईल. (योहान ५:२८, २९) यहोवाची आस धरण्याकरता ही खरोखर किती अद्‌भूत प्रेरणा आहे! पण पुनरुत्थानाच्या आशेप्रमाणेच आणखी काहीतरी आहे जे आपल्याला देवासोबत चालत राहण्यास प्रवृत्त करते.

यहोवाचे मार्ग नेहमी सरळ असतात

१५, १६. शोमरोनाबद्दल काय भाकीत करण्यात आले होते आणि ही भविष्यवाणी कशाप्रकारे पूर्ण झाली?

१५ “परमेश्‍वराचे मार्ग सरळ आहेत” अशी आपल्याला खात्री असल्यास आपल्याला देवासोबत चालत राहण्यास मदत मिळेल. शोमरोनचे रहिवासी देवाच्या नीतिमान मार्गांत चालले नाहीत. परिणामस्वरूप त्यांना त्यांच्या पापाची व यहोवावर अविश्‍वास दाखवण्याची किंमत मोजावी लागणार होती. असे भाकीत करण्यात आले की: “शोमरोनास प्रायश्‍चित्त मिळेल कारण तो आपल्या देवापासून फितुरी झाला आहे; ते तरवारीने पडतील, त्यांची अर्भके आपटून मारितील, त्यांच्या गर्भवती स्त्रियांस चिरून टाकितील.” (होशेय १३:१६) ऐतिहासिक अहवालांवरून दिसून येते की शोमरोनावर विजय मिळवणाऱ्‍या अश्‍शूरी लोकांकरता असा भयंकर क्रूरपणा करणे काही अशक्यप्राय गोष्ट नव्हती.

१६ शोमरोन हे इस्राएलच्या दहा गोत्रांच्या राज्याचे राजधानी शहर होते. पण या वचनात मात्र शोमरोन हे त्या राज्याच्या सबंध क्षेत्राच्या बाबतीत म्हटले असावे. (१ राजे २१:१) सा.यु.पू. ७४२ साली अश्‍शूरी राजा शलमानेसर पाचवा याने शोमरोनाला वेढा घातला. सा.यु.पू. ७४० साली शोमरोन पूर्णपणे पडले तेव्हा त्यात राहणाऱ्‍या बऱ्‍याच लोकांना मेसोपोटेमिया व मिडीया येथे हद्दपार करण्यात आले. शोमरोनवर शलमानेसर पाचवा याने विजय मिळवला की सार्गोन दुसरा याने, हे अद्यापही निश्‍चित नाही. (२ राजे १७:१-६, २२, २३; १८:९-१२) पण, सार्गोनच्या ऐतिहासिक लिखाणांत २७,२९० इस्राएल लोकांना युफ्रेटिस नदीच्या वरील क्षेत्रात व मिडिया येथे हद्दपार केल्याचा उल्लेख आहे.

१७. देवाच्या आदर्शांना तुच्छ लेखण्याऐवजी आपण काय करावे?

१७ यहोवाच्या सरळ मार्गांनी न चालल्यामुळे शोमरोनच्या रहिवाशांना दुःखद परिणाम भोगावे लागले. समर्पित ख्रिस्ती या नात्याने आपण जर जाणूनबुजून पाप करू लागलो व देवाच्या नीतिमान आदर्शांना तुच्छ लेखू लागलो तर आपल्यालाही दुःखद परिणाम भोगावे लागतील. अशी दुष्टाई आपण कधीही करू नये! त्याउलट, आपल्यापैकी प्रत्येकाने प्रेषित पेत्राच्या या सल्ल्यानुसार वागण्याचा प्रयत्न करावा: “खून करणारा, चोर, दुष्कर्मी, किंवा दुसऱ्‍याच्या कामात ढवळाढवळ करणारा असे होऊन कोणी दुःख भोगू नये; ख्रिस्ती ह्‍या नात्याने कोणाला दुःख सहन करावे लागत असेल तर त्याला लाज वाटू नये; त्या नावामुळे देवाचे गौरव करावे.”—१ पेत्र ४:१५, १६.

१८. आपण कशाप्रकारे ‘देवाचे गौरव करत राहू’ शकतो?

१८ आपल्याच मनाप्रमाणे कार्य करण्यापेक्षा देवाच्या सरळ मार्गांनी चालण्याद्वारे आपण त्याचे ‘गौरव करतो.’ काइनाने स्वतःच्याच मनाप्रमाणे वागण्याचे ठरवल्यामुळे व पाप तुझ्या दाराशी टपून आहे या यहोवाच्या इशाऱ्‍याकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्याने आपल्या भावाचा घात केला. (उत्पत्ति ४:१-८) बलामाने मवाबच्या राजाकडून मोबदला घेतला पण इस्राएलास शाप देण्यात त्याला यश आले नाही. (गणना २४:१०) तसेच, लेवी वंशाचा कोरह व त्याच्यासोबतच्या इतरांनी मोशे व अहरोनाच्या अधिकाराविरुद्ध बंड केल्यामुळे देवाने त्यांना मृत्यूदंड दिला. (गणना १६:१-३, ३१-३३) आपण निश्‍चितच खून करणाऱ्‍या “काइनाच्या मार्गाने” चालू इच्छित नाही, किंवा अविचारीपणे “बलामाच्या भ्रांतिमार्गांत” जाऊ इच्छित नाही किंवा “कोरहासारखे बंड करून” स्वतःवर नाश ओढवू इच्छित नाही. (यहूदा ११) पण आपल्याकडून चूक झाल्यास होशेयची भविष्यवाणी आपल्याला सांत्वन देते.

पापीजन यहोवाकडे परत येऊ शकतात

१९, २०. पश्‍चात्तापी इस्राएल लोक कोणती बलिदाने अर्पू शकले?

१९ गंभीर पाप करण्याद्वारे जे एका अर्थाने पडले आहेत ते देखील यहोवाकडे परत येऊ शकतात. होशेय १४:१, २ यात आपण ही विनवणी वाचतो: “हे इस्राएला, परमेश्‍वर तुझा देव याजकडे वळ, कारण तू आपल्या अधर्मामुळे ठोकर खाऊन पडला आहेस. तुम्ही शब्दानिशी परमेश्‍वराकडे वळा; त्याला म्हणा, आमचा सर्व अधर्म दूर कर; कृपेने आमचा स्वीकार कर, म्हणजे आम्ही आमच्या वाणीचे फळ अर्पू.”

२० पश्‍चात्तापी इस्राएल लोक देवाला आपल्या “वाणीचे फळ अर्पू” शकले. ही मनःपूर्वक स्तुतीची यज्ञे होती. या भविष्यवाणीचा संदर्भ घेऊन पौलाने ख्रिश्‍चनांना “त्याचे नाव पत्करणाऱ्‍या ओठाचे फळ असा स्तुतीचा यज्ञ आपण त्याच्याद्वारे देवाला नित्य अर्पण करावा” असे आर्जवले. (इब्री लोकांस १३:१५) देवासोबत चालणे आणि अशी यज्ञे अर्पण करणे हा आज आपल्याकरता किती मोठा बहुमान आहे!

२१, २२. पश्‍चात्तापी इस्राएलांना कोणती पुनःस्थापना अनुभवायला मिळेल?

२१ आपल्या भ्रष्ट मार्गांतून मागे फिरून देवाकडे परत आलेल्या इस्राएलांनी देवाला ‘आपल्या वाणीचे फळ’ अर्पिले. अशारितीने त्यांनी देवाने वचन दिल्याप्रमाणे आध्यात्मिक पुनःस्थापन अनुभवले. होशेय १४:४-७ म्हणते: “मी [यहोवा] त्यांना वाटेवर आणीन, त्यांजवर मोकळ्या मनाने प्रीति करीन, कारण त्यांजवरचा माझा राग गेला आहे. मी इस्राएलास दहिवरासारखा होईन; तो भूकमलाप्रमाणे फुलेल, लबानोनाप्रमाणे मूळ धरील. त्याच्या फांद्या पसरतील, त्याचे सौंदर्य जैतून वृक्षासारखे होईल, त्यास लबानोनासारखा वास सुटेल. ते परत येऊन त्याच्या छायेत राहतील; ते धान्यासारखे पुनर्जीवित होतील व द्राक्षीप्रमाणे फळ देतील; त्यांची कीर्ति लबानोनाच्या द्राक्षारसासारखी होईल.”

२२ पश्‍चात्तापी इस्राएल लोक आध्यात्मिकरित्या निरोगी होतील व त्यांना पुन्हा एकदा देवाचे प्रेम अनुभवायला मिळेल. यहोवा त्यांच्याकरता तजेला देणाऱ्‍या दहिवरासारखा होईल, अर्थात तो त्यांच्यावर विपूल आशीर्वादांचा वर्षाव करेल. त्याच्या या पुनःस्थापित लोकांना “जैतून वृक्षासारखे” सौंदर्य लाभेल व ते देवाच्या मार्गांत चालतील. आपणही यहोवा देवासोबत चालण्याचा निर्धार केला असल्यामुळे आपल्याकडून कशाची अपेक्षा केली जाते?

यहोवाच्या सरळ मार्गांत चालत राहा

२३, २४. होशेयच्या पुस्तकाची समाप्ती कोणत्या प्रोत्साहनदायक भविष्यवाणीने होते आणि याचा आपल्यावर कशाप्रकारे परिणाम होतो?

२३ जर आपल्याला देवासोबत चालत राहायचे असेल तर आपण ‘वरून येणाऱ्‍या ज्ञानाचा’ उपयोग केला पाहिजे आणि नेहमी देवाच्या सरळ मार्गांशी सुसंगत वागले पाहिजे. (याकोब ३:१७, १८) होशेयच्या भविष्यवाणीच्या शेवटल्या वचनात असे म्हटले आहे: “जो कोणी शहाणा आहे त्याला हे समजेल, जो कोणी समंजस आहे त्याला हे कळेल; परमेश्‍वराचे मार्ग सरळ आहेत; त्यांनी धार्मिक चालतील आणि पातकी त्यांत अडखळून पडतील.”—होशेय १४:९.

२४ या जगाच्या बुद्धीचे व आदर्शांचे अनुकरण करण्याऐवजी आपण सदोदीत देवाच्या सरळ मार्गांनी चालण्याचा निर्धार करू या. (अनुवाद ३२:४) होशेय ५९ किंवा त्याहीपेक्षा जास्त वर्षे देवाच्या सरळ मार्गांत चालत राहिला. तो विश्‍वासूपणे देवाचे संदेश सांगत राहिला कारण त्याला माहीत होते की जे सूज्ञ व विचारशील आहेत त्यांना नक्कीच ही वचने समजतील. आपल्याबद्दल काय? यहोवा जोपर्यंत आपल्याला साक्ष देण्याची संधी देतो तोपर्यंत आपण अशा लोकांचा शोध घेत राहू, जे सूज्ञपणे देवाची दया स्वीकारू इच्छितात. आणि ‘विश्‍वासू व बुद्धिमान’ दासाच्या मार्गदर्शनाप्रमाणे हे कार्य करत राहण्यास आपल्याला आनंद वाटतो.—मत्तय २४:४५-४७.

२५. होशेयच्या भविष्यवाणीतील माहितीने आपल्याला काय करण्यास मदत केली पाहिजे?

२५ आपण विचारात घेतलेल्या होशेयच्या भविष्यवाणीतील माहितीने आपल्याला, देवाने प्रतिज्ञा केलेल्या नव्या जगावर सतत आपली नजर खिळवून ठेवून देवासोबत चालत राहण्यास मदत केली पाहिजे. (२ पेत्र ३:१३; यहुदा २०, २१) ही आशा खरोखर किती अद्‌भुत आहे! “परमेश्‍वराचे मार्ग सरळ आहेत,” हे आपण केवळ म्हणतच नाही तर खरोखरच आपल्याला असे वाटते हे आपल्या कृतींवरून दिसून आल्यास, आपली ही आशा निश्‍चितच पूर्ण होईल. (w०५ ११/१५)

तुम्ही कसे उत्तर द्याल?

• आपण देवाची शुद्ध उपासना केल्यास तो आपल्यासोबत कसा व्यवहार करेल?

• आपण सदोदीत यहोवाची आस का धरावी?

• यहोवाचे मार्ग सरळ आहेत याची तुम्हाला का बरे खात्री वाटते?

• आपण यहोवाच्या सरळ मार्गांनी कशाप्रकारे चालत राहू शकतो?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१४ पानांवरील चित्र]

ख्रिस्ती वडिलांकडून आध्यात्मिक मदत स्वीकारा

[१५ पानांवरील चित्र]

होशेयची भविष्यवाणी आपल्याला यहोवाच्या पुनरुत्थानाच्या प्रतिज्ञांवर भरवसा ठेवण्याची प्रेरणा देते

[१७ पानांवरील चित्र]

सार्वकालिक जीवनाची आशा धरून देवासोबत चालत राहा