व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

‘सर्व भाषा बोलणाऱ्‍या राष्ट्रांतील’ लोक सुवार्ता ऐकत आहेत

‘सर्व भाषा बोलणाऱ्‍या राष्ट्रांतील’ लोक सुवार्ता ऐकत आहेत

‘सर्व भाषा बोलणाऱ्‍या राष्ट्रांतील’ लोक सुवार्ता ऐकत आहेत

“सर्व भाषा बोलणाऱ्‍या राष्ट्रांपैकी दहा जण . . . [म्हणतील]: आम्ही तुम्हाबरोबर येतो, कारण देव तुम्हाबरोबर आहे असे आम्ही ऐकले आहे.”जखऱ्‍या ८:२३.

१. बहुभाषिक व आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्रिस्ती संदेशाची घोषणा सुरू करण्याकरता यहोवाने उत्तम वेळ व संधी कशी पुरवली?

ती वेळ व ते स्थान अगदी योग्य होते. सा.यु. ३३ च्या पेन्टेकॉस्टचा तो दिवस होता. काही आठवड्यांपूर्वी, विस्तीर्ण रोमी साम्राज्याच्या १५ वेगवेगळ्या प्रदेशांतून यहुदी व यहुदी मतानुसारी जेरूसलेमला वल्हांडणाचा सण साजरा करण्याकरता आले होते. त्या दिवशी, त्यांच्यापैकी हजारो जणांनी—पुरातन बाबेलमधील लोकांप्रमाणे गोंधळून न जाता—सर्वसामान्य व्यक्‍तींना पवित्र आत्म्याने भरून जाऊन सबंध रोमी साम्राज्याच्या विविध प्रदेशांत बोलल्या जाणाऱ्‍या भाषांत सुवार्तेचा संदेश घोषित करताना ऐकले व त्यांना तो समजला.(प्रेषितांची कृत्ये २:१-१२) त्या दिवशी ख्रिस्ती मंडळीचा जन्म झाला आणि एका बहुभाषिक आंतरराष्ट्रीय शैक्षणिक कार्याचा प्रारंभ झाला. हे कार्य आजपर्यंत सुरू आहे.

२. येशूच्या शिष्यांनी निरनिराळ्या प्रांतांतून आलेल्या आपल्या श्रोत्यांना सा.यु. ३३च्या पेन्टेकॉस्टच्या दिवशी कशाप्रकारे “विस्मित” केले?

येशूच्या शिष्यांना त्याकाळी प्रचलित असणारी सर्वसामान्य ग्रीक भाषा अवगत असावी. तसेच, ते मंदिरात बोलल्या जाणाऱ्‍या इब्री भाषेचाही अधूनमधून वापर करत. पण त्या पेन्टेकॉस्टच्या दिवशी त्यांनी निरनिराळ्या प्रांतांतून आलेल्या श्रोत्यांच्या प्रादेशिक भाषेत बोलून त्यांना “विस्मित” केले. याचा परिणाम काय झाला? स्वतःच्या मातृभाषेत महत्त्वाची सत्ये ऐकल्यावर या लोकांच्या अंतःकरणावर त्याचा गहिरा प्रभाव पडला. त्या दिवशी शिष्यांचा लहानसा गट वाढून ३,००० पेक्षा अधिक सदस्य असलेली मोठी मंडळी बनली!—प्रेषितांची कृत्ये २:३७-४२.

३, ४. शिष्य जेरूसलेम, यहुदीया व गालीलमधून बाहेर पडल्यावर प्रचार कार्याचा कशाप्रकारे विस्तार झाला?

या अविस्मरणीय घटनेनंतर लगेचच जेरूसलेममध्ये छळाची लाट उसळली व “ज्यांची पांगापांग झाली होती ते वचनाची सुवार्ता सांगत चहूकडे फिरले.” (प्रेषितांची कृत्ये ८:१-४) उदाहरणार्थ, प्रेषितांची कृत्ये अध्याय ८ यात आपण फिलिप्पाविषयी वाचतो, जो कदाचित ग्रीक भाषा बोलणारा सुवार्तिक असावा. फिलिप्पाने शोमरोन्यांना प्रचार केला. तसेच ख्रिस्ताविषयीच्या संदेशाबद्दल आस्था दाखवणाऱ्‍या एका इथियोपियन अधिकाऱ्‍यालाही त्याने प्रचार केला.—प्रेषितांची कृत्ये ६:१-५; ८:५-१३, २६-४०; २१:८, ९.

जेरूसलेम, यहुदीया व गालीलच्या परिसरातून बाहेर पडून नव्या ठिकाणी आपले जीवन सुरू करण्याचा ख्रिस्ती लोक प्रयत्न करू लागले तेव्हा त्यांना वेगवेगळ्या जातींच्या व भाषा बोलणाऱ्‍या लोकांमध्ये राहताना नव्या अडथळ्यांना तोंड द्यावे लागले. त्यांच्यापैकी काहीजणांनी कदाचित केवळ यहुद्यांना प्रचार केला असावा. पण शिष्य लूक असे वृत्त देतो: “त्यांच्यापैकी कित्येक कुप्री व कुरेनेकर होते; ते अंत्युखियात येऊन प्रभु येशूची सुवार्ता हेल्लेणी लोकांसहि सांगू लागले.”—प्रेषितांची कृत्ये ११:१९-२१.

निःपक्षपाती देव—सर्वांकरता असलेला संदेश

५. राज्याच्या सुवार्तेच्या संदर्भात यहोवाची निःपक्षपाती वृत्ती कशावरून सिद्ध होते?

या घडामोडी देवाच्या कार्यपद्धतीच्या एकवाक्यतेत आहेत; तो पक्षपाती नाही. प्रेषित पेत्राला, यहोवाने विदेशी लोकांबद्दल त्याचा दृष्टिकोन बदलण्यास मदत केली तेव्हा त्याने कृतज्ञतेने म्हटले: “देव पक्षपाती नाही, हे मला पक्के ठाऊक आहे; तर प्रत्येक राष्ट्रात जो त्याची भीति बाळगतो व ज्याची कृत्ये नैतिक आहेत तो त्याला मान्य आहे.” (प्रेषितांची कृत्ये १०:३४, ३५; स्तोत्र १४५:९) पूर्वी ख्रिश्‍चनांचा छळ करणाऱ्‍या प्रेषित पौलानेही देव पक्षपाती नसल्याचे प्रतिपादित केले; त्याने म्हटले: “[देवाची] अशी इच्छा आहे की, सर्व माणसांचे तारण व्हावे.” (१ तीमथ्य २:४) राज्याची आशा आज सर्व स्त्रीपुरुषांना, सर्व जातींच्या, राष्ट्रांच्या किंवा भाषेच्या लोकांना उपलब्ध आहे. यावरूनच सृष्टिकर्त्या देवाची निःपक्षपाती वृत्ती सिद्ध होते.

६, ७. सुवार्तेचा प्रसार आंतरराष्ट्रीय, बहुभाषिक स्तरावर घडेल हे बायबलमधील कोणत्या भविष्यवाण्यांत भाकीत करण्यात आले होते?

आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेल्या या विस्ताराविषयी कित्येक शतकांआधीच भाकीत करण्यात आले होते. दानीएलाच्या भविष्यवाणीनुसार, “सर्व लोक, सर्व राष्ट्रे व सर्व भाषा बोलणारे लोक, यांनी [येशूची] सेवा करावी म्हणून त्यास प्रभुत्व, वैभव व राज्य ही दिली.” (दानीएल ७:१४) हे नियतकालिक, ज्यात तुम्हाला यहोवाच्या राज्याविषयी वाचायला मिळाले, ते सध्या १५१ भाषांत प्रकाशित केले जाते व सबंध जगभरात वितरित केले जाते. दानीएलाची वरील भविष्यवाणी पूर्ण होत असल्याचा हा एक पुरावा आहे.

बायबलमध्ये अशा एका काळाविषयी भाकीत करण्यात आले होते, जेव्हा निरनिराळ्या भाषा बोलणारे लोक यातील जीवनदायक संदेश ऐकतील. खऱ्‍या उपासनेकडे कशाप्रकारे अनेकजण आकर्षित होतील याचे संदेष्टा जखऱ्‍या याने पुढील भविष्यवाणीत वर्णन केले: “त्या दिवसांत सर्व भाषा बोलणाऱ्‍या राष्ट्रांपैकी दहा जण यहूदी माणसाचा [अभिषिक्‍त ख्रिस्ती, ‘देवाच्या इस्राएलातील’ सदस्य] पदर धरून म्हणतील, आम्ही तुम्हाबरोबर येतो, कारण देव तुम्हाबरोबर आहे असे आम्ही ऐकले आहे.” (जखऱ्‍या ८:२३; गलतीकर ६:१६) तसेच प्रेषित योहानाने एका दृष्टान्तात त्याला जे पाहायला मिळाले त्याचे अशाप्रकारे वर्णन केले: “मी पाहिले तो सर्व राष्ट्रे, वंश, लोक व निरनिराळ्या भाषा बोलणारे ह्‍यांच्यापैकी कोणाला मोजता आला नाही असा, . . . मोठा लोकसमुदाय राजासनासमोर व कोकऱ्‍यासमोर उभा राहिलेला माझ्या दृष्टीस पडला.” (प्रकटीकरण ७:९) या सर्व भविष्यवाण्या पूर्ण होताना आपण पाहिल्या आहेत!

सर्व प्रकारच्या लोकांना सुवार्ता सांगणे

८. आधुनिक काळातील कोणत्या वस्तुस्थितीमुळे आपल्या साक्षकार्यात फेरबदल करण्याची गरज उद्‌भवली आहे?

आज असंख्य लोक स्थलांतर करून दुसऱ्‍या ठिकाणी स्थायिक होतात. जागतिकीकरणामुळे देशांतर करणे पूर्वी कधी नव्हे इतके सुलभ झाले आहे. चांगल्या राहणीमानाच्या शोधात, युद्धग्रस्त व आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या प्रदेशांतील लोकांचे थवेच्या थवे आर्थिक स्थैर्य असलेल्या प्रदेशांत स्थायिक झाले आहेत. देशांतर करून आलेल्या व निर्वासित लोकांच्या आगमनामुळे बऱ्‍याच देशांत परदेशी भाषा बोलणाऱ्‍या लोकांच्या वसत्या निर्माण झाल्या आहेत. उदाहरणार्थ, फिनलंडमध्ये १२० भाषा बोलल्या जातात आणि ऑस्ट्रेलियात तर ही संख्या २०० हून अधिक आहे. सान दियागो या अमेरिकेतील एका शहरातच १०० पेक्षा जास्त भाषा बोलणारे लोक भेटतात!

९. आपल्या क्षेत्रात वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्‍या लोकांविषयी आपला कसा दृष्टिकोन असावा?

निरनिराळ्या भाषा बोलणारे हे लोक आपल्या सेवाकार्यात एक अडथळा आहेत असे ख्रिस्ती सेवक समजतात का? मुळीच नाही! उलट आपल्या सेवाकार्याचे क्षेत्र—अर्थात ‘कापणीसाठी पांढरी असलेली शेते’ आणखी विस्तारली आहेत हे पाहून आपल्याला आनंद वाटतो. (योहान ४:३५) ज्यांना आपल्या आध्यात्मिक गरजांची जाणीव आहे, मग ते कोणत्याही राष्ट्राचे अथवा भाषेचे असोत, अशा लोकांना साहाय्य करण्यास आपण उत्सुक आहोत. परिणामस्वरूप, दर वर्षी “निरनिराळ्या भाषा” बोलणाऱ्‍या लोकांपैकी अधिकाधिक लोक ख्रिस्ताचे शिष्य बनत आहेत. (प्रकटीकरण १४:६) उदाहरणार्थ, २००४ सालच्या ऑगस्ट महिन्यात जर्मनी देशात प्रचार कार्य जवळजवळ ४० वेगवेगळ्या भाषांत केले जात होते. त्याच वेळी, ऑस्ट्रेलियात जवळजवळ ३० भाषांत सुवार्ता प्रचाराचे कार्य केले जात होते. केवळ दहा वर्षांपूर्वी येथे १८ भाषांत प्रचार कार्य केले जात होते. ग्रीसमध्ये यहोवाचे साक्षीदार २० वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्‍या लोकांना सुवार्ता सांगत आहेत. सबंध जगात, यहोवाच्या साक्षीदारांपैकी जवळजवळ ८० टक्के साक्षीदार सध्याची आंतरराष्ट्रीय इंग्रजी भाषा नव्हे तर इतर भाषा बोलतात.

१०. “सर्व राष्ट्रांतील” लोकांना शिष्य बनवण्यात प्रत्येक प्रचारकाची काय भूमिका आहे?

१० खरोखर, “सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा” या येशूने दिलेल्या आदेशाचे आज पालन केले जात आहे! (मत्तय २८:१९) या आज्ञेचा आनंदाने स्वीकार करून यहोवाचे साक्षीदार आज २३५ देशांत सक्रिय आहेत व ते ४०० पेक्षा जास्त भाषांतून साहित्याचे वितरण करत आहेत. लोकांना सुवार्ता सांगण्याकरता आवश्‍यक असलेले साहित्य यहोवाची संघटना पुरवत आहे, पण ‘सर्वांना’ आपल्या स्वतःच्या भाषेत बायबलचा संदेश समजून घेता यावा म्हणून प्रत्येक राज्य प्रचारकाने जाणीवपूर्वक प्रयत्न करणे आवश्‍यक आहे. (योहान १:७) या एकजूट प्रयत्नांमुळे निरनिराळ्या भाषा बोलणाऱ्‍या कोट्यवधी लोकांना सुवार्तेचा लाभ होऊ शकेल. (रोमकर १०:१४, १५) होय आपल्यापैकी प्रत्येकाची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे!

आव्हानाला सामोरे जाणे

११, १२. (क) कोणत्या आव्हानांना सामोरे जाणे आवश्‍यक आहे आणि पवित्र आत्मा कशाप्रकारे आपली मदत करतो? (ख) लोकांना त्यांच्या मातृभाषेत प्रचार करणे सहसा उपयुक्‍त का असते?

११ आज अनेक राज्य प्रचारकांना दुसरी भाषा शिकण्याची इच्छा आहे. पण ते देवाच्या आत्म्याच्या चमत्कारिक दानाची अपेक्षा करू शकत नाहीत. (१ करिंथकर १३:८) नवी भाषा शिकणे अर्थातच सोपे नाही. ज्यांना आधीपासूनच दुसरी एखादी भाषा बोलता येते त्यांना देखील त्या भाषेच्या पण आपल्यापेक्षा वेगळ्या पार्श्‍वभूमीच्या व संस्कृतीच्या लोकांना बायबलचा संदेश परिणामकारकरित्या सांगण्याकरता आपल्या विचारसरणीत व संदेश सादर करण्याच्या पद्धतीत थोडाफार फेरबदल करावा लागतो. शिवाय, नवीन देशात आलेले परदेशी लोक सहसा लाजाळू असतात. त्यामुळे त्यांची विचारसरणी समजून घेणे तितके सोपे नसते.

१२ तरीसुद्धा, इतर भाषा बोलणाऱ्‍या लोकांना मदत करण्याकरता प्रयत्नशील असणाऱ्‍या यहोवाच्या सेवकांमध्ये पवित्र आत्मा आजही कार्यशील आहे. (लूक ११:१३) चमत्कारिकरित्या एखादी भाषा बोलण्याचे वरदान देण्याऐवजी आज पवित्र आत्मा, दुसऱ्‍या भाषा बोलणाऱ्‍या लोकांशी संवाद साधण्याची उत्कट इच्छा आपल्या मनात निर्माण करू शकतो. (स्तोत्र १४३:१०) लोकांना एखादी भाषा बोलता येत असेल आणि या भाषेत त्यांना बायबलचा संदेश सांगितल्यास कदाचित तो त्यांना समजेलही. पण आपला संदेश ऐकणाऱ्‍यांच्या हृदयाचा ठाव घेण्यासाठी सहसा त्यांच्या मातृभाषेतच बोलणे जास्त उपयुक्‍त असते कारण ही भाषा त्यांच्या मनापर्यंत पोचते, त्यांच्या आंतरिक इच्छाआकांक्षांना स्पर्श करते.—लूक २४:३२.

१३, १४. (क) काहींना नवीन भाषेत सेवाकार्य करण्याची प्रेरणा कशामुळे मिळते? (ख) आत्मत्यागाची वृत्ती कशावरून दिसून येते?

१३ बऱ्‍याच राज्य प्रचारकांनी, बायबल सत्याला मिळणारा उत्तम प्रतिसाद पाहून परदेशी भाषेतील क्षेत्रात सेवाकार्य करण्याचे ठरवले आहे. इतरजण आपले सेवाकार्य अधिक आव्हानात्मक व रोचक बनले आहे हे पाहून उत्साहित होतात. दक्षिण युरोपातील यहोवाच्या साक्षीदारांच्या एका शाखा दफ्तराने असे म्हटले: “पूर्व युरोपात येणारे असंख्य लोक सत्य जाणून घेण्याकरता आसूसलेले आहेत.” अशा उत्सुक प्रवृत्तीच्या लोकांना मदत करणे किती समाधानकारक ठरते!—यशया ५५:१, २.

१४ पण या कार्यात परिणामकारक सहभाग घेण्याकरता आपल्याला दृढसंकल्पाची व आत्मत्यागी वृत्तीची गरज आहे. (स्तोत्र ११०:३) उदाहरणार्थ, देशांतर करून आलेल्या चिनी भाषिक समूहांना बायबलमधील संदेश समजून घेण्यास मदत करण्याकरता कित्येक जपानी साक्षीदार कुटुंबांनी मोठ्या शहरातील आरामदायी जीवनशैलीचा त्याग करून दूरदूरच्या क्षेत्रात स्थलांतर केले आहे. संयुक्‍त संस्थानांच्या पश्‍चिम समुद्रतटावर राज्य प्रचारक नियमितरित्या एक ते दोन तासांचा प्रवास करून फिलिपिनो क्षेत्रातील लोकांसोबत बायबल अभ्यास करण्यासाठी जातात. नॉर्वे या देशात एक जोडपे अफगाणिस्तानहून आलेल्या एका कुटुंबांसोबत अभ्यास करतात. हे साक्षीदार जोडपे देव आपल्याकडून काय अपेक्षितो? * या माहितीपत्रकाच्या इंग्रजी व नॉर्विजियन आवृत्तींचा उपयोग करतात. कुटुंबातले सदस्य पर्शियन भाषेत परिच्छेद वाचतात. ही भाषा त्यांच्या मूळ दारी भाषेशी मिळतीजुळती आहे. या कुटुंबासोबत साक्षीदार जोडपे इंग्रजी व नॉर्विजियन भाषेत संभाषण करतात. परदेशी भाषा बोलणारे लोक जेव्हा सत्याचा स्वीकार करतात, तेव्हा अशा साक्षीदारांच्या आत्मत्यागाचे व आपल्या कार्यपद्धतींत फेरबदल करून पाहण्याच्या प्रवृत्तीचे चीज होते. *

१५. बहुभाषिक प्रचार कार्यात आपण सर्वजण कशाप्रकारे सहभाग घेऊ शकतो?

१५ या बहुभाषिक कार्यात तुम्हीही सहभाग घेऊ शकता का? तुमच्या क्षेत्रात कोणत्या परदेशी भाषा बोलल्या जातात याकडे लक्ष देण्याद्वारे तुम्ही सुरुवात करू शकता. यानंतर तुम्ही त्या भाषांतल्या काही हस्तपत्रिका किंवा माहितीपत्रके नेहमी आपल्यासोबत ठेवू शकता. २००४ साली प्रकाशित झालेल्या सर्व राष्ट्रांतील लोकांकरता सुवार्ता (इंग्रजी) या पुस्तिकेचा वापर करून बऱ्‍याच प्रचारकांना त्यातील साध्यासोप्या, सकारात्मक संदेशाच्या साहाय्याने राज्याची आशा निरनिराळ्या भाषा बोलणाऱ्‍या लोकांपर्यंत पोचवण्यात यश आले आहे.

“परदेशीयांवर प्रीति करावी”

१६. परदेशी भाषिकांना मदत करण्याकरता जबाबदारीच्या पदांवर असलेले बांधव कशाप्रकारे आत्मत्यागी वृत्तीने वागू शकतात?

१६ आपण दुसरी भाषा शिकलो अथवा शिकलो नाही तरीसुद्धा, आपल्या क्षेत्रातील परदेशी लोकांच्या आध्यात्मिक शिक्षणाच्या कार्याला आपण हातभार लावू शकतो. यहोवाने आपल्याला लोकांना ‘परदेशीयांवर प्रीती करण्याची’ आज्ञा दिली होती. (अनुवाद १०:१८, १९) उदाहरणार्थ, उत्तर अमेरिकेतील एका मोठ्या शहरात पाच मंडळ्या एकाच राज्य सभागृहात सभा चालवतात. बऱ्‍याच सभागृहांमध्ये केले जाते त्याप्रमाणे येथेही दर वर्षी मंडळ्यांच्या सभांच्या वेळा आळीपाळीने बदलल्या जातात. या वर्षी या सभागृहात होणाऱ्‍या चिनी सभा रविवारी उशिरा व्हायच्या होत्या. पण या बदलेल्या वेळेमुळे बहुतेक चिनी लोक सभेला येऊ शकणार नव्हते कारण बहुतेकजण शहरातील निरनिराळ्या रेस्टॉरंट्‌समध्ये कामाला होते. हे लक्षात घेऊन इतर मंडळ्यांच्या वडिलांनी प्रेमळपणे काही फेरबदल केले की जेणेकरून चिनी भाषेतील सभा रविवारी लवकर घेता येतील.

१७. काहीजण दुसऱ्‍या भाषेच्या समूहाला मदत करण्याकरता इतर ठिकाणी जायचे ठरवतात तेव्हा आपली कशी प्रतिक्रिया असावी?

१७ प्रेमळ वडील, इतर ठिकाणी जाऊन परदेशी भाषेच्या समूहाला मदत करू इच्छिणाऱ्‍या सुयोग्य व प्रशिक्षित बांधवांची प्रशंसा करतात. या अनुभवी बायबल शिक्षकांची स्थानीय मंडळीला कदाचित उणीव भासेल पण या मंडळ्यांतील वडील लुस्त्रा व इकुन्या येथील वडिलांप्रमाणेच मनोवृत्ती बाळगतात. तीमथ्य हा त्यांच्या मंडळ्यांमध्ये अतिशय हवाहवासा होता, पण तरीसुद्धा या वडिलांनी तीमथ्याला पौलासोबत प्रवास करण्यास जाऊ देण्यापासून रोकले नाही. (प्रेषितांची कृत्ये १६:१-४) शिवाय जे प्रचार कार्यात पुढाकार घेतात, ते परदेशी लोकांची वेगळी मानसिकता, चालीरिती, किंवा राहणीमान पाहून निरुत्साहित होत नाहीत. उलट ते या नाविन्याचा स्वीकार करतात आणि सुवार्तेच्या प्रसाराकरता चांगले संबंध प्रस्थापित करण्याचे मार्ग शोधतात.—१ करिंथकर ९:२२, २३.

१८. कोणते मोठे व कार्य साधण्याजोगे द्वार सर्वांकरता खुले झाले आहे?

१८ भविष्यवाणीनुसार, सुवार्ता खरोखरच आज “सर्व भाषा बोलणाऱ्‍या [राष्ट्रांत]” सांगितली जात आहे. परदेशी भाषिक क्षेत्रांत भरपूर वाढ होण्याची चिन्हे दिसत आहेत. हजारो होतकरू प्रचारकांनी या ‘मोठ्या व कार्य साधण्याजोग्या द्वारातून’ प्रवेश केला आहे. (१ करिंथकर १६:९) पण अशाप्रकारच्या क्षेत्रांत परिणामकारक रित्या कार्य करण्यासाठी आणखी काही करण्याची गरज आहे. याविषयी पुढील लेखात चर्चा करू. (w०५ १२/१)

[तळटीपा]

^ परि. 14 यहोवाच्या साक्षीदारांद्वारे प्रकाशित.

^ परि. 14 यासारखी आणखी उदाहरणे, “लहान त्याग केले मोठे आशीर्वाद मिळाले” या टेहळणी बुरूज एप्रिल १, २००४ अंकातील पृष्ठे २४-८ वरील लेखात आढळतील.

तुम्ही स्पष्ट करू शकता का?

• सर्व लोकांप्रती निःपक्षपाती वृत्ती दाखवण्याच्या बाबतीत आपण कशाप्रकारे यहोवाचे अनुकरण करू शकतो?

• आपल्या क्षेत्रातील जे लोक आपल्या भाषेत बोलत नाहीत त्यांच्याविषयी आपली मनोवृत्ती कशी असावी?

• लोकांना त्यांच्या मातृभाषेत प्रचार करणे का उपयुक्‍त आहे?

• आपल्यामध्ये असलेल्या परदेशी लोकांबद्दल आपण कशाप्रकारे काळजी व्यक्‍त करू शकतो?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२३ पानांवरील नकाशा/चित्र]

(पूर्ण फॉर्मेटेड टेक्स्ट पाहायचे असेल तर प्रकाशन पाहा)

रोम

आशिया

क्रीट

लिबिया

फ्रुगिया

पंफुलिया

जेरुसलेम

यहुदिया

ईजिप्त

पंत

कप्पदुकिया

मेसोपोटेमिया

मेद

एलाम

अरेबिया

पार्थिया

[समुद्र]

भूमध्य समुद्र

काळा समुद्र

तांबडा समुद्र

पर्शियन आखात

[चित्र]

सा.यु. ३३ सालच्या पेन्टेकॉस्टच्या दिवशी रोमी साम्राज्याच्या १५ प्रांतांतून आलेल्या लोकांनी आपापल्या प्रादेशिक भाषेत सुवार्ता ऐकली

[२४ पानांवरील चित्र]

अनेक परदेशी लोक बायबलमधील सत्याला चांगला प्रतिसाद देत आहेत

[२५ पानांवरील चित्र]

एका राज्य सभागृहाचा पाच भाषांतील फलक