व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

होशेयची भविष्यवाणी आपल्याला देवाबरोबर चालण्यास साहाय्य करते

होशेयची भविष्यवाणी आपल्याला देवाबरोबर चालण्यास साहाय्य करते

होशेयची भविष्यवाणी आपल्याला देवाबरोबर चालण्यास साहाय्य करते

“ते परमेश्‍वरामागून जातील.”होशेय ११:१०.

१. होशेयच्या पुस्तकात कोणते लाक्षणिक नाटक पाहण्यास मिळते?

तुम्हाला चित्तवेधक कथानक व रोचक पात्रे असलेली नाटके आवडतात का? बायबलमधील होशेय या पुस्तकात असेच एक लाक्षणिक अर्थाचे नाटक आहे. * या नाटकात देवाचा संदेष्टा होशेय याच्या कौटुंबिक घटनांचा समावेश असून याचा संबंध, यहोवाने प्राचीन इस्राएल राष्ट्रासोबत मोशेच्या नियमशास्त्र कराराद्वारे केलेल्या लाक्षणिक विवाहाशी आहे.

२. होशेयबद्दल आपल्याला कोणती माहिती आहे?

या नाटकाची पार्श्‍वभूमी होशेयच्या १ ल्या अध्यायात वाचायला मिळते. होशेय कदाचित इस्राएलच्या दहा गोत्रांच्या राज्यात (यांतील सर्वात प्रमुख गोत्रावरून या राज्याला एफ्राईम देखील म्हणण्यात आले) राहात असावा. होशेयने इस्राएलच्या शेवटल्या सात राजांच्या व यहुदाच्या राजा उज्जिया, योथाम, आहाज, व हिज्कीया यांच्या कारकीर्दीत देवाचे संदेश घोषित केले. (होशेय १:१) त्याअर्थी, होशेयने कमीतकमी ५९ वर्षांपर्यंत देवाचा संदेष्टा म्हणून कार्य केले. त्याच्या नावाचे हे पुस्तक सा.यु.पू. ७४५ च्या सुमारास लिहून पूर्ण झाले असले तरीसुद्धा ते आजच्या काळातही अर्थपूर्ण आहे. आज लाखो लोक होशेयने केलेल्या पुढील भविष्यवाणीप्रमाणे कार्य करत आहेत: “ते परमेश्‍वरामागून जातील.”—होशेय ११:१०.

या पुस्तकात काय आहे?

३, ४. होशेय अध्याय १ ते ५ यात कशाविषयी वर्णन केले आहे ते थोडक्यात स्पष्ट करा.

होशेय पुस्तकातील १ ते ५ अध्यायांचा संक्षिप्त सारांश पाहिल्यास, देवावर विश्‍वास ठेवण्याद्वारे व त्याच्या इच्छेनुसार जीवन व्यतीत करण्याद्वारे त्याच्यासोबत चालण्याचा आपला निर्धार आणखी पक्का होईल. इस्राएल राज्याच्या रहिवाशांनी आध्यात्मिक व्यभिचार केला पण त्यांनी पश्‍चात्ताप केल्यास देव त्यांना दया दाखवण्यास तयार होता. होशेयने आपली पत्नी गोमर हिच्याशी ज्याप्रकारे व्यवहार केला त्यावरून हे स्पष्ट झाले. तिला त्याच्याकडून एक मूल झाल्यानंतर तिला दोन अनौरस मुले झाली असे दिसते. तरीसुद्धा यहोवा ज्याप्रकारे पश्‍चात्तापी इस्राएलास क्षमा करण्यास तयार होता त्याचप्रकारे, होशेयने आपल्या पत्नीचा पुन्हा स्वीकार केला.—होशेय १:१–३:५.

यहोवाचा इस्राएलासोबत एक वाद होता कारण या राष्ट्रातून सत्य, प्रेमदया व देवाचे ज्ञान नाहीसे झाले होते. यामुळे जारकर्मी इस्राएल व भ्रष्ट यहुदा या दोन्ही राज्यांकडून तो जाब मागणार होता. पण देवाचे लोक “संकटसमयी” त्याचा धावा करतील.—होशेय ४:१-५:१५.

नाटकाची सुरुवात

५, ६. (क) इस्राएलच्या दहा गोत्रांच्या राज्यात जारकर्म किती प्रचलित होते? (ख) प्राचीन इस्राएलाला दिलेला इशारा आपल्याकरताही महत्त्वाचा का आहे?

देवाने होशेयला आज्ञा दिली: “जा; एक जारिणी बायको करून घे व जारकर्माची मुले आपली अशी करून घे; कारण परमेश्‍वराचा त्याग करणे हे घोर जारकर्म हा देश करीत आहे.” (होशेय १:२) इस्राएलात जारकर्म किती प्रचलित होते? होशेय सांगतो, “अनाचारबुद्धीने त्यांस [दहा गोत्रांच्या राज्याच्या रहिवाशांस] बहकविले आहे, परमेश्‍वराचा त्याग करणे हा अनाचार त्यांनी केला आहे. . . . तुमच्या कन्या व्यभिचार करितात व तुमच्या सुना जारकर्म करितात. . . . ते स्वत: [पुरूष] वेश्‍यांकडे जातात व कसबिणींसह यज्ञ करितात.”—होशेय ४:१२-१४.

इस्राएलात शारीरिक व आध्यात्मिक अर्थाने जारकर्म बोकाळले होते. म्हणूनच यहोवा इस्राएलांवर सूड उगवणार होता. (होशेय १:४; ४:९) हा इशारा आपल्याकरताही महत्त्वाचा आहे कारण आजही जे जारकर्म करतात व अशुद्ध उपासनेत सहभागी होतात अशा लोकांवर यहोवा सूड उगवेल. पण जे देवासोबत चालतात ते शुद्ध उपासनेकरता असलेल्या त्याच्या दर्जांचे पालन करतात आणि त्यांना जाणीव आहे की “जारकर्मी, . . . असल्या कोणासहि ख्रिस्ताच्या व देवाच्या राज्यात वारसा नाही.”—इफिसकर ५:५; याकोब १:२७.

७. होशेयने गोमरशी केलेला विवाह कशास सूचित करत होता?

होशेयने गोमरशी विवाह केला तेव्हा ती कुमारी होती आणि “त्याच्यापासून गर्भवती होऊन तिला पुत्र झाला” तेव्हाही ती एक विश्‍वासू पत्नी होती. (होशेय १:३) या लाक्षणिक नाटकात चित्रित केल्याप्रमाणे, होशेयने गोमर या कुमारीशी विवाह केला त्याप्रमाणे सा.यु.पू. १५१३ साली इस्राएलांना ईजिप्तच्या बंदिवासातून मुक्‍त केल्यावर देवाने अशाचप्रकारे त्यांच्यासोबत एक करार केला. या कराराला मान्यता देऊन इस्राएलाने आपला “पती” यहोवा याला विश्‍वासू राहण्याचे वचन दिले. (यशया ५४:५) होय होशेयने गोमरशी केलेला निर्मळ विवाह, इस्राएलाच्या देवाशी झालेल्या लाक्षणिक विवाहाचे प्रतीक होते. पण नंतर परिस्थिती बदलली!

८. इस्राएलचे दहा गोत्रांचे राज्य कशाप्रकारे अस्तित्वात आले आणि तेथील उपासनेबद्दल काय म्हणता येईल?

होशेयची पत्नी “पुन: गर्भवती होऊन तिला कन्या झाली.” ही कन्या व यानंतर गोमरला झालेले आणखी एक मूल कदाचित तिच्या जारकर्माचे फळ होते. (होशेय १:६, ८) गोमर इस्राएल राष्ट्रास सूचित करत असल्यामुळे तुम्ही कदाचित विचार कराल: ‘इस्राएलाने कोणत्या अर्थाने जारकर्म केले?’ सा.यु.पू. ९९७ साली इस्राएलची दहा गोत्रे दक्षिणेतील यहुदा व बन्यामीन या गोत्रांपासून विलग झाली. यहुदा राज्यातील जेरूसलेममधील यहोवाच्या मंदिरात लोकांनी जाऊ नये म्हणून, उत्तरेकडील दहा गोत्रांच्या इस्राएल राज्यात वासराची उपासना सुरू करण्यात आली. अशाप्रकारे बआल या खोट्या दैवताची उपासना व त्याच्याशी संबंधित असलेल्या कामक्रीडा इस्राएलात प्रचलित झाल्या.

९. होशेय १:६ यात भाकीत केल्याप्रमाणे इस्राएलात काय घडले?

गोमरला दुसरे अनौरस मूल झाले तेव्हा देवाने होशेयला असे सांगितले: “तिचे नाव लो-रुहामा (म्हणजे दया न पावलेली) असे ठेव; कारण यापुढे मी इस्राएलाच्या घराण्यावर दया करणार नाही तर त्यांना अगदी काढून टाकीन.” (होशेय १:६, पं.र.भा.) सा.यु.पू. ७४० साली यहोवाने त्यांना ‘काढून टाकले’ अर्थात, अश्‍शूरी लोकांनी इस्राएल लोकांना बंदिवासात नेले. पण यहुदाच्या दोन गोत्रांच्या राज्याला मात्र देवाने दया दाखवली व त्यांचा उद्धार केला. पण धनुष्य, तरवार, लढाई, घोडे अथवा स्वार यांच्या द्वारे त्याने हा उद्धार केला नाही. (होशेय १:७) सा.यु.पू. ७३२ साली एकाच रात्री, केवळ एका देवदूताने यहुदाची राजधानी जेरूसलेमवर चालून आलेल्या १,८५,००० अश्‍शूरी सैनिकांना जिवे मारले.—२ राजे १९:३५.

इस्राएलविरुद्ध यहोवाचा विवाद

१०. गोमरच्या जारकर्मावरून काय सूचित होते?

१० गोमरने होशेयला सोडून दिले. ती “जारिणी बायको” बनली व परपुरुषासोबत राहू लागली. इस्राएल राज्याने कशाप्रकारे मूर्तिपूजक राष्ट्रांशी राजकीय सख्य केले व त्यांच्यावर अवलंबून राहू लागले हे यावरून सूचित होते. आपल्या समृद्धीचे श्रेय यहोवाला देण्याऐवजी इस्राएलने या राष्ट्रांच्या दैवतांना हे श्रेय दिले आणि अशारितीने खोट्या उपासनेत सामील होऊन देवासोबत झालेल्या आपल्या वैवाहिक कराराचे उल्लंघन केले. साहजिकच या आध्यात्मिकरित्या जारकर्मी राष्ट्रासोबत यहोवाचा वाद होता!—होशेय १:२; २:२, १२, १३.

११. यहोवाने इस्राएल व यहुदाला बंदिवासात जाऊ दिले तेव्हा नियमशास्त्राचा करार रद्द झाला का?

११ आपल्या पतीला सोडून दिल्याबद्दल इस्राएलला कोणती शिक्षा भोगावी लागली? देवाने तिला बॅबिलोनच्या ‘वनात आणले.’ सा.यु.पू. ७४० साली इस्राएलांना जेथे बंदिवान करून नेण्यात आले होते त्या अश्‍शूरवर बॅबिलोनने विजय मिळवला. (होशेय २:१४) यहोवाने १० गोत्रांच्या राज्याचा अंत घडवून आणला तेव्हा त्याने इस्राएलच्या मूळच्या १२ गोत्रांच्या राष्ट्राशी केलेला विवाहाचा करार रद्द केला नाही. किंबहुना, सा.यु.पू. ६०७ साली देवाने जेरूसलेमचा बॅबिलोन्यांच्या हातून नाश होऊ दिला व यहुदाच्या लोकांना बंदिवान बनू दिले तेव्हा ज्या मोशेच्या नियमशास्त्राच्या कराराद्वारे १२ गोत्रांच्या इस्राएल राष्ट्राचे देवासोबत लाक्षणिक विवाहबंधन बांधले गेले होते तो नियमशास्त्राचा करार त्याने रद्द केला नाही. सा.यु. ३३ साली जेव्हा यहुदी नेत्यांनी येशू ख्रिस्ताचा अव्हेर करून त्याला ठार मारले तेव्हा तो नातेसंबंध संपुष्टात आला.—कलस्सैकर २:१४.

यहोवा इस्राएलचे ताडन करतो

१२, १३. होशेय २:६-८ यातील माहितीचा काय अर्थ होतो आणि हे शब्द इस्राएलच्या बाबतीत कसे खरे ठरले?

१२ देवाने इस्राएलास ‘आपले व्यभिचाराचे प्रकार दूर करण्याची’ ताकीद दिली पण ती मात्र आपल्या वल्लभांच्या मागे लागली. (होशेय २:२, ५) यहोवाने म्हटले: “ह्‍यास्तव, पाहा, मी तुझ्या मार्गांवर काटेरी कुंपण घालीन; तिला वाट सापडणार नाही अशी आडभिंत तिच्यापुढे घालीन. ती आपल्या वल्लभांमागे धावेल पण ते तिला आटोपणार नाहीत; ती त्यांचा शोध करील पण ते तिला सापडणार नाहीत; तेव्हा ती म्हणेल, मी आपल्या पहिल्या पतीकडे परत जाईन, कारण तेव्हाची माझी स्थिति आताच्यापेक्षा बरी होती. तिला धान्य, द्राक्षारस व तेल पुरविणारा व जे सोने रुपे त्यांनी बआलमूर्तीसाठी वेचिले त्याची रेलचेल करून देणारा तो मीच, हे तिला माहीत नाही.”—होशेय २:६-८.

१३ इस्राएल ज्यांना आपले ‘वल्लभ’ मानत होते त्या राष्ट्रांची त्यांनी मदत मागितली तरीसुद्धा त्यांच्यापैकी कोणीही त्यांची मदत करू शकले नाही. जणू तिच्याभोवती मोठे कुंपण घालण्यात आले होते. ते कोणत्याही प्रकारे तिला मदत करू शकले नाही. अश्‍शूरी लोकांनी तीन वर्षांपर्यंत वेढा घातल्यानंतर सा.यु.पू. ७४० साली शोमरोन हे राजधानी शहर पडले व यानंतर पुन्हा कधी हे दहा गोत्रांचे राज्य स्थापन होऊ शकले नाही. बंदिवासात गेलेल्या केवळ काही व्यक्‍तींनाच याची जाणीव होणार होती की त्यांचे पूर्वज जेव्हा यहोवाची सेवा करत होते तेव्हा त्यांची किती चांगली स्थिती होती. हे शेषजन बआल दैवताची उपासना त्यागून पुन्हा एकदा यहोवाशी कराराचा नातेसंबंध जोडणार होते.

नाटकाकडे पुन्हा एक नजर

१४. होशेयने गोमरसोबत वैवाहिक संबंध पुन्हा कशाप्रकारे प्रस्थापित केला?

१४ होशेयच्या वैवाहिक जीवनातील घडामोडींचा इस्राएलच्या यहोवाबरोबरील नात्याशी कशाप्रकारे संबंध होता हे आणखी स्पष्टपणे समजून घेण्याकरता या शब्दांकडे लक्ष द्या: “मग परमेश्‍वराने मला म्हटले, . . . तू पुन: जाऊन जी स्त्री जारिणी असून आपल्या सख्याला प्रिय आहे तिजवर प्रेम कर.” (होशेय ३:१) या आज्ञेप्रमाणे होशेयने गोमरला ती ज्या पुरुषासोबत राहात होती त्याच्याकडून पुन्हा विकत घेतले. त्यानंतर त्याने आपल्या पत्नीला ताकीद दिली: “तू पुष्कळ दिवस माझ्याकरिता स्वस्थ बसून रहा, जारकर्म करू नको, परपुरुषाची होऊ नको; मीहि तुजशी असाच वागेन.” (होशेय ३:२, ३) गोमरने हे ताडन स्वीकारले व होशेयने तिच्यासोबत वैवाहिक संबंध पुन्हा प्रस्थापित केला. देवाने इस्राएल व यहुदाच्या लोकांशी ज्याप्रकारे व्यवहार केला त्याच्याशी याचा कसा संबंध आहे?

१५, १६. (क) देवाच्या ताडन मिळालेल्या राष्ट्राला कोणत्या अटीवर त्याची दया अनुभवता येणार होती? (ख) होशेय २:१८ कशाप्रकारे पूर्ण झाले आहे?

१५ इस्राएल व यहुदाचे लोक बॅबिलोनमध्ये बंदिवान होते तेव्हा देवाने आपल्या संदेष्ट्यांना पाठवले व तो त्यांच्या ‘मनाला धीर येईल असे’ बोलला. देवाने त्यांच्यावर दया करावी म्हणून, ज्याप्रमाणे गोमर आपल्या पतीकडे परतली होती त्याप्रमाणे त्यांनीही पश्‍चात्ताप दाखवून आपला पती व मालक असलेल्या यहोवाकडे परतायला हवे होते. त्यांनी असे केल्यास आपण ताडन केलेल्या आपल्या पत्नीसमान राष्ट्राला बॅबिलोनच्या ‘वनातून’ परत यहुदा व जेरूसलेमला आणू असे यहोवाने म्हटले. (होशेय २:१४, १५) हे अभिवचन त्याने सा.यु.पू. ५३७ साली पूर्ण केले.

१६ देवाने आणखी एक अभिवचन पूर्ण केले: “त्या दिवशी इस्राएलांकरिता मी वनपशु, आकाशातील पक्षी व भूमिवर रांगणारे जीव यांबरोबर करार करीन; देशातून धनुष्य, तरवार युद्ध ही मोडून टाकीन व ते सुखासमाधानाने राहतील असे मी करीन.” (होशेय २:१८) आपल्या मायदेशी परतलेले यहुदी शेषजन निर्भयपणे राहू लागले, त्यांना कोणत्याही जीवजंतूंपासून कसलीही भीती नव्हती. सा.यु. १९१९ साली या भविष्यवाणीची पुन्हा पूर्णता झाली. त्या वर्षी आध्यात्मिक इस्राएलचे शेषजन खोट्या धर्माच्या जागतिक साम्राज्यापासून अर्थात ‘मोठ्या बाबेलपासून’ मुक्‍त झाले. आता ते या पृथ्वीवर सार्वकालिक जीवनाची आशा बाळगणाऱ्‍या आपल्या साथीदारांसोबत एका आध्यात्मिक परादीसात सुरक्षित व आनंदी जीवन जगतात. या खऱ्‍या ख्रिश्‍चनांमध्ये कोणत्याही प्रकारच्या पाशवी प्रवृत्ती दिसून येत नाहीत.—प्रकटीकरण १४:८; यशया ११:६-९; गलतीकर ६:१६.

शिकलेले धडे मनावर घेणे

१७-१९. (क) आपल्याला देवाच्या कोणत्या गुणांचे अनुकरण करण्याचे प्रोत्साहन दिले जात आहे? (ख) यहोवाच्या दयाळूपणा व कनवाळूपणाचा आपल्यावर कसा परिणाम झाला पाहिजे?

१७ देव दयाळू व कनवाळू आहे आणि आपणही असेच असले पाहिजे. होशेयच्या सुरुवातीच्या अध्यायांतून आपल्याला हा एक धडा शिकायला मिळतो. (होशेय १:६, ७; २:२३) देव पश्‍चात्तापी इस्राएलांना दया दाखवण्यास तयार होता. हे या देवप्रेरित नीतिसूत्राशी सुसंगत आहे: “जो आपले दोष झाकितो त्याचे बरे होत नाही, जो ते कबूल करून सोडून देतो त्याजवर दया होते.” (नीतिसूत्रे २८:१३) तसेच स्तोत्रकर्त्याचे पुढील शब्द देखील ज्यांच्या हातून पाप घडले पण जे पश्‍चात्तापी आहेत अशांकरता सांत्वनदायक आहेत: “देवाचे यज्ञ म्हणजे भग्न आत्मा हे देवा, भग्न व अनुतप्त हृदय तू तुच्छ मानणार नाहीस.”—स्तोत्र ५१:१७.

१८ होशेयची भविष्यवाणी, आपण ज्याची उपासना करतो त्या देवाच्या दया व कणव या गुणांकडे आपले लक्ष वेधते. त्याच्या नीतिमान मार्गांतून जर कोणी पथभ्रष्ट झाले तरीसुद्धा ते पश्‍चात्ताप करून सरळ मार्गावर येऊ शकतात. त्यांनी असे केल्यास यहोवा आनंदाने त्यांच्या स्वीकार करेल. ज्या इस्राएल राष्ट्रासोबत त्याने लाक्षणिक अर्थाने विवाह केला होता त्या राष्ट्रातील पश्‍चात्तापी सदस्यांना त्याने दया दाखवली. त्यांनी यहोवाच्या आज्ञांचे उल्लंघन केले व ‘इस्राएलाच्या पवित्र प्रभूस चिडविले. पण तो कनवाळू होता, ते नश्‍वर आहेत ह्‍याची त्याने सतत आठवण केली.’ (स्तोत्र ७८:३८-४१) यहोवा देवाच्या या दयाळूपणामुळे व कनवाळूपणामुळे आपल्याला त्याच्यासोबत चालत राहण्याची प्रेरणा मिळाली पाहिजे.

१९ मनुष्यहत्या, चोरी व जारकर्म यांसारखी पातके इस्राएलात मोठ्या प्रमाणात घडत होती तरीसुद्धा यहोवा “तिच्या मनाला धीर येईल असे” बोलला. (होशेय २:१४; ४:२) यहोवाच्या दयाळूपणा व कनवाळूपणाविषयी आपण मनन करतो तेव्हा आपल्या मनालाही धीर मिळतो व त्याच्यासोबत असलेला आपला घनिष्ठ वैयक्‍तिक नातेसंबंध अधिक दृढ होतो. तेव्हा आपण स्वतःला पुढील प्रश्‍न विचारू या: ‘इतरांसोबत वागताना मला यहोवाच्या दयाळूपणाचे व कनवाळूपणाचे आणखी चांगल्याप्रकारे अनुकरण कसे करता येईल? एखाद्या ख्रिस्ती बांधवाने माझे मन दुखावले, पण त्याने क्षमा मागितली तर देवासारखाच मीही क्षमा करण्यास तयार आहे का?’—स्तोत्र ८६:५.

२०. देवाने दिलेल्या आशेविषयी आपण भरवसा बाळगला पाहिजे हे दाखवणारे एक उदाहरण द्या.

२० देव खरी आशा देतो. उदाहरणार्थ, त्याने अशी प्रतिज्ञा केली: “आशेचे द्वार व्हावे म्हणून मी तिला अखोर खिंड देईन.” (होशेय २:१५) यहोवाच्या प्राचीन काळातील पत्नीसमान संघटनेला आपल्या मायदेशी, जेथे “अखोर खिंड” होती त्या देशी परतण्याची पक्की आशा होती. सा.यु.पू. ५३७ साली ही प्रतिज्ञा देवाने पूर्ण केली. तेव्हा, आपल्याला यहोवाने जी आशा दिली आहे तीही निश्‍चितच पूर्ण होईल हे जाणून आपण आनंदी होऊ शकतो.

२१. देवासोबत चालताना ज्ञान महत्त्वाचे का आहे?

२१ देवासोबत चालत राहण्याकरता आपण त्याचे ज्ञान घेत राहिले पाहिजे व त्यानुसार आपल्या जीवनात आचरण करत राहिले पाहिजे. इस्राएलात यहोवाविषयीच्या ज्ञानाचा तुटवडा होता. (होशेय ४:१, ६) तरीपण काहीजणांनी देवाच्या मार्गदर्शनाचे मोल जाणले व त्यानुसार ते वागले. परिणामस्वरूप त्यांना अनेक आशीर्वाद मिळाले. त्यांच्यापैकी एक होता, होशेय. तसेच एलीयाच्या काळातही ७,००० असे होते की ज्यांनी बआलापुढे गुडघे टेकले नव्हते. (१ राजे १९:१८; रोमकर ११:१-४) देवाच्या मार्गदर्शनाबद्दल आपण कृतज्ञ मनोवृत्ती राखली तर आपण सदोदीत देवासोबत चालत राहू शकू.—स्तोत्र ११९:६६; यशया ३०:२०, २१.

२२. धर्मत्यागाविषयी आपला दृष्टिकोन कसा असावा?

२२ यहोवाच्या लोकांचे जे नेतृत्त्व करतात त्यांनी धर्मत्यागाचा धिक्कार करावा अशी यहोवा त्यांच्याकडून अपेक्षा करतो. पण होशेय ५:१ असे म्हणते: “याजकांनो, ऐका; हे इस्राएलाच्या घराण्या, लक्ष दे; हे राजघराण्या, कान दे; कारण तुम्हास शासन होणार; तुम्ही मिस्पा येथे पाश, ताबोरावर पसरलेले जाळे असे झाला आहा.” धर्मत्यागी नेते इस्राएलांकरता पाशासारखे व जाळ्यासारखे होते. कारण त्यांच्यामुळेच इस्राएल लोक मूर्तिपूजेकडे वळाले. ताबोर पर्वत व मिस्पा नावाचे ठिकाण कदाचित त्याकाळी अशा खोट्या उपासनेची केंद्रे असावीत.

२३. होशेय अध्याय १ ते ५ यातील माहितीचा अभ्यास केल्यावर तुम्हाला कोणता फायदा झाला?

२३ तर आतापर्यंत, होशेयच्या भविष्यवाणीने आपल्याला हे समजून घेण्यास मदत केली की यहोवा दयाळू देव आहे आणि जे त्याचे मार्गदर्शन पाळतात व धर्मत्यागाचा धिक्कार करतात त्यांना तो आशीर्वाद देतो. गतकाळातील पश्‍चात्तापी इस्राएल लोकांप्रमाणे आपण यहोवाचा शोध करून त्याला संतुष्ट करण्याचाच नेहमी प्रयत्न करावा. (होशेय ५:१५) असे केल्यास, नेहमी चांगलेच परिणाम होतील आणि देवासोबत विश्‍वासूपणे चालणाऱ्‍यांना जो अतुलनीय आनंद व शांती लाभते ती आपल्यालाही अनुभवता येईल!—स्तोत्र १००:२; फिलिप्पैकर ४:६, ७. (w०५ ११/१५)

[तळटीप]

^ परि. 1 गलतीकर ४:२१-२६ यात एका लाक्षणिक नाटकाचे वर्णन आहे. यासंबंधी यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेल्या शास्त्रवचनांवरील सूक्ष्मदृष्टी खंड २ रा पृष्ठे ६९३-४ वरील माहिती पाहावी.

तुम्ही कसे उत्तर द्याल?

• होशेयने गोमरशी केलेला विवाह कशाचे प्रतीक आहे?

• यहोवाचा इस्राएलविरुद्ध कोणता वाद होता?

होशेय १ ते ५ या अध्यायांपैकी तुम्हाला कोणता अध्याय विशेष आवडला?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[४ पानांवरील चित्र]

होशेयची पत्नी कोणाला सूचित करते हे तुम्हाला माहीत आहे का?

[५ पानांवरील चित्र]

शोमरोनच्या रहिवाशांवर सा.यु.पू. ७४० साली अश्‍शूरी लोकांनी विजय मिळवला

[६ पानांवरील चित्र]

आनंदी लोक आपल्या मायदेशी परतले