तुम्ही कोणाच्या आज्ञा मानता—देवाच्या की मनुष्याच्या?
तुम्ही कोणाच्या आज्ञा मानता—देवाच्या की मनुष्याच्या?
“आम्ही मनुष्यांपेक्षा देवाची आज्ञा मानली पाहिजे.”—प्रेषितांची कृत्ये ५:२९.
१. (क) हा अभ्यास कोणत्या मुख्य वचनावर आधारित आहे? (ख) प्रेषितांना अटक का करण्यात आली होती?
ज्या न्यायालयाने काही आठवड्यांआधीच येशू ख्रिस्ताला मृत्यूदंड दिला होता त्या न्यायालयाच्या न्यायाधिशांनी आता त्याच्या निकटवर्ती अनुयायांना, त्याच्या प्रेषितांना धारेवर धरले होते. त्यांनी त्यांना तुरुंगात डांबले होते. पण जेव्हा तुरुंगाचे रक्षक त्यांना न्यायालयासमोर नेण्याकरता त्यांच्या कोठडीच्या दाराजवळ आले, तेव्हा काय आश्चर्य! तेथे तर कोणीही नव्हते. दारांना कुलुपे लावलेली होती तरीसुद्धा आतील कैदी गायब झाले होते. साहजिकच, यहुदी सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश चांगलेच संतापले असतील. रक्षकांना लवकरच खबर मिळाली की हे प्रेषित जेरुसलेममधील मंदिरात निर्भयपणे येशू ख्रिस्ताविषयी लोकांना उपदेश करत होते. हे कार्य केल्यामुळेच तर त्यांना अटक करण्यात आली होती! खबर मिळताच रक्षक तडक मंदिरात पोचले, त्यांनी प्रेषितांना पुन्हा अटक केली आणि त्यांना न्यायालयात आणले.—प्रेषितांची कृत्ये ५:१७-२७.
२. देवदूताने प्रेषितांना काय करण्याची आज्ञा दिली?
२ एका देवदूताने या प्रेषितांना तुरुंगातून सोडवले होते. त्यांचा आणखी छळ होऊ नये म्हणून त्यांना सोडवण्यात आले होते का? नाही. तर जेरुसलेमच्या रहिवाशांना येशू ख्रिस्ताविषयीची सुवार्ता ऐकायला मिळावी म्हणून त्यांना सोडवण्यात आले होते. देवदूताने या प्रेषितांना अशी सूचना दिली होती की त्यांनी ‘ह्या जीवनाचा सर्व संदेश लोकांना सांगत राहावा.’ (प्रेषितांची कृत्ये ५:१९, २०) म्हणूनच मंदिराचे रक्षक प्रेषितांना शोधत आले तेव्हा त्यांना प्रेषित आज्ञाधारकपणे देवदूताच्या सूचनेनुसार लोकांना शिकवत असलेले आढळले.
३, ४. (क) प्रचार न करण्याची ताकीद देण्यात आली तेव्हा पेत्र व योहान यांनी कसे उत्तर दिले? (ख) इतर प्रेषितांनी कशाप्रकारे उत्तर दिले?
३ त्या निश्चयी वृत्तीच्या प्रचारकांपैकी दोघे, प्रेषित पेत्र व योहान आता दुसऱ्यांदा न्यायालयात उभे होते. मुख्य न्यायाधीश योसेफ कैफा त्यांना तशी आठवणही करून देतो. तो म्हणतो: “[येशूच्या] नावाने शिक्षण देऊ नका असे आम्ही तुम्हाला निक्षून सांगितले होते की नाही? तरी पाहा, तुम्ही आपल्या शिकवणीने यरुशलेम भरून टाकले आहे.” (प्रेषितांची कृत्ये ५:२८) खरे तर पेत्र व योहान यांना पुन्हा न्यायालयात पाहून कैफाला आश्चर्य वाटायला नको होते. कारण पहिल्यांदा जेव्हा त्यांना प्रचार न करण्याची ताकीद देण्यात आली, तेव्हा त्यांनी असे उत्तर दिले होते: “देवाच्याऐवजी तुमचे ऐकावे हे देवाच्या दृष्टीने योग्य की अयोग्य आहे हे तुम्हीच ठरवा; [पण] जे आम्ही पाहिले व ऐकले ते न बोलणे हे आम्हाला शक्य नाही.” प्राचीन काळातील संदेष्टा यिर्मयाप्रमाणेच प्रचार करण्याची जी आज्ञा त्यांना देण्यात आली होती ती पूर्ण करण्यापासून स्वतःला रोखणे हे पेत्र व योहानाच्या दृष्टीने, अशक्य होते.—प्रेषितांची कृत्ये ४:१८-२०; यिर्मया २०:९.
४ आता केवळ पेत्र व योहानालाच नव्हे तर नव्याने निवडलेल्या मत्थियासहित सर्व प्रेषितांना न्यायालयापुढे आपली भूमिका स्पष्ट करण्याची संधी मिळाली होती. (प्रेषितांची कृत्ये १:२१-२६) प्रचार करण्याचे थांबवा असे त्यांना बजावून सांगण्यात आले तेव्हा त्यांनीही निर्भयतेने उत्तर दिले, की “आम्ही मनुष्यांपेक्षा देवाची आज्ञा मानली पाहिजे.”—प्रेषितांची कृत्ये ५:२९.
देवाचे आज्ञापालन विरुद्ध मानवाचे आज्ञापालन
५, ६. प्रेषितांनी न्यायालयाच्या हुकुमाचे पालन का केले नाही?
५ प्रेषित हे मुळात कायद्याच्या चौकटीत राहूनच वागणारे पुरुष होते; एरवी त्यांनी न्यायालयाची कोणतीही आज्ञा मोडली नसती. पण कोणत्याही मनुष्याला, मग तो कितीही मोठ्या पदावर असला तरीसुद्धा, देवाने दिलेल्या आज्ञेचे उल्लंघन करायला लावणारा हुकूम देण्याचा अधिकार नाही. यहोवा “सर्व पृथ्वीवर परात्पर” आहे. (स्तोत्र ८३:१८) तो “सर्व जगाचा न्यायाधीश” तर आहेच पण तोच सर्वश्रेष्ठ नियंता आणि सार्वकालिक राजा देखील आहे. देवाच्या आज्ञा रद्द करू पाहणारा कोणत्याही न्यायालयाचा हुकूम, देवाच्या नजरेतून अर्थहीन ठरतो.—उत्पत्ति १८:२५; यशया ३३:२२.
६ हे सत्य काही श्रेष्ठ कायदेपंडितांनीही कबूल केले आहे. उदाहरणार्थ, अठराव्या शतकातील इंग्लिश न्यायाधीश विल्यम ब्लॅकस्टोन यांनी लिहिले की कोणत्याही मानवी कायद्याला बायबलमध्ये सापडणारा “देवाने प्रकट केलेला कायदा” त्याविरुद्ध जाण्याची परवानगी दिली जाऊ नये. त्याअर्थी यहुदी धर्मसभेने प्रेषितांना प्रचार न करण्याची ताकीद दिली तेव्हा त्यांनी या मर्यादेचे उल्लंघन केले होते. साहजिकच, प्रेषित त्यांच्या हुकूमाचे पालन करू शकत नव्हते.
७. प्रचार कार्यामुळे मुख्य याजक का संतापले?
७ प्रचार करत राहण्याविषयी प्रेषितांचा दृढनिश्चय पाहून मुख्य याजक संतापले. कैफासहित याजक गणातील काही सदस्य सदुकी पंथाचे होते व त्यांचा पुनरुत्थानावर विश्वास नव्हता. (प्रेषितांची कृत्ये ४:१, २; ५:१७) पण, प्रेषित मात्र वारंवार हेच सांगत होते की येशूचे मृतांतून पुनरुत्थान झाले आहे. शिवाय, मुख्य याजकांपैकी काहींनी रोमन अधिकाऱ्यांची मर्जी संपादन करण्यासाठी बराच खटाटोप केला होता. येशूची न्यायचौकशी चालली असताना येशूला आपला राजा म्हणून स्वीकारण्याचे पिलाताने आवाहन केले तेव्हा या मुख्य याजकांनी तर इथपर्यंत बोलून दाखवले की “कैसरावाचून कोणी आम्हाला राजा नाही.” (योहान १९:१५) * प्रेषित केवळ येशूच्या पुनरुत्थानाविषयीच सांगत नव्हते, तर ते असेही शिकवत होते की येशूच्या नावाखेरीज “आपले तारण होईल असे दुसरे कोणतेहि नाव आकाशाखाली मनुष्यांमध्ये दिलेले नाही.” (प्रेषितांची कृत्ये २:३६; ४:१२) याजकांना अशी भीती होती की जर लोकांनी पुनरुत्थित येशूला आपला नेता मानले तर रोमन अधिकारी येतील आणि यहुदी धर्मपुढाऱ्यांचे “स्थान व राष्ट्रहि” त्यांच्यापासून हिरावून घेतले जाईल.—योहान ११:४८.
८. गमलिएलाने यहुदी न्यायसभेला कोणता सुज्ञ सल्ला दिला?
८ येशू ख्रिस्ताच्या प्रेषितांचे भविष्य अंधकारमय दिसत होते. न्यायसभेच्या न्यायाधीशांनी तर त्यांना जिवे मारण्याचे ठरवले होते. (प्रेषितांची कृत्ये ५:३३) पण घटनांनी अनपेक्षित वळण घेतले. कायद्याचा जाणकार असलेल्या गमालिएलाने न्यायसभेत उभे राहून आपल्या साथीदारांना अविचारीपणे कोणतेही पाऊल न उचलण्याची ताकीद दिली. त्याने सूज्ञपणे त्यांना सांगितले: “हा बेत किंवा हे कार्य मनुष्यांचे असल्यास नष्ट होईल; परंतु ते देवाचे असल्यास तुम्हाला ते नष्ट करिता यावयाचे नाही.” गमालिएलने आणखी एक महत्त्वाचे विधान केले: “तुम्ही मात्र देवाचे विरोधी ठराल.”—प्रेषितांची कृत्ये ५:३४, ३८, ३९.
९. प्रेषितांचे कार्य मनुष्यांचे नव्हे तर देवाचे होते हे कशावरून सिद्ध होते?
९ आश्चर्याची गोष्ट म्हणजे, न्यायसभेने गमलिएलचा सल्ला स्वीकारला. न्यायसभेने “प्रेषितांना बोलावून त्यांना मारहाण केली आणि येशूच्या नावाने बोलू नका अशी ताकीद देऊन त्यांना सोडून दिले.” पण यामुळे प्रेषित घाबरले नाहीत किंवा त्यांचा उत्साह मंदावला नाही. देवदूताने दिलेल्या प्रचार करण्याच्या आज्ञेचे पालन करण्याचा त्यांनी दृढनिश्चय केला होता. त्यामुळे सुटका झाल्यानंतर, “दररोज मंदिरात व घरोघर शिकविण्याचे व येशू हाच ख्रिस्त आहे ही सुवार्ता गाजविण्याचे त्यांनी सोडले नाही.” (प्रेषितांची कृत्ये ५:४०, ४२) यहोवाने त्यांच्या प्रयत्नांवर आशीर्वाद दिला. कितपत आशीर्वाद दिला? “देवाच्या वचनाचा प्रसार होत गेला; यरुशलेमेत शिष्यांची संख्या फार वाढत गेली.” इतकेच काय, तर “याजकवर्गातीलहि पुष्कळ लोकांनी ह्या विश्वासाला मान्यता दिली.” (प्रेषितांची कृत्ये ६:७) मुख्य याजकांची किती घोर निराशा झाली असेल! दिवसेंदिवस हेच सिद्ध होत होते, की प्रेषितांचे कार्य खरोखरच, मनुष्यांचे नव्हे तर देवाचे होते!
देवाचे विरोधी यशस्वी होऊच शकत नाहीत
१०. मनुष्याच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास, कैफाला कदाचित आपण अगदी सुरक्षित पदावर आहोत असे वाटले असेल, पण त्याचा हा भरवसा व्यर्थ का ठरला?
१० पहिल्या शतकात, यहुदी प्रमुख याजकांची नेमणूक रोमी अधिकाऱ्यांकडून केली जात असे. योसेफ कैफा या श्रीमंत यहुद्याला वॅलेरियस ग्रेटस याने प्रमुख याजक नेमले होते आणि त्याच्या आधीच्या मुख्य याजकांच्या तुलनेत तो अधिक काळ या पदावर राहिला होता. कैफा या साध्यतेचे श्रेय अर्थातच देवाला नव्हे तर स्वतःच्या राजकीय कौशल्याला आणि पिलाताशी असलेल्या त्याच्या सख्याला देत असावा. पण त्याने मनुष्यावर ठेवलेला हा भरवसा व्यर्थ ठरला. प्रेषितांना न्यायसभेपुढे आणण्यात आले होते त्या घटनेच्या केवळ तीन वर्षांनंतर कैफा रोमी वरिष्ठांच्या मर्जीतून पडला आणि त्याला प्रमुख याजकाच्या पदावरून काढण्यात आले.
११. पंतय पिलात, व यहुदी व्यवस्थेचा कसा अंत झाला व यावरून तुम्ही कोणता निष्कर्ष काढू शकता?
११ कैफाला पदच्युत करण्याचा हुकूम पिलाताच्या वरिष्ठाने अर्थात सिरियाचा सुभेदार ल्युक्युस व्हिटेलियुस याने दिला होता आणि कैफाचा जवळचा मित्र पिलात देखील हा हुकूम रद्द करण्यास असमर्थ ठरला. किंबहुना, कैफाला त्याच्या पदावरून काढल्यावर एका वर्षातच पिलातालाही त्याच्या पदावरून कमी करण्यात आले आणि त्याच्याविरुद्ध करण्यात आलेल्या गंभीर आरोपांचे स्पष्टीकरण देण्याकरता त्याला रोमला बोलावण्यात आले. कैसरावर भिस्त टाकणाऱ्या यहुदी पुढाऱ्यांचे काय झाले? तर रोमनांनी खरोखरच त्यांचे “स्थान व राष्ट्रहि” त्यांच्यापासून हिरावून घेतले. हे सा.यु. ७० साली घडले, जेव्हा रोमी सैन्यांनी जेरूसलेम शहराचा, त्यातील मंदिराचा व न्यायसभा जेथे भरवली जात असे त्या सभागृहाचाही पूर्णपणे नाश केला. स्तोत्रकर्त्याचे शब्द याबाबतीत किती अचूकपणे लागू होतात: “अधिपतींवर भरवसा ठेवू नका; मनुष्यावर भरवसा ठेवू नका; त्याच्याकडून साहाय्य मिळणे शक्य नाही.”—योहान ११:४८; स्तोत्र १४६:३.
१२. येशूच्या उदाहरणावरून कशाप्रकारे हे दिसून येते की देवाचे आज्ञापालन करण्यातच सुज्ञपणा आहे?
१२ याउलट, येशू ख्रिस्ताला मात्र देवाने एका महान आध्यात्मिक मंदिराचा प्रमुख याजक नेमले. त्याची ही नेमणूक कोणीही मनुष्य रद्द करू शकत नाही. “त्याचे याजकपण अढळ आहे.” (इब्री २:९; ७:१७, २४; ९:११) देवाने येशूला जिवंतांचा व मृतांचा न्यायाधीशही नेमले आहे. (१ पेत्र ४:५) त्याअर्थी, योसेफ कैफा व पंतय पिलाताला भविष्यात जीवनाची कोणतीही आशा द्यायची किंवा नाही हे येशू ठरवेल.—मत्तय २३:३३; प्रेषितांची कृत्ये २४:१५.
आधुनिक काळातील निर्भय राज्य प्रचारक
१३. आधुनिक काळात कोणते कार्य मनुष्यांचे व कोणते कार्य देवाचे असल्याचे सिद्ध झाले? तुम्ही असे कशावरून म्हणता?
१३ पहिल्या शतकाप्रमाणे आधुनिक काळातही ‘देवाचा विरोध’ करणाऱ्यांची कमी नाही. (प्रेषितांची कृत्ये ५:३९) उदाहरणार्थ, यहोवाच्या साक्षीदारांनी अडॉल्फ हिटलरला आपला नेता म्हणून सलामी केली नाही तेव्हा हिटलरने त्यांचे नामोनिशाण मिटवण्याचे ठरवले. (मत्तय २३:१०) आणि त्याची घातक संघटना या कार्याकरता अगदी सुसज्ज होती. नात्सींनी हजारो साक्षीदारांना अटक करून त्यांना छळ छावण्यांमध्ये पाठवले. काही साक्षीदारांना तर त्यांनी जिवेही मारले. पण केवळ देवाचीच उपासना करण्याचा त्यांचा संकल्प मात्र ते तोडू शकले नाहीत आणि समूह या नात्याने देवाच्या लोकांचे नामोनिशाण ते मिटवू शकले नाहीत. या ख्रिश्चनांचे कार्य मनुष्यांचे नव्हे तर देवाचे असल्यामुळे त्यांना ते नष्ट करता आले नाही. हिटलरच्या छळ छावण्यांतून जिवंत बचावलेले विश्वासू साक्षीदार आज साठ वर्षांनंतरही “पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जिवाने व पूर्ण मनाने” यहोवाची सेवा करत आहेत. पण आज लोक, हिटलर व त्याच्या नात्सी पार्टीच्या दुष्ट कृत्यांची आठवण करून त्यांची निंदा करतात.—मत्तय २२:३७.
१४. (क) देवाच्या सेवकांचे नाव बदनाम करण्यासाठी विरोध करणाऱ्यांनी कोणते प्रयत्न केले आहेत पण या सर्वाचा काय परिणाम झाला? (ख) अशाप्रकारचे प्रयत्न करणारे, देवाच्या लोकांचे कायमचे नुकसान करू शकतात का? (इब्री लोकांस १३:५, ६)
१४ नात्सींच्या काळानंतर इतरांनीही यहोवाचा व त्याच्या लोकांचा विरोध करण्याचा प्रयत्न केला. अर्थात, ही अशी लढाई आहे की ज्यात त्यांचा कधीही विजय होऊ शकत नाही. युरोपच्या कित्येक देशांत कपटी धार्मिक व राजकीय घटकांनी यहोवाच्या साक्षीदारांवर एक ‘धोकेदायक पंथ’ असल्याचा शिक्का मारण्याचा प्रयत्न केला. पहिल्या शतकातील ख्रिश्चनांवरही हाच आरोप करण्यात आला होता. (प्रेषितांची कृत्ये २८:२२) पण वस्तुस्थिती पाहिल्यास, मानवी हक्कांच्या युरोपियन न्यायालयाने यहोवाच्या साक्षीदारांना एक पंथ म्हणून नव्हे तर एक धर्म म्हणून मान्यता दिली आहे. साहजिकच विरोध करणाऱ्यांना हे माहीत आहे. तरीसुद्धा ते साक्षीदारांवर खोटे आरोप लावण्याचे थांबत नाहीत. या खोट्या माहितीप्रसारामुळे काही साक्षीदारांना नोकरीवरून कमी करण्यात आले. साक्षीदार मुलांची शाळांमध्ये छळवणूक करण्यात आली. साक्षीदार ज्या इमारतींमध्ये कित्येक वर्षांपासून आपल्या सभा भरवत होते, अशा काही इमारतींच्या मालकांनी घाबरून त्यांच्यासोबतचे काँट्रॅक्ट रद्द केले. काही ठिकाणी तर, काही व्यक्तींना केवळ ते यहोवाचे साक्षीदार असल्यामुळे सरकारी संस्थांनी नागरिकत्त्व देण्याचे नाकारले! हे सर्व असूनही साक्षीदारांचे धैर्य खचलेले नाही.
१५, १६. फ्रांसमध्ये यहोवाच्या साक्षीदारांनी त्यांच्या ख्रिस्ती कार्याला करण्यात आलेल्या विरोधाला कसा प्रतिसाद दिला आहे आणि ते प्रचार करण्याचे का थांबवत नाहीत?
१५ उदाहरणार्थ, फ्रांसमध्ये लोक सहसा विचारशील व न्यायप्रिय आहेत. पण काही विरोधकांनी मिळून राज्याच्या कार्यात खंड आणण्याच्या दृष्टीने विशिष्ट कायदे तयार केले आहेत. अशा भागांत राहणाऱ्या यहोवाच्या साक्षीदारांनी याला कशाप्रकारे प्रतिसाद दिला आहे? त्यांनी कधी नव्हे इतक्या आवेशाने प्रचार कार्यात आपला सहभाग वाढवला आहे आणि याचे अतिशय रोमांचकारी परिणाम त्यांना पाहायला मिळाले आहेत. (याकोब ४:७) केवळ सहा महिन्यांच्या काळात या देशात बायबल अभ्यासांच्या संख्येत ३३ टक्के वाढ झालेली दिसून आली! फ्रांसमधील प्रामाणिक हृदयाच्या लोकांना सुवार्तेला असा प्रतिसाद देताना पाहून दियाबल नक्कीच अत्यंत क्रोधाविष्ट होत असेल. (प्रकटीकरण १२:१७) फ्रांसमधील आपल्या सहविश्वासू बांधवांना खात्री आहे की संदेष्टा यशयाचे हे शब्द त्यांच्या बाबतीत खरे ठरतील: “तुझ्यावर चालविण्याकरिता घडिलेले कोणतेहि हत्यार तुजवर चालणार नाही; तुजवर आरोप ठेवणाऱ्या सर्व जिव्हांना तू दोषी ठरविशील.”—यशया ५४:१७.
१६ यहोवाच्या साक्षीदारांना छळ सहन करताना आनंद वाटत नाही. पण ते देवाने सर्व ख्रिश्चनांना दिलेल्या आज्ञेचे पालन करतात आणि त्यामुळे ज्या गोष्टी त्यांनी ऐकल्या आहेत त्यांच्याविषयी इतरांना सांगण्याचे ते थांबवू शकत नाहीत व थांबवणारही नाहीत. ते चांगल्या नागरिकाच्या सर्व जबाबदाऱ्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. पण जेथे देवाच्या व मनुष्याच्या नियमांत तफावत होते तेथे ते देवाचे आज्ञापालन करतात.
त्यांना भिऊ नका
१७. (क) आपला विरोध करणाऱ्यांना आपण का भिऊ नये? (ख) आपला छळ करणाऱ्यांप्रती आपली कशी वृत्ती असावी?
१७ आपला विरोध करणारे अतिशय धोकेदायक स्थितीत आहेत. ते देवाविरुद्ध लढत आहेत. त्यामुळे, येशूने आपल्याला दिलेल्या आज्ञेनुसार आपण आपला छळ करणाऱ्यांना भिण्याऐवजी त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. (मत्तय ५:४४) आपली अशी प्रार्थना आहे की जर कोणी, तार्सकर शौलाप्रमाणे अज्ञानामुळे देवाचा विरोध करत असेल तर यहोवाने दयाळूपणे त्यांचे डोळे उघडावेत जेणेकरून त्यांना सत्याचा प्रकाश दिसू शकेल. (२ करिंथकर ४:४) शौल नंतर ख्रिस्ती प्रेषित पौल बनला व त्याला त्याच्या काळातल्या अधिकाऱ्यांकडून बराच छळ सहन करावा लागला. तरीपण, त्याने सह विश्वासू बांधवांना अशी आठवण करून दिली की “सत्ताधीश व अधिकारी ह्यांच्या अधीन राहावे. त्यांच्या आज्ञा पाळाव्या, प्रत्येक चांगल्या कामाला सिद्ध असावे; कोणाची [होय, आपला अतिशय क्रूरपणे छळ करणाऱ्यांचीही] निंदा करू नये, भांडखोरपणा न करता सौम्य, व सर्व माणसांबरोबर सर्व प्रकारे नम्रतेने वागणारे असावे.” (तीत ३:१, २) फ्रांसमधील व इतर ठिकाणी असलेले यहोवाचे साक्षीदारही या सल्ल्याचे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
१८. (क) यहोवा कोणकोणत्या मार्गांनी आपल्या लोकांचा बचाव करू शकतो? (ख) अंतिम परिणाम काय असेल?
१८ देवाने संदेष्टा यिर्मया यास सांगितले: “तुझा बचाव करण्यास मी तुझ्याबरोबर आहे.” (यिर्मया १:८) आज आपला छळ केला जातो तेव्हा यहोवा कशाप्रकारे आपला बचाव करतो? कदाचित तो गमालिएलासारखा एखादा अपक्षपाती न्यायाधीश उभा करेल. किंवा अनपेक्षितपणे एखादा भ्रष्ट किंवा विरोध करणारा अधिकारी जाऊन त्याच्या जागी एखादा अधिक समजूतदार अधिकारी नेमला जातो, असे तो घडवून आणू शकतो. पण कधीकधी यहोवा हस्तक्षेप करत नाही, तर तो आपल्या लोकांचा छळ होऊ देतो. (२ तीमथ्य ३:१२) देवाने आपला छळ होऊ दिला तर तो आपल्याला आवश्यक सामर्थ्य व सहनशक्ती दिल्याशिवाय राहणार नाही. (१ करिंथकर १०:१३) आणि देवाने कोणत्याही परिस्थितीला अनुमती दिली तरीसुद्धा अंतिम परिणाम काय असेल याविषयी आपल्याला कोणतीही शंका नाही: जे देवाच्या लोकांविरुद्ध लढत आहेत ते प्रत्यक्ष देवाविरुद्ध लढत आहेत आणि साहजिकच देवाविरुद्ध लढणारे कधीही सफल होणार नाहीत.
१९. येत्या २००६ सालाकरता आपले वार्षिक वचन कोणते असेल व ते उचित का आहे?
१९ येशूने आपल्या शिष्यांना छळाची अपेक्षा करण्यास सांगितले. (योहान १६:३३) हे लक्षात घेता, प्रेषितांची कृत्ये ५:२९ यातील शब्द कधी नव्हे इतके आज समर्पक आहेत: “आम्ही मनुष्यांपेक्षा देवाची आज्ञा मानली पाहिजे.” म्हणूनच हे रोमांचक शब्द २००६ सालाकरता यहोवाच्या साक्षीदारांचे वार्षिक वचन म्हणून निवडण्यात आले आहेत. येत्या वर्षभर आणि सर्वकाळ, कोणत्याही परिस्थितीत केवळ देवाचीच आज्ञा मानण्याचा आपण संकल्प करू या! (w०५ १२/१५)
[तळटीप]
^ परि. 7 त्या प्रसंगी मुख्य याजकांनी ज्या “कैसराला” जाहीरपणे समर्थन दिले तो तिरस्कृत रोमी सम्राट टायबेरियस हा होता. ढोंगी व खूनी असणारा टायबेरियस त्याच्या घृणास्पद लैंगिक वर्तनाकरताही कुविख्यात होता.—दानीएल ११:१५, २१.
तुम्ही उत्तर देऊ शकता का?
• प्रेषितांनी ज्याप्रकारे विरोधाला तोंड दिले त्यावरून आपल्याला कोणते प्रोत्साहन मिळते?
• आपण नेहमी मनुष्यांपेक्षा देवाचीच आज्ञा का मानली पाहिजे?
• आपला विरोध करणारे मुळात कोणाशी लढत आहेत?
• ज्यांना छळाला तोंड द्यावे लागते त्यांच्या बाबतीत कोणत्या अंतिम परिणामाची आपण अपेक्षा करू शकतो?
[अभ्यासाचे प्रश्न]
[१५ पानांवरील संक्षिप्त आशय]
२००६ सालाचे वार्षिक वचन: “आम्ही मनुष्यांपेक्षा देवाची आज्ञा मानली पाहिजे.” —प्रेषितांची कृत्ये ५:२९
[१३ पानांवरील चित्र]
कैफाने देवाऐवजी मनुष्यांवर भरवसा ठेवला