व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

निर्णायक कृती करण्याची हीच वेळ आहे

निर्णायक कृती करण्याची हीच वेळ आहे

निर्णायक कृती करण्याची हीच वेळ आहे

“तुम्ही दोहो मतांमध्ये कोठवर लटपटाल?”—१ राजे १८:२१.

१. आपला काळ गतकाळापेक्षा इतका वेगळा का आहे?

 यहोवा हा एकच खरा देव आहे हे तुम्ही मानता का? शिवाय, बायबलमधील भविष्यवाण्यांनुसार आज आपण सैतानाच्या दुष्ट व्यवस्थेच्या ‘शेवटल्या काळात’ जगत आहोत हेही तुम्ही मानता का? (२ तीमथ्य ३:१) तर मग, तुम्ही नक्कीच हे मान्य कराल की कधी नव्हे इतकी आज, निर्णायक कृती करण्याची गरज आहे. मानव इतिहासात पूर्वी कधीही इतक्या लोकांचे जीव धोक्यात नव्हते.

२. दहा गोत्रांच्या इस्राएल राष्ट्रात राजा अहाब याच्या कारकीर्दीदरम्यान काय घडले?

सा.यु.पू. दहाव्या शतकात इस्राएल राष्ट्राला एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्याची गरज होती. ते कोणाची सेवा करतील यासंबंधी हा निर्णय होता. आपली पत्नी ईजबेल हिच्या प्रभावामुळे राजा अहाब याने दहा गोत्रांच्या इस्राएल राज्यात बआल देवतेच्या उपासनेला बढावा दिला. बआलला सुपीकतेचे दैवत मानले जायचे जे पाऊस पाडायचे व चांगले पीक द्यायचे. बआल उपासक आपल्या दैवताच्या मूर्तीला हाताने चुंबन देऊन किंवा मूर्तीसमोर नमन करून त्याची उपासना करत असत. बआल दैवताने आपल्या शेतांतील पीकांवर व आपल्या गुराढोरांवर आशीर्वाद द्यावा म्हणून त्याचे उपासक मंदिरातील वेश्‍यांसोबत लैंगिक सोहळ्यांमध्ये भाग घेत. तसेच आपल्या शरीरावर घाव करून रक्‍त वाहण्याचाही त्यांच्यात एक रिवाज होता.—१ राजे १८:२८.

३. बआल उपासनेचा देवाच्या लोकांवर कसा परिणाम झाला?

इस्राएल राष्ट्रात जवळजवळ ७,००० शेषजन या मूर्तिपूजक, अनैतिक व हिंसक उपासनेत सहभागी झाले नाहीत. (१ राजे १९:१८) यहोवा देवासोबत केलेल्या करारामुळे आपले त्याच्यासोबत एक खास नाते आहे हे आठवणीत ठेवून ते त्याला एकनिष्ठ राहिले आणि याकरता त्यांचा छळ करण्यात आला. उदाहरणार्थ, ईजबेल राणीने यहोवाच्या कित्येक संदेष्ट्यांचा वध केला. (१ राजे १८:४, १३) या कठीण परिस्थितीमुळे बहुतेक इस्राएलांनी मिश्र उपासना सुरू केली. यहोवा व बआल या दोघांचेही मन राखण्याचा ते प्रयत्न करू लागले. पण यहोवाकडे पाठ फिरवून खोट्या दैवताची उपासना करणे हे इस्राएली व्यक्‍तीने धर्मत्याग करण्यासारखे होते. यहोवाने इस्राएलांना सांगितले होते की जर त्यांनी त्याच्यावर प्रेम केले आणि त्याच्या आज्ञा पाळल्या तरच त्यांना त्याचा आशीर्वाद मिळेल. पण त्यांनी त्याच्याखेरीज वेगळ्या देवाची उपासना केली तर त्यांचा नाश केला जाईल, अशी ताकीद त्याने त्यांना दिली.—अनुवाद ५:६-१०; २८:१५, ६३.

४. येशूने व त्याच्या प्रेषितांनी ख्रिस्ती लोकांमध्ये काय घडण्याविषयी भाकीत केले होते आणि हे कशाप्रकारे पूर्ण झाले आहे?

अशाचप्रकारची परिस्थिती आज ख्रिस्ती धर्मजगतात पाहायला मिळते. चर्चचे सदस्य स्वतःला ख्रिस्ती म्हणवतात खरे, पण त्यांचे सणवार, त्यांचे वर्तन व विश्‍वास हे बायबलच्या शिकवणुकींच्या विरोधात आहेत. ईजबेलप्रमाणे ख्रिस्ती धर्मजगताचा पाद्रीवर्ग यहोवाच्या साक्षीदारांचा छळ करण्यात पुढाकार घेतो. तसेच त्यांनी इतिहासात अनेक युद्धांना पाठिंबा दिला आहे आणि अशारितीने चर्चच्या कोट्यवधी सदस्यांच्या मृत्यूला देखील ते जबाबदार आहेत. धर्मपुढाऱ्‍यांनी जगिक सरकारांना अशाप्रकारे पाठबळ देणे हे आध्यात्मिक अर्थाने जारकर्म करण्यासारखे आहे असे बायबलमध्ये सांगितले आहे. (प्रकटीकरण १८:२, ३) शिवाय, ख्रिस्ती धर्मजगत, शाब्दिक अर्थाचा जारकर्मही खपवून घेत आहे, विशेष म्हणजे यात पाद्रीही सामील आहेत. येशू ख्रिस्ताने व त्याच्या प्रेषितांनी देखील या मोठ्या प्रमाणातील धर्मत्यागाविषयी भाकीत केले होते. (मत्तय १३:३६-४३; प्रेषितांची कृत्ये २०:२९, ३०; २ पेत्र २:१, २) ख्रिस्ती धर्मजगताच्या १०० कोटी पेक्षा जास्त अनुयायांचे भविष्य काय असेल? आणि या लोकांप्रती व खोट्या धर्मामुळे पथभ्रष्ट झालेल्या इतर लोकांप्रती यहोवाच्या खऱ्‍या उपासकांची कोणती जबाबदारी आहे? या प्रश्‍नांच्या उत्तरांकरता आता आपण, ज्यांच्यामुळे “इस्राएल लोकांतून बआलमूर्ति काढून [टाकण्यात आली]” त्या नाट्यमय घटनांचे परीक्षण करू या.—२ राजे १०:२८.

आपल्या स्वच्छंदी लोकांवर देवाचे प्रेम

५. यहोवाने आपल्या स्वच्छंदी लोकांबद्दल प्रेमळ काळजी कशाप्रकारे व्यक्‍त केली?

यहोवा देवाशी अविश्‍वासूपणे वागणाऱ्‍यांना शिक्षा देण्यात त्याला आनंद वाटत नाही. एक प्रेमळ पिता या नात्याने त्याची अशी इच्छा आहे की दुष्टांनीही पश्‍चात्ताप करून त्याच्याकडे परत यावे. (यहेज्केल १८:३२; २ पेत्र ३:९) म्हणूनच, अहाब व ईजबेलच्या काळात यहोवाने अनेक संदेष्ट्यांना पाठवून आपल्या लोकांना बआल उपासनेच्या दुष्परिणामांविषयी ताकीद दिली. यांपैकी एक संदेष्टा एलीया होता. आधीच भाकीत करण्यात आलेल्या एका भयानक दुष्काळानंतर एलीयाने राजा अहाबला सर्व इस्राएल लोकांना व बआलाच्या संदेष्ट्यांना कर्मेल पर्वतावर एकत्र करण्यास सांगितले.—१ राजे १८:१, १९.

६, ७. (क) इस्राएलच्या धर्मत्यागाचे मूळ कारण एलीयाने कशाप्रकारे उघड केले? (ख) बआल संदेष्ट्यांनी काय केले? (ग) एलीयाने काय केले?

ही सभा अशा एका ठिकाणी भरवण्यात आली, जेथे पूर्वी यहोवाची एक वेदी होती परंतु कदाचित ईजबेलला खूश करण्यासाठी ती “पाडून टाकिली होती.” (१ राजे १८:३०) दुःखाची गोष्ट म्हणजे येथे एकत्र झालेल्या इस्राएलांना, याबद्दल खात्री नव्हती की त्यांच्यावर आलेला दुष्काळ संपवून पाऊस पाडण्यास कोण खरोखर समर्थ होता, यहोवा की बआल? बआलच्या वतीने ४५० संदेष्टे आले होते, तर यहोवाचे प्रतिनिधीत्व करणारा एकटा एलीया हा होता. एलीयाने सरळ लोकांच्या मूळ समस्येकडे लक्ष वेधले व त्यांना विचारले: “तुम्ही दोहो मतांमध्ये कोठवर लटपटाल?” मग आणखीनच स्पष्ट शब्दांत त्याने त्यांच्यासमोर खरा मुद्दा मांडला: “परमेश्‍वर [“यहोवा,” पं.र.भा.] हा देव असला तर त्याच्या भजनी लागा; बआल हा देव असला तर त्याच्या भजनी लागा.” या अस्थिर मनाच्या इस्राएल लोकांनी यहोवाची अनन्य उपासना करण्यास प्रवृत्त व्हावे म्हणून एलीयाने एक अशी परीक्षा घेण्याचे सुचवले ज्यावरून कोण खरा देव आहे हे सिद्ध होईल. एक यहोवाकरता व एक बआलाकरता असे दोन गोऱ्‍हे यज्ञ म्हणून कापण्यात आले. जो खरा देव असेल त्याने वेदीवरून अग्नीने अर्पण ग्रहण करावे असे ठरले. बआलाच्या संदेष्ट्यांनी त्यांचा यज्ञ तयार केला व कित्येक तास ते “हे बआला, आमचे ऐक” असे म्हणून हाका मारत राहिले. एलीयाने त्यांची थट्टा करण्यास सुरुवात केली तेव्हा ते स्वतःच्या शरीरावर घाव करून रक्‍तबंबाळ झाले व मोठमोठ्याने ओरडत राहिले. पण त्यांना कोणतेही उत्तर मिळाले नाही.—१ राजे १८:२१, २६-२९.

आता एलीयाची पाळी होती. सर्वप्रथम त्याने यहोवाची वेदी दुरुस्त केली आणि मग त्याने त्यावर गोऱ्ह्याचे तुकडे रचून ठेवले. मग त्याने चार घागरी पाणी वेदीवर ओतण्यास सांगितले. हे तीन वेळा करण्यात आले. वेदीच्या भोवती असलेली खळगी पाण्याने भरली. मग एलीयाने प्रार्थना केली: “हे परमेश्‍वरा, अब्राहाम, इसहाक व इस्राएल यांच्या देवा, इस्राएलांमध्ये तूच देव आहेस, मी तुझा सेवक आहे, आणि मी ह्‍या सर्व गोष्टी तुझ्याच आज्ञेने केल्या आहेत हे सर्वास विदित कर. हे परमेश्‍वरा, ऐक, माझी विनंती ऐक; हे परमेश्‍वरा, तूच देव आहेस आणि तूच यांची हृदये पराङमुख केली आहेस, याची या लोकांस जाणीव होऊ दे.”—१ राजे १८:३०-३७.

८. देवाने एलीयाच्या प्रार्थनेला कशाप्रकारे उत्तर दिले आणि एलीयाने कशाप्रकारे निर्णायक कृती केली?

खऱ्‍या देवाने एलीयाच्या प्रार्थनेचे उत्तर दिले. त्याने स्वर्गातून अग्नी पाठवून अर्पण व वेदीही भस्म करून टाकली. इतकेच काय, तर वेदीभोवती असलेल्या खळगीतील पाणी देखील अग्नीने चाटून घेतले! हे पाहून, इस्राएल लोकांवर काय परिणाम झाला असेल याची कल्पना करा. “हे पाहताच सर्व लोक उपडे पडले, आणि ते बोलले, यहोवा हाच देव आहे, यहोवा हाच देव आहे.” (पं.र.भा.) आता एलीयाने पुढचे निर्णायक पाऊल उचलले. त्याने इस्राएलांना हुकूम दिला: “बआलाच्या संदेष्ट्यांस पकडा; त्यातल्या एकासहि निसटून जाऊ देऊ नका!” तेव्हा बअलाच्या सर्व ४५० संदेष्ट्यांना कर्मेल पर्वताच्या पायथ्याशी नेऊन वधण्यात आले.—१ राजे १८:३८-४०.

९. खऱ्‍या उपासकांची पुढेही कशाप्रकारे परीक्षा घेण्यात आली?

त्याच संस्मरणीय दिवशी यहोवाने साडेतीन वर्षांत पहिल्यांदा भूमीवर पाऊस पाडला! (याकोब ५:१७, १८) घरी परतणारे इस्राएली आपसात काय बोलत असतील याची तुम्ही कल्पना करू शकता; यहोवाने आपले देवपण सिद्ध केले होते. पण बआल उपासकांनी तरीसुद्धा हार मानली नाही. ईजबेलने यहोवाच्या सेवकांचा छळ करण्याचे चालूच ठेवले. (१ राजे १९:१, २; २१:११-१६) त्यामुळे देवाच्या लोकांच्या एकनिष्ठेची पुन्हा परीक्षा घेण्यात आली. बआल उपासकांविरुद्ध यहोवाच्या न्यायदंडाचा दिवस येईल तेव्हा ते केवळ यहोवाचीच उपासना करत असलेले त्याला आढळतील का?

आताच निर्णायक पाऊल उचला

१०. (क) आधुनिक काळात अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांनी काय केले आहे? (ख) प्रकटीकरण १८:४ यातील आज्ञेचे पालन करण्याचा काय अर्थ होतो?

१० आधुनिक काळात अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांनी एलीयासारखे कार्य केले आहे. त्यांनी प्रत्यक्ष व छापील साहित्याद्वारे, ख्रिस्ती धर्मजगताच्या आत व बाहेर असलेल्या सर्व राष्ट्रांतील लोकांना खोट्या धर्माविषयी इशारा दिला आहे. परिणामस्वरूप, लाखो लोकांनी खोट्या धर्मातून आपले सदस्यत्व काढून घेण्याचे निर्णायक पाऊल उचलले आहे. आपले जीवन यहोवाला समर्पित करून व बाप्तिस्मा घेऊन ते येशू ख्रिस्ताचे शिष्य बनले आहेत. होय, खोट्या धर्मासंबंधी देवाच्या निकडीच्या आवाहनाकडे त्यांनी लक्ष दिले आहे: “माझ्या लोकांनो, तुम्ही तिच्या पापांचे वाटेकरी होऊ नये आणि तुम्हाला तिच्या पीडांतील कोणतीहि पीडा होऊ नये म्हणून तिच्यामधून निघा.”—प्रकटीकरण १८:४.

११. यहोवाची संमती मिळवण्याकरता काय करण्याची गरज आहे?

११ आणखी लाखो लोक असेही आहेत की ज्यांना, यहोवाचे साक्षीदार जो संदेश घोषित करत आहेत, तो पटतो, पण काय करावे याचा ते अद्यापही निर्णय घेऊ शकलेले नाहीत. यांपैकी काहीजण अधूनमधून ख्रिस्ती सभांना येतात, उदाहरणार्थ प्रभूच्या सांज भोजनाच्या विधीला किंवा प्रांतीय अधिवेशनाच्या काही भाषणांना ते हजर राहतात. अशा सर्व व्यक्‍तींना आम्ही एलीयाच्या शब्दांकडे लक्ष देण्याची विनंती करतो: “तुम्ही द्विधा मनःस्थितीत कोठवर राहणार? (१ राजे १८:२१, सुबोध भाषांतर) उशीर करण्याऐवजी या व्यक्‍तींनी आताच निर्णायक पाऊल उचलले पाहिजे. त्यांनी यहोवाचे समर्पित व बाप्तिस्मा घेतलेले सेवक बनण्याच्या ध्येयाकडे आवेशाने वाटचाल केली पाहिजे. यावरच त्यांची सार्वकालिक जीवनाची आशा अवलंबून आहे!—२ थेस्सलनीकाकर १:६-९.

१२. बाप्तिस्मा घेतलेले काही ख्रिस्ती कोणत्या धोकेदायक स्थितीत आले आहेत आणि त्यांनी काय केले पाहिजे?

१२ दुःखाची गोष्ट म्हणजे, बाप्तिस्मा घेतलेले काहीजण आपल्या उपासनेत अनियमित अथवा अक्रियाशील झाले आहेत. (इब्री लोकांस १०:२३-२५; १३:१५, १६) काहीजण छळ होण्याच्या भीतीने, किंवा उदरनिर्वाहाच्या चिंतांमुळे, श्रीमंत होण्याच्या इच्छेमुळे अथवा इतर स्वार्थ साधण्याच्या प्रयत्नात आपला आवेश गमावून बसले आहेत. येशूने ताकीद दिली होती की याच गोष्टी त्याच्या काही अनुयायांना अडखळायला लावतील, त्यांची प्रगती खुंटवतील व त्यांना पाशात अडकवतील. (मत्तय १०:२८-३३; १३:२०-२२; लूक १२:२२-३१; २१:३४-३६) ‘दोहो मतांत लटपटण्याऐवजी’ अशा व्यक्‍तींनी देवाला केलेले समर्पण पूर्ण करण्याकरता निर्णायक कृती करून ‘आस्था बाळगावी व पश्‍चात्ताप करावा.’—प्रकटीकरण ३:१५-१९.

खोट्या धर्माचा आकस्मिक अंत

१३. येहूला राजा म्हणून अभिषिक्‍त करण्यात आले त्यावेळी इस्राएलात असलेल्या परिस्थितीचे वर्णन करा.

१३ आज सर्व लोकांनी निर्णायक कृती करणे का अगत्याचे आहे हे समजून घेण्याकरता, कर्मेल पर्वतावर यहोवाने आपणच खरा देव असल्याचे सिद्ध केल्यानंतर, सुमारे १८ वर्षांनंतर इस्राएलात काय घडले हे पाहू या. बआल उपासनेविरुद्ध यहोवाचा न्यायदंडाचा दिवस, एलीयाचा उत्तराधिकारी अलीशा याच्या सेवेच्या काळादरम्यान अगदी अचानक व अनपेक्षितपणे आला. राजा अहाबचा पुत्र यहोराम इस्राएलवर राज्य करत होता आणि राजमाता ईजबेल अजूनही जिवंत होती. अलीशाने अगदी गुप्तपणे आपल्या सेवकाला पाठवून इस्राएलचा सेनाधिपती येहू याला नवा राजा म्हणून अभिषिक्‍त करण्यास पाठवले. त्यावेळी येहू यार्देन नदीच्या पूर्वेकडे रामोथ-गिलाद येथे होता व इस्राएलाच्या शत्रूंविरुद्ध एका युद्धाचे नेतृत्त्व करत होता. राजा यहोराम हा लढाईत जखमी झाल्यामुळे इज्रेल येथे, मगिद्दोजवळच्या एका खोऱ्‍यात विश्रांती घेत होता.—२ राजे ८:२९-९:४.

१४, १५. येहूवर कोणती कामगिरी सोपवण्यात आली आणि त्याने काय केले?

१४ यहोवाने येहूला अशी आज्ञा दिली: “ईजबेलीच्या हातून माझे सेवक जे संदेष्टे आणि दुसरे सर्व सेवक यांचा रक्‍तपात झाला आहे त्याचा मला सूड घेणे आहे, म्हणून आपला धनी अहाब याच्या घराण्याचा तू संहार कर. अहाबाच्या सर्व घराण्याचा समूळ नाश होईल; . . . इज्रेलाच्या भूमीवर ईजबेलीस कुत्री खातील; तिला पुरावयास कोणी असणार नाही.”—२ राजे ९:७-१०.

१५ येहू हा निग्रही मनाचा होता. जराही विलंब न लावता तो आपल्या रथावर चढला आणि वेगाने इज्रेलाकडे निघाला. इज्रेलातील एका पहारेकऱ्‍याने वेगाने रथ चालवणाऱ्‍या येहूला ओळखले आणि त्याने राजा यहोरामला येऊन सांगितले. तेव्हा यहोरामही रथातून आपल्या सेनाधिपतीला भेटायला निघाला. त्यांची गाठ पडली तेव्हा यहोरामने विचारले: “येहू, सर्व काही ठीक आहे ना?” येहूने उत्तर दिले: “तुझी आई ईजबेल हिचे व्यभिचार व गारुडे यांचा सपाटा जोपर्यंत चालला आहे तोपर्यंत ठीक कसे असणार?” मग राजा यहोराम तेथून निसटून पळ काढण्याच्या बेतात असताना येहूने आपला धनुष्य काढला व असा बाण मारला की तो यहोरामचे ऊर फोडून गेला व तो मेला.—२ राजे ९:२०-२४.

१६. (क) ईजबेलच्या खोज्यांसमोर अचानक कोणती परिस्थिती आली? (ख) यहोवाने ईजबेलविषयी जे भाकीत केले होते ते कशाप्रकारे खरे ठरले?

१६ विलंब न लावता येहू आपल्या रथातून नगराकडे निघाला. तेव्हा ईजबेल बराच शृंगार करून खिडकीजवळ बसली होती; तिने खाली येहूला पाहून त्याची चौकशी करण्याचे सोंग करून प्रत्यक्षात त्याला धमकी दिली. तिच्याकडे दुर्लक्ष करून येहूने आपल्या बाजूने कोण आहे असे विचारले: “माझ्या पक्षाचा कोणी आहे काय?” आता ईजबेलच्या सेवकांना निर्णायक कृती करण्याची वेळ आली होती. तेव्हा दोनतीन खोज्यांनी खिडकीतून खाली पाहिले. लगेच त्यांच्या एकनिष्ठेची परीक्षा झाली. येहूने हुकूम केला: “तिला खाली टाका.” खोज्यांनी ईजबेलला खाली रस्त्यावर टाकले व येहूच्या घोड्यांच्या पायांखाली व रथाखाली ती तुडवली गेली. अशारितीने बआल उपासनेला बढावा देणाऱ्‍या ईजबेलला योग्य न्यायदंड मिळाला. तिला पुरण्याआधीच, भाकीत करण्यात आल्याप्रमाणे कुत्र्यांनी तिचे मांस खाऊन टाकले होते.—२ राजे ९:३०-३७.

१७. देवाने ईजबेलचा ज्याप्रकारे न्याय केला त्यावरून भविष्यातील कोणत्या घटनेविषयी आपला विश्‍वास बळावतो?

१७ अशाचप्रकारे, “मोठी बाबेल” असे नाव असलेल्या लाक्षणिक कलावंतिणीचा आकस्मिक नाश होईल. ही कलावंतीण सैतानाच्या जगातील खोट्या धर्मांचे प्रतीक आहे. या खोट्या धर्मांची सुरुवात प्राचीन बाबेल शहरापासून झाली. खोट्या धर्माचा अंत झाल्यानंतर यहोवा देव, सैतानाच्या जगाच्या इतर घटकांत सामील असलेल्या सर्व माणसांकडे आपले लक्ष वळवेल. यांचाही नाश होईल आणि अशारितीने एका धार्मिक नव्या जगाच्या स्थापनेचा मार्ग मोकळा होईल.—प्रकटीकरण १७:३-६; १९:१९-२१; २१:१-४.

१८. ईजबेलच्या मृत्यूनंतर इस्राएलातील बआल उपासकांचे काय झाले?

१८ ईजबेलच्या मृत्यूनंतर राजा येहूने जराही विलंब न लावता अहाबच्या सर्व वंशजांचा आणि मुख्य समर्थकांचा वध केला. (२ राजे १०:११) पण अजूनही बआलाची उपासना करणारे इस्राएल लोक देशात होते. यांच्या बाबतीतही येहूने ‘परमेश्‍वराप्रीत्यर्थ उत्कट आस्था’ दाखवण्याकरता, निर्णायक पाऊल उचलले. (२ राजे १०:१६) आपण स्वतः बआल उपासक असल्याचे ढोंग करून येहूने, शोमरोनात अहाबने बआलाचे जे देऊळ बांधले होते, तेथे बआलाप्रीत्यर्थ एक महासभा भरवली. इस्राएलातील सर्व बआल उपासक या महासभेला आले. सर्वांना मंदिरात घेतल्यावर येहूच्या माणसांनी त्यांचा संहार केला. या घटनेच्या अहवालाच्या शेवटी बायबलमध्ये असे सांगितले आहे: “या प्रकारे येहूने इस्राएल लोकांतून बआलमूर्ति काढून टाकिली.”—२ राजे १०:१८-२८.

१९. यहोवाच्या एकनिष्ठ उपासकांच्या ‘मोठ्या लोकसमुदायाला’ कोणती अद्‌भुत आशा आहे?

१९ इस्राएलातून बआल उपासनेचे समूळ उच्चाटन करण्यात आले. अगदी तितक्याच निश्‍चितपणे जगाच्या खोट्या धर्मांचा आकस्मिक, आश्‍चर्यकारक रितीने अंत होणार आहे. न्यायनिवाड्याच्या त्या महान दिवसादरम्यान तुम्ही कोणाच्या पक्षात उभे असाल? आताच निर्णायक पाऊल उचला, म्हणजे त्या “मोठ्या संकटातून” बचावणाऱ्‍या ‘मोठ्या लोकसमुदायात’ असण्याचा बहुमान तुम्हालाही प्राप्त होईल. मग मागे वळून पाहताना तुम्ही आनंदाने देवाची स्तुती कराल कारण ‘ज्या मोठ्या कलावंतिणीने आपल्या जारकर्माने पृथ्वी भ्रष्ट केली तिचा न्यायनिवाडा त्याने केलेला असेल.’ इतर खऱ्‍या उपासकांसोबत मिळून तुम्ही हे रोमांचक गीत गाणाऱ्‍या स्वर्गीय गायकांच्या सुरात सूर मिळवू शकाल: “हालेलूया; कारण सर्वसमर्थ आमचा प्रभु देव ह्‍याने राज्य हाती घेतले आहे.”—प्रकटीकरण ७:९, १०, १४; १९:१, २,. (w०५ १२/१५)

मनन करण्याकरता प्रश्‍न

• प्राचीन इस्राएल कशाप्रकारे बआल उपासना करण्याबद्दल दोषी ठरले?

• बायबलमध्ये कोणत्या मोठ्या धर्मत्यागाबद्दल भाकीत करण्यात आले होते आणि हे कशाप्रकारे पूर्ण झाले आहे?

• येहूने बआल उपासनेचा कशाप्रकारे समूळ नाश केला?

• देवाच्या न्यायनिवाड्याच्या दिवशी बचावण्याकरता आपण काय केले पाहिजे?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१७ पानांवरील नकाशा]

(पूर्ण फॉर्मेटेड टेक्स्ट पाहायचे असेल तर प्रकाशन पाहा)

सोखो

अफेक

हेलकथ

यकनाम

मगिद्दो

तानख

दोथान

शोमरोन

एन-दोर

शूनेम

अफ्रा

इज्रेल

इब्लाम (गथ-रिम्मोन)

तिरसा

बेथ-शेमेश

बेथ-शान

याबेश-गिलाद?

आबेल-महोला

बेथआर्बेल

रामोथ-गिलाद

पर्वत

कर्मेल पर्वत

ताबोर पर्वत

मोरे

गिलबोवा डोंगर

[समुद्र]

भूमध्य समुद्र

गालील समुद्र

[नदी]

यार्देन नदी

[झरा आणि विहीर]

हारोदची विहीर

[चित्राचे श्रेय]

Based on maps copyrighted by Pictorial Archive (Near Eastern History) Est. and Survey of Israel

[१८ पानांवरील चित्रे]

राज्य प्रचाराच्या कार्यात व ख्रिस्ती सभांमध्ये नियमितरित्या सहभागी होणे खऱ्‍या उपासनेचे महत्त्वाचे पैलू आहेत

[२० पानांवरील चित्र]

यहोवाच्या दिवसातून बचावू इच्छिणाऱ्‍या सर्वांनी येहूप्रमाणेच निर्णायक पाऊल उचलले पाहिजे