नीतिमत्त्व मिळवण्यास झटणे आपल्याकरता संरक्षण
नीतिमत्त्व मिळवण्यास झटणे आपल्याकरता संरक्षण
“तुम्ही पहिल्याने . . . [देवाचे] नीतिमत्त्व मिळविण्यास झटा.”—मत्तय ६:३३.
१, २. एका ख्रिस्ती तरुणीने कोणता निर्णय घेतला आणि तिने हा निर्णय का घेतला?
आशियात एक तरुण ख्रिस्ती स्त्री एका सरकारी कार्यालयात सेक्रेटरीचे काम करत होती. ती आपले काम प्रामाणिकपणे करत असे, वेळेआधीच कामाला हजर होत असे आणि कधीही कामचुकारपणा करत नसे. पण तिची नोकरी कायमची नसल्यामुळे काही काळानंतर तिच्या कामाविषयी पुनर्विचार करण्यात आला. तिच्या विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने तिला सांगितले की तिची नोकरी कायमची केली जाईल आणि तिला प्रमोशनही मिळेल, पण त्याकरता तिला त्याच्यासोबत अनैतिक संबंध ठेवावे लागतील. तिने याला साफ नकार दिला. आपली नोकरी जाण्याची भीती असतानाही तिने तो अनैतिक प्रस्ताव मान्य केला नाही.
२ ही तरुण ख्रिस्ती स्त्री अवाजवीपणे वागली का? नाही. ती येशूच्या या शब्दांचे काळजीपूर्वक पालन करत होती: “तुम्ही पहिल्याने . . . [देवाचे] नीतिमत्त्व मिळविण्यास झटा.” (मत्तय ६:३३) अनैतिक संबंधांकरवी स्वतःचा फायदा करून घेण्यापेक्षा नीतिमान तत्त्वांनुसार जगणे तिच्याकरता जास्त महत्त्वाचे होते.—१ करिंथकर ६:१८.
नीतिमत्त्वाचे महत्त्व
३. नीतिमत्त्व म्हणजे काय?
३ “नीतिमत्त्व” हे नैतिक पूर्णता व प्रामाणिकपणा यास सूचित करते. बायबलमध्ये नीतिमत्त्व असा अनुवाद केलेल्या ग्रीक व इब्री शब्दांत “नेकी” किंवा “सरळपणा” या कल्पना गोवलेल्या आहेत. याचा अर्थ स्वतःच्या नजरेत नीतिमान असणे किंवा स्वतःच्या दर्जांनुसार स्वतःचा न्याय करणे असा होत नाही. (लूक १६:१५) तर यहोवाच्या दर्जांनुसार सरळ असणे असा याचा अर्थ होतो. हे देवाचे नीतिमत्त्व आहे.—रोमकर १:१७; ३:२१.
४. ख्रिश्चनांकरता नीतिमत्त्व महत्त्वाचे का आहे?
४ नीतिमत्त्व महत्त्वाचे का आहे? कारण यहोवा स्वतः ‘न्यायदाता’ किंवा नीतिमान देव आहे, व त्याचे लोक नीतिमत्त्वाने चालतात तेव्हा तो त्यांच्यावर कृपा करतो. (स्तोत्र ४:१; नीतिसूत्रे २:२०-२२; हबक्कूक १:१३) जो कोणी अनीतिमानपणे वागतो त्याचा देवासोबत जवळचा नातेसंबंध असू शकत नाही. (नीतिसूत्रे १५:८) म्हणूनच प्रेषित पौलाने तीमथ्याला आग्रहपूर्वक सांगितले: “तरुणपणाच्या वासनांपासून दूर पळ आणि शुद्ध मनाने प्रभूचा धावा करणाऱ्यांबरोबर नीतिमत्व” व इतर महत्त्वपूर्ण गुणांच्या “पाठीस लाग.” (२ तीमथ्य २:२२) आणि याच कारणामुळे पौलाने आपल्या आध्यात्मिक शस्त्रसामुग्रीच्या विविध भागांचे वर्णन केले तेव्हा त्याने ‘नीतिमत्वाच्या उरस्त्राणाचेही’ वर्णन केले.—इफिसकर ६:१४.
५. अपरिपूर्ण मानव नीतिमत्त्व मिळवण्यास कसे झटू शकतात?
५ अर्थात कोणीही मनुष्य परिपूर्णरित्या नीतिमान असू शकत नाही. सर्वांना वारशाने आदामाकडून अपरिपूर्णता मिळाली आहे आणि त्याअर्थी सर्वच जन्मापासून पापी किंवा अनीतिमान आहेत. तरीपण येशूने म्हटले की आपण नीतिमत्त्व मिळवण्यास झटावे. हे कसे शक्य आहे? हे शक्य आहे कारण येशूने आपले परिपूर्ण जीवन आपल्याकरता खंडणी म्हणून अर्पण केले आणि जर आपण त्या अर्पणावर विश्वास ठेवला तर यहोवा आपल्या पापांची क्षमा करण्यास तयार आहे. (मत्तय २०:२८; योहान ३:१६; रोमकर ५:८, ९, १२, १८) या बलिदानाच्या आधारावर, जेव्हा आपण यहोवाच्या नीतिमान दर्जांविषयी शिकतो आणि त्यांचे पालन करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतो, तसेच आपल्या दुर्बलतेवर मात करण्याकरता साहाय्य मिळावे म्हणून प्रार्थना करतो तेव्हा यहोवा आपली उपासना स्वीकारतो. (स्तोत्र १:६; रोमकर ७:१९-२५; प्रकटीकरण ७:९, १४) हे खरोखर किती सांत्वनदायक आहे!
अनीतिमान जगात नीतिमत्त्व जोपासणे
६. सुरुवातीच्या ख्रिश्चनांकरता हे जग एक धोकेदायक ठिकाण का होते?
६ येशूच्या शिष्यांवर जेव्हा “पृथ्वीच्या शेवटापर्यंत” त्याचे साक्षी होण्याची जबाबदारी सोपवण्यात आली तेव्हा त्यांच्यासमोर एक कठीण आव्हान उभे ठाकले. (प्रेषितांची कृत्ये १:८) त्यांना नेमण्यात आलेले सबंध क्षेत्र “त्या दुष्टाला वश” झालेले म्हणजे सैतानाला वश झालेले होते. (१ योहान ५:१९) सबंध जगात सैतानाने चेतवलेला दुष्टाईचा आत्मा पसरलेला होता आणि ख्रिस्ती शिष्यांनाही या आत्म्याच्या दुष्प्रभावाला तोंड द्यावे लागणार होते. (इफिसकर २:२) त्यांच्याकरता हे जग एक धोक्याचे ठिकाण होते. आणि अशा या जगात विश्वासात टिकून राहण्याकरता, पहिल्याने देवाचे नीतिमत्त्व मिळवण्यास झटणे हा एकच मार्ग होता. बहुतेक ख्रिस्ती टिकून राहिले, पण काहीजण मात्र ‘न्याय्यत्वाच्या मार्गापासून’ बहकले.—नीतिसूत्रे १२:२८; २ तीमथ्य ४:१०.
७. कोणत्या जबाबदाऱ्यांमुळे ख्रिश्चनांना या जगाच्या भ्रष्ट प्रभावांचा प्रतिकार करणे भाग आहे?
७ आज हे जग ख्रिश्चनांकरता सुरक्षित ठिकाण आहे का? मुळीच नाही! आज तर ते पहिल्या शतकात होते त्यापेक्षा कितीतरी पटीने भ्रष्ट झाले आहे. शिवाय, सैतानाला या पृथ्वीवर टाकण्यात आले आहे आणि येथे तो अभिषिक्त ख्रिश्चनांविरुद्ध, म्हणजेच “देवाच्या आज्ञा पाळणारे व येशूविषयी साक्ष देणारे तिच्या [स्त्रीच्या] संतानापैकी बाकीचे जे लोक” आहेत त्यांच्याविरुद्ध आपल्या पूर्ण शक्तीनिशी लढत आहे. (प्रकटीकरण १२:१२, १७) तसेच या ‘संतानाला’ जे कोणी पाठिंबा देतात त्यांच्यावरही सैतान हल्ला करतो. आणि हे सर्व असूनही ख्रिस्ती या जगापासून लपून राहू शकत नाहीत. ते जगाचे भाग नसले तरी, त्यांना या जगातच राहावे लागते. (योहान १७:१५, १६) आणि ज्या लोकांची योग्य मनोवृत्ती आहे त्यांना शोधून ख्रिस्ताचे शिष्य होण्यास मदत करण्याकरता त्यांना या जगात प्रचारही करावा लागतो. (मत्तय २४:१४; २८:१९, २०) तेव्हा, ज्याअर्थी ख्रिस्ती या जगाच्या भ्रष्ट प्रभावांना पूर्णपणे टाळू शकत नाहीत, त्याअर्थी त्यांना त्यांचा प्रतिकार करणे भाग आहे. अशा चार कुप्रभावांचे आता परीक्षण करूया.
अनैतिकतेचा पाश
८. इस्राएल लोक मवाबी देवतांची उपासना का करू लागले?
८ अरण्यातील ४० वर्षांच्या भटकंतीचा अंत होत आला तेव्हा अनेक इस्राएली लोक नीतिमत्त्वाच्या मार्गापासून बहकले. त्यांनी यहोवाची अनेक तारणकृत्ये पाहिली होती आणि लवकरच ते प्रतिज्ञात देशात प्रवेश करणार होते. पण या महत्त्वाच्या टप्प्यावर आले असताना, ते मवाबी देवतांची उपासना करू लागले. का? कारण ते ‘देहाच्या वासनेला’ बळी पडले. (१ योहान २:१६) अहवाल सांगतो: “[इस्राएल लोक] मवाबी कन्यांशी व्यभिचार करू लागले.”—गणना २५:१.
९, १०. आज कोणती परिस्थिती अस्तित्वात असल्यामुळे अयोग्य दैहिक वासनांचा कुप्रभाव नेहमी आठवणीत ठेवणे महत्त्वाचे आहे?
९ अयोग्य शारीरिक वासना कशाप्रकारे बेसावध व्यक्तींना वाईट मार्गाला लावू शकतात हे या घटनेवरून दिसून येते. यावरून आपण धडा घेतला पाहिजे. कारण खासकरून आजच्या काळात, जगाच्या अनेक भागांत अनैतिक वर्तनाला समाजात मान्यता मिळाली आहे. (१ करिंथकर १०:६, ८) संयुक्त संस्थानाच्या एका वृत्तात असे म्हटले आहे: “१९७० च्या आधी स्त्री व पुरुषाने लग्नाशिवाय एकत्र राहण्याची प्रथा अमेरिकेतील जवळजवळ सगळ्याच राज्यात बेकायदेशीर होती. आज मात्र ती सर्वसामान्य झाली आहे. प्रथम विवाहांच्या एकूण संख्येपैकी जवळजवळ निम्म्या विवाहांत, जोडपी लग्नाआधीच एकत्र राहात असतात.” अशाप्रकारच्या अनैतिक प्रथा केवळ एकाच देशापुरत्या मर्यादित नाहीत. तर त्या सबंध जगात पाहायला मिळतात. आणि दुःखाची गोष्ट म्हणजे काही ख्रिस्ती व्यक्तींनीही या प्रथेचे अनुकरण केले आहे व परिणामस्वरूप ख्रिस्ती मंडळीतले आपले स्थानही गमावले आहे.—१ करिंथकर ५:११.
१० शिवाय, प्रसार माध्यमांतून अनैतिकतेला सर्रास बढावा दिला जातो. चित्रपट व टीव्ही कार्यक्रमांतून, लग्नाआधी लैंगिक संबंध असण्यात काहीही गैर नाही असे सुचवले जाते. समलिंगी संबंध नैसर्गिक आहेत असे दाखवले जाते. आणि अनेक कार्यक्रमांत लैंगिक दृश्ये अगदी उघडपणे दाखवली जाऊ लागली आहेत. इंटरनेटवरही उघडपणे चित्रित केलेली लैंगिक दृश्ये अगदी सहजपणे उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ, एका वृत्तपत्रातील सदर लेखकाने आपल्यासोबत घडलेली एक घटना सांगितली. एके दिवशी त्याचा सात वर्षांचा मुलगा शाळेतून घरी आला व अतिशय उत्साहीपणे त्याला सांगू लागला की त्याच्या शाळेतील एका मित्राला इंटरनेटवर एक साईट सापडली ज्यात नग्न स्त्रिया लैंगिक चाळे करताना दाखवलेल्या आहेत. हे ऐकून त्याला धक्का बसला. पण कोण जाणे किती मुलांना अशा साईट्स सापडल्या असतील आणि ते आईवडिलांना न सांगता त्या पाहातही असतील? शिवाय, मुलांच्या व्हिडिओ गेम्समध्ये मुळात काय असते हे किती आईवडिलांना माहीत आहे? मुलांमध्ये अतिशय लोकप्रिय असलेल्या कित्येक गेम्समध्ये किळसवाणे अनैतिक प्रकार, तसेच भूतविद्या आणि हिंसाचार दाखवला जातो.
११. जगिक अनैतिकतेपासून एक कुटुंब स्वतःला कशाप्रकारे सुरक्षित ठेवू शकते?
११ एखादे कुटुंब अशा निकृष्ट दर्जाचे “मनोरंजन” कसे टाळू शकते? पहिल्याने देवाचे नीतिमत्त्व मिळवण्यास झटण्याद्वारे अर्थात कोणत्याही प्रकारच्या अनैतिक गोष्टींत गुंतण्यास साफ नकार देण्याद्वारे. (२ करिंथकर ६:१४; इफिसकर ५:३) जे आईवडील आपली मुले काय करतात याकडे योग्य लक्ष देतात आणि आपल्या मुलांच्या मनात यहोवा व त्याच्या नीतिमान नियमांविषयीचे प्रेम उत्पन्न करतात ते त्यांना अश्लील साहित्य, व्हिडिओ गेम्स, अनैतिक चित्रपट आणि इतर अनीतिमान मोहांचा प्रतिकार करण्यास शिकवतात.—अनुवाद ६:४-९. *
सामाजिक दबावाचा धोका
१२. पहिल्या शतकात कोणती समस्या उद्भवली?
१२ पौल आशिया मायनरमधील लुस्रा येथे होता तेव्हा त्याने चमत्कार करून एका मनुष्याला बरे केले. अहवालात असे सांगितले आहे: “पौलाने जे केले ते पाहून लोकसमुदाय लुकवनी भाषेत मोठ्याने ओरडून बोलले, देव माणसांच्या रूपाने आमच्यांत उतरले आहेत. त्यांनी बर्णबाला ज्यूपितर म्हटले व पौल मुख्य वक्ता होता म्हणून त्याला मर्क्युरी म्हटले.” (प्रेषितांची कृत्ये १४:११, १२) नंतर मात्र हाच जमाव पौल व बर्णबा यांच्या जिवावर उठला. (प्रेषितांची कृत्ये १४:१९) स्पष्टपणे हे लोक समाजाच्या दबावापुढे सहज झुकणाऱ्यांपैकी होते. त्या प्रदेशातील काही लोक ख्रिस्ती बनले तेव्हा त्यांची ही अंधविश्वासी प्रवृत्ती सहजासहजी नाहीशी झाली नाही. कलस्सै मंडळीला लिहिलेल्या पत्रात पौलाने “देवदूतांची उपासना” करण्याविरुद्ध बजावले होते.—कलस्सैकर २:१८.
१३. ख्रिस्ती व्यक्तीने कोणत्या काही प्रथा टाळल्या पाहिजेत आणि असे करण्याचे धैर्य तिला कोठून मिळेल?
१३ आज खऱ्या ख्रिश्चनांनी खोट्या धार्मिक कल्पनांवर आधारित असलेल्या सर्वसामान्य प्रथा टाळणे महत्त्वाचे आहे ज्या ख्रिस्ती तत्त्वांचे उल्लंघन करतात. उदाहरणार्थ, काही देशांत, मृत्यूनंतर आत्मा जिवंत राहतो या खोट्या कल्पनेवर आधारित जन्म व मृत्यूशी संबंधित प्रथा व विधी पाळले जातात. (उपदेशक ९:५, १०) काही देशांत, लहान मुलींच्या जननेंद्रियांची काटछाट करण्याची प्रथा आहे. * ही एक अतिशय क्रूर, निरर्थक प्रथा आहे. आणि ख्रिस्ती पालकांना आपल्या मुलांची प्रेमळपणे काळजी घेण्याची जी आज्ञा देण्यात आली आहे त्याच्या अगदी विरोधात आहे. (अनुवाद ६:६, ७; इफिसकर ६:४) सामाजिक दबावाचा प्रतिकार करून ख्रिस्ती अशा प्रकारच्या प्रथांचा धिक्कार कसा करू शकतात? यहोवावर संपूर्ण भरवसा ठेवून. (स्तोत्र ३१:६) “परमेश्वराला मी माझा आश्रय, माझा दुर्ग असे म्हणतो; तोच माझा देव, त्याच्यावर मी भाव ठेवितो,” असे जे मनापासून म्हणतात त्यांना नीतिमान देव यहोवा अवश्य साहाय्य करेल व सांभाळेल.—स्तोत्र ९१:२; नीतिसूत्रे २९:२५.
यहोवाला विसरू नका
१४. इस्राएल लोक प्रतिज्ञात देशात प्रवेश करण्याच्या बेतात होते तेव्हा यहोवाने त्यांना कोणती ताकीद दिली?
१४ इस्राएल लोक प्रतिज्ञात देशात प्रवेश करण्याच्या बेतात असताना यहोवाने त्यांना निक्षून सांगितले की त्यांनी कधीही त्याला विसरू नये. तो त्यांना म्हणाला: “सावध ऐस, नाहीतर ज्या आज्ञा, नियम व विधि मी आज तुला सांगत आहे ते पाळावयाचे सोडून तू आपला देव परमेश्वर ह्याला विसरशील. तू खाऊनपिऊन तृप्त होशील आणि चांगली घरे बांधून त्यात राहशील, तुझी गुरेढोरे व शेरडेमेंढरे ह्यांची वृद्धि होईल, तुझे सोनेरुपे व तुझी सर्व मालमत्ता वाढेल, तेव्हा तुझे मन उन्मत्त होऊ नये आणि तुझा देव परमेश्वर . . . त्याला तू विसरू नये म्हणून संभाळ.”—अनुवाद ८:११-१४.
१५. आपण यहोवाला विसरलेलो नाही याची खात्री कशी करू शकतो?
१५ आजही असेच घडू शकते का? होय, जर आपण जीवनात अयोग्य गोष्टींना प्राधान्य देऊ लागलो तर असे घडू शकते. पण, जर आपण पहिल्याने देवाचे नीतिमत्त्व मिळवण्यास झटत असू तर साहजिकच शुद्ध उपासना ही आपल्या जीवनातली सर्वात महत्त्वाची गोष्ट असेल. पौलाने प्रोत्साहन दिल्याप्रमाणे, आपण ‘संधी साधून घेऊ’ व निकडीच्या जाणीवेने सेवाकार्य करू. (कलस्सैकर ४:५; २ तीमथ्य ४:२) पण सभांना उपस्थित राहणे व क्षेत्र सेवा यांपेक्षा करमणूक किंवा मौजमजा करणे आपल्याला जास्त महत्त्वाचे वाटत असेल तर मग आपण यहोवाला आपल्या जीवनात दुय्यम स्थान देण्याद्वारे त्याला विसरू शकतो. पौलाने सांगितले की शेवटल्या दिवसांत लोक “देवावर प्रेम करण्याऐवजी सुखविलासाची आवड धरणारी” होतील. (२ तीमथ्य ३:४) अशाच प्रकारच्या विचारसरणीचा आपल्यावरही परिणाम झालेला नाही याची खात्री करण्याकरता प्रांजळ ख्रिस्ती वेळोवेळी स्वतःचे परीक्षण करतात.—२ करिंथकर १३:५.
स्वैराचारी वृत्तीपासून सांभाळून राहा
१६. हव्वेने व पौलाच्या काळातील काहींनी कोणती अयोग्य प्रवृत्ती असल्याचे दाखवले?
१६ एदेन बागेत सैतानाने, हव्वेच्या स्वार्थी स्वैराचारी वृत्तीचा फायदा घेऊन तिला फसवले. योग्य व अयोग्य यासंबंधी हव्वेला स्वतःहून निर्णय घेण्याची इच्छा होती. (उत्पत्ति ३:१-६) पहिल्या शतकात, करिंथ मंडळीतल्या काहीजणांची अशीच स्वैराचारी वृत्ती होती. त्यांना असे वाटत होते की आपल्याला पौलापेक्षा जास्त ज्ञान आहे आणि म्हणून त्याने त्यांना उपरोधाने ‘अतिश्रेष्ठ प्रेषित’ म्हटले.—२ करिंथकर ११:३-५; १ तीमथ्य ६:३-५.
१७. आपल्या मनात स्वैराचारी वृत्ती उत्पन्न होऊ नये म्हणून आपण काय केले पाहिजे?
१७ आज जगात अनेकजण ‘हूड, गर्वाने फुगलेले,’ आहेत आणि काही ख्रिश्चनांवरही अशा वृत्तीचा प्रभाव पडला आहे. काहीजण तर सत्याचा विरोध करू लागले आहेत. (२ तीमथ्य ३:४; फिलिप्पैकर ३:१८) शुद्ध उपासनेच्या बाबतीत, आपण नेहमी यहोवा देवाचे मार्गदर्शन मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि ‘विश्वासू व बुद्धिमान दास’ व मंडळीतले वडील यांना सहकार्य दिले पाहिजे. हा नीतिमत्त्व मिळवण्याचा एक मार्ग आहे आणि असे केल्यामुळे आपण स्वैराचारी वृत्ती उत्पन्न करण्याचे टाळतो. (मत्तय २४:४५-४७; स्तोत्र २५:९, १०; यशया ३०:२१) अभिषिक्तांची मंडळी “सत्याचा स्तंभ व पाया” आहे. आपले संरक्षण व मार्गदर्शन करण्याकरता यहोवानेच तिची स्थापना केली आहे. (१ तीमथ्य ३:१५) या मंडळीची महत्त्वाची भूमिका लक्षात घेतल्यामुळे आपल्याला “पोकळ डौल मिरविण्याच्या बुद्धीने काहीहि करू नका,” या सल्ल्याचे पालन करण्यास व यहोवाच्या नीतिमान इच्छेच्या नम्रपणे अधीन होण्यास साहाय्य मिळेल.—फिलिप्पैकर २:२-४; नीतिसूत्रे ३:४-६.
येशूचे अनुकरण करा
१८. येशूचे कोणत्या मार्गांनी अनुकरण करण्याचे आपल्याला प्रोत्साहन देण्यात आले आहे?
१८ येशूच्या संदर्भात बायबलमध्ये असे भाकीत केले होते: “तुला नीतिमत्वाची आवड व दुष्टाईचा वीट आहे.” (स्तोत्र ४५:७; इब्री लोकांस १:९) ही किती उत्तम व अनुकरणीय वृत्ती आहे! (१ करिंथकर ११:१) येशूला यहोवाचे नीतिमान दर्जे केवळ माहीतच नव्हते तर ते त्याला प्रिय होते. म्हणूनच, सैतानाने त्याला अरण्यात असताना मोहात पाडण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने जराही न कचरता व अगदी दृढपणे, ‘नीतिमार्गातून’ पथभ्रष्ट होण्यास नकार दिला.—नीतिसूत्रे ८:२०; मत्तय ४:३-११.
१९, २०. नीतिमत्त्व मिळवण्यास झटल्यामुळे कोणते चांगले परिणाम घडून येतात?
१९ देहाच्या अनीतिमान वासना अतिशय प्रबळ असू शकतात हे खरे आहे. (रोमकर ७:१९, २०) तरीपण, जर आपल्याला नीतिमत्त्व मोलाचे वाटत असेल तर ते आपोआपच आपल्याला दुष्टाईचा प्रतिकार करण्यास बळकट बनवेल. (स्तोत्र ११९:१६५) नीतिमत्त्व आपल्याला मनापासून प्रिय वाटल्यास, अयोग्य गोष्टी आपल्या समोर येतात तेव्हा आपले संरक्षण होईल. (नीतिसूत्रे ४:४-६) जेव्हा जेव्हा आपण एखाद्या मोहाला बळी पडतो तेव्हा तेव्हा आपण सैतानाला एक विजय मिळवून देत असतो हे नेहमी आठवणीत असू द्या. त्याऐवजी त्याचा प्रतिकार करून यहोवाला विजय मिळवून देणे किती उत्तम ठरेल!—नीतिसूत्रे २७:११; याकोब ४:७, ८.
२० खरे ख्रिस्ती नीतिमत्त्व मिळवण्यास झटतात, त्यामुळे ते ‘देवाचे गौरव व स्तुति व्हावी म्हणून येशू ख्रिस्ताच्या द्वारे जे नीतिमत्त्वाचे फळ त्याने भरून गेले आहेत’ असे त्यांच्याबाबतीत म्हणता येते. (फिलिप्पैकर १:१०, ११) ते “सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्व व पवित्रता ह्यांनी युक्त असा देवसदृश निर्माण केलेला नवा मनुष्य धारण” करतात. (इफिसकर ४:२४) त्यांच्यावर यहोवाची मालकी आहे आणि त्याअर्थी ते स्वतःची नव्हे तर त्याची इच्छा पूर्ण करण्याकरता जगतात. (रोमकर १४:८; १ पेत्र ४:२) त्यांच्या सर्व विचारांना व कृतींना ते याच आधारावर आकार देतात. त्यांच्या स्वर्गीय पित्याला त्यांच्याविषयी किती मनापासून संतोष वाटतो!—नीतिसूत्रे २३:२४. (w०६ १/१)
[तळटीपा]
^ परि. 11 आईवडील आपल्या कुटुंबाला अनैतिक कुप्रभावांपासून कसे सुरक्षित ठेवू शकतात यासंबंधी अतिशय उपयुक्त सूचना कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य या यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकात दिल्या आहेत.
^ परि. 13 स्त्रियांच्या जननेंद्रियांची काटछाट याला पूर्वी स्त्रियांची सुंता म्हटले जात असे.
तुम्ही स्पष्ट करू शकता का?
• नीतिमत्त्व मिळवण्यास झटणे इतके महत्त्वाचे का आहे?
• अपरिपूर्ण ख्रिस्ती नीतिमत्त्व कसे मिळवू शकतात?
• जगातल्या कोणत्या गोष्टी ख्रिश्चनांनी टाळल्या पाहिजेत?
• नीतिमत्त्व मिळवण्यास झटल्यामुळे आपले संरक्षण कशाप्रकारे होते?
[अभ्यासाचे प्रश्न]
[२८ पानांवरील चित्र]
येशूच्या अनुयायांकरता हे जग एक धोक्याचे ठिकाण होते
[२९ पानांवरील चित्र]
यहोवावर प्रेम करण्यास शिकवण्यात आलेली मुले अनैतिकतेचा प्रतिकार करू शकतील
[३० पानांवरील चित्र]
प्रतिज्ञात देशात समृद्धी मिळवल्यावर काही इस्राएल लोक यहोवाला विसरले
[३१ पानांवरील चित्र]
येशूप्रमाणेच ख्रिस्ती नीतिमत्त्वाचा द्वेष करतात