यहोवावर तुम्हाला कितपत भरवसा आहे?
यहोवावर तुम्हाला कितपत भरवसा आहे?
“तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य . . . मिळविण्यास झटा.”—मत्तय ६:३३.
१, २. एका तरुणाने आपल्या नोकरीसंबंधी कोणता निर्णय घेतला आणि का?
एका तरुणाला आपल्या मंडळीच्या कारभारांत आणखी हातभार लावावा असे मनापासून वाटत होते. पण समस्या अशी होती की त्याच्या नोकरीमुळे त्याला नियमित सभांना उपस्थित राहता येत नव्हते. मग त्याने ही परिस्थिती कशाप्रकारे हाताळली? त्याने आपल्या जीवनात काही तडजोडी केल्या आणि नोकरीला राजीनामा दिला. काही काळाने त्याला अशी नोकरी मिळाली की जिच्यामुळे ख्रिस्ती कार्यांत अडथळा येणार नाही. आज त्याला पूर्वीपेक्षा बराच कमी पगार मिळतो, पण त्या पैशात तो आपल्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करू शकतो आणि मंडळीच्या कार्याला अधिक चांगल्याप्रकारे हातभार लावणे आता त्याला शक्य झाले आहे.
२ या तरुणाने असा निर्णय का घेतला हे तुम्ही समजू शकता का? तुम्ही त्याच्या परिस्थितीत असता तर तुम्हीही असाच निर्णय घेतला असता असे तुम्हाला वाटते का? ही एक प्रशंसास्पद गोष्ट आहे, की बऱ्याच ख्रिस्ती बांधवांनी असा निर्णय घेतला आहे आणि त्यांच्या या निर्णयावरून हेच स्पष्ट होते की त्यांना येशूच्या या आश्वासनावर पूर्ण भरवसा आहे: “तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्त्व मिळविण्यास झटा म्हणजे त्यांच्याबरोबर ह्याहि सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील.” (मत्तय ६:३३) सुरक्षिततेकरता ते या जगावर भरवसा ठेवण्याऐवजी यहोवावर भिस्त टाकतात.—नीतिसूत्रे ३:२३, २६.
३. आजच्या काळात देवाच्या राज्याला प्राधान्य देणे खरोखर व्यवहार्य आहे का असा काहीजण का विचार करतील?
३ आपण ज्या कठीण काळात राहात आहोत त्याकडे पाहून काहीजणांना कदाचित वाटेल की त्या तरुणाने घेतलेला निर्णय योग्य होता का? आजच्या समाजात काही लोक अगदी दारिद्र्यात दिवस काढत आहेत तर काहीजण अभूतपूर्व समृद्धी अनुभवत आहेत. गरीब देशांत, आपले राहणीमान थोडेफार का होईना, सुधारण्याची संधी मिळाली तर बहुतेकजण अशी संधी हातची जाऊ देणार नाहीत. दुसरीकडे पाहता, श्रीमंत देशांतील बऱ्याच जणांना अस्थिर आर्थिक व्यवस्था, रोजगार संधींची बदलणारी उपलब्धता आणि मालकांच्या वाढलेल्या अपेक्षा यांसारख्या समस्यांना तोंड देताना आपले उच्च राहणीमान कायम ठेवणे तितके सोपे जात नाही. उदरनिर्वाह चालवणे आज सर्वांनाच किती कठीण झाले आहे हे पाहता, काहीजण असा विचार करतील की, ‘पहिल्याने राज्य मिळवण्यास झटणे आज खरच व्यवहार्य आहे का?’ या प्रश्नाचे उत्तर देण्याकरता येशू कोणाला उद्देशून हे शब्द बोलला याचा आपण विचार करूया.
“चिंता करीत बसू नका”
४, ५. देवाच्या लोकांनी दररोजच्या जीवनाच्या गरजांविषयी अनावश्यक चिंता करत न बसणे उचित का आहे हे येशूने कशाप्रकारे स्पष्ट केले?
४ येशू गालीलात होता व अनेक ठिकाणांहून आलेल्या लोकांच्या एका मोठ्या लोकसमुदायाला उद्देशून बोलत होता. (मत्तय ४:२५) यांपैकी फार कमी लोक श्रीमंत होते. बहुतेकजण गरीबच होते. तरीपण येशूने त्यांना सांगितले की त्यांनी भौतिक संपत्ती मिळवण्यास नव्हे तर त्याहीपेक्षा मोलवान असे आध्यात्मिक धन गोळा करण्यास जास्त महत्त्व द्यावे. (मत्तय ६:१९-२१, २४) त्याने म्हटले: “आपल्या जीवाविषयी, म्हणजे आपण काय खावे व काय प्यावे; आणि आपल्या शरीराविषयी, म्हणजे आपण काय पांघरावे, ह्याची चिंता करीत बसू नका. अन्नापेक्षा जीव आणि वस्त्रापेक्षा शरीर अधिक आहे की नाही?”—मत्तय ६:२५.
५ येशूच्या त्या श्रोत्यांपैकीही बऱ्याच जणांना त्याचे शब्द व्यवहार्य नाहीत असे वाटले असावे. त्यांना माहीत होते की जर त्यांनी कष्ट केले नाहीत तर त्यांच्या कुटुंबांची आबाळ होईल. पण येशूने त्यांना पक्ष्यांची आठवण करून दिली. पक्ष्यांना दररोज दाणा-पाणी शोधावे लागते पण यहोवा त्यांची काळजी घेतो. तसेच जंगलातील फुलांची यहोवा कशी काळजी घेतो याकडेही येशूने त्यांचे लक्ष वेधले. या फुलांचे सौंदर्य राजा शलमोनाच्या वैभवापेक्षा सरस आहे. जर यहोवा पक्षांची व फुलांची काळजी घेतो तर मग आपली तो आणखी किती पटीने जास्त काळजी घेईल? (मत्तय ६:२६-३०) येशूने म्हटल्याप्रमाणे, जीवाच्या (जीवनाच्या) पोषणाकरता आपण जे अन्न विकत घेतो आणि आपले शरीर झाकण्याकरता जे वस्त्र विकत घेतो त्यापेक्षा आपले जीवन व शरीर अधिक महत्त्वाचे आहे. जर आपला सगळा खटाटोप फक्त अन्न आणि वस्त्र मिळवण्याकरता असेल आणि यहोवाची सेवा करण्याकरता आपल्याजवळ फारसे काही उरत नसेल तर मग आपल्याला जीवनाचा उद्देशच समजलेला नाही.—उपदेशक १२:१३.
समतोल दृष्टिकोन
६. (क) ख्रिश्चनांवर कोणती जबाबदारी आहे? (ख) ख्रिस्ती कोणावर संपूर्ण भरवसा टाकतात?
६ अर्थात तुम्ही काहीही काम करू नका, देव या नाही तर त्या मार्गाने तुमच्या कुटुंबाच्या गरजा भागवेल असे येशू आपल्या श्रोत्यांना सुचवत नव्हता. पक्षांनाही स्वतःचे व आपल्या पिल्लांचे पोट भरण्याकरता अन्न शोधावे लागते. तेव्हा, येशूच्या त्या काळातील अनुयायांनाही पोट भरायचे असेल तर काम करणे भाग होते. आपापल्या कुटुंबांची जबाबदारी पेलणे त्यांना भाग होते. ख्रिस्ती सेवकांना व दासांना आपल्या मालकांच्या अधीन राहून परिश्रम करावेच लागत होते. (२ थेस्सलनीकाकर ३:१०-१२; १ तीमथ्य ५:८; १ पेत्र २:१८) प्रेषित पौल देखील आपला उदरनिर्वाह चालवण्याकरता तंबू शिवण्याचे काम करत असे. (प्रेषितांची कृत्ये १८:१-४; १ थेस्सलनीकाकर २:९) तरीपण या ख्रिश्चनांनी सुरक्षिततेकरता प्रापंचिक नोकरीवर भिस्त टाकली नाही. त्यांनी यहोवावर भरवसा ठेवला. परिणामस्वरूप, त्यांना इतरांजवळ नव्हती अशी एक आंतरिक शांती अनुभवायला मिळाली. स्तोत्रकर्त्याने म्हटल्याप्रमाणे: “ज्यांचा भाव परमेश्वरावर आहे ते निश्चल व सर्वकाळ टिकणाऱ्या सीयोन डोंगरासारखे आहेत.”—स्तोत्र १२५:१.
७. ज्याचा यहोवावर पूर्ण भरवसा नाही तो कदाचित कशाप्रकारे विचार करेल?
७ ज्याचा यहोवावर पूर्ण भरवसा नाही तो अशाप्रकारे विचार करणार नाही. आज जगात बहुतेक लोक भौतिक संपत्तीच सुरक्षितता देऊ शकते असे मानतात. म्हणूनच आईवडील आपल्या मुलांना त्यांच्या तारुण्याचा बराच काळ उच्च शिक्षण घेण्याकरता खर्च करण्याचे प्रोत्साहन देतात; असे केल्यामुळे पुढे चालून त्यांना चांगल्या पगाराची नोकरी मिळेल अशी त्यांची आशा असते. दुःखाची गोष्ट म्हणजे, काही ख्रिस्ती कुटुंबांना अशाचप्रकारे विचार केल्यामुळे मोठी किंमत मोजावी लागली कारण त्यांची मुले आध्यात्मिक गोष्टींत मागे पडली आणि भौतिक ध्येयांचा पाठलाग करू लागली आहेत.
८. ख्रिस्ती कशाप्रकारे समतोल दृष्टिकोन राखतात?
८ म्हणूनच, सूज्ञ ख्रिस्ती हे ओळखतात की येशूचा सल्ला जितका पहिल्या शतकात उपयुक्त होता तितकाच तो आजही समर्पक आहे. याकरताच ते समतोल दृष्टिकोनाने विचार करण्याचा प्रयत्न करतात. आपल्या शास्त्रवचनीय जबाबदाऱ्या पूर्ण करण्याकरता त्यांना नोकरीवर बरेच तास खर्च करावे लागले तरीसुद्धा ते पैसे कमवण्यातच पूर्णपणे गढून जाऊन अधिक महत्त्वाच्या आध्यात्मिक गोष्टींकडे दुर्लक्ष करत नाहीत.—उपदेशक ७:१२.
“चिंता करीत बसू नका”
९. जे यहोवावर पूर्ण भरवसा ठेवतात त्यांना येशू कोणते आश्वासन देतो?
९ डोंगरावर दिलेल्या प्रवचनात येशूने आपल्या श्रोत्यांना आग्रहपूर्वक सांगितले: “काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे, असे म्हणत चिंता करीत बसू नका. कारण ही सर्व मिळविण्याची धडपड परराष्ट्रीय लोक करीत असतात. तुम्हाला ह्या सर्वांची गरज आहे हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे.” (मत्तय ६:३१, ३२) हे खरोखर किती प्रोत्साहनदायक शब्द आहेत! जर आपण यहोवावर पूर्ण भरवसा ठेवला तर तो नेहमी आपल्या पाठीशी राहील. पण येशूचे शब्द आपल्याला गांभीर्याने विचार करण्यासही प्रवृत्त करतात. ते आपल्याला आठवण करून देतात की जर आपण भौतिक वस्तू मिळवण्यासाठी “धडपड” करत असू तर मग आपली विचारसरणी ‘परराष्ट्रीय लोकांसारखी’ अर्थात जे खरे ख्रिस्ती नाहीत अशा लोकांसारखी आहे.
१०. एका तरुणाने येशूजवळ येऊन सल्ला मागितला, तेव्हा त्या तरुणाला सर्वात प्रिय काय आहे हे येशूने कशाप्रकारे उघड केले?
१० एकदा एक अतिशय श्रीमंत तरुण येशूजवळ आला व सार्वकालिक जीवन मिळवण्याकरता मी काय करावे असे त्याने येशूला विचारले. येशूने त्याला नियमशास्त्रातील आज्ञा पाळण्यविषयी आठवण करून दिली कारण त्याकाळी नियमशास्त्र अद्याप रद्द करण्यात आले नव्हते. त्या तरुणाने येशूला खात्रीपूर्वक उत्तर दिले: “मी हे सर्व पाळिले आहे; माझ्या ठायी अजून काय उणे आहे?” यावर येशूने त्या तरुणाला जे उत्तर दिले ते बऱ्याच जणांना कदाचित अव्यवहारिक वाटेल. त्याने म्हटले: “पूर्ण होऊ पाहतोस तर जा, तुझे असेल-नसेल ते विकून दरिद्र्यांस दे म्हणजे तुला स्वर्गात संपत्ति मिळेल; आणि चल, माझ्यामागे ये.” (मत्तय १९:१६-२१) तो तरुण दुःखी होऊन तेथून निघून गेला कारण आपली सगळी संपत्ती गमवण्याची तो कल्पना करू शकत नव्हता. यहोवावर त्याचे कितीही प्रेम असले तरी, त्याची संपत्ती त्याला त्यापेक्षा जास्त प्रिय होती.
११, १२. (क) भौतिक संपत्तीविषयी येशूने कोणते विचारप्रवर्तक विधान केले? (ख) संपत्ती यहोवाची सेवा करण्याच्या मार्गात एक अडथळा कशाप्रकारे बनू शकते?
११ या घटनेनंतर येशूने अनपेक्षितपणे एक विधान केले: “स्वर्गाच्या राज्यात धनवानाचा प्रवेश होणे कठीण आहे. . . . देवाच्या राज्यात धनवानाचा प्रवेश होणे ह्यापेक्षा उंटाला सुईच्या नाकातून जाणे सोपे आहे.” (मत्तय १९:२३, २४) कोणतीच श्रीमंत व्यक्ती राज्यात प्रवेश करू शकणार नाही असे येशू सुचवत होता का? नाही कारण त्याने पुढे म्हटले: “देवाला तर सर्व शक्य आहे.” (मत्तय १९:२५, २६) आणि खरोखरच यहोवाच्या मदतीने त्या काळात काही श्रीमंत व्यक्तीही अभिषिक्त ख्रिस्ती बनल्या. (१ तीमथ्य ६:१७) येशूचे ते शब्द ऐकून बऱ्याच जणांना आश्चर्य वाटले, हे खरे असले तरीसुद्धा त्याने मुद्दामच ते विधान केले होते. त्यातून तो एक इशारा देत होता.
१२ त्या श्रीमंत तरुणाप्रमाणे जर एखाद्याला आपल्या संपत्तीची खूप ओढ असेल, तर यहोवाची पूर्ण मनाने सेवा करण्याच्या मार्गात हा एक अडथळा बनू शकतो. जे आधीपासूनच श्रीमंत आहेत आणि “जे धनवान होऊ पाहतात” अशा दोन्ही प्रकारच्या लोकांच्या बाबतीत असे घडू शकते. (१ तीमथ्य ६:९, १०) भौतिक गोष्टींवर अवास्तव भरवसा ठेवल्यामुळे एक व्यक्ती आपल्या ‘आध्यात्मिक गरजांकडे’ दुर्लक्ष करण्याची शक्यता आहे. (मत्तय ५:३, NW) परिणामस्वरूप तिला यहोवाच्या आधाराची तितकिशी गरज भासणार नाही. (अनुवाद ६:१०-१२) मंडळीत आपल्याला खास वागणूक दिली जावी अशीही अपेक्षा ही व्यक्ती करू लागण्याची शक्यता आहे. (याकोब २:१-४) आणि अशा प्रकारची व्यक्ती आपला बहुतेक वेळ यहोवाची सेवा करण्याऐवजी आपल्या संपत्तीचा उपभोग घेण्यात खर्च करण्याची शक्यता आहे.
योग्य मनोवृत्ती विकसित करा
१३. लावदिकियाच्या लोकांची कोणती अयोग्य मनोवृत्ती होती?
१३ पहिल्या शतकातील लावदिकिया मंडळीतल्या लोकांची धनसंपत्तीविषयी अयोग्य मनोवृत्ती होती. येशूने त्यांना म्हटले: “मी श्रीमंत आहे, मी धन मिळविले आहे, व मला काही उणे नाही असे तू म्हणतोस; पण तू कष्टी, दीन, दरिद्री, आंधळा व उघडावाघडा आहेस, हे तुला कळत नाही.” लावदिकिया मंडळीतले लोक आपल्या धनसंपत्तीमुळे अशा दयनीय आध्यात्मिक स्थितीत आले नव्हते. तर यहोवाऐवजी धनसंपत्तीवर भरवसा ठेवल्यामुळे त्यांची अशी दशा झाली होती. यामुळे ते आध्यात्मिकरित्या कोमट झाले होते आणि म्हणूनच येशू त्यांना आपल्या तोंडातून “ओकून टाकणार” होता.—प्रकटीकरण ३:१४-१७.
१४. पौलाने इब्री ख्रिश्चनांची प्रशंसा का केली?
१४ दुसरीकडे पाहता, पौलाने इब्री ख्रिश्चनांचा पूर्वी एकदा छळ होत असताना त्यांनी जी मनोवृत्ती बाळगली होती त्याविषयी त्यांची प्रशंसा केली. त्याने म्हटले: “बंदिवानांबरोबर तुम्ही समदुःखी झाला, आणि आपली स्वतःची अधिक चांगली मालमत्ता आपल्याजवळ आहे, व ती टिकाऊ आहे, हे समजून तुम्ही आपल्या मालमत्तेची हानी आनंदाने सोसली.” (इब्री लोकांस १०:३४) आपली मालमत्ता गमवल्यामुळे हे ख्रिस्ती दुःखात बुडाले नाहीत. अशा परिस्थितीतही ते आनंदी होते कारण त्यांच्याजवळ असलेली ‘अधिक चांगली व टिकाऊ’ अशी सर्वात मोलवान संपत्ती अद्यापही त्यांच्या मालकीची होती. एक मोलवान मोती मिळवण्याकरता आपले सर्वस्व त्यागणाऱ्या येशूच्या दृष्टान्तातील व्यापाऱ्याप्रमाणे, या इब्री ख्रिश्चनांनीही निश्चय केला होता की कोणतीही किंमत मोजावी लागली तरीसुद्धा राज्याची आशा शेवटपर्यंत कवटाळून ठेवायची, ती कधीही सोडायची नाही. (मत्तय १३:४५, ४६) त्यांची मनोवृत्ती खरोखर किती अनुकरणीय होती!
१५. लायबेरिया येथे एका ख्रिस्ती स्त्रीने राज्याला कशाप्रकारे प्राधान्य दिले?
१५ आजही बऱ्याच जणांची अशीच उत्तम मनोवृत्ती आहे. उदाहरणार्थ, लायबेरिया येथे एका ख्रिस्ती तरुणीला विद्यापीठात शिकण्याची संधी चालून आली. त्या देशात, एखाद्या व्यक्तीला अशाप्रकारची संधी मिळाल्यास तिला भविष्याबद्दल कसलीही चिंता करण्याची गरज नाही असे समजले जाते. पण ही तरुणी पायनियर होती, म्हणजेच ती पूर्ण वेळेची सेवा करत होती आणि तिला तात्पुरत्या काळासाठी खास पायनियर म्हणून सेवा करण्याचेही निमंत्रण देण्यात आले होते. तिने देवाच्या राज्यालाच प्राधान्य देऊन पूर्ण वेळेची सेवा करत राहण्याचे ठरवले. तिला नेमण्यात आलेल्या नव्या क्षेत्रात ती गेली आणि तीन महिन्यांच्या कालावधीत तिने २१ बायबल अभ्यास सुरू केले. या तरुण बहिणीप्रमाणेच आज हजारो जण, भौतिक लाभ मिळवण्याची संधी झुगारून, राज्याला प्राधान्य देत आहेत. पैशालाच सर्वकाही मानणाऱ्या या जगात ते अशी मनोवृत्ती कशी काय राखू शकतात? कारण त्यांनी अनेक चांगले गुण आत्मसात केले आहेत. यांपैकी काही चांगल्या गुणांविषयी येथे चर्चा करूया.
१६, १७. (क) यहोवावर भरवसा ठेवण्याकरता नम्र असणे का महत्त्वाचे आहे? (ख) देवाच्या प्रतिज्ञांवर आपण भरवसा का विकसित केला पाहिजे?
१६ नम्रता: बायबल म्हणते: “आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको; तू आपल्या सर्व मार्गांत त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल. तू आपल्या दृष्टीने स्वतःस शहाणा समजू नको.” (नीतिसूत्रे ३:५-७) कधीकधी विशिष्ट मार्ग भौतिक दृष्टिकोनाने अतिशय व्याव्हारिक वाटू शकतो. (यिर्मया १७:९) पण प्रामाणिक मनाचा ख्रिस्ती सर्व बाबतीत यहोवाचे मार्गदर्शन मिळवू इच्छितो. (स्तोत्र ४८:१४) “आपल्या सर्व मार्गांत”—मग ते मंडळीसंबंधी, शिक्षणासंबंधी, नोकरीसंबंधी, करमणुकीसंबंधी किंवा इतर कोणत्याही गोष्टीसंबंधी असोत, तो नम्रपणे यहोवाचे मार्गदर्शन मिळवण्याचा प्रयत्न करतो.—स्तोत्र ७३:२४.
१७ यहोवाच्या प्रतिज्ञांवर भरवसा: पौलाने म्हटले: “देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की, तो आहे, आणि त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणारा आहे.” (इब्री लोकांस ११:६) यहोवा आपल्या प्रतिज्ञा पूर्ण करेल किंवा नाही याबद्दल आपल्या मनात शंका असल्यास, ‘या जगाचा पूर्णपणे उपयोग’ करणेच आपल्याला तर्कशुद्ध वाटेल. (१ करिंथकर ७:३१) दुसरीकडे पाहता, जर आपला विश्वास मजबूत असेल तर आपण देवाच्या राज्यालाच प्राधान्य देण्याचा निर्धार करू. असा भक्कम विश्वास कसा विकसित केला जाऊ शकतो? यहोवाला सतत, मनःपूर्वक प्रार्थना करण्याद्वारे व नियमित वैयक्तिक अभ्यास करण्याद्वारे यहोवाच्या जवळ येऊन आपण असा विश्वास विकसित करू शकतो. (स्तोत्र १:१-३; फिलिप्पैकर ४:६, ७; याकोब ४:८) राजा दावीदाप्रमाणे आपणही अशी प्रार्थना करू शकतो: “हे परमेश्वरा, मी तर तुझ्यावर भाव ठेविला आहे; मी म्हणतो, तूच माझा देव आहेस. तुझे चांगुलपण किती थोर आहे!”—स्तोत्र ३१:१४, १९.
१८, १९. (क) परिश्रमी वृत्तीमुळे यहोवावरचा आपला भरवसा आणखी दृढ कसा होऊ शकतो? (ख) ख्रिस्ती व्यक्तीने त्याग करण्यास तयार का असले पाहिजे?
१८ यहोवाच्या सेवेत परिश्रमी असणे: पौलाने यहोवाच्या प्रतिज्ञांचा संबंध परिश्रमी वृत्तीशी जोडला. त्याने लिहिले: “आमची अशी इच्छा आहे की, तुम्हापैकी प्रत्येकाने आशेविषयीची पूर्ण खातरी करून घेण्याच्या हेतूने तशीच आस्था [“परिश्रमी वृत्ती,” NW] शेवटपर्यंत व्यक्त करावी.” (इब्री लोकांस ६:११) आपण यहोवाच्या सेवेत व्यग्र राहिलो तर तो आपल्याला आधार देईल. आपण त्याचे साहाय्य अनुभवतो तेव्हा प्रत्येक वेळी आपला त्याच्यावरचा भरवसा आणखी दृढ होतो आणि आपण “स्थिर व अढळ” होत जातो. (१ करिंथकर १५:५८) आपला विश्वास नव्याने मजबूत होतो आणि आपली आशा आणखी दृढ होते.—इफिसकर ३:१६-१९.
१९ त्याग करण्याची तयारी: येशूचे अनुकरण करण्यासाठी पौलाने, भरपूर यश मिळवण्याचा वाव असलेल्या व्यवसायाचा त्याग केला. भौतिक दृष्टिकोनातून विचार केल्यास, काहीवेळा पौलाला आपल्या जीवनात खडतर परिस्थितीला तोंड द्यावे लागले पण तरीसुद्धा, त्याने घेतलेला निर्णय योग्यच होता. (१ करिंथकर ४:११-१३) यहोवा आपल्याला ऐषोआरामाच्या जीवनाची हमी देत नाही. कधीकधी त्याच्या सेवकांना कठीण परिस्थितीला तोंड द्यावे लागते. पण आपली राहणी साधी ठेवण्याची व त्याग करण्याची आपण तयारी दाखवतो तेव्हा यहोवाची सेवा करण्याचा आपला निर्धार किती पक्का आहे हे सिद्ध होते.—१ तीमथ्य ६:६-८.
२०. राज्याच्या कार्याला प्राधान्य देणाऱ्याने धीर धरणे का महत्त्वाचे आहे?
२० धीर धरणे: शिष्य याकोबाने आपल्या सहख्रिस्ती बांधवांना असा सल्ला दिला: “बंधूंनो, प्रभूच्या आगमनापर्यंत धीर धरा.” (याकोब ५:७) आजकालच्या धावपळीच्या जीवनात, धीर धरणे तसे कठीणच आहे. सर्वकाही पटकन व्हावे असे आपल्याला वाटते. पण पौल आपल्याला, “विश्वासाच्या व धीराच्या योगे जे अभिवचनांचा वारसा उपभोगणारे होतात” त्यांचे अनुकरण करण्याचे प्रोत्साहन देतो. (इब्री लोकांस ६:१२) यहोवाच्या नियुक्त वेळेची वाट पाहण्यास तयार असा. पृथ्वीवरील रम्य परादिसात सार्वकालिक जीवन उपभोगण्याकरता कितीही काळ थांबावे लागले तरी ते सार्थच ठरेल!
२१. (क) आपण राज्याच्या कार्याला प्राधान्य देतो तेव्हा काय दाखवतो? (ख) पुढील लेखात कशाविषयी चर्चा केली जाईल?
२१ होय, पहिल्याने देवाचे राज्य मिळवण्यास झटा हा जो सल्ला येशूने दिला होता तो नक्कीच व्यावहारिक आहे. आपण या सल्ल्याचे पालन करतो तेव्हा आपण यहोवावर आपला पूर्ण भरवसा आहे हे दाखवतो. आणि अशाप्रकारे आपण, कोणत्याही ख्रिस्ती व्यक्तीकरता असलेला सर्वात सुरक्षित जीवनाचा मार्ग निवडतो. पण येशूने आपल्याला ‘पहिल्याने देवाचे नीतिमत्त्व’ मिळवण्यास झटा असाही सल्ला दिला होता. पुढच्या लेखात आपण पाहणार आहोत की हे प्रोत्साहन आज इतके आवश्यक का आहे. (w०६ १/१)
तुम्ही स्पष्ट करू शकता का?
• भौतिक गोष्टींच्या बाबतीत येशूने आपल्याला कोणता समतोल दृष्टिकोन बाळगण्याचे प्रोत्साहन दिले?
• उंट व सुईच्या नाकाविषयी येशूने दिलेल्या दृष्टान्तातून आपण काय शिकतो?
• कोणते ख्रिस्ती गुण आपल्याला पहिल्याने देवाचे राज्य मिळवण्यास झटण्याकरता साहाय्य करतात?
[अभ्यासाचे प्रश्न]
[२३ पानांवरील चित्र]
येशूचे शब्द ऐकणाऱ्यांपैकी बहुतेकजण गरीब होते
[२५ पानांवरील चित्र]
येशूच्या दृष्टान्तातील व्यापाऱ्याने एका मोलवान मोत्याकरता आपल्या सर्वस्वाचा त्याग केला
[२५ पानांवरील चित्र]
श्रीमंत तरुणाला देवापेक्षा आपली संपत्ती जास्त प्रिय होती
[२६ पानांवरील चित्र]
आपण यहोवाच्या सेवेत व्यग्र राहिल्यास तो आपले साहाय्य करील