व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या नवीन जगात खरी संपन्‍नता

देवाच्या नवीन जगात खरी संपन्‍नता

देवाच्या नवीन जगात खरी संपन्‍नता

डेवीड, * एक ख्रिस्ती पती व पिता आहे. नोकरीच्या निमित्ताने तो अमेरिकेत राहायला गेला. आपण जे करत आहोत ते आपल्या व आपल्या कुटुंबाच्या हिताचे आहे, असा त्याचा पक्का विश्‍वास होता. आपल्या बायकोला व मुलांना सोडून परदेशी जायला त्याला आवडत नव्हते; पण, आपल्याजवळ जर पैसा असेल तरच आपण या सर्वांना सुखाचे दिवस दाखवू शकतो, अशी खात्री त्याला वाटत होती. त्यामुळे न्यूयॉर्कमध्ये राहणाऱ्‍या त्याच्या नातेवाईकांनी त्याला तेथे बोलावले तेव्हा तो लगेच न्यूयॉर्कला गेला आणि त्याला नोकरी देखील मिळाली.

पण जसजसे महिने सरत गेले तसतसे डेवीडचा आशावादी दृष्टिकोन धूसर होत गेला. आध्यात्मिक गोष्टींसाठी त्याच्याकडे वेळच नव्हता. एक वेळ अशी आली, की देवावरील त्याचा भरवसा जवळजवळ उडून गेला. एकदा तो एका नैतिक मोहाला बळी पडला तेव्हा ताळ्यावर आला. आपण कोणत्या परिस्थितीत आहोत, याची त्याला जाणीव झाली. भौतिक समृद्धता मिळवण्याच्या नादात तो हळूहळू, त्याला पूर्वी ज्या गोष्टी महत्त्वाच्या वाटत होत्या त्यांच्यापासून दूर गेला होता. त्याला बदल करणे अगत्याचे होते.

डेवीडप्रमाणे विकसनशील देशांतील पुष्कळ लोक दरवर्षी आपली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी स्थलांतर करतात. पण यांतील बहुतेकांना खूप मोठी आध्यात्मिक किंमत मोजावी लागते. त्यामुळे काहींच्या मनात असा प्रश्‍न आला आहे, की ‘एक व्यक्‍ती भरपूर पैसा कमवत असताना देवविषयक बाबतीत धनवान असू शकते का?’ लोकप्रिय लेखक आणि धार्मिक नेते या प्रश्‍नाचे होय असे उत्तर देतील. पण डेवीड व त्याच्यासारख्या इतरांनी एक वेगळा धडा शिकला. एक गोष्ट गमवून दुसरी गोष्ट साध्य करणे सोपे नसते.—लूक १८:२४.

पैसा वाईट नाही

पैसा मानवाने शोधून काढला आहे. इतर अनेक शोधांप्रमाणे पैसा देखील वाईट नाही. तो फक्‍त एक विनिमय माध्यम आहे. त्यामुळे त्याचा उचित वापर केल्यास त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. जसे की, पैसा हा खासकरून दारिद्र्‌याशी संबंधित समस्यांपासून “आश्रय देणारा आहे,” असे बायबल म्हणते. (उपदेशक ७:१२) पण असे दिसते, की काहींना “पैशाने सारे काही मिळते” असे वाटते.—उपदेशक १०:१९, मराठी कॉमन लँग्वेज.

शास्त्रवचनांत, आळशीपणाचे खंडन करून कष्ट करण्याचे उत्तेजन देण्यात आले आहे. आपण आपल्या कुटुंबाच्या गरजा पुरवल्या पाहिजेत आणि जर आपल्याकडे थोडे जादा असेल तर आपण ते ‘गरजवंताला देऊ शकतो.’ (इफिसकर ४:२८; १ तीमथ्य ५:८) शिवाय बायबल वैरागी जीवन जगण्याला नव्हे तर आपल्या संपत्तीचा आनंद लुटण्याचे प्रोत्साहन देते. ‘आपला वाटा उचलून’ आपल्या कष्टाच्या फळाचा आनंद लुटण्यास बायबल आपल्याला सांगते. (उपदेशक ५:१८-२०) खरे तर बायबलमध्ये अशा अनेक स्त्रीपुरुषांची उदाहरणे आहेत की जे धनवान होते.

धनवान असलेले विश्‍वासू पुरुष

अब्राहाम हा देवाचा विश्‍वासू सेवक होता. त्याने पुष्कळ गुरेढोरे, सोने-रुपे आणि शेकडोंच्या घरात जाईल इतक्या संख्येचे सेवक गोळा केले होते. (उत्पत्ति १२:५; १३:२, ६, ७) धार्मिक ईयोबाकडेही अमाप संपत्ती होती—गुरेढोरे, नोकर-चाकर, सोने-रुपे. (ईयोब १:३; ४२:११, १२) आज जे खरोखर श्रीमंत म्हटले जातात त्यांच्याइतकेच तेही श्रीमंत होते. पण त्यासोबतच ते देवविषयक बाबतीत देखील श्रीमंत होते.

प्रेषित पौल अब्राहामाला “जे लोक . . . विश्‍वास ठेवतात, त्या सर्वांचा . . . बाप” म्हणतो. अब्राहाम अनावश्‍यक काटकसर करणारा नव्हता किंवा त्याच्याजवळ असलेल्या संपत्तीबद्दल त्याला खूप लगावही नव्हता. (रोमकर ४:११; उत्पत्ति १३:९; १८:१-८) तसेच, स्वतः देवाने ईयोबाला “सात्विक, सरळ,” म्हटले. (ईयोब १:८) तो गोरगरिबांना मदत करायला सदैव तयार होता. (ईयोब २९:१२-१६) अब्राहाम आणि ईयोब या दोघांचा, त्यांच्या संपत्तीपेक्षा देवावर भरवसा होता.—उत्पत्ति १४:२२-२४; ईयोब १:२१, २२; रोमकर ४:९-१२.

आणखी एक उदाहरण राजा शलमोनाचे आहे. जेरुसलेममधील देवाच्या सिंहासनाचा वारस म्हणून शलमोनाला देवाने फक्‍त ईश्‍वरी बुद्धीच नव्हे तर अमाप संपत्ती व वैभव देऊन आशीर्वादित केले होते. (१ राजे ३:४-१४) त्याच्या बहुतेक जीवनकालात तो विश्‍वासू होता. पण त्याच्या जीवनाच्या उत्तरार्धात त्याचे ‘मन परमेश्‍वराकडे पूर्णपणे . . . नव्हते.’ (१ राजे ११:१-८) खरे तर, त्याचा दुःखद अनुभव, भौतिक समृद्धतेचे काही सर्वसामान्य धोके दाखवतो. यांतील काहींचा विचार करूया.

संपन्‍नतेचे धोके

सर्वात मोठा धोका म्हणजे पैशाच्या आणि पैशाने जे काही विकत घेता येते त्याच्या प्रेमात पडणे. संपत्तीमुळे काही जणांमध्ये पैशाचा अधाशीपणा उत्पन्‍न होतो जो कधीही तृप्त होत नाही. शलमोनाने आपल्या कारकीर्दीच्या सुरुवातीला इतरांमधील ही प्रवृत्ती पाहिली होती. त्याविषयी त्याने असे लिहिले: “ज्याला पैसा प्रिय वाटतो त्याची पैशाने तृप्ति होत नाही; जो विपुल धनाचा लोभ धरितो त्याला काही लाभ घडत नाही; हेहि व्यर्थ!” (उपदेशक ५:१०) येशू आणि पौल या दोघांनी नंतर ख्रिश्‍चनांना या फसव्या प्रेमाविषयी इशारा दिला.—मार्क ४:१८, १९; २ तीमथ्य ३:२.

पैसा हा व्यवहार करण्याकरता असलेले केवळ एक माध्यम आहे असे न समजून जेव्हा आपण पैसा कमवण्यालाच आपले मुख्य ध्येय बनवतो तेव्हा आपण सर्व प्रकारच्या नैतिक मोहांना—ज्यांत खोटे बोलणे, चोरी करणे, फसवाफसवी यांचा समावेश होतो—सहज बळी पडू शकतो. ख्रिस्ताच्या प्रेषितांपैकी असलेल्या यहुदा इस्कार्योतने केवळ ३० चांदीच्या नाण्यांसाठी आपल्या धन्याला धरून दिले. (मार्क १४:११; योहान १२:६) काहींना पैशाबद्दल इतके अति प्रेम असते की ते देवाऐवजी पैशाची पूजा करू लागले आहेत. (१ तीमथ्य ६:१०) त्यामुळे ख्रिश्‍चनांनी, ते पैसा का कमवत आहेत तो मुख्य हेतू नेहमी लक्षात ठेवला पाहिजे.—इब्री लोकांस १३:५.

संपत्तीच्या मागे धावल्याने इतरही अनेक धोके उत्पन्‍न होतात जे चटकन लक्षात येत नाहीत. पहिला धोका म्हणजे, विपुल संपत्तीमुळे आत्म-निर्भरतेची प्रवृत्ती वाढण्याची शक्यता आहे. येशूने ‘द्रव्याच्या मोहाविषयी’ बोलताना या प्रवृत्तीविषयी सांगितले. (मत्तय १३:२२) तसेच बायबल लेखक याकोब याने देखील ख्रिश्‍चनांना, व्यापाराविषयीच्या योजना करताना देखील देवाला विसरू नये अशी ताकीद दिली. (याकोब ४:१३-१६) पैशामुळे आपल्याला काही प्रमाणात स्वातंत्र्य मिळाल्याचा भास होत असल्यामुळे ज्यांच्याकडे तो आहे त्यांच्यासाठी, देवाऐवजी आपल्या पैशावर भरवसा ठेवण्याचा धोका नेहमी असतो.—नीतिसूत्रे ३०:४-७; प्रेषितांची कृत्ये ८:१८-२४.

दुसरी गोष्ट म्हणजे, सुरुवातीला ज्याचा उल्लेख करण्यात आला त्या डेवीडला कळून चुकले की पैशाचा पाठलाग करताना एका व्यक्‍तीचा इतका वेळ आणि इतकी शक्‍ती खर्च होत असते की ती व्यक्‍ती हळूहळू आध्यात्मिक गोष्टींपासून दूर भरकटत जाते. (लूक १२:१३-२१) जे धनवान आहेत त्यांना नेहमी, त्यांच्याजवळ असलेल्या पैशाचा, मौजमजा करण्यासाठी किंवा व्यक्‍तिगत गोष्टींची खरेदी करण्यासाठी उपयोग करण्याचा मोह होऊ शकतो.

शलमोनाने काही अंशी, आपल्या ऐषोआरामाच्या जीवनशैलीला आपली शुद्ध हरपू दिल्यामुळे त्याचे आध्यात्मिक पतन झाले असावे का? (लूक २१:३४) विदेशी स्त्रियांबरोबर विवाह संबंध जोडण्याविरुद्ध देवाने स्पष्ट शब्दांत निषेध केला आहे हे त्याला माहीत होते. तरीपण त्याने सुमारे एक हजार स्त्रियांबरोबर लग्न करून एक जनानखानाच तयार केला. (अनुवाद ७:३) आपल्या विदेशी बायकांना खूष करण्यासाठी त्याने त्यांच्यासाठी मिश्र-विश्‍वासांची उपासनापद्धत बनवण्याचा प्रयत्न केला. आधी सांगितल्याप्रमाणे, शलमोनाचे हृदय हळूहळू यहोवापासून दूर भरकटत गेले.

स्पष्टपणे, ही उदाहरणे येशूच्या या सल्ल्याची सत्यता पटवतात, की “कोणीहि दोन धन्याची चाकरी करू शकत नाही.” (मत्तय ६:२४) तेव्हा, आता बहुतेकांना तोंड द्याव्या लागणाऱ्‍या आर्थिक अडचणींवर एक ख्रिस्ती व्यक्‍ती यशस्वीरीत्या मात कशी करू शकते? सर्वात महत्त्वाचे म्हणजे, पुढे उत्तम जीवन येणार आहे याची काय आशा आहे?

खरी संपन्‍नता पुढे येणार आहे

“सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा” ही आज्ञा कुलपिता अब्राहाम, ईयोब आणि इस्राएल राष्ट्राला देण्यात आली नव्हती पण येशूच्या अनुयायांना ती देण्यात आली आहे. (मत्तय २८:१९, २०) भौतिक गोष्टींचा पाठलाग करण्यामध्ये जो वेळ आणि जी शक्‍ती खर्च करावी लागते ती ही कामगिरी पार पाडण्यासाठी करावी लागेल. त्यामुळे जर आपल्याला यशस्वी व्हायचे आहे तर येशूने आपल्याला जे सांगितले ते आपण केले पाहिजे. “तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्त्व मिळविण्यास झटा म्हणजे त्यांच्याबरोबर ह्‍याहि सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील,” असे येशूने आपल्याला सांगितले आहे.—मत्तय ६:३३.

डेवीड आपले कुटुंब आणि आपली आध्यात्मिकता गमावता गमावता वाचला. तो आपल्या चुका सावरून पुन्हा योग्य मार्गावर येऊ शकला. त्याने जेव्हा बायबल अभ्यास, प्रार्थना आणि ख्रिस्ती सेवा या गोष्टींना आपल्या जीवनात प्रथम स्थान देण्यास सुरुवात केली तेव्हा येशूने वचन दिल्याप्रमाणे जीवनातील इतर गोष्टी आपोपाप सुधारू लागल्या. आपल्या बायको-मुलांबरोबरचे त्याचे संबंध पुन्हा सुरळीत झाले. त्याचा आनंद व समाधान त्याला पुन्हा मिळाला. आजही तो कष्ट करतो. असे नाही की त्याची परिस्थिती खूपच सुधारली म्हणजे अगदीच हलाखीच्या दिवसांपासून तो आता खूप धनवान झाला आहे. पण, त्याच्या दुःखदायक अनुभवातून मात्र तो खूप मौल्यवान धडे शिकला.

डेवीडने अमेरिकेत जाऊन राहण्याविषयी पुन्हा एकवार विचार केला आणि पुन्हा कधी पैशांच्या आधारावर निर्णय न घेण्याचा निश्‍चय त्याने केला आहे. आता त्याला जाणीव झाली आहे, की जीवनात सर्वात मौल्यवान गोष्टी—प्रेमळ कुटुंब, चांगले मित्र आणि देवाबरोबरचा नातेसंबंध—पैशाने विकत घेता येत नाहीत. (नीतिसूत्रे १७:१७; २४:२७; यशया ५५:१, २) होय, भौतिक संपत्तीपेक्षा नैतिक एकनिष्ठा जास्त मौल्यवान आहे. (नीतिसूत्रे १९:१; २२:१) डेवीडने आपल्या कुटुंबासोबत मिळून महत्त्वाच्या गोष्टींना प्राधान्य देण्याचा निर्धार केला आहे.—फिलिप्पैकर १:१०.

श्रीमंत आणि नीतितत्त्वांनुसार जगणाऱ्‍या लोकांचा समाज बनवण्यास मानव वारंवार निकामी ठरले आहेत. परंतु, देवाने असे वचन दिले आहे की त्याचे राज्य, आनंदी व सुखी जीवन जगण्यासाठी आपल्याला लागणाऱ्‍या भौतिक व आध्यात्मिक गोष्टी विपुलतेत पुरवेल. (स्तोत्र ७२:१६; यशया ६५:२१-२३) आपल्याला जर खरोखरच सुखी व्हायचे आहे तर आधी आपण आपल्या आध्यात्मिक गरजांबद्दलची जाणीव राखली पाहिजे, असे येशूने शिकवले. (मत्तय ५:३, NW) यास्तव, आपण भौतिकरीत्या श्रीमंत असो किंवा गरीब, आता आध्यात्मिक गोष्टींना प्राधान्य देणे हा, भविष्यात येणाऱ्‍या देवाच्या नवीन जगाची तयारी करण्याचा सर्वात उत्तम मार्ग आहे. (१ तीमथ्य ६:१७-१९) हे नवीन जग खऱ्‍या अर्थाने भौतिकरीत्या आणि आध्यात्मिकरीत्या समृद्ध असेल. (w०६ २/१)

[तळटीप]

^ परि. 2 नाव बदलण्यात आले आहे.

[५ पानांवरील चित्रे]

ईयोबाने देवावर भरवसा ठेवला, आपल्या संपत्तीवर नव्हे

[७ पानांवरील चित्रे]

जीवनातील सर्वात मौल्यवान गोष्टी पैशाने विकत घेता येत नाहीत