व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

नहेम्या पुस्तकातील ठळक मुद्दे

नहेम्या पुस्तकातील ठळक मुद्दे

यहोवाचे वचन सजीव आहे

नहेम्या पुस्तकातील ठळक मुद्दे

बायबलमधील एज्रा या पुस्तकात वर्णन केलेल्या शेवटल्या घटना घडून १२ वर्षे पूर्ण झाली आहेत. “यरुशलेमेचा जीर्णोद्धार करण्याची आज्ञा” देण्याची वेळ जवळ आली आहे; येथपासूनच, मशिहापर्यंत येणाऱ्‍या ७० आठवड्यांच्या वर्षांची सुरुवात होते. (दानीएल ९:२४-२७) नहेम्याच्या पुस्तकात, देवाचे लोक जेरुसलेमची भिंत पुन्हा कशी बांधू लागतात त्याचा इतिहास दिला आहे. तो १२ पेक्षा अधिक वर्षांच्या महत्त्वपूर्ण कालावधीचा म्हणजे सा.यु.पू. ४५६ पासून सा.यु.पू. ४४३ नंतरच्या काही वर्षांपर्यंतचा वृत्तांत आहे.

या पुस्तकाचा लेखक आहे सुभेदार नहेम्या. यहोवा देवावर पूर्ण भरवसा ठेवून अविचल कार्याने खऱ्‍या उपासनेला कसे उंचावले जाते त्याविषयीचा लक्षवेधक वृत्तांत या पुस्तकात आहे. आपली इच्छा पूर्ण करण्याकरता यहोवा घटनांना कसे वळण देतो हे या वृत्तांतावरून दिसून येते. शिवाय, एका बलवान आणि धाडसी नेत्याबद्दलचे वर्णन देखील या वृत्तांतांत आहे. नहेम्याच्या पुस्तकातील संदेशात, आजच्या सर्व खऱ्‍या उपासकांसाठी मौल्यवान धडे आहेत; “कारण देवाचे वचन सजीव, सक्रिय” आहे.—इब्री लोकांस ४:१२.

“कोट बांधून झाला”

(नहेम्या १:१–६:१९)

नहेम्या शूशन राजवाड्यांत राजा अर्तहशश्‍त लाँगीमेनसची एका विश्‍वासू पदावर सेवा करत आहे. त्याचे लोक “मोठ्या दुर्दशेत असून त्यांची अप्रतिष्ठा होत आहे; यरुशलेमेचा तटहि पडला आहे, व त्याच्या वेशी आग लावून जाळून टाकिल्या आहेत” ही बातमी तो ऐकतो तेव्हा खूप खेदीत होतो. तो मार्गदर्शनासाठी यहोवाला कळकळीने प्रार्थना करतो. (नहेम्या १:३, ४) राजा नहेम्याचा उतरलेला चेहरा पाहतो आणि जेरुसलेमला जाण्याची त्याला संधी दिली जाते.

जेरुसलेममध्ये आल्यावर नहेम्या रात्री तटाची पाहणी करतो आणि या तटाची पुनःबांधणी करण्याच्या त्याच्या योजनेविषयी यहुद्यांना सांगतो. बांधकाम सुरू होते. त्याचबरोबर बांधकामाला विरोधही सुरू होतो. पण नहेम्याच्या धाडसी नेतृत्वाखाली “कोट बांधून” पूर्ण होतो.—नहेम्या ६:१५.

शास्त्रवचनीय प्रश्‍नांची उत्तरे:

१:१; २:१—या दोन्ही वचनांतील ‘विसावे वर्ष’ याची मोजणी एकाच वर्षापासून करण्यात आली आहे का? होय, हे विसावे वर्ष अर्तहशश्‍त राजाच्या कारकीर्दीचे वर्ष आहे. परंतु, या वचनात वापरलेली मोजायची पद्धत वेगळी आहे. ऐतिहासिक पुरावा, अर्तहशश्‍त राजा सा.यु.पू. ४७५ मध्ये सिंहासनावर आला असे दाखवतो. बॅबिलोनी शास्त्र्यांची पर्शियन राजांच्या कारकीर्दीच्या वर्षांची मोजणी करायची पद्धत निसान (मार्च/एप्रिल) ते निसान अशी असल्यामुळे, अर्तहशश्‍त राजाच्या कारकीर्दीचे पहिले वर्ष सा.यु.पू. ४७४ पासून सुरू होते. त्यामुळे, नहेम्या २:१ मध्ये उल्लेखण्यात आलेल्या त्याच्या कारकीर्दीचे २० वे वर्ष सा.यु.पू. ४५५ च्या निसान मध्ये सुरू झाले. नहेम्या १:१ मध्ये उल्लेखण्यात आलेला किसलेव (नोव्हेंबर/डिसेंबर) महिना तर्कशुद्धपणे आदल्या वर्षाचा अर्थात सा.यु.पू. ४५६ वर्षाचा किसलेव महिना आहे. नहेम्या असेही म्हणतो की तो महिना अर्तहशश्‍त राजाच्या कारकीर्दीच्या विसाव्या वर्षी येतो. येथे कदाचित तो सम्राटाचे राज्यारोहण ज्या तारखेला झाले तेव्हापासून मोजत असावा. किंवा कदाचित असेही असू शकते, की नहेम्या, आज यहुदी ज्याला नागरी वर्ष म्हणतात तेव्हापासून मोजत असावा. नागरी वर्ष, सप्टेंबर/ऑक्टोबर या महिन्यांशी जुळणाऱ्‍या तिशरी महिन्यात सुरू होते. काहीही असो, जेरुसलेमची पुनःस्थापना करण्याची आज्ञा ज्या वर्षी झाली ते वर्ष सा.यु.पू. ४५५ आहे.

४:१७, १८—एक मनुष्य केवळ एकाच हाताने पुनःबांधकाम करणे कसे शक्य आहे? भार वाहणाऱ्‍यांसाठी असे करणे सोपे असावे. भार एकदा त्यांच्या डोक्यावर किंवा खांद्यावर ठेवल्यावर ते तो आपल्या एका हाताने सांभाळून “दुसऱ्‍या हातात शस्त्रे धारण करीत.” ज्या लोकांना दोन्ही हातांनी काम करावे लागत होते ते “आपल्या कमरेस तरवार लावून [काम] करीत.” शत्रूने जर त्यांच्यावर हल्ला केला तर त्यांना त्यांच्याविरुद्ध लढावे लागत होते.

५:७—कोणत्या अर्थाने नहेम्या “सरदार व शास्ते यांजशी वाद” करत होता? हे लोक आपल्या सहयहुदी बांधवांकडून वरताळा घेत होते जे मोशेच्या नियमशास्त्राविरुद्ध होते. (लेवीय २५:३६; अनुवाद २३:१९) शिवाय, पैसे देणारे हे लोक मागत असलेले व्याज खूपच जास्त होते. दरमहा मागितल्यास, “शतांश” दर वर्षी १२ टक्के इतका असता. (नहेम्या ५:११) आधीच कराच्या ओझ्याखाली दबून गेलेल्या व अन्‍नटंचाईमुळे अर्धपोटी असलेल्या लोकांकडून अशाप्रकारे पैसे उकळणे निर्दयीपणाचे होते. नहेम्याने देवाच्या नियमशास्त्राचा उपयोग करून श्रीमंतांशी वाद घातला अथवा त्यांची चूक त्यांच्या नजरेस आणून दिली. त्याने त्यांची खरडपट्टी काढली.

६:५—गोपनीय पत्रे सहसा मुहरबंद पिशवीत ठेवली जात, मग सनबल्लटाने नहेम्याला “खुली चिठी” का पाठवली? खुले पत्र पाठवून दोषारोपांची दवंडी पिटवण्याचा सनबल्लटाचा मनसुबा असावा. यामुळे नहेम्याला इतका राग येईल की तो बांधकाम अर्ध्यावरच सोडून सफाई देण्यासाठी येईल, असे सनबल्लटाला वाटले असावे. किंवा, कदाचित त्याने असा विचार केला असेल, की पत्रातील मजकूरामुळे यहुद्यांमध्ये खळबळ उडेल आणि ते बांधकाम पूर्णपणे थांबवतील. पण नहेम्याने याकडे दुर्लक्ष केले आणि तो शांतपणे देवाने दिलेले काम करत राहिला.

आपल्याकरता धडे:

१:४; २:४; ४:४, ५. आपल्यासमोर एक कठीण प्रसंग येतो तेव्हा किंवा आपल्याला एखादा महत्त्वपूर्ण निर्णय घ्यावा लागतो तेव्हा आपण “प्रार्थनेत तत्पर” राहिले पाहिजे व देवाच्या वचनांत किंवा त्याच्या संघटनेकरवी मिळणाऱ्‍या मार्गदर्शनाच्या सुसंगत कार्य केले पाहिजे.—रोमकर १२:१२.

१:११–२:८; ४:४, ५, १५, १६; ६:१६. यहोवा आपल्या सेवकांच्या प्रामाणिक प्रार्थनांचे उत्तर देतो.—स्तोत्र ८६:६, ७.

१:४; ४:१९, २०; ६:३, १५. नहेम्या कोमल भावनांचा मनुष्य होता तरीसुद्धा त्याने तडफदारपणे धार्मिकतेसाठी कार्य करताना धाडस दाखवून आपल्यासाठी एका उत्तम उदाहरण मांडले.

१:११–२:३. नहेम्याच्या आनंदाचे मुख्य कारण, तो प्यालेदार म्हणून एका प्रतिष्ठित हुद्द्‌यावर होता, हे नव्हते. तर, खऱ्‍या उपासनेची वृद्धी करण्याकरता त्याला मिळालेल्या सुहक्कामुळे तो आनंदी होता. आपल्याबाबतीतही, यहोवाची उपासना आणि या उपासनेच्या वृद्धीसाठी आपल्याला मिळालेले प्रत्येक काम यांना आपण जीवनात प्राधान्य दिले पाहिजे आणि हेच आपल्या आनंदाचे प्रमुख कारण असले पाहिजे, नाही का?

२:४-८. यहोवाने अर्तहशश्‍त राजाला, जेरुसलेमचा तट पुन्हा बांधण्यास नहेम्याला परवानगी देण्यास प्रवृत्त केले. नीतिसूत्रे २१:१ म्हणते: “राजाचे मन पाटांच्या पाण्याप्रमाणे परमेश्‍वराच्या हाती आहे. त्याला वाटेल तिकडे तो ते वळवितो.”

३:५, २७. तकोवाच्या “महाजनांना” जशी लाज वाटली तसे खऱ्‍या उपासनेच्या संबंधाने हातांनी कराव्या लागणाऱ्‍या कोणत्याही कामाची आपल्याला लाज वाटू नये. उलट, आपण त्या साधारण तकोवाकरांचे अनुकरण करू शकतो जे स्वेच्छेने काम करण्यास पुढे आले.

३:१०, २३, २८-३०. राज्य प्रचारकांची जेथे जास्त गरज आहे अशा ठिकाणी काही जण जाऊन राहू शकतात; पण आपल्यातील बहुतेक जण घरीच राहून खऱ्‍या उपासनेला पाठिंबा देतात. आपण राज्य सभागृह बांधकामात आणि विपत्ती मदत कार्यात भाग घेऊ शकतो परंतु सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण राज्य प्रचारकार्यात भाग घेऊ शकतो.

४:१४. आपला विरोध केला जातो तेव्हा आपणही “थोर व भयावह जो परमेश्‍वर” आहे त्याचे स्मरण करून आपल्या मनात असलेल्या भीतीवर मात करू शकतो.

५:१४-१९. अधिपती नहेम्याचा नम्र, निःस्वार्थ व विवेकी स्वभाव ख्रिस्ती पर्यवेक्षकांसाठी एक उत्तम उदाहरण आहे. देवाच्या नियमशास्त्राच्या बाबतीत तो कडक होता तरीसुद्धा, स्वतःच्या स्वार्थासाठी त्याने केव्हाही इतरांवर वर्चस्व गाजवले नाही. उलट, त्याने जुलूम झालेल्यांबद्दल व गरिबांबद्दल काळजी व्यक्‍त केली. उदार मनोवृत्ती बाळगण्याद्वारे नहेम्याने देवाच्या सर्व सेवकांसाठी उल्लेखनीय उदाहरण मांडले.

“हे माझ्या देवा, माझ्या हितार्थ माझे स्मरण ठेव”

(नहेम्या ७:१–१३:३१)

जेरुसलेमचे तट बांधून झाल्याबरोबर नहेम्या त्याला फाटके लावतो आणि शहराच्या संरक्षणासाठी व्यवस्था करतो. तो लोकांची वंशावळी तयार करायला लागतो. “पाणीवेशीजवळच्या चौकात” सर्व लोक एकत्र आल्यावर याजक एज्रा मोशेचा नियमशास्त्र वाचतो आणि नहेम्या व लेवी लोकांना नियमशास्त्र समजावून सांगतात. (नहेम्या ८:१) मांडवांच्या सणाविषयी ते ऐकतात तेव्हा ते अत्यानंदाने तो सण साजरा करतात.

त्यानंतर दुसऱ्‍यांदा लोक एकत्र येतात. तेव्हा “इस्राएल वंशातील लोक” इस्राएल राष्ट्राने केलेल्या पातकांची कबुली देतात. देवाने इस्राएल लोकांबरोबर कशाप्रकारे व्यवहार केला ते लेवीय त्यांना पुन्हा एकदा सांगतात तेव्हा लोक “प्रभु परमेश्‍वर याच्या सर्व आज्ञा . . . लक्षपूर्वक पाळू,” अशी आणभाक करतात. (नहेम्या ९:१, २; १०:२९) जेरुसलेमची लोकसंख्या अद्याप कमी असल्यामुळे, शहराच्या बाहेर राहणाऱ्‍या प्रत्येक १० पुरुषांमागे एका पुरुषाने शहरात येऊन राहावे म्हणून चिठ्या टाकल्या जातात. त्यानंतर, तटाचे उद्‌घाटन इतक्या आवेशाने केले जाते की ‘यरुशलेमेचा आनंदध्वनि दूरपर्यंत ऐकू [येतो].’ (नहेम्या १२:४३) जेरुसलेममध्ये १२ वर्ष राहिल्यानंतर नहेम्या अर्तहशश्‍त राजाच्या दरबारातील आपल्या कामाला रूजू होतो. त्यानंतर यहुद्यांमध्ये अशुद्धता दिसू लागते. जेरुसलेममध्ये परत आल्यावर नहेम्या परिस्थिती सुधारण्यासाठी निर्णायक पाऊल उचलतो. स्वतःसाठी तो विनम्रपणे अशी विनंती करतो: “हे माझ्या देवा, माझ्या हितार्थ माझे स्मरण ठेव.”—नहेम्या १३:३१.

शास्त्रवचनीय प्रश्‍नांची उत्तरे:

७:६-६७—जरुबाबेलबरोबर जेरुसलेमेस परतलेल्या शेष जणांच्या एकेका घराण्याबद्दलची नहेम्याची यादी आणि एज्राची यादी यात तफावत का आहे? (एज्रा २:१-६५) एज्रा व नहेम्याने वेगवेगळ्या स्रोतांचा उपयोग केला असावा म्हणून कदाचित दोन्ही याद्यांत तफावत आहे. जसे की, परत जाण्याची नोंद करणाऱ्‍या लोकांची संख्या, जे खरोखर परतले त्यांच्यापेक्षा वेगळी असावी. दोन्ही अहवालांत फरक असू शकतो, कारण ज्या यहुदांना आपली वंशावळी व्यवस्थित सिद्ध करता आली नसेल त्यांनी नंतर ती सांगितली असेल. परंतु, दोन्ही अहवालांचे एका मुद्द्‌यावर एकमत होते: दास आणि गायक यांना वगळता, सुरुवातीला परतलेल्यांची संख्या ४२,३६० इतकी होती.

१०:३४—लोकांना लाकडाचे अर्पण देण्याचा नियम का देण्यात आला होता? लाकडाचे अर्पण देण्याविषयी मोशेच्या नियमशास्त्रात काही सांगण्यात आले नव्हते. अर्पणांसाठी लाकडांची अत्यंत गरज असल्यामुळे लोकांनी लाकडे आणावीत असा नियम निघाला असावा. वेदीवर अर्पणे जाळण्याकरता खूप लाकडांची आवश्‍यकता होती. परंतु, गैर इस्राएली मंदिर सेवक म्हणून काम करणारे पुरेसे नेथीनीमही नव्हते. त्यामुळे, लाकडाचा पुरवठा सतत चालू राहील म्हणून चिठ्या टाकण्यात आल्या.

१३:६—नहेम्या जेरुसलेममध्ये किती दिवस नव्हता? बायबल फक्‍त असे म्हणते, की “काही दिवसांनी” नहेम्याने राजाकडे जेरुसलेमला जाण्यासाठी रजा मागितली. त्यामुळे, तो किती दिवस बाहेर होता हे सांगता येत नाही. पण, जेरुसलेमला परत आल्यावर, लोक याजकांना सहकार्य देत नव्हते, शब्बाथ नियमांचे पालन करत नव्हते, हे नहेम्याने पाहिले. पुष्कळ लोकांनी विदेशी स्त्रियांशी लग्न केले होते आणि त्यांना झालेल्या मुलांना यहुद्यांची भाषा बोलता येत नव्हती. परिस्थिती इतक्या थरापर्यंत पोहंचली होती म्हणजेच नहेम्या बऱ्‍याच काळासाठी जेरुसलेमच्या बाहेर होता.

१३:२५, २८—आध्यात्मिकरीत्या मागे पडलेल्या यहुद्यांशी “वाद” करण्याव्यतिरिक्‍त म्हणजे त्यांची चूक त्यांच्या लक्षात आणून देण्याव्यतिरिक्‍त नहेम्याने त्यांना सुधारण्यासाठी आणखी कोणती पावले उचलली? नहेम्याने “त्यांस शिव्याशाप दिले” म्हणजे त्याने देवाच्या नियमशास्त्रात त्यांच्याविरुद्ध उच्चारलेले न्यायदंड सांगितले. त्यांच्याविरुद्ध कोणती न्यायिक कारवाई केली जाईल हे सांगून त्याने जणू काय त्यांना “मार दिला.” आपल्या नैतिक जबाबदारीचे प्रतीक म्हणून त्याने ‘त्यांचे केस उपटले.’ शिवाय त्याने, होरोनी असलेल्या सनबल्लटाच्या मुलीशी लग्न करणाऱ्‍या महायाजक एल्याशीब याच्या नातवाला हाकलून लावले.

आपल्याकरता धडे:

८:८. देवाच्या वचनाचे शिक्षक या नात्याने आपण शास्त्रवचनांतील शब्दांचा योग्य उच्चार करण्याद्वारे, शब्दांवर जोर देण्याद्वारे व त्यांचे स्पष्टीकरण देण्याद्वारे त्यांचा ‘अर्थ समजावून सांगतो.’

८:१०. “परमेश्‍वराविषयींचा जो आनंद” आपल्या आध्यात्मिक गरजांबद्दलची जाणीव बाळगून त्या तृप्त केल्यामुळे व देवाकडून मिळणाऱ्‍या मार्गदर्शनाचे पालन केल्यामुळे मिळते. त्यामुळे, आपण बायबलचा मनःपूर्वक अभ्यास करणे, सर्व ख्रिस्ती सभांना उपस्थित राहणे व आवेशाने राज्य-प्रचार व शिष्य बनवण्याच्या कार्यात भाग घेणे किती अगत्याचे आहे.

११:२. आपली वडिलोपार्जित संपत्ती मागे सोडून जेरुसलेमेत जाऊन राहण्यात खर्च होणार होता आणि काही प्रमाणात तोटाही सहन करणे समाविष्ट होते. असे करायला जे तयार झाले त्यांनी आत्म-त्यागी वृत्ती दाखवली. आपणही, अधिवेशनांमध्ये आणि इतर प्रसंगी इतरांची सेवा करण्याची संधी येते तेव्हा स्वेच्छेने अशाप्रकारची वृत्ती दाखवू शकतो.

१२:३१, ३८, ४०-४२. यहोवाची स्तुती करण्याचा व त्याच्याबद्दल आपल्या मनात असलेली कृतज्ञता व्यक्‍त करण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे गीत गाणे. ख्रिस्ती मेळाव्यांमध्ये आपण मनापासून स्तुतीगीते गायिली पाहिजेत.

१३:४-३१. भौतिकवाद, भ्रष्टाचार आणि धर्मत्याग यांचा आपल्या जीवनावर हळूहळू प्रभाव तर पडत नाही, याची आपण खबरदारी बाळगली पाहिजे.

१३:२२. आपल्याला देवाला जाब द्यायचा आहे, ही जाणीव नहेम्याला होती. आपण देखील ही जाणीव बाळगली पाहिजे.

यहोवाची संमती मिळणे आवश्‍यक!

“परमेश्‍वर जर घर बांधीत नाही तर ते बांधणाऱ्‍याचे श्रम व्यर्थ आहेत,” असे स्तोत्रकर्त्याने गायिले. (स्तोत्र १२७:१) नहेम्याचे पुस्तक किती सुरेखपणे या शब्दांची सत्यता पटवते!

आपल्यासाठी धडा स्पष्ट आहे. आपण हाती घेतलेले कोणतेही कार्य सफल होण्याकरता यहोवाची संमती हवी. खऱ्‍या उपासनेला आपण आपल्या जीवनात प्रथम स्थान दिले नाही तर यहोवाने आपल्याला आशीर्वाद देण्याची आपण अपेक्षा करू शकतो का? यास्तव, नहेम्याप्रमाणे आपणही यहोवाच्या उपासनेला आणि तिच्या वृद्धीला प्राधान्य देऊ या. (w०६ २/१)

[८ पानांवरील चित्र]

“राजाचे मन पाटांच्या पाण्याप्रमाणे परमेश्‍वराच्या हाती आहे”

[९ पानांवरील चित्र]

तडफदार व कोमल भावना असलेला नहेम्या जेरुसलेमेस येतो

[१० पानांवरील चित्रे]

देवाच्या वचनाचा ‘अर्थ कसा समजावून सांगायचा’ हे तुम्हाला माहीत आहे का?