व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पैसा आणि नैतिकता इतिहासातून धडा

पैसा आणि नैतिकता इतिहासातून धडा

पैसा आणि नैतिकता इतिहासातून धडा

एप्रिल ७, १६३० रोजी, सुमारे चारशे लोक चार गलबतांवरून इंग्लंडहून अमेरिकेस निघाले. यांच्यापैकी पुष्कळ लोक खूप शिकलेले लोक होते. इतर जण, जम बसलेले उद्योगपती होते. काही तर संसदेचे सदस्य देखील होते. इंग्लंडमधील आर्थिकतेला मंदी आली होती; युरोपात, थांबायचे नाव घेत नसलेल्या तीस वर्षांच्या युद्धामुळे (१६१८-४८) तर परिस्थिती आणखीनच बिकट झाली होती. त्यामुळे, पैसा कमवण्यासाठी हे लोक धोका पत्करून, आपली घरेदारे, व्यापार आणि नातेवाईकांना मागे टाकून निघाले.

हा आशावादी घोळका केवळ संधीसाधू व्यापाऱ्‍यांचा घोळका नव्हता. तो धार्मिक छळापासून पळणाऱ्‍या आवेशी प्युरिटन लोकांचा घोळका होता. * देवाला भिऊन वागणारा समाज स्थापन करणे, हा या लोकांचा खरा उद्देश होता; जेणेकरून ते व त्यांची लेकरे, बायबल दर्जांपासून दूर न जाता भौतिकरीत्या श्रीमंत होऊ शकतील. सेलेम, मॅसॅच्यूसेट्‌स येथे पोहंचल्याबरोबर त्यांनी किनाऱ्‍याजवळील एका जमिनीवर आपले बस्तान मांडले. आपल्या या नव्या ठिकाणाला त्यांनी बॉस्टन असे नाव दिले.

विचित्र संतुलन

या गटाचा नेता आणि सुभेदार, जॉन विन्थ्रॉप याने या नवीन वसाहतीला खाजगी संपत्ती मिळवून देण्याकरता व लोकांचे कल्याण व्हावे म्हणून आपल्या परीने बराच प्रयत्न केला. लोकांकडे पैसा आणि त्याचबरोबर उत्तम नैतिकता असावी, अशी त्याची इच्छा होती. पण हे अतिशय विचित्र संतुलन ठरले. पुढे पुष्कळ आव्हाने येतील, हे त्याने ओळखल्यामुळे तो आपल्या साथीदारांना, देव-भीरू समाजासाठी पैशाची किती आवश्‍यकता आहे, हे समजावून सांगत असे.

इतर प्युरिटन नेत्यांप्रमाणे, विन्थ्रॉपचा असा विश्‍वास होता, की पैसा मिळवण्यात गैर असे काही नव्हते. पैसा मिळवण्याचा मुख्य हेतू, इतरांना मदत करणे हा आहे, असे तो म्हणत असे. त्यामुळे माणूस जितका श्रीमंत तितकाच सत्कर्म करण्यास सक्षम आहे, असे त्याचे म्हणणे होते. “पण पैसा एक असा विषय होता ज्यावर प्यूरिटन लोकांना बोलायला आवडत नव्हते,” असे इतिहासकार पॅट्रिशिया ओटूल म्हणतात. “श्रीमंती, ही देवाकडून बरकत मिळत असल्याचे चिन्ह होते तसेच एखाद्याला, आपल्या संपत्तीबद्दल टेंभा मिरवण्याचे पाप करण्याच्या . . . आणि शरीराची वासना पूर्ण करण्याच्या मोहात सहज पाडू शकत होते.”

संपत्ती व सुखविलास यांमुळे उत्पन्‍न होणारे पाप टाळण्यासाठी विन्थ्रॉपने लोकांना संतुलन आणि आत्म-संयम दाखवण्यास आर्जवले. परंतु लवकरच, स्वतःची पोळी भाजून घेण्याच्या त्याच्या साथीदारांची प्रवृत्ती आणि विन्थ्रॉपचे त्यांना धर्माचरण करण्यास व एकमेकांवर प्रेम करण्यास आजर्वण्याचा प्रयत्न यांच्यात काही मेळ बसेनासा झाला. विन्थ्रॉप बळजबरीने आपल्या खासगी मामल्यात लुडबूड करतोय, असे त्यांना वाटू लागले. काहींनी लोकांना विधान सभा निवडून देण्यास प्रवृत्त केले जी त्यांच्यासाठी निर्णय घेऊ शकेल. इतरांनी सोपा मार्ग अंगीकारला; ते स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्याकरता शेजारच्या कनेक्टीकटला राहायला गेले.

ओटूल म्हणतात: “संधी, समृद्धता, लोकशाही हे सर्व, मॅसॅच्यूसेट्‌सच्या प्युरिटन लोकांच्या जीवनातील जोरदार प्रभाव होते. आणि सर्वांनी विन्थ्रॉपच्या सामूहिक कल्पनेला चुलीत ढकलून आपापल्या इच्छा-आकांक्षा पूर्ण केल्या.” सन १६४९ मध्ये वयाच्या ६१ व्या वर्षी विन्थ्रॉपचा मृत्यू झाला तेव्हा त्याच्याजवळ एक नया पैसाही नव्हता. विन्थ्रॉपने स्थापिलेल्या वसाहतीला पुष्कळ संकटांना सामोरे जावे लागले असले तरी, विन्थ्रॉपला मात्र एका उदात्त जगाचे आपले स्वप्न पूर्ण करता आले नाही.

शोध चालू राहतो

उदात्त जगाचे स्वप्न पाहणारा जॉन विन्थ्रॉपच एकमात्र मनुष्य नव्हता. आफ्रिका, आग्नेय आशिया, पूर्व युरोप आणि लॅटिन अमेरिकेहून लाखो लोक उत्तम जीवनाच्या शोधात स्थलांतर करतात. यांतील काहींना, श्रीमंत होण्याची गुरूकिल्ली काय आहे हे सांगणाऱ्‍या दरवर्षी तयार होणाऱ्‍या नवनवीन पुस्तकांतून, परिषदांमधून व वेबसाईट्‌समधून प्रेरणा मिळते. अजूनही पुष्कळ लोक, नीतिमूल्यांचा त्याग न करता पैसा मिळवण्यासाठी झटत आहेत.

स्पष्टतः, याचा परिणाम मात्र निराशजनकच आहे. जे संपत्ती मिळवू पाहतात ते बहुतेकदा आपल्या नीतितत्त्वांचा आणि देवावरील त्यांच्या विश्‍वासाचा धनसंपत्तीच्या वेदीवर बलि चढवतात. त्यामुळे तुमच्या मनात असा प्रश्‍न येऊ शकतो: “एक व्यक्‍ती श्रीमंत असण्यासोबत खरी ख्रिस्ती व्यक्‍ती असू शकते का? भौतिकरीत्या आणि आध्यात्मिकरीत्या संपन्‍न असलेला देव-भीरू मानवसमाज कधी असेल का?” पुढील लेखात दाखवल्याप्रमाणे बायबल या प्रश्‍नांची उत्तरे देते. (w०६ २/१)

[तळटीप]

^ परि. 3 १६ व्या शतकात, चर्च ऑफ इंग्लंडमधून उदयास आलेल्या प्रॉटेस्टंट पंथीयांना प्युरिटन असे नाव देण्यात आले. रोमन कॅथलिक प्रभावाच्या सर्व लवलेशापासून त्यांना आपले चर्च शुद्ध करायचे होते.

[३ पानांवरील चित्राचे श्रेय]

जहाज: The Complete Encyclopedia of Illustration/J. G. Heck; विन्थ्रॉप: Brown Brothers