यहोवाच्या सहनशीलतेचे अनुकरण करा
यहोवाच्या सहनशीलतेचे अनुकरण करा
“प्रभु आपल्या वचनाविषयी [विलंब] करीत नाही, तर तो तुमचे धीराने सहन करितो.”—२ पेत्र ३:९.
१. यहोवाने मानवांना कोणते अतुलनीय वरदान देऊ केले आहे?
यहोवाने आपल्याला असे काहीतरी देऊ केले आहे जे इतर कोणीही देऊ शकत नाही. ते अतिशय हवेहवेसे आणि मोलवान आहे, पण ते विकत घेता येत नाही किंवा स्वतःच्या बळावर मिळवता येत नाही. ते म्हणजे, सार्वकालिक जीवनाचे वरदान. आपल्यापैकी बहुतेकजण पृथ्वीवरील परादिसात हे अनंत जीवन उपभोगू शकतील. (योहान ३:१६) किती हर्षदायी असेल ते जीवन! आपल्याला नितान्त दुःख देणाऱ्या गोष्टी—लढाया, हिंसाचार, दारिद्र्य, गुन्हेगारी, रोगराई, इतकेच काय मृत्यू देखील, कायमचा नाहीसा झालेला असेल. सर्व लोक देवाच्या राज्याच्या प्रेमळ शासनाधीन परिपूर्ण शांती व सलोख्याने राहतील. त्या परादिसाची आपण किती आतुरतेने वाट पाहात आहोत!—यशया ९:६, ७; प्रकटीकरण २१:४, ५.
२. यहोवाने अद्यापही सैतानाच्या जगाचा नाश का केला नाही?
२ या पृथ्वीवर परादीस स्थापन करण्याच्या काळाची यहोवा देखील वाट पाहात आहे. कारण, त्याला नीती व न्याय ही प्रिय आहेत. (स्तोत्र ३३:५) त्याच्या नीतिमान तत्त्वांकडे दुर्लक्ष करणाऱ्या, ही तत्त्वे धुडकावून लावणाऱ्या, तसेच त्याच्या अधिकाराला तुच्छ लेखणाऱ्या व त्याच्या लोकांचा छळ करणाऱ्या या जगाकडे नुसते पाहात राहण्यात त्याला आनंद वाटत नाही. तरीपण, आजपर्यंत त्याने सैतानाच्या या दुष्ट जगाचा नाश का केला नाही यामागे काही महत्त्वाची कारणे आहेत. ही कारणे त्याच्या सार्वभौमत्त्वाशी संबंधित असलेल्या नैतिक वादविषयांशी निगडीत आहेत. हे वादविषय कायमचे मिटवण्याकरता, यहोवा एक अतिशय मनोहर गुण प्रदर्शित करतो. हा असा एक गुण आहे की जो आज बहुतेक लोकांजवळ नाही—सहनशीलता.
३. (क) बायबलमध्ये “सहनशीलता” असे भाषांतर केलेल्या ग्रीक व इब्री शब्दांचा काय अर्थ होतो? (ख) आता आपण कोणत्या प्रश्नांविषयी चर्चा करणार आहोत?
३ एका विशिष्ट ग्रीक शब्दाचा नवे जग भाषांतर (इंग्रजी) यात तीन वेळा “सहनशीलता” असा अनुवाद केला आहे. याचा शब्दशः अर्थ, “आत्म्याची दीर्घता” असा असून, अनेकदा या शब्दाचे “संयम” आणि एकदा “धीर धरणे” असे भाषांतर केलेले आढळते. इब्री व ग्रीक या दोन्ही भाषांत “सहनशीलता” याकरता असलेल्या शब्दांत सोशीकता आणि मंदक्रोध या अर्थछटांचा समावेश आहे. यहोवाच्या सहनशीलतेमुळे आपल्याला कोणता फायदा होतो? यहोवाच्या व त्याच्या विश्वासू सेवकांच्या सहनशीलतेपासून आपण कोणते धडे शिकू शकतो? यहोवाच्या सहनशीलतेलाही सीमा आहे असे आपण का म्हणू शकतो? याविषयी आता चर्चा करू या.
यहोवाची सहनशीलता समजून घ्या
४. यहोवाच्या सहनशीलतेसंबंधी प्रेषित पेत्राने काय लिहिले?
४ यहोवाच्या सहनशीलतेबद्दल प्रेषित पेत्राने लिहिले: “प्रियजनहो, ही एक गोष्ट तुम्ही विसरू नका की, प्रभूला एक दिवस हजार वर्षांसारखा आहे आणि हजार वर्षे एका दिवसासारखी आहेत. कित्येक लोक ज्याला विलंब म्हणून म्हणतात तसा विलंब प्रभु आपल्या वचनाविषयी करीत नाही, तर तो तुमचे धीराने सहन करितो; कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्चात्ताप करावा अशी आहे.” (२ पेत्र ३:८, ९) येथे दिलेल्या दोन मुद्द्यांकडे लक्ष द्या, जे आपल्याला यहोवाच्या सहनशीलतेविषयी समजून घेण्यास मदत करतात.
५. काळाकडे यहोवा ज्या दृष्टीने पाहतो त्यामुळे त्याच्या कार्यांवर कसा परिणाम होतो?
५ पहिला मुद्दा असा आहे की आपण काळाकडे ज्या दृष्टीने पाहतो त्या दृष्टीने यहोवा पाहात नाही. तो अनादिअनंत असल्यामुळे त्याच्या दृष्टीने हजार वर्षे एका दिवसाप्रमाणे आहेत. त्याच्यावर काळाचे बंधन नाही, पण तरीसुद्धा तो कार्य करण्यास विलंब लावत नाही. त्याच्याजवळ असीम बुद्धी असल्यामुळे सर्व संबंधित व्यक्तींच्या हिताकरता कार्य करण्याची सर्वात उत्तम वेळ कोणती हे त्याला नेमके माहीत आहे आणि ती वेळ येईपर्यंत तो धीर धरतो. पण या मधल्या काळात त्याच्या सेवकांना जे दुःख सोसावे लागते त्याबद्दल यहोवाला काहीच वाटत नाही असे आपण कधीही समजू नये. तो ‘परम दया’ दाखवणारा देव, प्रेमाचे साक्षात रूप आहे. (लूक १:७८; १ योहान ४:८) या तात्पुरत्या काळासाठी दुःखाला अनुमती दिल्यामुळे जे काही नुकसान झाले असेल ते पूर्णपणे व कायमचे भरून काढण्याचे सामर्थ्य त्याच्याजवळ आहे.—स्तोत्र ३७:१०.
६. देवाबद्दल आपण कोणता निष्कर्ष काढू नये आणि का?
६ अर्थात, एखाद्या गोष्टीची आपल्याला उत्कंठा असते तेव्हा ती मिळेपर्यंत थांबून राहणे साहजिकच सोपे नसते. (नीतिसूत्रे १३:१२) म्हणूनच, एखादी व्यक्ती जेव्हा दिलेला शब्द लगेच पूर्ण करत नाही तेव्हा इतरजण कदाचित असा निष्कर्ष काढू शकतात, की तिचा तसे करण्याचा इरादाच नाही. देवाबद्दल असा विचार करणे किती निर्बुद्धपणाचे ठरेल! जर देवाच्या सहनशीलतेला आपण विलंब समजू लागलो, तर काळाच्या ओघात आपण शंकाकुशंकांना व निराशेला सहज बळी पडू शकतो आणि शिवाय, आध्यात्मिकरित्या उदासीन होण्याचाही धोका आहे. आणि त्याहीपेक्षा वाईट म्हणजे, पेत्राने आधी ज्या थट्टेखोर, व विश्वासहीन लोकांबद्दल ताकीद दिली होती त्यांच्या कह्यात आपण येऊ शकतो. हे लोक उपहासाने म्हणतात: “त्याच्या येण्याचे वचन आता कोठे आहे? कारण वाडवडील निजले तेव्हांपासून सर्व कांही उत्पत्तीच्या प्रारंभापासून होते तसेच चालू आहे.”—२ पेत्र ३:४.
७. लोकांनी पश्चात्ताप करावा या यहोवाच्या इच्छेशी त्याच्या सहनशीलतेचा कसा संबंध आहे?
७ पेत्राच्या शब्दांतील लक्ष देण्याजोगा दुसरा मुद्दा म्हणजे, यहोवा धीराने सहन यासाठी करतो की सर्वांनी पश्चात्ताप करावा अशी त्याची इच्छा आहे. जे आपल्या वाईट मार्गांतून मागे फिरण्यास उद्दामपणे नकार देतात त्यांचा यहोवा नाश करेल. पण दुष्ट व्यक्तीच्या मरणाने देवाला आनंद होत नाही. उलट या लोकांनी पश्चात्ताप करून आपले वाईट मार्ग सोडून द्यावे व जिवंत राहावे यात यहोवाला संतोष वाटतो. (यहेज्केल ३३:११) म्हणूनच, यहोवा धीराने सहन करत आहे आणि सबंध पृथ्वीवर सुवार्ता घोषित करण्याकरता आपल्या सेवकांना पाठवत आहे जेणेकरून लोकांना जिवंत राहण्याची संधी मिळावी.
८. इस्राएल राष्ट्रासोबत देवाने ज्याप्रकारे व्यवहार केला त्यावरून त्याची सहनशीलता कशी दिसून आली?
८ देवाची सहनशीलता, इस्राएलच्या प्राचीन राष्ट्राशी त्याने ज्याप्रकारे व्यवहार केला त्यावरूनही दिसून येते. कित्येक शतके त्याने त्यांचा आज्ञाभंग खपवून घेतला. आपल्या संदेष्ट्यांना पाठवून त्याने वारंवार त्यांना विनवणी केली: “तुम्ही आपले वाईट मार्ग सोडून तुमच्या पूर्वजांस जे सगळे धर्मशास्त्र मी विहित करून माझे सेवक संदेष्टे यांच्या हाती तुम्हाकडे पाठविले होते त्यास अनुसरून माझ्या आज्ञा व नियम” पाळा. याचा काय परिणाम झाला? दुःखाची गोष्ट म्हणजे, या लोकांनी ‘ऐकले नाही.’—२ राजे १७:१३, १४.
९. येशूने आपल्या पित्याची सहनशीलता कशाप्रकारे हुबेहूब व्यक्त केली?
९ शेवटी यहोवाने आपल्या पुत्राला पाठवले, ज्याने या यहुद्यांना देवाशी समेट करण्यास प्रवृत्त करण्याचा अथक प्रयत्न केला. येशूने आपल्या पित्याची सहनशीलता हुबेहूब व्यक्त केली. आपल्याला लवकरच ठार मारले जाणार आहे हे माहीत असल्यामुळे येशू दुःखाने म्हणाला: “यरूशलेमे, यरूशलेमे, संदेष्ट्यांचा घात करणाऱ्ये, व तुझ्याकडे पाठविलेल्यांस धोंडमार करणाऱ्ये! जशी कोंबडी आपली पिले पंखाखाली एकवटते, तसे तुझ्या मुलाबाळांना एकवटावयाची कितीदा तरी माझी इच्छा होती, पण तुमची इच्छा नव्हती!” (मत्तय २३:३७) हे हृदयस्पर्शी शब्द शिक्षा देण्यास उत्सुक असलेल्या निष्ठूर न्यायाधीशाचे नव्हे तर सहनशीलतेने वागणाऱ्या प्रेमळ मित्राचे आहेत. स्वर्गातील आपल्या पित्याप्रमाणेच, येशूचीही अशीच इच्छा होती की लोकांनी पश्चात्ताप करावा व नाशापासून स्वतःला वाचवावे. काहींनी येशूच्या इशाऱ्यांकडे लक्ष दिले व योग्य पावले उचलली आणि त्यामुळे सा.यु. ७० साली जेरूसलेमवर आलेल्या भयानक न्यायदंडातून ते बचावले.—लूक २१:२०-२२.
१०. देवाच्या सहनशीलतेमुळे आपल्याला कोणता फायदा झाला आहे?
१० देवाची सहनशीलता खरोखरच अद्भूत नाही का? मनुष्याने इतक्या मोठ्या प्रमाणावर आज्ञाभंग केला असला तरीपण यहोवाने इतर लाखो लोकांसोबत आपल्यापैकी प्रत्येकाला, त्याला जाणून घेण्याची व तारणाची आशा स्वीकारण्याची संधी दिली आहे. पेत्राने सहख्रिस्ती बांधवांना लिहिले: “आपल्या प्रभूची सहनशीलता तारणच आहे असे समजा.” (२ पेत्र ३:१५) यहोवाच्या सहनशीलतेमुळे आपल्याकरता तारणाचा मार्ग मोकळा झाला आहे याबद्दल आपण कृतज्ञ नाही का? आणि पुढेही, यहोवाची सेवा करत असताना, त्याने दररोज आपल्यासोबत सहनशील असावे अशीच आपली प्रार्थना नाही का?—मत्तय ६:१२.
११. यहोवाची सहनशीलता समजून घेतल्यामुळे आपल्याला काय करण्याची प्रेरणा मिळते?
११ यहोवा का धीराने सहन करतो हे जेव्हा आपण समजून घेतो, तेव्हा तो आपल्या प्रतिज्ञा पूर्ण करण्यास विलंब लावत आहे असा निष्कर्ष कधीही न काढता, त्याच्या तारणाकरता धीराने थांबून राहण्यास मदत मिळते. (विलापगीत ३:२६) देवाचे राज्य यावे अशी आपण सदोदीत प्रार्थना करतो, पण या प्रार्थनेचे उत्तर देण्याची सगळ्यात उत्तम वेळ कोणती हे देवाला माहीत आहे याची आपल्याला पक्की खात्री आहे. शिवाय, आपल्या बांधवांशी व ज्यांना आपण प्रचार करतो त्या लोकांशी व्यवहार करताना देवासारखीच सहनशीलता दाखवण्यास आपण प्रेरित होतो. आपलीही अशीच इच्छा आहे की कोणाचाही नाश होऊ नये तर त्यांनी पश्चात्ताप करावा व आपल्यासारखीच त्यांनाही सार्वकालिक जीवनाची आशा मिळावी.—१ तीमथ्य २:३, ४.
संदेष्ट्यांची सहनशीलता समजून घेणे
१२, १३. याकोब ५:१० याच्या सामंजस्यात, संदेष्टा यशयाने कशाप्रकारे सहनशीलता दाखवली?
१२ यहोवाची सहनशीलता समजून घेतल्यामुळे आपल्याला हा गुण किती महत्त्वाचा आहे याची जाणीव होते आणि तो उत्पन्न करण्यास साहाय्य मिळते. अपरिपूर्ण मानवांकरता सहनशीलता उत्पन्न करणे तितके सोपे नसले तरी, ते अशक्य मुळीच नाही. हे आपल्याला देवाच्या प्राचीन काळातील सेवकांच्या उदाहरणावरून समजते. शिष्य याकोबाने लिहिले: “बंधूंनो, जे संदेष्टे प्रभूच्या नांवाने बोलले त्यांचे दुखःसहन व त्यांचा धीर ह्यांविषयीचा कित्ता घ्या.” (याकोब ५:१०) आपल्याला जे सोसावे लागते, तेच इतरांनी यशस्वीपणे सोसले आहे हे जाणून आपल्याला सांत्वन व प्रोत्साहन मिळते.
१३ उदाहरणार्थ, संदेष्टा यशया याला यहोवाने जे कार्य नेमले होते ते करण्याकरता त्याला नक्कीच सहनशीलतेची गरज होती. यहोवाने स्वतःच त्याला सांगितले होते: “जा, या लोकांस सांग की ऐकत राहा पण समजू नका, पाहत राहा, पण जाणू नका. ह्या लोकांनी डोळ्यांनी पाहून, कानांनी ऐकून व मनाने समजून मजकडे वळून सुधारू नये म्हणून त्यांचे हृदय जड कर, त्यांचे कान बधिर कर व त्यांचे डोळे चिपडे कर.” (यशया ६:९, १०) लोकांनी लक्ष दिले नाही तरीसुद्धा यशया धीराने यहोवाचे इशारेवजा संदेश एकदोन नव्हे तर ४६ वर्षे घोषित करत राहिला! त्याचप्रकारे, आज बरेच लोक प्रतिसाद देत नसले तरीसुद्धा, सहनशीलतेचा गुण आपल्यालाही सुवार्ता घोषित करण्याच्या आपल्या कार्यात धीराने टिकून राहण्यास साहाय्य करेल.
१४, १५. यिर्मयाला संकटांना व निराशेला तोंड देण्याकरता कशामुळे मदत मिळाली?
१४ अर्थात, या संदेष्ट्यांना आपले सेवाकार्य करताना केवळ लोकांच्या थंड प्रतिसादालाच तोंड द्यावे लागले असे नाही; त्यांना छळही सोसावा लागला. यिर्मयाला खोड्यांत अडकवून ठेवण्यात आले, ‘अटकेत ठेवण्यात आले’ आणि एका विहिरीत टाकण्यात आले. (यिर्मया २०:२; ३७:१५; ३८:६) आणि हा सगळा छळ त्याला त्याच लोकांकडून सहन करावा लागला की ज्यांना तो मदत करू इच्छित होता. तरीसुद्धा, यिर्मया रागावला नाही किंवा तो जशास तसे वागला नाही. तर त्याने कित्येक दशके हा छळ धीराने सहन केला.
१५ छळ व थट्टा झाली तरी यिर्मयाने यहोवाचे संदेश घोषित करण्याचे थांबवले नाही आणि आज आपणही या कारणांमुळे आपले कार्य थांबवत नाही. अर्थात कधीकधी आपणही निराश होतो. यिर्मयाही एके प्रसंगी निराश झाला होता. त्याने लिहिले: “दिवसभर परमेश्वराचे वचन माझ्या निंदेला व अप्रतिष्ठेला कारण झाले आहे. मी म्हणालो, मी त्याचे नाव काढणार नाही, यापुढे मी त्याच्या नावाने बोलणार नाही.” मग काय झाले? यिर्मयाने आपले प्रचार कार्य थांबवले का? त्याने पुढे म्हटले: “माझ्या हाडात कोंडलेला अग्नि जळत आहे असे [देवाचे वचन] माझ्या हृदयाला झाले; मी स्वतःला आवरिता आवरिता थकलो, पण मला ते साधेना.” (यिर्मया २०:८, ९) जेव्हा त्याने लोकांच्या थट्टेकडे लक्ष केंद्रित केले तेव्हा तो आपला आनंद गमावून बसला. पण जेव्हा त्याने देवाचा संदेश किती अद्भुत व महत्त्वपूर्ण आहे याचा विचार केला तेव्हा तो पुन्हा आनंदी झाला. शिवाय, यहोवा “पराक्रमी वीराप्रमाणे” यिर्मयासोबत होता व त्याने देवाचे वचन आवेशाने व धैर्याने घोषित करावे म्हणून यहोवा त्याला सामर्थ्य देत राहिला.—यिर्मया २०:११.
१६. आपल्या सुवार्तेच्या प्रचार कार्यात आपण आपला आनंद कसा टिकवून ठेवू शकतो?
१६ संदेष्टा यिर्मयाला आपल्या कामात संतुष्टी मिळाली का? निश्चितच मिळाली! त्याने यहोवाला म्हटले: “मला तुझी वचने प्राप्त झाली ती मी स्वीकारली; तुझी वचने माझा आनंद, माझ्या जिवाचा उल्लास अशी होती; कारण हे परमेश्वरा, . . . तुझे नाम घेऊन मी आपणास तुझा म्हणवितो.” (यिर्मया १५:१६) खऱ्या देवाच्या वतीने कार्य करण्याचा व त्याचे वचन घोषित करण्याचा बहुमान आपल्याला मिळाला आहे याचा यिर्मयाला आनंद वाटला. आपणही आनंदी होऊ शकतो. शिवाय, सबंध जगात अधिकाधिक लोक राज्याच्या संदेशाचा स्वीकार करून, पश्चात्ताप करत आहेत व सार्वकालिक जीवनाच्या मार्गावर येत आहेत याबद्दल स्वर्गातील देवदूतांप्रमाणे आपणही आनंद मानतो.—लूक १५:१०.
‘ईयोबाचा धीर’
१७, १८. ईयोबाने कशाप्रकारे धीर धरला आणि याचा काय परिणाम झाला?
१७ प्राचीन काळातील संदेष्ट्यांबद्दल सांगितल्यावर शिष्य याकोबाने लिहिले: “तुम्ही ईयोबाच्या धीराविषयी ऐकले आहे, आणि त्याच्याविषयीचा प्रभूचा जो हेतु होता तो तुम्ही पाहिला आहे ह्यावरून ‘प्रभु फार कनवाळू व दयाळू’ आहे हे तुम्हास दिसून आले.” (याकोब ५:११) येथे ‘धीर’ असे भाषांतर केलेल्या ग्रीक शब्दाचा अर्थ, याआधीच्या वचनात याकोबाने वापरलेल्या ‘सहन करणे’ या शब्दप्रयोगाशी मिळताजुळता आहे. या दोन शब्दांतील फरक दाखवताना एका विद्वानाने असे लिहिले: “आधीचा शब्द इतर लोक आपल्याशी दुर्व्यवहार करतात तेव्हा तो सहन करण्यास सूचित करतो; तर नंतरचा शब्द दुःखदायी परिस्थितीला धैर्याने तोंड देण्याला व अशा परिस्थितीत टिकून राहण्याला सूचित करतो.”
१८ ईयोबाला कमालीचे दुःख सहन करावे लागले. तो कंगाल झाला, त्याच्या मुलांचा मृत्यू झाला आणि त्याला एका वेदनामय रोगाने ग्रासले. शिवाय यहोवानेच तुला शिक्षा दिली आहे असे आरोपही त्याला झेलावे लागले. ईयोबाने आपले दुःख व्यक्त केले नाही अशातला भाग नाही; त्याने आपल्या परिस्थितीविषयी विलाप केला आणि आपण देवापेक्षा जास्त नीतिमान आहोत असेही त्याने सुचवले. (ईयोब ३५:२) पण, हे सर्व असूनही त्याने आपला विश्वास मात्र गमावला नाही आणि शेवटपर्यंत त्याने देवाला सोडले नाही. सैतानाने म्हटल्याप्रमाणे, त्याने देवाचा अव्हेर केला नाही. (ईयोब १:११, २१) याचा काय परिणाम झाला? “परमेश्वराने ईयोबाचे उत्तरवय पूर्ववयाहून अधिक सुखसंपन्न केले.” (ईयोब ४२:१२) यहोवाने ईयोबाला निरोगी बनवले, त्याला दुप्पट धनसंपत्ती दिली आणि आपल्या प्रिय जनांसोबत सुखासमाधानाने नांदण्याचा आशीर्वाद दिला. ईयोबाने आपले संकट विश्वासूपणे सहन केल्यामुळे त्याला यहोवाची अधिक जवळून ओळख घडली.
१९. ईयोबाने ज्याप्रकारे धीराने सहन केले त्यावरून आपण काय शिकू शकतो?
१९ ईयोबाच्या धीरापासून आपण कोणता धडा घेऊ शकतो? ईयोबाप्रमाणे आपल्यालाही आजारपण किंवा इतर कठीण परिस्थितीला तोंड द्यावे लागू शकते. एखादी विशिष्ट परीक्षा यहोवा आपल्याला का सहन करायला लावत आहे हे आपल्याला समजत नसेल. तरीपण एका गोष्टीची आपण खात्री बाळगू शकतो: जर आपण विश्वासू राहिलो तर आपल्याला आशीर्वाद मिळतील. जे यहोवाचा झटून शोध करतात त्यांना तो प्रतिफळ दिल्याशिवाय राहात नाही. (इब्री लोकांस ११:६) येशूने म्हटले: “जो शेवटपर्यंत टिकून राहील तोच तरेल.”—मत्तय १०:२२; २४:१३.
“प्रभूचा दिवस येईल”
२०. यहोवाचा दिवस येईल याबद्दल आपण आश्वस्त का राहू शकतो?
२० यहोवा सहनशील असला तरी तो न्यायीही आहे आणि त्याअर्थी तो दुष्टाई सर्वकाळ सहन करणार नाही. त्याच्या सहनशक्तीला सीमा आहेत. पेत्राने लिहिले: “[देवाने] प्राचीन जगाचीहि गय केली नाही.” नोहा व त्याच्या कुटुंबाला तर जिवंत बचावण्यात आले, पण त्याकाळचे अधार्मिक जग मात्र जलप्रलयात वाहून गेले. यहोवाने सदोम व गमोरा यांच्यावरही न्यायदंड आणला व त्यांना भस्म केले. हे न्यायदंड “पुढे होणाऱ्या अभक्तांस उदाहरण देण्यासाठी” होते. तेव्हा “प्रभूचा दिवस येईल” याबद्दल आपण आश्वस्त राहू शकतो.—२ पेत्र २:५, ६; ३:१०.
२१. आपण धीर व सहनशीलता कशी दाखवू शकतो आणि पुढच्या लेखात आपण काय पाहणार आहोत?
२१ तर मग, इतरांचेही तारण व्हावे म्हणून त्यांना पश्चात्ताप करण्यास साहाय्य करण्याद्वारे आपण यहोवाच्या धीराचे अनुकरण करू या. तसेच, प्रचार कार्यात जरी लोकांनी थंड प्रतिसाद दिला तरीसुद्धा धीराने सुवार्ता घोषित करत राहण्याद्वारे आपण संदेष्ट्यांचेही अनुकरण करू या. शिवाय कठीण परिस्थितीत ईयोबाप्रमाणे जर आपण धीराने सहन केले व यहोवाला विश्वासू राहिलो तर आपण खात्री बाळगू शकतो की यहोवा आपल्याला अनेक आशीर्वाद देईल. आपले सेवाकार्य आनंदाने करत राहण्याचे एक चांगले कारण आपल्याजवळ आहे; ते म्हणजे, सबंध पृथ्वीवर सुवार्तेचा प्रचार करण्यासाठी यहोवाचे लोक जे परिश्रम घेत आहेत त्यावर त्याने विपूल आशीर्वाद दिला आहे. याविषयी पुढच्या लेखात आपण चर्चा करणार आहोत. (w०६ २/१)
तुम्हाला आठवते का?
• यहोवा का धीराने सहन करतो?
• संदेष्ट्यांच्या धीरापासून आपण काय शिकू शकतो?
• ईयोबाने कशाप्रकारे धीराने सहन केले आणि त्याचा काय परिणाम झाला?
• यहोवाच्या सहनशक्तीलाही सीमा आहेत हे आपल्याला कशावरून समजते?
[अभ्यासाचे प्रश्न]
[२२ पानांवरील चित्र]
येशूने आपल्या पित्याच्या सहनशीलतेचे हुबेहूब अनुकरण केले
[२४ पानांवरील चित्रे]
यहोवाने यिर्मयाच्या सहनशीलतेवर कशाप्रकारे आशीर्वाद दिला?
[२५ पानांवरील चित्रे]
ईयोबाच्या धीराबद्दल यहोवाने त्याला काय प्रतिफळ दिले?