व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

खरा आनंद देणारे निकोप मनोरंजन

खरा आनंद देणारे निकोप मनोरंजन

खरा आनंद देणारे निकोप मनोरंजन

“तुम्ही खाता, पिता किंवा जे काही करिता ते सर्व देवाच्या गौरवासाठी करा.”—१ करिंथकर १०:३१.

१, २. आनंदाचा उपभोग ही “देवाची देणगी” आहे असे आपण का म्हणू शकतो, पण बायबलमध्ये कोणता स्पष्ट इशारा देण्यात आला आहे?

 आपल्याला ज्या गोष्टी करण्यात आनंद वाटतो त्या कराव्याशा वाटणे स्वाभाविक आहे. आपला देव यहोवा आनंदी देव आहे. आपण जीवनाचा उपभोग घ्यावा असे त्याला वाटते. आणि आपल्याला असे करता यावे म्हणून तो अनेक गोष्टी आपल्याला उदारतेने पुरवतो. (१ तीमथ्य १:११, NW; ६:१७) सुज्ञ राजा शलमोन याने लिहिले: “मनुष्यांनी आमरण सुखाने राहावे . . . यापरते इष्ट त्यांस काही नाही हे मला कळून आले आहे. तरी प्रत्येक मनुष्याने खावे, प्यावे व आपला सर्व उद्योग करून सुख मिळवावे हीहि देवाची देणगी आहे.”—उपदेशक ३:१२, १३.

आपल्या मेहनतीचे फळ उपभोगण्याकरता, प्रिय माणसांच्या सहवासात मौजमजा करणे खरोखरच आनंददायक आहे. ही “देवाची देणगी” आहे असे म्हणणे योग्यच आहे. पण, सृष्टीकर्त्याने आपल्या आनंदाकरता विपुलतेने सर्व काही पुरवले आहे याचा अर्थ आपण अगदी अनिर्बंधपणे सुखोपभोग घेण्यास मोकळे आहोत, असा याचा अर्थ होत नाही. अतिमद्यपान, आधाशीपणा व अनैतिकता या गोष्टींची बायबलमध्ये निंदा करण्यात आली आहे आणि जे या गोष्टी आचरतात त्यांना “देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही” असा इशाराही त्यात देण्यात आला आहे.—१ करिंथकर ६:९, १०; नीतिसूत्रे २३:२०, २१; १ पेत्र ४:१-४.

३. आध्यात्मिकरित्या जागरूक राहण्यास व जवळ येऊन ठेपलेला यहोवाचा महान दिवस सतत डोळ्यासमोर ठेवण्यास कोणती गोष्ट आपले साहाय्य करील?

या शेवटल्या कठीण काळात ख्रिश्‍चनांना एका विशेष आव्हानाला तोंड द्यावे लागते. ते आव्हान म्हणजे, या जगाच्या नीतिभ्रष्ट चालीरितींचा अवलंब न करता त्यात राहणे. (योहान १७:१५, १६) पूर्वभाकीत करण्यात आल्यानुसार, आजच्या पिढीची माणसे “देवावर प्रेम करण्याऐवजी सुखविलासाची आवड धरणारी” झाली आहेत. सुखविलासात ती इतकी बुडाली आहेत, की “मोठे संकट” अगदी जवळ येऊन ठेपले आहे तरीसुद्धा त्यांना ‘समजत नाही.’ (२ तीमथ्य ३:४, ५; मत्तय २४:२१, ३७-३९) येशूने आपल्या अनुयायांना अशी ताकीद दिली होती: “संभाळा, नाहीतर कदाचित अधाशीपणा, दारूबाजी व संसाराच्या चिंता ह्‍यांनी तुमची अंतःकरणे भारावून जाऊन तो दिवस तुम्हावर पाशाप्रमाणे अकस्मात येईल; कारण तो अवघ्या पृथ्वीच्या पाठीवर राहणाऱ्‍या सर्व लोकांवर त्याप्रमाणेच येईल.” (लूक २१:३४, ३५) देवाचे सेवक या नात्याने, येशूने दिलेल्या या धोक्याच्या सूचनेकडे आपण लक्ष देऊ इच्छितो. आपल्या भोवतालच्या अधार्मिक जगातल्या लोकांप्रमाणे आपण होऊ इच्छित नाही, तर आपण आध्यात्मिकरित्या जागरूक राहण्याचा कसोशीने प्रयत्न करतो आणि यहोवाचा महान दिवस सतत डोळ्यासमोर ठेवतो.—सफन्या ३:८; लूक २१:३६.

४. (क) चांगल्या प्रकारचे मनोरंजन इतके दुर्मिळ का झाले आहे? (ख) इफिसकर ५:१५, १६ यात दिलेल्या कोणत्या सल्ल्याचे आपण पालन करू इच्छितो?

या जगाच्या वाईट गोष्टी टाळणे तितके सोपे नाही. कारण दियाबल या गोष्टी अतिशय आकर्षक आणि सहज उपलब्ध होतील अशा रूपात आपल्यापुढे ठेवतो. मनोरंजनाची निवड करताना आपल्याला ही समस्या अतिशय प्रकर्षाने जाणवते. आजच्या जगात उपलब्ध असणारे मनोरंजन अधिककरून ‘दैहिक वासना’ तृप्त करण्याच्या उद्देशानेच निर्माण केलेले असते. (१ पेत्र २:११) आणि हे वाईट मनोरंजन सार्वजनिक ठिकाणी तर उपलब्ध असतेच, शिवाय मासिकापुस्तकांच्या, टीव्हीच्या, इंटरनेटच्या व व्हिडिओंच्या माध्यमाने त्याचा आता घरांघरात शिरकाव झाला आहे. म्हणूनच देवाचे वचन ख्रिश्‍चनांना हा सूज्ञ सल्ला देते: “अज्ञान्यासारखे नव्हे तर ज्ञान्यासारखे सभोवार नजर ठेवून जपून चाला. वेळेचा सदुपयोग करा, कारण दिवस वाईट आहेत.” (इफिसकर ५:१५, १६) या सल्ल्याचे गांभीर्याने पालन करणे अतिशय महत्त्वाचे आहे; नाहीतर, कदाचित आपणही या जगातल्या वाईट मनोरंजनाकडे आकर्षित होऊ, त्यात गढून जाऊ; हो, अगदी यहोवासोबत आपला नातेसंबंध तुटून जाण्याइतपत त्यात रममाण होऊ. असे घडल्यास, शेवटी आपला नाश होईल!—याकोब १:१४, १५.

५. आपल्याला सर्वात जास्त आनंद कशामुळे मिळतो?

खिश्‍चनांना जीवनात बऱ्‍याच जबाबदाऱ्‍या पार पाडाव्या लागतात. त्यामुळे साहजिकच वेळोवेळी त्यांना विरंगुळ्याची गरज भासते. उपदेशक ३:४ या वचनात सांगितल्यानुसार “हसण्याचा समय” व “नृत्य करण्याचा समय” असतो. त्याअर्थी मनोरंजन म्हणजे केवळ वेळेचा अपव्यय आहे असे बायबल सांगत नाही. पण मनोरंजन असे असावे की ज्यामुळे आपल्याला तजेला मिळेल; आपल्या आध्यात्मिकतेवर त्याचा अनिष्ट परिणाम होऊ नये किंवा आपल्या आध्यात्मिक कार्यांत त्यामुळे व्यत्यय येऊ नये. अनुभवी ख्रिश्‍चनांना जाणीव आहे की इतरांना दिल्याने जास्त आनंद मिळतो. त्यामुळे ते यहोवाची इच्छा पूर्ण करण्याला आपल्या जीवनात प्राधान्य देतात; येशूचे सोयीचे जू स्वीकारल्यामुळे खऱ्‍या अर्थाने त्यांच्या “जिवास विसावा” मिळतो.—मत्तय ११:२९, ३०; प्रेषितांची कृत्ये २०:३५.

योग्य प्रकारचे मनोरंजन निवडणे

६, ७. विशिष्ट प्रकारचे मनोरंजन योग्य किंवा अयोग्य हे तुम्ही कशाच्या आधारावर ठरवू शकता?

विशिष्ट प्रकारचे मनोरंजन खऱ्‍या ख्रिश्‍चनांकरता योग्य आहे किंवा नाही हे आपण कसे ठरवू शकतो? याबाबतीत आईवडील आपल्या मुलांना मार्गदर्शन पुरवतात आणि आवश्‍यकता पडल्यास मंडळीतले वडीलही मदत पुरवतात. पण एखादे पुस्तक, चित्रपट, गेम, नृत्य, किंवा गीत ख्रिश्‍चनांकरता योग्य नाही हे कोणा दुसऱ्‍याने आपल्याला सांगण्याची खरे तर गरज पडायला नको. पौलाने म्हटले की “[प्रौढांच्या] ज्ञानेंद्रियांना वहिवाटीने चांगले आणि वाईट समजण्याचा सराव झाला आहे.” (इब्री लोकांस ५:१४; १ करिंथकर १४:२०) आपल्या मार्गदर्शनाकरता बायबलमध्ये अनेक तत्त्वे दिली आहेत. देवाच्या वचनानुसार आकार दिलेला तुमचा विवेकही तुम्हाला मदत करू शकतो, पण तुम्ही त्याचे ऐकले पाहिजे.—१ तीमथ्य १:१९.

येशूने म्हटले की “फळांवरून झाड कळते.” (मत्तय १२:३३) जर एखाद्या विशिष्ट प्रकारच्या मनोरंजनामुळे वाईट फळ, अर्थात हिंसा, अनैतिकता अथवा भूतविद्या यांच्याप्रती आकर्षण उत्पन्‍न होत असेल तर साहजिकच ते मनोरंजन आपल्याकरता नाही. तसेच जर एखाद्या प्रकारच्या मनोरंजनामुळे आपल्या जिवाला किंवा आपल्या आरोग्याला धोका असेल, जर त्यामुळे आर्थिक अडचणी किंवा निराशा उत्पन्‍न होत असेल किंवा जर इतरांना त्यामुळे अडखळण होत असेल तर ते आपल्याकरता योग्य नाही. प्रेषित पौलाने स्पष्ट ताकीद दिली की जर आपण आपल्या बांधवाच्या सद्‌सद्विवेकबुद्धीला धक्का देत असू तर आपण पाप करत आहोत. पौलाने लिहिले: “बंधुविरुद्ध असे पाप करून व त्यांच्या दुर्बळ सद्‌सद्विवेकबुद्धीला धक्का देऊन तुम्ही ख्रिस्ताविरुद्ध पाप करिता. म्हणून अन्‍नामुळे माझ्या बंधूला अडखळण होत असेल तर मी आपल्या बंधूला अडखळवू नये म्हणून मी मांस कधीच खाणार नाही.”—१ करिंथकर ८:१२, १३.

८. इलेक्ट्रॉनिक गेम्स व व्हिडिओंचा वापर करण्यात कोणते धोके आहेत?

बाजारांत हजारो प्रकारचे इलेक्ट्रॉनिक गेम्स व व्हिडिओ उपलब्ध आहेत. यांपैकी काही खरोखरच मनोरंजक असू शकतात, व त्यांत गैर म्हणता येईल असेही काही नसते. पण आज उपलब्ध असणाऱ्‍या बहुतेक गेम्स व व्हिडिओंमध्ये अशाच गोष्टींचा समावेश असतो की ज्या बायबलनुसार वाईट आहेत. एखाद्या गेममध्ये जर खेळणाऱ्‍यांना दुसऱ्‍यांना मारहाण करावी लागत असेल, त्यांना ठार मारावे लागत असेल किंवा अतिशय अनैतिक कृत्ये करावी लागत असतील तर असे गेम्स निव्वळ मनोरंजनाकरता आहेत, त्यांत गैर काही नाही असे नक्कीच म्हणता येणार नाही! ज्यांना जुलूम व हिंसा प्रिय आहे अशा लोकांचा यहोवाला वीट येतो. (स्तोत्र ११:५; नीतिसूत्रे ३:३१; कलस्सैकर ३:५, ६) जर एखादा गेम खेळल्यामुळे तुमच्या मनात लोभ किंवा आकसखोर वृत्ती उत्पन्‍न होत असेल, जर हा गेम खेळल्याने तुम्हाला भावनिकरित्या गळून गेल्यासारखे वाटत असेल, जर त्यामुळे तुमचा मौल्यवान वेळ वाया जात असेल तर तो आध्यात्मिकरित्या तुमचे नुकसान करू शकतो हे वेळीच ओळखा आणि लगेच आवश्‍यक पावले उचला.—मत्तय १८:८, ९.

विरंगुळ्याची गरज उचित मार्गांनी भागवणे

९, १०. विरंगुळ्याची गरज भागवण्याकरता विचारशील व्यक्‍ती कोणते पर्याय निवडू शकतात?

कधीकधी काही ख्रिस्ती बांधव विचारतात: “आजच्या जगातले बहुतेक मनोरंजनाचे प्रकार बायबलच्या आदर्शांच्या विरोधात जातात. मग उचित मनोरंजन शेवटी कशाला म्हणावे?” निर्भेळ आनंद देणारे मनोरंजन नक्कीच मिळवता येते, अर्थात त्याकरता तुम्हाला थोडी मेहनत घ्यावी लागेल. पूर्वविचार व पूर्वनियोजन करावे लागेल. खासकरून आईवडिलांना. बरीच कुटुंबे आपल्या कुटुंबाच्या व मंडळीतल्या बांधवांच्या सहवासात मनोरंजनाचा आनंद लुटतात. दिवसभर काय काय घडले याबद्दल किंवा बायबलच्या एखाद्या विषयावर चर्चा करता करता आरामशीर बसून भोजनाचा आस्वाद घेण्यातही एक निराळाच आनंद आहे. सहली, उचित खेळ, कॅम्प, किंवा ट्रेक्स आयोजित केले जाऊ शकतात. अशाप्रकारचे निकोप मनोरंजन खरोखरच आनंददायक ठरू शकते.

१० तीन मुलांचे पालक असणारे एक वडील व त्यांची पत्नी असे सांगतात: “सुटीला कुठे जायचे हे ठरवण्यात आम्ही आमच्या मुलांना लहानपणापासूनच सामील केलं. कधीकधी आम्ही प्रत्येक मुलाला सुटीला जाताना आपल्या एखाद्या चांगल्या मित्र किंवा मैत्रिणीलाही सोबत घेण्याची परवानगी देत असू. मुलांच्या जीवनातल्या महत्त्वाच्या घटनांना आम्ही नेहमी महत्त्व द्यायचो. कधीकधी, आम्ही आमच्या नातेवाईकांना व मंडळीतल्या स्नेह्‍यांना आमच्या घरी जेवायला येण्याचे निमंत्रण द्यायचो. कधीकधी बाहेर अंगणातच स्वयंपाक करून जेवायचा बेत करायचो व निरनिराळे गेम्स खेळायचो. कधीकधी डोंगरातल्या रम्य परिसरांत फेरफटका मारायला तर कधी गाडीने फिरायला जायचो; व अशा सहलींत यहोवाच्या सृष्टीबद्दल जास्त माहिती मिळवण्याचा प्रयत्न करायचो.”

११, १२. (क) अधूनमधून करमणुकीचे बेत आखताना तुम्हाला इतरांनाही कसे सामील करता येईल? (ख) कशाप्रकारचे प्रसंग अनेकांकरता अविस्मरणीय ठरले आहेत?

११ अधूनमधून करमणुकीकरता बेत आखताना, तुम्ही व्यक्‍तिशः किंवा कुटुंब मिळून आपल्या मित्रमंडळीचे वर्तुळ थोडे वाढवू शकता का? मंडळीतल्या एखाद्या विधवा भगिनीला, अविवाहित व्यक्‍तीला किंवा एकट्या कुटुंब चालवणाऱ्‍या आई किंवा वडिलांना प्रोत्साहनाची गरज असू शकते. (लूक १४:१२-१४) कदाचित तुम्हाला नव्यानेच मंडळीच्या सभांना येऊ लागलेल्या काही व्यक्‍तींनाही सामील करता येईल; अर्थात, असे करताना त्यांच्यामुळे इतरांवर वाईट प्रभाव पडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. (२ तीमथ्य २:२०, २१) जर काही बांधवांना घराबाहेर पडणे अशक्य असेल तर, एखाद्या वेळी जेवण तयार करून त्यांच्या घरी नेण्याची व त्यांच्यासोबत जेवण्याची व्यवस्था तुम्ही करू शकता का?—इब्री लोकांस १३:१, २.

१२ काहीजण साधासा जेवणाचा कार्यक्रम आयोजित करतात, ज्यात सहभाग घेणारे आपण सत्यात कसे आलो किंवा इतकी वर्षे विश्‍वासूपणे देवाची सेवा करणे आपल्याला कशामुळे शक्य झाले याविषयीचे अनुभव एकमेकांना सांगतात. अनेकजण सांगतात की अशाप्रकारचे कार्यक्रम बहुतेकदा अविस्मरणीय ठरतात. अशाप्रसंगी बायबलमधील एखाद्या विषयावर चर्चा केली जाऊ शकते व त्यात उपस्थित असणाऱ्‍या सर्वांना, लहान मुलांनासुद्धा भाग घेण्याचे प्रोत्साहन दिले जाऊ शकते. अशा चर्चांमुळे सर्वांना उत्तेजन मिळते आणि कोणाही एका व्यक्‍तीला संकोचल्यासारखे वाटत नाही.

१३. पाहुणचार दाखवण्याच्या व तो स्वीकारण्याच्या बाबतीत येशूने व पौलाने कोणता आदर्श आपल्यापुढे ठेवला?

१३ पाहुणचार दाखवण्याच्या व तो स्वीकारण्याच्या बाबतीत येशूने चांगला आदर्श आपल्यापुढे ठेवला. त्याने नेहमी अशा प्रसंगाचा इतरांना आध्यात्मिक आशीर्वाद देण्याकरता वापर केला. (लूक ५:२७-३९; १०:४२; १९:१-१०; २४:२८-३२) त्याच्या आरंभीच्या शिष्यांनीही याबाबतीत त्याचे अनुकरण केले. (प्रेषितांची कृत्ये २:४६, ४७) प्रेषित पौलाने लिहिले: “तुम्ही स्थिर व्हावे म्हणून मी तुम्हाला काही आध्यात्मिक कृपादान द्यावे, ह्‍यासाठी तुमची भेट घेण्याची मला फार उत्कंठा आहे; म्हणजे मी तुमच्या सन्‍निध असून तुमच्या व माझ्या अशा परस्परांच्या विश्‍वासाच्या योगाने आपणा उभयतांस, मला तुम्हाविषयी, व तुम्हाला माझ्याविषयी उत्तेजन प्राप्त व्हावे.” (रोमकर १:११, १२) त्याचप्रकारे आपण जेव्हा जेव्हा आपल्या बांधवांसोबत एकत्र येतो तेव्हा तेव्हा प्रोत्साहनाची देवाणघेवाण होऊ शकेल असे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करावा.—रोमकर १२:१३; १५:१, २.

आठवणीदाखल व धोक्याच्या काही सूचना

१४. मोठमोठे स्नेहसमारंभ आयोजित करणे उचित का नाही?

१४ मोठमोठे स्नेहसमारंभ आयोजित करणे उचित नाही कारण अशा मोठ्या समारंभांवर देखरेख करणे तितके सोपे नसते. आध्यात्मिक कार्यांत व्यत्यय येणार नाही अशा वेळी काही कुटुंबे मिळून सहलीला जाऊ शकतात किंवा स्पर्धात्मक वृत्तीला चालना देणार नाही असा एखादा खेळ आयोजित करू शकतात. अशा प्रसंगी मंडळीतल्या वडिलांपैकी, सहायक सेवकांपैकी किंवा इतर अनुभवी बांधवांपैकी काहींना सामील केल्यास त्यांचा चांगला प्रभाव पडू शकतो आणि तो प्रसंग अधिकच आनंददायक ठरू शकतो.

१५. कोणत्याही समारंभाचे आयोजन करताना त्यावर उचित देखरेख ठेवण्याची काळजी का घेतली पाहिजे?

१५ समारंभांचे आयोजन करणाऱ्‍यांनी योग्य देखरेख करण्याच्या गरजेकडे दुर्लक्ष करता कामा नये. तुम्हाला आतिथ्य केल्याने आनंद वाटतो हे जरी खरे असले, तरी तुम्ही पुरेसे लक्ष न दिल्यामुळे, तुमच्या घरात घडलेल्या एखाद्या घटनेने तुमच्या पाहुण्यांपैकी एखाद्याला अडखळणाचे कारण झाले हे कळल्यावर तुम्हाला वाईट वाटणार नाही का? अनुवाद २२:८ येथे दिलेल्या तत्त्वावर विचार करा. नवे घर बांधणाऱ्‍या इस्राएली व्यक्‍तीने आपल्या घराच्या छताला कठडा बांधावा असा नियम होता. त्या काळी सहसा छतावरच पाहुण्यामंडळीचे आदरातिथ्य केले जात असे. पण छताला कठडा बांधण्याचा नियम का देण्यात आला होता? “नाही तर एखादा मनुष्य तेथून खाली पडल्यास तू आपल्या घराण्यावर हत्येचा दोष आणशील,” असे त्यांना सांगण्यात आले होते. त्याचप्रकारे पाहुण्यांवर अवाजवी निर्बंध न लादता, तुम्ही आयोजित केलेल्या समारंभात त्यांच्या संरक्षणाकरता तुम्ही जे काही करता ते त्यांच्या शारीरिक व आध्यात्मिक हिताची काळजी बाळगून केले पाहिजे.

१६. एखाद्या समारंभात मद्य दिले जाणार असेल तर कोणती काळजी घेतली पाहिजे?

१६ समारंभात आमंत्रितांना मद्य दिले जाणार असेल तर विशेष काळजी बाळगण्याची गरज आहे. पाहुण्यांना किती प्रमाणात मद्य दिले जात आहे व कोण किती पीत आहे यावर जातीने लक्ष देणे जर शक्य असेल तरच समारंभात मद्य द्यायचे असे काही ख्रिस्ती बांधवांनी ठरवले आहे. इतरांना अडखळण्याचे कारण बनेल किंवा कोणाला अतिमद्यपान करण्याचा मोह होईल असा प्रसंगच उद्‌भवू नये म्हणून काळजी घेतली पाहिजे. (इफिसकर ५:१८, १९) निरनिराळ्या कारणांमुळे पाहुण्यांपैकी काहीजण कदाचित मद्यपान न करण्याचे ठरवतील. बऱ्‍याच ठिकाणी मद्यपान करण्याकरता कायदेशीररित्या किमान वय ठरवण्यात आले आहे व हे नियम आपल्याला कितीही अवाजवी वाटले तरीही ख्रिश्‍चनांनी कैसराच्या नियमांचे पालन केले पाहिजे.—रोमकर १३:५.

१७. (क) एखाद्या समारंभात संगीत वाजवले जाणार असेल तर समारंभ आयोजित करणाऱ्‍याने याबाबतीत विचारपूर्वक निवड करणे का महत्त्वाचे आहे? (ख) जर नृत्य केले जाणार असेल तर कशाप्रकारे सभ्यता दाखवली जावी?

१७ समारंभ आयोजित करणाऱ्‍याने याची काळजी घेतली पाहिजे की समारंभात वाजवले जाणारे संगीत, नृत्य व इतर मनोरंजनपर कार्यक्रम ख्रिस्ती तत्त्वांशी सुसंगत आहेत. साहजिकच संगीताच्या बाबतीत सर्वांच्या आवडीनिवडी वेगळ्या असतात, शिवाय आज बऱ्‍याच वेगवेगळ्या प्रकारचे संगीत उपलब्ध आहे. पण आजच्या काळातले संगीत सहसा विद्रोह, अनैतिकता व हिंसा यांसारख्या भावनांना प्रोत्साहन देते. तेव्हा विचारपूर्वक निवड करणे अतिशय महत्त्वाचे आहे. याचा अर्थ ख्रिश्‍चनांनी अगदी मंद सुरातले संगीतच ऐकावे असे नाही. पण आपण निवडलेले संगीत कामुक भावना उत्तेजित करणारे किंवा अश्‍लील असू नये, कर्कश किंवा खूप जोरदार ठोके असलेले असू नये. समारंभात कोणते संगीत वाजवले जाईल याची निवड करण्याची जबाबदारी अशा व्यक्‍तीवर सोपवू नका की जिला संगीत माफक आवाजात वाजवले पाहिजे हे समजत नाही. ज्या नृत्यांत असभ्य, विशेषतः कमरेच्या व छातीच्या उत्तेजक हालचाली असतील, अशाप्रकारचे नृत्य साहजिकच ख्रिस्ती व्यक्‍तींकरता उचित नाही.—१ तीमथ्य २:८-१०.

१८. आईवडील आपल्या मुलांच्या सामाजिक जीवनावर देखरेख करण्याद्वारे त्यांचे संरक्षण कसे करू शकतात?

१८ आपल्या मुलांना कोणत्याही समारंभांचे निमंत्रण मिळाले असल्यास त्या समारंभात काय काय होणार आहे याविषयी ख्रिस्ती आईवडिलांनी माहिती काढावी. सहसा आईवडिलांनी मुलांसोबत जाणेच इष्ट आहे. दुःखाची गोष्ट म्हणजे, देखरेख करण्याकरता कोणीही मोठी व्यक्‍ती नसलेल्या पार्ट्यांना काही आईवडिलांनी आपल्या मुलांना जाऊ दिले व अशा पार्ट्यांना आलेल्या अनेकजणांनी अनैतिक किंवा इतरप्रकारे गैरवर्तन केले. (इफिसकर ६:१-४) मुले सतरा-अठरा वर्षांची झाल्यावरही व ती एरवी जबाबदारपणे वागत असली तरीसुद्धा, ‘तरूणपणाच्या वासनांपासून दूर पळण्याकरता’ त्यांना मदतीची गरज असते.—२ तीमथ्य २:२२.

१९. आपण कशासाठी ‘पहिल्याने झटावे’ हे समजून घेण्यास कोणते वास्तव आपण लक्षात ठेवले पाहिजे?

१९ धकाधकीच्या जीवनात, वेळोवेळी निकोप व खरा आनंद देणाऱ्‍या मनोरंजनाचा आस्वाद घेतल्याने निश्‍चितच जीवनाची गोडी वाढेल. हा सुखोपभोग आपण घेऊ नये असे यहोवा म्हणत नाही; पण केवळ मनोरंजन व करमणूक आपल्याला स्वर्गात आध्यात्मिक धन साठवण्यास कोणत्याही प्रकारे मदत करत नाही हे वास्तवही आपल्याला माहीत आहे. (मत्तय ६:१९-२१) येशूने आपल्या शिष्यांना हे समजून घेण्यास मदत केली, की जीवनात सर्वात महत्त्वाची गोष्ट आपण काय खातो, पितो किंवा घालतो ही नाही; “ही सर्व मिळविण्याची धडपड परराष्ट्रीय लोक करीत असतात.” सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ‘पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्त्व मिळविण्यास झटणे’ ही आहे.—मत्तय ६:३१-३४.

२०. यहोवाचे विश्‍वासू सेवक आपल्या उदार सृष्टीकर्त्याकडून कोणत्या आशीर्वादांची अपेक्षा करू शकतात?

२० तर, माफक प्रमाणात उपभोगण्याकरता आपल्या उदार सृष्टिकर्त्याने आपल्याकरता जे काही पुरवले आहे त्याबद्दल त्याचे उपकार मानून, ‘आपण खातो, पितो किंवा जे काही करितो ते सर्व त्याच्या गौरवासाठी’ करावे. (१ करिंथकर १०:३१) अगदी जवळ आलेल्या नव्या जगात, आपल्याला यहोवाच्या उदारतेचा पुरेपूर उपभोग घेण्याच्या आणि जे त्याच्या नीतिमान दर्जांना जडून राहतात अशा बांधवांच्या निकोप सहवासाचा आनंद लुटण्याच्या असंख्य संधी लाभतील.—स्तोत्र १४५:१६; यशया २५:६; २ करिंथकर ७:१. (w०६ ३/१)

तुम्हाला आठवते का?

• आजच्या काळात निकोप मनोरंजन निवडणे ख्रिश्‍चनांना कठीण का जाते?

• कोणकोणत्या प्रकारचे मनोरंजन आनंददायक असल्याचे काही ख्रिस्ती कुटुंबांनी अनुभवले आहे?

• निकोप मनोरंजनाचा आनंद घेताना कोणत्या गोष्टींची व धोक्याच्या सूचनांची आठवण ठेवणे महत्त्वाचे आहे?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२४ पानांवरील चित्र]

ज्यामुळे चांगले फळ उत्पन्‍न होईल अशाच प्रकारचे मनोरंजन निवडा

[२५ पानांवरील चित्रे]

खरे ख्रिस्ती कोणत्या प्रकारच्या मनोरंजनाचा धिक्कार करतात?