व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

खोट्या उपासनेपासून अलिप्त राहा!

खोट्या उपासनेपासून अलिप्त राहा!

खोट्या उपासनेपासून अलिप्त राहा!

“‘त्यांच्यामधून निघा व वेगळे व्हा,’ असे प्रभु म्हणतो, ‘आणि जे अशुद्ध त्याला शिवू नका.’”—२ करिंथकर ६:१७.

१. प्रामाणिक अंतःकरणाचे कित्येक लोक आज आध्यात्मिक दृष्टीने कशा स्थितीत आहेत?

 प्रामाणिक अंतःकरणाच्या कित्येक लोकांना देवाबद्दल व मानवजातीच्या भविष्याबद्दल सत्य माहीत नाही. या आध्यात्मिक विषयांबद्दलचे स्पष्टीकरण न सापडल्यामुळे ते गोंधळलेल्या व संदिग्धतेच्या मनःस्थितीत जगतात. कोट्यवधी लोक निर्माणकर्त्याला मंजूर नसणाऱ्‍या अंधविश्‍वासांचे, रितीरिवाजांचे व सणावारांचे गुलाम बनले आहेत. तुमचे शेजारी व नातेवाईक यांच्यापैकी तुम्हीही अशा बऱ्‍याच जणांना ओळखत असाल की जे नरकाग्नीवर, त्रैक्यावर, अमर आत्म्यावर किंवा दुसऱ्‍या एखाद्या खोट्या शिकवणुकीवर विश्‍वास ठेवतात.

२. धर्मपुढाऱ्‍यांनी काय केले आहे व याचा काय परिणाम झाला आहे?

सर्वदूर पसरलेल्या या आध्यात्मिक अंधकाराचे कारण काय? आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे या आध्यात्मिक अंधकारासाठी जबाबदार आहेत धर्म—विशेषतः अशा धार्मिक संस्था व धर्मपुढारी ज्यांनी देवाच्या विचारांच्या विरोधात असलेल्या शिकवणुकी पसरवल्या आहेत. (मार्क ७:७, ८) परिणामस्वरूप, अनेक लोकांची फसवणूक झाली आहे, कारण आपण खऱ्‍या देवाची उपासना करत आहोत असे त्यांना शिकवण्यात आले असले तरीसुद्धा मुळात ते त्याला दुखावत आहेत. या शोचनीय परिस्थितीला खोटा धर्मच जबाबदार आहे.

३. खोट्या धर्माचा मुख्य पुरस्कर्ता कोण आहे आणि बायबलमध्ये त्याचे वर्णन कशाप्रकारे करण्यात आले आहे?

खोट्या धर्माला पाठिंबा देणारी एक अदृश्‍य आत्मिक व्यक्‍ती आहे. या व्यक्‍तीच्या संदर्भात प्रेषित पौलाने म्हटले: “विश्‍वास न ठेवणाऱ्‍या लोकांची मने ह्‍या युगाच्या दैवताने आंधळी केली आहेत, अशा हेतूने की, देवाची प्रतिमा जो ख्रिस्त त्याच्या तेजाच्या सुवार्तेचा प्रकाश त्यांच्यावर प्रकाशू नये.” (२ करिंथकर ४:४) ‘ह्‍या युगाचे दैवत’ दुसरा तिसरा कोणी नसून दियाबल सैतान हा आहे. तोच खोट्या उपासनेचा सर्वात प्रमुख पुरस्कर्ता आहे. पौलाने लिहिले: “सैतानहि स्वतः तेजस्वी देवदूताचे सोंग घेतो. म्हणून त्याच्या सेवकांनीहि नीतिमत्वाच्या सेवकांचे सोंग घेतले तर ती मोठीशी गोष्ट नाही.” (२ करिंथकर ११:१४, १५) सैतान वाईट गोष्टीही चांगल्या आहेत असे भासवतो आणि लोकांना फसवून त्यांना असत्य गोष्टींवर विश्‍वास करायला लावतो.

४. प्राचीन इस्राएल राष्ट्राला देवाने दिलेल्या नियमशास्त्रात खोट्या संदेष्ट्यांबद्दल काय सांगण्यात आले होते?

त्यामुळे, बायबलमध्ये खोट्या धर्माची कठोर शब्दांत निंदा करण्यात आली आहे यात काही आश्‍चर्य नाही! उदाहरणार्थ मोशेच्या नियमशास्त्रात देवाच्या निवडलेल्या लोकांना खोट्या संदेष्ट्यांवर भरवसा न ठेवण्याची स्पष्ट ताकीद देण्यात आली होती. त्यांना सांगण्यात आले होते, की जो कोणी विपरीत मार्ग शिकवेल किंवा खोट्या देवतांची उपासना करण्यास लोकांना शिकवेल अशा माणसास ‘जिवे मारावे, कारण यहोवाविरुद्ध बंड करायला त्याने सांगितले आहे.’ इस्राएल लोकांना आज्ञा देण्यात आली होती की ‘आपणामधून दुष्टाई दूर करा.’ (अनुवाद १३:१-५, पं.र.भा.) होय, खोट्या धर्माला यहोवा दुष्टाई म्हणून लेखतो.—यहेज्केल १३:३.

५. आज आपण कोणत्या इशाऱ्‍यांकडे लक्ष देण्याची गरज आहे?

यहोवाला खोट्या धर्माबद्दल असलेली तीव्र नापसंती येशू ख्रिस्ताने व त्याच्या प्रेषितांनीही व्यक्‍त केली. येशूने आपल्या शिष्यांना हा इशारा दिला: “खोट्या संदेष्ट्यांविषयी जपून राहा. ते मेंढरांच्या वेषाने तुमच्याकडे येतात, पण ते अंतरी क्रूर लांडगे आहेत.” (मत्तय ७:१५; मार्क १३:२२, २३) पौलाने लिहिले की “जी माणसे अनीतीने सत्य दाबून ठेवतात त्यांच्या अभक्‍तीवर व अनीतीवर देवाचा क्रोध स्वर्गातून प्रगट होतो.” (रोमकर १:१८) तेव्हा खऱ्‍या ख्रिश्‍चनांनी या इशाऱ्‍यांकडे लक्ष देऊन जे देवाच्या वचनातील सत्य दाबून ठेवतात किंवा जे खोट्या शिकवणुकी पसरवतात अशा सर्व व्यक्‍तींपासून दूर राहणे किती महत्त्वाचे आहे!—१ योहान ४:१.

‘मोठ्या बाबेलमधून’ बाहेर पडा

६. बायबलमध्ये “मोठी बाबेल” हिचे कशाप्रकारे वर्णन केले आहे?

बायबलच्या प्रकटीकरण या पुस्तकात खोट्या धर्माचे कशाप्रकारे वर्णन केले आहे ते पाहा. त्यात खोट्या धर्माला मद्य पिऊन झिंगलेल्या व अनेक राज्यांवर व लोकांवर नियंत्रण असलेल्या वेश्‍येच्या रूपात चित्रित करण्यात आले आहे. ही लाक्षणिक वेश्‍या अनेक राजांसोबत जारकर्म करते व देवाच्या खऱ्‍या उपासकांचे रक्‍त पिऊन ती मस्त झालेली आहे. (प्रकटीकरण १७:१, २, ६, १८) तिच्या कपाळावर एक नाव लिहिले आहे व तिच्या किळसवाण्या कृत्यांप्रमाणेच हे नावही घृणास्पद आहे. “मोठी बाबेल, कलावंतिणीची व पृथ्वीवरील अमंगळपणाची आई” असे हे नाव आहे.—प्रकटीकरण १७:५.

७, ८. खोट्या धर्माने कशाप्रकारे वेश्‍यागमन केले आहे व यामुळे परिणाम काय झाला आहे?

बायबलमधील मोठ्या बाबेलचे वर्णन, सामूहिकरित्या जगातल्या सर्व खोट्या धर्मांशी जुळते. जगातले हजारो धर्म जरी एका जागतिक संघटनेचे भाग नसले तरीही त्यांचा उद्देश व कार्ये यांचा विचार केल्यास त्यांचे अतूट नाते आहे. प्रकटीकरणातील अनैतिक स्त्रीच्या दृष्टान्तात सांगितल्याप्रमाणे खोट्या धर्माचा अनेक सरकारांवर कमालीचा पगडा आहे. आपल्या पतीला विश्‍वासू नसलेल्या स्त्रीप्रमाणे खोट्या धर्माने एकापाठोपाठ एक अशा अनेक राजकीय सत्तांशी संगनमत केले आहे व या अर्थाने वेश्‍यागमन केले आहे. शिष्य याकोबाने लिहिले: “अहो व्यभिचारिणींनो, जगाची मैत्री ही देवाशी वैर आहे, हे तुम्हांस ठाऊक नाही काय? म्हणून जो कोणी जगाचा मित्र व्हायला इच्छितो तो देवाचा वैरी ठरला आहे.”—याकोब ४:४, पं.र.भा.

खोट्या धर्माच्या सरकारांसोबतच्या या संगनमतामुळे मानवजातीला कमालीचे दुःख सहन करावे लागले आहे. आफ्रिकन राजकीय समीक्षक डॉ. ओनीना मांगू यांनी असा अभिप्राय व्यक्‍त केला की “धर्म व राजकारण यांची सरमिसळ झाल्यामुळे घडून आलेल्या मानवसंहाराची असंख्य उदाहरणे इतिहासात पाहायला मिळतात.” एका वृत्तपत्राने अलीकडे असे विधान केले: “आजघडीचे सर्वात हिंसक व घातक संघर्ष . . . धर्माच्याच नावाखाली केले जात आहेत.” धार्मिक कारणांमुळे लढलेल्या अनेक युद्धांत कोट्यवधी लोकांना आपले जीव गमवावे लागले आहेत. मोठ्या बाबेलने देवाच्या खऱ्‍या सेवकांचाही छळ केला आहे व त्यांच्यापैकी कित्येकांना जिवे मारले आहे आणि अशारितीने ती जणू त्यांच्या रक्‍ताने मस्त झाली आहे.—प्रकटीकरण १८:२४.

९. प्रकटीकरणाच्या पुस्तकात यहोवाला खोट्या धर्मांविषयी वाटणारी घृणा कशाप्रकारे व्यक्‍त करण्यात आली आहे?

यहोवाला खोट्या उपासनेची घृणा वाटते. मोठ्या बाबेलच्या भविष्याबद्दल बायबलमध्ये जे सांगितले आहे त्यावरून हे अगदीच स्पष्ट होते. प्रकटीकरण १७:१६ यात म्हटले आहे: “जी दहा शिंगे व जे श्‍वापद तू पाहिले ती कलावंतिणीचा द्वेष करितील व तिला ओसाड व नग्न करितील, तिचे मांस खातील व तिला अग्नीत जाळून टाकतील.” प्रथम, एक मोठे श्‍वापद तिच्यावर हल्ला करून तिला ठार मारते व तिच्या शरीराचे मांसल भाग खाऊन टाकते. यानंतर, तिचे छिन्‍नविछिन्‍न झालेले शरीर पूर्णपणे जाळून टाकले जाते. अशाचप्रकारे, जागतिक राजकीय सत्ता लवकरच खोट्या धर्माविरुद्ध हीच कारवाई करणार आहेत. देव स्वतः हे घडवून आणेल. (प्रकटीकरण १७:१७) खोट्या धर्मांचे जागतिक साम्राज्य, अर्थात मोठी बाबेल विनाशाच्या उंबरठ्यावर उभी आहे. “ह्‍यापुढे [ती] कधीहि सापडणार नाही.”—प्रकटीकरण १८:२१.

१०. खोट्या धर्माविषयी आपली काय भूमिका असावी?

१० खऱ्‍या देवाच्या उपासकांनी मोठ्या बाबेलच्या संबंधाने कोणती भूमिका घ्यावी? बायबलमध्ये त्यांना अगदी स्पष्ट शब्दांत ही आज्ञा देण्यात आली आहे: “माझ्या लोकांनो, तुम्ही तिच्या पापांचे वाटेकरी होऊ नये आणि तुम्हाला तिच्या पीडांतील कोणतीहि पीडा होऊ नये म्हणून तिच्यामधून निघा.” (प्रकटीकरण १८:४) जो कोणी जिवंत वाचू इच्छितो त्याने फार उशीर होण्याआधी खोट्या धर्मातून बाहेर पडले पाहिजे. पृथ्वीवर असताना येशू ख्रिस्ताने असे भाकीत केले होते, की शेवटल्या काळात अनेक जण त्याचे अनुसरण करण्याचा निव्वळ आव आणतील. (मत्तय २४:३-५) अशा लोकांना तो म्हणतो: “मला तुमची कधीच ओळख नव्हती; अहो अनाचार करणाऱ्‍यांनो, माझ्यापुढून निघून जा.” (मत्तय ७:२३) सध्या स्वर्गात सिंहासनाधिष्ट असलेल्या येशू ख्रिस्ताचा खोट्या धर्माशी काडीचाही संबंध नाही.

अलिप्त राहण्याचा काय अर्थ होतो?

११. खोट्या उपासनेपासून अलिप्त राहण्याकरता आपण काय केले पाहिजे?

११ खरे ख्रिस्ती खोट्या धार्मिक शिकवणुकी मानत नाहीत व अशारितीने खोट्या उपासनेपासून अलिप्त राहतात. याचा अर्थ, आपण रेडिओ व टीव्हीवरील धार्मिक कार्यक्रम ऐकत किंवा पाहात नाही व देवाबद्दल व त्याच्या वचनाबद्दल खोटी माहिती देणारे धार्मिक साहित्य देखील वाचत नाही. (स्तोत्र ११९:३७) तसेच खोट्या धर्माच्या एखाद्या संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या सामाजिक किंवा मनोरंजनपर कार्यक्रमांत आपण सहभागी होत नाही. तसेच, आपण कोणत्याही प्रकारे खोट्या धर्माला पाठिंबा देत नाही. (१ करिंथकर १०:२१) या सर्व गोष्टी टाळल्यामुळे आपले संरक्षण होते. ते या अर्थाने की, “ख्रिस्ताप्रमाणे नसलेले, तर माणसांच्या संप्रदायाप्रमाणे, जगाच्या प्राथमिक शिक्षणाप्रमाणे असलेले तत्वज्ञान व पोकळ भुलथापा ह्‍यांच्या योगाने” कोणी आपल्याला त्याच्या कह्‍यात घेऊ शकत नाही.—कलस्सैकर २:८.

१२. खोट्या धार्मिक संस्थांशी कोणत्याही प्रकारचा संबंध एक व्यक्‍ती कशाप्रकारे तोडू शकते?

१२ यहोवाचा साक्षीदार बनू इच्छिणारी व्यक्‍ती सध्या एखाद्या खोट्या धर्माची सदस्य असल्यास तिने काय करावे? यापुढे आपल्याला त्या धर्माचा सदस्य समजले जाऊ नये हे दाखवण्याकरता सहसा राजीनाम्याचे पत्र देणे पुरेसे असते. अशा व्यक्‍तीने खोट्या धर्मापासून कोणत्याही प्रकारे दूषित न होण्याकरता निर्णायक पावले उचलणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यहोवाचा साक्षीदार बनू इच्छिणाऱ्‍या व्यक्‍तीच्या कृत्यांवरून त्या धार्मिक संस्थेला व इतर लोकांना हे स्पष्टपणे दिसून आले पाहिजे की तिने त्या संस्थेपासून संबंध तोडून टाकला आहे.

१३. खोट्या उपासनेपासून अलिप्त राहण्यासंबंधी बायबलमध्ये कोणता सल्ला दिला आहे?

१३ प्रेषित पौलाने लिहिले: “तुम्ही विश्‍वास न ठेवणाऱ्‍यांबरोबर संबंध जोडून विजोड होऊ नका. कारण नीति व स्वैराचार ह्‍यांची भागी कशी होणार? उजेड व अंधार यांचा मिलाफ कसा होणार? ख्रिस्ताची बलियाराशी एकवाक्यता कशी होणार? विश्‍वास ठेवणारा व विश्‍वास न ठेवणारा हे वाटेकरी कसे होणार? देवाच्या मंदिराचा मूर्तीबरोबर मेळ कसा बसणार? . . . म्हणून ‘त्यांच्यामधून निघा व वेगळे व्हा,’ असे प्रभु म्हणतो, ‘आणि जे अशुद्ध त्याला शिवू नका.’” (२ करिंथकर ६:१४-१७) खोट्या उपासनेपासून अलिप्त राहून आपण या शब्दांचे पालन करतो. पौलाच्या या सल्ल्यानुसार, आपण खोट्या उपासकांपासूनही अलिप्त राहिले पाहिजे का?

“सुज्ञतेने वागा”

१४. जे खोट्या उपासनेत सहभागी होतात त्यांच्याशी आपण पूर्णपणे संबंध टाळावा का? स्पष्ट करा.

१४ खऱ्‍या उपासकांनी खोट्या उपासनेत सहभागी होणाऱ्‍या लोकांशी कोणत्याही प्रकारचा संपर्क टाळावा का? जे आपले विश्‍वास स्वीकारत नाहीत त्यांना आपण पूर्णपणे टाळावे का? नाही, असे करण्याची गरज नाही. सर्वात श्रेष्ठ अशा दोन आज्ञांपैकी दुसरी आज्ञा अशी आहे: “तू आपल्या शेजाऱ्‍यावर स्वतःसारखी प्रीति कर.” (मत्तय २२:३९) आपण आपल्या शेजाऱ्‍यांना राज्याची सुवार्ता सांगण्याद्वारे त्यांच्याबद्दल प्रीती व्यक्‍त करतो. तसेच आपण त्यांच्यासोबत बायबलचा अभ्यास करतो व खोट्या उपासनेपासून अलिप्त राहण्याचे महत्त्व त्यांना पटवून देतो तेव्हाही आपण त्यांच्याविषयी प्रीती व्यक्‍त करत असतो.

१५. येशूचे अनुयायी “जगाचे नाही” ते कोणत्या अर्थाने?

१५ आपण आपल्या शेजाऱ्‍यांना सुवार्ता सांगतो हे खरे असले तरीही येशूचे अनुयायी या नात्याने आपण या “जगाचे नाही.” (योहान १५:१९) याठिकाणी वापरलेला ‘जग’ हा शब्द देवापासून दुरावलेल्या मानव समाजाला सूचित करतो. (इफिसकर ४:१७-१९; १ योहान ५:१९) यहोवाचा ज्यामुळे अनादर होईल अशाप्रकारची विचारसरणी, भाषा, व वर्तन यांचा आपण तिरस्कार करतो आणि अशारितीने जगापासून अलिप्त राहतो. (१ योहान २:१५-१७) शिवाय, “कुसंगतीने नीति बिघडते” या तत्त्वाला मान देऊन जे ख्रिस्ती आदर्शांनुसार जगत नाहीत अशा लोकांशी जवळचे संबंध आपण जोडत नाही. (१ करिंथकर १५:३३) जगापासून अलिप्त राहणे म्हणजे “स्वतःला जगापासून निष्कलंक ठेवणे.” (याकोब १:२७) तेव्हा, जगापासून अलिप्त राहण्याचा अर्थ आपण इतर लोकांशी संपर्कच ठेवू नये असा होत नाही.—योहान १७:१५, १६; १ करिंथकर ५:९, १०.

१६, १७. ज्यांना बायबलमधील सत्यांविषयी माहिती नाही अशा व्यक्‍तींशी आपण कशाप्रकारे वागावे?

१६ तर मग ज्यांना बायबलमधील सत्यांविषयी माहिती नाही अशा लोकांशी आपण कसे वागावे? कलस्सै येथील मंडळीला पौलाने असे लिहिले: “बाहेरच्या लोकांबरोबर सुज्ञतेने वागा; संधि साधून घ्या. तुमचे बोलणे सर्वदा कृपायुक्‍त, मिठाने रूचकर केल्यासारखे असावे, म्हणजे प्रत्येकाला कसकसे उत्तर द्यावयाचे ते तुम्ही समजावे.” (कलस्सैकर ४:५, ६) प्रेषित पेत्राने लिहिले: “ख्रिस्ताला प्रभु म्हणून आपल्या अंतःकरणात पवित्र माना, आणि तुमच्या ठायी जी आशा आहे तिच्याविषयी विचारपूस करणाऱ्‍या प्रत्येकाला उत्तर देण्यास नेहमी सिद्ध असा; तरी ते सौम्यतेने व भीडस्तपणाने द्या.” (१ पेत्र ३:१५) पौलाने ख्रिश्‍चनांना सल्ला दिला की त्यांनी “कोणाची निंदा करू नये, भांडखोरपणा न करता सौम्य, व सर्व माणसांबरोबर सर्व प्रकारे नम्रतेने वागणारे असावे.”—तीत ३:२.

१७ यहोवाचे साक्षीदार इतरांशी उर्मटपणे किंवा रागीटपणे बोलण्याचे टाळतात. इतर धर्माच्या व्यक्‍तींबद्दल आपण कधीही अपमानास्पद रितीने बोलत नाही. उलट, घरोघरच्या सेवेत भेटलेली एखादी व्यक्‍ती, शेजारी किंवा सहकर्मचारी आपल्याशी रागाने किंवा अपमानास्पद रितीने बोलल्यास आपण त्यांना समंजसपणे उत्तर देतो.—कलस्सैकर ४:६; २ तीमथ्य २:२४.

‘सुवचनांचा नमुना दृढपणे राखणे’

१८. जे खोट्या उपासनेकडे परत जातात त्यांची आध्यात्मिक अवस्था कशी असते?

१८ बायबलमधील सत्यांचे ज्ञान मिळाल्यावर एखादी व्यक्‍ती पुन्हा खोट्या उपासनेकडे परत गेल्यास ही किती दुःखाची गोष्ट ठरेल! असा मार्ग निवडणे किती क्लेशदायक ठरू शकते याविषयी बायबलमध्ये या शब्दांत वर्णन केले आहे: “प्रभु व तारणारा येशू ख्रिस्त ह्‍याच्या ज्ञानाच्या द्वारे जगाच्या घाणीतून सुटल्यावर ते पुन्हा जर तिच्यांत गुंतून तिच्या कह्‍यात गेले तर त्यांची शेवटली दशा पहिल्या दशेपेक्षा वाईट झाली आहे. . . . ‘आपल्या ओकारीकडे परतलेले कुत्रे व अंग धुतल्यानंतर गाळात लोळण्यास परतलेली डुकरीण’, अशी जी खरी म्हण आहे, तिच्यासारखी त्यांची गत झाली आहे.”—२ पेत्र २:२०-२२.

१९. आपल्या आध्यात्मिक आरोग्याला घातक ठरू शकेल अशा प्रत्येक गोष्टीपासून सांभाळून राहणे महत्त्वाचे का आहे?

१९ आपल्या आध्यात्मिक आरोग्याला घातक ठरू शकेल अशा प्रत्येक गोष्टीपासून आपण सांभाळून राहिले पाहिजे. आणि सांभाळून राहण्याजोग्या अशा अनेक गोष्टी आहेत! प्रेषित पौल म्हणूनच ताकीद देतो: “आत्मा स्पष्ट म्हणतो की, पुढील काळी विश्‍वासापासून कित्येक लोक भ्रष्ट होतील; . . . खोटे बोलणाऱ्‍या माणसांच्या ढोंगाने ते फुसलाविणाऱ्‍या आत्म्यांच्या व भुतांच्या शिक्षणाच्या नादी लागतील.” (१ तीमथ्य ४:१, २) आज आपण त्या ‘पुढील काळात’ राहात आहोत. जे खोट्या उपासनेपासून अलिप्त राहात नाहीत ते “माणसांच्या धुर्तपणाने, भ्रांतीच्या मार्गास नेणाऱ्‍या युक्‍तीने, प्रत्येक शिकवणरुपी वाऱ्‍याने हेलकावणारे व फिरणारे असे” होऊ शकतात.—इफिसकर ४:१३, १४.

२०. खोट्या उपासनेच्या घातक प्रभावापासून आपण कशाप्रकारे स्वतःचे संरक्षण करू शकतो?

२० खोट्या धर्माच्या घातक प्रभावापासून आपण स्वतःचे संरक्षण कशाप्रकारे करू शकतो? यहोवाने यासंदर्भात आपल्याला बरेच साहाय्य पुरवले आहे. आपल्याजवळ त्याचे वचन बायबल आहे. (२ तीमथ्य ३:१६, १७) तसेच, ‘विश्‍वासू व बुद्धिमान दासाच्या’ माध्यमाने यहोवाने विपुल प्रमाणात आध्यात्मिक अन्‍न देखील पुरवले आहे. (मत्तय २४:४५) आपण जसजसे सत्यात प्रगती करतो तसतशी आपल्या मनात, ‘प्रौढांसाठी असलेल्या जड अन्‍नाबद्दल’ अधिकाधिक आवड, आणि आध्यात्मिक सत्यांचे शिक्षण जेथे आपल्याला मिळते त्या ठिकाणी आपल्या बांधवांसोबत एकत्र होण्याची अधिकाधिक इच्छा निर्माण व्हायला नको का? (इब्री लोकांस ५:१३, १४; स्तोत्र २६:८) तर मग, यहोवाच्या तरतुदींपासून पुरेपूर फायदा करून घेण्याचा आपण दृढसंकल्प करू या, जेणेकरून, आपण ऐकलेल्या ‘सुवचनांचा नमुना दृढपणे राखणे’ आपल्याला शक्य होईल. (२ तीमथ्य १:१३) आणि अशारितीने खोट्या उपासनेपासून आपल्याला अलिप्त राहता येईल. (w०६ ३/१५)

तुम्हाला काय शिकायला मिळाले?

• “मोठी बाबेल” म्हणजे काय?

• खोट्या धर्मापासून अलिप्त राहण्याकरता आपण काय केले पाहिजे?

• आपल्या आध्यात्मिक आरोग्याला घातक ठरू शकणाऱ्‍या कोणत्या गोष्टींपासून आपण सांभाळून राहिले पाहिजे?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१४ पानांवरील चित्र]

‘मोठ्या बाबेलला’ एका अनैतिक स्त्रीच्या रूपात का चित्रित करण्यात आले आहे हे तुम्हाला माहीत आहे का?

[१५ पानांवरील चित्र]

‘मोठ्या बाबेलचा’ नाश ठरलेला आहे

[१७ पानांवरील चित्र]

आपले विश्‍वास न मानणाऱ्‍या लोकांशी आपण ‘सौम्यतेने व भीडस्तपणाने’ वागतो