व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ख्रिस्ती बाप्तिस्म्यासाठी पात्र बनणे

ख्रिस्ती बाप्तिस्म्यासाठी पात्र बनणे

ख्रिस्ती बाप्तिस्म्यासाठी पात्र बनणे

“मला बाप्तिस्मा घेण्यास काय हरकत आहे?”—प्रेषितांची कृत्ये ८:३६.

१, २. फिलिप्पने इथियोपियन अधिकाऱ्‍यासोबत संभाषण कशाप्रकारे सुरू केले आणि या मनुष्याची धार्मिक प्रवृत्ती कशावरून दिसून येते?

 येशूच्या मृत्यूच्या एखाद दोन वर्षांनंतर, एक सरकारी अधिकारी जेरूसलेमहून गाजाला जाणाऱ्‍या रस्त्यावरून दक्षिणेकडे प्रवास करत होता. त्याला त्याच्या रथातून अद्याप १,५०० किलोमीटरचा कंटाळवाणा प्रवास करायचा होता. हा देवभीरू माणूस यहोवाची उपासना करण्याकरता थेट इथियोपियाहून जेरूसलेमला आला होता. परतीच्या लांब प्रवासात तो वेळेचा सदुपयोग करण्याच्या हेतूने देवाचे वचन वाचत होता. यावरूनच त्याच्या विश्‍वासाची कल्पना येते. तर अशा या प्रांजळ वृत्तीच्या मनुष्याकडे यहोवाने लक्ष दिले आणि आपल्या देवदूताकरवी त्याने शिष्य फिलिप्पला त्याच्याकडे सुवार्ता सांगण्याकरता पाठवले.—प्रेषितांची कृत्ये ८:२६-२८.

फिलिप्प या मनुष्यासोबत अगदी सहज संभाषण सुरू करू शकला कारण हा इथियोपियन अधिकारी, त्याकाळच्या प्रथेनुसार मोठ्याने वाचन करत होता. त्यामुळे, तो यशयाच्या गुंडाळीतून वाचन करत आहे हे फिलिप्प ऐकू शकला. फिलिप्पने त्याला एक साधासा प्रश्‍न केला: “आपण जे वाचीत आहा ते आपल्याला समजते काय?” या प्रश्‍नाने त्या मनुष्याची जिज्ञासा जागृत झाली आणि ते यशया ५३:७, ८ यावर चर्चा करू लागले. त्यानंतर फिलिप्पने “येशूविषयीची सुवार्ता त्याला सांगितली.”—प्रेषितांची कृत्ये ८:२९-३५.

३, ४. (क) फिलिप्पने इथियोपियन मनुष्याला लगेच बाप्तिस्मा का दिला? (ख) आता आपण कोणते प्रश्‍न विचारात घेणार आहोत?

काहीवेळातच, त्या इथियोपियन मनुष्याला देवाच्या उद्देशात येशूची काय भूमिका आहे हे स्पष्टपणे समजले. तसेच, बाप्तिस्मा घेऊन ख्रिस्ताचा शिष्य बनणे किती आवश्‍यक आहे हेही त्याला समजले. त्यामुळे, जवळच त्याला पाण्याचे एक सरोवर दिसले तेव्हा त्याने फिलिप्पला विचारले: “मला बाप्तिस्मा घेण्यास काय हरकत आहे?” अर्थात, ही परिस्थिती अपवादात्मक होती. हा एक धार्मिक वृत्तीचा माणूस होता व यहूदी मतानुसारी असल्यामुळे तो आधीपासूनच देवाची उपासना करत होता. बाप्तिस्मा घेण्याची संधी यानंतर कदाचित त्याला बरेच दिवस मिळू शकली नसती. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, देवाला त्याच्याकडून काय अपेक्षा आहे हे त्या माणसाला समजले होते आणि कोणत्याही अटीविना ही अपेक्षा पूर्ण करण्यास तो उत्सुक होता. फिलिप्पने त्याची विनंती मान्य केली आणि बाप्तिस्मा झाल्यानंतर हा इथियोपियन मनुष्य “आपल्या वाटेने हर्ष करीत [गेला].” आपल्या मायदेशी परतल्यावर त्याने आवेशाने सुवार्तेची घोषणा केली असेल यात शंका नाही.—प्रेषितांची कृत्ये ८:३६-३९.

अर्थात, समर्पण व बाप्तिस्म्याचे पाऊल पुरेसा विचार न करता, उतावीळपणे घेतले जाऊ नये; ही क्षुल्लक लेखण्यासारखी बाब निश्‍चितच नाही. पण तरीसुद्धा इथियोपियन अधिकाऱ्‍याच्या उदाहरणावरून आपल्याला दिसून येते की काही प्रसंगी देवाच्या वचनातील सत्याविषयी ऐकल्यावर काही व्यक्‍तींनी लगेचच बाप्तिस्मा घेतला. * तेव्हा, पुढील प्रश्‍नांचा विचार करणे योग्य ठरेल: बाप्तिस्म्याच्या आधी कोणत्या प्रकारची तयारी करण्याची गरज आहे? कोणत्या परिस्थितीत वयाचा विचार केला जावा? बाप्तिस्मा घेण्याआधी एखाद्या व्यक्‍तीत कोणत्या प्रकारची आध्यात्मिक प्रगती दिसून आली पाहिजे? सर्वात महत्त्वाचे म्हणजे, यहोवा आपल्या सेवकांकडून हे पाऊल उचलण्याची अपेक्षा का करतो?

एक गंभीर प्रतिज्ञा

५, ६. (क) गतकाळात यहोवाच्या लोकांनी कशाप्रकारे त्याच्या प्रेमाला प्रतिसाद दिला? (ख) बाप्तिस्मा घेतल्यानंतर आपण देवासोबत कशाप्रकारे जवळचा नातेसंबंध जोडू शकतो?

इस्राएल लोकांची ईजिप्तमधून सुटका केल्यानंतर यहोवा त्यांना आपला “खास निधि” म्हणून स्वीकारण्यास व त्यांच्यावर प्रेम करून व त्यांचे संरक्षण करून त्यांना एक “पवित्र राष्ट्र” बनवण्यास तयार होता. पण हे आशीर्वाद मिळवण्याकरता इस्राएल लोकांनी देवाच्या प्रीतीला एका विशिष्ट प्रकारे प्रतिसाद देणे गरजेचे होते. आणि त्यांनी असे केलेही. ते कसे? “परमेश्‍वराने सांगितले आहे ते सर्व आम्ही करू” असे त्यांनी कबूल केले व ते यहोवासोबत करारबद्ध झाले. (निर्गम १९:४-९) पहिल्या शतकात, येशूने आपल्या शिष्यांना सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य बनवण्याची आज्ञा दिली आणि ज्यांनी त्याच्या शिकवणुकी स्वीकारल्या त्यांनी बाप्तिस्मा घेतला. देवासोबत चांगला नातेसंबंध जोडण्याकरता येशू ख्रिस्तावर विश्‍वास ठेवून बाप्तिस्मा घेणे आवश्‍यक होते.—मत्तय २८:१९, २०; प्रेषितांची कृत्ये २:३८, ४१.

शास्त्रवचनांतील या अहवालांवरून आपल्याला दिसून येते की जे यहोवाची सेवा करण्याची प्रतिज्ञा करून ती पाळतात त्यांना तो आशीर्वाद देतो. ख्रिश्‍चनांकरता देवाचे आशीर्वाद मिळवण्याकरता समर्पण व बाप्तिस्मा ही आवश्‍यक पावले आहेत. आपण त्याच्या मार्गांनी चालण्याचा व त्याचे मार्गदर्शन मिळवण्याचा निर्धार करतो. (स्तोत्र ४८:१४) परिणामस्वरूप, यहोवा जणू आपला हात धरून आपण ज्या मार्गाने चालले पाहिजे त्याने आपल्याला नेतो.—स्तोत्र ७३:२३; यशया ३०:२१; ४१:१०, १३.

७. समर्पण करून बाप्तिस्मा घेण्याचा निर्णय स्वतः घेणे का महत्त्वाचे आहे?

ही पावले उचलण्याची प्रेरणा आपल्याला यहोवाबद्दल वाटणाऱ्‍या प्रेमामुळे व त्याची सेवा करण्याच्या इच्छेमुळे मिळाली पाहिजे. तुमचा अभ्यास बऱ्‍याच काळापासून चालला आहे तेव्हा लवकर बाप्तिस्मा घ्या असे कोणीतरी सांगितले आहे म्हणून, किंवा आपल्या मित्रमैत्रिणींनी बाप्तिस्मा घेतला म्हणून कोणीही बाप्तिस्मा घेऊ नये. साहजिकच आईवडील किंवा इतर प्रौढ ख्रिस्ती एखाद्याला समर्पण करण्याचा व बाप्तिस्मा घेण्याचा विचार करण्याचे प्रोत्साहन देतील. पेन्टेकॉस्टच्या दिवशी पेत्राने आपले भाषण ऐकणाऱ्‍यांना “बाप्तिस्मा घ्या” असे कळकळीचे निवेदन केले. (प्रेषितांची कृत्ये २:३८) पण आपले समर्पण ही एक वैयक्‍तिक बाब आहे. हा निर्णय कोणीही दुसरी व्यक्‍ती आपल्याकरता घेऊ शकत नाही. देवाच्या इच्छेनुसार चालण्याचा निर्णय आपला स्वतःचा असला पाहिजे.—स्तोत्र ४०:८.

बाप्तिस्म्याकरता पुरेशी तयारी

८, ९. (क) तान्ह्या मुलांना बाप्तिस्मा देणे का योग्य नाही? (ख) बाप्तिस्म्याअगोदर मुलांची कितपत आध्यात्मिक प्रगती झालेली असली पाहिजे?

लहान मुले डोळसपणे, स्वतःचे जीवन देवाला समर्पित करण्याचा निर्णय घेऊ शकतात का? शास्त्रवचनांत बाप्तिस्मा घेण्याकरता किमान वयोमर्यादा दिलेली नाही. तरीपण, तान्ही मुले विश्‍वास करून त्याच्या आधारावर निर्णय घेऊ शकत नाहीत, किंवा देवाला स्वतःचे जीवन समर्पित करू शकत नाहीत हे समजण्याजोगे आहे. (प्रेषितांची कृत्ये ८:१२) पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांच्या संदर्भात, इतिहासकार ऑगस्टस नेअँडर ख्रिस्ती धर्म व चर्च यांचा इतिहास (इंग्रजी) या आपल्या पुस्तकात म्हणतात: “सुरुवातीला बाप्तिस्मा हा केवळ प्रौढांना दिला जात असे; कारण बाप्तिस्मा व विश्‍वास या दोन गोष्टींचा जवळचा संबंध असल्याचे त्याकाळी लोक मानत होते.”

मुलांच्या बाबतीत पाहू जाता, काही मुले कोवळ्या वयातच आध्यात्मिक प्रवृत्ती विकसित करतात तर काहींना वेळ लागतो. पण, बाप्तिस्मा घेण्याअगोदर मुलांचा यहोवासोबत वैयक्‍तिक नातेसंबंध असला पाहिजे; त्यांना शास्त्रवचनांतील मूलभूत शिकवणुकी नीट समजलेल्या असल्या पाहिजेत; आणि प्रौढांप्रमाणेच त्यांनाही समर्पण म्हणजे नेमके काय हे स्पष्टपणे समजलेले असले पाहिजे.

१०. समर्पण व बाप्तिस्मा घेण्याअगोदर काय काय घडणे आवश्‍यक आहे?

१० येशूने आपल्या शिष्यांना सांगितले की त्यांनी नव्या शिष्यांना आपण आज्ञा दिलेल्या सर्व गोष्टी पाळावयास शिकवावे. (मत्तय २८:२०) तेव्हा, सर्वप्रथम नव्या व्यक्‍तींनी सत्याचे अचूक ज्ञान मिळवले पाहिजे जेणेकरून त्यांना यहोवावर व त्याच्या वचनावर विश्‍वास उत्पन्‍न करता येईल. (रोमकर १०:१७; १ तीमथ्य २:४; इब्री लोकांस ११:६) त्यानंतर, शास्त्रवचनांतील सत्य त्या व्यक्‍तीच्या अंतःकरणाला स्पर्श करते तेव्हा तिला पश्‍चात्ताप करून आपली पूर्वीची जीवनशैली सोडून देण्याची प्रेरणा मिळते. (प्रेषितांची कृत्ये ३:१९) शेवटी, ही व्यक्‍ती अशा टप्प्यावर येऊन पोचते जेव्हा तिच्या मनात, आपले जीवन यहोवाला समर्पित करून येशूने आज्ञा दिल्यानुसार बाप्तिस्मा घेण्याची इच्छा जागृत होते.

११. बाप्तिस्मा घेण्याअगोदरच प्रचार कार्यात नियमित सहभाग घेणे का महत्त्वाचे आहे?

११ बाप्तिस्मा घेईपर्यंत प्रगती करण्याकरता राज्याच्या सुवार्तेची घोषणा करण्यात सहभाग घेणे हे देखील एक महत्त्वाचे पाऊल आहे. यहोवाने या शेवटल्या काळात आपल्या लोकांना नेमलेले हे सर्वात महत्त्वाचे कार्य आहे. (मत्तय २४:१४) बाप्तिस्मा न घेतलेले प्रचारक देखील इतरांना आपल्या विश्‍वासांबद्दल सांगण्याचा आनंद अनुभवू शकतात. या कार्यात सहभाग घेतल्याने, बाप्तिस्म्यानंतरही क्षेत्र सेवाकार्यात नियमित व आवेशी सहभाग घेत राहण्याची त्यांना सवय लागते.—रोमकर १०:९, १०, १४, १५.

एखादी गोष्ट तुम्हाला बाप्तिस्मा घेण्यापासून रोखत आहे का?

१२. काही जण बाप्तिस्मा घेण्यापासून का मागे हटतात?

१२ बाप्तिस्मा घेतल्याने आपल्यावर एक जबाबदारी येईल या भीतीने काहीजण मागे हटतात. यहोवाच्या आदर्शांनुसार जगण्याकरता आपल्याला जीवनात फार मोठे बदल करावे लागतील याची त्यांना जाणीव असते. किंवा त्यांना अशी भीती वाटते की बाप्तिस्म्यानंतर आपण देवाच्या नियमांचे पालन करू शकू का? काहीजण कदाचित असा तर्क करत असतील, “एखाद्यावेळेस माझ्याकडून काही चूक झाली तर मला मंडळीतून बहिष्कृत केले जाईल.”

१३. येशूच्या काळात काहीजण येशूचे अनुयायी बनण्यापासून का मागे हटले?

१३ येशूच्या काळात काही लोकांनी स्वार्थी इच्छांना व कौटुंबिक बंधनांना येशूचे शिष्य बनण्याच्या मार्गात अडथळा बनू दिले. एका शास्त्र्याने येशूला म्हटले की आपण जेथे कोठे जाल तेथे मी आपल्यासोबत येईन. पण येशूने त्याला सांगितले की कित्येकदा त्याच्याजवळ रात्र काढण्याकरताही जागा नसते. येशूने आणखी एका मनुष्याला आपल्या मागे येण्याचे निमंत्रण दिले तेव्हा या मनुष्याने उत्तर दिले की मला प्रथम माझ्या बापाला ‘पुरायचे’ आहे. येशूच्या मागे जाऊन, वेळ येईल तेव्हा ही जबाबदारी पार पाडण्याऐवजी, कदाचित त्या मनुष्याला घरी राहून आपल्या बापाचा मृत्यू होईपर्यंत थांबायचे होते. शेवटी, तिसऱ्‍या एका मनुष्याने येशूच्या मागे चालू लागण्याआधी आपल्या घरच्या माणसांचा निरोप घेण्याची इच्छा व्यक्‍त केली. अशाप्रकारे दिरंगाई करणे हे ‘नांगराला हात घातल्यावर मागे पाहण्यासारखे’ आहे असे येशूने म्हटले. तेव्हा, ख्रिस्ती जबाबदाऱ्‍यांपासून अंग चोरण्याकरता ज्यांना निमित्ते शोधायचीच असतात त्यांना नेहमी काही न काही निमित्त सापडतेच हे यावरून दिसून येते.—लूक ९:५७-६२.

१४. (क) पेत्र, आंद्रिया, याकोब व योहान यांना येशूने माणसे धरणारे होण्याकरता बोलावले तेव्हा त्यांनी काय केले? (ख) येशूचे जू स्वीकारण्यास आपण दिरंगाई का करू नये?

१४ पेत्र, आंद्रिया, याकोब व योहान यांची उदाहरणे याच्या अगदी उलट आहेत. येशूने त्यांना माशांऐवजी माणसे पकडणारे होण्याकरता आपल्या मागे येण्यास सांगितले तेव्हा, बायबलमध्ये असे म्हटले आहे की, “लागलेच ते जाळी सोडून देऊन त्याला अनुसरले.” (मत्तय ४:१९-२२) लागलीच निर्णय घेतल्यामुळे येशूने नंतर त्यांना जे सांगितले ते त्यांनी स्वतः अनुभवले: “मी जो मनाचा सौम्य व लीन आहे त्या माझे जू आपणावर घ्या व माझ्यापासून शिका म्हणजे तुमच्या जिवास विसावा मिळेल; कारण माझे जू सोयीचे व माझे ओझे हलके आहे.” (मत्तय ११:२९, ३०) होय, बाप्तिस्मा घेतल्याने जबाबदारी तर येते पण येशू आपल्याला आश्‍वासन देतो की हे जू वाहण्यास कठीण नाही तर हलके आहे आणि त्यामुळे आपल्याला विसावा मिळेल.

१५. मोशे व यिर्मया यांच्या उदाहरणावरून, देव आपल्याला अवश्‍य साहाय्य पुरवेल हे कशाप्रकारे दिसून येते?

१५ अर्थात आपण कमी पडतो असे वाटणे स्वाभाविक आहे. मोशे व यिर्मया या दोघांनाही सुरुवातीला यहोवाने सोपवलेले कार्य करण्यास आपण समर्थ नाही असेच वाटले. (निर्गम ३:११; यिर्मया १:६) पण देवाने त्यांना कशाप्रकारे दिलासा दिला? त्याने मोशेला सांगितले: “खचित मी तुझ्याबरोबर असेन.” यिर्मयाला त्याने असे वचन दिले की, “तुझा बचाव करण्यास मी तुझ्याबरोबर आहे.” (निर्गम ३:१२; यिर्मया १:८) आपणही देवाच्या साहाय्यावर भरवसा ठेवू शकतो. देवावर प्रीती असल्यास व त्याच्यावर भरवसा असल्यास आपण आपले समर्पण पूर्ण करू शकू किंवा नाही यासंबंधी आपल्या मनात असलेल्या कोणत्याही शंकांवर आपल्याला मात करता येईल. प्रेषित योहानाने लिहिले: “प्रीतिच्या ठायी भीति नसते; इतकेच नव्हे तर पूर्ण प्रीति भीति घालवून देते.” (१ योहान ४:१८) एखाद्या लहानशा मुलाला एकट्याने चालण्यास कदाचित भीती वाटत असेल, पण आपल्या वडिलांचा हात धरून चालताना त्याला कसलीही भीती वाटत नाही. त्याचप्रकारे, जर आपण यहोवावर आपल्या पूर्ण मनाने भरवसा ठेवला तर त्याचा हात धरून चालत असताना तो आपला ‘मार्गदर्शक होण्याचे’ वचन देतो.—नीतिसूत्रे ३:५, ६.

आदरणीय प्रसंग

१६. बाप्तिस्मा देण्याकरता एका व्यक्‍तीला पाण्यात पूर्णपणे का बुडवले जाते?

१६ बाप्तिस्म्याचा विधी सुरू होण्याआधी सहसा बायबलच्या आधारावर एक भाषण दिले जाते व त्यात ख्रिस्ती बाप्तिस्म्याची अर्थसूचकता स्पष्ट केली जाते. या भाषणाच्या शेवटी, बाप्तिस्मा घेऊ इच्छिणाऱ्‍यांना, बाप्तिस्म्याच्या दोन प्रश्‍नांचे उत्तर देऊन आपल्या विश्‍वासाचे जाहीर प्रकटन करण्याचे निवेदन केले जाते. (रोमकर १०:१०; पृष्ठ २२ वरील चौकट पाहा.) यानंतर बाप्तिस्मा घेऊ इच्छिणाऱ्‍यांना पाण्यात पूर्णपणे बुडवून बाप्तिस्मा दिला जातो. येशूचाही बाप्तिस्मा अशाच रितीने झाला होता. बायबलमध्ये सांगितले आहे की बाप्तिस्मा झाल्यावर येशू “पाण्यातून वर आला.” (मत्तय ३:१६; मार्क १:१०) याचाच अर्थ बाप्तिस्मा देणाऱ्‍या योहानाने त्याला पूर्णपणे पाण्यात बुडवले होते. * पाण्यात पूर्णपणे बुडवणे हे आपण आपल्या जीवनात केलेल्या अमूलाग्र परिवर्तनास सूचित करते—जणू आपले पूर्वीचे जीवन संपुष्टात येते, एका अर्थाने आपण मरतो आणि देवाच्या सेवेत पुन्हा नव्याने जीवन सुरू करतो.

१७. बाप्तिस्मा घेऊ इच्छिणारे व प्रेक्षक म्हणून उपस्थित राहणारे या प्रसंगाबद्दलचा आदरभाव कसा वाढवू शकतात?

१७ बाप्तिस्मा हा एक गंभीर तसाच आनंददायक प्रसंग आहे. बायबलमध्ये सांगितले आहे की योहानाने येशूला यार्देन नदीत बुडवले तेव्हा येशू प्रार्थना करत होता. (लूक ३:२१, २२) या उदाहरणास अनुसरून आजही बाप्तिस्मा घेऊ इच्छिणाऱ्‍या व्यक्‍तींनी या प्रसंगी आदरणीय पद्धतीने वागले पाहिजे. शिवाय बायबलमध्ये आपल्याला दररोजच शालीन पेहराव करण्याचे प्रोत्साहन दिलेले आहे. तर मग, आपल्या बाप्तिस्म्याच्या दिवशी आपण या मार्गदर्शनाकडे अधिकच गांभीर्याने लक्ष द्यायला नको का? (१ तीमथ्य २:९) केवळ प्रेक्षक म्हणून उपस्थित राहणाऱ्‍यांनी देखील बाप्तिस्म्याचे भाषण लक्षपूर्वक ऐकण्याद्वारे व सुव्यवस्थित पद्धतीने वागण्याद्वारे या प्रसंगाबद्दल आपला आदर व्यक्‍त केला पाहिजे.—१ करिंथकर १४:४०.

बाप्तिस्मा घेतलेल्या शिष्यांना मिळणारे आशीर्वाद

१८, १९. बाप्तिस्मा घेतल्यामुळे कोणते विशेषाधिकार व आशीर्वाद मिळतात?

१८ आपण स्वतःस देवाला समर्पित करून बाप्तिस्मा घेतो तेव्हा आपण एका विशेष कुटुंबाचे सदस्य बनतो. सर्वप्रथम यहोवा आपला पिता व मित्र बनतो. बाप्तिस्मा घेण्याआधी आपण देवापासून दुरावलेलो होतो; पण आता आपला त्याच्यासोबत समेट होतो. (२ करिंथकर ५:१९; कलस्सैकर १:२०) ख्रिस्ताच्या बलिदानाद्वारे आपण देवाच्या जवळ आलो आहोत व तोही आपल्या जवळ येतो. (याकोब ४:८) संदेष्टा मलाखी याने लिहिल्याप्रमाणे जे यहोवाचे नाव घेतात व जे त्याचे नाव धारण करतात त्यांच्याकडे यहोवा लक्ष देतो, त्यांचे ऐकतो आणि त्यांची नावे आपल्या स्मरणवहीत लिहून ठेवतो. देव म्हणतो: “ते माझा खास निधि होतील; जसा कोणी आपली सेवाचाकरी करणाऱ्‍या पुत्रावर दया करितो तसा मी त्यांजवर दया करीन.”—मलाखी ३:१६-१८.

१९ तसेच, बाप्तिस्मा घेतल्यामुळे आपण एका जागतिक बंधुसमाजाचे सदस्य बनतो. अनेक त्याग केल्याबद्दल ख्रिस्ताच्या शिष्यांना कोणते आशीर्वाद मिळतील असे प्रेषित पेत्राने विचारले तेव्हा येशूने पुढील आश्‍वासन दिले: “ज्या कोणी घरे, भाऊ, बहिणी, बाप, आई, मुले किंवा शेते माझ्या नावाकरिता सोडिली आहेत त्याला अनेकपटीने मिळून सार्वकालिक जीवन हे वतन मिळेल.” (मत्तय १९:२९) अनेक वर्षांनंतर पेत्राने सबंध ‘जगात’ निर्माण झालेल्या ‘बंधुवर्गाविषयी’ लिहिले. या प्रेमळ बंधुसमाजाकडून मिळणारा आधार व आशीर्वाद पेत्राने स्वतः अनुभवले होते.—१ पेत्र २:१७; ५:९.

२०. बाप्तिस्मा घेतल्याने कोणते अद्‌भुत भवितव्य आपल्याला प्राप्त होऊ शकेल?

२० शिवाय, येशूने सांगितले होते की जे त्याचे अनुसरण करतील त्यांना “सार्वकालिक जीवन हे वतन मिळेल.” होय, समर्पण व बाप्तिस्मा घेतल्यामुळे देवाच्या नव्या जगातील सार्वकालिक जीवन अर्थात “खरे जीवन” मिळण्याची आशा आपल्याला प्राप्त होते. (१ तीमथ्य ६:१९) आपल्याकरता व आपल्या कुटुंबांकरता आपण यापेक्षा चांगल्या भविष्याची पायाभरणी करू शकतो का? या अद्‌भुत भवितव्यामुळे आपण “यहोवा [आपला] देव याच्या नावाने सदासर्वकाल चालत जाऊ.”—मीखा ४:५, पं.र.भा. (w०६ ४/१)

[तळटीपा]

^ परि. 4 पेन्टेकॉस्टच्या दिवशी पेत्राचे भाषण ऐकणाऱ्‍या तीन हजार यहुद्यांनी व यहुदी मतानुसाऱ्‍यांनीही लगेच बाप्तिस्मा घेतला. अर्थात, इथियोपियन मनुष्याप्रमाणेच त्यांनाही देवाच्या वचनातील मूलभूत शिकवणुकी व तत्त्वे माहीत होती.—प्रेषितांची कृत्ये २:३७-४१.

^ परि. 16 व्हाईन्स एक्सपोझिटरी डिक्शनरी ऑफ द न्यू टेस्टमेंट वड्‌र्स यात सांगितल्याप्रमाणे बॅप्टिस्मा हा ग्रीक शब्द मुळात “बुडवण्याच्या, [पाण्याखाली] जाण्याच्या व बाहेर येण्याच्या” क्रियेला सूचित करतो.

तुम्ही स्पष्ट करू शकता का?

• आपण यहोवाच्या प्रेमाला कसा व का प्रतिसाद द्यावा?

• बाप्तिस्मा घेण्याआधी एका व्यक्‍तीची कितपत आध्यात्मिक प्रगती झालेली असली पाहिजे?

• अयशस्वी होण्याच्या भीतीने किंवा जबाबदारी स्वीकारणे नकोसे वाटत असल्यामुळे आपण बाप्तिस्मा घेण्यापासून मागे का हटू नये?

• येशू ख्रिस्ताच्या बाप्तिस्मा घेतलेल्या शिष्यांना कोणते अद्‌भुत आशीर्वाद मिळतात?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२६ पानांवरील चित्र]

“मला बाप्तिस्मा घेण्यास काय हरकत आहे?”

[२९ पानांवरील चित्रे]

बाप्तिस्मा हा एक गंभीर तसाच आनंददायक प्रसंग आहे