व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

‘जाऊन लोकांस शिष्य करा, त्यांस बाप्तिस्मा द्या’

‘जाऊन लोकांस शिष्य करा, त्यांस बाप्तिस्मा द्या’

‘जाऊन लोकांस शिष्य करा, त्यांस बाप्तिस्मा द्या’

“तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा; त्यांस . . . बाप्तिस्मा द्या; जे काही मी तुम्हाला आज्ञापिले ते सर्व त्यांस पाळावयास शिकवा.”—मत्तय २८:१९, २०.

१. इस्राएल राष्ट्राने सिनाय पर्वताच्या पायथ्याशी कोणता निर्णय घेतला?

 सुमारे ३,५०० वर्षांपूर्वी एका सबंध राष्ट्राने देवाला एक शपथ वाहिली. सिनाय पर्वताच्या पायथ्याशी एकत्रित झालेल्या इस्राएली लोकांनी खुलेआम घोषित केले की, “परमेश्‍वराने सांगितले आहे ते सर्व आम्ही करू.” त्या क्षणापासून इस्राएल हे देवाला समर्पिलेले राष्ट्र, त्याचा “खास निधि” बनले. (निर्गम १९:५, ८; २४:३) देवाच्या संरक्षणाखाली पिढ्यान्‌पिढ्या, “दुधामधाचे प्रवाह वाहत” असलेल्या देशात राहण्याचे ते स्वप्न पाहू लागले.—लेवीय २०:२४.

२. आज लोक देवासोबत कशाप्रकारचा नातेसंबंध जोडू शकतात?

पण स्तोत्रकर्त्या आसाफने कबूल केल्याप्रमाणे, इस्राएली लोकांनी “देवाचा करार पाळिला नाही; त्याच्या नियमशास्त्राप्रमाणे चालावयास ते कबूल नव्हते.” (स्तोत्र ७८:१०) त्यांच्या वाडवडिलांनी यहोवाला वाहिलेली शपथ त्यांनी पूर्ण केली नाही. त्यामुळे शेवटी या राष्ट्राचा देवासोबत असलेला अनोखा नातेसंबंध त्यांनी गमवला. (उपदेशक ५:४; मत्तय २३:३७, ३८) म्हणूनच देवाने “परराष्ट्रीयांतून आपल्या नावाकरिता काही लोक काढून घ्यावे” असे ठरवले. (प्रेषितांची कृत्ये १५:१४) आणि या शेवटल्या काळात तो “सर्व राष्ट्रे, वंश, लोक व निरनिराळ्या भाषा बोलणारे ह्‍यांच्यापैकी कोणाला मोजता [येत] नाही असा, . . . मोठा लोकसमुदाय” एकत्रित करत आहे. हे सर्व लोक आनंदाने उच्च स्वरात म्हणतात: “राजासनावर बसलेल्या आमच्या देवाकडून व कोकऱ्‍याकडून, तारण आहे.”—प्रकटीकरण ७:९, १०.

३. देवासोबत वैयक्‍तिक नातेसंबंध जोडण्याकरता एका व्यक्‍तीने कोणती पावले उचलली पाहिजेत?

ज्यांचा देवासोबत असा अनमोल नातेसंबंध आहे अशा लोकांमध्ये सामील होण्याची एखाद्या व्यक्‍तीची इच्छा असल्यास, तिने स्वतःस यहोवाला समर्पित केले पाहिजे व पाण्याचा बाप्तिस्मा घेऊन हे जाहीर केले पाहिजे. येशूने आपल्या शिष्यांना दिलेल्या आज्ञेचे पालन करण्याकरता असे करणे आवश्‍यक आहे. येशूने म्हटले होते: “तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा; त्यांस पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या; जे काही मी तुम्हाला आज्ञापिले ते सर्व त्यांस पाळावयास शिकवा.” (मत्तय २८:१९, २०) इस्राएल लोकांना “कराराचे पुस्तक” वाचून दाखवण्यात आले. (निर्गम २४:३, ७, ८) ते ऐकून त्यांना यहोवाप्रती आपली कोणती कर्तव्ये आहेत हे समजले. त्याचप्रकारे आजही बाप्तिस्म्याचे पाऊल उचलण्याआधी देवाचे वचन बायबल यातून त्याच्या इच्छेविषयी अचूक ज्ञान घेणे आवश्‍यक आहे.

४. बाप्तिस्मा घेण्याची योग्यता प्राप्त करण्याकरता एका व्यक्‍तीने काय केले पाहिजे? (वरील चौकोनातील माहितीचा समावेश करावा.)

यावरून स्पष्ट होते की बाप्तिस्मा घेण्याआधी आपल्या शिष्यांना विश्‍वास धरण्याकरता पक्का आधार मिळावा अशी येशूची इच्छा होती. त्याने आपल्या अनुयायांना केवळ जाऊन शिष्य बनवा असे सांगितले नाही, तर त्या शिष्यांना “मी तुम्हाला आज्ञापिले ते सर्व पाळावयास शिकवा” असे सांगितले. (मत्तय ७:२४, २५; इफिसकर ३:१७-१९) त्याअर्थी, ज्यांनी बाप्तिस्मा घेण्याची योग्यता गाठली आहे त्यांनी सहसा काही महिन्यांपर्यंत किंवा एकदोन वर्षे बायबलचा अभ्यास केलेला असतो. यामुळे त्यांचा निर्णय हा उतावीळपणाने किंवा अपुऱ्‍या ज्ञानाच्या आधारावर घेतलेला नसतो. बाप्तिस्मा घेऊ इच्छिणाऱ्‍या व्यक्‍ती, प्रत्यक्ष बाप्तिस्म्याच्या वेळी दोन महत्त्वाच्या प्रश्‍नांना होकारार्थी उत्तर देतात. “तुमचे बोलणे, होय तर होय, नाही तर नाही, एवढेच असावे,” असे येशूने निक्षून सांगितले होते. तेव्हा बाप्तिस्म्याच्या वेळी विचारल्या जाणाऱ्‍या या दोन प्रश्‍नांचा अर्थ समजून घेणे आपल्या सर्वांकरता उपयुक्‍त ठरेल.—मत्तय ५:३७.

पश्‍चात्ताप व समर्पण

५. बाप्तिस्म्याच्या पहिल्या प्रश्‍नावरून कोणती दोन महत्त्वाची पावले उचलण्याचे महत्त्व स्पष्ट होते?

बाप्तिस्म्याच्या पहिल्या प्रश्‍नात, बाप्तिस्मा घेऊ इच्छिणाऱ्‍या व्यक्‍तीला विचारले जाते की तुम्ही आपल्या पूर्वीच्या जीवनाबद्दल पश्‍चात्ताप करून आपले जीवन यहोवाची इच्छा पूर्ण करण्याकरता त्याला समर्पित केले आहे का? या प्रश्‍नावरून बाप्तिस्मा घेण्याआधी कोणती दोन पावले उचलणे आवश्‍यक आहे हे स्पष्ट होते, अर्थात, पश्‍चात्ताप व समर्पण.

६, ७. (क) बाप्तिस्मा घेऊ इच्छिणाऱ्‍या सर्वांनी पश्‍चात्ताप करणे का महत्त्वाचे आहे? (ख) पश्‍चात्ताप केल्यानंतर एका व्यक्‍तीने कोणते बदल केले पाहिजेत?

बाप्तिस्मा घेण्याआधी पश्‍चात्ताप करणे का महत्त्वाचे आहे? प्रेषित पौल याविषयी खुलासा करतो: “आम्हीहि सर्व पूर्वी आपल्या दैहिक वासनांना अनुरुप असे वागलो.” (इफिसकर २:३) देवाच्या इच्छेविषयी अचूक ज्ञान मिळण्याआधी आपण या जगाच्या अनुरूप जीवन जगत होतो. जगिक मूल्ये व आदर्श यांनुसार विचार करत होतो. आपले जीवन या जगाचे दैवत, सैतान याच्या नियंत्रणात होते. (२ करिंथकर ४:४) पण देवाच्या इच्छेविषयीचे ज्ञान मिळाल्यानंतर मात्र आपण “माणसांच्या वासनांप्रमाणे नव्हे तर देवाच्या इच्छेप्रमाणे” जीवन जगायचे ठरवले.—१ पेत्र ४:२.

या नव्या मार्गावर चालल्यामुळे अनेक आशीर्वाद आपल्याला मिळतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, यामुळे एक व्यक्‍ती यहोवासोबत अनमोल असा नातेसंबंध जोडू शकते. दाविदाने याची तुलना, देवाच्या “मंडपात” किंवा “पवित्र डोंगरावर” येण्याकरता मिळालेल्या निमंत्रणाशी केली. निश्‍चितच हा एक मोठा बहुमान आहे! (स्तोत्र १५:१) साहजिकच, यहोवा कोणालाही आपल्या मंडपात निमंत्रित करणार नाही, तर फक्‍त अशाच मनुष्याला की “जो सात्विकतेने चालतो व नीतीने वागतो, [व] मनापासून सत्य बोलतो.” (स्तोत्र १५:२) सत्याचे ज्ञान मिळण्यापूर्वी आपली परिस्थिती वेगळी होती. व त्यानुसार, देवाच्या या अटी पूर्ण करण्याकरता आपल्याला आपल्या जीवनात, म्हणजे, आपल्या वागण्याबोलण्यात व व्यक्‍तिमत्त्वात काही बदल करावे लागतील. (१ करिंथकर ६:९-११; कलस्सैकर ३:५-१०) हे बदल करण्याची प्रेरणा आपल्याला पश्‍चात्तापामुळेच मिळते. अर्थात, आपण पूर्वी ज्या मार्गाने चालत होतो त्याबद्दल आपल्याला मनापासून खेद वाटणे आणि यापुढे यहोवाला आनंद वाटेल अशाच मार्गाने चालण्याचा निर्धार करणे महत्त्वाचे आहे. असे केल्यामुळे आपण आपल्या मार्गातून मागे फिरतो—स्वार्थी, जगिक जीवनशैली त्यागून देवाची संमती असलेल्या मार्गाने चालू लागतो.—प्रेषितांची कृत्ये ३:१९.

८. आपण समर्पण कशाप्रकारे करतो आणि त्याचा बाप्तिस्म्याशी कसा संबंध आहे?

बाप्तिस्म्याच्या पहिल्या प्रश्‍नातच, बाप्तिस्मा घेऊ इच्छिणाऱ्‍या व्यक्‍तीला असेही विचारले जाते की तुम्ही स्वतःस यहोवाला त्याची इच्छा पूर्ण करण्याकरता समर्पित केले आहे का? बाप्तिस्मा घेण्याआधी समर्पण करणे अत्यावश्‍यक आहे. हे समर्पण प्रार्थनेत केले जाते. आपण आपले जीवन ख्रिस्ताद्वारे यहोवाच्या स्वाधीन करू इच्छितो असे आपण त्या प्रार्थनेत यहोवाला कळवतो. (रोमकर १४:७, ८; २ करिंथकर ५:१५) यानंतर आपण यहोवाच्या मालकीचे होतो आणि येशूप्रमाणेच आपण देवाच्या इच्छेनुसार करण्यात आनंद मानतो. (स्तोत्र ४०:८; इफिसकर ६:६) समर्पणाची ही गंभीर प्रतिज्ञा यहोवाला केवळ एकदाच केली जाते. पण आपण हे समर्पण एकांतात करत असल्यामुळे बाप्तिस्म्याच्या दिवशी ते जाहीर करण्याद्वारे आपण सर्वांना हे कळू देतो की आपण आपल्या स्वर्गीय पित्याला आपले जीवन समर्पित केले आहे.—रोमकर १०:१०.

९, १०. (क) देवाची इच्छा आपण कशी पूर्ण करू शकतो? (ख) नात्सी अधिकाऱ्‍यांनीही यहोवाच्या साक्षीदारांचे समर्पण कशाप्रकारे कबूल केले?

देवाची इच्छा पूर्ण करण्याकरता येशूच्या उदाहरणाचे अनुकरण आपण कसे करू शकतो? येशूने आपल्या शिष्यांना सांगितले: “माझ्यामागे येण्याची कोणाची इच्छा असेल तर त्याने स्वतःचा त्याग करावा व आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे.” (मत्तय १६:२४) येथे त्याने अशा तीन गोष्टींचा उल्लेख केला की ज्या आपण केल्या पाहिजेत. सर्वप्रथम आपण स्वतःचा “त्याग” करतो. दुसऱ्‍या शब्दांत, आपल्या स्वार्थी, अपरिपूर्ण इच्छांना आपण नाकारतो आणि देवाचे मार्गदर्शन स्वीकारण्याची तयारी दाखवतो. दुसरी गोष्ट म्हणजे आपण ‘आपला वधस्तंभ उचलतो.’ येशूच्या काळात वधस्तंभ लज्जेचे व दुःखाचे प्रतीक होते. ख्रिस्ती या नात्याने आपण सुवार्तेमुळे आपल्याला जे काही दुःख सहन करावे लागेल ते स्वीकारतो. (२ तीमथ्य १:८) जगातले लोक कदाचित आपली थट्टा किंवा अपमान करतील पण ख्रिस्ताप्रमाणे, आपण “लज्जा तुच्छ मानून” देवाला संतोषवीत आहोत यातच आनंद मानतो. (इब्री लोकांस १२:२) आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपण सदोदीत येशूला ‘अनुसरतो.’—स्तोत्र ७३:२६; ११९:४४; १४५:२.

१० विशेष म्हणजे, यहोवाच्या साक्षीदारांचा विरोध करणारे काहीजण कबूल करतात की हे लोक देवाला पूर्णपणे समर्पित आहेत. उदाहरणार्थ, नात्सी जर्मनीतील, बुशनवॉल्ड छळ छावणीत ज्या साक्षीदारांनी आपला विश्‍वास त्यागण्यास नकार दिला त्यांना पुढील छापील विधानावर हस्ताक्षर करायला लावण्यात आले: “मी अजूनही एक बायबल विद्यार्थी या नात्याने वचनबद्ध असून यहोवाला दिलेले वचन मी कधीही तोडणार नाही.” खरोखर या शब्दांवरून देवाच्या समर्पित, विश्‍वासू सेवकांच्या भावना अगदी अचूक व्यक्‍त होतात.—प्रेषितांची कृत्ये ५:३२.

यहोवाचे साक्षीदार म्हणून आपली ओळख

११. बाप्तिस्मा घेणाऱ्‍या व्यक्‍तीला कोणता बहुमान प्राप्त होतो?

११ दुसऱ्‍या प्रश्‍नात, बाप्तिस्मा घेण्यास इच्छुक व्यक्‍तीला असे विचारले जाते की बाप्तिस्मा घेतल्यावर तुम्हाला यहोवाचे साक्षीदार म्हणून ओळखले जाईल याची जाणीव आहे का? पाण्याचा बाप्तिस्मा घेतल्यानंतर ती व्यक्‍ती यहोवाचे नाव धारण करणारा नियुक्‍त सेवक बनते. हा एक बहुमान तर आहेच पण त्यासोबत एक महत्त्वाची जबाबदारी देखील येते. तसेच बाप्तिस्मा घेतल्यानंतर, त्या व्यक्‍तीला सार्वकालिक तारण होण्याची आशा मिळते, अर्थात ती शेवटपर्यंत यहोवाला विश्‍वासू राहिली तर.—मत्तय २४:१३.

१२. यहोवाचे नाव धारण करण्यासोबतच आपल्यावर कोणते कर्तव्य येते?

१२ निश्‍चितच, सर्वसमर्थ देवाचे अर्थात यहोवाचे नाव धारण करण्यापेक्षा मोठा बहुमान असूच शकत नाही. संदेष्टा मीखा याने म्हटले: “सर्व राष्ट्रे आपापल्या दैवतांच्या नावाने चालत आहेत; पण आम्ही परमेश्‍वर आमचा देव याच्या नावाने सदासर्वकाळ चालू.” (मीखा ४:५) पण या बहुमानासोबतच एक कर्तव्यही आपल्यावर येते. आपण धारण केलेल्या या नावाचे गौरव होईल अशा प्रकारे जगण्याचा आपण सदोदीत प्रयत्न केला पाहिजे. पौलाने रोममधील ख्रिस्ती बांधवांना आठवण करून दिली की जर एखादी व्यक्‍ती इतरांना उपदेश करते पण स्वतः त्यानुसार चालत नाही तर तिच्यामुळे “देवाच्या नावाची निंदा” किंवा अनादर होतो.—रोमकर २:२१-२४.

१३. यहोवाच्या समर्पित साक्षीदारांवर त्याच्याबद्दल साक्ष देण्याची जाबाबदारी का आहे?

१३ एक व्यक्‍ती यहोवाची साक्षीदार बनते तेव्हा आपल्या देवाबद्दल इतरांना साक्ष देण्याची जबाबदारी देखील ती स्वीकारते. यहोवाने इस्राएल राष्ट्राला आपल्या वतीने साक्षीदार होण्याचे, व आपल्या सनातन देवत्वाबद्दल ग्वाही देण्याचे निवेदन केले. (यशया ४३:१०-१२, २१) पण इस्राएल राष्ट्राने ही जबाबदारी पार पाडली नाही व शेवटी त्यांनी यहोवाची कृपादृष्टी पूर्णपणे गमावली. आज खऱ्‍या ख्रिश्‍चनांना यहोवाबद्दल साक्ष देण्याच्या बहुमानाबद्दल अभिमान वाटतो. कारण आपले त्याच्यावर प्रेम आहे आणि त्याचे नाव पवित्र केले जावे अशी आपली मनापासून इच्छा आहे. आपला स्वर्गीय पिता व त्याच्या उद्देशाबद्दल सत्य माहीत असताना आपण शांत कसे राहू शकतो? आपल्या भावना प्रेषित पौलासारख्याच आहेत. त्याने म्हटले: “मला [सुवार्ता] सांगणे भाग आहे; कारण मी सुवार्ता सांगितली नाही तर माझी केवढी दुर्दशा होणार!”—१ करिंथकर ९:१६.

१४, १५. (क) यहोवाच्या संघटनेची आपल्या आध्यात्मिक वाढीत कोणती भूमिका आहे? (ख) आपल्याला आध्यात्मिकरित्या मदत करण्याकरता देवाने कोणत्या तरतुदी केल्या आहेत?

१४ बाप्तिस्म्याचा दुसरा प्रश्‍न, यहोवाच्या आत्म्याने मार्गदर्शित होणाऱ्‍या संघटनेसोबत कार्य करण्याच्या जबाबदारीचीही आठवण करून देतो. देवाची सेवा करण्यात आपण एकटे नाही आणि आपल्याला आपल्या संपूर्ण ‘बंधुवर्गाच्या’ मदतीची, आधाराची व प्रोत्साहनाची गरज आहे. (१ पेत्र २:१७; १ करिंथकर १२:१२, १३) देवाची संघटना आपल्या आध्यात्मिक प्रगतीला महत्त्वाचा हातभार लावते. ती विपुल प्रमाणात बायबलची प्रकाशने पुरवते. ही प्रकाशने आपल्याला अचूक ज्ञानात वाढण्यास, आपल्यासमोर समस्या येतात तेव्हा सुज्ञतेने वागण्यास व देवासोबत जवळचा नातेसंबंध जोडण्यास मदत करते. आई ज्याप्रकारे आपल्या मुलांना पोटभर अन्‍न देण्याविषयी व त्यांच्या इतर गरजा भागवण्याविषयी जागरूक असते त्याचप्रकारे, ‘विश्‍वासू व बुद्धिमान दास’ आपल्या आधात्मिक प्रगतीकरता विपुल प्रमाणात समयोचित आध्यात्मिक अन्‍न पुरवतो.—मत्तय २४:४५-४७; १ थेस्सलनीकाकर २:७, ८.

१५ दर आठवड्याच्या सभांत यहोवाच्या लोकांना, त्याचे साक्षीदार या नात्याने विश्‍वासूपणे सेवा करत राहण्याकरता आवश्‍यक प्रशिक्षण व प्रोत्साहन दिले जाते. (इब्री लोकांस १०:२४, २५) ईश्‍वरशासित सेवा प्रशाला आपल्याला चारचौघांसमोर बोलण्याचे प्रशिक्षण देते; तर सेवा सभेत आपल्याला सुवार्ता परिणामकारकरित्या कशी सादर करावी यासंबंधी मार्गदर्शन केले जाते. सभांमधून तसेच बायबल प्रकाशनांच्या आपल्या वैयक्‍तिक अभ्यासातूनही आपल्याला यहोवाचा आत्मा कशाप्रकारे त्याच्या संघटनेचे मार्गदर्शन करत आहे हे दिसून येते. या नियमित तरतुदींच्या माध्यमाने देव आपल्याला धोकेदायक गोष्टींबद्दल सावध करतो, परिणामकारक सुवार्तिक होण्याचे प्रशिक्षण देतो व आध्यात्मिकरित्या जागृत राहण्याकरता मदत देतो.—स्तोत्र १९:७, ८, ११; १ थेस्सलनीकाकर ५:६, ११; १ तीमथ्य ४:१३.

निर्णय घेण्यामागची प्रेरणा

१६. यहोवाला आपले जीवन समर्पित करण्यास आपल्याला कशामुळे प्रेरणा मिळते?

१६ अशारितीने, बाप्तिस्म्याच्या वेळी विचारले जाणारे दोन प्रश्‍न बाप्तिस्मा घेऊ इच्छिणाऱ्‍या व्यक्‍तीला पाण्याने बाप्तिस्मा घेण्याची अर्थसूचकता व त्यासोबत येणाऱ्‍या जबाबदाऱ्‍यांची आठवण करून देतात. तर मग, बाप्तिस्म्याचा निर्णय घेण्यामागची प्रेरणा काय असावी? कोणी आपल्यावर जबरदस्ती करते म्हणून नव्हे तर यहोवा आपल्याला ‘आकर्षितो’ म्हणून आपण बाप्तिस्मा घेतो. (योहान ६:४४) “देव प्रीति आहे,” त्यामुळे तो या विश्‍वावर आपल्या शक्‍तीच्या जोरावर नव्हे तर प्रेमाने राज्य करतो. (१ योहान ४:८) यहोवाच्या ठायी असलेले प्रेमळ गुण व तो आपल्याशी ज्या पद्धतीने व्यवहार करतो त्यामुळे आपण त्याच्याकडे आकर्षित होतो. यहोवाने आपला एकुलता एक पुत्र आपल्याकरता दिला आणि भविष्याकरता तो आपल्याला सर्वोत्तम आशा देऊ करतो. (योहान ३:१६) या सर्व गोष्टींबद्दल कृतज्ञतेने आपणही त्याला आपले जीवन अर्पण करण्यास किंवा समर्पित करण्यास प्रेरित होतो.—नीतिसूत्रे ३:९; २ करिंथकर ५:१४, १५.

१७. आपण स्वतःस कशाला समर्पित केलेले नाही?

१७ आपण स्वतःस कोणत्याही कार्याला नव्हे तर खुद्द यहोवाला समर्पित करतो. देवाने आपल्या लोकांवर सोपवलेले कार्य बदलू शकते पण त्यांचे समर्पण कायम राहील. उदाहरणार्थ, अब्राहामला देवाने जे करायला सांगितले होते ते यिर्मयाला त्याने जे करायला सांगितले त्यापेक्षा अगदी वेगळे होते. (उत्पत्ति १३:१७, १८; यिर्मया १:६, ७) तरीसुद्धा त्या दोघांनीही देवाने त्यांना सांगितलेले विशिष्ट कार्य पार पाडले कारण त्यांचे यहोवावर प्रेम होते आणि त्याच्या इच्छेप्रमाणे विश्‍वासूपणे करण्याची त्यांची इच्छा होती. या शेवटल्या काळात, ख्रिस्ताचे बाप्तिस्मा घेतलेले सर्व अनुयायी ख्रिस्ताने आज्ञा दिल्यानुसार राज्याच्या सुवार्तेची घोषणा करण्याचा व शिष्य बनवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतात. (मत्तय २४:१४; २८:१९, २०) हे कार्य मनापासून करण्याद्वारे आपण आपल्या स्वर्गीय पित्याबद्दल आपल्याला असणारे प्रेम व्यक्‍त करू शकतो व आपण खरोखरच त्याला समर्पित आहोत हे दाखवू शकतो.—१ योहान ५:३.

१८, १९. (क) बाप्तिस्मा घेण्याद्वारे आपण कोणते जाहीर विधान करत असतो? (ख) पुढील लेखात कशाविषयी चर्चा केली जाईल?

१८ बाप्तिस्मा घेतल्यामुळे आपल्याला अनेक आशीर्वाद प्राप्त होतात यात शंकाच नाही पण हे गंभीरपणे विचार न करता उचलण्याचे पाऊल नाही. (लूक १४:२६-३३) आपल्या इतर सर्व जबाबदाऱ्‍यांपेक्षा अधिक महत्त्वाचा एक निर्धार आपण बाप्तिस्मा घेऊन व्यक्‍त करत असतो. (लूक ९:६२) आपण बाप्तिस्मा घेतो तेव्हा खरे तर आपण जाहीरपणे असे म्हणत असतो की “हा देव आमचा सनातन देव आहे; तो सर्वकाळ आमचा मार्गदर्शक होईल.”—स्तोत्र ४८:१४.

१९ पुढील लेखात पाण्याच्या बाप्तिस्म्याशी संबंधित आणखी काही प्रश्‍नांचे परीक्षण केले जाईल. एखाद्या व्यक्‍तीला बाप्तिस्मा घेण्यापासून रोखू शकणारी काही सयुक्‍तिक कारणे असू शकतात का? वयोमर्यादेचा विचार केला जावा का? बाप्तिस्म्याचा प्रसंग आदरणीय रित्या पार पाडण्याकरता सर्वजण कशाप्रकारे योगदान देऊ शकतात? (w०६ ४/१)

तुम्ही स्पष्ट करू शकता का?

• प्रत्येक ख्रिस्ती व्यक्‍तीने बाप्तिस्मा घेण्याअगोदर पश्‍चात्ताप करणे का आवश्‍यक आहे?

• देवाला समर्पण करण्याचा काय अर्थ होतो?

• यहोवाचे नाव धारण करण्याच्या बहुमानासोबतच कोणत्या जबाबदाऱ्‍या आपल्यावर येतात?

• बाप्तिस्म्याचा निर्णय घेण्याची प्रेरणा आपल्याला कशामुळे मिळाली पाहिजे?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२२ पानांवरील चौकट/चित्र]

बाप्तिस्म्याचे दोन प्रश्‍न

येशू ख्रिस्ताच्या बलिदानाच्या आधारावर तुम्ही आपल्या पापांबद्दल पश्‍चात्ताप करून स्वतःस यहोवाची इच्छा पूर्ण करण्याकरता त्याला समर्पित केले आहे का?

तुमच्या समर्पणामुळे व बाप्तिस्म्यामुळे तुम्हाला देवाच्या आत्म्याने मार्गदर्शित असणाऱ्‍या त्याच्या संघटनेसोबत कार्य करणारा एक यहोवाचा साक्षीदार या रूपात ओळखले जाईल याची तुम्हाला जाणीव आहे का?

[२३ पानांवरील चित्र]

समर्पण हे यहोवाला प्रार्थनेत दिलेले महत्त्वपूर्ण वचन आहे

[२५ पानांवरील चित्र]

आपल्या प्रचार कार्यातून देवाला आपण समर्पित आहोत हे दिसून येते