आपले हात दृढ करा
आपले हात दृढ करा
“संदेष्ट्यांची ही वचने या समयी जे तुम्ही ऐकत आहा, ते तुम्ही आपले हात दृढ करा.”—जखऱ्या ८:९.
१, २. हाग्गय व जखऱ्या या पुस्तकांकडे आपण का लक्ष द्यावे?
हाग्गय व जखऱ्या यांनी घोषित केलेले भविष्यवाद आजपासून जवळजवळ २,५०० वर्षांपूर्वी लिहिण्यात आले होते. पण तरीसुद्धा ते आजही तुमच्या जीवनाकरता समर्पक आहेत. बायबलच्या या दोन पुस्तकांत सापडणारे अहवाल केवळ इतिहास सांगत नाहीत. तर ही दोन पुस्तके देखील, ‘आपल्या शिक्षणाकरिता पूर्वी लिहिण्यात आलेल्या शास्त्रात’ समाविष्ट आहेत. (रोमकर १५:४) यात आपण जे वाचतो त्यापैकी बऱ्याच गोष्टी, १९१४ साली स्वर्गात देवाचे राज्य स्थापन झाल्यानंतर ज्या घटना घडल्या त्यांची आठवण करून देतात.
२ देवाच्या लोकांनी पुरातन काळात अनुभवलेल्या घटना व परिस्थितींच्या संदर्भात प्रेषित पौलाने असे लिहिले: “ह्या गोष्टी उदाहरणादाखल त्यांच्यावर गुदरल्या आणि जे आपण युगाच्या समाप्तीप्रत येऊन पोहचलो आहोत त्या आपल्या बोधासाठी त्या लिहिल्या आहेत.” (१ करिंथकर १०:११) त्याअर्थी, ‘हाग्गय व जखऱ्या या पुस्तकांतील माहिती आपल्या काळात कशाप्रकारे उपयुक्त ठरते?’ हे जाणून घेण्याची नक्कीच तुम्हाला उत्सुकता वाटत असेल.
३. हाग्गय व जखऱ्या यांच्या संदेशांचा रोख कशावर होता?
३ याआधीच्या लेखात सांगितल्याप्रमाणे, हाग्गय व जखऱ्याचे भविष्यवाद लिहिण्यात आले तेव्हा यहुदी लोक बॅबिलोनच्या बंदिवासातून मुक्त होऊन, देवाने त्यांना दिलेल्या त्यांच्या मायदेशी परत आले होते. या दोन संदेष्ट्यांनी घोषित केलेल्या संदेशांचा रोख विशेषतः मंदिराच्या पुनर्निर्माणावर होता. यहुद्यांनी सा.यु.पू. ५३६ साली मंदिराचा पाया घातला. या प्रसंगी वयस्क यहुद्यांपैकी काहीजण गतकाळातील आठवणींनी व्याकूळ झाले, पण एकंदर हा प्रसंग अतिशय ‘हर्षभरीत’ होता. खरे पाहता, आपल्या काळात याहीपेक्षा जास्त लक्षणीय असे काहीतरी घडले आहे आहे. ते काय आहे?—एज्रा ३:३-१३.
४. पहिल्या महायुद्धानंतर काही काळातच काय घडले?
४ पहिल्या महायुद्धानंतर काही काळातच यहोवाच्या अभिषिक्त जनांना मोठ्या बाबेलच्या बंदिवासातून मुक्तता मिळाली. यहोवा त्यांच्या पाठीशी आहे याचा हा एक महत्त्वाचा पुरावा होता. पूर्वी असे भासत होते जणू धर्मपुढाऱ्यांनी व त्यांच्या राजकीय समर्थकांनी मिळून बायबल विद्यार्थ्यांच्या प्रचार व शिक्षण कार्याला पुरती खीळ घातली आहे. (एज्रा ४:८, १३, २१-२४) पण हे प्रचाराचे व शिक्षणाचे कार्य अखंड सुरू राहण्याकरता यहोवा देवाने सर्व अडथळे दूर केले. १९१९ नंतरच्या दशकांत राज्याचे कार्य वृद्धिंगत होत गेले आहे आणि कोणतीही गोष्ट त्याच्या प्रगतीत बाधा बनू शकली नाही.
५, ६. जखऱ्या ४:७ यातील शब्द कोणत्या महान कार्यसिद्धीला सूचित करतात?
५ आपल्या काळात यहोवाचे आज्ञाधारक सेवक प्रचाराचे व शिक्षण देण्याचे जे कार्य करत आहेत ते त्याच्या साहाय्याने अखंड सुरू राहील याची आपण खात्री बाळगू शकतो. जखऱ्या ४:७ या वचनात म्हटले आहे: “तो त्यावर अनुग्रह, त्यावर अनुग्रह, असा गजर करीत कोनशिला पुढे आणील.” आपल्या काळात हे शब्द कोणत्या महान कार्यसिद्धीला सूचित करतात?
६ सार्वभौम प्रभू यहोवाची खरी उपासना जेव्हा त्याच्या आत्मिक मंदिराच्या पृथ्वीवरील अंगणात परिपूर्ण स्थितीत येईल तेव्हाच्या काळाला जखऱ्या ४:७ यातील शब्द सूचित करतात. हे आत्मिक मंदिर म्हणजे, ख्रिस्त येशूच्या समतुल्य बलिदानाच्या आधारावर यहोवाची उपासना करण्याकरता स्वतः यहोवाने केलेली तरतूद. अर्थात, हे महान आत्मिक मंदिर सा.यु. पहिल्या शतकापासूनच अस्तित्वात आहे. पण या मंदिराच्या पृथ्वीवरील अंगणात खऱ्या उपासनेला परिपूर्ण स्थितीत आणले जाणे अद्याप बाकी आहे. आज आत्मिक मंदिराच्या पृथ्वीवरील अंगणात लाखो उपासक देवाची सेवा करत आहेत. हे लाखो उपासक व अगणित पुनरुत्थित जन येशू ख्रिस्ताच्या हजार वर्षांच्या शासनकाळात परिपूर्ण बनतील. हजार वर्षांच्या शेवटास पूर्णपणे स्वच्छ केलेल्या पृथ्वीवर केवळ देवाचे खरे उपासक उरतील.
७. आपल्या काळात खऱ्या उपासनेला परिपूर्ण स्थितीत आणण्याकरता येशू कोणती भूमिका बजावतो आणि हे जाणून आपल्याला प्रोत्साहन का मिळते?
७ सा.यु.पू. ५१५ साली मंदिराचे कार्य पूर्ण झाले तेव्हा प्रांताधिकारी जरूब्बाबेल आणि महायाजक यहोशवा उपस्थित होते. जखऱ्या ६:१२, १३ यात, खऱ्या उपासनेला परिपूर्ण स्थितीत आणण्यात येशूच्या तुलनीय भूमिकेविषयी भाकीत करण्यात आले होते: “सेनाधीश परमेश्वर म्हणतो, पाहा, एक पुरुष, ज्याचे नाव कोंब असे आहे तो आपल्या स्थानी उगवेल व तो परमेश्वराचे मंदिर बांधील; . . . तो वैभवशाली होईल व आपल्या सिंहासनावर बसून सत्ता चालवील; तो आपल्या सिंहासनावर याजकहि होईल.” दाविदाच्या कुळातील राजांच्या मालिकेला ज्याच्यामुळे पुन्हा कोंब फुटले तो येशू स्वर्गात आहे आणि तो स्वतः आत्मिक मंदिरातील राज्याच्या कार्याला पाठिंबा देत आहे; तेव्हा, या कार्याच्या प्रगतीला कोणीही खीळ घालू शकेल का? मुळीच नाही! ही खात्री मिळाल्यामुळे, दैनंदिन जीवनाच्या विवंचनांनी विचलित न होता, विश्वासूपणे आपले सेवाकार्य करत राहण्याचे प्रोत्साहन आपल्याला मिळत नाही का?
जीवनात सर्वात महत्त्वाचे कार्य कोणते?
८. आत्मिक मंदिराच्या कार्याला आपण आपल्या जीवनात सर्वात महत्त्वाचे स्थान का दिले पाहिजे?
८ यहोवाचा आशीर्वाद मिळण्याकरता, आपण त्याच्या आत्मिक मंदिराच्या कार्याला आपल्या जीवनात सर्वात महत्त्वाचे स्थान दिले पाहिजे. “वेळ अजून आली नाही,” असे म्हणणाऱ्या यहुद्यांसारखे आपण होऊ नये. आज आपण ‘शेवटल्या काळात’ राहात आहोत हे आपण आठवणीत ठेवले पाहिजे. (हाग्गय १:२; २ तीमथ्य ३:१) येशूने भाकीत केले होते की त्याचे एकनिष्ठ अनुयायी राज्याची सुवार्ता घोषित करतील आणि शिष्य बनवतील. हे कार्य करण्याचा जो अनमोल बहुमान आपल्याला मिळाला आहे त्याला आपण कधीही क्षुल्लक लेखू नये. जगिक विरोधामुळे प्रचार व शिक्षण देण्याचे जे कार्य तात्पुरते थांबले होते ते १९१९ साली पुन्हा सुरू करण्यात आले होते, पण अद्याप ते पूर्ण झालेले नाही. ते पूर्ण होईल हे मात्र निश्चित!
९, १०. यहोवाचा आशीर्वाद मिळण्याकरता काय करणे आवश्यक आहे आणि यावरून आपण काय शिकतो?
९ आपण जितके मन लावून हे कार्य करत राहू तितकाच आपल्याला आशीर्वादही मिळेल—सामूहिकरित्या आणि वैयक्तिक पातळीवरही. स्वतः यहोवाने आपल्याला हे आश्वासन दिले आहे. यहुदी लोक पूर्ण मनाने खरी उपासना करू लागले आणि त्यांनी मंदिराचा पाया घालण्याचे काम उत्साहाने सुरू केले तेव्हा यहोवा म्हणाला: “आजच्या दिवसापासून मी तुम्हास आशीर्वाद देईन.” (हाग्गय २:१९) त्यांच्यावर पुन्हा एकदा यहोवाची कृपादृष्टी होणार होती. देवाने कोणकोणते आशीर्वाद देण्याचे वचन दिले याकडे लक्ष द्या: “शांततेचे बीजारोपण होत आहे; द्राक्षी आपले फळ देईल, भूमि आपला उपज देईल आणि आकाश आपले दहिवर देईल. या अवशिष्ट लोकांस मी या अवघ्यांचे वतन देईन.”—जखऱ्या ८:९-१३.
१० यहोवाने आपल्यावर जे कार्य सोपवले आहे, ते आपण परिश्रमपूर्वक आणि आनंदी मनोवृत्तीने केल्यास, ज्याप्रकारे त्याने यहुद्यांना आध्यात्मिक व भौतिक आशीर्वाद दिले त्याचप्रकारे तो आपल्यालाही देईल. आपसांत शांतीचे संबंध, सुरक्षितता, समृद्धी आणि आध्यात्मिक वाढ हे त्यांपैकी काही आशीर्वाद आहेत. पण एक गोष्ट मात्र निश्चित, आपण जर आत्मिक मंदिराचे कार्य यहोवाने सांगितल्यानुसार केले, तरच आपल्याला हे आशीर्वाद सातत्याने मिळत राहतील.
११. आपण स्वतःच्या परिस्थितीचे कशाप्रकारे अवलोकन करू शकतो?
११ ‘आपल्या मार्गांकडे लक्ष लावण्याची’ हीच वेळ आहे. (हाग्गय १:५, ७) आपण शांत बसून विचार केला पाहिजे, की मी आपल्या जीवनात कोणत्या गोष्टीला सर्वात जास्त महत्त्व देत आहे? यहोवाचा आपल्यावर आशीर्वाद असणे आज यावर अवलंबून आहे, की आपण त्याच्या नावाचे गौरव करण्यात व त्याच्या आत्मिक मंदिराच्या कार्यात कितपत सहभाग घेतो. तुम्ही स्वतःला हे प्रश्न विचारू शकता: ‘जीवनात कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यावे याविषयी माझी मनोवृत्ती बदलली आहे का? माझा बाप्तिस्मा झाला होता तेव्हा मला यहोवाबद्दल, त्याच्या वचनातील सत्याबद्दल आणि त्याच्या कार्याबद्दल जितका उत्साह होता, तितकाच आजही आहे का? सुखसोयींच्या मागे लागल्यामुळे, यहोवा व त्याचे राज्य यापासून माझे लक्ष विचलित झाले आहे का? मनुष्याचे भय, किंवा लोक काय विचार करतील ही चिंता माझ्या मार्गात अडथळा बनली आहे का?’—प्रकटीकरण २:२-४.
१२. हाग्गय १:६, ९ यात सांगितल्यानुसार यहुद्यांमध्ये कशी परिस्थिती होती?
१२ यहोवाच्या कार्याकडे व त्याच्या नावाचे गौरव करण्याकडे आपण दुर्लक्ष केल्यामुळे त्याने आपल्या विपुल आशीर्वादांचा हात आवरून धरावा असे नक्कीच आपल्यापैकी कोणालाही वाटणार नाही. मायदेशी परतलेल्या यहुद्यांनी मंदिराचे कार्य उत्साहाने सुरू तर केले, पण त्यानंतर मात्र हाग्गय १:९ सांगते त्यानुसार, त्यांच्यापैकी ‘प्रत्येक आपापल्या घरासाठी धडपड करू’ लागला. दैनंदिन गरजा आणि जीवनातली सर्वसाधारण कामे यांतच ते पूर्णपणे गुंतले. परिणामस्वरूप, “तुम्ही पुष्कळ पेरणी करिता, पण हाती थोडे लागते” हे शब्द त्यांच्याबाबतीत खरे ठरले; त्यांना खाण्यापिण्याच्या चांगल्या वस्तूंची व उबदार कपड्यांची वाण सोसावी लागली. (हाग्गय १:६) यहोवाने त्याचा आशीर्वादाचा हात आवरून धरला होता. यातून आपण काही शिकू शकतो का?
१३, १४. हाग्गय १:६, ९ यातून जो धडा शिकायला मिळतो तो आपल्या परिस्थितीला आपण कसा लागू करू शकतो आणि हे महत्त्वाचे का आहे?
१३ देवाच्या आशीर्वादांचा उपभोग घेत राहण्याकरता, आपण यहोवाच्या उपासनेकडे दुर्लक्ष करून स्वतःचे स्वार्थ साधण्याची प्रवृत्ती प्रकर्षाने टाळली पाहिजे असे तुम्हालाही नाही का वाटत? यहोवाच्या उपासनेपासून आपले लक्ष विचलित करणाऱ्या अशा अनेक गोष्टी असू शकतात. उदाहरणार्थ, भरपूर पैसा कमवण्याचा ध्यास, कमीतकमी वेळात श्रीमंत बनण्याच्या स्कीम्स, सध्याच्या जगात उत्तम करियर करण्यासाठी उच्च शिक्षण मिळवण्याच्या महत्त्वाकांक्षी योजना किंवा विशेष आवडीच्या एखाद्या क्षेत्रात यशस्वी होण्याचे वैयक्तिक ध्येय.
१४ तसे पाहिल्यास या गोष्टींमध्ये काही गैर नाही. पण सार्वकालिक जीवनाचा विचार केल्यास या सर्व गोष्टी ‘निर्जीव कृत्यांमध्ये’ मोडतात, नाही का? (इब्री लोकांस ९:१४) आपण असे का म्हणू शकतो? कारण ही सर्व कार्ये आध्यात्मिक अर्थाने निर्जीव, निष्फळ, किंवा व्यर्थ आहेत. एखादी व्यक्ती अशा कार्यांत गुंतली तर तिचा आध्यात्मिक अर्थाने मृत्यू होऊ शकतो. प्रेषितांच्या काळातल्या काही अभिषिक्त ख्रिश्चनांच्या बाबतीत असेच घडले. (फिलिप्पैकर ३:१७-१९) आपल्या काळातही काहीजणांच्या बाबतीत हे घडले आहे. तुम्ही स्वतः अशा व्यक्तींना ओळखत असाल, की जे हळूहळू ख्रिस्ती कार्यांपासून व मंडळीपासून दूर गेले; आता त्यांना यहोवाच्या सेवेत पुन्हा सहभागी होण्याची जराही इच्छा नाही. असे ज्यांच्या बाबतीत घडले त्यांनी यहोवाकडे परत यावे अशी निश्चितच आपण आशा बाळगतो. पण सांगण्याचे तात्पर्य असे, की ‘निर्जीव कृत्यांच्या’ मागे लागल्यास यहोवाची कृपादृष्टी व आशीर्वाद आपण गमावू शकतो. असे घडणे खरोखर दुःखदायक ठरेल. कारण याचा अर्थ, देवाच्या आत्म्याद्वारे निष्पन्न होणारा आनंद व शांती आपल्याला मिळणार नाही. शिवाय, आपल्या ख्रिस्ती बांधवांचा प्रेमळ सहवास आपण गमावून बसू!—गलतीकर १:६; ५:७, १३, २२-२४.
१५. हाग्गय २:१४ यात आपल्या उपासनेचे गांभीर्य कशाप्रकारे दिसून येते?
१५ ही एक अतिशय गंभीर बाब आहे. हाग्गय २:१४ नुसार ज्या यहुद्यांनी स्वतःच्या तक्तपोशी घरांकडे शाब्दिक व लाक्षणिक अर्थाने लक्ष देऊन यहोवाच्या मंदिराकडे दुर्लक्ष केले त्यांच्याविषयी यहोवाचा कसा दृष्टिकोन होता याकडे लक्ष द्या: “परमेश्वर म्हणतो की, या लोकांची व या राष्ट्राची माझ्या दृष्टीने अशीच स्थिति आहे, आणि त्यांच्या हातचे प्रत्येक काम असेच आहे; तेथे ते जे अर्पण करितात ते अशुद्ध आहे.” जेरूसलेममध्ये तात्पुरत्या बांधलेल्या वेदीवर हे यहुदी बलिदाने केवळ द्यायची म्हणून देत होते. पण खऱ्या उपासनेकडे त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे त्यांची ही नावापुरती अर्पणे यहोवाने स्वीकारली नाहीत.—एज्रा ३:३.
देव अवश्य आपल्या पाठीशी राहील
१६. जखऱ्याला देण्यात आलेल्या दृष्टान्तांच्या आधारावर यहुदी लोक कोणती खात्री बाळगू शकत होते?
१६ देवाच्या मंदिराच्या कार्यात सहभाग घेणाऱ्या आज्ञाधारक यहुद्यांना आश्वासन देण्यात आले की देव त्यांच्या पाठीशी राहील. जखऱ्याला देण्यात आलेल्या आठ दृष्टान्तांवरून देवाने हे सूचित केले. पहिल्या दृष्टान्तात मंदिराचे कार्य पूर्ण होण्याची व यहुद्यांनी आज्ञाधारकपणे हे कार्य केल्यास त्यांना समृद्धी मिळण्याची हमी देण्यात आली. (जखऱ्या १:८-१७) दुसऱ्या दृष्टान्तात खऱ्या उपासनेचा विरोध करणाऱ्या सर्व सरकारांचा अंत होण्याविषयी आश्वासन देण्यात आले. (जखऱ्या १:१८-२१) उरलेल्या दृष्टान्तांत बांधकाम कार्याला देवाचे संरक्षण मिळण्याविषयी, यहोवाच्या पूर्ण झालेल्या मंदिरात अनेक देशांतील लोकांचे थवेच्या थवे येण्याविषयी, देवाने सोपवलेल्या कार्यात कितीही मोठे अडथळे आले तरी, ते दूर केले जाण्याविषयी, दुष्टाईचा अंत केला जाण्याविषयी आणि देवदूतांकडून मार्गदर्शन व संरक्षण दिले जाण्याविषयी आश्वासन देण्यात आले. (जखऱ्या २:५, ११; ३:१०; ४:७; ५:६-११; ६:१-८) देवाच्या पाठिंब्याची ही सुनिश्चित आश्वासने मिळाल्यावर आज्ञाधारक यहूदी आपल्या जीवनशैलीत बदल करून, देवाने त्यांना ज्या कार्याकरता बंदिवासातून मुक्त केले होते त्या कार्याकडे आपले लक्ष का केंद्रित करू शकले हे आपण समजू शकतो.
१७. देवाकडून आश्वासन मिळाले असताना आपण स्वतःला कोणते प्रश्न विचारले पाहिजेत?
१७ त्याचप्रकारे, आज आपल्यालाही खात्री आहे की शेवटी खऱ्या उपासनेचा निश्चितच विजय होईल. ही खात्री असल्यामुळे आपल्याला उत्साहीपणे कार्य करण्याची आणि यहोवाच्या मंदिराविषयी गांभीर्याने विचार करण्याची प्रेरणा मिळायला नको का? स्वतःला हे प्रश्न विचारा: ‘देवाच्या राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करण्याची आणि शिष्य बनवण्याची हीच वेळ आहे असे जर मी मानतो, तर मग माझ्या जीवनातील ध्येयांवरून आणि माझ्या जीवनशैलीवरून हे दिसून येत आहे का? देवाच्या भविष्यसूचक वचनाचा अभ्यास करण्याकरता, त्याविषयी मनन करण्याकरता व ख्रिस्ती बांधवांशी व मला भेटणाऱ्या इतर लोकांशी त्याविषयी चर्चा करण्याकरता मी पुरेसा वेळ देत आहे का?’
१८. जखऱ्याच्या १४ व्या अध्यायानुसार भविष्यात काय घडेल?
१८ जखऱ्याने मोठ्या बाबेलच्या नाशाविषयी व त्यानंतर हर्मगिदोनाची लढाई होण्याविषयी उल्लेख केला. त्याने लिहिले: “तो एक विशेष दिवस होईल, तो परमेश्वरालाच ठाऊक; तो ना धड दिवस, ना धड रात्र असा होईल; तरी असे होईल की संध्याकाळी प्रकाश राहील.” पृथ्वीवरील यहोवाच्या शत्रूंकरता त्याचा दिवस खरोखरच एक अंधारमय, भयाण दिवस ठरेल! पण यहोवाच्या विश्वासू उपासकांकरता मात्र तो निरंतर प्रकाशाचा व आशीर्वादांचा दिवस ठरेल. नव्या जगातील प्रत्येक वस्तू कशाप्रकारे यहोवाच्या पवित्र नामाचे गुणगान करेल याविषयीही जखऱ्याने वर्णन केले. त्यावेळी देवाच्या महान आत्मिक मंदिरातील उपासना ही पृथ्वीवर उरलेली एकमात्र उपासना असेल. (जखऱ्या १४:७, १६-१९) किती अद्भूत आश्वासन! आपण या सर्व भाकीत केलेल्या शब्दांची पूर्णता स्वतःच्या डोळ्यांनी पाहू आणि यहोवाचे सार्वभौमत्त्व पूर्णपणे सिद्ध झालेले पाहू. यहोवाचा तो दिवस खरच किती विशेष दिवस असेल!
सार्वकालिक आशीर्वाद
१९, २०. जखऱ्या १४:८, ९ वाचून आपल्याला कशाप्रकारे प्रोत्साहन मिळते?
१९ त्या अद्भुत कार्यसिद्धिनंतर, सैतान व त्याच्या दुरात्म्यांना अक्रियाशीलतेच्या अगाधकूपात टाकले जाईल. (प्रकटीकरण २०:१-३, ७) मग ख्रिस्ताच्या हजार वर्षांच्या शासनकाळात मानवजातीला अनेक आशीर्वाद मिळतील. जखऱ्या १४:८, ९ यात म्हटले आहे: “त्या दिवशी आणखी असे होईल की यरुशलेमेतून जिवंत पाण्याचे झरे फुटून वाहतील; अर्धे पूर्व समुद्राकडे व अर्धे पश्चिम समुद्राकडे वाहतील; उन्हाळ्यात व हिवाळ्यात तसेच होईल, तेव्हा परमेश्वर सर्व पृथ्वीवर राजा होईल; त्या दिवशी परमेश्वर तेवढा व त्याचे नाम तेवढे राहील.”
२० ‘जिवंत पाणी,’ किंवा ‘जीवनाचे पाणी’ म्हणजेच यहोवाच्या जीवनदायक तरतुदी मशीहाच्या सिंहासनातून सतत वाहात राहतील. (प्रकटीकरण २२:१, २) यहोवाच्या उपासकांचा एक मोठा लोकसमुदाय हर्मगिदोनातून जिवंत बचावून आदामाच्या पापामुळे लागलेल्या शापापासून मुक्त होईल. ज्यांचा आधीच मृत्यू झाला होता त्यांनाही पुनरुत्थानाकरवी आशीर्वादित केले जाईल. अशारितीने पृथ्वीवर यहोवाच्या शासनाचे एक नवे पर्व सुरू होईल. यहोवाच सबंध विश्वाचा सार्वभौम आहे व त्याचीच उपासना केली पाहिजे हे पृथ्वीवरील सर्व मानव स्वीकारतील.
२१. आपण सर्वांनी कोणता संकल्प करावा?
२१ हाग्गय व जखऱ्या यांनी जे काही भाकीत केले व त्यापैकी जे काही पूर्ण झाले आहे त्याकडे पाहता, आपल्याला देवाने त्याच्या आत्मिक मंदिराच्या पृथ्वीवरील अंगणात जे कार्य करण्याची आज्ञा दिली आहे ते उत्साहीपणे करत राहण्याची प्रेरणा मिळते. खरी उपासना परिपूर्ण स्थितीत येत नाही तोपर्यंत, आपण सर्वजण देवाच्या राज्याच्या कार्याला आपल्या जीवनात सर्वात महत्त्वाचे स्थान देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत राहू. जखऱ्या ८:९ आपल्याला प्रोत्साहन देते: “संदेष्ट्यांची ही वचने या समयी जे तुम्ही ऐकत आहा, ते तुम्ही आपले हात दृढ करा.” (w०६ ४/१५)
तुम्हाला आठवते का?
• कोणत्या ऐतिहासिक घटनांमुळे हाग्गय व जखऱ्या यांनी केलेले भविष्यवाद सध्याच्या काळातही समर्पक आहे?
• हाग्गय व जखऱ्या या पुस्तकांतून, जीवनात कोणत्या गोष्टीला महत्त्व द्यावे यासंबंधी आपल्याला कोणता धडा शिकायला मिळतो?
• हाग्गय व जखऱ्या या पुस्तकांतील माहिती विचारात घेतल्यामुळे आपल्याला भविष्याबद्दल कोणती खात्री मिळते?
[अभ्यासाचे प्रश्न]
[१४ पानांवरील चित्र]
हाग्गय व जखऱ्या यांनी यहुद्यांना प्रोत्साहन दिले की देवाचा आशीर्वाद मिळवण्याकरता त्यांनी पूर्ण मनाने त्याचे कार्य करावे
[१५ पानांवरील चित्रे]
तुम्ही ‘आपल्याच घरासाठी धडपड करत आहात का’?