गरिबी आजची परिस्थिती
गरिबी आजची परिस्थिती
ब्राझीलमधील साऊ पावलोच्या रस्त्यावर तुम्हाला, मालाने भरलेली हातगाडी ओढताना विसांते * दिसेल. तो, पुठ्ठे, भंगार, प्लॅस्टिक गोळा करतो. अंधार पडू लागतो तेव्हा तो आपल्या हातगाडीच्या खाली एक पुठ्ठा टाकून त्यावर झोपतो. रहदारीच्या रस्त्यांवरील मोटारगाड्यांच्या, बसेसच्या आवाजाची त्याला जराही शुद्ध नसते; तो गाढ झोपी जातो. पूर्वी विसांतेकडे नोकरी होती, घर होते, त्याचे कुटुंब होते. आज त्याच्याजवळ काहीच नाही. रस्त्यावर काबाडकष्ट करून तो टिचभर पोटाची खळगी भरतो.
दुःखाची गोष्ट म्हणजे, विसांतेसारखे कोट्यवधी लोक आज अगदी हालाखीत दिवस काढत आहेत. विकसनशील राष्ट्रांतील पुष्कळ लोकांना रस्त्यावर किंवा झोपडपट्ट्यांमध्ये राहावे लागते. भीक मागत फिरणारे भिकारी—लंगडे, अंधळे, काखेत तान्हे बाळ घेऊन फिरणाऱ्या बाया तर आपल्याला जागोजागी दिसतात. ट्रॅफिक सिग्नलमुळे थांबलेल्या गाड्यांच्या रांगांमधून दोन-चार रुपयांसाठी फुलं, पुस्तकं, पेन, पेपर विकणारी मुलं कशी धावपळ करत असतात तेही आपण पाहतो.
आतापर्यंत गरिबी का हटवण्यात आलेली नाही, याचे स्पष्टीकरण देणे खूप कठीण आहे. “वैज्ञानिक ज्ञान, तांत्रिक कौशल्य व बुद्धिमत्ता प्राप्त केलेला मानववंश, पूर्वीपेक्षा आज गरिबीचा सामना करण्यास सुसज्ज आहे,” असे द इकॉनॉमिस्ट या ब्रिटिश मासिकात म्हटले आहे. पुष्कळ लोकांना या ज्ञानाचा व कौशल्यांचा फायदा झाला आहे. अनेक विकसनशील राष्ट्रांतील मोठमोठ्या शहरांतील रस्त्यांवर, चकाचक नवीन कोऱ्या मोटार गाड्यांची गर्दी दिसते. शॉपिंग मॉल्स तर सर्वात आधुनिक वस्तुंनी खचाखच भरलेले आहेत; आणि या वस्तू विकत घेणाऱ्या लोकांचीही कमी नाही. ब्राझीलमधील दोन शॉपिंग सेंटर्समध्ये एक खास मेळा लागला होता ज्यात वस्तुंचे प्रदर्शन व विक्री होती. हा मेळा, डिसेंबर २३ आणि २४, २००४ या दिवशी संपूर्ण रात्री खुला होता. यांतील एका सेंटरने तर गिऱ्हाईकांच्या मनोरंजनासाठी सांबा नाच करणाऱ्या लोकांना ठेवले होते. जवळजवळ ५,००,००० लोक या मेळ्यात आले होते!
* परंतु, अशाप्रकारच्या प्रस्तावांवरून प्रगतीचा भास होत असला तरी, तेच मासिक पुढे म्हणते, की “या प्रस्तावांचे चांगले परिणाम झाले आहेत, यावर संशय घेण्यासाठी पुष्कळ कारणे आहेत. बहुतेक राष्ट्रे निधी देण्यास कचरतात कारण, ज्या हेतुस्तव तो निधी गोळा केला जातो तो क्वचितच त्या लोकांना दिला जातो.” दुःखाची गोष्ट म्हणजे, भ्रष्टाचार व दफ्तरदिरंगाईमुळे, सरकार, आंतरराष्ट्रीय संस्था व मोठमोठ्या लोकांनी दिलेल्या निधीतील बहुतांश निधी, ज्यांना खरोखरच गरज आहे अशा लोकांपर्यंत कधी पोहंचतच नाही.
पण, पुष्कळ लोकांना श्रीमंतांच्या संपत्तीचा काही फायदा होत नाही. श्रीमंत व गरीब यांच्यातील तफावत पाहून पुष्कळ लोक या निष्कर्षास पोहंचले आहेत, की होता होईल तितक्या लवकर गरिबीवर मात करणे निकडीचे आहे. “विश्वव्यापी पुढाऱ्यांचे या वर्षाचे [२००५] मुख्य ध्येय, गरिबीविरुद्ध लढा कसा देता येईल, हा असला पाहिजे,” असे वेझा या ब्राझिलच्या मासिकात म्हटले होते. आफ्रिकेतील सर्वात गरीब राष्ट्रांना मदत करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या मार्शल प्लॅन या एका नव्या प्रकल्पावर देखील वेझाने माहिती दिली.गरिबीची समस्या ही सतत चाललेली समस्या असेल, हे येशूला माहीत होते. त्याने म्हटले: “गरीब नेहमी तुम्हाजवळ आहेत.” (मत्तय २६:११) म्हणजे, पृथ्वीवर गरिबी नेहमी राहील, असा याचा अर्थ होतो का? परिस्थिती सुधारण्यासाठी काहीच केले जाऊ शकत नाही का? गरिबांना मदत करण्यासाठी ख्रिस्ती काय करू शकतात? (w०६ ५/१)
[तळटीपा]
^ परि. 2 नाव बदलण्यात आले आहे.
^ परि. 5 मार्शल प्लॅन एक अमेरिकन प्रायोजक कार्यक्रम होता जो दुसऱ्या महायुद्धानंतर युरोपची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी बनवण्यात आला होता.