“मी तुम्हाबरोबर आहे”
“मी तुम्हाबरोबर आहे”
“परमेश्वराचा निरोप्या . . . म्हणाला, मी तुम्हाबरोबर आहे, असे परमेश्वर म्हणतो.”—हाग्गय १:१३.
१. येशूने म्हटल्यानुसार, कोणत्या काळांतल्या घटना आपल्या काळाला पूर्वसूचित करतात?
आपण आज इतिहासातल्या एका निर्णायक वळणावर उभे आहोत. बायबल भविष्यवाणीवरून स्पष्ट दिसून येते की १९१४ पासून आपण “प्रभूचा दिवस” म्हटलेल्या काळात राहात आहोत. (प्रकटीकरण १:१०) तुम्ही या विषयावर अभ्यास केला असेल त्यामुळे तुम्हाला माहीत असेल, की येशूने राज्य शासन हाती घेतलेल्या ‘मनुष्याच्या पुत्राच्या दिवसांची’ तुलना, ‘नोहाच्या दिवसांशी’ व ‘लोटाच्या दिवसांशी’ केली. (लूक १७:२६, २८) त्याअर्थी, नोहाच्या व लोटच्या काळात जे घडले ते आपल्या काळात काय घडेल यास पूर्वसूचित करते असे बायबल सांगते. पण आणखी एका काळातल्या घटना आपल्या काळाला पूर्वसूचित करतात आणि त्या भविष्यवाणीकडे आपण गांभीर्याने लक्ष देणे महत्त्वाचे आहे.
२. यहोवाने हाग्गय व जखऱ्या यांच्यावर कोणते कार्य सोपवले होते?
२ इब्री संदेष्टे हाग्गय व जखऱ्या यांच्या काळातली परिस्थिती आपण विचारात घेणार आहोत. या दोन विश्वासू संदेष्ट्यांनी कोणता संदेश घोषित केला होता की जो सध्याच्या काळात राहणाऱ्या यहोवाच्या लोकांकरता समर्पक आहे? हाग्गय व जखऱ्या यांना बॅबेलोनच्या दास्यत्वातून परतलेल्या यहुदी लोकांमध्ये ‘परमेश्वराचे निरोपे’ म्हणून पाठवण्यात आले होते. मंदिराच्या पुनःबांधकाम कार्याला देवाचा पाठिंबा आहे याचे इस्राएली लोकांना आश्वासन देण्याकरता त्यांना पाठवण्यात आले होते. (हाग्गय १:१३; जखऱ्या ४:८, ९) हाग्गय व जखऱ्या यांनी लिहिलेली पुस्तके तशी लहानच आहेत, पण तरीसुद्धा ती ‘परमेश्वरप्रेरित शास्त्रलेखांत’ समाविष्ट असून “सद्बोध, दोष दाखविणे, सुधारणूक, नीतिशिक्षण ह्याकरिता उपयोगी [आहेत].”—२ तीमथ्य ३:१६.
आपण लक्ष देण्याजोग्या भविष्यवाण्या
३, ४. हाग्गय व जखऱ्या यांनी लिहिलेले संदेश आपण लक्ष देण्याजोगे का आहेत?
३ निश्चितच हाग्गय व जखऱ्या यांचे संदेश त्यांच्या काळातल्या यहुद्यांकरता उपयोगाचे होते आणि त्यांनी केलेल्या भविष्यवाण्या त्या काळात पूर्णही झाल्या होत्या. पण, आज आपण या दोन पुस्तकांतील माहितीकडे लक्ष दिले पाहिजे व यातील माहिती आपल्या उपयोगाची आहे असे आपण खात्रीने का म्हणू शकतो? याचा एक सुगावा आपल्याला इब्री लोकांस १२:२६-२९ यात मिळतो. यात प्रेषित पौलाने हाग्गय २:६ यातील शब्द उद्धृत केले, ज्यात देव कशाप्रकारे ‘आकाश व पृथ्वी हालवून सोडील’ याविषयी सांगितले आहे. या हालवण्यामुळे शेवटी ‘राज्यांचे तक्त उलथून टाकले जातील, राष्ट्रांच्या राज्यांचे बल नष्ट केले जातील.’—हाग्गय २:२२.
४ हाग्गयचे शब्द उद्धृत करताना पौल, ‘राष्ट्रांच्या राज्यांना’ काय घडेल व अभिषिक्त ख्रिश्चनांना जे न हलविता येणारे राज्य मिळेल ते कशाप्रकारे श्रेष्ठ असेल याविषयी सांगतो. (इब्री लोकांस १२:२८) यावरून हे स्पष्टपणे दिसते की सामान्य युगाच्या पहिल्या शतकात इबी लोकांस पत्र हे पुस्तक लिहिण्यात आले तेव्हा हाग्गय व जखऱ्या यांनी लिहिलेल्या भविष्यवाण्या अद्याप पूर्ण झालेल्या नव्हत्या, तर त्या भविष्यकाळास सूचित करत होत्या. येशूसोबत मशिही राज्यात वारसदार असणाऱ्या अभिषिक्त ख्रिश्चनांचा शेषवर्ग अद्यापही या पृथ्वीवर आहे. तेव्हा नक्कीच हाग्गय व जखऱ्या यांनी जे लिहिले ते आपल्याकरता अर्थपूर्ण असले पाहिजे.
५, ६. कोणत्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीत हाग्गय व जखऱ्या यांनी कार्य केले?
५ एज्रा या पुस्तकातून आपल्याला त्या काळाची थोडी पार्श्वभूमी मिळते. सा.यु.पू. ५३७ साली यहुदी लोक बॅबेलोनच्या दास्यत्वातून परत आल्यानंतर, प्रांताधिकारी जरुबाबेल व महायाजक येशूवा यांच्या देखरेखीखाली सा.यु.पू. ५३६ साली नव्या मंदिराची पायाभरणी करण्यात आली. (एज्रा ३:८-१३; ५:१) हे कार्य तर अतिशय आनंदात पार पडले, पण लवकरच यहुदी लोक भयभीत झाले. एज्रा ४:४ यात सांगितल्यानुसार, “त्या देशचे लोक यहूद्यांचे हात कमजोर करून त्यांस मंदिर बांधण्याच्या कामी अडथळा करू लागले.” या शत्रूंनी, विशेषतः शोमरोन्यांनी यहुद्यांवर खोटे आरोप केले. शेवटी या विरोध करणाऱ्यांनी पर्शियाच्या राजाला मंदिराच्या बांधकामावर बंदी आणण्यास उद्युक्त केले.—एज्रा ४:१०-२१.
६ मंदिराच्या बांधकामाविषयी लोकांनी सुरुवातीला दाखवलेला उत्साह हळूहळू मावळला. यहुदी लोक आपापल्या कामाला लागले. पण सा.यु.पू. ५२० साली, म्हणजे मंदिराचा पाया घालण्यात आल्यावर १६ वर्षांनंतर, यहोवाने हाग्गय व जखऱ्या या दोन संदेष्ट्यांना पाठवले. लोकांमध्ये पुन्हा एकदा मंदिराच्या कामाबद्दल उत्साह जागृत करण्याचे काम त्यांच्यावर सोपवण्यात आले होते. (हाग्गय १:१; जखऱ्या १:१) देवाच्या या निरोप्यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे आणि यहोवा आपल्या पाठीशी आहे याची पूर्ण खात्री पटल्यामुळे यहुद्यांनी पुन्हा एकदा मंदिराचे बांधकाम सुरू करून सा.यु.पू. ५१५ साली ते पूर्ण केले.—एज्रा ६:१४, १५.
७. संदेष्ट्यांच्या काळात असलेली परिस्थिती आधुनिक काळाशी कशाप्रकारे जुळते?
७ या सर्व घटनांचा आपल्याशी काय संबंध आहे हे तुम्हाला माहीत आहे का? ‘राज्याच्या सुवार्तेच्या’ घोषणेचे कार्य आपल्यावर सोपवण्यात आले आहे. (मत्तय २४:१४) पहिल्या महायुद्धानंतर या कार्याला विशेष महत्त्व देण्यात आले. ज्याप्रकारे प्राचीन काळात यहुदी लोकांना बॅबेलोनच्या दास्यातून मुक्त करण्यात आले त्याच प्रकारे, आधुनिक काळात यहोवाच्या लोकांना मोठ्या बाबेलच्या अर्थात खोट्या धर्मांच्या जागतिक साम्राज्याच्या दास्यातून लाक्षणिक अर्थाने मुक्त करण्यात आले. तेव्हापासून देवाच्या अभिषिक्त जनांनी सुवार्तेचा प्रचार करणे, लोकांना बायबलचे शिक्षण देणे आणि त्यांना खऱ्या उपासनेकडे मार्गदर्शित करणे याकरता विशेष परिश्रम घेतले आहेत. हे कार्य आज आणखी मोठ्या प्रमाणात केले जात आहे आणि तुम्हीही कदाचित यात भाग घेत असाल. हे कार्य करण्याची हीच वेळ आहे कारण या दुष्ट जगाचा अंत अगदी जवळ आला आहे! यहोवा “मोठे संकट” आणून मनुष्याच्या कारभारांत हस्तक्षेप करेपर्यंत, देवाने सोपवलेले हे कार्य आपल्याला करत राहायचे आहे. (मत्तय २४:२१) त्या मोठ्या संकटात दुष्टाईचा सर्वनाश होऊन खरी उपासना सबंध पृथ्वीवर भरभराटीस येईल.
८. आपल्या कार्याला देवाचा पाठिंबा आहे याची आपण खात्री का बाळगू शकतो?
८ हाग्गय व जखऱ्या यांच्या भविष्यवाण्यांमध्ये सांगितल्याप्रमाणे सुवार्ता प्रचाराच्या कार्यालाही यहोवाचा पाठिंबा आहे व या कार्यावर त्याचा आशीर्वाद आहे याबद्दल आपण खात्री बाळगू शकतो. काहीजण देवाच्या सेवकांवर दबाव आणण्याचा किंवा त्यांच्या कार्यावर बंदी आणण्याचा प्रयत्न करतात तरीसुद्धा, सुवार्ता प्रचाराचे कार्य वाढतच गेले आहे, त्याला कोणीही रोखू शकलेला नाही. पहिल्या महायुद्धानंतरच्या दशकांत, अगदी आपल्या काळापर्यंत यहोवाने राज्य प्रचाराच्या कार्याला कशाप्रकारे आशीर्वादित केले आहे याचा विचार करा. पण, अद्याप बरेच कार्य शिल्लक आहे.
९. आपण प्राचीन काळातल्या कोणत्या परिस्थितीकडे लक्ष दिले पाहिजे आणि का?
९ हाग्गय व जखऱ्या या पुस्तकांतील मजकूरातून आपल्याला प्रचार करण्याची व लोकांना शिकवण्याची जी आज्ञा देवाने दिली आहे, तिचे पालन करण्याचे प्रोत्साहन कशाप्रकारे मिळते? बायबलमधील या दोन पुस्तकांतून आपण कोणते काही धडे घेऊ शकतो याकडे लक्ष देऊ या. उदाहरणार्थ, परत आलेल्या यहुद्यांना जे मंदिराचे बांधकाम करण्याची आज्ञा देण्यात आली होती, त्यासंबंधी काही तपशीलांचे आपण परीक्षण करू या. याआधी सांगितल्याप्रमाणे, बॅबेलोनमधून जेरूसलेमला परत आलेल्या यहुद्यांनी मंदिराचे बांधकाम पूर्णत्वास नेले नाही. पाया घातल्यानंतर, त्यांचा उत्साह मावळला व ते मागे हटले. कोणत्या चुकीच्या धारणेमुळे त्यांनी असे केले? आणि आपण यातून कोणता धडा घेऊ शकतो?
योग्य दृष्टिकोन महत्त्वाचा
१०. यहुद्यांमध्ये कोणती चुकीची धारणा निर्माण झाली होती आणि यामुळे काय घडले?
१० परत आलेले यहुदी म्हणू लागले, की, “वेळ अजून आली नाही.” (हाग्गय १:२) सा.यु.पू. ५३६ साली जेव्हा त्यांनी मंदिराच्या बांधकामाला सुरुवात केली तेव्हा “वेळ अजून आली नाही,” असे त्यांच्यापैकी कोणीही म्हणाले नाही. पण लवकरच, आसपासची राष्ट्रे विरोध करू लागली आणि सरकारकडून कार्यात अडथळा आणला जाऊ लागला तेव्हा या यहुद्यांची मनोवृत्ती बदलली. त्यांनी आपल्या घरांकडे आणि आपल्या सुखसोयींकडे जास्त लक्ष देण्यास सुरुवात केली. देवाचे मंदिर अर्धवट बांधलेल्या स्थितीत होते, पण त्यांची घरे मात्र उत्तम प्रतीच्या लाकडाने सजवलेली होती. म्हणूनच यहोवाने त्यांना प्रश्न केला: “इकडे मंदिर ओसाड पडले असून तुम्ही स्वतः आपल्या तक्तपोशीच्या घरात राहावे असा समय आहे काय?”—हाग्गय १:४.
११. यहोवाला हाग्गयच्या काळात राहणाऱ्या यहुद्यांस वाग्दंड का द्यावा लागला?
११ कोणत्या गोष्टीला प्राधान्य दिले पाहिजे, यासंबंधी यहुद्यांची मनोवृत्ती बदलली होती. मंदिराचे पुनर्निर्माण व्हावे हा यहोवाचा उद्देश होता, पण त्याला प्राधान्य देण्याऐवजी देवाच्या लोकांनी आपले लक्ष स्वतःवर व आपल्या घरादारावर केंद्रित केले होते. देवाच्या उपासनेच्या स्थानाशी संबंधित कार्याकडे दुर्लक्ष केले जात होते. हाग्गय १:५ यात लिहिल्याप्रमाणे, यहोवाने त्या यहुद्यांना “आपल्या मार्गाकडे लक्ष पुरवा,” असे सांगितले. असे म्हणण्याद्वारे, यहोवा त्यांना सांगू इच्छित होता की त्यांनी थोडे थांबून, आपण जीवनात काय करत आहोत याचा विचार करावा आणि मंदिराच्या बांधकामाला प्राधान्य न दिल्यामुळे आपल्या जीवनावर कसा परिणाम होत आहे यावर मनन करावे.
१२, १३. हाग्गय १:६ यात यहुद्यांच्या स्थितीचे वर्णन कसे करण्यात आले आहे आणि या वचनाचा काय अर्थ होतो?
१२ जीवनात चुकीच्या गोष्टींना अधिक महत्त्व दिल्यामुळे साहजिकच यहुद्यांच्या जीवनावर याचा परिणाम होत होता. हाग्गय १:६ यात देवाने यासंबंधी आपला दृष्टिकोन कशाप्रकारे व्यक्त केला ते पाहा: “तुम्ही पुष्कळ पेरणी करिता पण हाती थोडे लागते; तुम्ही खाता पण तृप्त होत नाही, तुम्ही पिता पण तुमची तहान भागत नाही; तुम्ही कपडे घालिता पण त्यांनी तुम्हास ऊब येत नाही; मजूर मजुरीने पैसा मिळवून जसे काय भोक पडलेल्या पिशवीत टाकितो.”
१३ यहुदी खरे तर देवाने त्यांना दिलेल्या भूमीत राहात होते. तरीपण, या भूमीतून त्यांना मनासारखे पीक मिळत नव्हते. यहोवाने पूर्वीच ताकीद दिल्यानुसार त्याने त्यांना आशीर्वाद दिला नाही. (अनुवाद २८:३८-४८) यहोवाचा आशीर्वाद नसल्यामुळे, यहुदी बी तर पेरत होते पण त्यांना थोडेच पीक मिळत होते. खाऊन तृप्त होण्याकरता ते पुरेसे नव्हते. तसेच यहोवाच्या आशीर्वादाशिवाय, उबदार कपडे घालण्यास ते समर्थ नव्हते. त्यांनी कमवलेला पैसाही जणू भोके पडलेल्या पिशवीत टाकला जात होता. त्यांना त्याचा काहीही उपभोग मिळत नव्हता. “तुम्ही पिता पण तुमची तहान भागत नाही,” या वाक्यांशाचा काय अर्थ होतो? साहजिकच, मनसोक्त द्राक्षारस पिण्याविषयी येथे सुचवलेले नाही कारण देवाच्या वचनात अतिमद्यपानाची निर्भत्सना केली आहे. (१ शमुवेल २५:३६; नीतिसूत्रे २३:२९-३५) तर हा वाक्यांश यहुद्यांवर देवाचा आशीर्वाद नसल्याच्या आणखी एका पुराव्यास सूचित करतो.
१४, १५. हाग्गय १:६ यातून आपल्याला काय शिकायला मिळते?
१४ या सर्वातून आपण धडा घेऊ शकतो; अर्थात, गृहसजावटीसंबंधी नव्हे. इस्राएली लोक बॅबेलोनच्या बंदिवासात गेले त्याच्या बऱ्याच काळाआधी संदेष्टा आमोस याने इस्राएलातील श्रीमंत लोकांची त्यांच्या ‘हस्तिदंताने मढविलेल्या घरांविषयी’ व ‘हस्तीदंती पलंगावर निजण्याविषयी’ कानउघाडणी केली होती. (आमोस ३:१५; ६:४) त्यांची ही आलीशान घरे आणि शोभेच्या वस्तू फार काळ टिकल्या नाहीत. त्यांच्या राष्ट्रावर कब्जा मिळवणाऱ्या शत्रूंनी त्यांची लुटालूट केली. तरीपण ७० वर्षांच्या बंदिवासानंतरही देवाच्या लोकांपैकी बऱ्याच जणांनी अजूनही यातून धडा घेतलेला नव्हता. आपण घेणार का? आपल्यापैकी प्रत्येकाने स्वतःला हा प्रश्न विचारला पाहिजे: ‘प्रामाणिकपणे, माझे घर आणि त्याची सजावट याला मी कितपत महत्त्व देतो? तसेच, आपल्या व्यवसायात आणखी प्रगती करण्यासाठी, आध्यात्मिक कार्यांकडे दुर्लक्ष करून बरीच वर्षे अतिरिक्त शिक्षण घेण्याची योजना मी करतो का?’—लूक १२:२०, २१; १ तीमथ्य ६:१७-१९.
१५ हाग्गय १:६ या वचनाने खरे तर, आपल्या जीवनात देवाचा आशीर्वाद असणे किती महत्त्वाचे आहे याची आपल्याला जाणीव करून दिली पाहिजे. प्राचीन काळातल्या त्या यहुद्यांच्या जीवनात हीच एक उणीव असल्यामुळे त्यांना दुःखद परिणाम भोगावे लागले. आपल्याजवळ भरपूर भौतिक वस्तू असोत वा नसोत, यहोवाचा आशीर्वाद असणे सर्वात महत्त्वाचे आहे. तो नसल्यास, नक्कीच आध्यात्मिक अर्थाने आपले नुकसानच होईल. (मत्तय २५:३४-४०; २ करिंथकर ९:८-१२) पण हा आशीर्वाद मिळवण्यासाठी आपण काय केले पाहिजे?
यहोवा आपल्या आत्म्याने साहाय्य करील
१६-१८. प्राचीन काळातल्या परिस्थितीत जखऱ्या ४:६ या वचनाचे काय तात्पर्य होते?
१६ हाग्गयच्या सोबतीने कार्य करणारा संदेष्टा जखऱ्या याने देवाच्या प्रेरणेने, त्या काळच्या सुभक्तिशील जनांना यहोवाने कोणत्या माध्यमाने प्रेरित केले व आशीर्वादित केले याकडे लक्ष वेधले. आणि यावरून आपल्याला समजते की आज तो आपल्यालाही कशाप्रकारे आशीर्वादित करतो. जखऱ्याने लिहिले: “पराक्रमाने नव्हे, तर माझ्या आत्म्याने कार्यसिद्धि होईल असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.” (जखऱ्या ४:६) तुम्ही हे वचन अनेकदा ऐकले असेल. पण हाग्गय व जखऱ्या यांच्या काळातल्या यहुद्यांकरता आणि त्याअर्थी तुमच्याकरता या वचनाचे काय तात्पर्य आहे?
१७ हाग्गय व जखऱ्या यांच्या देवप्रेरित वचनांमुळे त्या काळात आश्चर्यकारक परिणाम घडून आला. त्या दोन संदेष्ट्यांनी जे सांगितले त्यामुळे विश्वासू यहुद्यांचा उत्साह पुनरुज्जिवित झाला. हाग्गयने सा.यु.पू. ५२० सालच्या सहाव्या महिन्यात, आणि जखऱ्याने त्याच्या वर्षीच्या आठव्या महिन्यात आपला संदेश घोषित करण्यास सुरुवात केली होती. (जखऱ्या १:१) हाग्गय २:१८ यातून आपल्याला कळते की नवव्या महिन्यात पायाभरणीचे कार्य पुन्हा एकदा पूर्ण उत्साहाने सुरू करण्यात आले. तर अशारितीने यहुदी लोकांना कार्य करण्याची प्रेरणा मिळाली आणि त्यांनी यहोवाच्या पाठिंब्यावर पूर्ण भरवसा ठेवून आज्ञाधारकपणे कार्य सुरू केले. जखऱ्या ४:६ यातील शब्द देवाच्या पाठिंब्याविषयीच सांगतात.
१८ सा.यु.पू. ५३७ साली यहुदी लोक आपल्या मायदेशी परत आले तेव्हा त्यांच्याजवळ सैन्यबळ नव्हते. तरीपण यहोवाने त्यांचे संरक्षण केले आणि बॅबेलोनपासून जेरूसलेमपर्यंतच्या प्रवासात त्याने त्यांचे मार्गदर्शन केले. मग थोड्याच काळानंतर त्यांनी मंदिराचे कार्य सुरू केले तेव्हा देवाचा आत्मा त्यांना मार्गदर्शन देत होता. त्यांनी पुन्हा एकदा पूर्ण मनाने कार्याला सुरुवात केल्यावर यहोवा पुन्हा त्याच्या पवित्र आत्म्याच्या माध्यमाने त्यांना साहाय्य करणार होता.
१९. देवाच्या आत्म्याने कोणत्या शक्तीवर मात केली?
१९ आठ दृष्टान्तांच्या मालिकेद्वारे जखऱ्याला आश्वासन देण्यात आले की यहोवा त्याच्या लोकांच्या पाठीशी राहील व ते विश्वासूपणे मंदिराचे कार्य पूर्ण करतील. तिसऱ्या अध्यायात वर्णन केलेल्या चवथ्या दृष्टान्तात मंदिराचे बांधकाम पूर्ण होऊ नये म्हणून सैतान यहुद्यांच्या प्रयत्नांना सक्रियपणे विरोध करत होता हे दाखवले आहे. (जखऱ्या ३:१) नव्या मंदिरात महायाजक येशूवा लोकांच्या वतीने सेवा करू लागेल तो दिवस पाहण्यास सैतान निश्चितच उत्सुक नव्हता. यहुद्यांना मंदिराचे बांधकाम करण्यापासून परावृत्त करण्यासाठी दियाबलाने जरी प्रयत्नांची शिकस्त केली, तरीसुद्धा यहोवाचा आत्मा सर्व अडथळे दूर करून मंदिराचे कार्य पूर्ण होईपर्यंत यहुद्यांना उत्साहित करत राहील.
२०. पवित्र आत्म्याने यहुद्यांना देवाची इच्छा पूर्ण करण्यास कशाप्रकारे साहाय्य पुरवले?
२० मंदिराच्या कार्यावर बंदी आणण्यास सरकारी अधिकाऱ्यांना यश आले तेव्हा असे वाटले की जणू या विरोधावर मात करून मंदिराचे कार्य पूर्ण करणे आता शक्य होणार नाही. पण यहोवाने आश्वासन दिले की ‘पर्वतासमान’ भासणाऱ्या या अडथळ्यालाही दूर करून “सपाट मैदान” बनवले जाईल. (जखऱ्या ४:७) आणि अगदी हेच घडले! दर्यावेश राजाने या बाबतीत तपास केला व त्याला कोरेशाने यहुद्यांना मंदिराचे पुनर्निर्माण करण्याचा जो परवाना दिला होता तो सापडला. तेव्हा, दर्यावेशाने बंदी उठवली आणि आपल्या शाही खजिन्यातून यहुद्यांना त्यांच्या कार्याकरता अर्धा खर्च देऊ केला. परिस्थितीने किती अद्भूत कलाटणी घेतली होती! यात देवाच्या आत्म्याचा हात होता का? यात शंकाच नाही. सा.यु.पू. ५१५ साली, दर्यावेशाच्या सहाव्या वर्षी मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले.—एज्रा ६:१, १५.
२१. (क) प्राचीन काळात, देवाने कशाप्रकारे ‘सर्व राष्ट्रांना हालवले’ आणि त्यामुळे कशाप्रकारे “निवडक वस्तु” येऊ शकल्या? (ख) आधुनिक काळात याची कशाप्रकारे पूर्णता होते?
२१ हाग्गय २:५ यात संदेष्टा हाग्गय यहुद्यांना त्या प्रसंगाची आठवण करून देतो जेव्हा सिनाय पर्वतावर देवाने त्यांच्यासोबत करार केला होता व जेव्हा “सर्व पर्वत थरथरू लागला” होता. (निर्गम १९:१८) हाग्गय व जखऱ्याच्या काळात यहोवा राष्ट्रांना हालवून सोडणार होता. याविषयी ६ व्या व ७ व्या वचनात वर्णन केले आहे. पर्शियन साम्राज्यात उलथापालथ घडणार होती पण मंदिराचे कार्य मात्र पूर्ण होणार होते. “सर्व राष्ट्रांतील निवडक वस्तू,” म्हणजेच गैर यहुदी लोक त्या मंदिरात यहुद्यांसोबत देवाची उपासना करू लागणार होते. आपल्या काळात, एका महत्त्वाच्या मार्गाने म्हणजेच आपल्या प्रचार कार्याद्वारे देवाने ‘राष्ट्रांना हालवले आहे’ आणि यामुळे “सर्व राष्ट्रांतील निवडक वस्तू,” अर्थात नवे उपासक अभिषिक्त ख्रिश्चनांच्या शेषवर्गासोबत देवाची उपासना करण्यास आले आहेत. खरोखर, अभिषिक्त जन व दुसरी मेंढरे आता एकजूटपणे यहोवाच्या मंदिराला वैभवाने भरत आहेत. हे खरे उपासक त्या दिवसाची पूर्ण विश्वासानिशी वाट पाहात आहेत, जेव्हा यहोवा दुसऱ्या एका अर्थाने ‘आकाश व पृथ्वी हालवून सोडील.’ हे हालवणे सर्व राष्ट्रांच्या राज्यांचे बल उलथून त्यांचा सर्वनाश करण्यासाठी असेल.—हाग्गय २:२२.
२२. राष्ट्रांना कशाप्रकारे ‘हालवून सोडले’ जात आहे व यामुळे परिणाम काय झाला आहे, आणि आता काय घडणे बाकी आहे?
२२ “आकाश व पृथ्वी, समुद्र व कोरडी जमीन,” यांद्वारे चित्रित केल्या जाणाऱ्या निरनिराळ्या घटकांमध्ये कशाप्रकारे उलथापालथ घडून आली आहे याची आपल्याला आठवण होते. एकतर, दियाबल सैतान व त्याच्या दुरात्म्यांना पृथ्वीच्या क्षेत्रात फेकून देण्यात आले आहे. (प्रकटीकरण १२:७-१२) शिवाय, देवाच्या अभिषिक्त जनांनी पुढाकार घेऊन आजवर साध्य केलेल्या प्रचार कार्यामुळे निश्चितच या व्यवस्थीकरणाच्या मानवी घटकांनाही हादरे बसले आहेत. (प्रकटीकरण ११:१८) दुसरीकडे पाहता, सर्व राष्ट्रांतील निवडक वस्तू अर्थात लोकांचा “मोठा लोकसमुदाय” आध्यात्मिक इस्राएलसोबत मिळून यहोवाची सेवा करू लागला आहे. (प्रकटीकरण ७:९, १०) मोठा लोकसमुदाय अभिषिक्त ख्रिश्चनांसोबत मिळून या सुवार्तेची घोषणा करत आहे, की लवकरच देव हर्मगिदोनात सर्व राष्ट्रांना हालवून सोडणार आहे. हे घडताच सबंध पृथ्वीवर खरी उपासना परिपूर्ण स्थितीत येण्यासाठी मार्ग मोकळा होईल. (w०६ ४/१५)
तुम्हाला आठवते का?
• हाग्गय व जखऱ्या यांनी केव्हा व कशा परिस्थितीत सेवा केली?
• हाग्गय व जखऱ्या यांनी दिलेल्या संदेशाचे तुम्ही कशाप्रकारे पालन करू शकता?
• जखऱ्या ४:६ हे वचन वाचून तुम्हाला का प्रोत्साहन मिळते?
[अभ्यासाचे प्रश्न]
[८ पानांवरील चित्रे]
हाग्गय व जखऱ्या यांच्या संदेशांतून आपल्याला देवाच्या पाठिंब्याची खात्री मिळते
[११ पानांवरील चित्र]
“इकडे मंदिर ओसाड पडले असून तुम्ही स्वत: आपल्या तक्तपोशीच्या घरात राहावे असा समय आहे काय?”