व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

येशूचे अनुकरण करा आणि गरिबांबद्दल काळजी दाखवा

येशूचे अनुकरण करा आणि गरिबांबद्दल काळजी दाखवा

येशूचे अनुकरण करा आणि गरिबांबद्दल काळजी दाखवा

गरिबी आणि जुलूम. मानवजातीइतक्याच या समस्या जुन्या आहेत. इस्राएल लोकांना देवाने दिलेल्या नियमशास्त्रात गरिबांचे संरक्षण करण्याविषयी व त्यांचे दुःख कमी करण्याविषयी नियम होता तरीपण लोक नियमशास्त्राकडे दुर्लक्ष करीत. (आमोस २:६) गरिबांना ज्याप्रकारे वागवले जाते त्याचा संदेष्टा यहेज्केल याने कडाडून विरोध केला. त्याने म्हटले: “देशातील लोक बलात्कार व चोरी करितात. ते दुर्बल व दरिद्री यांस चिरडून टाकितात आणि परदेशीयांवर अन्याय व जुलूम करितात.”—यहेज्केल २२:२९.

येशू पृथ्वीवर होता तेव्हा परिस्थिती काही वेगळी नव्हती. धार्मिक पुढारी गरीब व गरजू लोकांबद्दल यत्किंचितही काळजी दाखवत नसत. या धार्मिक पुढाऱ्‍यांना “धनलोभी” म्हटले आहे. ते “विधवांची घरे गिळंकृत” करीत आणि त्यांना वृद्ध तसेच गरजू लोकांची काळजी घेण्यापेक्षा परंपरा जोपासायची चिंता होती. (लूक १६:१४; २०:४७; मत्तय १५:५, ६) येशूने दिलेल्या चांगल्या शोमरोन्याच्या दृष्टांतात एक उल्लेखनीय गोष्ट आहे. एक याजक व एक लेवी, एका जखमी मनुष्याला रस्त्यावर पडलेले पाहिल्यावर त्याला मदत करण्याऐवजी रस्ता ओलांडून जातात, असे येशू या दृष्टांतात सांगतो.—लूक १०:३०-३७.

येशूने गरिबांबद्दल काळजी दाखवली

गरिबांना कोणकोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागते हे येशूला पूर्णपणे समजत होते आणि त्यांना कोणत्या गोष्टींची गरज आहे हे त्याने जवळून पाहिले होते व त्याला त्यांच्याविषयी सहानुभूती वाटत होती, हे त्याच्या जीवनाबद्दलच्या शुभवर्तमान अहवालात दिसून येते. येशू स्वर्गात राहात होता तरीपण त्याने स्वतःला रिक्‍त केले, मानव जीवन स्वीकारले आणि ‘आपल्याकरिता दरिद्री झाला.’ (२ करिंथकर ८:९) लोकसमुदायाला पाहिल्यावर येशूला “कळवळा आला, कारण मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे, ते गांजलेले व पांगलेले होते.” (मत्तय ९:३६) गरीब विधवेच्या अहवालावरून दिसते की येशू, श्रीमंतांनी “आपल्या समृद्धीतून” आणलेल्या मोठमोठ्या देणग्या पाहून प्रभावीत झाला नाही तर गरीब विधवेची देणगी पाहून प्रभावीत झाला. या विधवेच्या कार्याने येशू भारावून गेला कारण तिने “आपल्या कमताईतून आपली सर्व उपजीविका टाकली” होती.—लूक २१:४.

येशूने गरिबांबद्दल फक्‍त कळवळा व्यक्‍त केला नाही तर त्याने त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी जातीने कार्य देखील केले. येशू व त्याच्या प्रेषितांचा एक सामाईक निधी होता ज्यातून ते गरजू इस्राएली लोकांना देत असत. (मत्तय २६:६-९; योहान १२:५-८; १३:२९) जो कोणी आपला अनुयायी बनू इच्छितो त्याला येशूने, गरजू लोकांना मदत करण्याचे आपले कर्तव्य ओळखण्याचे उत्तेजन दिले. त्याने एका धनाढ्य तरुण शासकाला म्हटले: “तूझे असेलनसेल ते विकून गोरगरिबांना वाटून टाक म्हणजे तुला स्वर्गांत संपत्ति मिळेल; आणि चल, माझ्यामागे ये.” पण हा मनुष्य आपली संपत्ती वाटण्यास इच्छुक नव्हता यावरून, त्याला देव आणि सहमानवापेक्षा आपल्या संपत्तीवर अधिक प्रेम होते हे दिसून आले. त्यामुळे, येशूचा शिष्य बनण्याकरता आवश्‍यक असलेल्या गुणांमध्ये तो उणा पडला.—लूक १८:२२, २३.

ख्रिस्ताच्या अनुयायांना गरिबांची काळजी वाटते

येशूचा मृत्यू झाल्यानंतरही प्रेषित व ख्रिस्ताचे इतर अनुयायी, त्यांच्यामधील गरिबांबद्दल काळजी दाखवत राहिले. सा.यु. ४९ च्या सुमारास प्रेषित पौलाने, याकोब, पेत्र आणि योहान यांच्याबरोबर प्रभू येशू ख्रिस्त याच्याकडून सुवार्तेचा प्रचार करण्याविषयी मिळालेल्या नेमणुकीची चर्चा केली. या सर्वांचे असे ठरले, की पौलाने व बर्णबाने खासकरून विदेशी लोकांना प्रचार करण्यावर आपले लक्ष केंद्रित करण्यासाठी “परराष्ट्रीयांकडे” जावे. पण याकोब आणि त्याच्या सोबत्यांनी पौलाला व बर्णबाला, “गरिबांची आठवण” करण्यास आर्जवले. व पौल हेच करण्यास “उत्कंठित” होता.—गलतीकर २:७-१०.

सम्राट क्लॉडियसच्या शासनकाळात, रोमी साम्राज्याच्या विविध भागात खूप दुष्काळ पडला होता. यावर, अंत्युखियातील ख्रिश्‍चनांनी “निश्‍चय केला की, [प्रत्येकाने] यहूदीयात राहणाऱ्‍या बंधुजनांच्या मदतीकरिता यथाशक्‍ति काही पाठवावे; त्याप्रमाणे त्यांनी केले, म्हणजे ते बर्णबा व शौल ह्‍यांच्या हाती वडीलवर्गाकडे पाठवून दिले.”—प्रेषितांची कृत्ये ११:२८-३०.

आजही खऱ्‍या ख्रिश्‍चनांना ही जाणीव आहे, की येशूच्या अनुयायांनी गरीब व गरजू लोकांबद्दल आणि विशेषकरून सहविश्‍वासू बंधूभगिनींबद्दल काळजी दाखवली पाहिजे. (गलतीकर ६:१०) यास्तव, ते ज्यांना भौतिक गोष्टींची गरज असते अशांबद्दल खरी काळजी दाखवतात. उदाहरणार्थ, ईशान्य ब्राझीलमध्ये १९९८ साली मोठी कोरड पडली. तांदूळ, शेंगभाजी, मका या पिकांची नासाडी झाल्यामुळे सर्वत्र दुष्काळ पडला—१५ वर्षांत पडलेला हा सर्वात भयानक दुष्काळ होता. काही ठिकाणी तर पिण्याच्या पाण्याची देखील टंचाई होती. देशाच्या इतर भागात राहणाऱ्‍या यहोवाच्या साक्षीदारांनी लगेच साहाय्य समित्या तयार केल्या आणि काही काळांतच मोठ्या प्रमाणावर अन्‍नसामग्री गोळा करून ती पाठवण्यासाठी लागणारा खर्च देखील दिला.

या मदत कार्याला हातभार लावणाऱ्‍या साक्षीदारांनी असे लिहिले: “आम्हाला आमच्या बांधवांना मदत करता आली म्हणून खूप आनंद होतो; कारण असे करण्याद्वारे आम्ही यहोवाचं मन आनंदित केलं आहे, हे आम्हाला माहीत आहे. आम्ही याकोब २:१५, १६ मधील शब्द कधी विसरणार नाही.” या वचनांत म्हटले आहे: “भाऊ किंवा बहीण ही उघडी आहेत, त्यांना रोजच्या अन्‍नाची वाण आहे, आणि तुम्हांमधील कोणी त्यांना म्हणतो, सुखाने जा, ऊब घ्या व तृप्त व्हा; पण त्यांच्या शरीराला पाहिजे ते त्यांना तुम्ही देत नाही तर त्यापासून काय लाभ?”

साऊ पावलोच्या एका शहरातील यहोवाच्या साक्षीदारांच्या एका मंडळीत एक नम्र व आवेशी साक्षीदार भगिनी आहे जी गरीब आहे; उदरनिर्वाहाकरता तिला बरेच काबाडकष्ट करावे लागतात. ती म्हणते: “मी गरिबीत दिवस काढत असले तरी, बायबलमधील संदेशानं माझ्या जीवनाला खरा अर्थ दिला आहे. माझ्या सहविश्‍वासू बंधूभगिनींकडून मला मदत मिळाली नसती तर, माझं काय झालं असतं, माहीत नाही.” काही वर्षांपूर्वी याच कष्टाळू ख्रिस्ती भगिनीला शस्त्रक्रिया करावी लागणार होती, पण दवाखान्याचा खर्च पेलण्याची तिची ऐपत नव्हती. त्यावेळी, मंडळीतील ख्रिस्ती बंधूभगिनी तिच्या शस्त्रक्रियेचा खर्च उचलण्याच्या स्थितीत होते. संपूर्ण जगभरातील खऱ्‍या ख्रिश्‍चनांमध्ये अशाप्रकारे गरजू सहविश्‍वासू बंधूभगिनींना मदत केली जाते.

परंतु अशाप्रकारचे अनुभव कितीही हृदयस्पर्शी असले तरी, आपल्या प्रामाणिक प्रयत्नांनी गरिबीचे उच्चाटन होणार नाही. शक्‍तिशाली सरकारे आणि मदत करणाऱ्‍या मोठमोठ्या आंतरराष्ट्रीय संस्थांनी बरेच प्रयत्न केले आणि त्यांना काही प्रमाणात यशही आले परंतु तरीपण ते या जुनाट समस्येचे मुळापासून उच्चाटन करू शकलेले नाहीत. तेव्हा असा प्रश्‍न येतो, की मग मानवजातीला सतावत असलेली गरिबी आणि इतर समस्यांवर ठोस उपाय काय असेल?

बायबलच्या शिकवणी कायमची मदत करतात

गरिबांकरता व ज्यांना इतर गरजा होत्या अशा लोकांकरता येशू ख्रिस्ताने नेहमी सत्कार्ये केल्याचे वर्णन शुभवर्तमान अहवालांमध्ये मिळते. (मत्तय १४:१४-२१) पण, कोणत्या कार्याला त्याने प्राधान्य दिले? एके प्रसंगी, गरजू लोकांना मदत करण्यात काही वेळ घालवल्यानंतर येशूने आपल्या शिष्यांना सांगितले: “मला आसपासच्या गावात उपदेश करिता यावा म्हणून आपण दूसरीकडे जाऊ.” आपले प्रचार कार्य पुन्हा सुरू करण्याकरता त्याने आजारी व गरजू लोकांना मदत करण्याचे काम काही काळासाठी का थांबवले? तोच याचे उत्तर देतो: “कारण ह्‍याच उद्देशाने [म्हणजे, प्रचार करण्याच्या उद्देशाने] मी निघालो आहे.” (मार्क १:३८, ३९; लूक ४:४३) गरज असलेल्या लोकांसाठी सत्कार्ये करणे येशूला महत्त्वाचे वाटत असले तरी, देवाच्या राज्याचा प्रचार करणे हे त्याचे प्रमुख कर्तव्य होते.—मार्क १:१४.

येशूच्या “पावलांवर पाऊल ठेवून चालावे” असे बायबल ख्रिश्‍चनांना आर्जवत असल्यामुळे, इतरांना मदत करताना, कोणत्या गोष्टींना प्राधान्य दिले पाहिजे याबाबतीत आज ख्रिश्‍चनांना स्पष्ट मार्गदर्शन मिळाले आहे. (१ पेत्र २:२१) येशूप्रमाणे ते गरजू लोकांना मदत करतात. परंतु, येशूप्रमाणेच ते बायबलमधील देवाच्या राज्याच्या सुवार्तेचा संदेश लोकांना शिकवण्याच्या कार्याला आपल्या जीवनात सर्वात महत्त्वाचे स्थान देतात. (मत्तय ५:१४-१६; २४:१४; २८:१९, २०) पण देवाच्या वचनात सापडणाऱ्‍या संदेशाच्या प्रचार कार्याला, इतरांना मदत करण्याच्या कार्यापेक्षा इतके महत्त्व देण्याची काय गरज आहे?

संपूर्ण जगभरातील सत्य अनुभवांवरून दिसून येते, की लोक जेव्हा बायबलमधील व्यावहारिक सल्ला समजून घेऊन त्यानुसार जगतात तेव्हा ते जीवनातील दररोजच्या समस्यांचा, ज्यात गरिबीचा देखील समावेश होतो, सामना करण्यासाठी अधिक सुसज्ज होतात. शिवाय, यहोवाचे साक्षीदार आज प्रचार करत असलेल्या बायबलमधील देवाच्या राज्याच्याबद्दलचा संदेश लोकांना भविष्याविषयी आशा देतो. या आशेमुळे त्यांना जीवनाचे मोल समजते व सर्वात खडतर परिस्थितीतही ते आनंदाने जगतात. (१ तीमथ्य ४:८) ही कोणती आशा आहे?

देवाचे वचन आपल्या भविष्याविषयी असे अभिवचन देते: “ज्यामध्ये नीतिमत्त्व वास करिते असे नवे आकाश व नवी पृथ्वी ह्‍यांची त्याच्या वचनाप्रमाणे आपण वाट पाहत आहो.” (२ पेत्र ३:१३) बायबलमध्ये वापरण्यात आलेला ‘पृथ्वी,’ हा शब्द कधीकधी पृथ्वीवर जगणाऱ्‍या लोकांना सूचित करतो. (उत्पत्ति ११:१) तेव्हा, ज्याचे वचन दिले आहे अशी धार्मिक “नवी पृथ्वी” म्हणजे लोकांचा असा एक समाज ज्याला देवाची स्वीकृती मिळाली आहे. ख्रिस्ताच्या शासनात, देवाची स्वीकृती मिळालेल्यांना सार्वकालिक जीवनाचे प्रतिफळ मिळेल आणि पृथ्वीवरील परादीसमध्ये समाधानकारक जीवन जगता येईल, असे आणखी एक अभिवचन देवाच्या वचनात दिले आहे. (मार्क १०:३०) हे भविष्य सर्वांसाठी, गरिबांसाठी देखील उपलब्ध आहे. या ‘नव्या पृथ्वीवर’ गरिबीची समस्या कायमची सोडवली जाईल. (w०६ ५/१)

[७ पानांवरील चौकट/चित्र]

येशू “दरिद्री” लोकांना कसे सोडवील?—स्तोत्र ७२:१२

न्याय: “तो प्रजेतल्या दीनांचा न्याय करो. तो दरिद्रयांच्या मुलाबाळांचे तारण करो, तो जुलूम करणाऱ्‍यांस चिरडून टाको.” (स्तोत्र ७२:४) ख्रिस्त पृथ्वीवर राज्य करेल तेव्हा सर्वांना न्याय मिळेल. ज्या पीडेमुळे अनेक राष्ट्रे श्रीमंत होऊ शकलेली नाहीत ती पीडाच अर्थात भ्रष्टाचारच या राज्यात नसेल.

शांती: “त्याच्या कारकीर्दीत नीतिमान उत्कर्ष पावो; आणि चंद्र नाहीसा होईपर्यंत विपुल शांति असो.” (स्तोत्र ७२:७) मानवांतील झगडे आणि युद्धे ही जगातील बहुतेकांना गरीब बनवण्यास कारणीभूत आहेत. परंतु ख्रिस्त पृथ्वीवर परिपूर्ण शांती आणून द्रारिद्र्‌याला कारणीभूत असलेल्या अनेक कारणांपैकी एका प्रमुख कारणाचे उच्चाटन करील.

दया: “दुबळा व दरिद्री ह्‍यांच्यावर तो दया करील, दरिद्रयांचे जीव तो तारील. जुलूम व जबरदस्ती ह्‍यांपासून त्यांचे जीव तो मुक्‍त करील; आणि त्याच्या दृष्टीने त्यांचे रक्‍त अमोल ठरेल.” (स्तोत्र ७२:१२-१४) दीन, गरीब आणि जाच सहन करणारे, एकाच आनंदी मानव कुटुंबाचा भाग बनतील; राजा येशू ख्रिस्त याच्या नेतृत्वाखाली ते सर्व एक होतील.

समृद्धी: “भूमीत भरपूर पीक [येईल].” (स्तोत्र ७२:१६) ख्रिस्ताच्या राजवटीत भौतिक समृद्धी असेल. आज बहुतेकदा ज्यामुळे लोकांवर गरिबी येते ती अन्‍नटंचाई व दुष्काळ नसेल.

[४, ५ पानांवरील चित्र]

येशूने गरिबांच्या गरजा पूर्ण करण्याकरता जातीने लक्ष घातले

[६ पानांवरील चित्र]

बायबलचा संदेश खरी आशा देतो