व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

‘जीवन निवडून घे म्हणजे तू जिवंत राहशील’

‘जीवन निवडून घे म्हणजे तू जिवंत राहशील’

‘जीवन निवडून घे म्हणजे तू जिवंत राहशील’

“जीवन व मरण आणि आशीर्वाद व शाप मी तुझ्यापुढे ठेवली आहेत; म्हणून तू जीवन निवडून घे म्हणजे तू व तुझी संतति जिवंत राहील.”—अनुवाद ३०:१९.

१, २. मनुष्याला देवाचे प्रतिरूप असे निर्माण करण्यात आले याचा काय अर्थ होतो?

 “आपल्या प्रतिरुपाचा व आपल्याशी सदृश असा मनुष्य आपण करु.” देवाने बोललेले हे वाक्य बायबलच्या पहिल्या अध्यायात आपल्याला वाचायला मिळते. त्यानुसार, उत्पत्ति १:२६, २७ आपल्याला सांगते की, “देवाने आपल्या प्रतिरुपाचा मनुष्य निर्माण केला; देवाचे प्रतिरुप असा तो निर्माण केला.” अशारितीने पहिला मानव पृथ्वीवरील इतर सर्व निर्मित वस्तूंपेक्षा वेगळा होता. तो आपल्या निर्माणकर्त्यासारखा होता. तर्क करण्यात, तसेच प्रीती, न्याय, बुद्धी व शक्‍ती या गुणांचा वापर करण्यात तो देवाचे अनुकरण करण्यास समर्थ होता. त्याला सद्‌सद्विवेकबुद्धी देण्यात आली होती व तिच्या साहाय्याने तो योग्य निर्णय घेऊ शकत होता. असे निर्णय की ज्यांमुळे त्याचे भले होईल आणि त्याच्या स्वर्गीय पित्यालाही संतोष वाटेल. (रोमकर २:१५) थोडक्यात सांगायचे तर आदामाजवळ इच्छास्वातंत्र्य होते. पृथ्वीवरील आपल्या या पुत्राला पाहिल्यावर यहोवाने आपल्या निर्मितीबद्दल समाधान व्यक्‍त केले. “आपण केलेले सर्व फार चांगले आहे असे देवाने पाहिले.”—उत्पत्ति १:३१; स्तोत्र ९५:६.

आदामाचे वंशज या नात्याने आपल्यालाही देवाच्या सदृश्‍य व त्याच्या प्रतिरूपात निर्माण करण्यात आले आहे. पण आपण जे काही करतो ते करावे की करू नये हे ठरवण्याचे खरोखरच आपल्याला स्वातंत्र्य आहे का? हो, कारण भविष्यात काय घडेल हे आधीच जाणून घेण्याचे सामर्थ्य यहोवाजवळ असले तरीही, आपल्यापैकी प्रत्येक व्यक्‍तीच्या कृती व त्यांचे परिणाम त्याने आधीपासूनच ठरवलेले नाहीत. त्याने आपल्या पृथ्वीवरील मुलांना पूर्वनिश्‍चित दैवाचे गुलाम बनवलेले नाही. योग्य निर्णय घेण्याकरता आपल्या इच्छास्वातंत्र्याचा उपयोग करणे किती महत्त्वाचे आहे हे समजून घेण्याकरता आपण इस्राएल राष्ट्राकडून कोणता धडा शिकता येण्यासारखा आहे हे पाहूया.—रोमकर १५:४.

इस्राएल लोकांना निवड करण्याचे स्वातंत्र्य होते

३. दहा आज्ञांपैकी पहिली आज्ञा कोणती होती आणि विश्‍वासू इस्राएलांनी ही आज्ञा कशाप्रकारे पाळली?

यहोवाने इस्राएली लोकांना म्हटले: “ज्याने तुला मिसर देशातून, दास्यगृहातून आणिले तो मी परमेश्‍वर तुझा देव आहे.” (अनुवाद ५:६) सा.यु.पू. १५१३ साली इस्राएल राष्ट्राला ईजिप्तच्या बंदिवासातून चमत्कारिकरित्या सोडवण्यात आले होते. त्यामुळे यहोवाच्या या शब्दांविषयी त्यांना तीळमात्रही शंका असण्याचे कारण नव्हते. दहा आज्ञांपैकी पहिल्या आज्ञेत यहोवाने मोशेच्या द्वारे त्यांना असे बजावून सांगितले होते: “माझ्याखेरीज तुला वेगळे देव नसावेत.” (निर्गम २०:१,) त्या प्रसंगी, इस्राएल राष्ट्राने देवाच्या या आज्ञेचे पालन करण्याचे निवडले. त्यांनी स्वखुषीने केवळ यहोवाची उपासना केली.—निर्गम २०:५; गणना २५:११.

४. (क) मोशेने इस्राएली लोकांसमोर कोणते पर्याय ठेवले? (ख) आज आपण कोणत्या पर्यायांतून निवड करू शकतो?

सुमारे ४० वर्षांनंतर मोशेने इस्राएलच्या एका नव्या पिढीला त्यांच्यासमोर असलेल्या पर्यांयाची या जोरदार शब्दांत आठवण करून दिली: “आकाश व पृथ्वी ह्‍यांना तुझ्याविरुद्ध साक्षीला ठेवून मी आज सांगतो की, जीवन व मरण आणि आशीर्वाद व शाप मी तुझ्यापुढे ठेवली आहेत; म्हणून तू जीवन निवडून घे म्हणजे तू व तुझी संतति जिवंत राहील.” (अनुवाद ३०:१९) आज आपल्यासमोरही हेच पर्याय आहेत. आपण एकतर यहोवाची विश्‍वासूपणे सेवा करण्याचे निवडून सार्वकालिक जीवन मिळवू शकतो किंवा त्याच्या आज्ञा मोडण्याचे निवडून त्याचे दुष्परिणाम भोगू शकतो. हे दोन्ही विरुद्ध पर्याय निवडणाऱ्‍या लोकांची उदाहरणे विचारात घ्या.

५, ६. यहोशवाने कोणता पर्याय निवडला आणि याचा काय परिणाम झाला?

सा.यु.पू. १४७३ मध्ये यहोशवाने इस्राएली लोकांना प्रतिज्ञात देशात नेले. आपला मृत्यू होण्याआधी यहोशवाने त्या सबंध राष्ट्राला उद्देशून कळकळीने त्यांना असा आग्रह केला: “परमेश्‍वराची सेवा करणे हे तुम्हाला गैर दिसत असले तर तुम्ही कोणाची सेवा करणार हे आजच ठरवा; महानदीपलीकडे तुमच्या पूर्वजांनी ज्या देवांची सेवा केली त्यांची, किंवा तुम्ही राहत आहा त्या देशातल्या अमोऱ्‍यांच्या देवांची?” मग स्वतःच्या घराण्याच्या बाबतीत त्याने म्हटले: “मी आणि माझे घराणे तर परमेश्‍वराची [यहोवाची] सेवा करणार.”—यहोशवा २४:१५.

याआधी यहोवाने यहोशवाला खंबीर हो व खूप हिंमत धर असे प्रोत्साहन दिले होते. देवाच्या नियमशास्त्राचे पालन करण्यापासून कधीही वळू नकोस असे मार्गदर्शन केले होते. तर नियमशास्त्राचा ग्रंथ रात्रंदिवस वाचल्याने व त्यावर मनन केल्याने तुझा मार्ग यशस्वी होईल असे यहोवाने त्याला सांगितले होते. (यहोशवा १:७, ८) आणि असेच घडले. यहोशवाने देवाचे मार्गदर्शन पाळण्याचे निवडले व त्यामुळे त्याला अनेक आशीर्वाद मिळाले. स्वतः यहोशवाने कबूल केले: “परमेश्‍वराने इस्राएल घराण्याला ज्या हिताच्या गोष्टी सांगितल्या होत्या त्यांतली एकहि निष्फळ झाली नाही; त्या सर्व सिद्धीस गेल्या.”—यहोशवा २१:४५.

७. यशयाच्या काळात काही इस्राएली लोकांनी कोणता पर्याय निवडला आणि याचा काय परिणाम झाला?

याउलट, साधारण ७०० वर्षांनंतर इस्राएलमध्ये आलेल्या परिस्थितीचा विचार करा. एव्हाना, बरेच इस्राएली लोक मूर्तिपूजक धर्मांच्या रूढीपरंपरा पाळू लागले होते. उदाहरणार्थ, वर्षाच्या शेवटल्या दिवशी लोक एक मेजवानी करत. निरनिराळ्या चविष्ट खाद्यपदार्थांची व गोड द्राक्षारसाची रेलचेल असे. पण हा केवळ एक कौटुंबिक सोहळा नसून दोन देवतांच्या सन्मानार्थ पाळला जाणारा एक धार्मिक विधी होता. संदेष्टा यशया याने इस्राएली लोकांच्या या अविश्‍वासूपणाविषयी देवाचा दृष्टिकोन अशाप्रकारे व्यक्‍त केला: “तुम्ही परमेश्‍वरास सोडिले; जे तुम्ही माझ्या पवित्र पर्वताची पर्वा करीत नाही, गादासाठी (भाग्यदेवतेसाठी) मेजवानी तयार करिता, मनीसाठी (कर्मदेवतेसाठी) मिश्रित पेयाचे प्याले भरून ठेविता.” लोकांचा असा समज होता की दर वर्षी शेतात चांगले उत्पन्‍न मिळण्याकरता यहोवाच्या आशीर्वादाची नव्हे तर ‘भाग्यदेवतेला’ व ‘कर्मदेवतेला’ प्रसन्‍न करण्याची गरज आहे. खरे पाहता, त्यांनी अशाप्रकारे यहोवाच्या विरोधात जाण्याचे स्वतःहून निवडल्यामुळे त्यांनी आपल्या हातानेच आपले भाग्य निश्‍चित केले. यहोवाने घोषित केले: “तुम्हास तरवार नेमिली आहे; तुम्ही सगळे वधासाठी खाली वाकाल; कारण मी हाक मारिली तरी तुम्ही उत्तर दिले नाही; मी बोललो तरी तुम्ही ऐकले नाही; माझ्या दृष्टीने जे वाईट ते तुम्ही केले, जे मला नापसंत ते तुम्ही पसंत केले.” (यशया ६५:११, १२) त्यांनी निर्बुद्धपणे चुकीचा पर्याय निवडल्यामुळे त्यांचा नाश झाला आणि त्यांच्या भाग्यदेवता व कर्मदेवता त्यांना यातून बचावू शकल्या नाहीत.

योग्य निवड करणे

८. अनुवाद ३०:२० यानुसार योग्य निवड करण्यात कोणत्या गोष्टी समाविष्ट आहेत?

मोशेने इस्राएली लोकांना जीवन निवडून घेण्याचे आवाहन केले तेव्हा त्याने त्यांना तीन गोष्टी करायला सांगितल्या: “आपला देव परमेश्‍वर ह्‍याच्यावर प्रीति कर, त्याची वाणी ऐक व त्याला धरून राहा.” (अनुवाद ३०:२०) यांपैकी प्रत्येक गोष्टीचे आपण परीक्षण करू या, जेणेकरून आपल्याला योग्य निवड करता येईल.

९. आपल्याला यहोवावर प्रीती आहे हे आपण कसे दाखवू शकतो?

यहोवावर प्रीती करणे: आपली यहोवावर प्रीती असल्यामुळे आपण त्याची सेवा करण्याचे निवडतो. इस्राएली लोकांच्या उदाहरणांवरून धडा घेऊन आपण अनैतिक कामे करण्याच्या सर्व मोहांचा प्रतिकार करतो. तसेच ज्यांमुळे आपण या जगातल्या भौतिकवादी चक्रव्युहात अडकू शकतो, अशाप्रकारच्या जीवनशैली निवडण्याचे टाळतो. (१ करिंथकर १०:११; १ तीमथ्य ६:६-१०) आपण यहोवाला जडून राहतो आणि त्याच्या नियमांचे पालन करतो. (यहोशवा २३:८; स्तोत्र ११९:५,) इस्राएली लोक प्रतिज्ञात देशात प्रवेश करण्याच्या बेतात असताना मोशेने त्यांना आग्रहाने सांगितले: “पाहा, ज्या देशाचे वतन मिळविण्यास तुम्ही जात आहे, त्यात पाळण्यासाठी आपला देव परमेश्‍वर ह्‍याच्या आज्ञेप्रमाणे मी तुम्हाला विधि व नियम शिकविले आहेत त्याप्रमाणे तुम्ही चालावे. तुम्ही ते काळजीपूर्वक पाळावेत, कारण त्यामुळे देशोदेशीच्या लोकांच्या दृष्टीला तुम्ही सूज्ञ व समंजस असे दिसाल.” (अनुवाद ४:५, ६) आपल्या जीवनात यहोवाच्या इच्छेला प्राधान्य देण्याद्वारे त्याच्यावर आपली प्रीती आहे हे दाखवण्याची हीच वेळ आहे. जर आपण असे करण्याचे निवडले तर आपल्याला नक्कीच अनेक आशीर्वाद मिळतील.—मत्तय ६:३३.

१०-१२. नोहाच्या काळात घडलेल्या घटनांचे परीक्षण केल्यामुळे आपल्याला काय शिकायला मिळते?

१० देवाची वाणी ऐकणे. नोहा हा “नीतिमत्त्वाचा उपदेशक” होता. (२ पेत्र २:५) जलप्रलय येण्याआधीच्या काळात जवळजवळ सगळेच लोक आपापल्या जीवनात अगदी रममाण होते आणि नोहाच्या बोलण्याकडे त्यांनी “लक्ष दिले नाही” (NW). याचा काय परिणाम झाला? ‘जलप्रलयात सर्व वाहून गेले.’ येशूने ताकीद दिली की आपल्या काळात, अर्थात ‘मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल’ तेव्हाही असेच घडेल. आज जे लोक देवाच्या संदेशाकडे दुर्लक्ष करण्याचे निवडतात त्यांना नोहाच्या काळात घडलेल्या घटनांवरून स्पष्ट ताकीद मिळते.—मत्तय २४:३९.

११ आजच्या काळात देवाच्या सेवकांनी दिलेल्या देवाकडील इशाऱ्‍यांची थट्टा करणाऱ्‍यांनी हे ओळखले पाहिजे, की या इशाऱ्‍यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे काय परिणाम होईल. अशा थट्टा करणाऱ्‍यांविषयी प्रेषित पेत्राने म्हटले: “ते हे बुद्धिपुरस्सर विसरतात की, पूर्वी देवाच्या शब्दाने आकाश आणि पाण्यातून पाण्याच्या योगे घडलेली अशी पृथ्वी ही झाली; त्याच्या योगे तेव्हांच्या जगाचा पाण्याने बुडून नाश झाला; पण आताचे आकाश व पृथ्वी ही त्याच शब्दाने अग्नीसाठी राखलेली आहेत; म्हणजे न्यायनिवाड्याचा व भक्‍तिहीन लोकांच्या नाशाचा दिवस येईपर्यंत राखून ठेवलेली आहेत.”—२ पेत्र ३:३-७.

१२ याउलट, नोहा व त्याच्या कुटुंबाने कोणता मार्ग निवडला? “तोपर्यंत जे पाहण्यात आले नव्हते त्याविषयी नोहाला सूचना मिळाली आणि आदरयुक्‍त भयाने त्याने . . . विश्‍वासाने तारू तयार केले.” त्याने देवाच्या सूचनेकडे लक्ष दिल्यामुळे त्याच्या घराण्याचे तारण झाले. (इब्री लोकांस ११:७) आपणही देवाचे संदेश ऐकून त्यांचे पालन करण्याच्या बाबतीत तत्पर राहू या.—याकोब १:१९, २२-२५.

१३, १४. (क) यहोवाला ‘धरून राहणे’ का महत्त्वाचे आहे? (ख) आपण ‘आपल्या कुंभाराला’ अर्थात यहोवाला आपल्या व्यक्‍तिमत्त्वाला आकार देण्याची अनुमती कशाप्रकारे देऊ शकतो?

१३ यहोवाला धरून राहणे: ‘जीवन निवडून घेण्याकरता’ यहोवावर प्रीती असणे आणि त्याचे ऐकणेच केवळ पुरेसे नाही. तर आपण यहोवाला ‘धरून राहिले’ पाहिजे, म्हणजेच त्याच्या इच्छेनुसार करत राहिले पाहिजे. येशूने म्हटले: “तुम्ही आपल्या धीराने आपले जीव मिळवाल.” (लूक २१:१९) याबाबतीत आपण जी निवड करतो त्यावरून खरे तर आपल्या हृदयात काय आहे हे दिसून येते. नीतिसूत्रे २८:१४ सांगते, “जो नेहमी पापभीरू असतो तो धन्य, पण जो आपले मन कठीण करितो तो विपत्तीत पडतो.” याचे उदाहरण म्हणजे प्राचीन ईजिप्तचा फारो. दहा पीडांपैकी एकेक पीडा ईजिप्तवर आली तेव्हा देवाचे भय मानण्याऐवजी फारोने आपले हृदय कठीण केले. यहोवाने फारोला अशाप्रकारे आज्ञा मोडण्यास भाग पाडले नाही आणि त्याने या गर्विष्ठ सम्राटाला हा मार्ग निवडण्यापासून रोखलेही नाही. अशारितीने यहोवाची इच्छा पूर्ण झाली. प्रेषित पौलाने फारोविषयी यहोवाच्या दृष्टिकोनाचे या शब्दांत वर्णन केले: “मी तुला पुढे केले आहे [“राहू दिले आहे,” NW] ते ह्‍याचकरिता की, तुझ्याकडून मी आपला पराक्रम दाखवावा आणि माझे नाव सर्व पृथ्वीवर प्रख्यात व्हावे.”—रोमकर ९:१७.

१४ इस्राएली लोकांना फारोच्या ताब्यातून मुक्‍त करण्यात आल्यावर कित्येक शतकांनंतर संदेष्टा यशयाने असे उद्‌गार काढले: “हे परमेश्‍वरा, तू आमचा पिता आहेस; आम्ही माती आहो, तू आमचा कुंभार आहेस; आम्ही सर्व तुझ्या हातची कृति आहो.” (यशया ६४:८) देवाच्या वचनाचा वैयक्‍तिक अभ्यास व पालन करण्याद्वारे आपण यहोवाला आपल्या व्यक्‍तिमत्त्वाला आकार देण्याची अनुमती देत असतो. असे केल्यामुळे हळूहळू आपण नवे व्यक्‍तिमत्त्व धारण करतो. आपण पूर्वीपेक्षा जास्त नम्र बनतो. आपले व्यक्‍तिमत्त्व कठीण नव्हे तर सहज आकार देण्याजोगे बनते; आणि यामुळे यहोवाला धरून राहणे आपल्याला सोपे जाते, कारण त्याला संतुष्ट करण्याची आपल्याला प्रामाणिक इच्छा असते.—इफिसकर ४:२३, २४; कलस्सैकर ३:८-१०.

‘तू त्यांची माहिती द्यावी’

१५. अनुवाद ४:९ यानुसार मोशेने इस्राएली लोकांना कोणत्या दुहेरी जबाबदारीची आठवण करून दिली?

१५ प्रतिज्ञात देशाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या इस्राएल राष्ट्राच्या मंडळीला मोशेने म्हटले: “स्वतःविषयी सावधगिरी बाळग आणि स्वतःला फार जप, नाहीतर तू ज्या गोष्टी डोळ्यांनी पाहिल्या आहेत त्या विसरून जाशील आणि जन्मभर त्या तुझ्या मनातून जातील; तू आपल्या पुत्रपौत्रांना त्यांची मीहिती द्यावी.” (अनुवाद ४:९) यहोवाचे आशीर्वाद मिळवण्याकरता आणि ज्या देशात ते प्रवेश करण्याच्या बेतात होते त्यात समृद्धी मिळवण्याकरता त्यांनी यहोवा देवासमोर एक दुहेरी जबाबदारी पूर्ण करणे महत्त्वाचे होते. एकतर त्यांनी स्वतः यहोवाने त्यांच्या डोळ्यासमोर केलेली महत्कृत्ये विसरून जायची नव्हती आणि त्यांनी भावी पिढ्यांनाही त्यांविषयी माहिती द्यायची होती. देवाचे लोक या नात्याने, जर आपल्याला आज ‘जीवन निवडून घ्यायचे असेल’ तर आपण देखील असेच केले पाहिजे. पण यहोवाने आपल्याकरता कोणती महत्कृत्ये केली आहेत, की जी आपण स्वतः डोळ्यांनी पाहिली आहेत?

१६, १७. (क) गिलियड प्रशालेतून प्रशिक्षण घेतलेल्या मिशनरी बंधू भगिनींनी राज्य प्रचाराच्या कार्याला कशाप्रकारे हातभार लावला आहे? (ख) अनेक वर्षांनंतर आजही ज्यांचा प्रचार कार्यातला उत्साह कायम आहे अशा काही बांधवांची उदाहरणे तुम्ही सांगू शकता का?

१६ यहोवाने आपल्या प्रचाराच्या व शिष्य बनवण्याच्या कार्याला कशाप्रकारे आशीर्वादित केले आहे हे पाहून आपण रोमांचित होतो. १९४३ साली वॉचटावर गिलियड बायबल प्रशाला स्थापन करण्यात आल्यापासून मिशनरी बंधूभगिनींनी कित्येक देशांत शिष्य बनवण्याच्या कार्याचे नेतृत्व केले आहे. आजमितीलाही, या प्रशालेच्या सुरुवातीच्या वर्गांतून पदवीधर झालेले बंधूभगिनी, वयोवृद्ध झालेले असले व शारीरिक कमजोरीमुळे काहीसे धीमे झालेले असले तरीही, राज्य प्रचाराच्या कार्याबद्दल त्यांच्या मनात तोच सुरुवातीचा उत्साह आजही कायम आहे. एक बोलके उदाहरण मेरी ओल्सन यांचे आहे. त्या १९४४ साली गिलियड प्रशालेतून पदवीधर झाल्या होत्या. प्रथम कोलंबिया, मग उरुग्वे येथे त्यांनी मिशनरी सेवा केली आणि सध्या त्या प्वेर्त रिको येथे सेवा करत आहेत. वयोमानानुसार येणाऱ्‍या दुखण्याखुपण्यांमुळे त्यांना हवे तितके करता येत नाही. तरीसुद्धा प्रचार कार्यातला त्यांचा उत्साह मंदावलेला नाही. स्पॅनिश भाषा शिकून घेतल्यामुळे त्या दर आठवडी आपल्या मंडळीतल्या प्रचारकांसोबत क्षेत्र सेवाकार्यात सहभागी होतात.

१७ नॅन्सी पोर्टर १९४७ साली गिलियड प्रशालेतून पदवीधर झाल्या होत्या. आपल्या पतीच्या मृत्यूनंतर आजही त्या बहामा येथे सेवा करत आहेत. त्यांनी देखील प्रचार कार्यात आपला उत्साह आजपर्यंत टिकवून ठेवला आहे. भगिनी पोर्टर आपल्या जीवनकथेत * सांगतात: “इतरांना बायबलचे सत्य शिकवण्यात एक वेगळाच आनंद मिळतो. त्यामुळे आध्यात्मिकरीत्या मी व्यस्त राहते आणि माझ्या जीवनालाही स्थैर्य मिळते.” भगिनी पोर्टर व त्यांच्यासारखे यहोवाचे इतर विश्‍वासू सेवक आपल्या जीवनाकडे मागे वळून पाहतात तेव्हा यहोवाने त्यांच्याकरता काय काय केले आहे हे ते विसरत नाहीत. आपल्याविषयी काय? आपल्या क्षेत्रात यहोवाने राज्याच्या कार्याला कशाप्रकारे आशीर्वादित केले आहे याकडे आपणही कृतज्ञतापूर्वक मागे वळून पाहतो का?—स्तोत्र ६८:११.

१८. मिशनरी बंधूभगिनींच्या जीवनकथा वाचल्याने आपल्याला काय शिकायला मिळते?

१८ अनेक वर्षांपासून यहोवाची सेवा करत असलेल्या या बंधूभगिनींनी जे काही साध्य केले आहे आणि अजूनही करत आहेत ते पाहून आपल्याला मनापासून आनंद होतो. त्यांच्या जीवनकथा वाचताना आपल्याला प्रोत्साहन मिळते कारण या विश्‍वासू बांधवांना यहोवाने कशाप्रकारे आशीर्वादित केले हे पाहिल्यावर यहोवाची सेवा करत राहण्याचा आपला निर्धार आणखीनच पक्का होतो. तुम्हाला अशाप्रकारच्या रोमांचक जीवनकथा वाचायला व त्यांवर मनन करायला आवडते का?

१९. ख्रिस्ती आईवडील टेहळणी बुरूज यात प्रकाशित झालेल्या जीवनकथांचा कशाप्रकारे उपयोग करू शकतात?

१९ मोशेने इस्राएली लोकांना आठवण करून दिली की यहोवाने त्यांच्याकरता जे केले होते ते त्यांनी विसरू नये तर या गोष्टी त्यांनी जीवनभर आपल्या मनात ठेवाव्यात. मग त्याने त्यांना आणखी काहीतरी करण्यास सांगितले: “तू आपल्या पुत्रपौत्रांना त्यांची मीहिती द्यावी.” (अनुवाद ४:९) वास्तविक अनुभव अधिक जोरदार छाप पाडतात. लहान मुलांना अनुकरण करण्याजोग्या आदर्शांची गरज असते. अविवाहित बहिणी टेहळणी बुरूज अंकांत आजवर प्रकाशित झालेल्या वयस्क बहिणींच्या जीवनकथा वाचून त्यांच्या विश्‍वासू उदाहरणावरून बरेच काही शिकू शकतात. आपल्याच देशातील परदेशी भाषेच्या क्षेत्रात सेवा करणाऱ्‍यांच्या उदाहरणांविषयी वाचल्यामुळे बंधू भगिनींना सुवार्तेच्या प्रचार कार्यात जास्तीत जास्त वेळ घालवण्याच्या अतिरिक्‍त संधींविषयी माहिती मिळते. ख्रिस्ती पालकांनो, तुमच्या मुलांना पूर्णवेळेची सेवा निवडण्याचे प्रोत्साहन देण्याकरता तुम्ही मिशनरी बंधूभगिनींच्या व इतरांच्या जीवनकथांचा उपयोग करून पाहिला आहे का?

२०. ‘जीवन निवडून घेण्यासाठी’ आपण काय केले पाहिजे?

२० तर मग आपल्यापैकी प्रत्येकजण कशाप्रकारे ‘जीवन निवडून घेऊ’ शकतो? आपण इच्छास्वातंत्र्याच्या अद्‌भुत देणगीचा उपयोग ज्याप्रकारे करतो, त्यावरून यहोवावर आपली प्रीती आहे हे दाखवण्याद्वारे; आणि तो जोपर्यंत आपल्याला संधी देईल तोपर्यंत शक्य तितक्या चांगल्याप्रकारे त्याची सेवा करण्याद्वारे आपण असे करू शकतो. कारण मोशेने म्हटल्याप्रमाणे, “त्यातच तुझे जीवन आहे व त्यामुळेच तू दीर्घायु होशील.”—अनुवाद ३०:१९, २०. (w०६ ६/१)

[तळटीप]

^ परि. 17 टेहळणी बुरूज जून १, २००१ अंकातील पृष्ठे २३-७ यांवर “अतीव दुःखातही आनंदी व कृतज्ञ” या शीर्षकाचा लेख पाहावा.

तुम्हाला आठवते का?

• विरुद्ध पर्याय निवडणाऱ्‍यांच्या आपण पाहिलेल्या उदाहरणांवरून तुम्हाला काय शिकायला मिळाले?

• ‘जीवन निवडून घेण्यासाठी’ आपण काय काय केले पाहिजे?

• आपल्याला कोणती दुहेरी जबाबदारी पूर्ण करण्याचे प्रोत्साहन देण्यात आले आहे?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२६ पानांवरील चित्र]

“जीवन व मरण . . . मी तुझ्यापुढे ठेवली आहेत”

[२९ पानांवरील चित्र]

देवाची वाणी ऐकल्यामुळे नोहा व त्याच्या कुटुंबाचे तारण झाले

[३० पानांवरील चित्र]

मेरी ओल्सन

[३० पानांवरील चित्र]

नॅन्सी पोर्टर