व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्ही बचावाकरता तयार आहात का?

तुम्ही बचावाकरता तयार आहात का?

तुम्ही बचावाकरता तयार आहात का?

“तू आपल्या सगळ्या कुटुंबासह तारवात चल; कारण मी पाहिले आहे की या पिढीत तूच माझ्यापुढे नीतिमान आहेस.”—उत्पत्ति ७:१.

१. नोहाच्या काळात जलप्रलयातून बचावण्याकरता यहोवाने कोणती व्यवस्था केली होती?

 नोहाच्या काळात यहोवाने ‘अभक्‍तांच्या जगावर जलप्रलय आणला’ पण त्याने बचावाकरताही व्यवस्था केली होती. (२ पेत्र २:५) खऱ्‍या देवाने नीतिमान नोहाला एक तारू बांधण्याविषयी सुस्पष्ट सूचना दिल्या. सगळ्या पृथ्वीवर येणार असलेल्या जलप्रलयातून बचावण्याकरता या तारवाचा उपयोग केला जाणार होता. (उत्पत्ति ६:१४-१६) या सूचना मिळाल्यावर यहोवाच्या कोणत्याही प्रामाणिक सेवकाने जे केले असते तेच नोहाने केले. नोहाला ‘देवाने जे काही सांगितले ते त्याने केले.’ एका अर्थाने, नोहाने देवाच्या सूचनांचे प्रामाणिकपणे पालन केल्यामुळेच आज आपण जिवंत आहोत.—उत्पत्ति ६:२२.

२, ३. (क) नोहा जे कार्य करत होता ते पाहून त्याच्या काळातल्या लोकांनी कशी प्रतिक्रिया दाखवली? (ख) नोहाला कोणता भरवसा असल्यामुळे तो तारवात गेला?

तारू बांधण्याचे काम सोपे नव्हते. नोहा व त्याच्या कुटुंबाला तो विशाल तारू बांधताना पाहून बऱ्‍याच लोकांना आश्‍चर्य वाटले असावे. पण, या तारवात प्रवेश केला तरच आपला बचाव होऊ शकतो याची मात्र त्यांना खात्री पटली नाही. शेवटी, देवाची सहनशक्‍ती संपली.—उत्पत्ति ६:३; १ पेत्र ३:२०.

नोहा व त्याच्या कुटुंबाने अनेक दशके कठोर परिश्रम केल्यानंतर यहोवाने नोहाला असे सांगितले: “तू आपल्या सगळ्या कुटुंबासह तारवात चल; कारण मी पाहिले आहे की या पिढीत तूच माझ्यापुढे नीतिमान आहेस.” यहोवाच्या वचनावर पूर्ण भरवसा ठेवून, “नोहा आपले मुलगे, बायको व सुना यास घेऊन तारवात गेला.” यहोवाने आपल्या उपासकांचे संरक्षण करण्याकरता तारवाचे दार बंद केले. सर्व पृथ्वीवर जलप्रलय आला, पण देवाने केलेल्या तरतुदीमुळे नोहा व त्याच्या कुटुंबाचा बचाव झाला.—उत्पत्ति ७:१, ७, १०, १६.

नोहाच्या काळाशी आजच्या काळाचे साम्य

४, ५. (क) येशूने आपल्या येण्याच्या काळाशी कशाची तुलना केली? (ख) नोहाच्या व आपल्या काळात कोणकोणत्या बाबतीत साम्य आहे?

“नोहाच्या दिवसात होते त्याप्रमाणे मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल.” (मत्तय २४:३७) असे म्हणण्याद्वारे येशूने हे सूचित केले, की तो अदृश्‍य रूपात येईल तेव्हाचा काळही नोहाच्या काळासारखाच असेल. आणि हे अगदी खरे ठरले आहे. नोहाने ज्याप्रमाणे त्याच्या काळातल्या लोकांना धोक्याची सूचना दिली होती, त्याचप्रमाणे आजच्या काळातही, विशेषतः १९१९ सालापासून सर्व राष्ट्रांच्या लोकांना येणाऱ्‍या नाशाविषयी जागृत करण्यात आले आहे. पण बहुतेक लोकांची प्रतिक्रिया नोहाच्या काळातल्या लोकांसारखीच आहे.

यहोवाने जलप्रलय आणून नोहाच्या काळातल्या जगाविरुद्ध न्यायदंड आणला कारण त्या जगात “जाचजुलूम माजला” होता. (उत्पत्ति ६:१३) नोहा व त्याच्या कुटंबांने या जाचजुलुमात कोणत्याही प्रकारे सहभाग घेतला नाही. तर ते शांतपणे आपले तारू बांधण्याचे कार्य करत राहिले हे सर्व लोकांना दिसत होते. याबाबतीतही आपल्या काळाशी नोहाच्या काळाचे साम्य आहे. प्रामाणिक मनाच्या लोकांना “धार्मिक व दुष्ट यांच्यातला आणि देवाची सेवा करणारा व सेवा न करणारा यांच्यातला भेद” स्पष्ट दिसतो. (मलाखी ३:१८) यहोवाच्या साक्षीदारांचा विश्‍वासूपणा, दयाळूपणा, शांतीप्रियता आणि परिश्रमी मनोवृती पाहून, त्यांच्याविषयी पूर्वग्रह न बाळगणारे बरेच लोक त्यांची प्रशंसा करतात. याच गुणांमुळे जगातल्या इतर लोकांमध्ये देवाचे लोक उठून दिसतात. यहोवाचे साक्षीदार हिंसाचाराचा, मग तो कोणत्याही रूपात का असेना धिक्कार करतात आणि यहोवाच्या आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार चालतात. म्हणूनच त्यांच्यामध्ये शांती आहे आणि म्हणूनच ते आपल्या जीवनात नीतिमान मार्गाने चालू शकतात.—यशया ६०:१७.

६, ७. (क) नोहाच्या काळातल्या लोकांनी काय ओळखले नाही आणि कशाप्रकारे आजची परिस्थितीही तशीच आहे? (ख) यहोवाचे साक्षीदार इतरांपेक्षा वेगळे आहेत हे बरेच लोक मान्य करतात हे कोणत्या उदाहरणांवरून दिसून येते?

नोहाला देवाचा पाठिंबा आहे आणि तो देवाच्या मार्गदर्शनानुसारच कार्य करत आहे, हे त्याच्या काळातले लोक ओळखू शकले नाही. त्यामुळे त्यांनी त्याच्या प्रचार कार्याकडे फारसे लक्ष दिले नाही आणि त्याने दिलेल्या धोक्याच्या सूचनेकडे दुर्लक्ष केले. आजच्या काळाविषयी काय? बरेच लोक यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्याची व त्यांच्या उत्तम चारित्र्याची प्रशंसा करतात, पण यांपैकी बहुतेकजण बायबलमधील सूचनांकडे फारसे लक्ष देत नाहीत. शेजारी, कंपन्यांचे मालक, किंवा नातेवाईक यहोवाच्या साक्षीदारांच्या चांगल्या गुणांविषयी भरभरून स्तुती करतात, पण मग खेदाने हे वाक्यही जोडतात, “ते यहोवाचे साक्षीदार असायला नको होते!” पण जर साक्षीदारांमध्ये प्रेम, शांती, दयाळूपणा, चांगुलपणा, सौम्यता, संयम यांसारखे गुण आहेत, तर ते देवाच्या पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार चालत असल्यामुळेच आहेत हे मात्र त्यांच्या लक्षात येत नाही. (गलतीकर ५:२२-२५) खरे पाहता, या चांगल्या गुणांमुळे लोकांनी त्यांच्या संदेशाकडे आणखी गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे.

उदाहरणार्थ, रशियात यहोवाच्या साक्षीदारांच्या एका राज्य सभागृहाचे बांधकाम चालले होते. काम सुरू असताना, एक माणूस बांधकाम करणाऱ्‍या बांधवांपैकी एकाला म्हणाला: “असा बांधकाम प्रकल्प मी पहिल्यांदाच पाहतोय, कोणी सिगारेट ओढताना, शिवीगाळ करताना किंवा दारू प्यायलेला दिसत नाही! तुम्ही यहोवाचे साक्षीदार तर नाहीत?” बांधवाने त्या माणसाला विचारले, “समजा मी नाही म्हणालो, तर तुम्ही माझ्यावर विश्‍वास ठेवाल?” तेव्हा तो माणूस लगेच म्हणाला, “नाही.” दुसऱ्‍या एका रशियन शहरात साक्षीदारांनी बांधलेले राज्य सभागृह पाहून त्या शहराचे महापौर अतिशय प्रभावित झाले. ते म्हणाले, की सगळेच धार्मिक गट एकसारखेच आहेत असे मी एकेकाळी मानत होतो पण यहोवाच्या साक्षीदारांची प्रामाणिकता आणि निःस्वार्थता पाहिल्यावर माझे मत बदलले आहे. बायबलच्या नीतिनियमांचे पालन न करणाऱ्‍या लोकांपेक्षा यहोवाचे लोक किती वेगळे आहेत हे दाखवणारी ही केवळ दोन उदाहरणे आहेत.

८. सध्याच्या दुष्ट जगाच्या अंतातून बचावू इच्छिणाऱ्‍यांनी काय केले पाहिजे?

जलप्रलयात ज्याचा नाश झाला त्या ‘प्राचीन जगाच्या’ शेवटल्या काळात, नोहाने विश्‍वासूपणे लोकांना ‘नीतिमत्त्वाचा उपदेश’ दिला. (२ पेत्र २:५) सध्याच्या जगाच्या या शेवटल्या काळात यहोवाचे सेवक त्याच्या नीतिनियमांविषयी लोकांना माहिती देत आहेत. तसेच, येणाऱ्‍या नाशातून बचावून नव्या जगात प्रवेश करणे शक्य आहे ही चांगली बातमी ते सर्वांना सांगत आहेत. (२ पेत्र ३:९-१३) ज्याप्रकारे नोहा व त्याचे देव-भीरू कुटुंब तारवात गेल्यामुळे सुरक्षित राहिले, त्याचप्रकारे जे सध्याच्या जगाच्या नाशातून बचावू इच्छितात त्यांनी यहोवाच्या वचनावर विश्‍वास ठेवला पाहिजे आणि त्याच्या विश्‍वव्यापी संघटनेच्या पृथ्वीवरील व्यवस्थेला एकनिष्ठपणे सहयोग दिला पाहिजे.

बचावण्याकरता विश्‍वास ठेवणे आवश्‍यक

९, १०. सैतानाच्या या जगाच्या अंतातून बचावण्याकरता विश्‍वास असणे का महत्त्वाचे आहे?

सैतानाच्या कह्‍यात असलेल्या या जगाचा नाश ठरलेला आहे. पण या नाशातून बचावण्याकरता एखाद्याने काय केले पाहिजे? (१ योहान ५:१९) सर्वप्रथम, आपल्याला संरक्षणाची गरज आहे हे त्याने ओळखले पाहिजे. आणि मग हे संरक्षण मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नोहाच्या काळातले लोक नेहमीप्रमाणे आपल्या रोजच्या कार्यांत व्यग्र होते. येणाऱ्‍या संकटातून आपल्याला संरक्षणाची गरज आहे हे त्यांनी ओळखले नाही. तसेच, ज्या आणखी एका गोष्टीची त्यांच्यात उणीव होती ती म्हणजे, त्यांचा देवावर विश्‍वास नव्हता.

१० पण नोहा आणि त्याच्या कुटुंबाच्या बाबतीत पाहिल्यास, त्यांना जाणीव होती की येणाऱ्‍या संकटातून आपल्याला संरक्षणाची आणि तारणाची गरज आहे. तसेच सबंध विश्‍वावर सर्वोच्च अधिकार असणाऱ्‍या यहोवा देवावर त्यांचा विश्‍वास होता. प्रेषित पौलाने लिहिल्याप्रमाणे: “विश्‍वासावाचून त्याला संतोषविणे अशक्य आहे; कारण देवाजवळ जाणाऱ्‍याने असा विश्‍वास ठेवला पाहिजे की, तो आहे, आणि त्याचा शोध झटून करणाऱ्‍यांना तो प्रतिफळ देणारा आहे.” पौल पुढे म्हणतो: “तोपर्यंत जे पाहण्यात आले नव्हते त्याविषयी नोहाला सूचना मिळाली आणि आदरयुक्‍त भयाने त्याने आपल्या कुटुंबाच्या तारणासाठी विश्‍वासाने तारू तयार केले; त्या विश्‍वासाच्या द्वारे त्याने जगाला दोषी ठरविले, आणि विश्‍वासाने प्राप्त होणारे जे नीतिमत्व त्याचा तो वतनदार झाला.”—इब्री लोकांस ११:६, ७.

११. गतकाळात यहोवाने ज्या प्रकारे आपल्या लोकांना संरक्षण पुरवले त्यावरून आपण काय शिकू शकतो?

११ सध्याच्या दुष्ट जगाच्या अंतातून बचावण्याकरता, या जगाचा नाश होणार आहे हे फक्‍तच मानणे पुरेसे नाही. आपल्याला विश्‍वास असला पाहिजे आणि बचावाकरता देवाने जी व्यवस्था केली आहे त्याचा आपण फायदा घेतला पाहिजे. अर्थात देवाचा पुत्र येशू ख्रिस्त याने दिलेल्या खंडणी बलिदानावरही आपला विश्‍वास असला पाहिजे. (योहान ३:१६, ३६) पण आपण हे आठवणीत ठेवले पाहिजे की नोहाच्या काळात जे तारवाच्या आत होते केवळ तेच जलप्रलयातून जिवंत बचावले. तसेच, प्राचीन इस्राएल देशात ज्याच्या हातून चुकून एखाद्याची हत्या झाली असेल, अशा व्यक्‍तीला संरक्षण पुरवण्याकरता शरणपुरांची खास तरतूद होती. पण संरक्षण मिळवण्याकरता त्या व्यक्‍तीने शरणपूर म्हणून ठरवलेल्या नगरात पळून जाणे आणि मग महायाजकाचा मृत्यू होईपर्यंत या नगराच्या आतच राहणे आवश्‍यक होते. (गणना ३५:११-३२) मोशेच्या काळात देवाने ईजिप्तवर दहावी पीडा आणली तेव्हा ईजिप्तच्या सर्व घराण्यांतल्या ज्येष्ठ संतानांचा मृत्यू झाला पण इस्राएली घराण्यांतल्या ज्येष्ठ पुत्रांना जिवंत बचावण्यात आले. का? यहोवाने मोशेला असे सांगितले होते: “ज्या घरात [वल्हांडणाच्या कोकराचे] मांस खावयाचे असेल त्या घराच्या दोन्ही दारबाह्‍यांना व चौकटीच्या कपाळपट्टीला त्याचे काही रक्‍त लावावे. . . . आणि सकाळपर्यंत कोणीहि घराच्या दाराबाहेर जाऊ नये.” (निर्गम १२:७, २२) देवाने सांगितल्यानुसार ज्या घराच्या दारावर रक्‍त लावण्यात आले होते अशा घरातून बाहेर पडण्याचे कोणत्याही इस्राएली कुटुंबातल्या ज्येष्ठ पुत्राने धैर्य केले असेल का?

१२. प्रत्येकाने स्वतःला कोणता प्रश्‍न विचारावा आणि का?

१२ तर मग, आज प्रत्येकाने आपल्या वैयक्‍तिक परिस्थितीबद्दल विचार केला पाहिजे. यहोवाने आध्यात्मिक संरक्षण पुरवण्याकरता ज्या काही तरतुदी केल्या आहेत त्यांचा आपण पूर्णपणे लाभ घेत आहोत का? मोठ्या संकटाला अचानक सुरूवात होईल तेव्हा, ज्यांनी यहोवाच्या व्यवस्थेचा आसरा घेतला आहे त्यांच्या डोळ्यांतून आनंदाचे व कृतज्ञतेचे अश्रू वाहतील. पण इतरांना मात्र दुःखाने रडावे व पस्तावावे लागेल.

प्रगतीशील सुधारणा बचावाकरता तयार करतात

१३. (क) संस्थेत झालेल्या सुधारणा कोणत्या उद्देशाने करण्यात आल्या आहेत? (ख) काही प्रगतीशील सुधारणांविषयी स्पष्टीकरण द्या.

१३ यहोवाने आपल्या संघटनेच्या पृथ्वीवरील क्षेत्रात बऱ्‍याच प्रगतीशील सुधारणा घडवून आणल्या आहेत. या सुधारणांमुळे आपल्या आध्यात्मिक संरक्षणाकरता त्याने केलेली व्यवस्था अधिकाधिक सुंदर, स्थिर, आणि मजबूत बनली आहे. १८७० पासून १९३२ पर्यंतच्या काळात मंडळीचे सदस्य वडिलांना व त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्‍या बांधवांना (डीकनांना) मतदान करून निवडून देत असत. पण १९३२ साली वडिलांना निवडून देण्याची प्रथा बंद करण्यात आली. त्याऐवजी मंडळी मतदानाकरवी एक सेवा समितीला निवडून देऊ लागली. आणि ही सेवा समिती, नियुक्‍त केलेल्या सेवा संचालकाच्या हाताखाली काम करत असे. १९३८ साली मंडळीतल्या सर्व सेवकांना बायबलच्या तत्त्वांच्या अनुषंगाने नियुक्‍त करण्याची व्यवस्था सुरू करण्यात आली. यहोवाच्या साक्षीदारांच्या नियमन मंडळाच्या देखरेखीखाली, १९७२ सालापासून वडिलांना व सेवा सेवकांना नियुक्‍त करण्याच्या पद्धतीत आणखी सुधारणा झाली आहे. या पद्धतीनुसार, बांधवांची शिफारस केली जाते आणि वडिलांना व सेवा सेवकांना ईश्‍वरशासित पद्धतीने नियुक्‍त केले जाते. नियुक्‍ती झाल्याबद्दल मंडळ्यांना पत्राद्वारे कळवले जाते. काळाच्या ओघात, नियमन मंडळाने अधिकाधिक कार्यभार आपल्या हाती घेतला असून त्यांचे काम सोपे करण्याकरताही काही बदल करण्यात आले आहेत.

१४. एकोणीसशे एकोणसाठ साली कोणता प्रशिक्षणाचा कार्यक्रम सुरू करण्यात आला?

१४ स्तोत्र ४५:१६ या वचनाचे बारकाईने परीक्षण करण्यात आल्यामुळे १९५० साली एक प्रशिक्षण कार्यक्रम हाती घेण्यात आला जो आजही सुरू आहे. या वचनात असे म्हटले आहे: “तुझ्या वडिलांच्या ठिकाणी तुझी मुले येतील; तू सर्व पृथ्वीवर त्यास अधिपति करिशील.” आज जे बांधव मंडळीत पुढाकार घेत आहेत, त्यांना सध्या आणि हर्मगिदोनानंतरही देवाच्या मंडळीतला कार्यभार सांभाळण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. (प्रकटीकरण १६:१४, १६) १९५९ साली राज्य सेवा प्रशाला स्थापन करण्यात आली. ही प्रशाला म्हणजे, आज आपण ज्यांना अध्यक्षीय पर्यवेक्षक म्हणतो त्या, त्याकाळच्या मंडळीच्या सेवकांकरता खासकरून तयार केलेला महिनाभर चालणारा अभ्यासक्रम होता. आज या प्रशालेत केवळ निवडक वडिलांना नव्हे, तर सर्व वडिलांना व सेवा सेवकांना प्रशिक्षण पुरवले जाते. मग हे बांधव आपापल्या मंडळ्यांतल्या बांधवांना वैयक्‍तिक पातळीवर प्रशिक्षण देण्यात पुढाकार घेतात. अशारितीने, सर्वांना आध्यात्मिक साहाय्य पुरवले जाते आणि राज्याच्या सुवार्तेची घोषणा अधिक प्रभावकारी पद्धतीने करण्याकरता मदत दिली जाते.—मार्क १३:१०.

१५. कोणत्या दोन मार्गांनी ख्रिस्ती मंडळीची शुद्धता टिकवून ठेवली जाते?

१५ ज्या व्यक्‍तींना ख्रिस्ती मंडळीचे सभासद बनायचे आहे त्यांना विशिष्ट अटी पूर्ण कराव्या लागतात. साहजिकच, यहोवाच्या प्रतिज्ञांविषयी थट्टा करणाऱ्‍या लोकांना ज्याप्रकारे नोहाच्या तारवात प्रवेश मिळाला नाही त्याचप्रकारे आजही अशा थट्टेखोर लोकांना मंडळीत घेतले जात नाही. (२ पेत्र ३:३-७) विशेषतः १९५२ सालापासून यहोवाच्या साक्षीदारांनी, पाप करणाऱ्‍या अपश्‍चात्तापी व्यक्‍तींना बहिष्कृत करण्याच्या व्यवस्थेला अधिकाधिक सहयोग दिला आहे. ही व्यवस्था मंडळीच्या संरक्षणाकरता आहे. अर्थात, जे मनापासून पश्‍चात्ताप करतात अशा व्यक्‍तींना ‘आपल्या पायांसाठी सरळ वाटा करण्याकरता’ मदत पुरवली जाते.—इब्री लोकांस १२:१२, १३; नीतिसूत्रे २८:१३; गलतीकर ६:१.

१६. यहोवाच्या लोकांच्या आध्यात्मिक परिस्थितीचे कशाप्रकारे वर्णन करता येईल?

१६ यहोवाचे लोक आज आध्यात्मिकरित्या जी समृद्धी अनुभवत आहेत ती अपेक्षितच आहे. कारण यहोवाने आपला संदेष्टा यशया याच्याद्वारे पूर्वीच असे भाकीत केले होते, की “पाहा, माझे सेवक खातील, पण तुम्ही उपाशी राहाल; माझे सेवक पितील, पण तुम्ही तान्हेले राहाल; पाहा, माझे सेवक आनंद करितील पण तुम्ही फजीत व्हाल; पाहा, माझे सेवक हर्षित चित्ताने जयजयकार करितील, पण तुम्ही खिन्‍न चित्ताने ओरडाल, भग्नहृदय होऊन आकांत कराल.” (यशया ६५:१३, १४) यहोवा नियमितपणे आपल्याला आवश्‍यक असलेले समयोचित व आरोग्यदायी आध्यात्मिक अन्‍न, विपुल प्रमाणात पुरवतो आणि त्यामुळे आपण आध्यात्मिकरित्या सुदृढ राहू शकतो.—मत्तय २४:४५.

बचावाकरता तयार असा

१७. बचावाकरता तयार राहण्याकरता आपण काय केले पाहिजे?

१७ आजच्या या काळात, ‘प्रीति व सत्कर्मे करावयास उत्तेजन येईल असे एकमेकांकडे लक्ष देण्याची आणि कित्येकांच्या चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे न सोडता एकमेकास बोध करण्याची’ म्हणजेच, एकमेकांस प्रोत्साहन देण्याची अत्यंत गरज आहे. (इब्री लोकांस १०:२३-२५) यहोवाच्या साक्षीदारांच्या ९८,००० पेक्षा जास्त मंडळ्यांपैकी कोणत्याही एका मंडळीसोबत जवळचा सहवास राखल्यामुळे आणि नियमित व सक्रिय रित्या मंडळीच्या कार्यांत सहभाग घेतल्यामुळे आपल्याला येणाऱ्‍या मोठ्या संकटातून बचावाकरता तयार राहता येईल. आपण सतत “नवा मनुष्य” धारण करण्याचा, अर्थात ख्रिस्ती गुण आपल्या वर्तणुकीत आणण्याचा मनापासून प्रयत्न केला पाहिजे. तसेच तारणाकरता यहोवाने केलेल्या तरतुदीविषयी समजून घेण्यास इतरांना मदत करण्याच्या कार्यातही आपण स्वतःला झोकून दिले पाहिजे. हे सर्व करताना आपले सहविश्‍वासू बांधव नेहमी आपले साहाय्य करतील.—इफिसकर ४:२२-२४; कलस्सैकर ३:९, १०; १ तीमथ्य ४:१६.

१८. तुम्हाला ख्रिस्ती मंडळीशी जडून राहावेसे का वाटते?

१८ सैतान व त्याचे दुष्ट जग कसेही करून, आपल्याला ख्रिस्ती मंडळीपासून दूर नेण्याच्या प्रयत्नात आहे. पण आपण या मंडळीत टिकून राहण्याद्वारे सध्याच्या दुष्ट जगाच्या अंतातून बचावू शकतो. यहोवाबद्दलचे प्रेम आणि त्याच्या प्रेमळ तरतुदींबद्दलची कृतज्ञता आपल्याला सैतानाच्या दुष्ट प्रयत्नांना धुडकावून लावण्याची सतत प्रेरणा देत राहो. सध्याच्या काळात यहोवाने आपल्याला जे आशीर्वाद दिले आहेत त्यांवर मनन केल्यामुळे असे करण्याचा आपला निर्धार अधिकच पक्का होईल. तेव्हा, पुढच्या लेखात यांपैकी काही आशीर्वादांविषयी चर्चा करू या. (w०६ ५/१५)

तुम्ही कसे उत्तर द्याल?

• आपला काळ कोणत्या बाबतीत नोहाच्या काळासारखा आहे?

• बचावण्याकरता कोणता गुण असणे महत्त्वाचे आहे?

• यहोवाने आपल्या बचावाकरता केलेली व्यवस्था कोणत्या प्रगतीशील सुधारणांमुळे अधिक मजबूत बनली आहे?

• आपण स्वतः बचावाकरता कशाप्रकारे तयारी करू शकतो?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[११ पानांवरील चित्र]

देवाने दिलेल्या धोक्याच्या सूचनांकडे लक्ष देणे आपल्याच फायद्याचे आहे

[१२ पानांवरील चित्र]

राज्य सेवा प्रशालेचे कोणते उद्दिष्ट आहे?

[१३ पानांवरील चित्र]

ही वेळ ख्रिस्ती मंडळीच्या जवळ राहण्याची आहे