व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवा “आरंभीच शेवट” कळवितो

यहोवा “आरंभीच शेवट” कळवितो

यहोवा “आरंभीच शेवट” कळवितो

“मी आरंभीच शेवट कळवितो. होणाऱ्‍या गोष्टी घडविण्यापूर्वी त्या मी प्राचीन काळापासून सांगत आलो आहे.”—यशया ४६:१०.

१, २. बॅबिलोनच्या पराभवाशी संबंधित घटनांचे वैशिष्ट्य काय आहे आणि यावरून यहोवाविषयी आपल्याला काय समजते?

 रात्रीच्या गर्द काळोखात, शत्रूसैन्य फरात नदीच्या पात्रातून आपल्या लक्ष्याकडे वाटचाल करत आहे. त्यांचे लक्ष्य आहे शक्‍तिशाली शहर, बॅबिलोन. शहराच्या तटबंदीजवळ येताच त्यांना समोर जे दिसते ते पाहून त्यांना आपल्या डोळ्यांवर विश्‍वासच बसत नाही. बॅबिलोन शहराची मोठाली दारे कधी नव्हे ती आज उघडीच ठेवण्यात आली आहेत! नदीच्या पात्रातून ते पायऱ्‍या चढून शहरात प्रवेश करतात. आणि काही वेळातच बॅबिलोन शहर काबीज करतात. त्यांचा राजा कोरेश लगेच या पराभूत देशाचा कारभार आपल्या हाती घेतो आणि नंतर बॅबिलोनने ज्यांना बंदिवान बनवले होते त्या इस्राएली लोकांना मुक्‍त करण्याचे फर्मान सोडतो. हजारो इस्राएली बंदिवान आपल्या मायदेशी परतून जेरूसलेम शहरात यहोवाची उपासना पुन्हा सुरू करतात.—२ इतिहास ३६:२२, २३; एज्रा १:१-४.

सा.यु.पू. ५३९-५३७ मध्ये घडलेल्या या घटनांना आज इतिहासकार देखील दुजोरा देतात. पण या घटनांचे वैशिष्ट्य हे, की त्या घडण्याच्या २०० वर्षांआधीच त्यांच्याविषयी सांगण्यात आले होते. होय, यहोवाने तब्बल २०० वर्षांआधीच आपला संदेष्टा यशया याला बॅबिलोनच्या पराभवाचे वर्णन करण्यास प्रेरित केले होते. (यशया ४४:२४–४५:७) देवाने बॅबिलोनच्या पराभवाशी संबंधित घटनांविषयीच नव्हे तर बॅबिलोनवर कब्जा करणाऱ्‍या राजाचे नावसुद्धा प्रकट केले होते. * इस्राएली लोक, जे तेव्हा यहोवाचे साक्षीदार होते, त्यांना उद्देशून तो म्हणाला: “प्राचीन काळापासून घडलेल्या गत गोष्टी स्मरा आणि समजा की, मीच देव आहे, दुसरा कोणी देव नव्हे, मजसमान कोणीच नाही मी आरंभीच शेवट कळवितो. होणाऱ्‍या गोष्टी घडविण्यापूर्वी त्या मी प्राचीन काळापासून सांगत आलो आहे.” (यशया ४६:९, १०अ) यहोवा खरोखरच असा देव आहे की जो भविष्यात काय घडणार आहे ते आधीपासूनच सांगू शकतो.

३. आता आपण कोणते प्रश्‍न विचारात घेणार आहोत?

पण भविष्याबद्दल देवाला कितपत माहिती आहे? आपल्यापैकी प्रत्येकजण काय करणार आहे हे त्याला आधीपासूनच माहीत असते का? आणि त्याअर्थी, आपले भविष्य हे आधीपासूनच ठरले आहे असे आपण समजावे का? या व संबंधित प्रश्‍नांना बायबल काय उत्तर देते हे आपण या व पुढच्या लेखात पाहणार आहोत.

यहोवा—भविष्यवाणी करणारा देव

४. बायबलमध्ये लिहिलेल्या भविष्यवाण्या कोणी प्रेरित केल्या आहेत?

यहोवा देव भविष्य जाणण्यास समर्थ असल्यामुळे त्याने पुरातन काळातल्या आपल्या सेवकांना बायबलमध्ये अनेक भविष्यवाण्या लिहून ठेवण्यास प्रेरित केले. त्यामुळे, यहोवाचा भविष्यात काय करण्याचा संकल्प आहे हे आपल्यालाही आधीपासूनच समजणे शक्य झाले आहे. यहोवा असे घोषित करतो: “पहिल्या गोष्टी घडून चुकल्या आहेत; नव्या गोष्टी मी विदित करितो; त्यास आरंभ होण्यापूर्वी त्या तुम्हास ऐकवितो.” (यशया ४२:९) देवाच्या लोकांना खरोखर किती मोठा सन्मान लाभला आहे!

५. यहोवा भविष्यात काय करणार आहे याविषयी आधीपासूनच समजल्यामुळे कोणती जबाबदारी येते?

संदेष्टा आमोस आपल्याला हे आश्‍वासन देतो: “प्रभु परमेश्‍वर आपले रहस्य आपले सेवक संदेष्टे यांस कळविल्याशिवाय खरोखर काहीच करीत नाही.” पण आधीपासूनच हे ज्ञान मिळाल्यामुळे देवाच्या सेवकांवर एक जबाबदारी देखील आली. आमोसने एका अतिशय बोलक्या उदाहरणाच्या साहाय्याने हे स्पष्ट केले: “सिंहाने गर्जना केली आहे; त्याला भिणार नाही असा कोण?” सिंहाची डरकाळी ऐकल्यावर जवळपास असलेले पशूपक्षी व मानव लगेच प्रतिक्रिया दाखवतात. त्याचप्रकारे, यहोवाने भविष्याविषयी जे जाहीर केले ते ऐकल्यावर आमोस व त्याच्यासारख्या इतर संदेष्ट्यांनी लगेच त्या भविष्यवाण्या घोषित केल्या. “प्रभु परमेश्‍वर बोलला आहे; संदेश दिल्यावाचून कोणाच्याने राहवेल?”—आमोस ३:७, ८.

यहोवाचे ‘वचन कधीही विफल होत नाही’

६. बॅबिलोनच्या पराभवासंबंधी यहोवाचा “संकल्प” कशाप्रकारे पूर्ण झाला?

यशया संदेष्ट्याद्वारे यहोवाने असे म्हटले: “माझा संकल्प सिद्धीस जाईल, माझा मनोरथ मी पूर्ण करीन.” (यशया ४६:१०ब) बॅबिलोनच्या बाबतीत देवाचा “संकल्प” किंवा इच्छा पूर्ण करण्याकरता तो कोरेशला पारस देशातून बोलावून त्याच्याद्वारे बॅबिलोनचा पराभव घडवून आणणार होता. यहोवाने आपला हा उद्देश फार पूर्वीच घोषित केला होता. आणि याआधी सांगण्यात आल्याप्रमाणे तो सा.यु.पू. ५३९ साली पूर्ण देखील झाला.

७. यहोवाचे “वचन” नेहमी पूर्ण होते याची आपण खात्री का बाळगू शकतो?

कोरेशने बॅबिलोनवर विजय मिळवण्याच्या जवळजवळ चार शतकांआधी अम्मोन व मवाबाच्या सैन्यांनी मिळून यहुदा राष्ट्राच्या राजा यहोशाफाटाविरुद्ध चढाई केली. तेव्हा त्याने पूर्ण विश्‍वासानिशी अशी प्रार्थना केली: “हे आमच्या पूर्वजांच्या देवा, परमेश्‍वरा, तू स्वर्गीचा देव आहेस ना? राष्ट्रांच्या सर्व राज्यांवर तूच शास्ता आहेस ना? तुझ्या हाती एवढे सामर्थ्य व पराक्रम आहे की कोणाच्याने तुजसमोर टिकाव धरवत नाही.” (२ इतिहास २०:६) यशयानेही असाच भरवसा व्यक्‍त केला. त्याने म्हटले: “सेनाधीश परमेश्‍वराने संकल्प केला आहे तो कोणाच्याने रद्द करवेल! त्याचा हात उगारिलेला आहे तो कोणाच्याने मागे आणवेल?” (यशया १४:२७) नंतर, बॅबिलोनचा राजा नबुखेदनस्सर, ज्याला काही काळ वेड्या माणसासारखे राहावे लागले व नंतर त्याची बुद्धी परत आली, त्यानेही यहोवाविषयी हे कबूल केले: “तू असे काय करितोस, असे त्याचा हात धरून कोणाच्याने त्याला म्हणवत नाही.” (दानीएल ४:३५) होय, यहोवा आपल्या लोकांना ही खात्री देतो की, “माझ्या मुखातून निघणारे वचन . . . माझी इच्छा पूर्ण केल्यावाचून व ज्या कार्याकरिता मी ते पाठविले ते केल्यावाचून मजकडे विफल होऊन परत येणार नाही.” (यशया ५५:११) यहोवाचे “वचन” नेहमी खरे ठरते याची आपण पूर्ण खात्री बाळगू शकतो. देवाचा संकल्प पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही.

देवाचा “युगादिकालाचा संकल्प”

८. देवाचा “युगादिकालाचा संकल्प” काय आहे?

इफिसस येथील ख्रिस्ती बांधवांना लिहिलेल्या पत्रात प्रेषित पौलाने देवाच्या ‘युगादिकालाच्या संकल्पाविषयी’ उल्लेख केला. (इफिसकर ३:११) हा संकल्प म्हणजे केवळ पूर्वीपासून आखलेली एक योजना नव्हे. यहोवा देवाला काहीही साध्य करण्यासाठी आधीपासून योजना आखावी लागत नाही. तर युगादिकालाचा संकल्प, मानवजातीकरता व या पृथ्वीकरता यहोवाने अगदी सुरवातीला जे इच्छिले होते ते पूर्ण करण्याच्या त्याच्या निश्‍चयाला सूचित करतो. (उत्पत्ति १:२८) यहोवाचा संकल्प कधीही विफल होणार नाही हे समजून घेण्याकरता बायबलमध्ये नोंदलेल्या पहिल्या भविष्यवाणीकडे लक्ष द्या.

९. उत्पत्ति ३:१५ यात जे सांगितले आहे त्याचा देवाच्या संकल्पाशी कसा संबंध आहे?

उत्पत्ति ३:१५ यातील प्रतिज्ञा असे सूचित करते, की आदाम व हव्वा यांनी पाप केल्यावर लगेच यहोवाने हे ठरवले की त्याची लाक्षणिक स्त्री एका संततीला किंवा पुत्राला जन्म देईल. ही स्त्री व सैतान यांच्यामध्ये आणि त्यांच्या विरोधी संततींमध्ये जे वैर असेल त्याचा अंतिम परिणाम काय असेल हेही यहोवाने आधीच पाहिले. देवाच्या स्त्रीच्या संततीची टाच फोडली जाणार होती आणि यहोवा हे घडू देणार होता. पण देवाच्या नियुक्‍त वेळी, स्त्रीची संतती सर्पाचे म्हणजेच दियाबल सैतानाचे डोके फोडणार होती. येशू हा प्रतिज्ञा केलेल्या मशीहाच्या रूपात प्रकट होईपर्यंत यहोवाचा संकल्प, त्याने निवडलेल्या वंशावळीतून प्रगतीशीलपणे पूर्ण झाला. कोणीही यात बाधा आणू शकले नाही.—लूक ३:१५, २३-३८; गलतीकर ४:४.

यहोवाने काय पूर्वनिश्‍चित केले?

१०. आदाम व हव्वा पाप करतील हे यहोवाने आधीपासूनच ठरवले होते का? स्पष्ट करा.

१० देवाच्या संकल्पाच्या पूर्णतेत येशूच्या भूमिकेविषयी सांगताना प्रेषित पेत्राने असे लिहिले: “ज्याचे [येशूचे] पूर्वज्ञान जगाच्या स्थापनेच्या आधी झाले होते, तोच काळाच्या शेवटी तुम्हांसाठी प्रगट झाला.” (१ पेत्र १:२०) आदाम व हव्वा पाप करतील आणि मग येशू ख्रिस्ताच्या बलिदानाद्वारे खंडणी पुरवली जाईल हे यहोवाने पूर्वीपासूनच ठरवले किंवा पूर्वनिश्‍चित केले होते का? नाही. या वचनात “स्थापनेच्या” असे भाषांतर केलेल्या मूळ ग्रीक संज्ञेचा शब्दशः अर्थ “बीज टाकणे” असा होतो. आदाम व हव्वा यांनी पाप करण्याआधी मानवी संततीची गर्भधारणा झाली होती का किंवा त्यांचे ‘बीज टाकण्यात’ आले होते का? नाही. आदाम व हव्वा यांनी देवाची आज्ञा मोडल्यानंतर त्यांना मुले झाली. (उत्पत्ति ४:१) तेव्हा, एदेन बागेतल्या बंडाळीनंतर पण आदाम व हव्वेने मुलांना जन्म देण्याअगोदर यहोवाने “संतती” प्रकट होण्याविषयी पूर्वनिश्‍चित केले. येशूच्या मृत्यू व पुनरुत्थानाकरवी खंडणीची प्रेमळ तरतूद करण्यात आली. या खंडणीकरवी आदामापासून वारशाने मिळालेले पाप व सैतानाच्या सर्व दुष्ट योजना कायमच्या नाहीशा केल्या जाणार आहेत.—मत्तय २०:२८; इब्री लोकांस २:१४; १ योहान ३:८.

११. आपल्या संकल्पाच्या पूर्णतेकरता यहोवाने कोणता घटनाक्रम पूर्वनिश्‍चित केला होता?

११ आपल्या संकल्पाच्या पूर्णतेकरता देवाने आणखी एक घटनाक्रम पूर्वनिश्‍चित केला होता. पौलाने इफिसकरांना जे लिहिले होते त्यावरून हे सूचित होते. त्याने लिहिले की देव “स्वर्गात व पृथ्वीवर जे आहे ते सर्व ख्रिस्तामध्ये एकत्र” करेल. मग ‘स्वर्गात जे आहे’ त्याविषयी अर्थात ख्रिस्तासोबत वारस होण्याकरता ज्यांना निवडण्यात आले आहे त्यांच्याविषयी पौलाने असा खुलासा केला: “आपल्याला मनाच्या संकल्पाप्रमाणे जो अवघे चालवितो त्याच्या योजनेप्रमाणे आम्ही पूर्वी नेमलेले . . .आहो.” (इफिसकर १:१०, ११) होय, मानवांपैकी एक मर्यादित संख्या देवाच्या स्त्रीच्या संततीचा दुय्यम भाग बनेल व ख्रिस्तासोबत मानवजातीला खंडणीचे लाभ मिळवून देईल, हे यहोवाने आधीपासूनच ठरवले होते. (रोमकर ८:२८-३०) प्रेषित पेत्राने यांचा उल्लेख “पवित्र राष्ट्र” असा केला. (१ पेत्र २:९) प्रेषित योहानाला एक विशेष सन्मान मिळाला. त्याला एका दृष्टान्तात, ख्रिस्तासोबत सहवारस बनणार असलेल्यांची संख्या सांगण्यात आली, अर्थात १,४४,०००. (प्रकटीकरण ७:४-८; १४:१, ३) ते “देवाच्या गौरवाची स्तुति व्हावी म्हणून” ख्रिस्तासोबत राजे या नात्याने सेवा करतात.—इफिसकर १:१२-१४.

१२. एक लक्ष चव्वेचाळीस हजार जणांना व्यक्‍तिशः पूर्वनिश्‍चित करण्यात आलेले नाही हे आपल्याला कसे समजते?

१२ एक लक्ष चव्वेचाळीस हजार जणांना पूर्वनिश्‍चित करण्यात आले होते. पण मानवांपैकी कोणकोणत्या व्यक्‍ती अशाप्रकारे देवाची विश्‍वासूपणे सेवा करतील हे पूर्वनिश्‍चित करण्यात आले होते असा याचा अर्थ होत नाही. किंबहुना, अभिषिक्‍त जनांना मार्गदर्शन व मनोबल पुरवण्यासाठी आणि त्यांनी शेवटपर्यंत विश्‍वासू राहून, त्यांना देण्यात आलेल्या स्वर्गीय आशेकरता स्वतःची लायकी सिद्ध करावी याच उद्देशाने ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांत त्यांना बराच सल्ला देण्यात आला. (फिलिप्पैकर २:१२; २ थेस्सलनीकाकर १:५, ११; २ पेत्र १:१०, ११) यहोवाला आधीपासूनच हे माहीत आहे की १,४४,००० जण त्याच्या संकल्पानुसार कार्य करण्याकरता योग्य ठरतील. पण हे १,४४,००० जण नेमके कोण असतील हे या गोष्टीवर निर्भर आहे की ज्यांना निवडण्यात आले आहे ते आपले जीवन कशाप्रकारे जगतात. आणि हा एक असा निर्णय आहे की जो त्यांपैकी प्रत्येक व्यक्‍ती स्वखुशीने घेईल.—मत्तय २४:१३.

यहोवाला कशाविषयी पूर्वज्ञान आहे?

१३, १४. यहोवा ज्याप्रकारे आपल्या पूर्वज्ञानाचा उपयोग करतो ते कशाच्या सामंजस्यात असते आणि का?

१३ यहोवा भविष्यवाणी करणारा व आपले संकल्प पूर्णतेस नेणारा देव आहे. त्याअर्थी तो आपले पूर्वज्ञानाचे सामर्थ्य कशाप्रकारे उपयोगात आणतो? सर्वप्रथम, आपण ही खात्री बाळगू शकतो की देवाचे सर्व मार्ग खरे, न्याय्य आणि प्रेमळ आहेत. सा.यु. पहिल्या शतकात इब्री ख्रिश्‍चनांना लिहिताना प्रेषित पौलाने, याविषयी खात्री दिली की देवाची शपथ व त्याचे अभिवचन ‘अशा दोन अचल गोष्टी’ आहेत की ‘ज्याविषयी खोटे बोलणे देवाला अशक्य आहे.’ (इब्री लोकांस ६:१७, १८) शिष्य तीतास लिहिताना देखील पौलाने हा विचार व्यक्‍त केला. त्याने लिहिले की देव “सत्यप्रतिज्ञ” आहे, अर्थात त्याच्याने खोटे बोलवतच नाही.—तीत १:२.

१४ शिवाय, यहोवाजवळ असीम सामर्थ्य असले तरी तो कधीच अन्यायाने वागत नाही. मोशेने यहोवाचे वर्णन करताना म्हटले, “तो विश्‍वसनीय देव आहे; त्याच्या ठायी अनीति नाही; तो न्यायी व सरळ आहे.” (अनुवाद ३२:४) यहोवा जे काही करतो ते त्याच्या या अद्‌भुत गुणांच्या सामंजस्यात असते. त्याच्या सर्व कृतींतून, प्रीती, बुद्धी, न्याय व सामर्थ्य या त्याच्या चार मुख्य गुणांचा परिपूर्ण मिलाफ दिसून येतो.

१५, १६. एदेन बागेत यहोवाने आदामापुढे कोणते पर्याय ठेवले?

१५ या सर्व गोष्टींचा एदेन बागेत जे घडले त्याच्याशी कसा संबंध आहे याकडे लक्ष द्या. एक प्रेमळ पिता बनून यहोवाने मानवांना आवश्‍यक असलेले सर्व काही पुरवले होते. त्याने आदामाला विचार करण्याची, तर्क करण्याची आणि त्या आधारावर कोणत्याही बाबतीत निष्कर्ष काढण्याची क्षमता दिली होती. याबाबतीत, तो प्राण्यांसारखा नव्हता. कारण प्राणी आपल्या उपजतबुद्धीच्या आधारावरच कृती करतात. पण आदामाला मात्र कोणता मार्ग निवडायचा याबाबतीत निर्णय घेण्याची क्षमता होती. आदामाला निर्माण केल्यानंतर, देवाने आपल्या स्वर्गीय सिंहासनावरून खाली नजर टाकली तेव्हा, “आपण केलेले सर्व फार चांगले आहे असे देवाने पाहिले.”—उत्पत्ति १:२६-३१; २ पेत्र २:१२.

१६ “बऱ्‍यावाइटाचे ज्ञान करुन देणाऱ्‍या झाडाचे फळ खाऊ नको” अशी आदामाला आज्ञा देण्याचे देवाने ठरवले तेव्हा त्याने पुरेशा सूचना देखील दिल्या जेणेकरून आदाम याबाबतीत काय करावे याचा निर्णय घेऊ शकेल. त्याने आदामाला “बागेतील वाटेल त्या झाडाचे फळ यथेच्छ” खाण्याची परवानगी दिली. फक्‍त एका झाडाचे फळ खाण्यास त्याने मनाई केली आणि हे फळ खाल्ले तर तू मरशील असेही बजावून सांगितले. (उत्पत्ति २:१६, १७) कोणता निर्णय घेतल्यामुळे काय परिणाम होईल हे देवाने आदामाला स्पष्ट करून सांगितले. आदामाने काय केले?

१७. यहोवा त्याच्या पूर्वज्ञानाच्या सामर्थ्याचा वापर करण्याचे नेहमीच निवडत नाही असे आपण का म्हणू शकतो?

१७ यहोवाला आधीपासूनच सर्वकाही जाणून घेण्याचे सामर्थ्य असले तरीही, आदाम व हव्वा काय करतील हे आधीपासूनच जाणून घेण्याचे देवाने निवडले नाही हे उघड आहे. त्याअर्थी, प्रश्‍न हा नाही की यहोवा भविष्य जाणून घेऊ शकतो किंवा नाही, तर हा आहे की तो जाणून घेण्याचे निवडतो किंवा नाही. शिवाय, आपण असाही तर्क करू शकतो की यहोवा प्रेमळ देव असल्यामुळे, त्याची आज्ञा तोडल्याने कोणकोणते दुःखद परिणाम होतील हे माहीत असताना जाणूनबुजून, क्रूरपणे असे घडण्याचे तो पूर्वनिश्‍चित करणार नाही. (मत्तय ७:११; १ योहान ४:८) तेव्हा यहोवाला पूर्वज्ञानाचे सामर्थ्य आहे पण तो त्याचा नेहमीच वापर करायचे निवडत नाही.

१८. यहोवा नेहमीच आपल्या पूर्वज्ञानाच्या सामर्थ्याचा उपयोग करण्याचे निवडत नाही याचा अर्थ त्याच्यात काही अपरिपूर्णता आहे असे समजावे का?

१८ यहोवा आपल्या पूर्वज्ञानाच्या सामर्थ्याचा नेहमीच वापर करत नाही याचा अर्थ त्याच्यात काहीतरी कमी आहे किंवा तो अपरिपूर्ण आहे असा होतो का? नाही. मोशेने यहोवाचे “दुर्ग” असे वर्णन केले व पुढे असेही म्हटले की “त्याची कृति परिपूर्ण आहे.” मानवी पापामुळे झालेल्या दुष्परिणामांकरता तो मुळीच जबाबदार नाही. आज आपल्याला जे सगळे दुःखदायी परिणाम भोगावे लागत आहेत ते आदामाने देवाची आज्ञा मोडण्याचा अनीतिमान मार्ग निवडल्यामुळे घडून आले आहेत. प्रेषित पौलाने याविषयी स्पष्ट खुलासा केला: “एका माणसाच्या द्वारे पाप जगात शिरले आणि पापाच्या द्वारे मरण शिरले; आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसांमध्ये अशा प्रकारे मरण पसरले.”—अनुवाद ३२:४, ५; रोमकर ५:१२; यिर्मया १०:२३.

१९. पुढच्या लेखात आपण कोणत्या प्रश्‍नांवर विचार करणार आहोत?

१९ तर आपल्या या चर्चेत इथपर्यंत आपण पाहिले, की यहोवा कधीही अन्याय करत नाही. (स्तोत्र ३३:५) उलट, तो त्याच्या सामर्थ्याचा, नैतिक गुणांचा आणि नीतिनियमांचा त्याच्या उद्देशानुरूप उपयोग करतो. (रोमकर ८:२८) यहोवा भविष्यवाणी सांगणारा देव असल्यामुळे “आरंभीच शेवट कळवितो. होणाऱ्‍या गोष्टी घडविण्यापूर्वी” सांगतो. (यशया ४६:९, १०) आपल्या पूर्वज्ञानाच्या सामर्थ्याचा वापर करण्याचे तो नेहमीच निवडत नाही हे देखील आपण पाहिले. तर मग या सर्वात आपली काय भूमिका आहे? आपल्या जीवनातले निर्णय देवाच्या प्रेमळ उद्देशांच्या अनुरूप आहेत याची आपण कशी खात्री करू शकतो? आणि असे केल्याने आपल्याला कोणते आशीर्वाद लाभतील? या सर्व प्रश्‍नांचा आपण पुढच्या लेखात विचार करणार आहोत. (w०६ ६/१)

[तळटीप]

^ परि. 2 यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेल्या सर्व लोकांसाठी असलेले पुस्तक या माहितीपत्रकातले पृष्ठ २८ कृपया पाहावे.

तुम्ही स्पष्ट करू शकता का?

• देवाचे “वचन” कधीही ‘विफल होत नाही’ हे पुरातन काळातल्या कोणत्या उदाहरणांवरून दिसून येते?

• यहोवाने आपल्या ‘युगादिकालाच्या संकल्पाच्या’ संबंधाने काय पूर्वनिश्‍चित केले आहे?

• यहोवा आपल्या पूर्वज्ञानाच्या सामर्थ्याचा कशाप्रकारे वापर करतो?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२२ पानांवरील चित्र]

यहोशाफाटाला यहोवावर भरवसा होता

[२३ पानांवरील चित्र]

देवाने येशूच्या मृत्यू व पुनरुत्थानाविषयी भाकीत केले होते

[२४ पानांवरील चित्र]

आदाम व हव्वा काय करतील हे यहोवाने आधीच ठरवले होते का?