व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

स्तोत्रसंहितेच्या पहिल्या पुस्तकातील ठळक मुद्दे

स्तोत्रसंहितेच्या पहिल्या पुस्तकातील ठळक मुद्दे

यहोवाचे वचन सजीव आहे

स्तोत्रसंहितेच्या पहिल्या पुस्तकातील ठळक मुद्दे

बायबलमध्ये, आपला निर्माणकर्ता यहोवा देव याची बहुतेक स्तुतीगीते ज्या पुस्तकात आहेत त्या पुस्तकाचे कोणते नाव उचित असू शकते? स्तोत्रसंहिता, या नावापेक्षा आणखी कोणतेही नाव उचित असू शकत नाही. हे बायबलमधील सर्वात मोठे पुस्तक आहे. यांत सुरेख रचलेली गीते आहेत जी देवाच्या अद्‌भुत गुणांचे आणि महत्कृत्यांचे वर्णन करतात आणि अनेक भविष्यवाण्या प्रकट करतात. ही गीते ज्यांनी लिहिली आहेत त्या लेखकांनी बहुतेक गीतांद्वारे, संकटांचा सामना करताना त्यांच्या मनात कोण-कोणत्या भावना आल्या होत्या हे व्यक्‍त केले आहे. जवळजवळ हजार वर्षांच्या कालावधीत—संदेष्टा मोशे याच्या दिवसांपासून बंदिवासात गेल्यानंतरच्या कालावधीत—या लेखकांनी आपल्या भावना स्तोत्रांच्या रुपात व्यक्‍त केल्या आहेत. मोशे, राजा दावीद आणि इतरांनी या स्तोत्रांचे लेखन केले आहे. या पुस्तकाची सध्या दिसते त्या रूपात मांडणी करण्याचे श्रेय एज्रा याजकाला दिले जाते.

खूप पूर्वीपासून स्तोत्रसंहिता पुस्तकाची पाच गीत संग्रहांत किंवा विभागांत विभागणी करण्यात आली आहे: (१) स्तोत्रसंहिता १-४१, (२) स्तोत्रसंहिता ४२-७२, (३) स्तोत्रसंहिता ७३-८९, (४) स्तोत्रसंहिता ९०-१०६ आणि (५) स्तोत्रसंहिता १०७-१५०. या लेखात पहिल्या संग्रहाची चर्चा करण्यात आली आहे. या भागातील तीन स्तोत्रे सोडून बाकी सर्व प्राचीन इस्राएलच्या राजा दावीदाने लिहिली आहेत. स्तोत्रे १, १० आणि ३३ कोणी रचली हे ज्ञात नाही.

“माझा देव, माझा खडक आहे”

(स्तोत्र १:१–२४:१०)

यहोवाच्या वचनात रमणारा मनुष्य धन्य आहे असे पहिल्या स्तोत्रात म्हटल्यानंतर, दुसरे स्तोत्र थेट राज्याविषयी बोलते. * या स्तोत्रांच्या समूहात बहुतेक, देवाला केलेल्या विनवण्या आहेत. उदाहरणार्थ, स्तोत्रे ३-५, ७, १२, १३, १७, शत्रूंपासून सुटका करण्यासाठी देवाला केलेल्या विनंत्या आहेत. स्तोत्र ८, यहोवाच्या महानतेपुढे मानव किती क्षुद्र आहे, यावर जोर देते.

यहोवा आपल्या लोकांचा संरक्षक कसा आहे याचे वर्णन केल्यानंतर दावीद असे गातो: “माझा देव, माझा खडक आहे, त्याचा आश्रय मी करितो.” (स्तोत्र १८:२) स्तोत्र १९ मध्ये यहोवाची निर्माणकर्ता आणि न्यायाधीश म्हणून, स्तोत्र २० मध्ये तारणकर्ता म्हणून आणि स्तोत्र २१ मध्ये आपल्या अभिषिक्‍त राजाचा तारक म्हणून स्तुती करण्यात आली आहे. स्तोत्र २३ त्याला महान मेंढपाळाच्या रूपात सादर करते तर २४ वे स्तोत्र त्याला वैभवी राजा म्हणून सादर करते.

शास्त्रवचनीय प्रश्‍नांची उत्तरे:

२:१, २—राष्ट्रे कोणती “व्यर्थ योजना” करीत आहेत? मानव सरकारांना, आपला अधिकार कायम ठेवण्याची सतत लागलेली चिंता, म्हणजे “व्यर्थ योजना” होय. याला व्यर्थ म्हटले आहे कारण त्यांचा हेतू कदापि सफल होणार नाही. “परमेश्‍वराविरुद्ध व त्याच्या अभिषिक्‍ताविरुद्ध” उठलेली राष्ट्रे सफल होण्याचे स्वप्नात तरी पाहू शकतात का?

२:७—“परमेश्‍वराचा निर्णय” म्हणजे काय? परमेश्‍वराचा निर्णय म्हणजे राज्याची वाचा जी यहोवाने आपला प्रिय पुत्र येशू ख्रिस्त याच्याबरोबर केली आहे.—लूक २२:२८, २९.

२:१२—राष्ट्रांचे राजे कोणत्या अर्थाने “त्याचे चुंबन” घेऊ शकतात? बायबल काळांत चुंबन, मैत्री आणि विश्‍वासूपणाचे प्रतीक होते. आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करण्याची ती एक पद्धत होती. पृथ्वीवरील राजांना पुत्राचे चुंबन घेण्याची आज्ञा देण्यात आली आहे अर्थात मशिही राजा म्हणून त्याचे स्वागत करण्याची त्यांना आज्ञा देण्यात आली आहे.

३:उपरीलेखन—काही स्तोत्रांवर उपरीलेखन का करण्यात आले आहे? उपरीलेखन कधीकधी लेखकाची ओळख करून देते आणि/किंवा सदर स्तोत्र कोणत्या परिस्थितीत लिहिण्यात आले होते त्याबद्दलची माहिती देते; जसे की स्तोत्र ३. एखाद्या विशिष्ट गीताचा (स्तोत्र ४) हेतू काय आहे किंवा त्याचा उपयोग काय आहे हे उपरीलेखनात सांगितले जाते तसेच संगीताच्या सूचना देखील दिल्या जातात. (स्तोत्र ६).

३:२—“सेला” म्हणजे काय? सेला हा शब्द, केवळ गाताना किंवा गायन आणि संगीत वाद्यांच्या संगीताच्या वेळी मूकपणे मनन करण्याकरता थांबण्याला सूचित करतो, असे सहसा समजले जाते. एखाद्या स्तोत्रातील विचार किंवा भावना यांवर जोर देण्याकरता अशाप्रकारे थांबले जायचे. स्तोत्रसंहितेचे सर्वांसमक्ष वाचन करताना उपरीलेखनातील हा शब्द वाचण्याची गरज नाही.

११:३—कोणते आधारस्तंभ ढासळले? मानव समाज ज्यावर उभा आहे अर्थात कायदा, सुव्यवस्था, न्याय हे ते आधारस्तंभ आहेत. या व्यवस्थांमध्ये जेव्हा गोंधळ असतो तेव्हा सामाजिक अव्यवस्था माजते आणि तेथे न्याय नसतो. अशा परिस्थितींत, ‘नीतिमानांनी’ देवावर पूर्ण भरवसा ठेवला पाहिजे.—स्तोत्र ११:४-७.

२१:३—‘शुद्ध सुवर्णाच्या मुकुटाविषयी’ काय खास आहे? हा मुकूट खरा होता, की दाविदाने अनेक विजय मिळवल्यामुळे त्याला लाक्षणिक अर्थाने हा गौरवयुक्‍त मुकूट देण्यात आला होता, हे सांगण्यात आलेले नाही. परंतु, १९१४ मध्ये येशूला यहोवाकडून मिळालेल्या राज्याधिकाराच्या मुकुटाला हे वचन भविष्यसूचकपणे अंगुली दर्शवते. हा मुकुट सोन्याचा आहे यावरून येशूची कारकीर्द उच्च दर्ज्याची आहे, हे सूचित होते.

२२:१, २—यहोवाने आपल्याला सोडून दिले आहे असे दाविदाला का वाटले असावे? दाविदाचे शत्रू त्याच्या मागे हात धुवून लागल्यामुळे तो इतक्या प्रचंड तणावाखाली होता की त्याचे हृदय ‘मेणासारखे झाले; ते आतल्या आत वितळले.’ (स्तोत्र २२:१४) यहोवाने त्याला सोडून दिले आहे असे त्याला वाटले असावे. येशूला वधस्तंभावर खिळण्यात आले तेव्हा त्यालाही असेच वाटले. (मत्तय २७:४६) दाविदाच्या शब्दांवरून, आणीबाणीच्या प्रसंगाला प्रतिक्रिया दाखवण्याची मानव प्रवृत्ती कशी असते, हे सूचित होते. परंतु स्तोत्र २२:१६-२१ मध्ये लिहिण्यात आलेल्या त्याच्या प्रार्थनेवरून स्पष्ट होते, की दावीदाने देवावरील आपला भरवसा गमावला नव्हता.

आपल्याकरता धडे:

१:१. जे यहोवावर प्रेम करत नाहीत अशांबरोबर संगती करणे आपण टाळले पाहिजे.—१ करिंथकर १५:३३.

१:२. आपला एकही दिवस, आध्यात्मिक गोष्टींवर विचार न केल्याशिवाय जाऊ नये.—मत्तय ४:४.

४:४. रागात असतो तेव्हा आपण आपल्या जिभेवर ताबा ठेवला पाहिजे जेणेकरून रागाच्या भरात आपण असे काहीही बोलणार नाही ज्याचा नंतर आपल्याला पस्तावा होईल.—इफिसकर ४:२६.

४:५. आपली आध्यात्मिक बलिदाने फक्‍त तेव्हाच “नीतिमत्त्वपूर्वक यज्ञ” होतात जेव्हा आपण ती उचित हेतूने करतो आणि यहोवाच्या अपेक्षांनुसार जगतो.

६:५. यहोवाची स्तुती करणे हे जिवंत राहण्याकरता सर्वात उत्तम कारण असू शकते.—स्तोत्र ११५:१७.

९:१२. रक्‍तदोषी असलेल्यांचा सूड उगविण्यासाठी यहोवा त्यांनी केलेल्या रक्‍तपाताची आठवण करतो; पण ‘दीनांचा आक्रोश [तो] विसरत नाही.’

१५:२, ३; २४:३-५. खऱ्‍या उपासकांनी सत्य बोलले पाहिजे आणि खोट्या शपथा घेणे व दुसऱ्‍यांचे नाव खराब करण्याकरता त्यांच्याविषयी असत्य गोष्टी बोलणे टाळले पाहिजे.

१५:४. आपली शपथ बायबलच्या शिकवणुकींच्या विरुद्ध नसेल तर आपण ती पूर्ण करण्याचा कसोशीने प्रयत्न केला पाहिजे; मग ती गोष्ट कितीही कठीण असली तरीसुद्धा.

१५:५. यहोवाचे उपासक या नात्याने आपण पैशांचा गैरवापर करणे टाळले पाहिजे.

१७:१४, १५. ‘ऐहिक मानव’ अर्थात या युगाचे लोक, पैसा गोळा करण्यात, कुटुंब वाढवण्यात, मुलाबाळांच्या नावावर संपत्ती ठेवण्याकरता ती साठवण्यात संपूर्ण आयुष्य खर्च करतात. पण दाविदाच्या जीवनातील मुख्य ध्येय, ‘देवाच्या मुखाचे दर्शन’ व्हावे अर्थात यहोवाची मर्जी मिळावी म्हणून देवासमोर एक चांगले नाव कमवणे हे होते. यहोवाच्या अभिवचनांची व प्रतिज्ञांची जाणीव झाल्यावर दावीदाला ‘देवाच्या दर्शनाने तृप्ती होत असे;’ म्हणजे, यहोवा त्याच्या बरोबर होता या वस्तुस्थितीने तो आनंदित होत असे. दाविदाप्रमाणे आपणही आध्यात्मिक खजिन्यावर आपले लक्ष केंद्रित ठेवले पाहिजे, नाही का?

१९:१-६. सृष्टी बोलू शकत नसली किंवा तर्क करू शकत नसली तरी देवाचे गौरव करते. आपण विचार करू शकतो, बोलू शकतो, उपासना करू शकतो. मग आपण सृष्टीपेक्षा जास्त देवाचे गौरव करू नये का?—प्रकटीकरण ४:११.

१९:७-११. यहोवाच्या अपेक्षा आपल्या किती लाभाच्या आहेत!

१९:१२, १३. चुका आणि घमेंडी कार्ये ही अशी पातके आहेत जी आपण टाळली पाहिजेत.

१९:१४. आपण जे काही करतो केवळ त्याबाबतीतच नव्हे तर जे बोलतो व विचार करतो त्याबाबतीतही सावधगिरी बाळगली पाहिजे.

‘माझ्या सात्विकपणामुळे तू मला स्थिर राखितोस’

(स्तोत्र २५:१–४१:१३)

या पहिल्या दोन स्तोत्रांत, सचोटी राखण्याची उत्कट इच्छा व दृढनिश्‍चय किती प्रांजळपणे दावीद व्यक्‍त करतो! तो गातो: “मी तर सात्विकपणे वागेन.” (स्तोत्र २६:११) आपल्या पापांच्या क्षमेकरता प्रार्थना करताना तो कबूल करतो: “मी गप्प राहिलो होतो, तेव्हा सतत कण्हण्यामुळे माझी हाडे जीर्ण झाली.” (स्तोत्र ३२:३) यहोवाच्या एकनिष्ठ जनांना दावीद असे आश्‍वासन देतो: “परमेश्‍वराचे नेत्र नीतिमानांकडे असतात; त्याचे कान त्यांच्या हाकेकडे असतात.”—स्तोत्र ३४:१५.

स्तोत्र ३७ मधील सल्ला इस्राएलांकरता आणि आज या युगाच्या ‘शेवटल्या दिवसांत’ राहणाऱ्‍या आपल्याकरता किती मौल्यवान आहे. (२ तीमथ्य ३:१-५) येशू ख्रिस्ताविषयी भविष्यवाणी करताना स्तोत्र ४०:७, ८ मध्ये म्हटले आहे: “पाहा, मी आलो आहे; ग्रंथपटात माझ्याविषयी लिहून ठेविले आहे की, हे माझ्या देवा, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यात मला आनंद आहे, तुझे शास्त्र माझ्या अंतर्यामी आहे.” संग्रहातील शेवटले स्तोत्र, दाविदाने यहोवाला मदतीसाठी केलेल्या याचनेबद्दल आहे. बथशेबाबरोबर पाप केल्यानंतर दाविदाचे मन त्याला खात होते. या मानसिक पीडामय काळात त्याने यहोवाला मदतीसाठी जी याचना केली होती ती या स्तोत्रात आहे. तो असे गातो: ‘माझ्या सात्विकपणामुळे तू मला स्थिर राखितोस.’—स्तोत्र ४१:१२.

शास्त्रवचनीय प्रश्‍नांची उत्तरे:

२६:६—दाविदाप्रमाणे आपण लाक्षणिक अर्थाने यहोवाच्या वेदीला फेरा कसा मारतो? मानवजातीच्या सुटकेसाठी येशू ख्रिस्ताने दिलेले खंडणी बलिदान यहोवा स्वीकारतो, या गोष्टीला वेदी चित्रित करते. (इब्री लोकांस ८:५; १०:५-१०) या बलिदानावर विश्‍वास ठेवून आपण यहोवाच्या वेदीला फेरा मारतो.

२९:३-९—यहोवाच्या ध्वनिची तुलना, आपल्या मनात भीती उत्पन्‍न करणाऱ्‍या गर्जनेशी करण्यात आली आहे. या शब्दचित्रावरून आपल्याला काय समजते? इतकेच, की यहोवाची शक्‍ती किती अफाट आहे!

३१:२३—गर्विष्ठ व्यक्‍तीला भरपूर प्रतिफळ कसे मिळते? (पं.र.भा.) येथे प्रतिफळ म्हणजे शिक्षा. एका धार्मिक व्यक्‍तीला, तिने जाणूनबुजून न केलेल्या चुकांबद्दल यहोवाकडून मिळणाऱ्‍या सुधारणुकीच्या रूपात प्रतिफळ मिळते. गर्विष्ठ व्यक्‍ती आपल्या कुमार्गापासून मागे वळत नसल्यामुळे तिला कडक शिक्षेच्या रूपात भरपूर प्रतिफळ मिळते.—नीतिसूत्रे ११:३१; १ पेत्र ४:१८.

३३:६—यहोवाचा ‘मुखश्‍वास’ म्हणजे काय? यहोवाचा मुखश्‍वास म्हणजे त्याची सक्रिय शक्‍ती अर्थात पवित्र आत्मा. भौतिक स्वर्ग निर्माण करताना त्याने याच शक्‍तीचा उपयोग केला होता. (उत्पत्ति १:१, २) याला मुखश्‍वास म्हटले आहे कारण ते एका जोरदार श्‍वासाप्रमाणे अगदी दूरपर्यंत गोष्टी साध्य करण्यासाठी पाठवले जाऊ शकते.

३५:१९—माझा जे द्वेष करतात त्यांनी विनाकारण डोळे मिचकवू नयेत, अशी दावीदाने जी विनंती केली तिचा काय अर्थ होतो? दावीदाचे शत्रू त्याच्याकडे पाहून डोळे मिचकवत होते म्हणजे, त्याच्याविरुद्ध रचत असलेले दुष्ट कट कसे यशस्वी होत आहेत हे पाहून आनंदित होत होते. असे होऊ नये म्हणून दावीद विनंती करत होता.

आपल्याकरता धडे:

२६:४. इंटरनेट चॅट रूम्समध्ये आपली ओळख लपवण्याचा प्रयत्न करणाऱ्‍या, शाळेत किंवा कामाच्या ठिकाणी कपटी कारणांसाठी आपले मित्र असल्याचे सोंग घेणाऱ्‍या, प्रांजळपणाचा मुखवटा चढवलेल्या धर्मत्यागी व दुहेरी जीवनशैली जगणाऱ्‍या लोकांबरोबर संगती टाळण्याद्वारे आपण सुज्ञता दाखवतो.

२६:७, १२; ३५:१८; ४०:९. ख्रिस्ती सभांमध्ये आपण जाहीररीत्या यहोवाची स्तुती केली पाहिजे.

२६:८; २७:४. ख्रिस्ती सभांना उपस्थित राहायला आपल्याला आनंद होतो का?

२६:११. सचोटी राखण्याचा दृढनिश्‍चय व्यक्‍त करताना दावीदाने सुटकेसाठी देखील विनंती केली. अपरिपूर्ण असलो तरी आपण सचोटी राखू शकतो.

२९:१०. यहोवा “जलप्रलयावर” आरूढ आहे; याचा अर्थ, त्याची शक्‍ती त्याच्या काबूत आहे.

३०:५. यहोवाचा प्रमुख गुण क्रोध नव्हे तर प्रीती आहे.

३२:९. खेचर किंवा गाढव, लगाम लावल्यावर किंवा चाबूक मारल्यावर आज्ञा ऐकते; आपण असे असावे अशी यहोवाची इच्छा नाही. त्याच्या इच्छेविषयीची समज प्राप्त करून आपण स्वखुषीने त्याची आज्ञा मानावी, अशी तो अपेक्षा करतो.

३३:१७-१९. कोणतीही मानव संस्था मग ती कितीही शक्‍तीशाली असली तरी आपले तारण करू शकत नाही. आपण यहोवा आणि त्याच्या राज्य व्यवस्थेवर भरवसा ठेवला पाहिजे.

३४:१०. आपल्या जीवनात राज्याला प्रथम स्थान देणाऱ्‍यांसाठी किती हे सांत्वन आहे!

३९:१, २. आपल्या सहविश्‍वासू बंधूभगिनींचे वाईट करण्याकरता दुष्ट लोक आपल्याकडून माहिती काढून घेण्याचा प्रयत्न करतात तेव्हा आपण “तोंडाला लगाम” लावून शांत राहण्याद्वारे सुज्ञता दाखवतो.

४०:१, २. यहोवावर भरवसा ठेवल्याने आपण नैराश्‍याचा सामना करू शकतो आणि जणू काय “नाशाच्या खाचेतून, दलदलीच्या चिखलातून” बाहेर येतो.

४०:५, १२. आपल्याला मिळालेले आशीर्वाद आपल्या “गणनेपलीकडे आहेत” या वस्तुस्थितीकडे जर आपण दुर्लक्ष केले नाही तर आपल्यावर कितीही संकटे आली आणि आपल्या व्यक्‍तिमत्त्वात कितीही दोष असले तरी आपण निराश होणार नाही.

‘परमेश्‍वर धन्यवादित’ असो

पहिल्या संग्रहातील ४१ स्तोत्रे किती सांत्वनदायक व उत्तेजनदायक आहेत. आपल्याला परीक्षांचा सामना करावा लागतो किंवा दोषी विवेक आपल्याला सतत बोचत असतो तेव्हा आपण देवाच्या शक्‍तीशाली वचनाच्या या भागातून शक्‍ती आणि उत्तेजन मिळवू शकतो. (इब्री लोकांस ४:१२) या स्तोत्रांत जगण्याकरता आवश्‍यक असलेले विश्‍वासहार्य मार्गदर्शन आहे. आपल्याला कितीही अडीअडचणींचा सामना करावा लागला तरी, यहोवा आपल्याला सोडणार नाही, हे आश्‍वासन आपल्याला वारंवार देण्यात आले आहे.

स्तोत्रांच्या पहिल्या संग्रहाची समाप्ती अशा शब्दांत करण्यात आली आहे: “इस्राएलाचा देव परमेश्‍वर युगानुयुग धन्यवादित आहे. आमेन, आमेन.” (स्तोत्र ४१:१३) या स्तोत्रांची चर्चा केल्यानंतर आपल्याला यहोवाचा धन्यवाद किंवा त्याची स्तुती करावीशी वाटत नाही का? (w०६ ५/१५)

[तळटीप]

^ परि. 7 स्तोत्र २ याची पहिली पूर्णता दावीदाच्या दिवसांत झाली.

[३ पानांवरील चित्राचे श्रेय]

नक्षत्रे: Courtesy United States Naval Observatory

[५ पानांवरील चित्राचे श्रेय]

नक्षत्रे, पृष्ठे ४ आणि ५: Courtesy United States Naval Observatory