व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आनंदी होण्याचे खात्रीशीर मार्गदर्शक

आनंदी होण्याचे खात्रीशीर मार्गदर्शक

आनंदी होण्याचे खात्रीशीर मार्गदर्शक

“आनंदाचा शोध घेण्याचा” सर्वांना हक्क आहे. असे, अमेरिकेच्या संयुक्‍त राष्ट्राच्या स्वातंत्र्याची घोषणा बनवणाऱ्‍यांचे मत होते. पण, एखाद्या गोष्टीचा शोध घेणे आणि ती मिळवणे या दोन विभिन्‍न गोष्ट आहेत. पुष्कळ तरुण, मनोरंजन व क्रीडा क्षेत्रात करिअर बनवण्याचा जिवापाड प्रयत्न करतात. पण, तुम्ही अशा किती तरुणांना ओळखता की ज्यांना वास्तविकतेत यश आले आहे? “तुम्हाला कदाचित यश मिळणार नाही,” असे एका नामवंत गायकाने म्हटले. यशस्वी संगीतकार बनण्यासाठी किती धडपड करावी लागते हे त्याला स्वानुभवावरून माहीत होते.

आनंद प्राप्त करण्याविषयी तुम्हालाही जर असेच वाटत असेल तर निराश होऊ नका. तुम्ही जर योग्य मार्गाने आनंद मिळवण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला तो नक्की मिळेल. असे का म्हणता येते? मागच्या लेखात आपण पाहिले होते, की कोणत्या गोष्टींमुळे आपण खरोखर आनंदी बनू शकतो, हे यहोवा देवाला चांगल्याप्रकारे माहीत आहे. बायबलमध्ये देवाने असे मार्गदर्शन दिले आहे, ज्यामुळे आनंद प्राप्त करण्याचा आपला मार्ग खुंटणार नाही व आपण निराश होणार नाही. ज्या सामान्य कारणांमुळे आपण दुःखी होतो त्यावर मात करण्यास यहोवा आपली मदत करू शकतो. उदाहरणार्थ, आपल्या एखाद्या प्रिय व्यक्‍तीचा मृत्यू होतो तेव्हा तो आपल्याला जे सांत्वन देतो त्याचा विचार करा.

आपल्या प्रिय व्यक्‍तीचा मृत्यू होतो तेव्हा

मृत्यूविषयी काही चांगले बोलता येते का? मृत्यू, पालकांना मुलांपासून आणि मुलांना पालकांपासून हिरावून घेतो. तो जवळच्या मित्रांना एकमेकांपासून विलग करतो. एकमेकांशी घनिष्ठ संबंध असलेल्या समाजातील लोकांना असुरक्षित वाटू लागते; मृत्यू केव्हा आपल्यावर घाला घालेल याची त्यांना सतत भीती वाटत राहते. कुटुंबात एखाद्याचा मृत्यू होतो तेव्हा सुखाने नांदणारे कुटुंब दुःखात बुडून जाते.

मृत्यू एक शोकांतिका आहे, हे कोणा तिऱ्‍हाईताने आपल्याला सांगायची गरज नाही. परंतु, पुष्कळ लोक ही वास्तविकता नाकारून, मृत्यू एक आशीर्वाद आहे असे समजतात. २००५ सालच्या ऑगस्ट महिन्यात, मेक्सिकोच्या आखातात, कॅटरिना वादळ आल्यानंतर काय झाले ते पाहा. या वादळात मरण पावलेल्या एका व्यक्‍तीच्या अंत्यसंस्काराच्या वेळी एका पाळकाने म्हटले: “कॅटरिनाने त्याला ठार मारले नाही. तर, देवाने त्याला आपल्या घरी नेले.” दुसऱ्‍या एका प्रसंगी, दवाखान्यात क्लार्क म्हणून काम करणाऱ्‍या एका सद्‌हेतू व्यक्‍तीने एका मुलीला म्हटले, काळजी कशाला करतेस, देवाने तुझ्या आईला त्याच्या घरी नेले आहे. पण मुलगी अत्यंत शोकाकूल होऊन म्हणाली: “पण, त्यानं माझ्यापासून तिला का हिरावून घेतलं?”

मृत्यूबद्दलच्या अशा चुकीच्या धारणांमुळे शोक करणाऱ्‍यांना सांत्वन मिळत नाही. का नाही? कारण अशाप्रकारच्या धारणा मृत्यूविषयीचे सत्य सांगत नाहीत. एवढेच नव्हे तर, देव अत्यंत भयानक व यातनाकारक मार्गाने प्रिय लोकांना त्यांच्या कुटुंबापासून व मित्रांपासून हिरावून घेतो, असे शिकवून या धारणा देवाचे नाव खराब करतात. तो सांत्वन देत नाही तर तो एक खलनायक आहे, असे या शिकवणी भासवतात. परंतु देवाचे वचन, मृत्यूविषयीचे सत्य सांगते.

बायबलमध्ये मृत्यूला शत्रू म्हटले आहे. त्यात मृत्यूची तुलना मानवजातीवर राज्य करणाऱ्‍या राजाशी केली आहे. (रोमकर ५:१७; १ करिंथकर १५:२६) या शत्रूत अर्थात मृत्यूत इतकी शक्‍ती आहे, की कोणताही मानव त्यास विरोध करू शकत नाही. मरण पावणारी प्रत्येक प्रिय व्यक्‍ती, मरणाऱ्‍यांच्या संख्येत भर पाडत असते; आणि मरणाऱ्‍यांची संख्या तर अगणीत आहे. बायबलमधील हे सत्य, आपली प्रिय व्यक्‍ती मरण पावल्यावर आपल्यावर जे दुःख कोसळते आणि आपल्याला जसे असाहाय्य वाटते, त्याजशी पूर्णपणे सुसंगत आहे. या अशा भावना मनात येणे साहजिक आहे, असे ते सांगते. पण, आपल्या प्रिय जनांना देवाघरी नेण्यासाठी देव, शत्रूचा अर्थात मृत्यूचा उपयोग करतो का? बायबल याचे काय उत्तर देते ते पाहा.

उपदेशक ९:५, १० (पं.र.भा) मध्ये म्हटले आहे: “मेलेले काही जाणत नाहीत, . . . ज्याकडे तू जात आहेस त्या मृत्यूलोकात [शेओल, समास] काही कार्य अथवा संकल्प अथवा विद्या अथवा ज्ञान असे काहीच नाही.” येथे समासात, शेओल हा जो शब्द वापरला आहे त्याचा काय अर्थ होतो? शेओल म्हणजे, माणूस मेल्यावर त्याला जिथे पुरले जाते ती सर्वसाधारण कबर. कबरेतील मृत जन पूर्णपणे निष्क्रिय असतात; तिथे कसलीच हालचाल नसते, भावना नसतात किंवा कोणत्याही प्रकारचे विचार नसतात. त्यांच्या अवस्थेची तुलना गाढ झोपेशी करता येते. * तर, बायबल हे स्पष्टपणे सांगते, की देव आपल्या प्रिय जनांना त्याच्याबरोबर स्वर्गात राहायला नेत नाही. तर, मृत्यूच्या परिणामांमुळे ते कबरेत निपचित पडलेले आहेत.

येशूने या सत्याची पुष्टी त्याचा मित्र लाजर जेव्हा मरण पावला तेव्हा दिली. त्याने मृत्यूची तुलना झोपेशी केली. जर लाजर सर्वशक्‍तिमान देवाच्या घरी स्वर्गात गेला होता तर येशूने त्याला पुन्हा पृथ्वीवर आणून दया दाखवली नाही; कारण येथे तो कालांतराने पुन्हा मरणार होता. देवाच्या प्रेरणेने लिहिण्यात आलेल्या अहवालात म्हटले आहे, की लाजरला जेथे पुरले होते तेथे जाऊन येशूने मोठ्याने हाक मारून म्हटले: “लाजरा, बाहेर ये.” बायबलमधील त्या अहवालात पुढे म्हटले आहे: “तेव्हा जो मेलेला होता तो बाहेर आला.” लाजर पुन्हा जिवंत झाला. लाजर पृथ्वी सोडून इतर कोठेही गेला नव्हता हे येशूला माहीत होते. तो कबरेत निर्जीव अवस्थेत होता.—योहान ११:११-१४, ३४, ३८-४४.

बायबलमध्ये लिहून ठेवण्यात आलेला हा अहवाल आपल्याला एक गोष्ट समजण्यास मदत करतो. ती ही, की मृत्यूद्वारे देव मानवांना पृथ्वीहून स्वर्गात नेत नाही. त्यामुळे, आपल्यावर ओढवलेले दुःख देवामुळे नाही, हे समजल्यानंतर आपण देवाच्या समीप जाऊ शकतो. आपण हाही भरवसा बाळगू शकतो, की मृत्यूमुळे आपल्याला किती अतीव दुःख होते, आपण कसे उद्ध्‌वस्त होतो, हे तो चांगल्याप्रकारे समजतो. आणि मृतांच्या स्थितीविषयी बायबलमध्ये असलेले सत्य सिद्ध करते, की मृत जन नरकाग्नीत किंवा परगेटरीत यातना भोगत नाहीत तर ते कबरेत निर्जीव अवस्थेत आहेत. त्यामुळे, आपल्या मृत प्रिय जनांची आपल्याला आठवण येते तेव्हा आपण देवाबद्दल मनात अढी बाळगून त्याच्यापासून दूर जाण्याची किंवा आपले मृत प्रिय जन नेमके कोठे आहेत याबद्दलचे भय बाळगण्याची गरज नाही. शिवाय, बायबलमध्ये यहोवा आपल्याला आणखी सांत्वन देतो.

आशेमुळे आनंद होतो

आपण चर्चा केलेली शास्त्रवचने, खरा आनंद देणारी मुख्य गोष्ट अर्थात आशेला सूचित करतात. बायबलमध्ये वापरण्यात आलेला “आशा” या शब्दाचा अर्थ, चांगल्या गोष्टीची भरवसालायक प्रतिक्षा, असा होतो. आशेमुळे आताही आपल्याला आनंद कसा मिळू शकतो, हे पाहण्यासाठी आपण पुन्हा एकदा येशूने लाजरचे जे पुनरुत्थान केले त्या अहवालाची चर्चा करू या.

येशूने हा चमत्कार का केला त्याची निदान दोन कारणे तरी आहेत. एक कारण हे की, तो मार्था, मरीया आणि शोक करणाऱ्‍या लाजरच्या इतर मित्रपरिवाराचे दुःख दूर करू इच्छित होता. लाजरला जिवंत केल्यावर ते पुन्हा आपल्या प्रिय व्यक्‍तीचा सहवास लुटू शकतील. पण येशूने मार्थेला पुनरुत्थान करण्यामागचे दुसरे एक कारण सांगितले, जे अत्यंत महत्त्वाचे होते. तो म्हणाला: “तू विश्‍वास ठेवशील तर देवाचे गौरव पाहशील असे मी तुला सांगितले नव्हते काय?” (योहान ११:४०) मराठीतील सुबोध भाषांतरात, वरील वचनाच्या मधल्या भागाचे भाषांतर, “देवाकडून अद्‌भुत चमत्कार” असे करण्यात आले आहे. लाजरला पुन्हा जिवंत करून, यहोवा देव भवितव्यात काय करू शकतो आणि करणार आहे याची येशूने एक झलक दाखवली. ‘देव जो अद्‌भुत चमत्कार’ करणार आहे त्याच्याबद्दलचे आणखी तपशील पुढे आहेत.

योहान ५:२८, २९ या वचनात येशूने म्हटले: “ह्‍याविषयी आश्‍चर्य करू नका; कारण कबरेतील सर्व माणसे त्याची वाणी ऐकतील आणि . . . बाहेर येतील, अशी वेळ येत आहे.” याचा अर्थ, शिओलमध्ये असलेले सर्व मृत जन, ज्यांत आपल्या प्रिय जनांचा देखील समावेश होतो, ते सर्व जण पुन्हा जिवंत केले जातील. प्रेषितांची कृत्ये २४:१५ या अद्‌भुत समयाविषयी आणखी स्पष्टीकरण देते. ते म्हणते: “नीतिमानांचे व अनीतिमानांचे पुनरुत्थान होईल.” ‘अनीतिमान’ अर्थात जे लोक यहोवाला ओळखत नव्हते आणि त्याची सेवा करत नव्हते त्यांना देवाची मर्जी प्राप्त करण्याची पुन्हा एक संधी मिळणार आहे.

हे पुनरुत्थान कोठे होईल? स्तोत्र ३७:२९ मध्ये म्हटले आहे: “नीतिमान पृथ्वीचे वतन पावतील, तिच्यात ते सर्वदा वास करितील.” या वचनाचा काय अर्थ होतो, त्याचा विचार करा! मृत्यूमुळे एकमेकांपासून दुरावलेली कुटुंबे आणि मित्र या पृथ्वीवर पुन्हा एकमेकांना भेटतील. एकेकाळी तुम्हाला ज्यांचा सहवास हवाहवासा वाटायचा त्यांच्याबरोबर तुम्ही पुन्हा एकदा सहवास करू शकाल! हे ऐकून तुमच्या अंगावर आनंदामुळे शहारे उठत नाहीत का?

तुम्ही आनंदी राहावे अशी यहोवाची इच्छा आहे

समस्या असूनही कोणत्या दोन मार्गांनी यहोवा आपला आनंद द्विगुणीत करतो, त्याची चर्चा आता आपण केली. पहिला मार्ग म्हणजे बायबलद्वारे तो आपल्याला क्लेशांचा यशस्वीपणे सामना करण्याकरता ज्ञान आणि मार्गदर्शन देतो. मृत्यूमुळे आपल्याला होत असलेल्या दुःखात आपली मदत करण्याव्यतिरिक्‍त बायबलमधील सल्ला आपल्याला, आर्थिक आणि शारीरिक समस्यांचा सामना करण्यासही मदत करू शकतो. बायबलचा सल्ला तुम्हाला सामाजिक अन्याय आणि राजनैतिक अराजकता सहन करण्याची शक्‍ती देऊ शकतो. तुम्ही जर बायबलमधील सल्ल्याचे आपल्या जीवनात पालन केले तर तुम्हाला इतरही व्यक्‍तिगत समस्यांवर मात करण्यास मदत मिळू शकते.

दुसरा मार्ग म्हणजे, बायबलचा अभ्यास करण्याद्वारे तुम्हाला मानव समाज जे काही देऊ शकतो त्यापेक्षा कित्येकपटीने सर्वश्रेष्ठ अशी आशा मिळते. मित्रजन आणि कौटुंबिक सदस्यांच्या पुनरुत्थानाची आशा, ही बायबलमध्ये असलेल्या इतर आशांपैकी एक आहे. प्रकटीकरण २१:३, ४ मध्ये याविषयी सविस्तर माहिती दिली आहे. तिथे असे म्हटले आहे: “देव स्वतः [मानवजातीबरोबर] राहील. तो त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकील; ह्‍यापुढे मरण नाही; शोक, रडणे व कष्ट ही नाहीत; कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या.” म्हणजे, दुःखास कारणीभूत असलेली गोष्ट तुमच्या जीवनातून कायमची काढून टाकली जाईल! बायबलमधील अभिवचने लवकरच पूर्ण होणार आहेत. तुम्ही ते स्वतः अनुभवाल! पुढे सुकाळ आहे, नुसता हा विचारच मनाला किती सांत्वन देतो, नाही का? मृत्यूनंतर चिरकालासाठी पीडा भोगाव्या लागत नाही, हे माहीत झाल्यावरही आपल्याला आनंद होतो.

खूप वर्षांपूर्वी, मारियाने आपल्या नवऱ्‍याला कॅन्सरमुळे मरताना पाहिले होते. कॅन्सरमुळे त्याला कशा यातना होत होत्या ते केवळ ती पाहू शकत होती. तिच्या नवऱ्‍याला जाऊन जास्त दिवसही झाले नव्हते तोच तिला आणि तिच्या तीन मुलींना, आर्थिक अडचणी आल्यामुळे आपले घर विकावे लागले. दोन वर्षांनंतर, मारियाला समजले, की तिलाही कॅन्सर झाला आहे. तिची दोन ऑपरेशनं झाली आहेत. आणि कॅन्सरमुळे दररोज तिला यातना सहन कराव्या लागतात. इतके सर्व होऊनही तिची मनोवृत्ती इतकी सकारात्मक आहे, की ती इतरांना उत्तेजन देण्यास प्रेरित होते. तिने तिचा आनंद कसा काय टिकवून ठेवला आहे?

मारिया म्हणते: “माझ्यासमोर जेव्हा कोणतीही समस्या येते तेव्हा मी त्यावर जास्त विचार न करण्याचा प्रयत्न करते. ‘मलाच का झालं असं? मलाच का असं सहन करावं लागतं? मीच का आजारी पडले?’ असा विचार न करण्याचा मी प्रयत्न करते. नकारात्मक विचार केल्यामुळे आपल्याला थकायला होतं. त्याऐवजी मी माझी शक्‍ती यहोवाची सेवा करण्यात आणि इतरांना मदत करण्यात खर्च करते. यामुळे मला आनंद मिळतो.”

यहोवाच्या राज्याच्या आशेने मारियाला तग धरून राहायला कशी मदत केली आहे? ती त्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहे जेव्हा यहोवा मानवजातीवरचे सर्व प्रकारचे आजारपण आणि समस्या काढून टाकेल. ती औषधोपचारासाठी दवाखान्यात जाते तेव्हा ती, तिच्याबरोबरच्या इतर कॅन्सर रुग्णांना आपल्या आशेविषयी सांगत राहते; कारण या रुग्णांना भवितव्याच्या आशेविषयी काही माहीत नाही. मारियासाठी ती आशा किती महत्त्वपूर्ण आहे? मारिया म्हणते: “मी नेहमी बायबल, इब्री लोकांस पत्राच्या ६ व्या अध्यायाच्या १९ व्या वचनात काय म्हणते त्यावर विचार करते. तिथं पौल आशा, ही जीवनाचा नांगर आहे असे म्हणतो. बोटीनं नांगर टाकला नाही तर वादळात ती बोट किनाऱ्‍यापासून भरकटत जाऊ शकते. पण तुम्ही जर नांगर टाकला असेल म्हणजे तुमच्याजवळ आशा असेल तर तुमच्या जीवनात कितीही वादळे आली तरी तुम्ही स्थिर व सुरक्षित राहू शकता.” ती आशा म्हणजे “युगानुयुगाचे जीवन [जे] सत्यप्रतिज्ञ देवाने युगाच्या काळापूर्वी देऊ केले” आहे. ही आशा मारियाला आनंदी राहण्यास मदत करते. व ती तुम्हालाही आनंदी राहण्यास मदत करू शकते.—तीत १:२.

कितीही समस्यांचा सामना तुम्हाला करावा लागला तरी बायबलचा अभ्यास केल्याने खरा आनंद मिळवता येईल. पण बायबलचा अभ्यास करणे खरोखरच किती व्यवहारी आहे, याविषयी तुमच्या मनात आता अनेक प्रश्‍न उठले असतील. खरोखरच आनंदी होण्याकरता तुम्हाला ज्या प्रश्‍नांची उत्तरे हवी आहेत ती उत्तरे शास्त्रवचनांतून दाखवायला यहोवाच्या साक्षीदारांना आनंद वाटेल. यहोवाने दिलेली आशा वास्तवात उतरेपर्यंत थांबून राहणाऱ्‍यांपैकी तुम्ही देखील एक असू शकता. त्यांच्याविषयी असे म्हटले आहे: “ते आनंद व हर्ष पावतील, दुःख व उसासे पळ काढितील.”—यशया ३५:१०. (w०६ ६/१५)

[तळटीप]

^ परि. 9 एनसायक्लोपिडिआ ब्रिटॅनिकामध्ये (२००३) शिओलचे वर्णन, “यातना, आनंद, शिक्षा, प्रतिफल नसलेले ठिकाण,” असे करण्यात आले आहे.

[५ पानांवरील चित्र]

केवळ बायबलमधील सत्य दुःख कमी करू शकते

[७ पानांवरील चित्र]

बायबलमधील पुनरुत्थानाच्या आशेमुळे तुम्हाला आनंद मिळू शकतो