व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तरुणांनो, यहोवाची सेवा करण्याचा निर्णय घ्या

तरुणांनो, यहोवाची सेवा करण्याचा निर्णय घ्या

तरुणांनो, यहोवाची सेवा करण्याचा निर्णय घ्या

“तुम्ही कोणाची सेवा करणार हे आजच ठरवा.”—यहोशवा २४:१५.

१, २. ख्रिस्ती धर्मजगतात बाप्तिस्मा देण्याच्या संबंधात कोणत्या अयोग्य प्रथा पाळल्या जातात?

 “ख्रिस्ताला ओळखण्याइतकी समज आल्यानंतरच मुलांनी ख्रिस्ती बनावे.” हे विधान सा.यु. दुसऱ्‍या शतकाच्या शेवटास टर्टुलियन नावाच्या एका लेखकाने केले होते. त्याच्या काळात, भ्रष्ट झालेल्या ख्रिस्ती धर्मात अगदी तान्ह्या मुलांना बाप्तिस्मा देण्याची प्रथा रुजायला लागली होती. या प्रथेची टीका करण्याकरता त्याने वरील विधान केले होते. पण ख्रिस्ती धर्मशास्त्राचा विद्वान व लेखक ऑगस्टीन याने टर्टुलियनच्या व बायबलच्याही विरोधात जाऊन तान्ह्या मुलांना बाप्तिस्मा देण्याच्या प्रथेचे समर्थन केले. त्याचे असे म्हणणे होते की बाप्तिस्मा दिल्यामुळे आदामाकडून मिळालेला पापाचा कलंक धुतला जातो. शिवाय, जर बाप्तिस्मा न देताच मुलाचा मृत्यू झाला तर ते मूल नरकात जाईल. या धारणेमुळेच बाळाचा जन्म होताच लवकरात लवकर त्याला बाप्तिस्मा देण्याची प्रथा सुरू झाली.

ख्रिस्ती धर्मजगताच्या अनेक पंथांत अजूनही नवजात शिशूंना बाप्तिस्मा देण्याची प्रथा पाळली जाते. शिवाय, एखाद्या राष्ट्रावर विजय मिळवल्यानंतर, ख्रिस्ती राष्ट्रांचे सम्राट व धर्मपुढारी तेथल्या “मूर्तिपूजक” लोकांना जबरदस्तीने बाप्तिस्मा देत असत. याची कित्येक उदाहरणे सबंध इतिहासात पाहायला मिळतात. पण तान्ह्या मुलांना बाप्तिस्मा दिला जावा किंवा प्रौढांना जबरदस्तीने बाप्तिस्मा दिला जावा असे बायबलमध्ये कोठेही सांगितलेले नाही.

समर्पण आपोआप होत नाही

३, ४. ज्यांचे आईवडील यहोवाचे समर्पित सेवक आहेत अशा मुलांना स्वेच्छेने यहोवाला आपले जीवन समर्पित करणे कशामुळे शक्य होऊ शकते?

बायबलमध्ये असे सांगितले आहे की आईवडिलांपैकी एकही जण विश्‍वासू ख्रिस्ती असल्यास देवाच्या नजरेत त्यांची मुले पवित्र आहेत. (१ करिंथकर ७:१४) याचा अर्थ यहोवा या मुलांना आपले समर्पित सेवक मानतो का? नाही. पण ज्या मुलांचे आईवडील यहोवाचे समर्पित सेवक आहेत, त्यांना आपल्या आईवडिलांकडून लहानपणापासून देवाच्या मार्गांचे शिक्षण मिळते. आणि हे शिक्षण त्यांना पुढे जाऊन स्वेच्छेने आपले जीवन यहोवाला समर्पित करण्याकरता प्रवृत्त करू शकते. बुद्धिमान शलमोन राजाने असे लिहिले: “माझ्या मुला, तू आपल्या बापाची आज्ञा पाळ, आपल्या आईची शिस्त सोडू नको. . . . तू चालशील तेव्हा ज्ञान तुला मार्ग दाखवील; तू निजशील तेव्हा ते तुझे रक्षण करील; तू जागा होशील तेव्हा ते तुजशी बोलेल. कारण ती आज्ञा केवळ दिवा आहे व ती शिस्त केवळ प्रकाश आहे. बोधाचा वाग्दंड जीवनाचा मार्ग आहे.”—नीतिसूत्रे ६:२०-२३.

ख्रिस्ती आईवडिलांचे मार्गदर्शन लहान मुलांसाठी संरक्षण ठरू शकते, अर्थात, त्यांनी त्याचे पालन केले तर. शलमोनाने असेही म्हटले होते, की “मुलगा शहाणा तर बाप सुखी, मुलगा मूर्ख तर आई दुःखी.” “माझ्या मुला, तू ऐकून शहाणा हो व आपले मन सरळ मार्गांत राख.” (नीतिसूत्रे १०:१; २३:१९) तेव्हा मुलांनो, आईवडिलांनी दिलेल्या शिक्षणाचा आपल्याला फायदा व्हावा असे जर तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही त्यांचा सल्ला, मार्गदर्शन व बोध आनंदाने स्वीकारले पाहिजे. तुम्ही जन्मतःच सुज्ञ किंवा शहाणे नसता पण तुम्ही ‘शहाणे होऊ’ शकता आणि स्वेच्छेने “जीवनाचा मार्ग” निवडू शकता.

प्रभूच्या शिक्षणात वाढवण्याचा अर्थ काय?

५. पौलाने मुलांना व त्यांच्या वडिलांना कोणता सल्ला दिला?

प्रेषित पौलाने लिहिले: “मुलांनो, प्रभूमध्ये तुम्ही आपल्या आई-बापांच्या आज्ञेत राहा, कारण हे योग्य आहे. ‘आपला बाप व आपली आई ह्‍यांचा मान राख, ह्‍यासाठी की, तुझे कल्याण व्हावे व तू पृथ्वीवर दीर्घायु असावे.’ अभिवचन असलेली हीच पहिली आज्ञा आहे. बापांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिरडीस आणू नका, तर प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात त्यांना वाढवा.”—इफिसकर ६:१-४.

६, ७. यहोवाच्या ‘शिक्षणात मुलांना वाढवण्याचा’ काय अर्थ होतो आणि हे मुलांवर अन्याय करण्यासारखे किंवा त्यांना जबरदस्तीने कह्‍यात ठेवण्यासारखे का नाही?

आपल्या मुलांना यहोवाच्या “शिस्तीत व शिक्षणात” वाढवणारे आईवडील मुलांच्या विचारांना आकार देण्याद्वारे त्यांच्यावर अन्याय किंवा जबरदस्ती करत असतात का? नाही. आईवडिलांना जे योग्य आणि नैतिकदृष्ट्या फायद्याचे वाटते त्याविषयी त्यांनी आपल्या मुलांना शिकवू नये का? याकरता त्यांची टीका केली जावी का? नास्तिक लोक आपल्या मुलांना शिकवतात की देव अस्तित्वात नाही. रोमन कॅथलिक किंवा इतर धर्मांचे लोक आपल्या मुलांवर त्या त्या धर्माचे संस्कार करतात. त्यांची सहसा कोणीही टीका करत नाहीत. त्याचप्रकारे, यहोवाचे साक्षीदार आपल्या मुलांच्या मनावर जीवनाच्या मूलभूत सत्यांविषयी व नीतिनियमांविषयी यहोवाचे विचार बिंबवतात तेव्हा त्यांची टीका केली जाऊ नये. ते आपल्या मुलांना कह्‍यात ठेवतात किंवा त्यांच्यावर जबरदस्ती करतात असा आरोप त्यांच्यावर लावला जाऊ नये.

थियोलॉजिकल डिक्शनरी ऑफ द न्यू टेस्टमेंट या शब्दकोशानुसार इफिसकर ६:४ यात ‘शिक्षण’ असा अनुवाद केलेल्या मूळ ग्रीक शब्दाचा अर्थ, “योग्य प्रकारे विचार करायला शिकवणे, चुका दुरुस्त करणे आणि देवाबद्दल योग्य मनोवृत्ती उत्पन्‍न करायला शिकवणे” असा होतो. मित्रमैत्रिणींच्या दबावामुळे किंवा इतर लोकांप्रमाणेच वागण्याच्या इच्छेमुळे लहान मुलांनी आपल्या आईवडिलांचे शिक्षण स्वीकारले नाही व त्याला विरोध केला, तर काय समजावे? या परिस्थितीत खरे पाहता, त्यांचे ज्यामुळे नुकसान होऊ शकेल असा दबाव त्यांच्यावर कोण आणत असतात—आईवडील की त्यांचे मित्रमैत्रिणी? जर मित्रमैत्रिणी तरुण मुलांवर ड्रग्स घेण्याचा, दारू पिण्याचा किंवा अनैतिक कामे करण्याचा दबाव आणत असतील तर अशा धोकेदायक वर्तनाचे दुष्परिणाम त्यांच्या लक्षात आणून देण्याबद्दल किंवा त्यांना याबाबतीत योग्यप्रकारे विचार करायला शिकवल्याबद्दल आईवडिलांची टीका करणे योग्य ठरेल का?

८. तीमथ्याला ख्रिस्ती शिकवणुकींविषयी कशामुळे “खातरी झाली?”

प्रेषित पौलाने तरुण तीमथ्याला असे लिहिले: “ज्या गोष्टी [तू] शिकलास व ज्यांविषयी तुझी खातरी झाली आहे त्या धरून राहा. त्या कोणापासून शिकलास हे, आणि बालपणापासूनच तुला पवित्र शास्त्राची माहिती आहे हे तुला ठाऊक आहे; ते खिस्त येशूमधील विश्‍वासाच्या द्वारे तुला तारणासाठी ज्ञानी करावयास समर्थ आहे.” (२ तीमथ्य ३:१४, १५) लहानपणापासूनच तीमथ्याच्या आईने व आजीने त्याला पवित्र शास्त्राचे शिक्षण देण्याद्वारे, देवावर पूर्ण विश्‍वास ठेवण्याकरता जणू एक उत्तम पाया घातला होता. (प्रेषितांची कृत्ये १६:१; २ तीमथ्य १:५) नंतर जेव्हा त्या दोघी ख्रिस्ती बनल्या तेव्हा त्यांनी तीमथ्यावर ख्रिस्ती शिकवणुकी स्वीकारण्याची जबरदस्ती केली नाही; तर शास्त्रवचनांच्या ज्ञानाच्या आधारावर त्यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला आणि यामुळे तीमथ्याला त्या गोष्टींविषयी “खातरी झाली.”

यहोवाने निर्णय तुमच्यावर सोडला आहे

९. (क) यहोवाने मानवांना कशाप्रकारे बहुमानित केले आणि का? (ख) देवाच्या एकुलत्या एका पुत्राने आपल्या इच्छास्वातंत्र्याचा कशाप्रकारे उपयोग केला?

मानवांना निर्माण करण्याऐवजी यहोवा यंत्रमानवे निर्माण करू शकला असता. दिलेल्या सूचनांप्रमाणे केवळ देवाच्या इच्छेप्रमाणे वागणारी आणि स्वतःहून काहीही करण्यास असमर्थ असणारी यंत्रमानवे. पण देवाने असे न करता, मानवांना इच्छास्वातंत्र्य देऊन बहुमानित केले. मानवांनी स्वेच्छेने, स्वखुषीने आपल्या अधीन व्हावे असे देवाला वाटते. कोणतीही व्यक्‍ती, मग ती वयाने लहान असो अथवा वृद्ध असो ती प्रेमापोटी देवाची सेवा करते तेव्हा देवाला आनंद होतो. प्रेमापोटी देवाच्या आज्ञांचे पालन करणाऱ्‍यांपैकी सर्वात उत्तम उदाहरण त्याच्या एकुलत्या एक पुत्राचे आहे. त्याच्याविषयी यहोवाने म्हटले: “हा माझा पुत्र, मला परमप्रिय आहे.” (मत्तय ३:१७) आणि सर्व सृष्टीत ज्येष्ठ असणाऱ्‍या या पुत्राने आपल्या पित्याला असे म्हटले: “हे माझ्या देवा, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यात मला आनंद आहे, तुझे शास्त्र माझ्या अंतर्यामी आहे.”—स्तोत्र ४०:८; इब्री लोकांस १०:९, १०.

१०. यहोवा आपल्याकडून कशाप्रकारच्या सेवेची अपेक्षा करतो?

१० आज जे यहोवाची सेवा त्याच्या पुत्राच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत, त्यांच्याकडून यहोवा अशीच अपेक्षा करतो की त्याच्या पुत्राने ज्याप्रमाणे स्वेच्छेने त्याचे आज्ञापालन केले त्याप्रमाणे त्यांनीही करावे. स्तोत्रकर्त्याने एका भजनात असे भाकीत केले की “तुझ्या पराक्रमाच्या दिवशी तुझे लोक संतोषाने पुढे होतात, पावित्र्याने मंडित झालेले तुझे तरुण तुला पहाटेच्या दहिंवरासारखे आहेत.” (स्तोत्र ११०:३) यहोवाची संपूर्ण संघटना, ज्यात तिच्या स्वर्गीय व पृथ्वीवरील भागांचा समावेश आहे, ती प्रेमापोटी देवाच्या इच्छेला अधीन होण्याच्या तत्त्वावर आधारित आहे.

११. यहोवाचे समर्पित सेवक असणाऱ्‍या आईवडिलांच्या मुलांना कोणती निवड करावी लागेल?

११ तेव्हा, लहान मुलांनो, तुम्ही हे समजून घेतले पाहिजे की तुमचे आईवडील किंवा मंडळीतले ख्रिस्ती वडील तुम्हाला बाप्तिस्मा घेण्यासाठी जबरदस्ती मुळीच करणार नाहीत. यहोवाची सेवा करण्याची इच्छा तुमच्या मनातून उत्पन्‍न झाली पाहिजे. यहोशवाने इस्राएली लोकांना सांगितले होते, की “[यहोवाची] सेवा सात्विकतेने व खऱ्‍या मनाने करा आणि . . . तुम्ही कोणाची सेवा करणार हे आजच ठरवा.” (यहोशवा २४:१४-२२) त्याचप्रकारे, यहोवाला आपले जीवन समर्पित करून त्याच्या इच्छेप्रमाणे करण्याकरता आपले जीवन वाहून घेण्याचा निर्णय तुम्ही स्वतः, स्वखुषीने घेतला पाहिजे.

जबाबदारीला सामोरे जाणे

१२. (क) आईवडिलांनी मुलांना शिक्षण दिले तरीसुद्धा, ते मुलांकरता काय करू शकत नाहीत? (ख) मुले आपल्या जीवनातील निर्णयांकरता यहोवासमोर जबाबदार केव्हा ठरतात?

१२ मुलांनो, आपले आईवडील यहोवाचे विश्‍वासू सेवक आहेत, तेव्हा मोठे झाल्यानंतरही आपल्याला त्यांच्या विश्‍वासूपणामुळे आपोआपच संरक्षण मिळेल असे समजू नका. (१ करिंथकर ७:१४) शिष्य याकोबाने लिहिले: “चांगले करणे कळत असून जो ते करीत नाही त्याचे ते पाप आहे.” (याकोब ४:१७) आईवडील आपल्या मुलांच्या वतीने, किंवा मुले आपल्या आईवडिलांच्या वतीने यहोवाची सेवा करू शकत नाहीत. (यहेज्केल १८:२०) तुम्ही यहोवाबद्दल व त्याच्या उद्देशांबद्दल ज्ञान घेतले आहे का? या शिकलेल्या गोष्टी समजून घेण्याइतके व यहोवासोबत एक वैयक्‍तिक नातेसंबंध जोडण्यास सुरुवात करण्याइतके तुमचे वय झाले आहे का? तर मग देव तुम्हाला त्याची सेवा करण्याचा स्वतःहून निर्णय घेण्यास सक्षम समजतो हे योग्यच नाही का?

१३. बाप्तिस्मा न झालेली किशोरवयीन मुले स्वतःला कोणते प्रश्‍न विचारू शकतात?

१३ तुम्ही अशा तरुणांपैकी आहात का, की ज्यांचे संगोपन देवभीरू आईवडिलांनी केले आहे पण ज्यांचा अद्याप बाप्तिस्मा झालेला नाही? तुम्ही ख्रिस्ती सभांना उपस्थित राहात असाल आणि राज्याच्या सुवार्तेच्या प्रचार कार्यातही सहभाग घेत असाल. जर तुम्ही अशा तरुणांपैकी असाल, तर पुढील प्रश्‍नांचा प्रामाणिकपणे विचार करा: ‘मी हे सगळे का करत आहे? आईवडील म्हणतात म्हणून मी सभांना जातो किंवा प्रचार कार्यात सहभाग घेतो का? की यहोवाला संतुष्ट करण्याची माझी इच्छा असल्यामुळे मी हे सगळे करतो?’ “देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे” हे तुम्ही समजून घेतले आहे का आणि याविषयी तुमची खातरी झाली आहे का?—रोमकर १२:२.

काहीजण बाप्तिस्मा घ्यायचे का लांबणीवर टाकतात?

१४. बाप्तिस्मा घेण्यास विनाकारण उशीर लावणे योग्य नाही हे बायबलमधल्या कोणत्या उदाहरणांवरून दिसून येते?

१४ “मला बाप्तिस्मा घेण्यास काय हरकत आहे?” हा प्रश्‍न एका इथियोपियन माणसाने फिलिप्प या सुवार्तिकाला विचारला होता. त्या माणसाला नुकतेच कळले होते की येशू हाच मशीहा आहे. पण आपण यापुढे ख्रिस्ती मंडळीसोबत मिळून यहोवाची सेवा करू हे जाहीररित्या कबूल करण्यास उशीर लावू नये हे समजण्याइतपत त्याच्याजवळ पुरेसे ज्ञान होते आणि यामुळे त्याला खूप आनंद झाला होता. (प्रेषितांची कृत्ये ८:२६-३९) त्याचप्रकारे, लुदिया नावाच्या एका स्त्रीचे “अंतःकरण प्रभूने असे प्रफुल्लित केले की, पौलाच्या सांगण्याकडे तिने लक्ष दिले,” आणि तिचा व तिच्या घराण्याचा लगेच ‘बाप्तिस्मा झाला.’ (प्रेषितांची कृत्ये १६:१४, १५) तसेच, फिलिप्पै येथील बंदिशाळेच्या नायकाला पौल व सीला यांनी “प्रभूचे वचन सांगितले” तेव्हा कसलाही विलंब न लावता “त्याने व त्याच्या घरच्या सर्व माणसांनी बाप्तिस्मा घेतला.” (प्रेषितांची कृत्ये १६:२५-३४) तर मग प्रश्‍न हा आहे, की जर तुम्हाला यहोवाबद्दल व त्याच्या उद्देशांबद्दल मूलभूत ज्ञान आहे, त्याच्या इच्छेप्रमाणे करण्याची तुम्हाला इच्छा आहे, मंडळीत तुमचे चांगले नाव आहे, तुम्ही सर्व सभांना नियमित उपस्थित राहता आणि राज्याच्या सुवार्तेच्या प्रचार कार्यातही भाग घेता, तर मग कोणती गोष्ट तुम्हाला बाप्तिस्मा घेण्यापासून अडवत आहे?—मत्तय २८:१९, २०.

१५, १६. (क) कोणत्या चुकीच्या धारणेमुळे काही तरुण बाप्तिस्मा घेण्याचे टाळतात? (ख) समर्पण करून बाप्तिस्मा घेतल्यामुळे कशाप्रकारे तरुणांचे संरक्षण होऊ शकते?

१५ बाप्तिस्मा घेतल्यानंतर जर तुमच्या हातून काही चूक झाली, तर तुम्हाला त्याकरता जबाबदार धरले जाईल या भीतीने तर तुम्ही हे महत्त्वाचे पाऊल उचलण्याचे टाळत नसाल? जर हे कारण असेल, तर मग जरा यावर विचार करा: एखाद्या दिवशी आपला अपघात होईल या भीतीने तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज भरायला नकार द्याल का? नाही, नक्कीच नाही! बाप्तिस्मा घेण्याच्या बाबतीतही असेच आहे. जर तुम्ही पात्र असाल तर बाप्तिस्मा घ्यायला उशीर लावू नये. खरे तर, यहोवाला आपले जीवन समर्पित केल्यानंतर आणि त्याच्या इच्छेप्रमाणे जीवन जगण्याचे वचन दिल्यानंतर तुम्हाला चुकीच्या वर्तनापासून दूर राहण्याची आणखीनच प्रेरणा मिळेल. (फिलिप्पैकर ४:१३) तरुणांनो, बाप्तिस्मा लांबणीवर टाकून तुम्ही जबाबदारीतून मुक्‍त असता, असा विचार करू नका. कारण तुमच्या निर्णयांची व वागणुकीची जबाबदारी उचलण्याइतके तुमचे वय झाल्यानंतर, यहोवा तुम्हाला जबाबदार लेखतो. मग, तुमचा बाप्तिस्मा झालेला असो वा नसो.—रोमकर १४:११, १२.

१६ सबंध जगातल्या बऱ्‍याच साक्षीदारांचे असे मत आहे की तरुणपणी बाप्तिस्मा घेण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्यांना खूप फायदा झाला. पश्‍चिम युरोपातल्या २३ वर्षांच्या एका साक्षीदाराचे उदाहरण घ्या. तो सांगतो की १३ वर्षांच्या वयात त्याचा बाप्तिस्मा झाल्यामुळे त्याला ‘तरूणपणाच्या वासनांवर’ नियंत्रण मिळवण्याची आणि याबाबतीत अतिशय सांभाळून वागण्याची प्रेरणा मिळाली. (२ तीमथ्य २:२२) अगदी लहानपणापासूनच त्याने पूर्ण वेळेचा सेवक बनण्याचे ध्येय डोळ्यापुढे ठेवले होते. आज तो यहोवाच्या साक्षीदारांच्या एका शाखा दफ्तरात आनंदाने सेवा करत आहे. यहोवाची सेवा करण्याचा निर्णय घेणाऱ्‍या सर्व तरुणांना, हो, तुम्हाला देखील, अनेक आशीर्वाद मिळू शकतात.

१७. जीवनातल्या कोणकोणत्या गोष्टींत यहोवाची “इच्छा” काय आहे हे समजून घेणे महत्त्वाचे आहे?

१७ समर्पण करून बाप्तिस्मा घेतल्यावर आपण एका नव्या जीवनाला सुरुवात करतो. यानंतर जीवनातले प्रत्येक पाऊल उचलताना, यहोवाची इच्छा काय आहे याचा आपण विचार करतो. यहोवाला आपले जीवन समर्पित करताना आपण त्याला जे वचन दिले होते ते पूर्ण करण्याकरता आपण “वेळेचा सदुपयोग” करतो. तो कसा? पूर्वी आपण बऱ्‍याच निरर्थक गोष्टींत वेळ घालवत होतो. पण आता तोच वेळ आपण बायबलचा सखोल अभ्यास करण्याकरता, सभांना नियमितपणे उपस्थित राहण्याकरता, आणि ‘राज्याच्या सुवार्तेच्या’ प्रचारात जमेल तितका जास्त सहभाग घेण्याकरता खर्च करतो. (इफिसकर ५:१५, १६; मत्तय २४:१४) यहोवाला केलेल्या समर्पणामुळे आणि त्याच्या इच्छेनुसार जगण्याच्या आपल्या संकल्पामुळे, आपल्या जीवनाच्या सर्वच पैलूंवर सकारात्मक प्रभाव पडतो. उदाहरणार्थ करमणूक, खाण्यापिण्याच्या सवयी तसेच कशाप्रकारचे संगीत आपण ऐकतो यावरही आपल्या समर्पणामुळे चांगला प्रभाव पडतो. आपण अशाच प्रकारची करमणूक निवडू नये का, की जिचा आपल्याला सर्वकाळ आनंद घेता येईल? यहोवाच्या साक्षीदारांपैकी हजारो आनंदी तरुण तुम्हाला स्वतःच्या अनुभवाने हे सांगू शकतात, की यहोवाच्या ‘इच्छेच्या’ चाकोरीत राहूनही आपण अनेक उचित व चांगल्या मार्गांनी मौजमजा करू शकतो.—इफिसकर ५:१७-१९.

“आम्ही तुम्हाबरोबर येतो”

१८. आज तरुणांनी स्वतःला कोणते प्रश्‍न विचारले पाहिजेत?

१८ सा.यु.पू. १५१३ पासून सा.यु. ३३ सालच्या पेन्टेकॉस्टपर्यंत यहोवाने एका संघटित राष्ट्राला या पृथ्वीवर आपली उपासना करण्याकरता आणि आपले साक्षीदार होण्याकरता निवडले होते. (यशया ४३:१२) अशा एका राष्ट्रात इस्राएली मुलांचा जन्म होत असे. पण सा.यु. ३३ सालच्या पेन्टेकॉस्ट पासून यहोवाचे या पृथ्वीवर एक नवे “राष्ट्र” आहे. हे यहोवाने ‘आपल्या नावाकरता काढून घेतलेले लोक’ अर्थात आत्मिक इस्राएल आहे. (१ पेत्र २:९, १०; प्रेषितांची कृत्ये १५:१४; गलतीकर ६:१६) प्रेषित पौलाने म्हटले की, ख्रिस्ताने ‘चांगल्या कामात तत्पर असे आपले स्वतःचे लोक आपणासाठी शुद्ध’ केले आहेत. (तीत २:१४) तरुणांनो, हे लोक कोण आहेत हे तुम्हाला ठरवायचे आहे. आज “सत्याचे पालन करणारे धार्मिक राष्ट्र,” कोणते आहे? बायबलच्या तत्त्वांनुसार कोण जगत आहेत? यहोवाविषयी साक्ष देण्याचे कार्य विश्‍वासूपणे कोण करत आहेत, आणि देवाचे राज्य हे मानवजातीच्या सर्व समस्यांवर एकमात्र उपाय आहे हे कोण घोषित करत आहेत? (यशया २६:२-४) ख्रिस्ती धर्मजगताच्या चर्चेसमध्ये आणि इतर धर्मांत काय चालले आहे ते पाहा आणि बायबलनुसार देवाच्या सेवकांकडून कशाप्रकारच्या वर्तनाची अपेक्षा केली जाते याच्याशी त्याची तुलना करून पाहा.

१९. सबंध जगातल्या लाखो लोकांना कशाविषयी खात्री पटली आहे?

१९ अनेक तरुणांसहित जगातल्या लाखो लोकांना ही खात्री पटली आहे, की “सत्याचे पालन करणारे धार्मिक राष्ट्र,” यहोवाच्या साक्षीदारांच्या अभिषिक्‍त शेषवर्गालाच सूचित करते. या आत्मिक इस्राएली लोकांना ते म्हणतात: “आम्ही तुम्हाबरोबर येतो, कारण देव तुम्हाबरोबर आहे असे आम्ही ऐकले आहे.” (जखऱ्‍या ८:२३) तरुणांनो, आमची प्रामाणिक सदिच्छा आणि प्रार्थना हीच आहे, की तुम्ही देखील देवाच्या लोकांमध्ये सामील होण्याचा निर्णय घ्यावा आणि असे करण्याद्वारे ‘जीवन निवडून घ्यावे’—यहोवाच्या नव्या जगातले कधीही न संपणारे जीवन.—अनुवाद ३०:१५-२०; २ पेत्र ३:११-१३. (w०६ ७/१)

उजळणी

• प्रभूच्या शिक्षणात वाढवण्याचा काय अर्थ होतो?

• यहोवा कशाप्रकारच्या सेवेची अपेक्षा करतो?

• देवाला समर्पित असलेल्या आईवडिलांनी वाढवलेल्या मुलांसमोर कोणती निवड आहे?

• बाप्तिस्मा घेण्याचे विनाकारण लांबणीवर का टाकले जाऊ नये?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२८ पानांवरील चित्रे]

तुम्ही कोणाचे ऐकाल?

[२९ पानांवरील चित्र]

समर्पण करून बाप्तिस्मा घेतल्यामुळे कशाप्रकारे तुमचे संरक्षण होईल?

[३० पानांवरील चित्रे]

बाप्तिस्मा घेण्यापासून कोणती गोष्ट तुम्हाला अडवत आहे?