व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“तुझे निर्बंध मला आनंददायी आहेत”

“तुझे निर्बंध मला आनंददायी आहेत”

“तुझे निर्बंध मला आनंददायी आहेत”

“जे काही शास्त्रात पूर्वी लिहिले ते सर्व आपल्या शिक्षणाकरिता लिहिले.”—रोमकर १५:४.

१. यहोवा आपल्याला त्याच्या निर्बंधांची आठवण कशी करून देतो आणि आपल्याला याची गरज का आहे?

 या कठीण काळात ताणतणावांना तोंड देण्याकरता यहोवा आपल्या लोकांना वारंवार त्याच्या निर्बंधांची किंवा आज्ञांची आठवण करून देतो. हे निर्बंध कधी वैयक्‍तिक बायबल वाचनातून, तर कधी ख्रिस्ती सभांमध्ये सादर केल्या जाणाऱ्‍या भाषणांतून अथवा टिपणीतून आपल्या लक्षात आणून दिले जातात. आपण जे वाचतो, किंवा सभांमध्ये जे ऐकतो त्यातल्या बहुतेक गोष्टी आपल्याकरता नवीन नसतात. पूर्वीही आपण त्या ऐकलेल्या किंवा वाचलेल्या असतात. पण मनुष्यस्वभावानुसार सहसा या ऐकलेल्या व वाचलेल्या गोष्टी आपण विसरतो. त्यामुळे यहोवाचे उद्देश, त्याचे नियम व सूचना यांची आपल्याला सतत आठवण करून दिली जाण्याची गरज आहे. देव आपल्याला वारंवार त्याचे निर्बंध कळवतो याबद्दल खरे तर आपण त्याचे आभार मानले पाहिजेत. कारण हे निर्बंध आपल्याला याची आठवण करून देतात, की जीवनात आपण देवाच्या इच्छेनुसार चालण्याचे का ठरवले होते. आणि अशारितीने ते आपल्याला पुढेही याच मार्गावर चालत राहण्याचे प्रोत्साहन देतात. म्हणूनच स्तोत्रकर्त्याने एका भजनात यहोवाला म्हटले: “तुझे निर्बंध मला आनंददायी आहेत.”—स्तोत्र ११९:२४.

२, ३. (क) यहोवाने बायबलमध्ये निरनिराळ्या व्यक्‍तींचे अहवाल आपल्या काळापर्यंत का जतन करून ठेवले आहेत? (ख) या लेखात बायबलमधल्या कोणत्या अहवालांचे आपण परीक्षण करणार आहोत?

देवाचे वचन कित्येक शतकांआधीच लिहिलेले असले तरी ते आजही अतिशय शक्‍तिशाली आहे. (इब्री लोकांस ४:१२) त्यात आपल्याला निरनिराळ्या व्यक्‍तींच्या जीवनाचे अहवाल वाचायला मिळतात. अर्थात, बायबल ज्या काळात लिहिण्यात आले होते तेव्हाच्या प्रथा, रितीरिवाज आणि दृष्टिकोन आजच्या काळाच्या तुलनेत बरेच वेगळे होते. पण तरीसुद्धा, त्या काळातल्या लोकांना ज्या समस्यांना तोंड द्यावे लागायचे त्या आज आपल्या जीवनात येणाऱ्‍या समस्यांपेक्षा फारशा वेगळ्या नव्हत्या. बायबलमध्ये आपल्या फायद्याकरता जे अनेक अहवाल लिहून ठेवण्यात आले आहेत, ते वाचताना आपल्याला अशा अनेक लोकांची हृदयस्पर्शी उदाहरणे सापडतात की ज्यांनी यहोवावर मनापासून प्रेम केले आणि कठीण परिस्थितीतही त्याची विश्‍वासूपणे सेवा केली. इतर अहवालांतून आपल्याला हे समजते की यहोवाला कशाप्रकारच्या वर्तनाचा वीट आहे. यहोवाने आपल्याला त्याच्या निर्बंधांची आठवण करून देण्यासाठीच या सर्व चांगल्या व वाईट व्यक्‍तींच्या अहवालांचा बायबलमध्ये समावेश केला आहे. प्रेषित पौलाने लिहिल्याप्रमाणे: “धीराच्या व शास्त्रापासून मिळणाऱ्‍या उत्तेजनाच्या योगे आपण आशा धरावी म्हणून जे काही शास्त्रात पूर्वी लिहिले ते सर्व आपल्या शिक्षणाकरिता लिहिले.”—रोमकर १५:४.

आता आपण बायबलमधल्या तीन अहवालांकडे लक्ष देऊ या: दावीद व शौल, हनन्या व सप्पीरा आणि पोटीफरच्या बायकोबरोबर योसेफचा व्यवहार यांच्याविषयीचे हे अहवाल आहेत. यांतल्या प्रत्येक अहवालातून आपण बरेच मोलाचे धडे शिकू शकतो.

देवाने केलेल्या व्यवस्थेप्रती एकनिष्ठा

४, ५. (क) राजा शौल व दावीद यांच्यामध्ये कोणती समस्या निर्माण झाली होती? (ख) शौलाच्या शत्रुत्वाला दाविदाने कशी प्रतिक्रिया दाखवली?

शौल राजा यहोवाला विश्‍वासू राहिला नाही आणि यहोवाच्या लोकांवर राज्य करण्याकरता तो अपात्र ठरला. त्यामुळे देवाने त्याच्यावरून आपला आशीर्वाद काढून घेतला; आणि दाविदाला इस्राएलचा नवा राजा म्हणून अभिषिक्‍त करावे अशी संदेष्टा शमुवेल याला आज्ञा दिली. दावीद एकापाठोपाठ एक युद्धात विजय मिळवू लागला आणि सर्व लोक त्याची वाहवा करू लागले. हे पाहून शौल मत्सराने पेटला आणि दाविदाला आपला वैरी मानू लागला. त्याने कितीतरी वेळा दाविदाला मारून टाकण्याचा प्रयत्न केला. पण प्रत्येक वेळी दावीद त्याच्या तावडीतून सुटला कारण यहोवा दाविदाच्या पाठीशी होता.—१ शमुवेल १८:६-१२, २५; १९:१०, ११.

शौलाच्या भीतीने, दाविदाला कित्येक वर्षे आपला जीव घेऊन रानावनात भटकावे लागले. दाविदाला जेव्हा शौलाला ठार मारण्याची संधी मिळाली, तेव्हा त्याच्या साथीदारांनी त्याला असे म्हणून शौलाला ठार मारण्याचे प्रोत्साहन दिले की, यहोवानेच तुझ्या शत्रूला तुझ्या हातात दिले आहे. पण दावीद मात्र शौलाला ठार मारण्यास तयार झाला नाही. का बरे? कारण तो यहोवाच्याप्रती एकनिष्ठ होता. शिवाय, देवाच्या लोकांवर राज्य करण्याकरता अभिषिक्‍त केलेला राजा या नात्याने शौलाच्या पदवीचा त्याने आदर केला. यहोवानेच शौलाला इस्राएलचा राजा म्हणून नियुक्‍त केले नव्हते का? मग त्याला योग्य वाटेल तेव्हा तो स्वतःच शौलाला या पदावरून काढूनही टाकेल असा दाविदाला विश्‍वास होता. पण परिस्थिती आपल्या हातात घेऊन काही करण्याचा आपल्याला अधिकार नाही हे दाविदाने ओळखले. शौलाला आपल्याप्रती वाटणारा वैरभाव कमी करण्यासाठी दाविदाने आपल्याकडून होईल तितके सर्वकाही केले. पण शेवटी तो या निष्कर्षावर आला, की “परमेश्‍वरच त्यास मारील अथवा त्याचा काळ आला म्हणजे तो मरेल अथवा युद्धात त्याचा अंत होईल. परमेश्‍वराच्या अभिषिक्‍तावर आपला हात टाकावयाचे मजकडून न घडो!”—१ शमुवेल २४:३-१५; २६:७-२०.

६. दावीद व शौल यांच्याविषयीचा अहवाल आपल्याकरता महत्त्वाचा का आहे?

या अहवालातून आपण एक महत्त्वाचा धडा शिकू शकतो. ख्रिस्ती मंडळीत समस्या का उद्‌भवतात असा विचार कधी तुमच्या मनात आला आहे का? कदाचित, मंडळीतली एखादी व्यक्‍ती अनुचित प्रकारे वागत असेल. ती काही गंभीर पाप करत नसेल, पण तरीही तिचे वागणे तुम्हाला अस्वस्थ करते. अशा परिस्थितीत तुम्ही काय करावे? आपल्या या ख्रिस्ती बांधवाला मदत करण्याची प्रामाणिक इच्छा असल्यामुळे आणि यहोवाच्याप्रती एकनिष्ठपणामुळे, तुम्ही प्रत्यक्ष त्या व्यक्‍तीकडे जाऊन तिच्याशी या बाबतीत प्रेमळपणे बोलू शकता. असे करताना तुमचा उद्देश, आपल्या भावाचे मन जिंकण्याचा असावा. पण इतके करूनही समस्या तशीच राहिली तर काय करावे? तर मग, दाविदाने जे केले तेच तुम्हीही करावे. म्हणजेच, आपल्या परीने सर्व प्रयत्न केल्यानंतर ती समस्या यहोवावर सोडून द्यावी.

७. आपल्याला अन्यायी वागणूक सहन करावी लागल्यास आपण कशाप्रकारे दाविदाचे अनुकरण करावे?

किंवा कदाचित तुम्हाला समाजात काही अन्यायी वागणूक सहन करावी लागत असेल. अथवा विशिष्ट धर्माचे असल्यामुळे काहीजण तुमच्याविषयी पूर्वग्रह बाळगत असतील. कदाचित ही परिस्थिती सहन करण्याशिवाय, सध्यातरी तुमच्याजवळ कोणताच पर्याय नसेल. अर्थात, अशाप्रकारची अन्यायी वागणूक सहन करणे, मुळीच सोपे नाही, पण दाविदाने अन्यायाला ज्याप्रकारे तोंड दिले त्यावरून आपण धडा घेऊ शकतो. दाविदाने लिहिलेल्या बहुतेक स्तोत्रांत त्याने शौलाच्या तावडीतून सुटका मिळण्याकरता देवाला केलेल्या कळकळीच्या याचना आहेत; पण याशिवाय, त्याचा यहोवाप्रती एकनिष्ठपणा आणि देवाच्या नावाचे गौरव व्हावे याविषयीची त्याची तळमळही त्याच्या स्तोत्रांतून व्यक्‍त होते. (स्तोत्र १८:१-६, २५-२७, ३०-३२, ४८-५०; ५७:१-११) शौलाकडून कित्येक वर्षांपर्यंत अन्यायी वागणूक सहन करावी लागली तरीसुद्धा दावीद यहोवाला एकनिष्ठ राहिला. यावरून आपण हे शिकतो, की आपल्याला कितीही अन्याय सहन करावा लागला, किंवा इतरजण कशाहीप्रकारे वागले तरीसुद्धा, आपण मात्र यहोवाला व त्याच्या संघटनेला विश्‍वासू राहिले पाहिजे. आपल्या परिस्थितीची यहोवाला पूर्ण कल्पना आहे याची आपण खात्री बाळगू शकतो.—स्तोत्र ८६:२.

८. मोझांबिक येथे राहणाऱ्‍या यहोवाच्या साक्षीदारांच्या एकनिष्ठपणाची परीक्षा झाली तेव्हा त्यांनी काय केले?

कठीण परीक्षांना तोंड देतानाही यहोवाची विश्‍वासूपणे सेवा करत राहण्याविषयी, मोझांबिक येथील आपल्या ख्रिस्ती बांधवांनी या आधुनिक काळात एक उत्तम आदर्श आपल्याकरता पुरवला आहे. १९८४ साली एका बंडखोर चळवळीच्या सशस्त्र सदस्यांनी एक नव्हे तर अनेकवेळा त्यांच्या खेडेगावांवर हल्ले केले. त्यांनी गावांत लुटालूट, जाळपोळ आणि बऱ्‍याच लोकांची कत्तल केली. या गावांत राहणारे खरे ख्रिस्ती स्वतःचा बचाव करण्याकरता अक्षरशः काहीच करू शकत नव्हते. बंडखोर गटाला प्रत्युत्तर देण्याकरता एक लष्करी सैन्य संघटित करण्याचे ठरवण्यात आले. गावातल्या लोकांवर या सैन्यात भरती होण्याचा व इतर प्रकारे या सैन्याला साहाय्य करण्याचा दबाव आणला जाऊ लागला. यहोवाचे साक्षीदार कधीच कोणत्याही राजकीय चळवळींत भाग घेत नाहीत त्यामुळे त्यांना या सैन्यात भरती होणे किंवा त्याला साहाय्य पुरवणे शक्य नव्हते. त्यांनी नकार दिल्यामुळे त्यांच्यावर या सैन्याच्या समर्थकांचा रोष ओढवला. त्या सबंध वादळी काळात जवळजवळ ३० साक्षीदारांना ठार मारण्यात आले. पण मृत्यूची भीती देखील त्यांना देवाप्रती आपला एकनिष्ठपणा सोडून देण्यास भाग पाडू शकली नाही. * दाविदाप्रमाणेच त्यांनी अनेक अन्यायांना तोंड दिले पण शेवटी ते विजयी ठरले.

एक इशारेवजा उदाहरण

९, १०. (क) बायबलमधील काही उदाहरणांपासून आपल्याला काय शिकायला मिळते? (ख) हनन्या व सप्पीरा यांनी जे केले ते चुकीचे का होते?

बायबलमध्ये उल्लेख केलेल्या काही व्यक्‍तींचे अहवाल आपल्याला आठवण करून देतात की आपण कशाप्रकारचे वर्तन टाळले पाहिजे. खरे पाहता, बायबलमध्ये अशा अनेक व्यक्‍तींची उदाहरणे आहेत की ज्यांनी वाईट कृत्ये केली आणि त्यामुळे त्यांना याचे दुष्परिणाम भोगावे लागले. यांपैकी काहीजण तर देवाचे सेवक देखील होते. (१ करिंथकर १०:११) असाच एक अहवाल आहे हनन्या व सप्पीरा यांच्याविषयी. हे एक विवाहित जोडपे होते आणि पहिल्या शतकात जेरूसलेममधील ख्रिस्ती मंडळीचे ते सभासद होते.

१० सा.यु. ३३ सालच्या पेन्टेकॉस्टनंतर काही नवीन शिष्य आपापल्या गावी न परतता, प्रेषितांच्या सहवासात राहण्याकरता जेरूसलेममध्येच थांबले तेव्हा त्यांच्या गरजा भागवण्याकरता आर्थिक साहाय्याची आवश्‍यकता निर्माण झाली. ही समस्या सोडवण्याकरता मंडळीतल्या काही सभासदांनी आपापली जमीन व मालमत्ता विकून हातभार लावला. (प्रेषितांची कृत्ये २:४१-४५) हनन्या व सप्पीरा यांनीही एक शेत विकले आणि मिळालेल्या रकमेतून अर्धीच रक्कम प्रेषितांना आणून दिली. पण प्रेषितांना त्यांनी असे सांगितले की ही शेताची पूर्ण किंमत आहे. अर्थात, मिळालेल्या रकमेतून किती पैसे द्यायचे हा हनन्या व सप्पीरा यांचा वैयक्‍तिक प्रश्‍न होता. तरीपण, त्यांचा हेतू चांगला नव्हता आणि त्यांनी बेइमानी केली. त्यांना प्रेषितांवर छाप पाडायची होती. आपण फार मोठा त्याग करत आहोत असा खोटा आभास निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पण पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने प्रेषित पेत्राने त्यांच्या अप्रामाणिकतेचा व ढोंगीपणाचा पर्दाफाश केला आणि यहोवाने त्या दोघांनाही ठार मारले.—प्रेषितांची कृत्ये ५:१-१०.

११, १२. (क) प्रामाणिकपणाविषयी बायबलमध्ये आपल्याला वारंवार कोणती आज्ञा दिली आहे? (ख) प्रामाणिकपणे जगण्याचे कोणते फायदे आहेत?

११ लोकांनी आपल्याला चांगले म्हणावे, या इच्छेने जर कधी सत्य लपवण्याचा आपल्याला मोह झाला तर हनन्या व सप्पीरा यांचे उदाहरण आठवून आपण वेळीच सावध झाले पाहिजे. आपण इतर मनुष्यांना फसवू शकतो पण यहोवाला आपण कधीही फसवू शकत नाही. (इब्री लोकांस ४:१३) बायबल आपल्याला वेळोवेळी सल्ला देते की आपण एकमेकांशी प्रामाणिक असावे. कारण देवाने या पृथ्वीवरून सर्व दुष्टाई काढून टाकल्यानंतर, असत्य बोलणारे कोणीही त्या नव्या जगात राहणार नाही. (नीतिसूत्रे १४:२; प्रकटीकरण २१:८; २२:१५) आणि याचे कारण अगदीच स्पष्ट आहे. ते म्हणजे, सर्व असत्य व लबाडी दियाबल सैतानापासून उत्पन्‍न होते.—योहान ८:४४.

१२ प्रामाणिकपणे जगण्याचे अनेक फायदे आहेत. उदाहरणार्थ, आपला विवेक शुद्ध राहतो आणि इतरजण आपल्यावर भरवसा ठेवतात याचे समाधान आपल्याला मिळते. आपल्याजवळ अशा अनेक ख्रिस्ती बांधवांची उदाहरणे आहेत की ज्यांना केवळ त्यांच्या प्रामाणिकपणामुळे नोकरी मिळाली किंवा ज्यांना नोकरीवरून कमी करण्यात आले नाही. पण या सर्व फायद्यांपेक्षा सर्वात मोठा फायदा म्हणजे, प्रामाणिकपणामुळे आपण सर्वसमर्थ देवाशी मित्रत्व जोडू शकतो.—स्तोत्र १५:१, २.

शुद्ध चारित्र्य कायम राखणे

१३. योसेफसमोर कोणती समस्या आली आणि त्याने काय केले?

१३ कुलपिता याकोब याच्या योसेफ नावाच्या मुलाला १७ वर्षांच्या वयात गुलाम म्हणून विकण्यात आले. कालांतराने तो पोटीफर या ईजिप्तच्या एका अंमलदाराच्या घरात राहू लागला. पोटीफरच्या बायकोचे योसेफवर मन बसले. तिच्या मनात या देखण्या तरुणासोबत लैंगिक संबंध ठेवण्याची इच्छा जागृत झाली. त्यामुळे ती रोज रोज त्याला “मजपाशी नीज” अशी गळ घालू लागली. योसेफ आपल्या कुटुंबापासून दूर एका अशा देशात होता की जेथे त्याला कोणीही ओळखत नव्हते. तो सहज कोणाच्याही नकळत या स्त्रीसोबत संबंध ठेवू शकला असता. तरीपण, शेवटी एकदा पोटीफरच्या बायकोने त्याला जबरदस्तीने धरले तेव्हा तो अक्षरशः तेथून पळून गेला.—उत्पत्ति ३७:२, १८-२८; ३९:१-१२.

१४, १५. (क) योसेफच्या अहवालावर आपण का मनन करावे? (ख) देवाच्या निर्बंधांकडे लक्ष दिल्यामुळे एका ख्रिस्ती तरुणीला कशाप्रकारे फायदा झाला?

१४ योसेफ एका देवभीरू कुटुंबात लहानाचा मोठा झाला होता. त्याला माहीत होते की जे एकमेकांशी विवाहित नाहीत त्यांनी लैंगिक संबंध ठेवणे चुकीचे आहे. म्हणूनच योसेफाने म्हटले: “एवढी मोठी वाईट गोष्ट करुन मी देवाच्या विरुद्ध पाप कसे करु?” देवाने एदेन बागेत म्हटले होते की पतीने आपल्या पत्नीशी जडून राहावे. कदाचित, मानवांकरता देवाने घालून दिलेल्या या आदर्शाविषयी माहीत असल्यामुळेच योसेफाने वरीलप्रमाणे निष्कर्ष काढला असावा. (उत्पत्ति २:२४) योसेफासमोर आलेल्या परिस्थितीत तो कशाप्रकारे वागला यावर मनन केल्यास आज देवाचे लोक बरेच काही शिकू शकतात. काही देशांत, लैंगिक संबधांविषयी लोकांची इतकी बेपर्वा वृत्ती झाली आहे की जे तरुण अनैतिक वर्तन करण्यास नकार देतात त्यांना त्यांचे मित्र मूर्ख समजतात. प्रौढांमध्येही विवाहबाह्‍य लैंगिक संबंध अगदी सर्वसामान्य झाले आहेत. तेव्हा योसेफविषयीचा अहवाल आपल्या या काळाकरता अगदी उचित आहे. हा अहवाल आपल्याला याची आठवण करून देतो, की व्यभिचार व जारकर्म यांसंबंधी देवाचा दर्जा आजही बदललेला नाही. तो आजही या गोष्टींना पाप म्हणून लेखतो. (इब्री लोकांस १३:४) लैंगिक दुराचरण करण्याच्या मोहाला बळी पडलेले अनेकजण आज कबूल करतात की असे वर्तन टाळण्याची अनेक महत्त्वाची कारणे आहेत. अनैतिकतेमुळे एका व्यक्‍तीची नालस्ती तर होतेच, पण बोचणारा विवेक, हेवेदावे, नको असलेली गर्भधारणा व लैंगिकरित्या संक्रमित रोग यांसारखे इतर दुष्परिणामही भोगावे लागू शकतात. म्हणूनच बायबल आपल्याला आठवण करून देते की जो व्यभिचार करतो तो “आपल्या शरीराबाबत पाप करितो.”—१ करिंथकर ५:९-१२; ६:१८; नीतिसूत्रे ६:२३-२९, ३२.

१५ जेनी * ही यहोवाच्या साक्षीदारांपैकी असलेली एक अविवाहित तरुणी आहे. तिला आलेल्या अनुभवामुळे, ती देवाच्या निर्बंधांची मनापासून कदर करू लागली. तिच्या कामाच्या ठिकाणी, एक देखणा सहकर्मचारी तिच्याकडे आकर्षित झाला आणि तिच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करू लागला. जेनीने त्याला प्रतिसाद दिला नाही तेव्हा त्याला आणखीनच चेव आला. जेनी कबूल करते, “त्याच्या अनैतिक प्रस्तावांना नकार देणं मला दिवसेंदिवस कठीण वाटू लागलं. कारण काही झालं तरी, एखादा पुरुष आपल्याकडे इतकं लक्ष देतोय हे पाहून कोणत्याही मुलीला मनातल्या मनात आनंद वाटणं स्वाभाविक आहे.” पण जेनीने ओळखले की या तरुणाने याआधी ज्या अनेक मुलींशी लैंगिक संबंध ठेवले होते त्यांच्या यादीत तो तिचेही नाव जोडायला पाहात होता. त्याच्या प्रयत्नांना झिडकारण्याचा तिचा निर्धार जराही डगमगला की ती लगेच यहोवाला प्रार्थना करून, ‘विश्‍वासू राहायला मला मदत कर’ अशी त्याला कळकळीची विनंती करत असे. बायबल व ख्रिस्ती प्रकाशनांत संशोधन करताना जेनीला ज्या गोष्टी शिकायला मिळाल्या त्यांमुळे तिला “यहोवाच्या निर्बंधांची आठवण झाली आणि या निर्बंधांनी [तिला] प्रत्येक पाऊल सावधगिरीने टाकण्यास मदत केली.” ज्या गोष्टींनी तिला यहोवाच्या निर्बंधांची आठवण करून दिली त्यांपैकी एक योसेफ व पोटीफरची बायको यांचा अहवाल होता. ती शेवटी म्हणते, “माझं यहोवावर किती मनापासून प्रेम आहे याची मी जोपर्यंत स्वतःला आठवण करून देत राहीन तोपर्यंत, एवढी मोठी वाईट गोष्ट करुन मी त्याच्या विरुद्ध पाप कधीच करणार नाही याची मला खात्री आहे.”

देवाच्या निर्बंधांकडे लक्ष द्या!

१६. बायबलमध्ये उल्लेखलेल्या व्यक्‍तींच्या जीवनाचे अहवाल पडताळून त्यांवर मनन केल्यामुळे आपल्याला कोणता फायदा होऊ शकतो?

१६ यहोवाने विशिष्ट अहवाल बायबलमध्ये आपल्याकरता का जतन करून ठेवले आहेत हे समजून घेण्याचा जर आपण प्रयत्न केला, तर यहोवाच्या नीतिनियमांबद्दल आपली कदर नक्कीच वाढेल. या अहवालांतून आपल्याला काय शिकायला मिळते? बायबलमधील निरनिराळ्या व्यक्‍तींच्या कोणत्या गुणांचे किंवा प्रवृत्तींचे आपण अनुकरण करावे? आणि कोणते गुण व प्रवृत्ती आपण टाळाव्यात? देवाच्या वचनात अक्षरशः शेकडो व्यक्‍तींबद्दल माहिती दिली आहे. ज्या कोणाला देवाकडील शिक्षण हवेहवेसे वाटते त्याने हे जीवनदायक ज्ञान मिळवण्याची उत्कंठा आपल्या मनात निर्माण केली पाहिजे. यहोवाने अतिशय काळजीपूर्वक जपून ठेवलेल्या अनेक अहवालांतून जे निरनिराळे धडे आपण शिकतो त्यांतून हे जीवनदायक ज्ञान आपल्याला मिळू शकते. या नियतकालिकात अशा व्यक्‍तींच्या जीवनाचे अहवाल अनेकदा सादर करण्यात आले आहेत आणि त्या प्रत्येक अहवालातून आपल्याला काही न काही शिकायला मिळतेच. अशाप्रकारचे लेख पुन्हा वाचण्याकरता तुम्ही वेळ काढू शकाल का?

१७. यहोवाच्या निर्बंधांविषयी तुमच्या भावना तुम्ही कशा व्यक्‍त कराल आणि का?

१७ जे यहोवाच्या इच्छेप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतात त्यांच्याबद्दल तो प्रेमळ काळजी व्यक्‍त करतो. याबद्दल आपण त्याचे आभार मानले पाहिजेत! बायबलमध्ये उल्लेखलेल्या व्यक्‍ती ज्याप्रमाणे परिपूर्ण नव्हत्या त्याप्रमाणे आज आपणही परिपूर्ण नाही. पण त्या व्यक्‍तींच्या कृत्यांचा लिखित अहवाल आपल्याकरता अतिशय मोलाचा ठरू शकतो. यहोवाच्या निर्बंधांकडे लक्ष दिल्याने आपण बऱ्‍याच गंभीर चुका करण्याचे टाळू शकतो. तसेच, जे नीतिमान मार्गाने चालले अशा व्यक्‍तींच्या उत्तम उदाहरणांचे आपण अनुकरणही करू शकतो. जर आपण असे केले तर स्तोत्रकर्त्यासोबत आपल्यालाही असे म्हणता येईल, की “जे [यहोवाचे] निर्बंध पाळून अगदी मनापासून त्याचा शोध करितात ते धन्य. माझा जीव तुझे निर्बंध पाळितो; व ते मला अत्यंत प्रिय आहेत.”—स्तोत्र ११९:२, १६७. (w०६ ६/१५)

[तळटीपा]

^ परि. 8 यहोवाच्या साक्षीदारांचे वार्षिक पुस्तक (इंग्रजी) १९९६, पृष्ठे १६०-२ पाहावे.

^ परि. 15 हे तिचे खरे नाव नाही.

तुम्ही कसे उत्तर द्याल?

• शौलाप्रती दाविदाच्या मनोवृत्तीवरून आपण काय शिकू शकतो?

• हनन्या व सप्पीरा यांच्या अहवालावरून आपण काय शिकतो?

• योसेफची जीवन कथा आज आपल्याकरता महत्त्वाची का आहे?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१८ पानांवरील चित्र]

दाविदाने शौलाचा वध करण्यास नकार का दिला?

[१९ पानांवरील चित्र]

हनन्या व सप्पीरा यांच्या अहवालावरून आपण काय शिकतो?

[२० पानांवरील चित्र]

योसेफ कशामुळे पोटीफरच्या बायकोच्या अनैतिक प्रस्तावांना झिडकारू शकला?