व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाने निवडलेल्या राष्ट्रात जन्मलेले

देवाने निवडलेल्या राष्ट्रात जन्मलेले

देवाने निवडलेल्या राष्ट्रात जन्मलेले

“तू त्याची खास प्रजा व्हावे म्हणून . . . तुझा देव परमेश्‍वर ह्‍याने तुला निवडून घेतले आहे.”—अनुवाद ७:६.

१, २. यहोवाने आपल्या लोकांकरता कोणती महान कार्ये केली आणि त्याने इस्राएली लोकांसोबत कशाप्रकारचा नातेसंबंध जोडला?

 सा.यु.पू. १५१३ साली यहोवाने पृथ्वीवरील आपल्या सेवकांसोबत एक नवा नातेसंबंध जोडला. त्या वर्षी त्याने एका जागतिक महासत्तेचा पाणउतारा करून, इस्राएली लोकांना गुलामीतून मुक्‍त केले. असे करण्याद्वारे तो त्यांचा तारणकर्ता व मालक बनला. इस्राएल राष्ट्राला गुलामीतून सोडवण्याआधी देवाने मोशेला असे सांगितले: “इस्राएल लोकांस सांग, मी परमेश्‍वर आहे; मी तुम्हास मिसऱ्‍यांच्या बिगारीच्या ओझ्याखालून काढीन, त्यांच्या दास्यातून तुम्हास मुक्‍त करीन आणि हात पुढे केलेल्या बाहूने व मोठ्या शिक्षा करून तुमचा उद्धार करीन; मी तुम्हास आपली प्रजा करून घेईन आणि मी तुमचा देव होईन.”—निर्गम ६:६, ७; १५:१-७, ११.

इस्राएली लोक इजिप्तमधून बाहेर पडल्यावर थोड्याच काळानंतर यहोवाने त्यांच्यासोबत एक करार केला आणि ते त्याचे निवडलेले लोक बनले. यावरून हे सूचित झाले की, यापुढे यहोवा कोणत्याही व्यक्‍तींसोबत, घराण्यांसोबत अथवा कुळांसोबत व्यवहार करणार नाही तर पृथ्वीवर त्याचे लोक एका संघटित राष्ट्राच्या रूपात असतील. (निर्गम १९:५, ६; २४:७) यहोवाने आपल्या या लोकांना त्यांच्या दैनंदिन जीवनातील व्यवहाराकरता आणि विशेषतः त्यांच्या उपासनेच्या संबंधात काही कायदे दिले. म्हणूनच मोशेने इस्राएल लोकांना असे म्हटले: “ह्‍याच्या सारखे देव जवळ असणारे महान राष्ट्र दुसरे कोणते आहे? हे सारे नियमशास्त्र मी आज तुम्हाला देत आहे त्यातल्यासारखे यथार्थ विधि व नियम असणारे महान राष्ट्र दुसरे कोणते आहे?”—अनुवाद ४:७, ८.

साक्षीदारांच्या राष्ट्रात जन्मलेले

३, ४. इस्राएल राष्ट्राच्या अस्तित्वाचे मुख्य कारण काय होते?

कित्येक शतकांनंतर, यहोवाने संदेष्टा यशया याच्याद्वारे इस्राएलांना, त्यांचे राष्ट्र अस्तित्वात असण्यामागच्या एका महत्त्वाच्या कारणाची आठवण करून दिली. यशयाने म्हटले: “हे याकोबा, तुझा उत्पन्‍नकर्ता, आणि हे इस्राएला, तुझा निर्माणकर्ता परमेश्‍वर, असे म्हणतो, भिऊ नको; कारण मी तुला सोडविले आहे; मी तुला तुझ्या नावाने हाक मारिली आहे; तू माझा आहेस. कारण मी परमेश्‍वर तुझा देव आहे; मी इस्राएलाचा पवित्र प्रभू तुझा त्राता आहे; . . . माझे पुत्र दुरून व माझ्या कन्या दिगंतापासून घेऊन या; ज्यास माझे नाम ठेविले, ज्यास माझ्या गौरवासाठी उत्पन्‍न केले, निर्माण केले आणि घडिले त्या सर्वांस घेऊन या. परमेश्‍वराचे असे म्हणणे आहे की . . . तुम्ही माझे साक्षी आहा, तू माझा निवडलेला सेवक आहेस. मी आपल्यासाठी निर्माण केलेले लोक माझे स्तवन करितील.”—यशया ४३:१, ३, ६, ७, १०, २१.

यहोवाने इस्राएल लोकांना आपले नाव दिले. त्याअर्थी ते सर्व राष्ट्रांपुढे यहोवाच्या सार्वभौमत्त्वाविषयी साक्ष देणार होते. ते यहोवाच्या ‘गौरवासाठी उत्पन्‍न केलेले’ लोक असणार होते. ते यहोवाचे ‘स्तवन करितील’ अर्थात, त्याच्या अद्‌भुत तारणकृत्यांचे वर्णन करण्याद्वारे त्याच्या पवित्र नावाचे गौरव करतील असे त्यांच्याविषयी म्हणण्यात आले. थोडक्यात सांगायचे झाल्यास, ते यहोवाच्या साक्षीदारांचे राष्ट्र असणार होते.

५. इस्राएल राष्ट्र कोणत्या अर्थाने एक समर्पित राष्ट्र होते?

यहोवाने इस्राएल राष्ट्राला कशाप्रकारे इतर राष्ट्रांमधून वेगळे केले होते याविषयी सा.यु.पू. ११ व्या शतकात शलमोन राजाने उल्लेख केला. यहोवाला प्रार्थना करताना त्याने म्हटले: “हे लोक तुझे वतन व्हावे म्हणून भूतलावरल्या सर्व राष्ट्रांपासून तू त्यास वेगळे केले आहे.” (१ राजे ८:५३) केवळ एक राष्ट्र म्हणूनच नव्हे, तर वैयक्‍तिक पातळीवरही इस्राएली लोकांचा यहोवासोबत एक विशेष नातेसंबंध होता. पूर्वी मोशेने त्यांना सांगितले होते: “तुम्ही आपला देव परमेश्‍वर ह्‍याची मुले आहा. . . . तुम्ही आपला देव परमेश्‍वर ह्‍याची पवित्र प्रजा आहा.” (अनुवाद १४:१, २) त्याअर्थी इस्राएली लोकांच्या मुलाबाळांना आपले जीवन यहोवाला समर्पित करण्याची गरज नव्हती. कारण ते जन्मतःच देवाच्या समर्पित राष्ट्राचे सदस्य होते. (स्तोत्र ७९:१३; ९५:७) प्रत्येक नव्या पिढीला यहोवाच्या नियमांविषयी शिक्षण दिले जायचे. आणि यहोवासोबत करारबद्ध असल्यामुळे या राष्ट्राचा प्रत्येक सदस्य या नियमांचे पालन करण्यास बाध्य होता.—अनुवाद ११:१८, १९.

निवड करण्याची मोकळीक

६. प्रत्येक इस्राएली व्यक्‍तीला कशाच्या बाबतीत स्वातंत्र्य होते?

इस्राएली लोक जन्मतःच एका समर्पित राष्ट्राचे सदस्य होते हे जरी खरे असले तरी, प्रत्येक व्यक्‍तीला देवाची सेवा करण्याचा निर्णय स्वतःहून घ्यावा लागत असे. प्रतिज्ञात देशात प्रवेश करण्याआधी मोशेने त्यांना असे सांगितले होते: “आकाश व पृथ्वी ह्‍यांना तुझ्याविरुद्ध साक्षीला ठेवून मी आज सांगतो की, जीवन व मरण आणि आशीर्वाद व शाप मी तुझ्यापुढे ठेवली आहेत; म्हणून तू जीवन निवडून घे म्हणजे तू व तुझी संतति जिवंत राहील. आपला देव परमेश्‍वर ह्‍याच्यावर प्रीति कर, त्याची वाणी ऐक व त्याला धरून राहा, कारण त्यातच तुझे जीवन आहे व त्यामुळेच तू दीर्घायु होशील; तसे केलेस तर तुझे पूर्वज अब्राहाम, इसहाक व याकोब ह्‍यांना जो देश देण्याची परमेश्‍वराने त्यांच्याशी शपथ वाहिली होती त्यात तुझी वस्ती होईल.” (अनुवाद ३०:१९, २०) त्याअर्थी, यहोवावर प्रीती करण्याचा, त्याची वाणी ऐकण्याचा व त्याला धरून राहण्याचा निर्णय प्रत्येक इस्राएली व्यक्‍तीला स्वेच्छेने घ्यायचा होता. इस्राएल लोकांजवळ इच्छास्वातंत्र्य होते आणि त्यामुळे त्यांनी घेतलेल्या निर्णयांकरता ते स्वतः सर्वस्वी जबाबदार होते.—अनुवाद ३०:१६-१८.

७. यहोशवाची पिढी जाऊन नवीन पिढी आली तेव्हा काय घडले?

इस्राएलात शास्त्यांच्या काळात घडलेल्या काही घटनांवरून विश्‍वासू व अविश्‍वासूपणे वागल्याने कोणते परिणाम घडले याची काही चांगली उदाहरणे पाहायला मिळतात. शास्त्यांचा काळ सुरू होण्याआधी इस्राएली लोकांनी यहोशवाच्या उत्तम उदाहरणाचे अनुकरण केले व यामुळे त्यांना अनेक आशीर्वादही मिळाले. “यहोशवाच्या हयातीत आणि यहोशवाच्या मरणानंतर जिवंत राहिलेल्या ज्या वडील लोकांनी परमेश्‍वराने इस्राएलासाठी केलेली महान कार्ये पाहिली होती त्यांच्या हयातीत लोकांनी परमेश्‍वराची सेवा केली.” पण यहोशवाचा मृत्यू झाल्यानंतर काही काळाने “जी नवी पिढी उदयास आली तिला परमेश्‍वराची आणि त्याने इस्राएलासाठी केलेल्या कार्यांची ओळख राहिली नव्हती. इस्राएल लोक परमेश्‍वराच्या दृष्टीने वाईट ते . . . करु लागले.” (शास्ते २:७, १०, ११) इस्राएल राष्ट्राच्या नव्या पिढीला अनुभव नव्हता. आणि ज्या राष्ट्राकरता यहोवा देवाने गतकाळात अद्‌भूत कार्ये केली होती अशा एका समर्पित राष्ट्राचे सदस्य असण्याचा बहुमान आपल्याला वारशाने मिळाला आहे या गोष्टीची या नव्या पिढीला कदर नव्हती.—स्तोत्र ७८:३-७, १०, ११.

समर्पणाचे वचन पूर्ण करणे

८, ९. (क) कोणत्या तरतुदीमुळे इस्राएली लोकांना, यहोवाला केलेल्या त्यांच्या समर्पणाचे वचन पूर्ण करण्याची संधी मिळत असे? (ख) ऐच्छिक अर्पणे देणाऱ्‍यांना कोणता आशीर्वाद मिळत असे?

यहोवाने आपल्या लोकांना, त्यांच्या समर्पणाचे वचन पूर्ण करण्याच्या अनेक संधी दिल्या. उदाहरणार्थ, त्याच्या नियमशास्त्रात बलिदाने किंवा अर्पणे देण्याची आज्ञा होती. यांपैकी काही बलिदाने बंधनकारक तर काही ऐच्छिक होती. (इब्री लोकांस ८:३) उदाहरणार्थ होमार्पणे, धान्यार्पणे व शांत्यर्पणे ही ऐच्छिक अर्पणे होती. यहोवाकडे कृपेची याचना करण्याकरता व त्याची उपकारस्तुती करण्याकरता ही अर्पणे दिली जायची.—लेवीय ७:११-१३.

ही ऐच्छिक अर्पणे यहोवाला संतोषदायक होती. होमार्पणांचे व धान्यार्पणांचे वर्णन, “परमेश्‍वराप्रीत्यर्थ सुवासिक हव्य” असे करण्यात आले. (लेवीय १:९; २:२) शांत्यर्पणात प्राण्यांचे रक्‍त व चरबी यहोवाला अर्पण केली जात असे आणि बाकीचे मांस याजक व अर्पण करणाऱ्‍या व्यक्‍तीला मिळत असे. लाक्षणिक अर्थाने हे एक सहभोजन होते व यहोवासोबतच्या शांतीपूर्ण संबंधांचे द्योतक होते. नियमशास्त्रात देवाने असे सांगितले होते: “तुम्ही परमेश्‍वराप्रीत्यर्थ शांत्यर्पणाचा यज्ञ कराल तेव्हा तुम्ही मला मान्य व्हाल असा तो करा.” (लेवीय १९:५) तसे तर सगळेच इस्राएली लोक जन्मतःच एका समर्पित राष्ट्राचे सदस्य होते. पण जे आपल्या समर्पणाची जाणीव ठेवून ऐच्छिक अर्पणे द्यायचे ते यहोवाला ‘मान्य असे होत असत’ व तो त्यांना विपुल आशीर्वाद देत असे.—मलाखी ३:१०.

१०. यशया व मलाखीच्या काळात यहोवाने आपली नाराजी कशी व्यक्‍त केली?

१० पण इस्राएल राष्ट्राचे लोक वारंवार यहोवाशी अविश्‍वासूपणे वागले. संदेष्टा यशया याच्याद्वारे यहोवाने त्यांना म्हटले: “तू मला होमार्पण करण्यासाठी मेंढरे आणिली नाहीत; आणि मला यज्ञ करून माझे गौरव केले नाही. मी तुजवर अन्‍नार्पणासाठी सक्‍ती केली नाही.” (यशया ४३:२३) शिवाय, जी अर्पणे स्वेच्छेने व प्रेमापोटी दिलेली नसत ती यहोवाच्या नजरेत व्यर्थ होती. उदाहरणार्थ, यशयाच्या काळाच्या तीन शतकांनंतर, मलाखी संदेष्ट्याच्या काळात इस्राएली लोक लुळीपांगळी जनावरे यज्ञासाठी आणू लागले. तेव्हा, मलाखीने त्यांना स्पष्टपणे सांगितले: “सेनाधीश परमेश्‍वर म्हणतो, तुमच्यात मला मुळीच संतोष नाही; तुमच्या हातचे यज्ञार्पण मला मान्य नाही. . . . लुटून आणिलेला, लंगडा किंवा रोगी, असा पशु आणून तुम्ही अर्पिता; तुमच्या हातचे असले अर्पण मला पसंत होईल काय, असे परमेश्‍वर म्हणतो.”—मलाखी १:१०, १३; आमोस ५:२२.

समर्पित राष्ट्राला नाकारण्यात आले

११. इस्राएल राष्ट्राला कोणती संधी देण्यात आली होती?

११ इस्राएली लोकांना जेव्हा यहोवाला समर्पित असलेल्या एका राष्ट्राच्या रूपात संघटित करण्यात आले तेव्हा यहोवाने त्यांना असे आश्‍वासन दिले होते: “तुम्ही खरोखर माझी वाणी ऐकाल आणि माझा करार पाळाल तर सर्व लोकांपेक्षा माझा खास निधि व्हाल, कारण सर्व पृथ्वी माझी आहे; पण तुम्ही मला याजकराज्य, पवित्र राष्ट्र व्हाल.” (निर्गम १९:५, ६) देवाने ज्याच्याविषयी वचन दिले होते तो मशीहा या इस्राएली लोकांमधूनच येणार होता आणि देवाच्या राज्यसरकाराचे सदस्य बनण्याची पहिली संधी देखील त्यांनाच मिळणार होती. (उत्पत्ति २२:१७, १८; ४९:१०; २ शमुवेल ७:१२, १६; लूक १:३१-३३; रोमकर ९:४, ५) पण इस्राएल राष्ट्रातील बहुतेक लोक आपल्या समर्पणाला जागले नाहीत. (मत्तय २२:१४) त्यांनी मशीहाला धुतकारले आणि शेवटी त्याचा वध केला.—प्रेषितांची कृत्ये ७:५१-५३.

१२. येशूने केलेल्या कोणत्या विधानांवरून दिसून येते की यहोवाच्या समर्पित राष्ट्राच्या रूपात इस्राएलला नाकारण्यात आले होते?

१२ येशूने आपल्या मृत्यूच्या काही दिवसांआधी यहुदी धर्मपुढाऱ्‍यांना उद्देशून म्हटले: “जो दगड बांधणाऱ्‍यांनी नापसंत केला, तोच कोनशिला झाला; हे परमेश्‍वराकडून झाले, आणि ते आमच्या दृष्टीने आश्‍चर्यकारक आहे, असे शास्त्रात तुमच्या वाचण्यात कधी आले नाही काय? म्हणून मी तुम्हास सांगतो की, देवाचे राज्य तुम्हापासून काढून घेतले जाईल व जी प्रजा त्याचे फळ देईल तिला ते दिले जाईल.” (मत्तय २१:४२, ४३) एका समर्पित राष्ट्राच्या रूपात यहोवाने त्यांना नाकारले आहे हे दाखवण्याकरता येशूने त्यांना म्हटले: “यरूशलेमे, यरूशलेमे, संदेष्ट्यांचा घात करणाऱ्‍ये, व तुझ्याकडे पाठविलेल्यांस धोंडमार करणाऱ्‍ये! जशी कोंबडी आपली पिले पंखाखाली एकवटते, तसे तुझ्या मुलाबाळांना एकवटावयाची कितीदा तरी माझी इच्छा होती, पण तुमची इच्छा नव्हती! पाहा, तुमचे घर तुम्हावर सोडले आहे.”—मत्तय २३:३७, ३८.

एक नवे समर्पित राष्ट्र

१३. यिर्मयाच्या काळात यहोवाने काय भाकीत केले?

१३ संदेष्टा यिर्मया याच्या काळात, यहोवाने आपल्या लोकांच्या संदर्भात काहीतरी आगळेवेगळे भाकीत केले. याविषयी आपण असे वाचतो: “परमेश्‍वर म्हणतो, पाहा, असे दिवस येत आहेत की त्यात इस्राएलाचे घराणे व यहूदाचे घराणे यांच्याबरोबर मी नवा करार करीन; परमेश्‍वर म्हणतो मी त्यांच्या पूर्वजांचा हात धरून त्यांस मिसर देशातून बाहेर आणिले, तेव्हाच्या कराराप्रमाणे हा करार व्हावयाचा नाही; मी त्यांजबरोबर विवाह केला तरी तो माझा करार त्यांनी मोडिला. तर परमेश्‍वर म्हणतो, त्या दिवसानंतर इस्राएलाच्या घराण्याबरोबर जो करार मी करीन तो हा: मी आपले धर्मशास्त्र त्यांच्या अंतर्यामी ठेवीन; मी ते त्यांच्या हृदयपटलावर लिहीन; मी त्यांचा देव होईन व ते माझे लोक होतील.”—यिर्मया ३१:३१-३३.

१४. यहोवाचे नवे समर्पित राष्ट्र केव्हा व कोणत्या आधारावर अस्तित्वात आले? हे नवे राष्ट्र कोणते?

१४ सा.यु. ३३ साली येशू ख्रिस्ताचा मृत्यू झाला आणि त्याने मानवजातीकरता वाहिलेल्या आपल्या रक्‍ताची किंमत यहोवाला दिली तेव्हा या नव्या कराराचा पाया घालण्यात आला होता. (लूक २२:२०; इब्री लोकांस ९:१५, २४-२६) पण सा.यु. ३३ सालच्या पेन्टेकॉस्टच्या दिवशी जेव्हा पवित्र आत्मा ओतण्यात आला आणि एक नवे राष्ट्र, अर्थात ‘देवाचे इस्राएल’ जन्मास आले, त्या दिवसापासून खरे तर हा नवा करार अमलात आला. (गलतीकर ६:१६; रोमकर २:२८, २९; ९:६; ११:२५, २६) अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना लिहिताना, प्रेषित पेत्राने असे म्हटले: “तुम्ही तर ‘निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र,’ देवाचे स्वतःचे लोक असे आहां; ह्‍यासाठी की, ज्याने तुम्हांस अंधकारांतून काढून आपल्या अद्‌भुत प्रकाशात पाचारण केले ‘त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावे;’ ते तुम्ही पूर्वी लोक नव्हता, आता तर देवाचे लोक आहां.” (१ पेत्र २:९, १०) यहोवा व शारीरिक इस्राएल राष्ट्रामध्ये असलेला खास नातेसंबंध संपुष्टात आला होता. सा.यु. ३३ मध्ये यहोवाची कृपा दैहिक इस्राएल राष्ट्रावरून काढून घेण्यात आली आणि आत्मिक इस्राएलाला, अर्थात ख्रिस्ती मंडळीला देण्यात आली. हीच मशीही राज्याकरता ‘फळ देणारी प्रजा’ अथवा राष्ट्र होते.—मत्तय २१:४३.

वैयक्‍तिक समर्पण

१५. सा.यु. ३३ सालच्या पेन्टेकॉस्टच्या दिवशी पेत्राने आपल्या श्रोत्यांना कोणत्या प्रकारचा बाप्तिस्मा घेण्याचे प्रोत्साहन दिले?

१५ सा.यु. ३३ सालच्या पेन्टेकॉस्टनंतर प्रत्येक जणाला, मग तो यहुदी असो वा नसो, त्याला आपले जीवन देवाला वैयक्‍तिकरित्या समर्पित करून “पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा” घेणे आवश्‍यक होते. * (मत्तय २८:१९) पेन्टेकॉस्टच्या दिवशी पेत्राने अनुकूल मनोवृत्तीच्या यहुद्यांना व यहुदी मतानुसाऱ्‍यांना म्हटले: “पश्‍चात्ताप करा आणि तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या; म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल.” (प्रेषितांची कृत्ये २:३८) बाप्तिस्मा घेऊन या यहुद्यांना व यहुदी मतानुसाऱ्‍यांना हे सूचित करणे आवश्‍यक होते की त्यांनी आपले जीवन यहोवाला समर्पित केले आहे. इतकेच नव्हे, येशूच्याच माध्यमाने यहोवा त्यांच्या पापांची क्षमा करेल हे देखील त्यांना बाप्तिस्मा घेण्याद्वारे कबूल करायचे होते. येशू हा यहोवाने नियुक्‍त केलेला मुख्य याजक, नेता आणि ख्रिस्ती मंडळीचे मस्तक आहे हे त्यांनी कबूल करणे आवश्‍यक होते.—कलस्सैकर १:१३, १४, १८.

१६. पौलाच्या काळात, यहुदी व गैरयहुदी यांच्यापैकी अनुकूल मनोवृत्तीचे लोक कशाप्रकारे आत्मिक इस्राएलचे भाग बनले?

१६ कित्येक वर्षांनंतर प्रेषित पौलाने म्हटले: “पहिल्याने दिमिष्कातील लोकांना व यरुशलेमेत अवघ्या यहूदीया देशात व परराष्ट्रीय लोकात मी उपदेश करीत आलो की, पश्‍चात्ताप करा आणि पश्‍चात्तापास शोभतील अशी कृत्ये करून देवाकडे वळा.” (प्रेषितांची कृत्ये २६:२०) पौलाने यहुदी व गैरयहुदी, दोन्ही प्रकारच्या लोकांना ही खात्री पटवून दिली की येशूच ख्रिस्त किंवा मशीहा आहे आणि त्यानंतर त्याने त्यांना समर्पण करून बाप्तिस्मा घेण्याकरता साहाय्य केले. (प्रेषितांची कृत्ये १६:१४, १५, ३१-३३; १७:३, ४; १८:८) देवाकडे वळून हे नवीन शिष्य आत्मिक इस्राएलचे सदस्य बनले.

१७. कोणते काम संपत आले आहे आणि दुसरे कोणते कार्य वेगाने केले जात आहे?

१७ आज, उरलेल्या आत्मिक इस्राएली लोकांवर शेवटला शिक्का मारण्याचे काम संपत आले आहे. हे संपल्यावर, ‘मोठ्या संकटाच्या’ नाशाचे वारे धरून ठेवणाऱ्‍या ‘चार देवदूतांना’ ते सोडून देण्याची आज्ञा दिली जाईल. त्यादरम्यानच्या काळात, पृथ्वीवर सर्वकाळ जगण्याची आशा असलेल्या ‘मोठ्या लोकसमुदायाच्या’ सदस्यांना एकत्रित करण्याचे कार्य अतिशय वेगाने चालले आहे. ही ‘दुसरी मेंढरे’ स्वेच्छेने ‘कोकऱ्‍याच्या रक्‍तावर’ विश्‍वास ठेवतात आणि यहोवाला केलेले समर्पण बाप्तिस्मा घेऊन जाहीर करतात. (प्रकटीकरण ७:१-४, ९-१५; २२:१७; योहान १०:१६; मत्तय २८:१९, २०) त्यांमध्ये अनेक लहान मुले देखील आहेत, ज्यांचे आईवडील यहोवाचे साक्षीदार आहेत. तुम्ही या लहान मुलांपैकी एक आहात का? मग, पुढचा लेख खास तुमच्यासाठीच आहे. (w०६ ७/१)

[तळटीप]

^ परि. 15 टेहळणी बुरूज मे १, २००३, पृष्ठे ३०-१ कृपया पाहावे.

उजळणी

• इस्राएली मुलांनी यहोवाला वैयक्‍तिकरित्या आपले जीवन समर्पित करणे का आवश्‍यक नव्हते?

• इस्राएली लोक आपल्या समर्पणाचे वचन कशाप्रकारे पूर्ण करू शकत होते?

• एका समर्पित राष्ट्राच्या रूपात यहोवाने इस्राएलला का नाकारले?

• सा.यु. ३३ सालच्या पेन्टेकॉस्टनंतर यहुदी व गैरयहुदी या दोन्ही प्रकारच्या लोकांनी आत्मिक इस्राएलचा भाग बनण्याकरता काय करणे आवश्‍यक होते?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२२ पानांवरील चित्र]

इस्राएली मुले जन्मतःच देवाच्या निवडलेल्या राष्ट्राचे सदस्य बनायचे

[२५ पानांवरील चित्र]

प्रत्येक इस्राएली व्यक्‍तीला देवाची सेवा करण्याचा निर्णय स्वेच्छेने घ्यावा लागत होता

[२५ पानांवरील चित्र]

ऐच्छिक अर्पणांमुळे इस्राएली लोकांना यहोवाबद्दल आपले प्रेम व्यक्‍त करण्याची संधी मिळत असे

[२६ पानांवरील चित्र]

सा.यु. ३३ सालच्या पेन्टकॉस्टनंतर ख्रिस्ताच्या अनुयायांना वैयक्‍तिकरित्या देवाला आपले जीवन समर्पित करून हे बाप्तिस्मा घेण्याद्वारे जाहीर करणे आवश्‍यक होते