व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

होय, तुम्ही आनंद मिळवू शकता

होय, तुम्ही आनंद मिळवू शकता

होय, तुम्ही आनंद मिळवू शकता

खरा, कायमचा आनंद मिळणे कधीकधी कठीण असू शकते. कारण, पुष्कळ लोक चुकीच्या मार्गांनी आनंद मिळवण्याचा आटापिटा करत असतात. पण त्यांना जर, योग्य दिशा दाखवणारा एक भरवसालायक व खात्रीशीर मित्र असेल तर त्यांची निराशा होणार नाही.

आपल्याला हवे असलेले मार्गदर्शन बायबलमध्ये आहे. त्यातल्या केवळ एका पुस्तकाचा विचार करा. त्या पुस्तकाचे नाव आहे स्तोत्रसंहिता. हे पुस्तक म्हणजे, यहोवा देवासाठी गायिलेली १५० पवित्र गीतांचा संग्रह आहे. यांपैकी निम्मी गीते प्राचीन इस्राएलच्या राजा दावीदाने रचली आहेत. पण, या पुस्तकाचे लेखक कोण होते हे जाणण्यापेक्षा, ते मानवजातीचा सर्वात महान मित्र यहोवा देव याच्या प्रेरणेने लिहिण्यात आले होते, हे जाणणे जास्त महत्त्वाचे आहे. त्यात आपल्या भल्यासाठी ईश्‍वरी मार्गदर्शन दिले आहे व आनंद प्राप्त करण्याच्या मार्गाविषयी सांगितले आहे, याची आपण खात्री बाळगू शकतो.

देवाबरोबर सुदृढ नातेसंबंध जोडल्यामुळे आनंद मिळतो, याची स्तोत्रसंहिता पुस्तकाच्या लेखकांना खात्री होती. “जो पुरुष यहोवाचे भय धरतो . . . तो सुखी आहे!” असे स्तोत्रकर्त्याने लिहिले. (स्तोत्र ११२:१, पं.र.भा.) “ज्या लोकांचा देव यहोवा आहे” त्यांना मिळणारा आनंद, कोणताही मानवी नातेसंबंध, कोणतीही भौतिक संपत्ती, कोणतीही व्यक्‍तिगत साध्यता यांतून मिळत नाही. (स्तोत्र १४४:१५, पं.र.भा.) आधुनिक दिवसांतील देवाच्या सेवकांची अनेक उदाहरणे याची ग्वाही देतात.

चाळीशीत असलेल्या सुसॅनेचे एक उदाहरण आहे. * ती म्हणते: “आज, पुष्कळ लोक समान ध्येये साध्य करण्यासाठी किंवा समान कार्यांत भाग घेण्यासाठी विशिष्ट गटांत सामील होतात. परंतु, गटातील प्रत्येक व्यक्‍तीला ते फार क्वचित आपला मित्र समजतात. यहोवाच्या लोकांमधली गोष्ट निराळी आहे. यहोवावर आपले प्रेम असल्यामुळे आपण एकमेकांबद्दल आपुलकी दाखवण्यास प्रवृत्त होतो. देवाच्या लोकांच्या संगतीत असताना मग आपण कोठेही असलो तरी, बिनधास्त असतो. आपल्यात असलेल्या या एकीमुळे आपल्या जीवनाचा दर्जा खूप सुधारतो. कोण असा दावा करू शकेल, की त्यांचे मित्र पूर्णपणे भिन्‍न सामाजिक गटाचे, पार्श्‍वभूमीचे आणि विविध राष्ट्रांचे आहेत? मी अगदी मनापासून म्हणू शकते, की यहोवाच्या लोकांपैकी एक असल्यामुळे मी खऱ्‍या अर्थाने आनंदी आहे.”

मारीचा जन्म स्कॉटलंडमध्ये झाला होता. आनंद मिळण्यासाठी यहोवाबरोबर घनिष्ठ नातेसंबंध जोडणे महत्त्वाचे आहे, हे तिनेही जाणले. ती म्हणते: “सत्य शिकण्याआधी मला भीतीदायक चित्रपट पाहायला खूप आवडायचे. पण रात्रीची मी हातात क्रॉस घेऊन झोपायचे तेव्हा कुठं मला झोप लागायची. पुष्कळ भयपटात भुतं दाखवली जातात. मी जर हातात क्रॉस ठेवला तर ते माझ्या जवळ फिरकणारही नाहीत, असा माझा ग्रह. पण सत्य शिकल्यानंतर मी असे चित्रपट पाहायचं सोडून दिलं. यहोवाबरोबर नातेसंबंध जोडल्यामुळे मी बिनधास्त झोपू लागले. भुतांपेक्षा शक्‍तिमान असलेल्या देवाची मी सेवा करतेय हा आनंद मला मिळाला होता.”

यहोवावर भरवसा ठेवल्यामुळे आनंद मिळतो

सृष्टीकर्त्याचा सर्वसमर्थपणा आणि त्याची अमर्याद बुद्धी याबद्दल शंका घेण्याचे आपल्याला काही कारण नाही. आपण डोळे झाकून यहोवावर भरवसा ठेवू शकतो आणि त्याच्या आश्रयाला जाऊ शकतो, अशी पक्की खात्री असल्यामुळे दावीदाने असे लिहिले: “जो पुरुष यहोवाला आपला भरवसा करतो, . . . तो सुखी आहे.”—स्तोत्र ४०:४, पं.र.भा.

मारिया म्हणाली: “स्पेन आणि इतर ठिकाणी मला असा अनुभव आला आहे, की आपण जेव्हा यहोवाच्या मार्गाप्रमाणे गोष्टी करतो, मग आपल्या भावना आणि आपले विचार, काहीतरी दुसरं करायला आपल्याला सांगत असले तरीसुद्धा, याचे परिणाम उत्तम असतात. यामुळे आपल्यालाच आनंद मिळतो कारण, यहोवाचे मार्ग नेहमीच उत्तम आहेत.”

आन्द्रियास नावाच्या एका ख्रिस्ती वडिलांनी अनेक युरोपीय देशांत सेवा केली आहे. आपण यहोवावर भरवसा ठेवू शकतो, हे त्यांनी स्वतःच्या अनुभवावरून जाणले आहे. ते म्हणाले: “मी तरुण होतो तेव्हा माझ्या मोठ्या भावानं मला, भरपूर पैसा मिळेल अशी नोकरी करण्यासाठी खूप गळ घातली. तो सत्यात नव्हता. मी जेव्हा पूर्ण-वेळेची सेवा निवडली आणि निवृत्ती योजनांवर भरवसा ठेवून त्यांच्यावर अवलंबून राहिलो नाही म्हणून तो माझ्यावर खूप नाराज झाला. माझ्या पूर्ण वेळेच्या सेवेत मला कोणत्याही गोष्टीची कमी भासली नाही. मी अशा आशीर्वादांचा आनंद लुटला आहे, की ज्यांचे इतर लोक केवळ स्वप्न पाहू शकतात.”

१९९३ साली, फेलिक्स यांना जर्मनी, सेल्टर्स येथील यहोवाच्या साक्षीदारांच्या शाखा दफ्तराच्या विस्ताराच्या वेळी बांधकाम प्रकल्पावर काम करण्याचे आमंत्रण मिळाले होते. काम संपल्यानंतर त्यांना तेथील बेथेल कुटुंबाचा कायमचा सदस्य बनण्याचे आमंत्रण मिळाले. त्यांची प्रतिक्रिया काय होती? “मी हे आमंत्रण स्वीकारलं खरं, पण माझ्या मनात पुष्कळ शंका होत्या. आता मला इथं येऊन जवळजवळ दहा वर्षं झाली आहेत आणि माझी खात्री पटली आहे, की यहोवानं माझ्या प्रार्थना ऐकल्या. माझ्यासाठी काय चांगलं आहे हे त्याला चांगलं माहीत आहे. त्याच्यावर पूर्ण भरवसा ठेवून व त्याचं मार्गदर्शन स्वीकारून, माझ्याबद्दल त्याची काय इच्छा आहे हे त्यानं मला दाखवण्याची संधी मी त्याला देतो.”

आधी ज्यांचा उल्लेख करण्यात आला होता त्या सुसॅनेला पूर्ण वेळेची सेवा करायची इच्छा होती. तिला पायनियर व्हायचे होते. पण तिला अर्ध वेळ नोकरी मिळत नव्हती. तिने एक वर्ष प्रयत्न केल्यानंतर यहोवावर भरवसा ठेवून कार्य केले. ती म्हणते: “मी सामान्य पायनियरींगचा अर्ज भरून दिला. मी माझा एक महिन्याचा नेहमीचा खर्च निघेल इतका पैसा साठवला होता. तो महिना खूप चमत्कारिक होता! माझ्या सेवेमुळे मला खूप आनंद मिळाला. पण एकापाठोपाठ एक अशा माझ्या अनेक इंटरव्हू अपयशी ठरल्या. पण यहोवानं वचन दिल्याप्रमाणे त्यानं मला सोडलं नाही. महिन्याच्या अगदी शेवटल्या दिवशी मला एक नोकरी मिळाली. आता माझी खात्री पटली, की मी यहोवावर खरोखरच भरवसा ठेवू शकते! पूर्ण वेळ सेवेतल्या या माझ्या पहिल्या अनुभवानं माझं जीवन आशीर्वादित आणि आनंदी झालं आहे.”

देवाच्या तत्त्वांवर आधारित सल्ला स्वीकारल्याने आनंदात भर

राजा दावीदाने काही गंभीर चुका केल्या. कधीकधी त्याला सुज्ञ सल्ल्याची गरज होती. दावीदाने जसा सल्ला आणि मार्गदर्शन स्वीकारले तसे आपणही स्वीकारण्यास तयार आहोत का?

फ्रान्समधील ऐडाच्या हातून एकदा एक गंभीर पाप घडले. ती त्याविषयी आठवून सांगते: “मला कसेही करून यहोवासोबत पुन्हा नातेसंबंध जोडायचा होता, दुसऱ्‍या कशाचीच मला चिंता नव्हती.” मदतीसाठी ती ख्रिस्ती वडिलांना जाऊन भेटली. पूर्ण वेळेच्या सेवेत १४ वर्षे सेवा केल्यानंतर ती आता असे म्हणते: “यहोवानं मला क्षमा केली याबद्दल मी त्याची किती आभारी आहे.”

देवाकडून मिळत असलेल्या सल्ल्याचे पालन केल्यास आपण पहिली गोष्ट म्हणजे चूक करण्याचे टाळू. ज्यूडीथ म्हणते: “वयाच्या २० वर्षी मी, माझ्याबरोबर काम करणाऱ्‍या एका जर्मन मनुष्याच्या प्रेमात पडले. माझ्यावर छाप पाडण्याचा तो खूप प्रयत्न करीत असे. तो चांगल्या घरातला होता. शिवाय बिझनेसमध्येही त्यानं चांगला जम बसवला होता. पण त्याचं लग्न झालेलं होतं! माझ्यासमोर दोन निवडी होत्या—यहोवाच्या आज्ञांचे पालन करायचे की पूर्णपणे त्याच्याकडे पाठ फिरवायची. मी माझ्या आईवडिलांना ही गोष्ट सांगितली. माझ्या वडिलांनी कसलेही आढेवेढे न घेता मला स्पष्ट शब्दांत यहोवा माझ्याकडून काय अपेक्षा करतो ते सांगितलं. त्यांचा हा स्पष्टवक्‍तेपणाच मला हवा होता! इतकं सर्व होऊनही माझं मन अजूनही त्या माणसातच अडकलं होतं. कित्येक आठवडे रोज संध्याकाळची माझी आई माझ्याबरोबर, देवाच्या नियमांचं पालन करणं महत्त्वाचं व जीवनरक्षक का आहे यावर बोलायची. हळूहळू माझं हृदय यहोवाकडे वळू लागलं. त्याबद्दल मी खूप आभारी आहे. यहोवाकडून ताडन मिळाल्यामुळे व प्रशिक्षण मिळाल्यामुळे आज मी खऱ्‍या अर्थानं आनंदी आहे. मला पूर्ण वेळेच्या सेवेत अनेक प्रतिफलदायी वर्षं लाभली. शिवाय, मला एक उत्तम ख्रिस्ती जोडीदारही मिळाला जो माझ्यावर आणि यहोवावर प्रेम करतो.”

अशाप्रकारचे अनुभव दावीदाच्या या शब्दांना पुष्टी देतात: “ज्याच्या अपराधाची क्षमा केलेली आहे, ज्याचे पाप झाकलेले आहे तो सुखी आहे. ज्याच्याकडे यहोवा अन्याय मोजीत नाही, . . . तो मनुष्य सुखी आहे.”—स्तोत्र ३२:१, २, पं.र.भा.

इतरांना विचारात घेतल्यामुळे आनंद मिळतो

“जो दारिद्र्‌याची चिंता करतो तो सुखी आहे,” असे दावीदाने लिहिले. तो पुढे असे लिहितो: “वाईट दिवशी यहोवा त्याला मुक्‍त करील. यहोवा त्याला राखील आणि वाचवील; तो पृथ्वीत आशीर्वादित होईल.” (स्तोत्र ४१:१, २, पं.र.भा.) मफीबोशेथ हा दावीदाचा जीवलग मित्र योनाथान याचा पांगळा मुलगा होता. दावीदाने त्याच्या बाबतीत जो प्रेमळपणा दाखवला तशाप्रकारची योग्य मनोवृत्ती आपण गरिबांबद्दल दाखवली पाहिजे.—२ शमुवेल ९:१-१३.

सत्तेचाळीस वर्षांपासून मिशनरी म्हणून सेवा करणाऱ्‍या मारलाईजला, आफ्रिका, आशिया आणि पूर्व युरोपमध्ये चाललेल्या घातक दंगलींमधून पळून आलेल्या विस्थापित लोकांना प्रचार करण्याची खास संधी मिळाली आहे. त्या म्हणतात: “त्यांना वेगवेगळ्या समस्या असतात. त्यांना परकीय समजले जाते आणि त्यामुळे त्यांना दुजाभाव दाखवला जातो. अशा लोकांना मदत केल्याने खरोखरच आनंद मिळतो.”

चाळीशीत असलेली मरीना लिहिते: “मी अविवाहित आहे, पण इतर जण आपल्याला मदत करायला तयार आहेत, हे जाणणे खरोखरच खूप सांत्वन देणारे आहे. म्हणून मग मीही लोकांना टेलिफोनने किंवा पत्र लिहून उत्तेजन द्यायचा प्रयत्न करते. पुष्कळ जण मग मला याबद्दल आपले आभार व्यक्‍त करतात. इतरांना मदत केल्याने मला आनंद मिळतो.”

विशीत असलेला डिमिटर म्हणतो: “माझ्या आईनं एकटीनं मला लहानाचं मोठं केलं. मी लहान होतो तेव्हा आमच्या मंडळीचे पुस्तक अभ्यास पर्यवेक्षक मला दर आठवडी आपल्यासोबत सेवेत न्यायचे. त्यांच्या अविरत प्रयत्नांबद्दल मी त्यांचा आभारी आहे. मला उत्तेजन देणं, हे प्रत्येक वेळा सोपं नव्हतं.” डिमिटरला मिळालेल्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्‍त करण्यासाठी आता तो स्वतः इतरांना मदत करतो. तो म्हणतो: “मी महिन्यातून एकदा तरी माझ्याबरोबर सेवेत एखाद्या लहान मुलाला अथवा वृद्ध व्यक्‍तीला न्यायचा प्रयत्न करतो.”

स्तोत्रसंहिता पुस्तकात आनंद देणाऱ्‍या इतरही गोष्टींचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यापैकी एक गोष्ट म्हणजे, स्वतःच्या बळावर अवलंबून राहण्यापेक्षा यहोवाच्या शक्‍तीवर अवलंबून राहण्याचे महत्त्व: “ज्याचे सामर्थ्य [यहोवात] आहे, . . . तो मनुष्य सुखी आहे.”—स्तोत्र ८४:५, पं.र.भा.

कोरिनाने हे स्वतः अनुभवले. ती अशा देशांत राहायला गेली जिथे, ख्रिस्ती सेवेची खूप गरज होती. “माझ्यासाठी सर्व काही नवीन होतं. नवीन भाषा, नवीन संस्कृती, विचार करायची वेगळी पद्धत. मला वाटलं, की मी कुठल्या तरी दुसऱ्‍याच ग्रहावर आले होते. या अनोळख्या लोकांना मला प्रचार करायचा आहे, या विचारानंच मला गुदमरल्यासारखं वाटू लागलं. मी मदतीसाठी यहोवाला प्रार्थना केली. केवळ त्याच्या शक्‍तीनंच मी एका अनोळख्या क्षेत्रात संपूर्ण दिवस प्रचार करू शकले. हळूहळू मला याची सवय झाली. मी अनेक बायबल अभ्यास सुरू केले. या अनुभवातून मला अजूनही फायदा होतोय. मी एक गोष्ट शिकले. ती ही, की यहोवाच्या शक्‍तीनं आपण डोंगरासारख्या वाटणाऱ्‍या कोणत्याही समस्येला चीत करू शकतो.”

होय, विविध गोष्टींतून आपण आनंद मिळवू शकतो. यहोवाबरोबर आणि त्याच्या लोकांबरोबर मैत्रीसंबंध जोडल्याने, त्याच्यावर पूर्ण भरवसा ठेवल्याने, त्याचा सल्ला स्वीकारल्याने व इतरांबद्दल विचारीपणा दाखवल्याने आपण आनंद मिळवू शकतो. यहोवाच्या मार्गांत चालल्यामुळे व त्याच्या नियमांचे पालन केल्यामुळे आपण त्याच्या पसंतीची पावती आनंदाने मिळवू शकतो.—स्तोत्र ८९:१५; १०६:३; ११२:१; १२८:१, २.  (w०६ ६/१५)

[तळटीप]

^ परि. 5 काही नावे बदलण्यात आली आहेत.

[८ पानांवरील चित्र]

मारिया

[९ पानांवरील चित्र]

मारी

[९ पानांवरील चित्र]

सुसॅने व आन्द्रियास

[११ पानांवरील चित्र]

कोरिना

[११ पानांवरील चित्र]

डिमिटर