व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

‘कुरकुर करू नका’

‘कुरकुर करू नका’

‘कुरकुर करू नका’

“जे काही तुम्ही कराल ते कुरकुर . . . न करिता करा.”—फिलिप्पैकर २:१४.

१, २. फिलिप्पै व करिंथमधील ख्रिश्‍चनांना पौलाने कोणता सल्ला दिला व का?

 पहिल्या शतकात, फिलिप्पै मधील ख्रिस्ती मंडळीला लिहिलेल्या ईश्‍वरप्रेरित पत्रात प्रेषित पौलाने बंधूभगिनींची खूप प्रशंसा केली. त्या शहरात राहणाऱ्‍या आपल्या सहविश्‍वासू बंधूभगिनींची, त्यांच्या उदार व आवेशी मनोवृत्तीबद्दल त्याने तारीफ केली. त्यांची उत्तम कार्ये पाहून त्याने आनंद व्यक्‍त केला. पण, पौलाने त्यांना एका गोष्टीची आठवण करून दिली. तो म्हणाला: “जे काही तुम्ही कराल ते कुरकुर . . . न करिता करा.” (फिलिप्पैकर २:१४) पण, प्रेषित पौलाला हा सल्ला देण्याची गरज का भासली?

कुरकुर करण्याच्या मनोवृत्तीचा काय परिणाम होऊ शकतो, हे पौलाला माहीत होते. काही वर्षांपूर्वी त्याने करिंथ येथील मंडळीला, कुरकुर करण्याची वृत्ती घातक ठरू शकते, अशी आठवण करून दिली होती. इस्राएल लोक रानात होते तेव्हा त्यांनी अनेकदा यहोवाचा क्रोध भडकवला, याकडे त्याने त्यांचे लक्ष वेधले. इस्राएल लोकांनी यहोवाचा क्रोध कसा भडकवला होता? घातक गोष्टींची मनिषा बाळगण्याद्वारे, मूर्तिपूजा व जारकर्म करण्याद्वारे, यहोवाची परीक्षा पाहण्याद्वारे व कुरकुर करण्याद्वारे. या उदाहरणांतून धडा शिकण्याचे उत्तेजन पौलाने करिंथकरांना दिले. त्याने असे लिहिले: “त्यांच्यापैकी कित्येकांनी कुरकुर केली आणि ते संहारकर्त्याकडून नाश पावले, तेव्हा तुम्ही कुरकुर करू नका.”—१ करिंथकर १०:६-११.

३. कुरकुर करण्याची मनोवृत्ती, यावर आज आपण गंभीरपणे विचार का केला पाहिजे?

यहोवाचे आधुनिक दिवसांतील सेवक या नात्याने आपणही फिलिप्पै मंडळीतील बंधूभगिनींसारखी मनोवृत्ती दाखवतो. आपण आवेशाने सत्कार्ये करतो. शिवाय, आपले एकमेकांवर प्रेम आहे. (योहान १३:३४, ३५) परंतु गतकाळात देवाच्या लोकांनी कुरकुर केल्यामुळे त्यांना वाईट परिणाम भोगावे लागले. या लोकांचे वाईट उदाहरण लक्षात ठेवून आपण पुढील सल्ल्याकडे लक्ष दिले पाहिजे: “जे काही तुम्ही कराल ते कुरकुर . . . न करिता करा.” पण आधी आपण, कुरकुर करण्याविषयी शास्त्रवचनांत उल्लेख करण्यात आलेल्या उदाहरणांचा विचार करू या. मग, कुरकुर केल्यामुळे जे हानीकारक परिणाम होतात ते टाळण्यासाठी आपण कोणकोणत्या गोष्टी करू शकतो, ते पाहू या.

दुष्ट मंडळी यहोवाविरुद्ध कुरकुर करते

४. इस्राएली लोक रानांत कोणत्या गोष्टीवरून कुरकुर करत होते?

‘कुरकुर करणे, पुटपुटणे, तक्रार करणे,’ असा अर्थ असणारा इब्री शब्द बायबलमध्ये, इस्राएली लोक ४० वर्षे रानांत असताना घडलेल्या घटनांचे वर्णन करताना वापरण्यात आला आहे. अनेकदा, इस्राएल लोकांनी, त्यांच्यावर आलेल्या परिस्थितीबद्दल कुरकुर करून नाराजी व्यक्‍त केली. जसे की, ईजिप्तच्या दास्यत्वातून त्यांची सुटका होऊन काही आठवडेच झाले होते, तेव्हा “इस्राएल लोकांच्या सर्व मंडळीने मोशे व अहरोन ह्‍यांच्यासंबंधाने कुरकुर केली.” खाण्यापिण्याच्या बाबतीत त्यांची कुरकुर चालली होती. ते म्हणत होते: “आम्ही मिसर देशात मांसाच्या भांड्याभोवती बसून भरपूर जेवीत होतो तेव्हा आम्हाला परमेश्‍वराच्या हातून मरण आले असते तर पुरवले असते; पण ह्‍या सर्व समुदायाला उपासाने मारावे म्हणून तुम्ही आम्हाला ह्‍या रानात आणिले आहे.”—निर्गम १६:१-३.

५. इस्राएली खरे तर कोणाविरुद्ध कुरकुर करत होते?

खरे तर, रानात असताना इस्राएल लोकांना ज्या ज्या गोष्टींची गरज होती त्या त्या गोष्टी यहोवाने त्यांना पुरवल्या होत्या. त्याने प्रेमळपणे त्यांना अन्‍न, पाणी दिले. त्यामुळे रानांत उपासमारीने त्यांचा मृत्यू होणे शक्य नव्हते. परंतु तरीसुद्धा ते असंतुष्ट झाले. आपल्यावर आलेल्या कठीण परिस्थितीचा आवाचा बावा करून ते कुरकुर करू लागले. ते मोशे व अहरोनाविरुद्ध तक्रार करत असले तरी, यहोवाच्या दृष्टीत ते, खुद्द त्याच्याविरुद्ध नाराजी व्यक्‍त करत होते. त्यामुळे मोशेने इस्राएल लोकांना सांगितले: “तुम्ही परमेश्‍वराविरूद्ध जी कुरकुर करीत आहा ती त्याने ऐकली आहे; आम्ही कोण? तुमचे कुरकुरणे आम्हाविरूद्ध नव्हे तर परमेश्‍वराविरूद्ध आहे.”—निर्गम १६:४-८.

६, ७. गणना १४:१-३ मध्ये दाखवल्यानुसार, इस्राएल लोकांची मनोवृत्ती कशी बदलली होती?

या गोष्टीला जास्त दिवसही झाले नव्हते. इस्राएलांची पुन्हा कुरकुर सुरू झाली. मोशेने वचनयुक्‍त देशाची पाहणी करण्यासाठी १२ हेरांना पाठवले होते. यांपैकी दहा जणांनी वाईट बातमी आणली. परिणाम? “सर्व इस्राएल लोक मोशे आणि अहरोन ह्‍यांच्याविरुद्ध कुरकुर करु लागले; सर्व मंडळी त्यांना म्हणाली, आम्ही मिसर देशात मेलो असतो तर बरे झाले असते किंवा ह्‍याच रानात मेलो असतो तरी बरे झाले असते. तरवारीने आमचा निःपात व्हावा म्हणून परमेश्‍वर आम्हाला ह्‍या देशात [कनानात] का नेत आहे? आमच्या बायकामुलांची लूट होईल! आम्ही मिसर देशात परत जावे हेच बरे नव्हे काय?”—गणना १४:१-३.

इस्राएल लोकांची मनोवृत्ती किती बदलली होती! ईजिप्तमधून व तांबड्या समुद्रातून सुटका झाल्यानंतर याच इस्राएलांनी आनंदाने यहोवाची स्तुती-गीते गाऊन आभार व्यक्‍त केले होते. (निर्गम १५:१-२१) पण आता जेव्हा त्यांच्यावर रानात कसल्याही सुखसोयींविना राहायची पाळी आली होती व कनानी लोकांची त्यांना भीती वाटू लागली तेव्हा ते लगेच कुरकुर करू लागले. आभारी मनोवृत्तीच्या ऐवजी त्यांची तक्रारी वृत्ती झाली होती. आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याबद्दल यहोवाचे आभार मानण्याऐवजी, ते यहोवाला दोष देत होते. त्यांच्यामते यहोवा त्यांच्याशी रास्तपणे वागत नव्हता. कुरकुर करण्याद्वारे त्यांनी, यहोवाने त्यांच्यासाठी केलेल्या सर्व गोष्टींबद्दल घोर कृतघ्नता दाखवली. म्हणूनच तर यहोवा त्यांच्याविषयी असे म्हणाला: “ही दुष्ट मंडळी कोठवर माझ्याविरुद्ध कुरकुर करीत राहणार?”—गणना १४:२७; २१:५.

पहिल्या शतकातील कुरकुर

८, ९. ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांत उल्लेखण्यात आलेली कुरकुरीची उदाहरणे सांगा.

कुरकुर करण्याच्या मनोवृत्तीची वरील उदाहरणे अशा लोकांची आहेत ज्यांनी आपली नाराजी मोठ्याने बोलून दाखवली. पण येशू ख्रिस्त जेव्हा सा.यु. ३२ मध्ये जेरुसलेममध्ये मंडपाच्या सणासाठी आला होता तेव्हा ‘लोकसमुदायात त्याच्याविषयी बरीच कुजबुज सुरु झाली.’ (योहान ७:१२, १३, ३२) ते आपापसात हळू आवाजात त्याच्याविषयी कुजबुजत होते. काही जण त्याला चांगला मनुष्य म्हणत होते तर काही जण दुष्ट म्हणत होते.

दुसऱ्‍या एका प्रसंगी, लेवी अर्थात मत्तय जकातदाराने येशूला आणि त्याच्या शिष्यांना एका मेजवानीसाठी घरी बोलवले होते. “तेव्हा परुशी व त्यांच्यातील शास्री हे त्याच्या शिष्यांच्या विरूद्ध कुरकुर करीत त्यांना म्हणाले, जकातदार व पापी लोक ह्‍यांच्याबरोबर तुम्ही का खाता पिता?” (लूक ५:२७-३०) त्यानंतर, गालीलमध्ये “मी स्वर्गातून उतरलेली भाकर आहे, असे [येशू] म्हणाला म्हणून यहूदी त्याच्याविषयी कुरकुर करु लागले.” येशूच्या काही अनुयायांना देखील येशूचे बोलणे रुचले नाही. तेही कुरकुर करू लागले.—योहान ६:४१, ६०, ६१.

१०, ११. हेल्लेणी यहुदी कुरकुर का करत होते, आणि यांच्या तक्रारीकडे ज्याप्रकारे लक्ष देण्यात आले, त्याचा ख्रिस्ती वडिलांना लाभ कसा होऊ शकतो?

१० पण, सा.यु. ३३ सालच्या पेन्टेकॉस्टनंतर, कुरकुरीची एक जी घटना घडली तिचा परिणाम मात्र चांगला निघाला. नव्याने मतपरिवर्तन झालेले अनेक शिष्य जे इस्राएलच्या बाहेर राहत होते ते यहुदियातील सहविश्‍वासू बंधूभगिनींच्या आदरातिथ्याचा आनंद लुटत होते. पण, जी अन्‍नसामग्री उपलब्ध होती तिच्या वाटपाबाबतीत कुरकुर सुरू झाली. याविषयीच्या अहवालात असे म्हटले आहे: “हेल्लेणी यहूद्यांची इब्री लोकांविरुद्ध कुरकुर सुरू झाली; कारण रोजच्या वाटणीत त्यांच्या विधवांची उपेक्षा होत असे.”—प्रेषितांची कृत्ये ६:१.

११ कुरकुर करणारे हे लोक रानात असलेल्या इस्राएली लोकांसारखे नव्हते. हेल्लेणी यहुदी, स्वार्थीपणे त्यांच्यावर आलेल्या परिस्थितीवर नाराजी व्यक्‍त करत नव्हते. ते स्वार्थी नव्हते. तर, काही विधवांच्या गरजा पुरवल्या जात नव्हत्या, या गोष्टीकडे ते लक्ष वेधत होते. शिवाय, जे कुरकुर करत होते ते गोंधळ माजवणारे नव्हते किंवा त्यांनी यहोवाविरुद्ध तक्रार केली नाही. त्यांनी प्रेषितांकडे तक्रार केली. आणि प्रेषितांनी लगेच कार्यहालचाल केली. कारण विधवांकडे खरोखरच दुर्लक्ष होत होते. आजच्या ख्रिस्ती वडिलांसाठी प्रेषितांनी खरोखरच किती उत्तम उदाहरण मांडले! हे आध्यात्मिक मेंढपाळ, ‘गरिबांची आरोळी ऐकून कानांत बोटे घालत नाहीत.’—नीतिसूत्रे २१:१३; प्रेषितांची कृत्ये ६:२-६.

कुरकुरीच्या विनाशकारक प्रभावापासून सावधान

१२, १३. (क) कुरकुर करण्याच्या प्रवृत्तीचे परिणाम कसे असू शकतात हे समजण्यासाठी उदाहरण द्या. (ख) कोणकोणत्या कारणांमुळे एखादी व्यक्‍ती कुरकुर करेल?

१२ आपण आता चर्चा केलेल्या शास्त्रवचनांतील बहुतेक उदाहरणांतून दिसून आले, की कुरकुर केल्यामुळे गतकाळातील देवाच्या लोकांना हानीकारक परिणाम भोगावे लागले. यास्तव, कुरकुर करण्याच्या मनोवृत्तीचा आज विनाशकारक परिणाम होऊ शकतो, यावर आपण गंभीरपणे विचार करणे उचित आहे. कुरकुर करण्याची मनोवृत्ती विनाशकारक कशी ठरू शकते हे समजण्यासाठी पुढील उदाहरणावर विचार करा. पुष्कळ धातू असे असतात ज्यांवर गंज चढत असतो. एखाद्या धातूवर जेव्हा नुकतीच गंज चढायला सुरुवात होते तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले तर तो धातू इतका गंजून जातो की कालांतराने त्याचा कशासाठीच उपयोग करता येत नाही. अनेक मोटारगाड्या मोडीत काढल्या जातात. त्यांच्यात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे नव्हे तर त्यांच्यावर इतका गंज चढलेला असतो की त्या वापरण्यास सुरक्षित नसतात. हे उदाहरण आपण, कुरकुर करण्याच्या मनोवृत्तीला कशाप्रकारे लागू करू शकतो?

१३ काही धातूंचा गंजण्याचा जसा गुणधर्म असतो तसेच अपरिपूर्ण मानवांमध्ये तक्रार करण्याची प्रवृत्ती असते. त्यामुळे आपली मनोवृत्ती तक्रारी बनत चालली आहे का, याबद्दल आपण सतत दक्षता बाळगली पाहिजे. ओलावा आणि खारट हवेमुळे गंजण्याची प्रक्रिया झपाट्याने वाढते. त्याचप्रकारे, आपल्यावर आलेल्या क्लेशामुळे आपली कुरकुर करण्याची मनोवृत्ती शक्यता बळावू शकते. तणावामुळे एखाद्या लहानशा कारणानेही आपण खूप नाराज होऊ शकतो. या व्यवस्थीकरणाच्या शेवटल्या दिवसांतील परिस्थिती दिवसेंदिवस जसजशी बिकट होत चालली आहे, तसतशी तक्रार करण्याची कारणे देखील वाढू शकतात. (२ तीमथ्य ३:१-५) परिणामतः यहोवाचा एक सेवक दुसऱ्‍या सेवकाविरुद्ध कुरकुर करण्यास सुरुवात करू लागेल. याचे कारण लहानसे असेल. जसे की एखाद्यामध्ये असलेल्या उणीवेबद्दल, त्याच्या क्षमतेबद्दल किंवा सेवेच्या खास संधींबद्दल एक जण दुसऱ्‍यावर नाराज असेल.

१४, १५. कुरकुर करण्याची आपली प्रवृत्ती बनत चालली असेल तर त्याकडे आपण दुर्लक्ष का करता कामा नये?

१४ नाराज होण्यामागचे कारण कोणतेही असो, आपण जर कुरकुर करण्याच्या प्रवृत्तीला वेळीच आळा घातला नाही तर ही असंतोषी प्रवृत्ती आपल्या स्वभावात रुजेल आणि प्रत्येक गोष्टीबाबत कुरकुर करण्याचे आपल्या अंगवळणी पडेल. होय, कुरकुर करण्याच्या मनोवृत्तीचा विनाशकारक परिणाम आपल्याला आध्यात्मिकरीत्या पूर्णपणे नष्ट करू शकतो. इस्राएली लोक रानात त्यांच्यावर आलेल्या परिस्थितीबद्दल कुरकुर करू लागले तेव्हा यहोवावर दोष लावण्याइतपत त्यांची मजल गेली. (निर्गम १६:८) असे आपल्याबाबतीत कदापि न घडो!

१५ धातूवर गंजविरोधक रंग लावल्यास व ज्या ज्या ठिकाणी गंज चढल्यामुळे धातू नष्ट होत चालला आहे अशा ठराविक ठिकाणांवर वेळीच उपाय केल्यास धातू गंजण्याची प्रक्रिया कमी करता येते. अशाचप्रकारे, आपली कुरकुर करण्याची प्रवृत्ती होत चालली आहे, असे जर आपल्या लक्षात आले तर आपण याबाबतीत प्रार्थना करू शकतो आणि आपल्या प्रवृत्तीत वेळीच सुधारणा करून या वृत्तीला आळा घालू शकतो. आपण काय करू शकतो?

सर्व गोष्टींकडे यहोवाच्या दृष्टिकोनातून पाहा

१६. तक्रार करण्याच्या प्रवृत्तीवर आपण कशाप्रकारे मात करू शकतो?

१६ कुरकुर करण्याची आपली प्रवृत्ती बनते तेव्हा आपले मन, स्वतःवर, आपल्या चिंतांवर केंद्रित होते आणि यहोवाचा साक्षीदार म्हणून आपण उपभोगत असलेल्या आशीर्वादांकडे आपले दुर्लक्ष होते. तक्रार करण्याच्या प्रवृत्तीवर मात करण्याकरता आपण यहोवाने आपल्याला दिलेले आशीर्वाद सतत आपल्या डोळ्यांसमोर ठेवले पाहिजे. जसे की, आपल्या प्रत्येकाला यहोवाचे व्यक्‍तिगत नाव धारण करण्याचा अद्‌भुत सन्मान मिळाला आहे. (यशया ४३:१०) आपण त्याच्याबरोबर घनिष्ठ नातेसंबंध जोडू शकतो आणि त्याच्याशी केव्हाही बोलू शकतो, कारण तो ‘प्रार्थना ऐकतो.’ (स्तोत्र ६५:२; याकोब ४:८) विश्‍वव्यापी सार्वभौमत्त्वाचा वादविषय समजल्यामुळे व यहोवाशी एकनिष्ठ राहण्याचा सुहक्क आपल्याला मिळाला आहे ही गोष्ट आठवणीत ठेवल्यामुळे आपल्या जीवनाला खरा अर्थ लाभला आहे. (नीतिसूत्रे २७:११) आपण राज्याच्या सुवार्तेच्या प्रचार कार्यात नियमाने भाग घेऊ शकतो. (मत्तय २४:१४) येशू ख्रिस्ताच्या खंडणी बलिदानावर विश्‍वास असल्यामुळे आपण शुद्ध विवेक बाळगू शकतो. (योहान ३:१६) आपल्याला कोणत्याही परिस्थितीचा सामना करावा लागत असला तरी, आपण या सर्व आशीर्वादांचा उपभोग घेत असतो.

१७. आपल्याकडे तक्रार करण्यासाठी सबळ कारण असले तरीसुद्धा, आपण सर्व गोष्टींकडे यहोवाच्या दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न का केला पाहिजे?

१७ आपण केवळ स्वतःच्या नव्हे तर यहोवाच्या दृष्टीतून गोष्टींकडे पाहण्याचा प्रयत्न करू या. “हे परमेश्‍वरा, तुझे मार्ग मला दाखीव; तुझ्या वाटा मला प्रगट कर,” असे स्तोत्रकर्ता दावीद याने गायिले. (स्तोत्र २५:४) तक्रार करण्यासाठी आपल्याकडे सबळ कारण असले तरी, ते साहजिकच यहोवाच्या नजरेतून सुटणार नाही. तो परिस्थिती लगेच सुधारू शकतो. पण मग कधीकधी तो आपल्याला क्लेशाचा सामना का करू देतो? आपल्याच भल्यासाठी. धीर, सहनशीलता, विश्‍वास, सोशिकपणा यांसारखे उत्तम गुण आपण आपल्या अंगी विकसित करावेत म्हणून तो कधीकधी क्लेश राहू देतो.—याकोब १:२-४.

१८, १९. अडीअडचणी तक्रार न करता सहन केल्यामुळे कोणते चांगले परिणाम घडतात, याचे उदाहरण द्या.

१८ आपल्यावर आलेल्या अडचणी तक्रार न करता सहन करीत राहिल्याने आपल्या व्यक्‍तिमत्त्वात सुधारणा होऊ शकते. शिवाय जे आपले वर्तन पाहतात त्यांच्यावरही प्रभाव पडू शकतो. २००३ साली यहोवाच्या साक्षीदारांच्या एका गटाने जर्मनीहून हंगेरीचा बसने प्रवास केला. बसचा चालक साक्षीदार नव्हता. साक्षीदारांबरोबर दहा दिवस राहण्याची त्याची इच्छा नव्हती. पण, प्रवासाच्या शेवटी त्याचे मत पूर्णपणे बदलले. का बदलले?

१९ संपूर्ण प्रवासादरम्यान, पुष्कळ अडचणी आल्या होत्या. पण साक्षीदारांनी याबद्दल कसलीही तक्रार केली नाही. प्रवाशांचा असा गट आपण पूर्वी कधी पाहिला नव्हता, असे बसचालक म्हणाला. पुढच्या वेळी माझ्या घरी जेव्हा साक्षीदार येतील तेव्हा मी नक्की त्यांना घरात बोलवून त्यांचे म्हणणे ऐकून घेईन, असेही त्याने वचन दिले. ‘कुरकुर न करण्याद्वारे’ सर्व प्रवाशांनी त्याच्यावर किती उत्तम छाप पाडली होती!

क्षमा केल्याने ऐक्य टिकून राहते

२०. आपण एकमेकांना क्षमा का केली पाहिजे?

२० पण आपल्याला जर एखाद्या बंधू अथवा बहिणीविरुद्ध तक्रार असेल तर काय? तक्रार गंभीर स्वरुपाची असेल तर आपण येशूने मत्तय १८:१५-१७ मध्ये जे तत्त्व सांगितले त्या तत्त्वाचे पालन केले पाहिजे. पण प्रत्येक प्रसंगी हे तत्त्व लागू करण्याची गरज पडणार नाही, कारण बहुतेक तक्रारी क्षुल्लक स्वरूपाच्या असतात. असे असेल तर, आपल्याला क्षमा करण्याची एक संधी मिळाली आहे, असे समजून त्या बंधू अथवा बहिणीला क्षमा करायला काय हरकत आहे? पौलाने म्हटले: “एकमेकांचे सहन करा, आणि कोणाविरूद्ध कोणाचे गाऱ्‍हाणे असल्यास आपसात क्षमा करा; प्रभूने तुम्हाला क्षमा केली तशी तुम्हीहि करा; पूर्णता करणारे बंधन अशी जी प्रीति ती ह्‍या सर्वांवर धारण करा.” (कलस्सैकर ३:१३, १४) आपण क्षमा करायला तयार आहोत का? आपण दररोज यहोवाच्या मनाविरुद्ध कितीदा तरी वागत नाही का? तरीपण नेहमी तो आपल्याला दया दाखवतो आणि आपल्याला क्षमा करतो.

२१. कुरकुर ऐकणारे लोक कशी प्रतिक्रिया दाखवतील?

२१ नाराजीचे कोणतेही कारण असले तरी, कुरकुर केल्याने प्रश्‍न सुटत नाही. “कुरकुर” असा अर्थ देणाऱ्‍या इब्री शब्दाचा अर्थ ‘गुरगुरणे’ असाही होतो. सतत कुरकुर करणारी व्यक्‍ती आपल्या जवळपास असेल तर आपल्याला खूप अस्वस्थ वाटते आणि आपण तिच्यापासून होता होईल तितके दूर पळण्याचा प्रयत्न करतो. मग आपण जर कुरकुर करणारे किंवा क्रोधाविष्ट होऊन गुरगुरत असू तर ऐकणाऱ्‍यांना आपल्याविषयी असेच वाटेल. ते इतके अवस्थ होतील, की त्यांना आपल्या जवळही यावेसे वाटणार नाही. क्रोधाविष्ट होऊन कुरकुर करून लोकांचे लक्ष वेधता येते, पण कोणाचे मन जिंकता येत नाही.

२२. यहोवाच्या साक्षीदारांबद्दल एका मुलीने काय म्हटले?

२२ क्षमाशील वृत्तीमुळे ऐक्य वाढते. आणि यहोवाचे लोक ऐक्य जोपासतात. (स्तोत्र १३३:१-३) एका युरोपियन देशात, एका १७ वर्षीय कॅथलिक मुलीने यहोवाच्या साक्षीदारांच्या शाखा दफ्तराला साक्षीदारांबद्दल एक प्रशंसा पत्र पाठवले. तिने त्या पत्रात असे लिहिले होते: “मला माहीत असलेली ही एकच अशी संघटना आहे जिच्या सदस्यांमध्ये द्वेष, लोभ, असहिष्णुता, स्वार्थीपणा किंवा मतभेद, यांच्यामुळे विभाजने नाहीत.”

२३. पुढील लेखात आपण कशाची चर्चा करणार आहोत?

२३ खरा देव यहोवा याचे उपासक यानात्याने आपल्याला मिळत असलेल्या आशीर्वादांबद्दलची कृतज्ञता आपल्याला ऐक्य टिकवून ठेवण्यास तसेच व्यक्‍तिगत गोष्टींत एकमेकांविरुद्ध कुरकुर करण्याचे टाळण्यास मदत करेल. पण याहीपेक्षा घातक स्वरुपाची एक कुरकुर आहे. ती म्हणजे, पृथ्वीवरील यहोवाच्या संघटनेविरुद्धची कुरकुर. पण देवाचे गुण विकसित केल्यामुळे आपण अशाप्रकारची कुरकुर कशी टाळू शकतो, याची चर्चा पुढील लेखात करण्यात आली आहे. (w०६ ७/१५)

तुम्हाला आठवते का?

• कुरकुर करण्यात काय गोवलेले आहे?

• कुरकुर करण्याच्या प्रवृत्तीचे परिणाम कसे असू शकतात हे कसे समजवता येतील?

• कुरकुर करण्याच्या प्रवृत्तीवर आळा घालण्यासाठी आपण काय करू शकतो?

• क्षमा करण्याची तयारी दाखवल्याने आपण तक्रार करण्याची प्रवृत्ती कशी टाळू शकतो?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[८ पानांवरील चित्र]

इस्राएली लोकांनी वास्तविकतेत यहोवाविरुद्ध कुरकुर केली!

[१० पानांवरील चित्र]

तुम्ही सर्व गोष्टींकडे यहोवाच्या दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न करता का?

[११ पानांवरील चित्रे]

क्षमा केल्याने ऐक्य टिकून राहते