व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवाचे भय धरा —सुखी व्हा!

यहोवाचे भय धरा —सुखी व्हा!

यहोवाचे भय धरा —सुखी व्हा!

“जो मनुष्य परमेश्‍वराचे भय धरितो . . . तो धन्य!”—स्तोत्र ११२:१.

१, २. यहोवाचे भय बाळगल्याने आपल्याला काय मिळू शकते?

 सुख सहजासहजी मिळत नाही. खरे सुख योग्य निवडीवर, जे बरोबर आहे ते करण्यावर आणि जे वाईट आहे त्यापासून दूर राहण्यावर अवलंबून आहे. आपला निर्माणकर्ता यहोवा देव याने, सर्वात उत्कृष्ट जीवनाचा आनंद कसा लुटता येईल हे शिकवण्यासाठी आपल्याला त्याचे वचन बायबल दिले आहे. यहोवाचे मार्गदर्शन शोधून त्याचे पालन करून आपण दाखवून देतो, की आपल्याला देवाचे भय आहे. अशाप्रकारे आपण खरोखर सुखी व आनंदी होतो.—स्तोत्र २३:१; नीतिसूत्रे १४:२६.

या लेखात आपण बायबलमधील आणि आधुनिक दिवसांतील अशा काही लोकांच्या उदाहरणांची चर्चा करणार आहोत ज्यांना देवाचे भय होते. देवाच्या भयाने त्यांना, जे चूक आहे ते करण्याच्या दबावाचा प्रतिकार करण्याची शक्‍ती कशी दिली व जे बरोबर आहे ते करण्याचे धैर्य कसे दिले ते या उदाहरणांतून आपण पाहणार आहोत. दाविदाच्या बाबतीत झाले तसे, देवाचे भय आपल्याला आपली चूक सुधारण्यास प्रवृत्त करून आनंदी कसे बनवू शकते, हे आपण पाहू या. पालक आपल्या मुलांना यहोवाची भीती बाळगण्यास शिकवून सर्वात अमूल्य वारसा कसा देऊ शकतात, हेही आपण पाहणार आहोत. होय, देवाचे वचन आपल्याला आश्‍वासन देते: “जो मनुष्य परमेश्‍वराचे भय धरितो . . . तो धन्य!”—स्तोत्र ११२:१.

हरवलेला आनंद पुन्हा मिळणे

३. कोणत्या गोष्टीने दाविदाला आपल्या पापांतून सावरण्यास मदत केली?

मागील लेखात आपण चर्चा केली होती, की दावीद तीन प्रसंगी देवाबद्दल उचित भय बाळगण्यास चुकल्यामुळे त्याने पाप केले. परंतु, यहोवाकडून त्याला मिळालेल्या शिक्षेला त्याने ज्याप्रकारे प्रतिक्रिया दाखवली त्यावरून तो मुळातच देव-भीरू होता, हे दिसून आले. देवाबद्दल त्याच्या मनात पूज्यभाव व आदर असल्यामुळे त्याने आपली चूक कबूल केली, आपला मार्ग सुधारला आणि यहोवाबरोबर पुन्हा नातेसंबंध जोडला. त्याच्या चुकांचे परिणाम त्याला आणि त्याच्याबरोबर इतरांनाही भोगावे लागले असले तरीसुद्धा त्याने मनापासून पश्‍चात्ताप केला. यामुळे यहोवा त्याला साहाय्य करीत राहिला आणि आशीर्वाद देत राहिला. आज ज्या ख्रिश्‍चनांच्या हातून गंभीर पाप घडते अशांना दाविदाच्या उदाहरणातून निश्‍चितच धैर्य मिळू शकते.

४. देवाबद्दलचे भय एखाद्याला पुन्हा आनंद मिळण्यास कशाप्रकारे मदत करू शकते?

सोनयाचे उदाहरण घ्या. * ती पूर्णवेळेची सुवार्तिक होती, तरी ती वाईट लोकांच्या संगतीला लागली, ख्रिश्‍चनांना न शोभणाऱ्‍या वर्तनात गुरफटली व त्यामुळे ख्रिस्ती मंडळीतून तिला बहिष्कृत करावे लागले. ताळ्यावर आल्यावर सोनयाने यहोवाबरोबर बिघडलेला तिचा नातेसंबंध पुन्हा सुधारण्यासाठी आवश्‍यक ती सर्व पावले उचलली. कालांतराने तिला मंडळीत पुन्हा घेण्यात आले. या सर्व कालावधीत तिने यहोवाची सेवा करण्याची आपली इच्छा मरू दिली नाही. तिने पुन्हा पूर्णवेळेची सेवा सुरू केली. नंतर एका उत्तम ख्रिस्ती वडिलांशी तिचा विवाह झाला व आता ती आपल्या पतीसोबत मंडळीत आनंदाने सेवा करत आहे. आपण तात्पुरत्या काळासाठी ख्रिस्ती मार्गापासून भरकटलो, याचे सोनयाला वाईट वाटते, पण मनात देवाबद्दल भय असल्यामुळे ती पुन्हा त्याच्याकडे येऊ शकली, याचा तिला आनंद होतो.

पाप करण्यापेक्षा सहन करणे बरे

५, ६. दाविदाने दोनदा शौलाला जीवदान कसे व का दिले हे समजावून सांगा.

आधी पाप करून मग त्यातून सावरण्याऐवजी, आपल्या मनात देवाचे भय असेल तर आपण मुळातच पाप करण्यापासून दूर राहू. दाविदाच्या बाबतीत असे झाले. एकदा, शौल त्याच्या तीन हजार सैनिकांबरोबर दाविदाचा पाठलाग करत असताना तो, दावीद आणि त्याचे लोक ज्या गुहेत लपले होते तेथे गेला. दाविदाच्या लोकांनी शौलाला ठार मारावे म्हणून त्याला गळ घातली. यहोवाने आयतेच शौलाला दाविदाच्या हातात दिले असा त्यांनी तर्क केला. चोर पावलांनी दावीद शौलाजवळ जातो आणि त्याच्या अंगरख्याच्या काठाचा एक लहानसा तुकडा कापून घेतो. आता हे निर्धोक कृत्य होते तरी दाविदाचे मन त्याला खाऊ लागले; कारण दाविदाला देवाचे भय होते. शौलाचा वध करावा म्हणून त्याला चिथावणाऱ्‍या लोकांना पांगवताना तो म्हणाला: “मी आपल्या स्वामीवर, परमेश्‍वराच्या अभिषिक्‍तावर, आपला हात टाकावा, अशी गोष्ट परमेश्‍वर मजकडून न घडवो, कारण तो परमेश्‍वराचा अभिषिक्‍त आहे.” *१ शमुवेल २४:१-७.

दुसऱ्‍या एका प्रसंगी, शौलाने रात्रीच्या वेळी एका रानात छावणी केलेली असते, तेव्हा त्याला व त्याच्या लोकांना “परमेश्‍वराने . . . गाढ निद्रा लाविली.” दावीद आणि त्याचा धैर्यवान पुतण्या अबीशय छावणीच्या अगदी मध्ये शिरतात आणि गाढ झोपलेल्या शौलाजवळ उभे राहतात. अबीशय शौलाला मारू पाहतो. पण दावीद त्याला अडवून विचारतो: “परमेश्‍वराच्या अभिषिक्‍तावर हात चालवून कोण निर्दोष राहणार?”—१ शमुवेल २६:९, १२.

७. कोणत्या गोष्टीने दाविदाला पाप करण्यापासून रोखले?

शौलाला ठार मारण्याची संधी दाविदासमोर दोनदा चालून आली तरीसुद्धा त्याने त्याला ठार का मारले नाही? कारण दाविदाला शौलापेक्षा देवाचे भय होते. देवाबद्दल उचित भय असल्यामुळे पाप करण्यापेक्षा तो काहीही सहन करण्यास तयार होता. (इब्री लोकांस ११:२५) दाविदाला खात्री होती, की यहोवा त्याची आणि त्याच्या लोकांची काळजी घेतो. दाविदाला माहीत होते, की जर त्याने देवाच्या आज्ञा मानल्या आणि त्याच्यावर भरवसा ठेवला तर त्याला आनंद व आशीर्वाद मिळतील; पण जर त्याने देवाकडे दुर्लक्ष केले तर देव त्याच्यावर नाराज होईल. (स्तोत्र ६५:४) दाविदाला हेही माहीत होते, की त्याला राजा बनवण्यासंबंधी यहोवाने त्याला दिलेले वचन तो पूर्ण करेल आणि आपल्या ठरलेल्या वेळी व आपल्या पद्धतीने तो शौलाला राजपदावरून काढेल.—१ शमुवेल २६:१०.

देवाचे भय बाळगल्यामुळे सुख मिळते

८. दबावाखाली असताना दाविदाने दाखवलेली प्रतिक्रिया आपल्यासाठी एक उदाहरण कशी आहे?

ख्रिस्ती या नात्याने आपण, थट्टा, छळ आणि इतर संकटांची अपेक्षा करू शकतो. (मत्तय २४:९; २ पेत्र ३:३) कधीकधी आपल्याला आपल्याच बांधवांकडून होणाऱ्‍या त्रासांचा सामना करावा लागेल. परंतु यहोवा सर्व काही पाहतो, तो आपल्या प्रार्थना ऐकतो आणि योग्य वेळी तो त्याच्या इच्छेनुसार सर्वकाही ठीक करेल, हे आपल्याला माहीत आहे. (रोमकर १२:१७-२१; इब्री लोकांस ४:१६) त्यामुळे आपल्या विरोधकांना घाबरण्याऐवजी आपण देवाचे भय बाळगतो आणि सुटकेसाठी त्याच्यावर विसंबून राहतो. दाविदाप्रमाणे आपणही बदला घेत नाही किंवा क्लेशापासून वाचण्यासाठी धार्मिक तत्त्वांशी हातमिळवणी करत नाही. यामुळे आपल्याला आनंद मिळतो. पण आपल्याला आनंद नेमका कसा मिळतो?

९. देवाचे भय बाळगल्यामुळे छळ होत असूनही आनंद मिळू शकतो, हे समजण्यासाठी एक उदाहरण द्या.

खूप वर्षांपासून आफ्रिकेत मिशनरी म्हणून सेवा करणारे एक बंधू सांगतात: “मला एका आईचे आणि तिच्या किशोरवयीन मुलीचे उदाहरण आठवते, ज्यांनी ख्रिस्ती तटस्थतेमुळे राजकीय पक्षाचे कार्ड विकत घेण्यास नकार दिला. तेव्हा पुरुषांच्या एका जमावाने त्यांना निर्दयीपणे मारले आणि मग घरी जाण्यास सांगितले. घरी जात असताना, आई आपल्या मुलीला सांत्वन देत होती. पण आपल्यावर हे संकट का आले, हे समजेना म्हणून मुलगी रडत होती. त्याप्रसंगी दोघी मायलेकी आनंदी नव्हत्या, पण त्यांचा विवेक शुद्ध होता. नंतर, आपण देवाची आज्ञा मोडली नाही, म्हणून त्यांना खूप आनंद झाला. त्यांनी जर ते पक्षाचे कार्ड विकत घेतले असते तर हा जमाव त्यांच्यावर खूष झाला असता. त्याने त्यांना शीतपेयांच्या बाटल्या दिल्या असत्या आणि वाजत-गाजत त्यांना घरी नेले असते. पण, अशाप्रकारे हातमिळवणी केल्यामुळे या दोघी जगातील सर्वात दुःखी व्यक्‍ती बनल्या असत्या.” देवाचे भय असल्यामुळे त्या या भीतीदायक भावनेपासून वाचल्या.

१०, ११. एका स्त्रीने देवाचे भय बाळगल्यामुळे कोणते उत्तम परिणाम घडले?

१० जीवनाच्या पावित्र्याचा आदर करण्यासंबंधाने आलेल्या परीक्षांना तोंड देतानाही, देवाचे भय बाळगल्यामुळे आनंद मिळू शकतो. मेरीला दिवस गेले होते. तिचे हे तिसरे मूल होते. डॉक्टर तिला गर्भपात करण्यास सांगत होते. ते तिला म्हणाले: “तुझ्या जीवाला धोका आहे. तुझी तब्येत कधीही बिघडून, २४ तासांच्या आत तुझं बरं वाईट होऊ शकतं. यात तुझं बाळही मरेल. आणि जरी तुम्ही दोघं वाचलात तरी बाळ नॉर्मल असेल याची शाश्‍वती नाही.” मेरी यहोवाच्या साक्षीदारांबरोबर बायबलचा अभ्यास करत होती. तिचा अजून बाप्तिस्मा झाला नव्हता. ती म्हणते: “तरीपण मी यहोवाची सेवा करण्याचं ठरवलं होतं. काहीही झाले तरी मी त्याची आज्ञा मोडणार नाही, असा मी निश्‍चय केला.”—निर्गम २१:२२, २३.

११ गर्भावस्थेत ती बायबलचा अभ्यास व आपल्या कुटुंबाची काळजी घेत राहिली. शेवटी तिने एका मुलाला जन्म दिला. “पहिल्या दोन बाळंतपणापेक्षा हे बाळंतपण जरा अवघड होतं, पण गंभीर असं काही नव्हतं,” असे मेरी म्हणते. देवाचे भय बाळगल्यामुळे मेरीचा विवेक शुद्ध राहिला आणि काही काळातच तिचा बाप्तिस्मा झाला. तिचा हा मुलगा मोठा झाला तेव्हा तोही यहोवाचे भय बाळगण्यास शिकला व सध्या तो यहोवाच्या साक्षीदारांच्या एका शाखा दफ्तरात सेवा करत आहे.

‘परमेश्‍वरावर भिस्त ठेवून खंबीर राहा’

१२. देवाच्या भयाने दाविदाला शक्‍ती कशी दिली?

१२ देवाच्या भयाने दाविदाला फक्‍त चूक करण्यापासूनच रोखले नाही, तर आणीबाणीच्या प्रसंगी निर्णायक पाऊल उचलण्यासाठी व सुज्ञपणे वागण्यासाठी त्याला शक्‍ती दिली. एक वर्ष आणि चार महिन्यांपर्यंत दावीद आणि त्याच्या लोकांनी, सिकलाग नावाच्या पलिष्टी खेडेगावात आश्रय घेतला होता. (१ शमुवेल २७:५-७) एकदा सर्व पुरुष बाहेर गेले असताना, लुटालूट करणाऱ्‍या अमालेकी लोकांनी शहर अग्नीने जाळून टाकले आणि स्त्रियांना, मुलांना व आणि गुराढोरांना पळवून नेले. दावीद आणि त्याचे लोक पुन्हा नगरात आले आणि त्यांनी हे पाहिले तेव्हा ते खूप रडले. पण या दुःखाचे रुपांतर रागात झाले. दाविदाचे लोक त्याला दगडमार करण्याची भाषा करू लागले. दाविदाला काय करावे समजत नव्हते तरी तो खचला नाही. (नीतिसूत्रे २४:१०) देवाचे भय बाळगल्यामुळे त्याने यहोवाला प्रार्थना केली आणि ‘परमेश्‍वरावर भिस्त ठेवून तो खंबीर राहिला.’ देवाच्या मदतीने मग दावीद आणि त्याच्या लोकांनी अमालेकींचा पाडाव केला आणि जे काही त्यांनी पळवून नेले होते ते सर्व सोडवून आणले.—१ शमुवेल ३०:१-२०.

१३, १४. देवाच्या भयाने एका ख्रिस्ती भगिनीला योग्य निर्णय घेण्यास कशाप्रकारे मदत केली?

१३ आज देवाच्या सेवकांसमोरही संकटे येतात तेव्हा त्यांना देवावर भरवसा ठेवावा लागतो व निर्णायक पाऊल उचलण्यासाठी धैर्य लागते. क्रिस्टीनाचे उदाहरण घ्या. लहानपणी क्रिस्टीनाने यहोवाच्या साक्षीदारांबरोबर बायबलचा अभ्यास केला होता. पण तिला पियानोवादक बनण्याची इच्छा होती. यासाठी तिने त्या दिशेने बरीच प्रगती देखील केली. शिवाय, तिला प्रचारकार्यात जायची लाज वाटत होती. त्यामुळे, बाप्तिस्मा घेतल्यानंतर आपल्यावर प्रचारकार्याला जाण्याची जबाबदारी येईल, म्हणून ती घाबरत होती. पण क्रिस्टीना जसजशी बायबलचा अभ्यास करत राहिली तसतसे तिला बायबलमधील शक्‍ती जाणवू लागली. ती यहोवाचे भय बाळगण्यास शिकू लागली. तिला जाणवले, की आपल्या सेवकांनी आपल्यावर संपूर्ण हृदयाने, मनाने, जिवाने व शक्‍तीने प्रेम करावे, अशी यहोवा अपेक्षा करतो. (मार्क १२:३०) यामुळे ती यहोवाला आपले जीवन समर्पित करण्यास व बाप्तिस्मा घेण्यास प्रवृत्त झाली.

१४ आध्यात्मिक प्रगती करण्यास मदत मिळावी म्हणून क्रिस्टीनाने यहोवाला प्रार्थना केली. ती म्हणते: “पियानोवादकांना सतत कार्यक्रम करण्यासाठी फिरतीवर असावे लागते आणि वर्षाला ४०० पेक्षा अधिक कार्यक्रम करावे लागतात, हे मला माहीत होतं. स्वतःचा खर्च उचलता यावा म्हणून व मला पूर्णवेळेची सेवा करता यावी म्हणून मी शिक्षक व्हायचं ठरवलं.” त्यावेळी क्रिस्टीना पहिल्यांदा तिच्या देशातल्या जनतेसमोर सर्वात लोकप्रिय प्रेक्षागृहात तिचा शो करणार होती. ती म्हणते: “माझा हा शो पहिला आणि शेवटला ठरला.” काही काळानंतर क्रिस्टीनाचा एका ख्रिस्ती वडिलांशी विवाह झाला. आज ते दोघेही मिळून यहोवाच्या साक्षीदारांच्या एका शाखा दफ्तरात सेवा करत आहेत. यहोवाने आपल्याला योग्य निवड करण्याची शक्‍ती दिली व त्यामुळे ती त्याच्या सेवेत वेळ आणि शक्‍ती खर्च करू शकते, म्हणून खूप आनंदी आहे.

अमूल्य वारसा

१५. दावीद आपल्या मुलांना कोणता वारसा देऊ इच्छित होता आणि हे त्याने कसे केले?

१५ दाविदाने लिहिले: “मुलांनो या, माझे ऐका; मी तुम्हाला परमेश्‍वराचे भय धरावयाला शिकवीन.” (स्तोत्र ३४:११) पिता असल्यामुळे दावीद आपल्या मुलांना सर्वात अमूल्य वारसा देऊ इच्छित होता. अर्थात, तो त्यांना यहोवाबद्दल खरे, संतुलित भय बाळगण्याची शिकवण देऊ इच्छित होता. आपल्या बोलण्याद्वारे आणि कार्यांद्वारे दाविदाने यहोवाचे वर्णन तो अवाजवी अपेक्षा करणारा, भयानक, त्याच्या नियमांचे कोण उल्लंघन करतोय का हे पाहण्यासाठी टपून बसलेला देव असे नव्हे, तर तो एक प्रेमळ, काळजी करणारा व पृथ्वीवरील आपल्या मुलांना क्षमा करणारा पिता असल्याचे केले. “चुकांचा हिशेब कोण ठेवू शकते?” असे दाविदाने विचारले. मग, यहोवा सतत केवळ आपल्या चुका पाहात नाही, हा भरवसा व्यक्‍त करत तो पुढे म्हणाला: “गुप्त दोषांपासून मला मुक्‍त कर.” दाविदाला ही खात्री होती, की जर त्याने आपल्यापरीने प्रयत्न केले तर त्याचे बोलणे आणि त्याचे विचार यहोवाला स्वीकारयोग्य ठरतील.—स्तोत्र १९:१२, NW, १४.

१६, १७. पालक आपल्या मुलांना यहोवाचे भय बाळगण्यास कसे शिकवू शकतात?

१६ दावीद आजच्या पालकांसाठी एक उत्तम आदर्श आहे. राल्फ आपल्या धाकट्या भावासमवेत यहोवाच्या साक्षीदारांच्या एका शाखा दफ्तरात सेवा करतो. तो म्हणतो: “आमच्या आईवडिलांनी आम्हाला अशा पद्धतीनं वाढवलं, की सत्यात राहणं आम्हाला आवडत होतं. आम्ही लहान असताना, ते मंडळीच्या कार्यांविषयी बोलायचे तेव्हा आम्हाला त्यात सहभाग घेऊ द्यायचे. सत्याविषयी ते जसे आवेशी होते तसे आम्हीही झालो. यहोवाच्या सेवेत आम्ही पुष्कळ फायदेकारक गोष्टी करू शकतो, अशी खात्री देत त्यांनी आम्हाला लहानाचं मोठं केलं. खरं तर, आम्ही खूप वर्षांपर्यंत जिथं राज्य प्रचारकांची खूप गरज होती तिथे राहून नवीन मंडळ्या स्थापन करण्यासाठी मदत केली.

१७ “आम्ही सत्याच्या मार्गावर टिकून राहिलो ते असंख्य नियमांमुळे नव्हे, तर आमच्या आईवडिलांना यहोवा खरा आणि अतिशय दयाळू व चांगला वाटत होता म्हणून. त्यांनी नेहमी यहोवाला आणखी चांगल्याप्रकारे ओळखायचा व त्याला संतुष्ट करायचा प्रयत्न केला आणि आम्ही, देवाबद्दल त्यांना असलेली भीती व प्रेम पाहून, तसेच करायला शिकलो. आमच्या हातून चुका व्हायच्या तेव्हाही आमच्या आईवडिलांनी आम्हाला कधी असं जाणवू दिलं नाही, की यहोवा आता तुमच्यावर प्रेम करत नाही. किंवा त्यांनी कधी आमच्यावर रागानं अनावश्‍यक बंधनं लादली नाहीत. पुष्कळदा, ते आमच्याबरोबर बसायचे, बोलायचे. मला आठवतं, कधीकधी आई आम्हाला काहीतरी समजावताना तिच्या डोळ्यांत पाणी यायचं, ती आमच्या हृदयापर्यंत पोहंचण्याचा प्रयत्न करायची. त्यांच्या प्रयत्नांचं चीज झालं. आमच्या पालकांच्या बोलण्याद्वारे व कार्यांद्वारे आम्ही शिकलो, की यहोवाचं भय बाळगणं, सर्वात उत्तम गोष्ट आहे व त्याचा साक्षीदार होणं, ओझं नव्हे तर जगातील सर्वात आनंदविणारी व सुख देणारी गोष्ट आहे.”—१ योहान ५:३.

१८. खऱ्‍या देवाचे भय बाळगल्यास आपल्याला काय मिळेल?

१८ “दाविदाची शेवटली वचने ही होत: मानवांवर न्यायाने राज्य करणारा देवाचे भय धरून त्याजवर राज्य करणारा निर्माण होईल. सूर्योदयीच्या प्रभातेसारखा तो उदय पावेल.” (२ शमुवेल २३:१, ३, ४) दाविदानंतर सिंहासनावर आलेला त्याचा पुत्र शलमोन याला या सुज्ञ शब्दांचा अर्थ उमगला कारण त्याने यहोवाला, मला “सावधान चित्त दे” अर्थात आज्ञाधारक हृदय दे आणि “बऱ्‍यावाइटांचा विवेक” अर्थात बरे आणि वाईट यांतील फरक जाणण्याची कुवत दे, अशी विनंती केली. (१ राजे ३:९) शलमोनाने जाणले होते, की यहोवाचे भय धरल्याने बुद्धी व आनंद मिळतो. नंतर तो उपदेशकाच्या पुस्तकात थोडक्यात असे म्हणतो: “आता सर्व काही तुम्ही ऐकले; सर्वांचे सार हे की देवाचे भय धर व त्याच्या आज्ञा पाळ; मनुष्यकर्तव्य काय ते एवढेच आहे. सगळ्या बऱ्‍यावाईट गुप्त गोष्टींचा न्याय करितांना देव सगळ्या कृत्यांची झाडाझडती घेईल.” (उपदेशक १२:१३, १४) या सल्ल्याचे पालन केल्यास आपल्याला दिसून येईल, की “नम्रता व परमेश्‍वराचे भय” यांमुळे आपल्याला फक्‍त बुद्धी आणि आनंदच मिळत नाही तर “धन, सन्मान व जीवन” देखील मिळेल.—नीतिसूत्रे २२:४.

१९. काय केल्याने आपल्याला “परमेश्‍वराच्या भयाची” जाणीव होऊ शकेल?

१९ देवाबद्दलचे उचित भय यहोवाच्या खऱ्‍या सेवकांच्या जीवनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते, हे आपण बायबलमधील व आधुनिक दिवसांतील काही उदाहरणांतून पाहिले आहे. अशाप्रकारचे भय आपल्याला, आपला स्वर्गीय पिता असंतुष्ट होईल असे कोणतेही कार्य करण्यापासून रोखते. शिवाय ते आपल्यासमोर येणाऱ्‍या अडीअचणींचा सामना करण्याचे धैर्य आणि परीक्षा किंवा संकटे सहन करण्याची शक्‍ती देखील देते. यास्तव, आपण सर्व अबालवृद्ध देवाच्या वचनाचा मनःपूर्वक अभ्यास करू या, शिकलेल्या गोष्टींवर मनन करू या आणि यहोवाला सातत्याने व मनापासून प्रार्थना करून त्याच्या जवळ जाऊ या. असे केल्याने आपल्याला फक्‍त ‘देवाविषयीचे ज्ञानच’ मिळणार नाही तर “परमेश्‍वराच्या भयाची” देखील जाणीव होईल.—नीतिसूत्रे २:१-५. (w०६ ८/१)

[तळटीपा]

^ परि. 4 नावे बदलण्यात आली आहेत.

^ परि. 5 या घटनेने प्रवृत्त होऊन कदाचित दाविदाने स्तोत्रे ५७ व १४२ रचली असावीत.

तुम्ही स्पष्टीकरण देऊ शकाल?

देवाचे भय

• एखाद्याला गंभीर पापातून सावरण्यास कसे साहाय्य करू शकते?

• परीक्षा व छळ होत असूनही आनंद कसे देऊ शकते?

• देवाची इच्छा करण्याची शक्‍ती कसे देऊ शकते?

• आपल्या मुलांसाठी अमूल्य वारसा कसा ठरू शकते?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२९ पानांवरील चित्रे]

पालक आपल्या मुलांना यहोवाचे भय बाळगण्यास शिकवून अमूल्य वारसा देऊ शकतात