व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवाच्या संघटनेच्या चांगुलपणावर लक्ष केंद्रित करा

यहोवाच्या संघटनेच्या चांगुलपणावर लक्ष केंद्रित करा

यहोवाच्या संघटनेच्या चांगुलपणावर लक्ष केंद्रित करा

“तुझ्या घरातील . . . उत्तम लाभांनी आम्ही तृप्त होऊ.”—स्तोत्र ६५:४.

१, २. (क) मंदिराच्या संबंधाने असलेल्या व्यवस्थांचा देवाच्या लोकांवर काय परिणाम होणार होता? (ख) मंदिराच्या बांधकामाला दाविदाने पाठिंबा कसा दिला?

 प्राचीन इस्राएलचा दावीद, इब्री शास्त्रवचनांत चर्चा केलेल्या सर्वात उल्लेखनीय लोकांपैकी एक होता. मेंढपाळ, संगीतकार, संदेष्टा आणि राजा असलेल्या दावीदाचा यहोवावर पूर्ण भरवसा होता. दाविदाचा यहोवाबरोबर इतका घनिष्ठ नातेसंबंध होता, की देवासाठी एक मंदिर बांधण्याची त्याला इच्छा झाली. हे मंदिर इस्राएलमध्ये खऱ्‍या उपासनेचे केंद्र बनणार होते. मंदिराच्या संबंधाने असलेल्या सर्व व्यवस्थांमुळे देवाच्या लोकांना आनंद होईल व त्यांना लाभही मिळतील, हे दाविदाला माहीत होते. त्यामुळे दाविदाने असे गायिले: “तुझ्या अंगणात राहण्यासाठी ज्याला तू [यहोवा] निवडून घेतोस आणि आपल्याजवळ आणितोस तो धन्य; तुझ्या घरातील, तुझ्या मंदिराच्या पवित्रस्थानातील उत्तम लाभांनी आम्ही तृप्त होऊ.”—स्तोत्र ६५:४.

यहोवाच्या मंदिराच्या बांधकामावर देखरेख करण्याची दाविदाला परवानगी देण्यात आली नाही. ही खास नेमणूक त्याचा मुलगा शलमोन याच्यासाठी राखून ठेवण्यात आली. आपण ज्याची उत्कट मनिषा बाळगली ती दुसऱ्‍या कोणालातरी पूर्ण करायला दिली म्हणून दाविदाने कुरकुर केली नाही. मंदिराचे बांधकाम होणे जास्त महत्त्वाचे त्याला वाटले. यहोवाकडून मिळालेला बांधकामाचा नमुना शलमोनाला सुपूर्त करून त्याने या प्रकल्पाला मनापासून पाठिंबा दिला. याशिवाय, दाविदाने हजारो लेव्यांच्या तुकड्या करून त्यांना विविध कामांवर नेमले आणि मंदिराच्या बांधकामासाठी मोठ्या प्रमाणावर सोने व रुपे दान केले.—१ इतिहास १७:१, ४, ११, १२; २३:३-६; २८:११, १२; २९:१-५.

३. खऱ्‍या उपासनेकरता केल्या जाणाऱ्‍या व्यवस्थांबद्दल देवाच्या सेवकांची काय मनोवृत्ती आहे?

देवाच्या मंदिरात खऱ्‍या उपासनेकरता केल्या जाणाऱ्‍या व्यवस्थांना विश्‍वासू इस्राएलांनी पाठिंबा दिला. यहोवाचे आधुनिक सेवक या नात्याने आपणही खऱ्‍या उपासनेकरता यहोवाच्या संघटनेच्या पृथ्वीवरील दृश्‍य भागात केल्या जाणाऱ्‍या सर्व व्यवस्थांना पाठिंबा देतो. अशाप्रकारे आपण दाविदासारखी मनोवृत्ती दाखवतो. आपली कुरकुर करण्याची प्रवृत्ती नाही. उलट, आपण यहोवाच्या संघटनेच्या चांगुलपणावर लक्ष केंद्रित करतो. असे कोणकोणते उत्तम लाभ आहेत, की ज्यांच्याबद्दल आपण कृतज्ञता दाखवू शकतो, यावर कधी तुम्ही विचार केला आहे का? तर मग यांपैकी काही उत्तम लाभांचा आता आपण विचार करू या.

पुढाकार घेणाऱ्‍यांबद्दल कृतज्ञता

४, ५. (क) ‘विश्‍वासू व बुद्धिमान दास’ आपली कामगिरी कशाप्रकारे पूर्ण करत आहे? (ख) मिळत असलेल्या आध्यात्मिक अन्‍नाबद्दल काही साक्षीदारांना कसे वाटते?

येशूने पृथ्वीवरील आपल्या सर्वस्वावर नेमलेल्या ‘विश्‍वासू व बुद्धिमान दासाबद्दल’ कृतज्ञता दाखवण्यासाठी आपल्याजवळ ठोस कारणे आहेत. आत्म्याने अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांचा मिळून बनलेला हा दासवर्ग, सुवार्तेच्या प्रचार कार्यात पुढाकार घेतो, उपासनेसाठी सभांचे आयोजन करतो आणि ४०० पेक्षा अधिक भाषांमध्ये बायबल आधारित प्रकाशने तयार करतो. संपूर्ण जगातील कोट्यवधी लोक ‘यथाकाळी खावयास दिल्या जाणाऱ्‍या’ आध्यात्मिक अन्‍नाचा कृतज्ञतापूर्वक आस्वाद घेतात. (मत्तय २४:४५-४७) याविषयी कुरकुर करण्याचा काही प्रश्‍नच उरत नाही.

अनेक वर्षांपासून, यहोवाची साक्षीदार असलेल्या एल्फी नावाच्या एका वृद्ध भगिनीने, दासवर्गाकडून मिळत असलेल्या प्रकाशनांतील शास्त्रवचनीय सल्ला लागू केल्यामुळे सांत्वन आणि साहाय्य अनुभवले आहे. याबद्दल एल्फीला अगदी मनापासून गुणग्राहकता वाटत असल्यामुळे ती लिहिते: “यहोवाची संघटना नसती तर माझं काय झालं असतं, कुणास ठाऊक!” पीटर आणि अमगार्ड देखील पुष्कळ वर्षांपासून यहोवाची सेवा करत आहेत. “यहोवाच्या प्रेमळ व काळजीवाहू संघटनेनं” पुरवलेल्या सर्व प्रकाशनांबद्दल अमगार्ड कृतज्ञता व्यक्‍त करते. या प्रकाशनांत, खास गरजा असलेल्यांसाठी जसे की अंध व कर्णबधिरांसाठी विशेषकरून तयार करण्यात आलेल्या प्रकाशनांचा समावेश आहे.

६, ७. (क) संपूर्ण जगभरातील मंडळ्यांतील कार्यांवर कशाप्रकारे देखरेख केली जाते? (ख) यहोवाच्या संघटनेच्या दृश्‍य भागाविषयी काहींचे काय मत आहे?

यहोवाच्या साक्षीदारांचे नियमन मंडळ, या ‘विश्‍वासू दासाचे’ प्रतिनिधित्व करते. हे नियमन मंडळ आत्म्याने अभिषिक्‍त पुरुषांच्या एका लहानशा गटाचे बनलेले आहे. न्यूयॉर्क ब्रुकलिन येथे यहोवाच्या साक्षीदारांच्या मुख्यालयात हे मंडळ सेवा करते. ते, यहोवाच्या अनुभवी सेवकांना शाखा दफ्तरांत सेवा करण्यास नेमते. ही शाखा दफ्तरे, संपूर्ण जगभरातील ९८,००० पेक्षा अधिक मंडळ्यांच्या कार्यांवर देखरेख करतात. बायबलमध्ये दिलेल्या पात्रतेच्या अनुषंगाने कार्य करणाऱ्‍या पुरुषांना वडील आणि सेवा सेवक म्हणून या मंडळ्यांमध्ये नियुक्‍त केले जाते. (१ तीमथ्य ३:१-९, १२, १३) वडीलजन, त्यांना सोपवलेल्या देवाच्या कळपाचे नेतृत्त्व करतात आणि त्याची प्रेमळपणे काळजी घेतात. या कळपाचा एक भाग होणे आणि संपूर्ण ‘बंधुवर्गात’ असलेल्या प्रेमाचा व एकतेचा अनुभव घेणे किती मोठा आशीर्वाद आहे!—१ पेत्र २:१७; ५:२, ३.

तक्रार करण्याऐवजी बंधूभगिनी सहसा वडिलांकडून मिळणाऱ्‍या प्रेमळ मार्गदर्शनाबद्दल आभार व्यक्‍त करतात. उदाहरणार्थ, तिशीत असलेली बिर्गीट एक ख्रिस्ती पत्नी आहे. किशोरवयात असताना ती वाईट सोबत्यांच्या नादाला लागली आणि तिच्या हातून गंभीर पाप घडणार होते. पण, वडिलांकडून तिला मिळालेल्या बायबलमधील स्पष्ट सल्ल्यामुळे व सहविश्‍वासू बंधूभगिनींच्या आधारामुळे ती एका घातक परिस्थितीतून वाचली. आता बिर्गीटला याविषयी कसे वाटते? ती म्हणते: “मी अजूनही यहोवाच्या अद्‌भुत संघटनेतच आहे, याबद्दल मी मनापासून आभारी आहे.” सतरा वर्षीय आन्द्रेयास म्हणतो: “ही खरोखरच यहोवाची संघटना आहे; जगातली सर्वात अप्रतिम संघटना!” यहोवाच्या संघटनेच्या पृथ्वीवरील दृश्‍य भागाच्या चांगुलपणाबद्दल आपणही अशीच कृतज्ञता बाळगू नये का?

पुढाकार घेणारे अपरिपूर्ण आहेत

८, ९. दाविदाच्या काळातले काही लोक त्याच्याशी कसे वागले आणि त्यांच्या या वागण्यावर दाविदाची काय प्रतिक्रिया होती?

खऱ्‍या उपासनेत पुढाकार घेण्याकरता नेमलेले अपरिपूर्ण आहेत. ते सर्व चुका करतात आणि त्यांच्यातही काही उणीवा आहेत ज्यावर मात करण्याचा ते मनापासून प्रयत्न करत आहेत. यावर आपण नाराज होण्याचे काही कारण आहे का? नाही. प्राचीन इस्राएलमध्ये, ज्यांच्यावर अनेक जबाबदाऱ्‍या सोपवण्यात आल्या होत्या अशा लोकांच्या हातूनही गंभीर चुका घडल्या. उदाहरणार्थ, दावीद तरुण असताना, अस्वस्थ राजा शौलाला शांत करण्याकरता संगीत वाजवण्यासाठी त्याला बोलवण्यात आले. पण नंतर शौलाने दाविदाला ठार मारायचा प्रयत्न केला. दाविदाला आपला जीव मुठीत धरून पळून जावे लागले.—१ शमुवेल १६:१४-२३; १८:१०-१२; १९:१८; २०:३२, ३३; २२:१-५.

काही इस्राएल लोक बेईमान ठरले. जसे की, दाविदाच्या सेनापती यवाबाने शौलाचा नातेवाईक अबनेर याला ठार मारले. अबशालोमाने राजपद मिळण्यासाठी आपला बाप दावीद याच्याविरुद्ध कट रचला. आणि दावीदाचा भरवशाचा सल्लागार अहीथोफेल याने त्याला दगा दिला. (२ शमुवेल ३:२२-३०; १५:१-१७, ३१; १६:१५, २१) तरीपण दाविदाने यांच्याबद्दल मनात राग बाळगून कुरकुर केली नाही किंवा खऱ्‍या उपासनेकडे पाठ फिरवली नाही. दाविदाने याच्या अगदी उलट कार्य केले. जसे की त्याच्यावर जितके क्लेश येत राहिले तितके तो यहोवाच्या आणखी जवळ गेला आणि शौलामुळे त्याला पळून जावे लागले होते तेव्हा जशी त्याने उत्तम मनोवृत्ती दाखवली तीच मनोवृत्ती त्याने कायम राखली. त्यावेळी दाविदाने असे गायिले: “हे देवा, माझ्यावर दया कर, माझ्यावर दया कर; माझा जीव तुझा आश्रय करितो; ही अरिष्टे टळून जाईपर्यंत मी तुझ्या पंखांच्या सावलीचा आश्रय करीन.”—स्तोत्र ५७:१.

१०, ११. गरट्रूट नावाच्या एका ख्रिस्ती भगिनीला तरुण असताना कोणत्या गोष्टीला सामोरे जावे लागले आणि सहविश्‍वासू बंधूभगिनींच्या चुकांविषयी तिने काय म्हटले?

१० आज देवाच्या संघटनेत आपल्याला दगाबाजीविषयी कुरकुर करण्याचे काही कारण नाही कारण देवाच्या संस्थेत असे प्रकार होत नाहीत. ख्रिस्ती मंडळीत फितूर, दुष्ट लोकांना यहोवा, त्याचे दूत आणि आध्यात्मिक मेंढपाळ टिकू देत नाहीत. तरीपण, आपल्या सर्वांना मानवी अपरिपूर्णतेचा सामना करावा लागतो मग ती आपली स्वतःची असो अथवा देवाच्या इतर सेवकांची असो.

११ गरट्रूट दीर्घकाळापासून यहोवाची उपासक होती. ती तरुण असताना एकदा तिच्यावर, ती लबाड आहे, पूर्णवेळेची राज्य उद्‌घोषक नाही, असा खोटा आरोप लावण्यात आला. यावर तिने कशी प्रतिक्रिया दाखवली? गरट्रूटने अशा वागणुकीबद्दल कुरकुर केली का? नाही. सन २००३ मध्ये वयाच्या ९१ व्या वर्षी तिचा मृत्यू व्हायच्या काही काळाआधी तिने आपल्या जीवनातील काही आठवणींविषयी असे सांगितले: “या आणि इतर अनेक अनुभवांनी मला एक गोष्ट शिकवली. ती ही, की यहोवाच्या संघटनेतील लोक चुका करत असले तरीसुद्धा तो त्याचं महत्त्वाचं काम करवून घेत आहे आणि यासाठी तो आपल्यासारख्या अपरिपूर्ण मानवांचाच उपयोग करून घेतो.” गरट्रूटला देवाच्या इतर सेवकांच्या अपरिपूर्णता सहन कराव्या लागत होत्या तेव्हा ती यहोवाला कळकळीने प्रार्थना करीत असे.

१२. (क) पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांनी कोणते वाईट उदाहरण मांडले? (ख) आपण आपले विचार कशावर केंद्रित ठेवावेत?

१२ सर्वात एकनिष्ठ व नीतिमान ख्रिस्ती देखील अपरिपूर्णच असल्यामुळे, कोणा नियुक्‍त सेवकाकडून चूक झाली असली तरीसुद्धा आपण ‘जे काही करू ते कुरकुर न करता’ करत राहू या. (फिलिप्पैकर २:१४) पहिल्या शतकातील ख्रिस्ती मंडळीतल्या काही लोकांच्या वाईट उदाहरणाचे आपण अनुकरण करणे किती दुःखदायक ठरेल! शिष्य यहुदा म्हणतो, की त्याच्या दिवसांतील खोटे शिक्षक ‘प्रभुत्व तुच्छ लेखत होते व थोरांची निंदा करीत’ होते. शिवाय, हे अपराधी “कुरकुर करणारे, असंतुष्ट” होते. (यहूदा ८, १६) ज्यांना कुरकुर करण्याची सवय लागली आहे अशा लोकांचे अनुकरण करण्याऐवजी आपण ‘विश्‍वासू दासाकरवी’ मिळणाऱ्‍या उत्तम गोष्टींवर आपले लक्ष केंद्रित करू या. यहोवाच्या संघटनेचा चांगुलपणा आपण उपभोगत राहू या व ‘जे काही करू ते कुरकुर न करता’ करू या.

“हे वचन कठीण आहे”

१३. येशू ख्रिस्ताच्या काही शिकवणींवर काही लोकांची प्रतिक्रिया काय होती?

१३ पहिल्या शतकातील काही जण, नियुक्‍त सेवकांविरुद्ध तर काही जण येशूच्या शिकवणींविरुद्ध कुरकुर करणारे होते. योहान ६:४८-६९ मध्ये एका अहवालाचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यात येशू म्हणतो: “जो माझा देह खातो व माझे रक्‍त पितो, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे.” “त्याच्या शिष्यांपैकी पुष्कळ जण हे ऐकून म्हणाले, हे वचन कठीण आहे, हे कोण ऐकून घेऊ शकतो?” “आपले शिष्य ह्‍याविषयी कुरकुर करीत आहेत” हे येशूने ओळखले. शिवाय, “त्याच्या शिष्यांपैकी पुष्कळ जण परत गेले आणि ते पुन्हा कधी त्याच्या बरोबर चालले नाहीत.” पण सर्वच शिष्यांनी कुरकुर केली नाही. येशूने आपल्या १२ प्रेषितांना, “तुमचीहि निघून जाण्याची इच्छा आहे काय?” असे विचारले असता काय झाले ते पाहा. प्रेषित पेत्र म्हणाला: “प्रभुजी, आम्ही कोणाकडे जाणार? सार्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळ आहेत; आणि आम्ही विश्‍वास ठेवला आहे व ओळखिले आहे की देवाचा पवित्र तो पुरुष आपण आहा.”

१४, १५. (क) विशिष्ट ख्रिस्ती शिकवणींच्या बाबतीत काही लोक नाराजी का व्यक्‍त करतात? (ख) एमॅन्यूलच्या अनुभवावरून आपण काय शिकू शकतो?

१४ आधुनिक काळांत, देवाच्या लोकांतील केवळ मोजक्याच लोकांनी, विशिष्ट ख्रिस्ती शिकवणींच्या बाबतीत असंतुष्टी दाखवून यहोवाच्या संघटनेच्या दृश्‍य भागाविरुद्ध कुरकुर केली आहे. पण हे असे का घडले? देव ज्याप्रकारे कार्य करतो त्यांबद्दलची अपुरी समज, हे बहुतेकदा कुरकुर करण्यामागचे कारण असते. निर्माणकर्ता आपल्या लोकांना सत्य टप्याटप्याने प्रकट करतो. त्यामुळे, शास्त्रवचनांविषयीची समज वेळोवेळी सुधारत राहते. यहोवाच्या बहुतेक लोकांना या सुधारणेबाबत आनंद होतो. तुरळक लोक “फाजील धार्मिक” होतात आणि सुधारणेबाबत नाराजी व्यक्‍त करतात. (उपदेशक ७:१६) गर्व, हे यामागचे एक कारण असू शकते. आणि काही जण, स्वतंत्रपणे विचार करण्याच्या पाशात पडतात. कुरकुर करण्यामागचे कारण काहीही असो. एक मात्र खरे, की कुरकुर करण्याची प्रवृत्ती विनाशकारक आहे. कारण अशाप्रकारच्या प्रवृत्तीमुळे आपण पुन्हा जग आणि त्याच्या मार्गात जाऊ शकतो.

१५ एमॅन्यूल एक साक्षीदार होता जो ‘विश्‍वासू व बुद्धिमान दास वर्गाने’ पुरवलेली प्रकाशने वाचल्यानंतर त्यात काहीतरी खोट काढायचा. (मत्तय २४:४५) त्याने ख्रिस्ती प्रकाशने वाचायचीच सोडून दिली आणि कालांतराने स्थानीय मंडळीच्या वडिलांनाही त्याने सांगितले, की तो इथूनपुढे यहोवाचा साक्षीदार म्हणून राहू इच्छित नाही. परंतु थोड्याच काळानंतर, यहोवाच्या संघटनेच्याच शिकवणी अगदी खऱ्‍या असल्याचे एमॅन्यूलला जाणवले. त्याने साक्षीदारांशी पुन्हा संपर्क साधला, आपली चूक कबूल केली आणि त्याला यहोवाचा साक्षीदार म्हणून पुन्हा स्वीकारण्यात आले. यामुळे तो पुन्हा एक आनंदी मनुष्य झाला.

१६. कोणकोणत्या गोष्टी केल्याने, विशिष्ट ख्रिस्ती शिकवणींविषयी आपल्या मनात असलेल्या शंका दूर होऊ शकतील?

१६ यहोवाचे लोक मानत असलेल्या काही शिकवणींच्या बाबतीत आपल्या मनात शंका उत्पन्‍न झाल्यामुळे कुरकुर करण्याचा आपल्याला मोह झाला तर काय? अशावेळी आपण अधीर होऊ नये. ‘विश्‍वासू दास’ कधी न्‌ कधी असे लेख छापील ज्यांत आपल्या प्रश्‍नांची उत्तरे असतील व आपल्या शंकांचे निरसन होईल. आपण ख्रिस्ती वडिलांचे साहाय्य घेऊन सुज्ञता दाखवतो. (यहुदा २२, २३) प्रार्थना, व्यक्‍तिगत अभ्यास आणि आध्यात्मिक मनोवृत्तीच्या लोकांबरोबर संगती केल्याने देखील आपल्या मनातील शंका दूर होतील. शिवाय यहोवाच्या दळणवळणाच्या माध्यमाद्वारे आपण शिकत असलेल्या बायबल सत्यांबद्दलची आपली कदर आणखी वाढेल.

सकारात्मक मनोवृत्ती ठेवा

१७, १८. कुरकुर करण्याऐवजी आपण कोणती मनोवृत्ती बाळगू शकतो व का?

१७ अपरिपूर्ण असल्यामुळे आपल्यामध्ये पाप करण्याची वृत्ती जन्मतःच असते, हे आपण कबूल केले पाहिजे. आणि काही लोकांमध्ये, विनाकारण कुरकुर करण्याची प्रवृत्ती इतरांपेक्षा जरा जास्तच असू शकते. (उत्पत्ति ८:२१; रोमकर ५:१२) पण आपल्याला जर कुरकुर करण्याची सवयच जडली असेल तर आपण यहोवा देवाबरोबरचा आपला नातेसंबंध धोक्यात आणत असतो. त्यामुळे कुरकुर करण्याच्या प्रवृत्तीवर आपण वेळीच बांध घातला पाहिजे.

१८ मंडळीतल्या कारभारांवर कुरकुर करण्याऐवजी आपण, सकारात्मक मनोवृत्ती ठेवू शकतो आणि असा एक नित्यक्रम बनवू शकतो जो आपल्याला आध्यात्मिक गोष्टीत व्यस्त, आनंदी, आदरणीय, संतुलित आणि विश्‍वासात सुदृढ ठेवेल. (१ करिंथकर १५:५८; तीत २:१-५) यहोवाची संघटना त्याच्या पूर्ण नियंत्रणात आहे आणि पहिल्या शतकाप्रमाणे आजही येशू ख्रिस्ताला प्रत्येक मंडळीत चाललेल्या घडामोडींची जाणीव आहे. (प्रकटीकरण १:१०, ११) तेव्हा देवावर आणि मंडळीचा मस्तक असलेला ख्रिस्त याच्यावर धीराने अवलंबून राहा. ज्या गोष्टींत सुधारणा झाली पाहिजे त्या कदाचित जबाबदार मेंढपाळांकरवी सुधारल्या जातील.—स्तोत्र ४३:५; कलस्सैकर १:१८; तीत १:५.

१९. मशीही राज्य मानवजातीचे सर्व व्यवहार आपल्या हाती घेईपर्यंत आपण कोणत्या गोष्टींवर आपले लक्ष केंद्रित करू शकतो?

१९ लवकरच या दुष्ट व्यवस्थीकरणाचा नाश होणार आहे आणि मशीही राज्य मानवजातीचे सर्व व्यवहार आपल्या हाती घेणार आहे. पण तोपर्यंत आपण प्रत्येकाने सकारात्मक मनोवृत्ती टिकवून ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे! सकारात्मक मनोवृत्ती बाळगल्याने आपण, आपल्या सहविश्‍वासू बांधवांच्या चुकांवर आपले लक्ष केंद्रित करणार नाही तर त्यांचे चांगले गुण पाहू. त्यांच्या चांगल्या गुणांकडे पाहिल्यामुळे आपण आनंदी होऊ. कुरकुर करून भावनिकरीत्या थकून जाण्याऐवजी आपल्याला उत्तेजन मिळेल आणि आध्यात्मिकरीत्या आपण आणखी मजबूत होऊ.

२०. सकारात्मक मनोवृत्ती बाळगल्यास आपण कोणते आशीर्वाद उपभोगू शकतो?

२० सकारात्मक मनोवृत्ती ठेवल्यास, यहोवाच्या संघटनेच्या पृथ्वीवरील दृश्‍यभागाशी संगती ठेवल्यामुळे आपल्याला मिळालेल्या अनेक आशीर्वादांची आपण आठवण ठेवू शकतो. जगातील ही एकमेव संघटना आहे जी विश्‍वाचा सार्वभौम देव याच्याशी एकनिष्ठ आहे. ही वस्तुस्थिती ऐकून व एकमात्र खरा देव यहोवा याची उपासना करण्याचा आपल्याला जो सन्मान मिळाला आहे त्याविषयी तुम्हाला कसे वाटते? दाविदाप्रमाणे तुमचीही अशीच मनोवृत्ती असो त्याने असे गायिले: “तू जो प्रार्थना ऐकतोस त्या तुझ्याकडे सर्व मानवजाति येते. तुझ्या अंगणात राहण्यासाठी ज्याला तू निवडून घेतोस आणि आपल्याजवळ आणितोस तो धन्य; तुझ्या घरातील, . . . उत्तम लाभांनी आम्ही तृप्त होऊ.”—स्तोत्र ६५:२,. (w०६ ७/१५)

तुम्हाला आठवते का?

• मंडळीत पुढाकार घेणाऱ्‍यांबद्दल आपण कृतज्ञता का दाखवावी?

• जबाबदार पदांवर असलेल्या बांधवांच्या हातून चुका होतात तेव्हा आपली प्रतिक्रिया कशी असावी?

• शास्त्रवचनांच्या समजेबद्दल होणाऱ्‍या सुधारणेबाबत आपला दृष्टिकोन कसा असावा?

• कोणती गोष्ट एखाद्या ख्रिश्‍चन व्यक्‍तीला शंकांवर मात करण्यास मदत करू शकेल?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१३ पानांवरील चित्र]

दाविदाने शलमोनाला मंदिराच्या बांधकामाचा नमुना सुपूर्त केला आणि खऱ्‍या उपासनेला पूर्ण मनाने पाठिंबा दिला

[१६ पानांवरील चित्र]

ख्रिस्ती वडील आध्यात्मिक साहाय्य आनंदाने देतात