व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवा पीडितांना सोडवतो

यहोवा पीडितांना सोडवतो

यहोवा पीडितांना सोडवतो

“नीतिमानाला फार कष्ट होतात; तरी परमेश्‍वर त्या सर्वांतून त्याला सोडवितो.”—स्तोत्र ३४:१९.

१, २. एका ख्रिश्‍चन भगिनीने कोणत्या समस्येचा सामना केला व आपल्याही मनात अशाप्रकारच्या भावना का येऊ शकतात?

 केको * नावाची एक तरुणी २० पेक्षा अधिक वर्षांपासून यहोवाची साक्षीदार आहे. काही काळ तिने, पूर्ण वेळेची राज्य प्रचारक अर्थात सामान्य पायनियर म्हणूनही सेवा केली. तिला लाभलेल्या या सेवेची ती मनापासून कदर करते. परंतु, अलिकडे तिच्या मनात नैराश्‍याच्या भावना येऊ लागल्या होत्या; तिला एकटेपणा जाणवू लागला होता. ती म्हणते: “मी नुसतं रडत राहायची.” मनात नकारात्मक भावना येऊ नयेत म्हणून केको जास्तीत जास्त वेळ व्यक्‍तिगत अभ्यासात खर्च करू लागली. “तरीसुद्धा माझ्या मनात नकारात्मक भावना येतच राहिल्या. मी इतकी निराश झाले, की मला मरून जावंसं वाटू लागलं.” असे ती पुढे म्हणते.

तुमच्याही मनात अशा निराशजनक भावना येतात का? यहोवाचे साक्षीदार असल्यामुळे तुमच्याकडे आनंदण्याची अनेक कारणे आहेत, कारण ईश्‍वरी भक्‍ती “आताच्या व पुढच्याहि जीवनाचे अभिवचन” देते. (१ तीमथ्य ४:८) या घडीला तुम्ही आध्यात्मिक परादिसात आहात! परंतु, याचा अर्थ तुम्ही सर्व पीडांपासून सुरक्षित आहात का? नाही. बायबल म्हणते: “नीतिमानाला फार कष्ट होतात.” (स्तोत्र ३४:१९) यात आश्‍चर्य करण्यासारखे काही नाही, कारण “सगळे जग त्या दुष्टाला वश झाले आहे,” अर्थात सगळे जग सैतानाच्या कह्‍यात आहे. (१ योहान ५:१९) या वस्तुस्थितीची झळ आपल्या सर्वांना या नाही तर त्या मार्गाने लागतेच.—इफिसकर ६:१२.

पीडेचे परिणाम

३. तीव्र मानसिक पीडांचा सामना करावा लागलेल्या बायबलमधील देवाच्या काही सेवकांची उदाहरणे सांगा.

दीर्घकाळपासून आपल्या एखाद्या समस्येवर नाराज राहिल्यास आपला संपूर्ण दृष्टिकोन अंधकारमय होऊ शकतो. (नीतिसूत्रे १५:१५) धार्मिक ईयोबाचे उदाहरण घ्या. त्याच्यावर आलेल्या संकटामुळे अगदी विव्हळ होऊन तो एके प्रसंगी असे म्हणाला: “स्त्रीपासून जन्मलेला मानवप्राणी अल्पायु व क्लेशभरित असतो.” (ईयोब १४:१) ईयोबाचा आनंद नाहीसा झाला होता. यहोवाने आपल्याला त्यागले आहे, असेही एकदा त्याला वाटले. (ईयोब २९:१-५) देवाच्या सेवकांपैकी केवळ ईयोबालाच अशा तीव्र मानसिक यातनांचा सामना करावा लागला नाही तर इतरांनाही करावा लागला. बायबल आपल्याला हन्‍नेविषयी देखील सांगते. मूल होत नसल्यामुळे “तिचे मन व्यथित” झाले होते. (१ शमुवेल १:९-११) घरातील एका गोष्टीला कंटाळून रिबका एकदा म्हणाली: “माझा जीव मला नकोसा झाला आहे.” (उत्पत्ति २७:४६) आपण केलेल्या चुकांबद्दल विचार करत असताना दावीद म्हणाला: “सारा दिवस मी शोक करीत हिंडतो.” (स्तोत्र ३८:६, पं.र.भा.) ख्रिस्तपूर्व युगात देवाला भिऊन वागणाऱ्‍या स्त्रीपुरुषांनाही तीव्र मानसिक पीडांचा सामना करावा लागला होता, हे या तुरळक उदाहरणांवरून दिसून येते.

४. आज ख्रिश्‍चनांमध्ये काही जण “अल्पधीराचे” आहेत, यात आश्‍चर्य करण्यासारखे का नाही?

ख्रिश्‍चनांविषयी काय? “जे अल्पधीराचे आहेत त्यांना धीर द्या,” असे थेस्सलनीकाकरांना सांगणे प्रेषित पौलाला अगत्याचे वाटले. (१ थेस्सलनीकाकर ५:१४) “अल्पधीराचे” असे भाषांतर केलेला ग्रीक शब्द, “जीवनाच्या दबावांखाली तात्पुरत्या काळासाठी दबलेल्या लोकांना” सूचित करू शकतो, असे एका संदर्भ ग्रंथात म्हटले आहे. पौलाच्या शब्दांवरून असे सूचित होते, की थेस्सलनीका मंडळीतील काही आत्म्याने अभिषिक्‍त जण खिन्‍न झाले होते. आजही ख्रिश्‍चनांमध्ये असे निराश झालेले, खचून गेलेले बांधव आहेत. पण हे बंधूभगिनी निराश का होतात? आपण तीन सर्वसामान्य कारणांची चर्चा करू या.

अपरिपूर्णतेमुळे आपण निराश होऊ शकतो

५, ६. रोमकर ७:२२-२५ मधून आपल्याला कोणते सांत्वन मिळते?

खरे ख्रिस्ती भ्रष्ट लोकांसारखे “कोडगे” नाहीत. आपण पापी आहोत, ही जाणीव त्यांना बोचत असते. (इफिसकर ४:१९) त्यांना पौलाप्रमाणे वाटत राहते ज्याने असे लिहिले: “माझा अंतरात्मा देवाच्या नियमशास्त्रामुळे हर्ष करितो; तरी माझ्या अवयवात मला निराळाच नियम दिसतो; तो माझ्या मनातल्या नियमाबरोबर लढतो आणि मला कैद करून माझ्या अवयवातील पापाच्या नियमाच्या स्वाधीन करितो.” मग पौल पुढे म्हणतो: “किती मी कष्टी माणूस!”—रोमकर ७:२२-२४.

पौलाप्रमाणे तुमच्याही मनात असे विचार येतात का? आपल्या अपरिपूर्णतांची जाणीव राखण्यात काही चूक नाही, कारण यामुळे आपल्याला पापाचे गांभीर्य कळते आणि वाईट गोष्टी न करण्याचा आपला निश्‍चय आणखी पक्का होऊ शकतो. पण याचा अर्थ तुम्ही सतत तुमच्या चुकांचा विचार करत चिंतेत बुडून जाण्याची गरज नाही. थोड्या वेळा पूर्वी आपण, पीडेमुळे पौलाने जे शब्द उच्चारले त्यांचा उल्लेख केला होता. तर त्या शब्दांनंतर तो पुढे असे म्हणाला: “आपला प्रभु येशू ख्रिस्त ह्‍याच्या द्वारे मी देवाचे आभार मानतो.” (रोमकर ७:२५) होय, येशूने वाहिलेले रक्‍त आपल्याला वारशाने मिळालेल्या पापातून सोडवू शकते, याची पौलाला खात्री होती.—रोमकर ५:१८.

७. कोणती गोष्ट एखाद्याला, आपल्या पापी प्रवृत्तींमुळे निराश न होण्यास मदत करू शकेल?

तुमच्या पापी स्वभावामुळे तुम्ही अतिशय खिन्‍न झाला असाल तर, प्रेषित योहानाच्या शब्दांतून तुम्ही सांत्वन मिळवू शकता. त्याने असे लिहिले: “जर कोणी पाप केले, तर नीतिसंपन्‍न असा जो येशू ख्रिस्त तो पित्याजवळ आपला कैवारी आहे, आणि तोच आपल्या पापांबद्दल प्रायश्‍चित आहे; केवळ आपल्याच पापांबद्दल नव्हे तर सर्व जगाच्याहि पापांबद्दल आहे.” (१ योहान २:१, २) आपल्या पापी प्रवृत्तींबद्दल तुम्ही नाराज होत असाल तर, येशू परिपूर्ण लोकांसाठी नव्हे तर पापी लोकांसाठी मरण पावला, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. वास्तविक पाहता, आपण ‘सर्वांनी पाप केले आहे व आपण देवाच्या गौरवाला उणे पडले आहोत.’—रोमकर ३:२३.

८, ९. स्वतःला दोषी ठरवणाऱ्‍या भावना आपल्या मनात येतात तेव्हा आपण त्या कुरवाळत का बसू नये?

समजा गतकाळात तुमच्या हातून एखादे गंभीर पाप घडले होते. तुम्ही त्याविषयी यहोवाला एकदा नव्हे तर अनेकदा प्रार्थनाही केली होती. तुम्हाला ख्रिस्ती वडिलांकडून आध्यात्मिक मदतही मिळाली होती. (याकोब ५:१४, १५) पण तुम्ही मनापासून पश्‍चात्ताप केला होता त्यामुळे मंडळीतच राहिला. किंवा कदाचित, काही काळासाठी तुम्ही देवाची संघटना सोडून दिली होती पण नंतर पश्‍चात्ताप करून तुम्ही पुन्हा एकदा शुद्ध भूमिका मिळवली. या दोन्हीपैकी कोणतीही गोष्ट तुमच्या जीवनात घडली असेल. पण आता, गत काळात तुम्ही केलेली चूक तुमच्या मनाला सतत टोचत राहते आणि यामुळे तुम्ही अस्वस्थ होता. असे जर होत असेल तर, एक गोष्ट आठवणीत ठेवा. यहोवा मनापासून पश्‍चात्ताप करणाऱ्‍यांना “भरपूर क्षमा” करतो. (यशया ५५:७) शिवाय, कसलीही आशा नसल्यासारखे तुम्ही स्वतःला दोषी ठरवावे, असे त्याला वाटत नाही. असे तर सैतानाला वाटते. तुमच्या विश्‍वासाचा नाश करण्याची सैतानाची इच्छा आहे. (२ करिंथकर २:७, १०, ११) दियाबलाचा नाश होणार आहे कारण तो त्याच लायकीचा आहे. पण तो आपल्याही मनात आपण नाशास पात्र आहोत असे विचार घालण्याचा प्रयत्न करतो. (प्रकटीकरण २०:१०) तेव्हा, तुमच्या विश्‍वासाचा नाश करण्यासाठी सैतान जे डाव रचत आहे, त्यात त्याला यशस्वी होऊ देऊ नका. (इफिसकर ६:११) त्याऐवजी, या आणि इतर बाबतीतही, “त्याच्याविरुद्ध विश्‍वासांत दृढ असे उभे राहा.”—१ पेत्र ५:९.

प्रकटीकरण १२:१० मध्ये सैतानाचे वर्णन अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना अर्थात “आमच्या बंधूंना दोष देणारा” असे करण्यात आले आहे. तो “देवासमोर रात्रंदिवस त्यांच्यावर दोषारोप” करत असतो. या वचनावर मनन केल्यावर तुम्हाला दिसून येईल, की यहोवा तुम्हाला दोषी ठरवत नाही. तर तुम्ही जेव्हा स्वतःला दोषी ठरवता तेव्हा दोषारोप करणाऱ्‍या लबाड सैतानाला याचा खूप आनंदत होतो. (१ योहान ३:१९-२२) असे आहे तर मग, जीव अगदी नकोसा वाटू लागण्यापर्यंत तुम्ही स्वतःच्या चुकांविषयी चिंता करत बसावे का? यहोवाबरोबर असलेला तुमचा नातेसंबंध सैतानाला नष्ट करू देऊ नका. यहोवा “दयाळू व कृपाळू देव, मंदक्रोध, दयेचा व सत्याचा सागर” आहे, ही गोष्ट तुम्हाला दिसू नये, म्हणून सैतान खूप प्रयत्न करतो. पण असे घडण्यासाठी आपण सैतानाला का म्हणून वाव द्यावा?—निर्गम ३४:६.

आपल्या मर्यादांमुळे आपण निराश होऊ शकतो

१०. कोणकोणत्या कारणांमुळे सेवेमधील आपला मर्यादित सहभाग आपल्याला निराश करू शकतो?

१० काही बंधूभगिनी, त्यांना पूर्वीसारखी देवाची सेवा करता येत नाही म्हणून निराश होतात. तुमच्याही बाबतीत हे खरे आहे का? गंभीर आजारपणामुळे, वाढत्या वयोमानामुळे किंवा इतर परिस्थितींमुळे, तुम्ही पूर्वी सेवेत जितका भाग घेत होता तितका आता घेऊ शकत नाही. ख्रिश्‍चनांना देवाच्या सेवेसाठी वेळेचा सदुपयोग करा, असे सांगण्यात आले आहे हे खरे आहे. (इफिसकर ५:१५, १६) पण सेवेत अधिक भाग घेता न येण्यासाठी तुमच्याकडे रास्त कारणे असूनही तुम्ही निराश होत असाल तर काय?

११. गलतीकर ६:४ मधील पौलाच्या सल्ल्याचा आपल्याला कशाप्रकारे लाभ होऊ शकतो?

११ तुम्ही आळशी होऊ नका तर “विश्‍वासाच्या व धीराच्या योगे जे अभिवचनांचा वारसा उपभोगणारे होतात त्यांचे तुम्ही अनुकारी व्हावे,” असे उत्तेजन बायबल आपल्याला देते. (इब्री लोकांस ६:१२) आपण जर त्यांच्या उत्कृष्ट उदाहरणाचे परीक्षण केले आणि त्यांच्या विश्‍वासाचे अनुकरण केले तरच आपण असे करू शकतो. पण आपण जर स्वतःची तुलना इतरांशी अयोग्यरीतीने करू लागलो आणि असा निष्कर्ष काढू लागलो, की आपण जितके करतो तितके पुरेसे नाही तर आपला काही लाभ होणार नाही. यास्तव, आपण पौलाच्या सल्ल्याचे अनुकरण केले पाहिजे. तो म्हणतो: “प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या कामाची परीक्षा करावी म्हणजे त्याला दुसऱ्‍यांच्या संबंधाने नव्हे, तर केवळ स्वतःसंबंधाने अभिमान बाळगण्यास जागा मिळेल.”—गलतीकर ६:४.

१२. आपण यहोवाची जी सेवा करतो त्यात आनंदण्यासाठी आपल्याकडे कारण का आहे?

१२ गंभीर आजारामुळे काही ख्रिश्‍चनांची सेवा मर्यादित असली तरीसुद्धा त्यांच्याकडे आनंदण्याची अनेक कारणे आहेत. बायबल आपल्याला असे आश्‍वासन देते: “तुमचे कार्य व तुम्ही पवित्र जनांची केलेली व करीत असलेली सेवा आणि तुम्ही देवावर दाखविलेली प्रीति, ही विसरून जाण्यास तो अन्यायी नाही.” (इब्री लोकांस ६:१०) तुमच्या कह्‍यात नसलेल्या परिस्थितींमुळे तुम्हाला आता पूर्वीसारखे यहोवाच्या सेवेत भाग घेता येत नाही. पण यहोवाच्या मदतीने तुम्ही ख्रिस्ती सेवेचे इतर पैलू, जसे की टेलिफोनवरून व पत्राद्वारे साक्ष देणे यांसारख्या गोष्टींमध्ये अधिक भाग घेऊ शकता. तुम्ही ही खात्री बाळगू शकता, की तुम्ही मनापासून यहोवा देवाची सेवा करता, त्याच्यावर आणि सहमानवांवर प्रेम करता म्हणून तो तुम्हाला निश्‍चित आशीर्वादित करेल.—मत्तय २२:३६-४०.

‘कठीण दिवसांमुळे’ आपण निराश होऊ शकतो

१३, १४. (क) कोणकोणत्या मार्गांनी हे ‘कठीण दिवस’ आपल्याला पीडित करू शकतात? (ख) आज लोक ममताहीन झाले आहेत हे कशावरून दिसून येते?

१३ भवितव्यात देवाच्या धार्मिक नव्या जगात राहण्याची आपल्याला आशा असली तरी, आता आपण ‘शेवटल्या काळच्या कठीण दिवसात’ जगत आहोत. (२ तीमथ्य ३:१) आपला मुक्‍तिसमय किती जवळ आला आहे, हे आजच्या अस्वस्थ करणाऱ्‍या घटनांकडे पाहून कळते तेव्हा आपल्याला किती दिलासा मिळतो. पण तोपर्यंत आपल्या अवतीभोवती घडणाऱ्‍या घटनांचा आपल्यावर परिणाम हा होतच राहील. उदाहरणार्थ, तुमच्याकडे नोकरी नाही का? आपण जिथे राहतो तिथे कदाचित नोकऱ्‍यांचा तुटवडा असेल. आणि जसजसे महिने सरत राहतात तसतसे तुम्हाला वाटत राहील, की माझ्यावर आलेली दयनीय अवस्था यहोवाला दिसत नाही का किंवा तो माझ्या प्रार्थना खरोखरच ऐकतोय की नाही. किंवा कदाचित तुम्हाला भेदभाव दाखवला जात असेल अथवा तुमच्यावर अन्याय होत असेल. रोजचा पेपरसुद्धा जेव्हा आपण चाळतो तेव्हा त्यातल्या बातम्या वाचून आपले मन खिन्‍न होते; धार्मिक पुरुष लोट, त्याच्या आजूबाजूला असलेल्या कामातूर लोकांच्या वर्तनाने असाच ‘विटला’ होता किंवा कंटाळून गेला होता.—२ पेत्र २:७.

१४ शेवटल्या दिवसाच्या चिन्हांतील एक चिन्ह असे आहे, ज्याकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही. अनेक लोक “ममताहीन” होतील, असे बायबलमध्ये भाकीत करण्यात आले आहे. (२ तीमथ्य ३:३) पुष्कळ घरात, कुटुंबातील प्रेमाचा ओलावा आटत चालला आहे. कुटुंबातील हिंसाचार (इंग्रजी) नावाच्या पुस्तकात असे म्हटले आहे: “पुरावा सूचित करतो, की पुष्कळ लोक, इतरांपेक्षा आपल्याच कुटुंबातील एखाद्या सदस्याकडून ठार मारले जातात, त्यांना मारहाण केली जाते, मानसिकरीत्या किंवा लैंगिकरीत्या त्यांचे शोषण केले जाते. लोकांना जिथे प्रेम मिळाले पाहिजे व जिथे सुरक्षित वाटले पाहिजे असे ठिकाण, काही प्रौढांसाठी व मुलांसाठी सर्वात घातक ठिकाण बनले आहे.” जे लोक अशी अहितकारक परिस्थिती असलेल्या घरात लहानाचे मोठे होतात त्या लोकांना जीवनात पुढे चिंता आणि नैराश्‍याचा सामना करावा लागतो. तुमच्याबाबतीत हे खरे असेल तर काय?

१५. यहोवाचे प्रेम इतर मानवांपेक्षा श्रेष्ठ कसे आहे?

१५ स्तोत्रकर्त्याने असे गायिले: “माझ्या आईबापांनी मला सोडिले तरी परमेश्‍वर मला जवळ करील.” (स्तोत्र २७:१०) यहोवाचे प्रेम कोणत्याही मानवी पालकापेक्षा श्रेष्ठ आहे, या गोष्टीची जाणीव किती सांत्वनदायक आहे! तुमच्या पालकाने तुम्हाला स्वीकारण्यास नकार दिला असेल, तुम्हाला गैरवागणूक दिली असेल, किंवा तुम्हाला सोडून दिले असेल; परंतु याचा, यहोवा तुमची किती काळजी घेतो त्याजशी काहीएक संबंध नाही. (रोमकर ८:३८, ३९) देव ज्यांच्यावर प्रेम करतो अशा लोकांना तो स्वतःकडे आकर्षित करतो, ही गोष्ट लक्षात ठेवा. (योहान ३:१६; ६:४४) मानव तुम्हाला कसेही वागवत असले तरी, तुमच्या स्वर्गीय पित्याचे मात्र तुमच्यावर प्रेम आहे.

निराशेवर मात करण्यासाठी काही व्यावहारिक पावले

१६, १७. एखादी व्यक्‍ती निराश होते तेव्हा आपले आध्यात्मिक बळ टिकवून ठेवण्यासाठी ती काय करू शकते?

१६ निराशेच्या भावनेवर मात करण्यासाठी तुम्ही काही व्यावहारिक पावले उचलू शकता. जसे की ख्रिस्ती सेवेत पूर्णपणे सहभाग घ्या. तुम्ही जेव्हा निराश होता तेव्हा विशेषकरून देवाच्या वचनावर मनन करा. स्तोत्रकर्त्याने असे गायिले: “माझा पाय घसरला, असे मी म्हणालो, तेव्हा हे परमेश्‍वरा, तुझ्या दयेने मला आधार दिला. माझे मन अनेक चिंतांनी व्यग्र होते तेव्हा तुझ्यापासून लाभणारे सांत्वन माझ्या जिवाचे समाधान करिते.” (स्तोत्र ९४:१८, १९) नियमित बायबल वाचनामुळे तुम्ही तुमचे मन सांत्वन व उभारी देणाऱ्‍या शब्दांनी भरू शकता.

१७ प्रार्थना करणे देखील महत्त्वाचे आहे. तुम्ही तुमच्या भावनांना शब्दरूप देऊ शकत नसला तरी तुम्हाला नेमके काय म्हणायचे आहे, हे यहोवाला माहीत आहे. (रोमकर ८:२६, २७) स्तोत्रकर्त्याने असे आश्‍वासन दिले: “तू आपला भार परमेश्‍वरावर टाक म्हणजे तो तुझा पाठिंबा होईल; नीतिमानाला तो कधीहि ढळू देणार नाही.”—स्तोत्र ५५:२२.

१८. नैराश्‍याचा आजार असलेली व्यक्‍ती कोणती पावले उचलू शकते?

१८ काही लोकांना नैराश्‍याचा आजार असतो. याला क्लिनिकल डिप्रेशन म्हणतात. * तुम्हाला जर हा आजार असेल तर तुम्ही देवाच्या नव्या जगावर आपले लक्ष केंद्रित करायचा प्रयत्न करू शकता. तसेच, “मी रोगी आहे असे एकहि रहिवासी म्हणणार नाही,” असा जो काळ येणार आहे त्या काळाचाही तुम्ही विचार करू शकता. (यशया ३३:२४) तुमच्या मनात नकारात्मक भावना अधूनमधून नव्हे तर सारख्याच येत असतील तर तुम्ही मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेतली पाहिजे. (मत्तय ९:१२) शिवाय, तुम्ही तुमच्या शरीराची देखील काळजी घेतली पाहिजे. पोषक आहार आणि काही प्रमाणात व्यायाम तुम्हाला मदत करू शकतो. तसेच तुम्ही पुरेशी झोप घेतली पाहिजे. रात्री उशिरापर्यंत टीव्ही पाहत बसू नका आणि तुम्ही शारीरिकरीत्या व मानसिकरीत्या थकून जाल अशाप्रकारचे मनोरंजन टाळा. यासर्वांहून महत्त्वाचे म्हणजे, देवाला संतुष्ट करणाऱ्‍या कार्यांत भाग घ्या! आपल्या ‘डोळ्यांचे सर्व अश्रू पुसून टाकण्याची’ यहोवाची अद्याप वेळ आलेली नसली तरी तो तुम्हाला सर्वकाही सहन करण्याची शक्‍ती देऊ शकतो.—प्रकटीकरण २१:४; १ करिंथकर १०:१३.

“देवाच्या पराक्रमी हाताखाली” राहा

१९. पीडितांना यहोवा कोणते वचन देतो?

१९ नीतिमानाला फार कष्ट होत असले तरी, यहोवा “त्या सर्वांतून त्याला सोडवितो,” असे आश्‍वासन बायबल देते. (स्तोत्र ३४:१९) कसे सोडवतो? पौलाने जेव्हा यहोवाला, आपल्या शरीरातल्या काट्यापासून मुक्‍तता मिळण्यासाठी वारंवार प्रार्थना केली तेव्हा यहोवाने त्याला सांगितले: “अशक्‍तपणातच शक्‍ति पूर्णतेस येते.” (२ करिंथकर १२:७-९) यहोवाने पौलाला काय वचन दिले आणि तो तुम्हाला काय वचन देतो? तो तुम्हाला लगेच बरे करण्याचे वचन देत नाही तर सहनशक्‍ती देण्याचे वचन देतो.

२०. आपल्यावर कितीही परीक्षा येत असल्यातरी, १ पेत्र ५:६, ७ आपल्याला काय आश्‍वासन देते?

२० प्रेषित पेत्राने असे लिहिले: “देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा, ह्‍यासाठी की, त्याने योग्य वेळी तुम्हास उंच करावे. त्याच्यावर तुम्ही आपली सर्व चिंता टाका कारण तो तुमची काळजी घेतो.” (१ पेत्र ५:६, ७) यहोवाला तुमची काळजी असल्यामुळे तो तुम्हाला सोडणार नाही. तुम्हाला कितीही परीक्षांचा सामना करावा लागत असला तरी देखील तो तुमच्या पाठीशी उभा राहील. विश्‍वासू ख्रिस्ती “देवाच्या पराक्रमी हाताखाली” आहेत, हे लक्षात ठेवा. आपण यहोवाची सेवा करतो तेव्हा तो आपल्याला सहनशक्‍ती देतो. आपण जर त्याला विश्‍वासू राहिलो तर कोणतीही गोष्ट आपल्याला आध्यात्मिक अर्थाने त्याच्यापासून कायमचे दूर करू शकणार नाही. यास्तव, आपण यहोवाशी एकनिष्ठ राहू या जेणेकरून त्याने वचन दिलेल्या नव्या जगात सार्वकालिक जीवनाचा उपभोग घेऊ शकू आणि तो दिवस पाहू जेव्हा सर्व पीडितांना त्याने कायमचे सोडवलेले असेल! (w०६ ७/१५)

[तळटीपा]

^ परि. 1 नाव बदलण्यात आले आहे.

^ परि. 18 नैराश्‍याचा आजार झालेला रुग्ण केवळ निरुत्साहितच होत नाही तर डॉक्टरांच्या निदानानुसार ती एक अशी अवस्था आहे ज्यात रुग्ण तीव्रपणे उदास होतो व तो या अवस्थेतच राहतो. अधिक माहितीसाठी, टेहळणी बुरूज ऑक्टोबर १५, १९८८, पृष्ठे २५-९ (इंग्रजी); नोव्हेंबर १५, १९८८, पृष्ठे २१-४ (इंग्रजी); आणि सप्टेंबर १, १९९६, पृष्ठे ३०-१ पाहा.

तुम्हाला आठवते का?

• यहोवाच्या सेवकांनाही पीडांचा सामना का करावा लागतो?

• कोणकोणत्या कारणांमुळे देवाचे काही लोक निराश होऊ शकतात?

• आपल्या चिंतांचा सामना करण्यासाठी यहोवा आपली मदत कशी करतो?

• कोणत्या अर्थाने आपण “देवाच्या पराक्रमी हाताखाली” आहोत?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१७ पानांवरील चित्रे]

यहोवाच्या लोकांवर परीक्षा येत असल्यातरी त्यांच्याजवळ आनंदण्याची कारणे आहेत

[२० पानांवरील चित्र]

यहोवाची मनापासून सेवा करण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे टेलिफोनवरून साक्षकार्य करणे