व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

नीतिसूत्रे ८:२२-३१ यात केलेले बुद्धीचे वर्णन, येशू ख्रिस्त पृथ्वीवर येण्याआधीच्या त्याच्या स्वर्गातील अस्तित्वाच्या संदर्भात आहे असे आपण कशावरून म्हणू शकतो?

नीतिसूत्रांच्या पुस्तकात बुद्धीविषयी पुढील देवप्रेरित वर्णन वाचायला मिळते: “परमेश्‍वराने सृष्टिक्रमाच्या आरंभी आपल्या प्राचीन कृत्यांतील पहिले कृत्य, असे मला पैदा केले. . . . पर्वत स्थापित झाल्यापूर्वी, डोंगरांपूर्वी, मला निर्माण केले; . . . त्याने आकाश स्थापिले तेव्हा मी होते; . . . तेव्हा मी त्याच्यापाशी कुशल कारागीर होते; मी त्याला नित्य आनंददायी होते; त्याच्यासमोर मी सर्वदा हर्ष पावत असे; त्याच्या पृथ्वीवर मी हर्ष करी; मनुष्यजातीच्या ठायी मी आनंद पावे.”

हे वर्णन देवाच्या बुद्धीविषयी किंवा निव्वळ बुद्धी या गुणाविषयी असू शकत नाही. का बरे? कारण येथे ज्या बुद्धीचे वर्णन करण्यात आले आहे, तिला यहोवाच्या सृष्टिक्रमाच्या आरंभी “पैदा” म्हणजेच निर्माण करण्यात आले. पण, देव तर अनादिकालापासून अस्तित्वात आहे आणि अनादिकालापासूनच बुद्धिमान आहे. (स्तोत्र ९०:१, २) त्याअर्थी, देवाच्या बुद्धीला सुरुवात नाही; त्याच्या बुद्धीला निर्माण किंवा “पैदा” करण्यात आले नाही. शिवाय, येथे वर्णन केलेल्या बुद्धीला एका चालत्याबोलत्या व्यक्‍तीच्या रूपात चित्रित करण्यात आले आहे. यावरून कळते की हे एका व्यक्‍तीचे वर्णन आहे.—नीतिसूत्रे ८:१.

नीतिसूत्रांचे पुस्तक सांगते की फार पूर्वी बुद्धी निर्माणकर्त्या यहोवापाशी, एक “कुशल कारागीर” होती. हे वर्णन निश्‍चितच येशूला लागू होते. येशू पृथ्वीवर आला त्याच्या बऱ्‍याच काळाआधी तो यहोवासोबत निकट सहवासात राहून काम करत होता. म्हणूनच देवाचे वचन त्याच्याविषयी असे म्हणते: “तो सर्वांच्या पूर्वीचा आहे व त्याच्यामध्ये सर्व काही अस्तित्वात आहे.”—कलस्सैकर १:१७; प्रकटीकरण ३:१४.

देवाच्या पुत्राचे वर्णन बुद्धीच्या रूपात करणे अगदी योग्य आहे कारण त्यानेच मनुष्यांना यहोवाच्या उद्देशांबद्दल व निर्णयांबद्दल ज्ञान देण्याद्वारे त्याच्या अफाट बुद्धीचे दर्शन घडविले. पृथ्वीवर येण्याआधी येशू देवाचा शब्द होता, म्हणजेच त्याच्याद्वारे देव आपली वचने कळवत होता. (योहान १:१) त्याचे वर्णन “देवाचे सामर्थ्य व देवाचे ज्ञान” म्हणजेच बुद्धी असे करण्यात आले आहे. (१ करिंथकर १:२४, ३०) मनुष्यजातीच्या ठायी आनंद मानून त्यांच्याकरता आपले जीवन खंडणी म्हणून अर्पण करणाऱ्‍या देवाच्या पुत्राविषयी किती हे सुरेख वर्णन!—योहान ३:१६. (w०६ ८/१)