व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

सुज्ञ व्हा—देवाची भीती बाळगा

सुज्ञ व्हा—देवाची भीती बाळगा

सुज्ञ व्हा—देवाची भीती बाळगा

“परमेश्‍वराचे भय ज्ञानाचा आरंभ होय.”—नीतिसूत्रे ९:१०.

१. अनेकांना देवाची भीती बाळगण्याची कल्पना समजायला कठीण का वाटते?

 एक असा काळ होता जेव्हा, एखाद्या व्यक्‍तीला देव-भीरू म्हटल्यास ते प्रशंसनीय समजले जात असे. आज, अनेक लोकांना देवाचे भय बाळगण्याची कल्पना, जुन्या विचारसरणीची तसेच समजायला कठीण वाटते. ते कदाचित विचारतील, ‘जर देव प्रीती आहे तर मी त्याची भीती का बाळगावी?’ त्यांच्या मते, भीती म्हणजे नकारात्मक, गर्भगळीत करून टाकणारी भावना. परंतु, देवाबद्दलची खरी भीती केवळ एक भावना नव्हे. तिच्या अनेक अर्थछटा आहेत. याविषयी आपण या लेखात चर्चा करणार आहोत.

२, ३. देवाबद्दल खरे भय बाळगण्यात कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो?

बायबलमध्ये, देवाची भीती बाळगा असे सकारात्मक अर्थाने म्हटलेले आहे. (यशया ११:३) देवाची भीती बाळगण्यात देवाबद्दल गाढ पूज्यभाव व आदर आणि त्याला असंतुष्ट न करण्याची तीव्र इच्छा या गोष्टींचा समावेश होतो. (स्तोत्र ११५:११) देवाचे नैतिक स्तर स्वीकारून त्यांचे काटेकोरपणे पालन करणे तसेच देवाच्या मते जे बरोबर आहे व जे चूक आहे, ते स्वीकारून त्यानुसार जगण्याची इच्छा बाळगणे, असाही त्याचा अर्थ होतो. हितकारक भय म्हणजे, “देवाप्रती अशी योग्य मनोवृत्ती बाळगल्यामुळे आपण सुज्ञपणे वागतो आणि प्रत्येक वाईट गोष्ट टाळतो,” असे एक संदर्भ ग्रंथ म्हणतो. यास्तव, देवाचे वचन अगदी उचितपणे म्हणते: “परमेश्‍वराचे भय ज्ञानाचा आरंभ होय.”—नीतिसूत्रे ९:१०.

होय, देवाच्या भीतीचा संबंध मनुष्याच्या व्यवहारांतील अनेक पैलूंशी आहे. देवाचे भय बाळगल्यामुळे केवळ बुद्धीच नव्हे तर आनंद, शांती, समृद्धता, दीर्घायुष्य, आशा, भरवसा, विश्‍वास उत्पन्‍न होतो. (स्तोत्र २:११; नीतिसूत्रे १:७; १०:२७; १४:२६; २२:४; २३:१७, १८; प्रेषितांची कृत्ये ९:३१) देवाच्या भयाचा विश्‍वास आणि प्रीती याजशी जवळून संबंध आहे. यामध्ये, देवाबरोबर आणि सहमानवांबरोबर आपला संपूर्ण नातेसंबंध गोवलेला आहे. (अनुवाद १०:१२; ईयोब ६:१४; इब्री लोकांस ११:७) आपण देवाचे भय बाळगतो तेव्हा आपला हा पूर्ण आत्मविश्‍वास असतो, की आपला स्वर्गीय पिता स्वतः आपली काळजी घेतो आणि आपल्या चुका माफ करण्यास तयार असतो. (स्तोत्र १३०:४) फक्‍त निर्ढावलेले दुष्ट लोकच देवाला घाबरतात. *इब्री लोकांस १०:२६-३१.

यहोवाचे भय बाळगण्यास शिकणे

४. यहोवाचे ‘भय बाळगण्याचे’ शिकण्यास काय आपली मदत करेल?

सुज्ञ निर्णय घेण्याकरता व देवाचे आशीर्वाद मिळवण्याकरता त्याच्याबद्दल भय बाळगणे महत्त्वाचे असल्यामुळे आपण यहोवाचे ‘भय बाळगायला’ कसे शिकू शकतो? (अनुवाद १७:१९) बायबलमध्ये देवाला भिऊन वागलेल्या अनेक स्त्रीपुरुषांची उदाहरणे ‘आपल्या शिक्षणाकरता लिहून’ ठेवण्यात आली आहेत. (रोमकर १५:४) देवाचे भय बाळगणे म्हणजे नेमके काय, हे समजण्यासाठी आपण बायबलमध्ये लिहून ठेवण्यात आलेल्या त्या व्यक्‍तींच्या जीवनावर थोडा विचार करू या. त्यांपैकी एक व्यक्‍ती आहे, प्राचीन इस्राएलचा राजा दावीद.

५. मेंढ्यांची राखण करता करता दावीद यहोवाचे भय बाळगण्यास कसे शिकला?

इस्राएलचा पहिला राजा शौल याला देवापेक्षा लोकांचे अधिक भय वाटत असल्यामुळे, देवाने त्याला नाकारले. (१ शमुवेल १५:२४-२६) दुसऱ्‍या बाजूला पाहता, दाविदाची जीवनशैली आणि यहोवाबरोबरचा त्याचा घनिष्ठ नातेसंबंध यांमुळे, तो खरोखरच एक देव-भीरू माणूस बनला होता, असे त्याचे वर्णन केले जाते. दावीद लहानपणापासून आपल्या वडिलांच्या मेंढ्यांची राखण करायचा. (१ शमुवेल १६:११) चांदण्या रात्रीत मेंढ्यांची राखण करता करता आकाशाकडे पाहून देवाबद्दल मनन केल्यामुळे त्याला यहोवाचे भय समजले असावे. दाविदाला या प्रचंड विश्‍वाचा केवळ एक लहानसा भाग उमगला असला तरी, त्याने हा उचित निष्कर्ष काढला, की देव आपल्या आदरास व गौरवास पात्र आहे. त्याने नंतर असे लिहिले: “आकाश जे तुझे अंगुलीकार्य, व त्यात तू नेमलेले चंद्र व तारे ह्‍यांच्याकडे पहावे तर मर्त्य मनुष्य तो काय की तू त्याची आठवण करावी? मानव तो काय की तू त्याला दर्शन द्यावे?”—स्तोत्र ८:३, ४.

६. यहोवाची महती उमगल्यावर दाविदाला कसे वाटले?

लुकलुकणाऱ्‍या नक्षत्रांच्या प्रचंड आकाशाकडे पाहिल्यावर आपण किती क्षुद्र आहोत, हे दाविदाला समजले. पण यामुळे तो गर्भगळीत झाला नाही. उलट या जाणीवेमुळे तो यहोवाची स्तुती करण्यास व असे म्हणण्यास प्रवृत्त झाला, की: “आकाश देवाचा महिमा वर्णिते; अंतरिक्ष त्याची हस्तकृति दर्शविते.” (स्तोत्र १९:१) यहोवाबद्दल हा पूज्यभाव असल्यामुळे दावीद त्याच्याकडे आकर्षित झाला; त्याच्या परिपूर्ण मार्गांविषयी शिकण्याची व त्यांचे अनुकरण करण्याची इच्छा त्याच्या मनात उत्पन्‍न झाली. “तू थोर व अद्‌भुत कृत्ये करणारा आहेस; तूच केवळ देव आहेस. हे परमेश्‍वरा, तुझा मार्ग मला दाखीव; मी तुझ्या सत्यमार्गाने चालेन; तुझ्या नावाचे भय धरण्यास माझे चित्त एकाग्र कर” असे जेव्हा दाविदाने यहोवाबद्दल गायिले, तेव्हा दाविदाला कसे वाटले असेल याची कल्पना करा.—स्तोत्र ८६:१०, ११.

७. देवाचे भय बाळगल्यामुळे दावीद गल्याथाशी कसा लढू शकला?

पलिष्टी जेव्हा इस्राएल देशात घुसले तेव्हा गल्याथ नावाचा त्यांचा साडे नऊ फूट उंचीचा धिप्पाड योद्धा इस्राएलांची थट्टा करू लागला. तो खरे तर त्यांना म्हणत होता: ‘चला, माझ्याबरोबर झटापटी करायला तुमच्यातल्या एकाला निवडा! तो जर जिंकला तर आम्ही तुमचे दास!’ (१ शमुवेल १७:४-१०) शौल आणि त्याच्या संपूर्ण सैन्याची कंबर ढिली झाली. दावीद मात्र धैर्याने उभा राहिला. त्याला माहीत होते, की आपण, माणसाची नव्हे तर फक्‍त यहोवाची भीती बाळगली पाहिजे, मग तो माणूस कितीही बलाढ्य असला तरी. दावीद गल्याथाला म्हणाला: “सेनाधीश परमेश्‍वराच्या नामाने मी तुझकडे आलो आहे. . . . आणि या सगळ्या समुदायास कळून येईल की परमेश्‍वर तरवारीने व भाल्याने विजयी होतो असे नाही; कारण हे युद्ध परमेश्‍वराचे आहे.” यहोवाच्या साहाय्याने आणि आपल्या गोफणीतून मारलेल्या फक्‍त एका गोट्यानेच दाविदाने त्या अजस्र राक्षसाला जमिनीवर लोळवले.—१ शमुवेल १७:४५-४७.

८. देवाला भिऊन वागलेल्यांची बायबलमधील उदाहरणे आपल्याला काय शिकवतात?

आपण अनेक अडीअडचणींचा सामना करत असू, किंवा दाविदाला सामोरे जावे लागलेल्या शत्रूंप्रमाणे आपल्याला देखील शत्रूंचा सामना करावा लागेल. अशावेळी आपण काय करू शकतो? दावीद आणि प्राचीन काळातल्या इतर विश्‍वासू लोकांनी ज्याप्रकारे देवाबद्दल भय दाखवले त्याप्रकारे आपणही दाखवू शकतो. देवाचे भय माणसाच्या भीतीला नमवू शकते. देवाचा विश्‍वासू सेवक नहेम्या याने, विरोधकांच्या दबावाखाली आलेल्या आपल्या सहइस्राएलांना म्हटले: “त्यांची भीति धरू नका; थोर व भयावह जो परमेश्‍वर त्याचे स्मरण” करा. (नहेम्या ४:१४) यहोवाच्या मदतीने दावीद, नहेम्या आणि देवाचे इतर विश्‍वासू सेवक, देवाने त्यांना दिलेली नेमणूक यशस्वीरीत्या पार पाडू शकले. आपणही देवाची भीती बाळगली तर आपली नेमणूक यशस्वीरीत्या पार पाडू शकू.

देवाचे भय बाळगून समस्यांना तोंड देणे

९. कोणकोणत्या परिस्थितीत दाविदाने देवाबद्दल भय असल्याचे दाखवले?

गल्याथाला पराजीत केल्यानंतर यहोवाने दाविदाला अनेक विजय मिळवून दिले. हे पाहून शौल जळफळला. त्याने दाविदाला ठार मारायचा प्रयत्न केला. पण एकदाच प्रयत्न करून तो थांबला नाही. भावनाविवश होऊन त्याने पहिला प्रयत्न केला असला तरी नंतर मात्र त्याने दाविदाला ठार मारण्याकरता कट रचला. पण त्याचा हा प्रयत्नही जेव्हा फसला तेव्हा शेवटी त्याने सैन्यबळाचा उपयोग केला. यहोवाने दाविदाला, तू राजा होणार असे आश्‍वासन दिले असले तरीसुद्धा, यहोवाची नियुक्‍त वेळ येईपर्यंत अर्थात कित्येक वर्षांपर्यंत त्याला आपला जीव मुठीत घेऊन पळावे लागले, लढावे लागले, थांबून राहावे लागले. पण या सर्व काळांत दाविदाने, त्याला खऱ्‍या देवाचे भय आहे, हे दाखवून दिले.—१ शमुवेल १८:९, ११, १७; २४:२.

१०. जीवघेण्या परिस्थितीत दाविदाने, त्याला देवाचे भय असल्याचे कशाप्रकारे दाखवून दिले?

१० एकदा असेच शौलापासून पळत असताना दावीद, गथा या पलिष्टी शहराचा राजा आखीश याच्या आश्रयाला आला होता. गल्याथ याच शहराचा होता. (१ शमुवेल २१:१०-१५) हा तर आपल्या राष्ट्राचा शत्रू आहे, हे राजाच्या सेवकांनी ओळखले. जीवावर बेतलेल्या या परिस्थितीत दाविदाने कशी प्रतिक्रिया दाखवली? त्याने यहोवाला अगदी कळकळून प्रार्थना केली. (स्तोत्र ५६:१-४, ११-१३) तेथून जिवंत वाचण्याकरता त्याला वेड्याचे सोंग घ्यावे लागले तरी, त्याने केलेल्या प्रयत्नांना यहोवाने यश दिल्यामुळेच खरे तर तो या जीवघेण्या परिस्थितीतून वाचला, हे दाविदाला माहीत होते. त्याने पूर्णपणे यहोवावर भरवसा व विश्‍वास ठेवला. यावरून तो खरोखर एक देव-भीरू मनुष्य असल्याचे दिसून आले.—स्तोत्र ३४:४-६, ९-११.

११. दाविदाने जसे परीक्षेत देवाचे भय दाखवले तसेच आपणही कसे दाखवू शकतो?

११ आपल्यावर जेव्हा समस्या येतात तेव्हा आपल्याला मदत करण्याचे यहोवा जे आश्‍वासन देतो त्यावर भरवसा ठेवून दाविदाप्रमाणे आपणही दाखवून देऊ शकतो, की आपल्याला देवाचे भय आहे. दाविदाने म्हटले: “आपला जीवितक्रम परमेश्‍वरावर सोपवून दे; त्याच्यावर भाव ठेव म्हणजे तो तुझी कार्यसिद्धि करील.” (स्तोत्र ३७:५) याचा अर्थ असा होत नाही, की आपल्यावर समस्या येतात तेव्हा आपण त्या यहोवावर टाकून द्याव्यात आणि आपल्यापरीने काही प्रयत्न करू नयेत; यहोवाने आपल्या समस्या सोडवाव्यात, अशी अपेक्षा करावी. दाविदाने यहोवाला फक्‍त मदतीसाठी प्रार्थना करून मग स्वतः काही प्रयत्न करायचे सोडून दिले नाही. यहोवाने त्याला दिलेल्या शारीरिक क्षमतेचा व बुद्धिचा त्याने उपयोग केला आणि समोर आलेल्या परिस्थितीला तोंड दिले. पण, केवळ स्वतःच्या प्रयत्नांनी त्याला यश मिळणार नाही हे दाविदाला माहीत होते. आपणही ही गोष्ट समजून घेतली पाहिजे. आपल्याला जमतील ते प्रयत्न आपण केले पाहिजेत, आणि बाकीचे यहोवावर सोडून दिले पाहिजे. किंबहुना, बरेचदा यहोवावर विसंबून राहण्याव्यतिरिक्‍त आपल्या हातात काहीही नसते. अशावेळी आपल्याला व्यक्‍तिगतरीत्या देवाचे भय आहे हे आपण दाखवून देतो. दाविदाने मनापासून जे व्यक्‍त केले त्याद्वारे आपल्यालाही सांत्वन मिळू शकते: “परमेश्‍वराचे सख्य त्याचे भय धरणाऱ्‍याशी असते.”—स्तोत्र २५:१४.

१२. आपण आपल्या प्रार्थना गांभिर्याने का घ्याव्यात, व आपली कोणती मनोवृत्ती कधीच असू नये?

१२ त्यामुळे, देवाला प्रार्थना करणे व त्याच्याबरोबरचा आपला नातेसंबंध या गोष्टींना आपण गांभिर्याने घेतले पाहिजे. यहोवाला आपण प्रार्थना करतो तेव्हा “असा विश्‍वास ठेवला पाहिजे की, तो आहे, आणि त्याचा शोध झटून करणाऱ्‍यांना तो प्रतिफळ देणारा आहे.” (इब्री लोकांस ११:६; याकोब १:५-८) आणि तो आपली मदत करतो तेव्हा आपण प्रेषित पौल आपल्याला जो सल्ला देतो त्याप्रमाणे ‘कृतज्ञता’ दाखवली पाहिजे. (कलस्सैकर ३:१५, १७) आपण अशा लोकांप्रमाणे असू नये ज्यांच्याविषयी एका अनुभवी अभिषिक्‍त ख्रिश्‍चनाने असे म्हटले: “ते देवाला स्वर्गातला वेटर समजतात. त्यांना जेव्हा त्याची गरज असते तेव्हा ते त्याला चुटकीने इशारा करून आपल्याजवळ बोलवतात. आणि मग हवी असलेली गोष्ट मिळाल्यानंतर त्याने तेथून निघून जावे, असे त्यांना वाटते.” अशाप्रकारच्या मनोवृत्तीने देवाचे भय दिसून येत नाही.

देवाबद्दलचे भयच नाहीसे झाले तेव्हा

१३. देवाच्या नियमशास्त्राबद्दल दाविदाने अनादर केव्हा दाखवला?

१३ संकटकाळी यहोवाचे साहाय्य अनुभवल्यामुळे दाविदाचे देवाबद्दलचे भय आणखी गहिरे झाले आणि त्याच्यावरील त्याचा भरवसा आणखी पक्का झाला. (स्तोत्र ३१:२२-२४) परंतु, तीन प्रसंगी दाविदाच्या मनातून देवाबद्दलचे भय नाहीसे झाले, ज्याचे परिणाम दुःखद घडले; या तिन्ही प्रसंगांची आपण दखल घेणे महत्त्वाचे आहे. पहिला प्रसंग, तो जेव्हा जेरुसलेमहून यहोवाचा कोश आणायची व्यवस्था करत होता तेव्हाचा आहे. देवाच्या नियमशास्त्रात म्हटले होते, की यहोवाचा कोश लेव्यांनी आपल्या खांद्यावर वाहून न्यावा. परंतु दावीद तो एका गाडीत ठेवून आणू इच्छित होता. गाडी हाकणाऱ्‍या उज्जाने जेव्हा तो कोश खाली पडण्यापासून त्याला रोखले, तेव्हा त्याने उद्धटपणे केलेल्या “चुकीमुळे” तो जागीच मरण पावला. होय, उज्जाने घोर पाप केले होते; पण हे सर्व दाविदामुळेच घडले होते. कारण दाविदाने देवाच्या नियमशास्त्राबद्दल योग्य आदर दाखवला नव्हता. देवाचे भय बाळगणे म्हणजे देवाच्या पद्धतीनुसार कार्य करणे.—२ शमुवेल ६:२-९; गणना ४:१५; ७:९.

१४. दाविदाने इस्राएलांच्या केलेल्या गणतीचा काय परिणाम झाला?

१४ दुसऱ्‍या प्रसंगी, सैतानाने चिथावल्यामुळे दाविदाने इस्राएली सैनिकांची गणती केली. (१ इतिहास २१:१) असे करण्याद्वारे दाविदाने, आपल्याला देवाचे भय नसल्याचे दाखवले. याचा परिणाम काय झाला? ७०,००० इस्राएली मृत्यूमुखी पडले. यावर दाविदाने पश्‍चात्ताप केला तरी, त्याला आणि त्याच्या बरोबरच्या लोकांना अतिशय दुःखद परिणाम भोगावे लागले.—२ शमुवेल २४:१-१६.

१५. कोणत्या कारणामुळे दावीद आपल्या वासनेच्या आहारी गेला?

१५ आणखी एके प्रसंगी दावीदाच्या मनातून देवाबद्दलचे भय काही काळासाठी नाहीसे झाल्यामुळे त्याने उरीयाची पत्नी बथशेबा हिच्याबरोबर अनैतिक संबंध ठेवले. व्यभिचार किंवा दुसऱ्‍या पुरुषाच्या पत्नीची अभिलाषा करणे पाप आहे, हे दाविदाला माहीत होते. (निर्गम २०:१४, १७) त्याने बथशेबाला स्नान करताना पाहिले तेव्हा त्याच्या मनात चुकीची इच्छा जागृत झाली. देवाबद्दलचे योग्य भय असते तर दाविदाने लगेच आपली नजर तेथून हटविली असती आणि त्यावर विचार करण्याचे थांबवले असते. पण असे करण्याऐवजी तो तिच्याकडे ‘पाहत राहिला,’ आणि शेवटी त्याची वासना देवाच्या भयापेक्षा प्रबळ ठरली. (मत्तय ५:२८; २ शमुवेल ११:१-४) यहोवाचा आपल्या जीवनाशी किती जवळून संबंध आहे, हे दावीद तात्पुरत्या काळासाठी विसरून गेला.—स्तोत्र १३९:१-७.

१६. दाविदाला आपल्या चुकीमुळे कोणते परिणाम भोगावे लागले?

१६ दावीद आणि बथशेबाच्या या अनैतिक संबंधातून त्यांना एक मुलगा झाला. त्यानंतर, यहोवाने आपला संदेष्टा नाथान याला दाविदाचे पाप उघडकीस आणण्यासाठी पाठवले. शुद्धीवर आल्यानंतर दाविदाच्या मनात देवाबद्दलचे भय पुन्हा जागृत झाले आणि त्याने पश्‍चात्ताप केला. आपल्याला सोडून देऊ नये किंवा आपल्याकडचा पवित्र आत्मा काढून घेऊ नये म्हणून दाविदाने यहोवाला भीक मागितली. (स्तोत्र ५१:७, ११) यहोवाने दाविदाला क्षमा केली आणि त्याची शिक्षा कमी केली परंतु त्याच्या कार्यांच्या सर्व दुष्परिणामांपासून त्याला वाचवले नाही. दाविदाचा मुलगा मरण पावला आणि तेव्हापासून त्याच्या कुटुंबावर एकावर एक दुःखद समस्या येत राहिल्या. देवाचे भय विसरून गेल्याबद्दल किती मोठी किंमत त्याला मोजावी लागली!—२ शमुवेल १२:१०-१४; १३:१०-१४; १५:१४.

१७. पापी कार्यांमुळे दुःखद परिणाम घडतात याचे उदाहरण द्या.

१७ आजही, नैतिक गोष्टींबाबतीत देवाचे भय न बाळगल्यामुळे गंभीर व दीर्घकालीन परिणाम घडू शकतात. एका तरुण पत्नीला तिचा पती परदेशात असताना तिच्याशी विश्‍वासू नसल्याचे समजले तेव्हा तिला खूप मानसिक यातना झाल्या! तिला ही बातमी ऐकून धक्काच बसला. आपले तोंड दोन्ही हातांनी झाकून ती खाली वाकली आणि अगदी ओक्साबोक्शी रडली. तिच्या नवऱ्‍याला तिचा विश्‍वास आणि तिचा आदर मिळवायला किती दिवस लागतील? पण एखाद्याला देवाबद्दल खरोखर भय जर असेल तर तो अशाप्रकारचे दुःखद परिणाम वेळीच टाळू शकतो!—१ करिंथकर ६:१८.

देवाबद्दलचे भय आपल्याला पाप करण्यापासून रोखते

१८. सैतानाचा काय हेतू आहे व तो कोणत्या कार्यपद्धतीचा उपयोग करतो?

१८ सैतान या जगाच्या नैतिक स्तरांचा झपाट्याने नाश करत आहे व विशेषकरून तो खऱ्‍या ख्रिश्‍चनांना भ्रष्ट करू पाहतोय. हा उद्देश पूर्ण करण्यासाठी, तो आपल्या हृदयात व मनात जाणारा सर्वात थेट मार्ग अर्थात आपल्या ज्ञानेंद्रियांवर विशेषकरून आपले डोळे आणि आपले कान यांच्यावर वाईट प्रभाव पाडतो. (इफिसकर ४:१७-१९) तुमच्या डोळ्यांसमोर अचानक जेव्हा अनैतिक चित्रे किंवा लोक येतात किंवा तुमच्या कानांवर अनैतिक शब्द पडतात तेव्हा तुम्ही कशी प्रतिक्रिया दाखवाल?

१९. देवाच्या भयाने एका ख्रिस्ती बांधवाला मोहावर मात करण्यास कशाप्रकारे मदत केली?

१९ ख्रिस्ती मंडळीत वडील असलेले ॲन्ड्रे * युरोपमध्ये डॉक्टर आहेत. ते एक पिता देखील आहेत. त्यांना जेव्हा हॉस्पिटलमध्ये रात्र पाळी असायची तेव्हा त्यांच्याबरोबर काम करणाऱ्‍या महिला कर्मचारी त्यांच्या उशीवर हृदयाची चित्रे असलेल्या चिटोऱ्‍या टाचण्यांनी लावून ठेवायच्या. आपल्याबरोबर संबंध ठेवण्याचे हे इशारे होते. पण ॲन्ड्रे या अनैतिक प्रस्तावांना ठामपणे धुडकावत होते. इतकेच नव्हे तर या वाईट वातावरणातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी ते काम सोडून देऊन दुसरीकडे काम पाहिले. देवाचे भय बाळगल्यामुळे ते केवळ सुज्ञच ठरले नाहीत, तर त्यांना यामुळे अनेक आशीर्वादही मिळाले. आज ते आपल्या देशांतील यहोवाच्या साक्षीदारांच्या शाखा दफ्तरांत अर्ध-वेळेसाठी सेवा करत आहेत.

२०, २१. (क) देवाचे भय आपल्याला पाप करण्यापासून कसे रोखू शकते? (ख) पुढच्या लेखात कशाचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे?

२० चुकीचे विचार मनात घोळत राहू दिल्यास आपण, आपला काहीही अधिकार नसलेल्या गोष्टींसाठी, यहोवा देवाबरोबरचा आपला अमूल्य नातेसंबंध तोडण्यास तयार होतो. (याकोब १:१४, १५) दुसऱ्‍या बाजूला पाहता, आपण जर यहोवाचे भय बाळगले तर, आपण आपले नैतिक बळ कमी करणाऱ्‍या लोकांपासून, ठिकाणांपासून, कार्यांपासून व मनोरंजनापासून दूर राहू. फक्‍त दूरच राहणार नाही तर त्यांच्यापासून दूर पळून जाऊ. (नीतिसूत्रे २२:३) देवाची संमती गमावण्यापेक्षा आपल्याला संकोच किंवा त्याग परवडेल. (मत्तय ५:२९, ३०) देवाचे भय बाळगणे यांत, मुद्दामहून कोणत्याही प्रकारची अनैतिक, अश्‍लील चित्रे न पाहणे व त्याऐवजी ‘निरर्थक गोष्टी पाहण्यापासून आपली दृष्टि वळवणे’ समाविष्ट आहे. असे जर आपण केले तर मग आपण ही खात्री बाळगू शकतो, की यहोवा आपल्याला “नवजीवन” आणि आपल्याला हव्या असलेल्या सर्व गोष्टी देईल.—स्तोत्र ८४:११; ११९:३७.

२१ होय, देवाचे खरे भय बाळगून त्यानुसार कार्य करण्यातच शहाणपण आहे. शिवाय त्याने खरा आनंदही मिळतो. (स्तोत्र ३४:९) याविषयीचे अधिक स्पष्टीकरण पुढच्या लेखात करण्यात आले आहे. (w०६ ८/१)

[तळटीपा]

^ परि. 3 यहोवाचे साक्षीदार प्रकाशित करत असलेल्या सावध राहा! या मासिकाच्या फेब्रुवारी ८, १९९८ अंकातील, “एका प्रेमळ देवाचे भय तुम्ही कसे बाळगू शकता?” हा लेख पाहा.

^ परि. 19 नाव बदलण्यात आले आहे.

तुम्ही स्पष्टीकरण देऊ शकाल?

• देवाचे भय यांत कोणत्या ख्रिस्ती गुणांचा समावेश होतो?

• देवाबद्दलचे भय, माणसाच्या भयावर कशाप्रकारे मात करते?

• प्रार्थनेविषयी आपला योग्य दृष्टिकोन आहे हे आपण कसे दाखवू शकतो?

• देवाबद्दलचे भय आपल्याला पाप करण्यापासून कसे रोखू शकते?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२३ पानांवरील चित्र]

यहोवाची निर्मितीकार्ये पाहिल्यावर दाविदाला देवाचे भय उमगले

[२४ पानांवरील चित्रे]

मोहात पाडू शकणारी एखादी परिस्थिती तुमच्यासमोर अचानक येते तेव्हा तुमची प्रतिक्रिया काय असेल?