व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

स्तोत्रसंहितेच्या तिसऱ्‍या व चवथ्या पुस्तकांतील ठळक मुद्दे

स्तोत्रसंहितेच्या तिसऱ्‍या व चवथ्या पुस्तकांतील ठळक मुद्दे

यहोवाचे वचन सजीव आहे

स्तोत्रसंहितेच्या तिसऱ्‍या व चवथ्या पुस्तकांतील ठळक मुद्दे

स्तोत्रकर्त्याने प्रार्थनेत देवाला असा प्रश्‍न विचारला: “तुझ्या कृपेचे वर्णन शवगर्तेंत होईल काय? विनाशस्थानी तुझ्या सत्यतेचे वर्णन होईल काय?” (स्तोत्र ८८:११) या प्रश्‍नाचे उत्तर अर्थातच, ‘नाही’ असेच असू शकते. कारण जिवंत असल्याशिवाय आपण यहोवाचे गौरव करू शकत नाही. यहोवाचे गौरव करणे हे जगण्याकरता एक उत्तम कारण आहे. आणि आपण जिवंत आहोत यामुळेच आपल्याला त्याचे गौरव करण्याची प्रेरणा मिळाली पाहिजे.

स्तोत्रसंहितेच्या तिसऱ्‍या व चवथ्या भागांत ७३ ते १०६ या स्तोत्रांचा समावेश आहे. या स्तोत्रांचे परीक्षण करताना आपल्याला आपल्या निर्माणकर्त्याचे गौरव करण्याची आणि त्याच्या नावाची स्तुती करण्याची अनेक कारणे सापडतील. या स्तोत्रांवर मनन केल्यामुळे, नक्कीच ‘देवाच्या वचनाबद्दल’ आपली कृतज्ञता वाढेल आणि त्याचे गुणगान आणखी चांगल्याप्रकारे करण्याची प्रेरणा आपल्याला मिळेल. (इब्री लोकांस ४:१२) तेव्हा, आपण उत्कंठापूर्वक, स्तोत्रसंहितेतल्या तिसऱ्‍या भागाकडे प्रथम लक्ष देऊ या.

“देवाजवळ जाणे ह्‍यातच माझे कल्याण आहे”

(स्तोत्र ७३:१–८९:५२)

स्तोत्रांच्या तिसऱ्‍या संग्रहातील पहिली ११ स्तोत्रे आसाफने किंवा त्याच्याच भाऊबंदांनी लिहिली आहेत. यांपैकी पहिल्या गीतात, अयोग्यप्रकारे विचार केल्यामुळे आसाफ कशाप्रकारे देवापासून दूर जाण्याच्या बेतात होता, पण कोणत्या गोष्टीने त्याला सावरले याविषयीचे वर्णन आहे. शेवटी, तो अगदी योग्य निष्कर्षावर येतो आणि म्हणतो: “माझ्याविषयी म्हटले तर देवाजवळ जाणे ह्‍यातच माझे कल्याण आहे.” (स्तोत्र ७३:२८) यानंतरचे म्हणजे ७४ वे स्तोत्र, जेरूसलेमच्या विनाशाबद्दलचे शोकगीत आहे. ७५, ७६ व ७७ ही स्तोत्रे दाखवतात की यहोवा नीतिमान न्यायाधीश, नम्र लोकांचा कैवारी आणि प्रार्थना ऐकणारा आहे. ७८ व्या स्तोत्रात मोशेपासून दाविदापर्यंत इस्राएलच्या इतिहासाचे वर्णन केले आहे. ७९ वे स्तोत्र मंदिराच्या विनाशाबद्दल शोक व्यक्‍त करते. यानंतर देवाच्या लोकांना पुन्हा त्यांच्या मायदेशी वसवण्यासंबंधी एक प्रार्थना आहे. ८१ वे स्तोत्र आपल्याला यहोवाच्या आज्ञांचे पालन करण्यास आर्जवते. तर ८२ व ८३ या स्तोत्रांत स्तोत्रकर्ता अशी प्रार्थना करतो की देवाने दुष्ट न्यायाधीशांचा व देवाच्या शत्रूंचा नाश करावा.

कोरहपुत्रांनी रचलेल्या एका स्तोत्रात म्हटले आहे की “माझ्या जिवाला परमेश्‍वराच्या अंगणाची उत्कंठा लागली असून तो झुरत आहे.” (स्तोत्र ८४:२) स्तोत्र ८५ यात बंदिवासातून मुक्‍त होऊन आलेल्या यहुदी लोकांवर देवाने आशीर्वाद द्यावा अशी विनंती केली आहे. शारीरिक आशीर्वादांपेक्षा आध्यात्मिक आशीर्वाद कित्येक पटीने जास्त मोलाचे आहेत यावर या स्तोत्रात भर देण्यात आला आहे. स्तोत्र ८६ यात दावीद संरक्षण व मार्गदर्शन देण्याची देवाला विनंती करतो. स्तोत्र ८७ हे सियोनेविषयी गायिलेले गीत असून त्यानंतरच्या स्तोत्र ८८ यात यहोवाला केलेली एक प्रार्थना आहे. स्तोत्र ८९ हे दाविदासोबत केलेल्या करारातून देवाची प्रेमदया कशाप्रकारे दिसून येते यावर प्रकाश टाकते. एथान याने हे स्तोत्र रचले असून, तो शलमोनाच्या काळातल्या चार बुद्धिमान पुरुषांपैकी एक असावा.—१ राजे ४:३१.

शास्त्रवचनीय प्रश्‍नांची उत्तरे:

७३:९—दुर्जन “आपले तोंड आकाशापर्यंत पोचवितात; त्यांची जीभ जगभर मिरविते” याचा काय अर्थ होतो? दुर्जनांना स्वर्गात किंवा पृथ्वीवर कोणाबद्दलही आदर नसल्यामुळे ते आपल्या तोंडाने देवाची निंदा करण्याचे धाडस करतात. शिवाय आपल्या जिभेने ते इतर मनुष्यांविरुद्धही चहाड्या करतात.

७४:१३, १४—यहोवाने “जलाशयांतील मगरींची मस्तके” ठेचली व “लिव्याथानाच्या मस्तकाचा चुराडा” केला असे जे म्हणण्यात आले आहे, ते केव्हा घडले? ‘मिसर देशाच्या फारो राजाला’ ‘आपल्या नद्यांत पडून राहणारा मोठा मगर’ म्हणण्यात आले आहे. (यहेज्केल २९:३) आणि लिव्याथान कदाचित फारोच्या सैन्यातल्या शूरवीरांना म्हणण्यात आले असावे. तेव्हा, यहोवाने इस्राएली लोकांना ईजिप्तच्या गुलामीतून सोडवताना फारो व त्याच्या सैन्याचा जो सत्यानाश केला त्याची तुलना त्यांची मस्तके ठेचण्याशी केली असावी.

७५:४, ५, १० (पं.र.भा.)—या वचनांत ‘शिंगांचा’ उल्लेख का करण्यात आला आहे? प्राण्यांच्या शिंगांचा शक्‍तिशाली शस्त्राच्या रूपात उपयोग केला जाऊ शकतो. त्यामुळे लाक्षणिक अर्थाने ‘शिंग’ हे सामर्थ्य किंवा शक्‍तीचे प्रतीक आहे. यहोवा आपल्या लोकांची शिंगे उंच करतो याचा अर्थ तो त्यांना मोठेपणा देतो. तर ‘दुष्टांची शिंगे तो तोडून टाकतो.’ आपल्याला ताकीद देण्यात आली आहे की आपण ‘आपले शिंग उंच करू नये,’ म्हणजेच गर्विष्ठ किंवा उर्मट मनोवृत्तीने वागू नये. उन्‍नती देणारा यहोवा असल्यामुळे, एखाद्याला मंडळीत जबाबदारीच्या पदावर नियुक्‍त केले जाते तेव्हा ही नियुक्‍ती यहोवाकडून आहे असा दृष्टिकोन आपण बाळगला पाहिजे.—स्तोत्र ७५:७.

७६:१०—“मनुष्याचा क्रोध” यहोवाच्या स्तुतीचे साधन कसे बनू शकतो? आपण देवाचे सेवक असल्यामुळे जेव्हा लोक क्रोधिष्ट होऊन आपल्याशी वागतात, आणि देव असे घडू देतो, तेव्हा यातूनही चांगले परिणाम निष्पन्‍न होऊ शकतात. कारण आपल्याला जो काही त्रास सहन करावा लागतो त्यातून आपल्याला काही न काही शिकायला मिळते. आणि अशाप्रकारच्या वाईट अनुभवांतून आपल्याला हे प्रशिक्षण मिळेपर्यंतच यहोवा आपल्यावर दुःख येऊ देतो. (१ पेत्र ५:१०) उरलेल्या किंवा ‘अवशिष्ट क्रोधाने देव आपली कंबर बांधितो.’ पण आपल्याला मृत्यूपर्यंत त्रास सहन करावा लागला तर? तर यातूनही यहोवाची स्तुती होऊ शकते कारण जे आपल्याला दुःख सहन करून शेवटपर्यंत विश्‍वासू राहिलेले पाहतात ते देवाचे गौरव करण्यास प्रवृत्त होऊ शकतात.

७८:२४, २५—मान्न्याला “स्वर्गातले धान्य” आणि “दिव्यदूतांची भाकर” का म्हणण्यात आले आहे? या दोन्ही वचनांत देवदूत मान्‍ना खातात असे सुचवलेले नाही. मान्न्याला “स्वर्गातले धान्य” म्हटले आहे कारण तो स्वर्गातून आला. (स्तोत्र १०५:४०) ‘दिव्यदूत’ हे स्वर्गात राहात असल्यामुळे “दिव्यदूतांची भाकर” या वाक्यांशाचा केवळ इतकाच अर्थ आहे की मान्‍ना हा स्वर्गात राहणाऱ्‍या देवाने पुरवला होता. (स्तोत्र ११:४) इस्राएली लोकांना मान्‍ना पुरवण्याकरता देवाने देवदुतांचा उपयोग केला असण्याचीही शक्यता आहे.

८२:१, तळटीप, ६—‘देव’ व “परात्पराचे पुत्र” कोणाला म्हटले आहे? हे दोन्ही शब्दप्रयोग इस्राएल राष्ट्रात न्याय करणाऱ्‍या मानवी शास्त्यांच्या संदर्भात वापरण्यात आले आहेत. आणि त्यांना असे म्हणणे योग्यच आहे कारण हे शास्ते देवाच्या वतीने बोलणारे, त्याचे प्रतिनिधी होते.—योहान १०:३३-३६.

८३:२—‘डोके वर काढण्याचा’ काय अर्थ होतो? या कृतीवरून आपल्या सामर्थ्याचा उपयोग करण्यास तयार असण्याचा किंवा काही कार्यवाही करण्यास, सहसा विरोध, प्रतिकार किंवा अत्याचार करण्यास तयार असण्याचा अर्थ सूचित होतो.

आपल्याकरता धडे:

७३:२-५, १८-२०, २५, २८. दुष्टांची समृद्धी पाहून आपण त्यांचा हेवा करू नये किंवा त्यांच्या दुष्ट मार्गांचे अनुकरण करू नये. कारण निसरड्या जागेवर उभे असलेल्या माणसासारखी या दुष्टांची स्थिती आहे. आज न उद्या ते नक्कीच ‘पडतील’ व त्यांचा ‘नाश’ होईल. शिवाय, अपरिपूर्ण मनुष्याच्या राज्यात दुष्टाई पूर्णपणे काढून टाकणे अशक्य आहे. तेव्हा आपण असा प्रयत्न करणे व्यर्थच ठरेल. आसाफाप्रमाणे, ‘देवाजवळ जाऊन’ आणि त्याच्यासोबत जवळचा नातेसंबंध जोडून दुष्टाईला तोंड देणे हाच सुज्ञतेचा मार्ग आहे.

७३:३, ६, ८, २७. गर्विष्ठपणा, अहंकार, थट्टा व जुलूम करणे यांपासून आपण सांभाळून राहिले पाहिजे. अशा प्रवृत्तींमुळे आपला फायदा होऊ शकतो असे वाटले तरीसुद्धा आपण त्या टाळल्या पाहिजेत.

७३:१५-१७. आपण एखाद्या गोष्टीबद्दल गोंधळलेल्या मनःस्थितीत असतो तेव्हा आपल्या मनातले विचार जाहीर करण्यापासून आपण स्वतःला आवरले पाहिजे. ‘ह्‍याप्रमाणे बोलल्यास’ काही चांगले तर साध्य होणारच नाही, उलट आपले बोलणे ऐकून इतरांचेही धैर्य खचेल. तेव्हा, आपल्याला ज्या गोष्टी गोंधळात टाकत आहेत त्यांविषयी आपण शांतपणे मनन करून सहविश्‍वासू बांधवांच्या सहवासात त्या समस्येचे निरसन केले पाहिजे.—नीतिसूत्रे १८:१.

७३:२१-२४. दुष्टांची सुबत्ता पाहून “खिन्‍न” होणे हे अज्ञानी पशूंप्रमाणे वागण्यासारखे आहे. उतावीळपणाने भावनांच्या भरात वागणारा मनुष्य सहसा अशी प्रतिक्रिया दाखवतो. याउलट, आपण यहोवाच्या मार्गदर्शनाप्रमाणे चालून, तो आपला ‘उजवा हात धरून’ नेहमी आपल्याला आधार देईल असा भरवसा बाळगला पाहिजे. शिवाय, यहोवा ‘गौरवाने आपला स्वीकार करेल’ म्हणजेच आपल्यासोबत जवळचा नातेसंबंध जोडेल.

७७:६. आध्यात्मिक सत्यांविषयी मनःपूर्वक चिंतन करण्याकरता व त्यांचा प्रयत्नपूर्वक शोध घेण्याकरता आपण वेळ काढला पाहिजे. अशाप्रकारे सखोल अभ्यास व मनन करण्याकरता आपल्या नित्यक्रमातून निदान काही वेळ एकांतात घालवणे अत्यंत महत्त्वाचे आहे!

७९:९. यहोवा आपल्या प्रार्थना ऐकतो. विशेषतः त्याच्या नावाच्या पवित्रिकरणाच्या संदर्भात केलेल्या प्रार्थना.

८१:१३, १६. यहोवाचे वचन ऐकल्याने व त्याच्या मार्गांत चालल्याने अनेक आशीर्वाद मिळतात.—नीतिसूत्रे १०:२२.

८२:२, ५. अन्यायामुळे ‘पृथ्वीचे आधारस्तंभ’ ढळतात. अन्यायी कृत्यांमुळे मानवी समाजातले स्थैर्य नष्ट होते.

८४:१-४, १०-१२. स्तोत्रकर्त्यांना यहोवाच्या मंदिराविषयी अर्थात त्याच्या उपासनेच्या केंद्राविषयी वाटणारी कदर आणि तेथे सेवा करण्याची सुसंधी मिळाल्याबद्दल त्यांना वाटणारे समाधान अनुकरणीय आहे.

८६:५. यहोवा “क्षमाशील” आहे याबद्दल आपण किती कृतज्ञ असले पाहिजे! पश्‍चात्ताप करणाऱ्‍या व्यक्‍तीला जिच्या आधारावर दया दाखवता येईल, अशी लहानशी गोष्टही दिसून येते का याकडे सतत यहोवाचे डोळे लागलेले असतात.

८७:५, ६. देवाच्या राज्यात, जे पृथ्वीवर जीवनाचा उपभोग घेतील त्यांना स्वर्गीय जीवनाकरता पुनरुत्थान झालेल्या व्यक्‍तींची नावे कधी समजतील का? या वचनांच्या आधारावर ही शक्यता नाकारता येत नाही.

८८:१३, १४. विशिष्ट समस्येविषयी केलेल्या प्रार्थनेचे उत्तर मिळण्यास उशीर लागत असल्यास, कदाचित यहोवा आपली श्रद्धा व समर्पण कितपत प्रामाणिक आहे हे पाहू इच्छित असावा.

‘त्याचे उपकारस्मरण करा, त्याच्या नावाचा धन्यवाद करा’

(स्तोत्र ९०:१–१०६:४८)

स्तोत्रसंहितेतल्या चवथ्या भागात यहोवाचा महिमा वर्णण्याची अनेक कारणे दिली आहेत. ९० व्या स्तोत्रात मोशे ‘सनातन राजा’ यहोवा याच्या चिरकालिक अस्तित्वाची तुलना मनुष्याच्या क्षणभंगुर जीवनाशी करतो. (१ तीमथ्य १:१७) स्तोत्र ९१:२ यानुसार मोशे यहोवाला आपला ‘आश्रय व दुर्ग,’ अर्थात आपला संरक्षणकर्ता म्हणतो. पुढच्या काही स्तोत्रांत देवाच्या मनोहर गुणांविषयी, त्याच्या श्रेष्ठ विचारांविषयी व अद्‌भुत कार्यांविषयी त्याची स्तुती केलेली आहे. कमीतकमी तीन स्तुतीगीते “परमेश्‍वर राज्य करतो” या शब्दांनी सुरू होतात. (स्तोत्र ९३:१; ९७:१; ९९:१) यहोवानेच आपल्याला उत्पन्‍न केले आहे असे म्हणून स्तोत्रकर्ता आपल्याला सांगतो की आपण ‘त्याचे उपकारस्मरण करावे, त्याच्या नावाचा धन्यवाद करावा.’—स्तोत्र १००:४.

यहोवाचे भय बाळगून चालणाऱ्‍या राजाने कसे वागावे? दावीद राजाने रचलेल्या १०१ व्या स्तोत्रात या प्रश्‍नाचे उत्तर सापडते. पुढच्या स्तोत्रात आपल्याला असे सांगितले आहे की यहोवा ‘निराश्रितांच्या प्रार्थनेकडे लक्ष देईल; त्यांची प्रार्थना तो तुच्छ मानणार नाही.’ (स्तोत्र १०२:१७) स्तोत्र १०३, यहोवाची प्रेमदया व क्षमाशीलता यांकडे आपले लक्ष वेधते. पृथ्वीवर देवाने केलेल्या अनेक सृष्टिकार्यांविषयी स्तोत्रकर्ता या शब्दांत त्याची स्तुती करतो: “हे परमेश्‍वरा, तुझी कृत्ये किती विविध आहेत! ती सर्व तू सूज्ञतेने केली.” (स्तोत्र १०४:२४) चवथ्या भागातल्या शेवटल्या दोन गीतांत यहोवाच्या महत्कृत्यांची स्तुती केली आहे.—स्तोत्र १०५:२, ५; १०६:७, २२.

शास्त्रवचनीय प्रश्‍नांची उत्तरे:

९१:१, २—‘परात्पराचे गुप्त स्थल’ काय आहे आणि आपण तेथे कोणत्या अर्थाने “वसतो?” हे सुरक्षिततेचे एक लाक्षणिक स्थल, अर्थात, आध्यात्मिकरित्या हानी होण्यापासून संरक्षण मिळण्याची स्थिती आहे. हे गुप्त स्थल आहे कारण जे देवावर भरवसा ठेवत नाहीत त्यांना ते सापडत नाही. आपण यहोवाला आपला आश्रय व दुर्ग मानण्याद्वारे, या विश्‍वाचा सार्वभौम शासक म्हणून त्याला कबूल करण्याद्वारे आणि राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करण्याद्वारे यहोवाच्या या गुप्त स्थली वसतो. असे केल्यामुळे आपल्याला आध्यात्मिकरित्या सुरक्षित वाटते कारण यहोवा सदैव आपल्याला मदत करण्यास तयार आहे याची आपल्याला खात्री असते.—स्तोत्र ९०:१.

९२:१२—नीतिमान कशाप्रकारे ‘खजुरीसारखे समृद्ध होतात’? खजुरीच्या झाडाचे वैशिष्ट्य म्हणजे ते भरपूर फळ देणारे झाड आहे. नीतिमान खजुरीच्या झाडासारखा असतो कारण तो यहोवाच्या नजरेत सरळ असतो आणि आपल्या सत्कृत्यांच्या रूपात तो ‘चांगले फळ’ देत राहतो.—मत्तय ७:१७-२०.

आपल्याकरता धडे:

९०:७, ८, १३, १४. आपण वाईट कृत्ये करतो तेव्हा खऱ्‍या देवासोबत आपला नातेसंबंध नक्कीच बिघडतो. आणि आपण कितीही प्रयत्न केला तरी आपली गुप्त पापे आपण त्याच्यापासून लपवू शकत नाही. पण, जर आपण मनापासून पश्‍चात्ताप करून वाईट मार्गातून मागे फिरलो तर यहोवा आपल्याला पुन्हा एकदा स्वीकारेल आणि त्याच्या ‘दयेने तृप्त’ करेल.

९०:१०, १२. मनुष्याचे जीवन अतिशय अल्पावधीचे असल्यामुळे आपण आपले ‘दिवस गणण्यास’ शिकले पाहिजे. हे आपल्याला कसे करता येईल? ‘सुज्ञ अंतःकरणाने’ किंवा सुज्ञतेने वागून. असे केल्यास, आपले उरलेले दिवस व्यर्थ जाणार नाहीत. उलट, यहोवाला आनंद वाटेल अशाप्रकारे ते आपल्याला घालवता येतील. याकरता आध्यात्मिक गोष्टींना जीवनात इतर गोष्टींपेक्षा जास्त महत्त्व देणे आणि वेळेचा विचारपूर्वक उपयोग करणे महत्त्वाचे आहे.—इफिसकर ५:१५, १६; फिलिप्पैकर १:१०.

९०:१७. “आमच्या हातचे काम सिद्धीस ने,” व सेवाकार्यात आमच्या प्रयत्नांना यश दे अशी यहोवाला प्रार्थना करणे योग्यच आहे.

९२:१४, १५. देवाच्या वचनाचा परिश्रमपूर्वक अभ्यास करून व यहोवाच्या लोकांसोबत नियमित सहवास राखून वयस्कर बंधूभगिनी देखील आध्यात्मिक दृष्टीने “रसभरित व टवटवीत” म्हणजे उत्साही राहतात. आणि ते मंडळीकरता अतिशय मोलवान साहाय्य पुरवतात.

९४:१९. आपल्या मनातील ‘चिंतेचे’ कारण काहीही असो, पण जर आपण यहोवापासून लाभणारे “सांत्वन” मिळवण्याकरता बायबलचे वाचन व मनन केले तर आपल्या जिवाला नक्कीच समाधान मिळेल.

९५:७, ८. आपण जर बायबलवर आधारित असणारे मार्गदर्शन ऐकले, त्याकडे लक्ष दिले आणि त्याचे पालन केले तर आपले मन कठीण होणार नाही.—इब्री लोकांस ३:७, ८.

१०६:३६, ३७. ही वचने मूर्तिपूजेची तुलना दुरात्म्यांना बळी देण्याशी करतात. यावरून हे दिसून येते की मूर्तींची पूजा करणारी व्यक्‍ती दुरात्म्यांच्या प्रभावाखाली येऊ शकते. म्हणूनच बायबल आपल्याला निक्षून सांगते: “स्वतःस मूर्तींपासून दूर राखा.”—१ योहान ५:२१.

“परमेश्‍वराचे स्तवन करा!”

स्तोत्रसंहितेच्या चवथ्या भागातल्या अंतिम तीन गीतांचा शेवट, “परमेश्‍वराचे स्तवन करा!” या शब्दांनी होतो. आणि शेवटल्या गीताची सुरवातही याच आवाहनाने होते. (स्तोत्र १०४:३५; १०५:४५; १०६:१, ४८) “परमेश्‍वराचे स्तवन करा!” हे वाक्य स्तोत्रसंहितेच्या चवथ्या भागात बरेचदा आढळते.

खरोखर, यहोवाची स्तुती करण्याजोगी असंख्य कारणे आपल्याजवळ आहेत. ७३ ते १०६ या स्तोत्रांचे परीक्षण केल्यामुळे आपल्याला मनन करण्याकरता अनेक मुद्दे मिळाले आहेत. आपल्या स्वर्गीय पित्याने केलेल्या सर्व उपकारांचा आपण विचार करतो, तेव्हा आपले मन कृतज्ञतेने भरून येते. आजवर त्याने आपल्याकरता जे केले आहे आणि भविष्यातही जे करणार आहे त्याचा विचार करून, आपल्याला पूर्ण शक्‍तिनिशी यहोवाचे “स्तवन” करण्याची प्रेरणा मिळत नाही का? (w०६ ७/१५)

[४ पानांवरील चित्र]

आसाफाप्रमाणे, आपणही ‘देवाजवळ जाऊन’ दुष्टाईला तोंड देऊ शकतो

[५ पानांवरील चित्र]

फारोचा तांबड्या समुद्रात पराभव झाला

[५ पानांवरील चित्र]

मान्न्याला “दिव्यदुतांची भाकर” का म्हटले आहे हे तुम्हाला माहीत आहे का?

[६ पानांवरील चित्र]

आपले मन “अनेक चिंतांनी व्यग्र होते” तेव्हा या चिंता आपल्याला कशा दूर करता येतील?