“आपली मागणी देवाला कळवा”
“आपली मागणी देवाला कळवा”
“सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभारप्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा.”—फिलिप्पैकर ४:६.
१. आपल्याजवळ कोणाशी बोलण्याचा विशेषाधिकार आहे आणि हे इतके अद्भुत का आहे?
तुमच्या देशाच्या पंतप्रधानांशी भेटण्याची, किंवा बोलण्याची इच्छा तुम्ही व्यक्त केल्यास, तुम्हाला काय उत्तर दिले जाईल? कदाचित त्यांच्या कार्यालयातील कर्मचारी तुम्हाला विनम्रपणे काहीतरी उत्तर देतील. प्रत्यक्ष पंतप्रधानांशी बोलायला मिळण्याची शक्यता मात्र फार कमी आहे. पण, सबंध पृथ्वीवरील परमप्रधान अधिपती, विश्वाचा सार्वभौम यहोवा देव याच्याबाबतीत असे नाही. कोणत्याही ठिकाणाहून आणि कोणत्याही वेळी आपण त्याच्याशी बोलू शकतो. त्याच्या इच्छेनुसार केलेल्या प्रार्थना कोणत्याही परिस्थितीत त्याच्यापर्यंत अवश्य पोचतील. (नीतिसूत्रे १५:२९) हे किती अद्भुत आहे, नाही का? याबद्दल वाटणाऱ्या कृतज्ञतेने आपल्याला नियमितपणे, “तू जो प्रार्थना ऐकतोस” असे ज्याच्याविषयी योग्यपणे म्हणण्यात आले आहे त्याला प्रार्थना करण्यास प्रेरित करू नये का?—स्तोत्र ६५:२.
२. देवाने आपल्या प्रार्थना ऐकण्याकरता कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत?
२ पण कोणी म्हणेल, की कशाप्रकारच्या प्रार्थना देव ऐकतो? बायबल सांगते की देवाने आपल्या प्रार्थना ऐकाव्यात याकरता एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे: “विश्वासावाचून त्याला ‘संतोषविणे’ अशक्य आहे; कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की, तो आहे, आणि त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणारा आहे.” (इब्री लोकांस ११:६) याआधीच्या लेखातही स्पष्ट केल्याप्रमाणे, देवाकडे येण्याकरता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विश्वास. देवाकडे येणाऱ्यांच्या प्रार्थना ऐकण्यास तो तयार आहे, पण त्यांनी विश्वासाने, प्रामाणिकतेने आणि योग्य मनोवृत्तीने प्रार्थना केली पाहिजे. शिवाय, त्यांची कृत्ये ही देवाच्या नजरेत योग्य असली पाहिजेत.
३. (क) पुरातन काळातल्या विश्वासू सेवकांच्या उदाहरणाप्रमाणे आपण कशाप्रकारच्या अभिव्यक्तींचा उपयोग करू शकतो? (ख) प्रार्थना कोणकोणत्या प्रकारच्या असू शकतात?
३ प्रेषित पौलाने त्याच्या काळातल्या ख्रिस्ती बांधवांना असा सल्ला दिला: “कशाविषयीहि चिंताक्रांत होऊ नका तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभारप्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा; म्हणजे सर्व बुद्धिसामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांति तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखील.” (फिलिप्पैकर ४:६, ७) बायबलमध्ये अशा कितीतरी जणांची उदाहरणे आहेत, ज्यांनी आपल्या काळज्या व विवंचना देवाजवळ व्यक्त केल्या. उदाहरणार्थ, हन्ना, एलीया, हिज्किया, व दानीएल. (१ शमुवेल २:१-१०; १ राजे १८:३६, ३७; २ राजे १९:१५-१९; दानीएल ९:३-२१) आपणही त्यांच्या उदाहरणाचे अनुकरण केले पाहिजे. तसेच, पौलाच्या शब्दांवरून दिसून येते की प्रार्थना या निरनिराळ्या प्रकारच्या असू शकतात. त्याने आभारप्रदर्शनाचा उल्लेख केला, अर्थात ही एक अशी प्रार्थना आहे ज्यात आपण देवाच्या उपकारांबद्दल त्याला आभार व्यक्त करतो. यासोबतच आपण त्याची स्तुतीही करू शकतो. विनंती म्हणजे नम्रपणे व कळकळीने यहोवाला याचना करणे. तसेच आपण देवाला मागणी, अर्थात एखाद्या विशिष्ट गोष्टीकरता प्रार्थना देखील करू शकतो. (लूक ११:२, ३) यांपैकी कोणत्याही प्रकारची प्रार्थना करून आपण देवाकडे येतो तेव्हा आपला स्वर्गीय पिता आनंदाने आपल्याला स्वीकारतो.
४. यहोवाला आपल्या गरजा माहीत आहेत तरीसुद्धा आपण आपल्या मागण्या त्याला का कळवल्या पाहिजेत?
४ काहीजण कदाचित विचारतील, ‘यहोवाला आधीपासूनच आपल्या सर्व गरजा माहीत नाहीत का?’ हो, माहीत आहेत. (मत्तय ६:८, ३२) तरीसुद्धा आपण आपली मागणी त्याला कळवावी अशी अपेक्षा तो का करतो? एका उदाहणाचा विचार करा: एखादा दुकानदार खास ऑफर जाहीर करतो, ज्यात ग्राहकांना विशिष्ट भेटवस्तू दिली जाईल. पण ती भेटवस्तू मिळवण्याकरता साहजिकच ग्राहकांना दुकानदाराकडे जाऊन ती मागावी लागेल. जे असे करण्याची तसदी घेत नाहीत, त्यांना त्या भेटवस्तूची फारशी किंमत नाही असे दिसून येईल. त्याचप्रकारे, प्रार्थनेत आपण आपली मागणी यहोवाला न कळवल्यास, तो जे काही पुरवतो त्याची आपल्याला फारशी किंमत नाही असे दिसून येईल. येशूने म्हटले: “मागा म्हणजे तुम्हास मिळेल.” (योहान १६:२४) अशाप्रकारे, आपण दाखवतो की देवावर आपला भरवसा आहे.
प्रार्थना कशी करावी?
५. आपण येशूच्या नावाने प्रार्थना का केली पाहिजे?
५ प्रार्थना कशी केली पाहिजे यासंदर्भात यहोवाने अनेक कडक नियम घालून दिलेले नाहीत. तरीपण देवाला प्रार्थना करण्याची योग्य पद्धत कोणती हे आपण जाणून घेतले पाहिजे. बायबलमध्ये याविषयी मार्गदर्शन दिलेले आहे. उदाहरणार्थ, येशूने आपल्या अनुयायांना असे शिकवले: “तुम्ही पित्याजवळ काही मागाल तर तो ते तुम्हाला माझ्या नावाने देईल.” (योहान १६:२३) त्याअर्थी, आपण येशूच्या नावाने प्रार्थना केली पाहिजे. म्हणजेच, ज्याच्याद्वारे देवाचे आशीर्वाद सर्व मानवजातीला दिले जातील असा तो एकच मध्यस्थ आहे हे आपण ओळखले पाहिजे.
६. विशिष्ट पद्धतीने बसून अथवा उभे राहून प्रार्थना करणे आवश्यक आहे का?
६ प्रार्थना करताना विशिष्ट पद्धतीने बसणे किंवा उभे राहणे आवश्यक आहे का? आपल्या प्रार्थना ऐकल्या जाव्यात म्हणून आपण विशिष्ट प्रकारे बसून अथवा उभे राहून प्रार्थना करावी असे बायबलमध्ये सांगितलेले नाही. (१ राजे ८:२२; नहेम्या ८:६; मार्क ११:२५; लूक २२:४१) महत्त्वाची गोष्ट ही आहे की आपण प्रामाणिक अंतःकरणाने आणि योग्य मनोवृत्तीने देवाला प्रार्थना केली पाहिजे.—योएल २:१२, १३.
७. (क) “आमेन” म्हणण्याचा काय अर्थ होतो? (ख) प्रार्थना करताना या शब्दाचा योग्यप्रकारे उपयोग कसा करता येईल?
७ “आमेन” म्हणण्याविषयी काय? शास्त्रवचनांनुसार प्रार्थनांच्या शेवटी, विशेषतः आपण काही लोकांसमोर प्रार्थना करतो तेव्हा प्रार्थनेच्या शेवटी आमेन म्हणणे योग्य आहे. (स्तोत्र ७२:१९; ८९:५२) ‘आमेन’ या इब्री शब्दाचा मुळात “खचित” किंवा खात्रीने असा अर्थ होतो. मॅक्लिंटॉक व स्ट्राँग यांच्या सायक्लोपिडियात सांगितल्यानुसार, “[प्रार्थनेत] जे व्यक्त करण्यात आले आहे त्याला संमती दर्शवण्याकरता व त्यांची पूर्तता व्हावी अशी विनंती करण्यासाठी” प्रार्थनांच्या शेवटी “आमेन” म्हणणे महत्त्वाचे आहे. त्याअर्थी, प्रार्थनेच्या शेवटी मनःपूर्वक “आमेन” म्हटल्यामुळे त्या प्रार्थनेत जे व्यक्त करण्यात आले आहे त्याबद्दल एक व्यक्ती आपल्या प्रामाणिक भावना व्यक्त करू शकते. मंडळीपुढे प्रार्थना करणारी ख्रिस्ती व्यक्ती जेव्हा आमेन म्हणते तेव्हा ऐकणारेही एकतर मनातल्या मनात किंवा मोठ्याने “आमेन” म्हणू शकतात. असे करण्याद्वारे ते या प्रार्थनेत जे म्हणण्यात आले त्यासोबत आपण पूर्णपणे सहमत आहोत हे दाखवू शकतात.—१ करिंथकर १४:१६.
८. कधीकधी आपल्या प्रार्थना याकोबाच्या किंवा अब्राहामच्या प्रार्थनांसारख्या कशा असू शकतात आणि यावरून काय दिसून येईल?
८ कधीकधी आपण ज्या गोष्टीकरता प्रार्थना करतो तिच्याविषयी आपल्याला खरोखर किती कळकळ आहे हे दाखवण्याची देव आपल्याला संधी देतो. आपल्याला प्राचीन काळच्या याकोबाप्रमाणे व्हावे लागेल, ज्याने एका स्वर्गदूताकडून आशीर्वाद मिळवण्याकरता पहाटेपर्यंत त्याच्याशी झोंबी केली. (उत्पत्ति ३२:२४-२६) किंवा काही परिस्थितींत आपल्याला अब्राहामसारखे व्हावे लागेल. अब्राहामने लोटाला, व सदोममध्ये इतर नीतिमान लोक असतील तर त्यांना वाचवण्याविषयी यहोवाला वारंवार विनंती केली. (उत्पत्ति १८:२२-३३) आपल्याला ज्या गोष्टी महत्त्वाच्या वाटतात त्यांविषयी आपणही यहोवाला अशाचप्रकारे कळकळीची विनंती केली पाहिजे. त्याचा न्यायीपणा, प्रेमदया व क्षमाशीलता या गुणांच्या आधारावर आपण त्याला विनवणी केली पाहिजे.
कशाविषयी प्रार्थना करावी?
९. प्रार्थना करताना आपण जास्त महत्त्व कशाला दिले पाहिजे?
९ पौलाने काय म्हटले ते तुम्हाला आठवते का? त्याने म्हटले: “सर्व गोष्टींविषयी . . . आपली मागणी देवाला कळवा.” (फिलिप्पैकर ४:६) वैयक्तिक प्रार्थना आपल्या जीवनातल्या कोणत्याही गोष्टीबद्दल असू शकतात. पण आपल्या प्रार्थनांमध्ये जास्त महत्त्व आपण यहोवाशी संबंधित असलेल्या गोष्टींना दिले पाहिजे. याबाबतीत दानीएलाचे उत्तम उदाहरण आहे. इस्राएल राष्ट्राला त्यांच्याच पापांमुळे शिक्षा भोगावी लागली तेव्हा दानीएलाने यहोवाला इस्राएल लोकांवर दया दाखवण्याची या शब्दांत याचना केली: “हे प्रभू, ऐक, कार्य कर; विलंब लावू नको . . . तुझ्याचप्रीत्यर्थ हे मागतो.” (दानीएल ९:१५-१९) याचप्रकारे, यहोवाच्या नावाचे पवित्रीकरण आणि त्याची इच्छा पूर्ण व्हावी याचीच आपल्याला सर्वात जास्त काळजी आहे हे आपल्या प्रार्थनांवरून दिसून येते का?
१०. वैयक्तिक गोष्टींसंबंधी प्रार्थना करणे योग्य आहे हे आपल्याला कशावरून कळते?
१० असे असले तरीसुद्धा, वैयक्तिक बाबींसंबंधी प्रार्थना करणेही योग्य आहे. उदाहरणार्थ स्तोत्रकर्त्याप्रमाणे आपणही गहन आध्यात्मिक गोष्टी समजण्यास साहाय्य करण्याची देवाला विनंती करू शकतो. स्तोत्रकर्त्याने यहोवाला प्रार्थना केली: “मला बुद्धि दे, म्हणजे मी तुझे नियमशास्त्र पाळीन; खरोखर अगदी मनापासून ते मी पाळीन.” (स्तोत्र ११९:३३, ३४; कलस्सैकर १:९, १०) येशूने “आपल्याला मरणातून तारावयास जो समर्थ आहे त्याच्याजवळ . . . प्रार्थना व विनवणी केली.” (इब्री लोकांस ५:७) असे करण्याद्वारे त्याने दाखवले की आपण जेव्हा कठीण प्रसंगांना किंवा परीक्षांना तोंड देत असतो तेव्हा यहोवाकडे सामर्थ्याकरता प्रार्थना करणे अगदी योग्यच आहे. आपल्या शिष्यांना प्रार्थना कशी करायची हे शिकवत असताना येशूने, चुकांची क्षमा व दररोजची भाकरी यांसारख्या वैयक्तिक गरजांचाही समावेश केला.
११. प्रार्थना केल्यामुळे मोहांना बळी न पडण्याचे साहाय्य आपल्याला कशाप्रकारे मिळू शकते?
११ नमून्यादाखल दिलेल्या त्या प्रार्थनेत, येशूने या विनंतीचाही समावेश केला: “आम्हास परीक्षेत आणू नको; तर आम्हास वाइटापासून सोडीव.” (मत्तय ६:९-१३) नंतर त्याने आपल्या शिष्यांना असा सल्ला दिला: “तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागृत राहा व प्रार्थना करा.” (मत्तय २६:४१) आपल्यासमोर मोह येतात तेव्हा विशेषतः प्रार्थना करणे अतिशय महत्त्वाचे आहे. कदाचित आपल्याला कामाच्या ठिकाणी अथवा शाळेत बायबलच्या तत्त्वांकडे दुर्लक्ष करण्याचा मोह होऊ शकतो. साक्षीदार नसलेल्या व्यक्ती बायबलनुसार योग्य नसणाऱ्या गोष्टींमध्ये त्यांच्यासोबत सहभागी होण्याची आपल्याला गळ घाळू शकतात. किंवा ज्यामुळे नैतिक तत्त्वांचे उल्लंघन होईल असे काहीतरी करण्यास आपल्याला सांगितले जाऊ शकते. अशा वेळी आपण येशूने सल्ला दिल्याप्रमाणे प्रार्थना केली पाहिजे. मोहात पाडणाऱ्या परिस्थितीला प्रत्यक्ष तोंड देत असताना, तसेच अशी परिस्थिती उद्भवण्याआधीही आपण प्रार्थना करून त्या मोहाला बळी न पडण्याकरता साहाय्य करण्याची देवाला विनंती केली पाहिजे.
१२. कोणकोणत्या काळजीच्या विषयांसंबंधी आपल्याला प्रार्थना करावीशी वाटू शकते आणि यहोवा या प्रार्थनांना कसा प्रतिसाद देईल?
१२ सध्याच्या काळात देवाच्या सेवकांना जीवनात अनेक दबावांना व कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागते. आजारपण आणि भावनिक तणावाने बरेचजण चिंतातूर आहेत. तसेच वरचेवर घडणाऱ्या हिंसक घटनांमुळेही जीवनात बराच तणाव निर्माण होतो. आर्थिक अडचणींमुळे उदरनिर्वाह चालवण्याकरता कित्येकांना अक्षरशः संघर्ष करावा लागतो. पण आपल्याला हे जाणून किती सांत्वन मिळते, की यांपैकी कोणत्याही समस्येविषयी यहोवाचे सेवक त्याच्याजवळ आपल्या भावना व विवंचना व्यक्त करतात तेव्हा तो त्यांच्या प्रार्थना ऐकतो! स्तोत्र १०२:१७ यहोवाबद्दल असे म्हणते: “त्याने निराश्रितांच्या प्रार्थनेकडे लक्ष दिले आहे; त्यांची प्रार्थना त्याने तुच्छ मानिली नाही.”
१३. (क) कोणकोणत्या विषयांबद्दल प्रार्थना करणे उचित आहे? (ख) अशा प्रार्थनेचे एक उदाहरण सांगा.
१३ खरे पाहता, आपण यहोवाची जी सेवा करतो आणि त्याच्यासोबतचा आपला जो नातेसंबंध आहे त्यांवर परिणाम करू शकणाऱ्या कोणत्याही विषयाबद्दल प्रार्थना करणे योग्य आहे. (१ योहान ५:१४) जर तुम्हाला लग्नासंबंधी, नोकरीसंबंधी अथवा सेवाकार्यात अधिक सहभाग घेण्याविषयी निर्णय घ्यायचे असतील तर याबाबतींत प्रार्थना करण्यास, व देवाकडे मार्गदर्शनाची विनंती करण्यास कचरू नका. फिलिपाईन्स येथे राहणाऱ्या एका तरुण भगिनीला पूर्णवेळेची सेवा करण्याची इच्छा होती. पण आपला उदरनिर्वाह चालवण्याकरता तिच्याजवळ नोकरी नव्हती. ती सांगते: “एका शनिवारी मी पायनियर सेवेविषयी यहोवाला प्रार्थना केली. त्याच दिवशी नंतर जेव्हा मी प्रचार कार्याला गेले होते, तेव्हा एका किशोरवयीन मुलीला मी एक पुस्तक दिले. अचानक ती मुलगी म्हणाली: ‘सोमवारी सकाळीच तुम्ही माझ्या शाळेत जायला हवं.’ मी विचारले, ‘का?’ तर तिने सांगितले की तिच्या शाळेत एक नोकरीची जागा उपलब्ध आहे आणि त्यांना लवकरात लवकर ती जागा भरायची आहे. तिने सांगितल्याप्रमाणे मी शाळेत गेले आणि मला लगेच ती नोकरी मिळाली. काही कळायच्या आतच सगळं घडलं होतं.” सबंध जगातील अनेक साक्षीदारांना अशाप्रकारचे अनुभव आले आहेत. तेव्हा, आपल्या मनातल्या विनंत्या देवाजवळ व्यक्त करण्यास कधीही संकोच करू नका!
आपल्या हातून पाप घडले असेल तर?
१४, १५. (क) एखाद्या व्यक्तीने पाप केलेले असले तरीही तिने प्रार्थना करण्याचे का थांबवू नये? (ख) वैयक्तिक प्रार्थनांव्यतिरिक्त, त्या व्यक्तीला आणखी कशामुळे आध्यात्मिक साहाय्य मिळू शकेल?
१४ एखाद्याने पाप केले असेल, तर प्रार्थनेमुळे त्याला कशाप्रकारे साहाय्य मिळू शकते? पाप केल्यावर लाज वाटत असल्यामुळे काहीजण प्रार्थना करण्याचे सोडून देतात. पण हा सुज्ञपणा नाही. उदाहरणार्थ: विमानचालकांना माहीत असते, की जर ते वाट चुकले तर वायू वाहतूक नियंत्रकांशी संपर्क साधून ते मदत मागू शकतात. पण आपण वाट चुकलो याची लाज वाटत असल्यामुळे जर एखाद्या वैमानिकाने नियंत्रकांशी संपर्क साधला नाही तर काय होईल? हे संकटाला आमंत्रण देण्यासारखे ठरेल! त्याचप्रकारे, पाप केल्यामुळे लाजून देवाला प्रार्थना न करणारा स्वतःचे आणखीनच नुकसान करून घेतो. खरे तर, ज्यांनी गंभीर चुका केल्या आहेत अशांना विशेषतः, देव प्रार्थना करण्यास आर्जवतो. संदेष्ट्या यशयाने त्याच्या काळातल्या पापी लोकांना यहोवाची करुणा भाकण्यास आर्जवले ‘कारण तो भरपूर क्षमा करील.’ (यशया ५५:६, ७) अर्थात, यहोवाच्या क्षमेची ‘याचना’ करण्याआधी एका व्यक्तीने नम्रतापूर्वक आपले पापी आचरण सोडून दिले पाहिजे आणि मनापासून पश्चात्ताप केला पाहिजे.—स्तोत्र ११९:५८; दानीएल ९:१३.
१५ एखाद्या व्यक्तीने पाप केलेले असेल तर आणखी एका महत्त्वाच्या कारणामुळे प्रार्थना करण्याची आवश्यकता आहे. शिष्य याकोबाने आध्यात्मिक साहाय्याची गरज असलेल्या व्यक्तीबद्दल असे लिहिले: “त्याने मंडळीच्या वडिलांना बोलवावे आणि त्यांनी प्रभूच्या नावाने . . . त्याच्यावर ओणवून प्रार्थना करावी. . . . आणि प्रभु त्याला उठवील.” (याकोब ५:१४, १५) होय, त्या व्यक्तीने स्वतः तर आपले पाप यहोवाजवळ प्रार्थनेत कबूल केलेच पाहिजे पण त्यासोबतच ती मंडळीच्या वडिलांना आपल्याकरता प्रार्थना करण्यासाठी बोलावू शकते. यामुळे अशा व्यक्तीला आध्यात्मिकरित्या सावरण्यास साहाय्य मिळेल.
प्रार्थनांचे उत्तर
१६, १७. (क) यहोवा प्रार्थनांचे उत्तर कसे देतो? (ख) प्रार्थना प्रचार कार्याशी निगडीत आहे हे कोणत्या अनुभवांवरून दिसून येते?
१६ प्रार्थनांचे उत्तर कशाप्रकारे दिले जाते? काही प्रार्थनांचे उत्तर लगेच आणि उघडपणे मिळू शकते. (२ राजे २०:१-६) इतर प्रार्थनांचे उत्तर मिळायला वेळ लागू शकतो आणि काही उत्तरे तितकी उघड नसल्यामुळे हेच आपल्या प्रार्थनेचे उत्तर आहे हे ओळखणे कठीण जाऊ शकते. न्यायाधीशाकडे वारंवार येणाऱ्या एका विधवेचा येशूने जो दृष्टान्त दिला होता त्यानुसार, एखाद्या गोष्टीबाबत आपल्याला कदाचित वारंवार देवाला प्रार्थना करावी लागेल. (लूक १८:१-८) पण, आपण देवाच्या इच्छेनुरूप प्रार्थना करतो तेव्हा आपण ही खात्री बाळगू शकतो की त्या न्यायाधीशाप्रमाणे यहोवा कधीही “मला त्रास देऊ नको” असे म्हणणार नाही.—लूक ११:५-९.
१७ प्रार्थनांचे उत्तर मिळण्याच्या बाबतीत यहोवाच्या लोकांना बरेच अनुभव आले आहेत. आपल्या सार्वजनिक सेवाकार्यात हे विशेषकरून अनेकदा दिसून येते. उदाहरणार्थ, फिलिपाईन्स येथे दोन ख्रिस्ती बहिणी एका दुर्गम भागात लोकांना बायबल साहित्य देत होत्या. एका स्त्रीला जेव्हा त्यांनी एक लहानशी पत्रिका दिली तेव्हा तिचे डोळे भरून आले. ती म्हणाली: “काल रात्रीच मी देवाला प्रार्थना केली होती, की देवा मला बायबलमधून शिकवण्याकरता कोणालातरी पाठव. मला वाटतं देवानं माझ्या प्रार्थनेचे उत्तर दिले आहे.” लवकरच या स्त्रीने राज्य सभागृहात सभांना यायला सुरुवात केली. आशियातल्याच दुसऱ्या एका देशात, एका ख्रिस्ती बांधवाला कडक सुरक्षा व्यवस्था असलेल्या इमारतींमध्ये जाऊन प्रचार करायला खूप भीती वाटायची. पण त्याने यहोवाला प्रार्थना केली, आणि धैर्य एकवटून त्याने एका इमारतीत प्रवेश केला. त्याने एक दार वाजवले, तेव्हा एका तरुणीने दार उघडले. बांधवाने आपला येण्याचा उद्देश समजावून सांगितला तेव्हा ती रडू लागली. तिने सांगितले की ती यहोवाच्या साक्षीदारांना शोधत होती आणि त्यांच्याशी भेट घडावी म्हणून तिने प्रार्थनाही केली होती. बांधवाने आनंदाने तिला यहोवाच्या साक्षीदारांच्या स्थानिक मंडळीशी संपर्क साधण्यास मदत केली.
१८. (क) आपल्या प्रार्थनांचे उत्तर मिळाल्यावर आपण काय केले पाहिजे? (ख) प्रत्येक प्रसंगी प्रार्थना केल्यास आपण कशाची खात्री बाळगू शकतो?
१८ प्रार्थना खरोखरच देवाकडील एक अद्भुत आशीर्वाद आहे. यहोवा आपल्या प्रार्थना ऐकण्यास व त्यांचे उत्तर देण्यास उत्सुक आहे. (यशया ३०:१८, १९) पण यहोवा आपल्या प्रार्थनांचे कशारितीने उत्तर देतो हे समजण्यासाठी आपण चौकस असणे आवश्यक आहे. आपल्या प्रार्थनेचे उत्तर नेहमीच आपण अपेक्षा केल्याप्रमाणे दिले जाईल असे नाही. पण तरीसुद्धा, एखादी गोष्ट देवाच्याच मार्गदर्शनाने घडली आहे हे आपल्याला कळते तेव्हा आपण त्याचे उपकार मानण्यास व त्याची स्तुती करण्यास विसरू नये. (१ थेस्सलनीकाकर ५:१८) शिवाय, पौलाचा सल्ला नेहमी आठवणीत असू द्या: “सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभारप्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा.” होय, देवाशी बोलण्याच्या प्रत्येक संधीचा फायदा घ्या. असे केल्यास, ज्यांच्या प्रार्थनांचे उत्तर दिले जाते अशांबद्दल पौलाने केलेल्या विधानाची सत्यता तुम्हाला सतत अनुभवता येईल: “सर्व बुद्धिसामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांति तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखील.”—फिलिप्पैकर ४:६, ७. (w०६ ९/१)
तुम्ही उत्तर देऊ शकता का?
• प्रार्थना कोणकोणत्या प्रकारच्या असू शकतात?
• आपण कशाप्रकारे प्रार्थना करावी?
• आपल्या प्रार्थनांमध्ये आपण कोणकोणत्या विषयांचा समावेश करू शकतो?
• एखाद्याने पाप केले असल्यास प्रार्थना कशाप्रकारे साहाय्य करू शकते?
[अभ्यासाचे प्रश्न]
[२९ पानांवरील चित्रे]
मनःपूर्वक प्रार्थना केल्यामुळे मोहांना तोंड देताना खंबीर राहण्यास मदत मिळते
[३१ पानांवरील चित्रे]
प्रार्थनेद्वारे आपण देवाजवळ आभार, चिंता व विनंत्या व्यक्त करतो