व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ईयोब—धीर व सत्वनिष्ठेचे ज्वलंत उदाहरण

ईयोब—धीर व सत्वनिष्ठेचे ज्वलंत उदाहरण

ईयोब—धीर व सत्वनिष्ठेचे ज्वलंत उदाहरण

“माझा सेवक ईयोब याच्याकडे तुझे लक्ष गेले होते काय? भूतलावर त्याच्या तोडीचा सात्विक, सरळ, देवाला भिऊन वागणारा व पापापासून दूर राहणारा असा दुसरा कोणी नाही.”—ईयोब १:८.

१, २. (क) ईयोबाला कोणत्या अनपेक्षित संकटांना तोंड द्यावे लागले? (ख) ईयोबावर संकटे कोसळण्याआधी त्याचे जीवन कसे होते?

 ईयोबाजवळ जणू सारे काही होते—धनसंपत्ती, प्रतिष्ठा, उत्तम आरोग्य आणि आनंदी कौटुंबिक जीवन. पण मग अचानक सर्व काही बदलले. एकापाठोपाठ एक त्याच्यावर संकटे कोसळू लागली. रातोरात त्याची सगळी संपत्ती नष्ट झाली. यानंतर एका वादळाने एकाच झटक्यात त्याच्या सर्व मुलांचा बळी घेतला. हे घडून थोडा अवकाशही झाला नव्हता तोच, त्याला एका भयानक रोगाने ग्रासले. त्याच्या संपूर्ण शरीरावर वेदनामय गळू आले. ईयोबाच्या जीवनातल्या या घटनांविषयी तुम्ही कदाचित त्याचेच नाव असलेल्या बायबलमधील पुस्तकात वाचले असेल.—ईयोब अध्याय १ व.

“पूर्वींचे मास मला प्राप्त होते, पूर्वीच्यासारखे माझे दिवस असते, तर किती बरे होते!” ईयोब विव्हळून म्हणाला. (ईयोब ३:३; २९:२) जीवनात संकटे येतात तेव्हा साहजिकच कोणालाही पूर्वीचे दिवस आठवतात. ईयोब त्या दिवसापर्यंत सात्विकतेने चालत आला होता, त्याच्या सुखी जीवनाला कोणत्याही संकटांचे गालबोट लागलेले नव्हते. प्रतिष्ठित लोक त्याचा आदर करत असत; त्याच्याकडे सल्ला मागायला येत असत. (ईयोब २९:५-११) तो धनवान होता, पण पैसाच सर्वकाही आहे असे मानणाऱ्‍यांपैकी तो नव्हता. (ईयोब ३१:२४, २५, २८) विधवांना व अनाथांना तो साहाय्य करत असे. (ईयोब २९:१२-१६) आणि आपल्या पत्नीशी तो एकनिष्ठ होता.—ईयोब ३१:१, ९, ११.

३. यहोवाचा ईयोबाविषयी कसा दृष्टिकोन होता?

ईयोब सरळ व सात्विक होता कारण तो देवाचा उपासक होता. यहोवाने त्याच्याविषयी म्हटले: “भूतलावर त्याच्या तोडीचा सात्विक, सरळ, देवाला भिऊन वागणारा व पापापासून दूर राहणारा असा दुसरा कोणी नाही.” (ईयोब १:१,) पण नैतिकदृष्ट्या निर्दोष असूनही ईयोबाच्या सुखी जीवनावर संकटांचे सावट आले. त्याने मिळवलेले सर्वकाही नामशेष झाले. दुःख, वेदना, वैफल्य यांनी त्याला पछाडले व त्याला अक्षरशः कसोटीस लावले.

४. ईयोबाच्या संकटांविषयी विचार करणे का उपयुक्‍त ठरेल?

अर्थात वैयक्‍तिक जीवनात संकटे सोसलेला ईयोब हा देवाचा एकच सेवक नव्हता. आज बरेच ख्रिस्ती ईयोबावर आलेली परिस्थिती समजू शकतात कारण त्यांच्यावरही त्याचप्रकारची संकटे आली आहेत. त्यामुळे आपण दोन महत्त्वाच्या प्रश्‍नांवर विचार करू या: आपल्या जीवनात संकटे येतात तेव्हा ईयोबावर गुदरलेल्या परिस्थितीची आठवण ठेवल्यास आपल्याला कशाप्रकारे साहाय्य मिळू शकते? आणि दुसऱ्‍यांवर जेव्हा दुःखद परिस्थिती येते तेव्हा त्यांच्याप्रती सहानुभूती दाखवण्यास आपल्याला ईयोबाच्या उदाहरणातून कशी मदत मिळू शकते?

एक महत्त्वाचा वादविषय व सत्वनिष्ठेची परीक्षा

५. सैतानाच्या दृष्टीने ईयोब देवाची सेवा का करत होता?

ईयोबाची परिस्थिती अपवादात्मक होती. ईयोब देवाची सेवा स्वार्थबुद्धीने करतो असा सैतानाने आरोप लावला होता. पण ईयोबाला यातले काहीही माहीत नव्हते. स्वर्गात सर्व देवदूत एकत्र आले असताना, यहोवाने ईयोबाच्या चांगल्या गुणांकडे लक्ष वेधले तेव्हा सैतानाने असे उत्तर दिले: “ईयोब देवाचे भय काय फुकट बाळगितो? तो, त्याचे घर व त्याचे सर्वस्व याभोवती तू कुंपण घातले आहे ना?” असे म्हणून सैतानाने हा आरोप लावला की ईयोब, आणि त्याअर्थी देवाचे सगळेच सेवक केवळ स्वार्थी हेतूने त्याची सेवा करतात. सैतानाने यहोवाला म्हटले: “तू आपला हात पुढे करून त्याच्या सर्वस्वास लावून तर पाहा, म्हणजे तो तुझ्या तोंडावर तुझा अव्हेर करील.”—ईयोब १:८-११.

६. सैतानाने कोणता महत्त्वपूर्ण वादविषय उपस्थित केला?

हा एक अत्यंत महत्त्वाचा वादविषय होता. यहोवा ज्याप्रकारे आपले सार्वभौमत्त्व गाजवतो त्याविषयी सैतानाने शंका उपस्थित केली होती. देव खरोखरच प्रेमळपणे या विश्‍वावर शासन करू शकतो का? की सैतानाने सुचवल्याप्रमाणे, स्वार्थी प्रवृत्तीचाच नेहमी विजय होईल? या वादाची शहानिशा करण्याकरता यहोवाने दियाबलाला ईयोबाचा उपयोग करण्याची अनुमती दिली. यहोवाला खात्री होती की त्याचा सेवक ईयोब हा शेवटपर्यंत विश्‍वासू व एकनिष्ठ राहील. अशारितीने, सैतानाने स्वतः ईयोबाला पीडिले. त्याच्यावर एकापाठोपाठ अनेक संकटे आणली. सैतानाचे सुरुवातीचे प्रयत्न अपयशी ठरले तेव्हा त्याने ईयोबाला एका वेदनामय रोगाने पीडिले. दियाबलाचा दावा होता की “त्वचेसाठी त्वचा! मनुष्य आपल्या प्राणासाठी आपले सर्वस्व देईल.”—ईयोब २:४.

७. ईयोबावर आलेल्या संकटांप्रमाणेच आज देवाच्या सेवकांना कोणकोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागते?

ईयोबाला जितके सहन करावे लागले तितके आजच्या काळात यहोवाच्या सेवकांपैकी क्वचितच कोणाला सहन करावे लागले असेल. पण तरीसुद्धा त्यांना निरनिराळ्या प्रकारच्या संकटांना तोंड द्यावे लागले आहे. कित्येकांना छळ किंवा कौटुंबिक समस्यांना तोंड द्यावे लागते. आर्थिक समस्या किंवा आजारपण अनेकांना हैराण करून सोडते. आणि काहींना तर आपल्या विश्‍वासाकरता मरणही पत्करावे लागले आहे. अर्थात, आपल्यावर येणारे प्रत्येक संकट सैतानच आणतो असे आपण गृहीत धरू नये. किंबहुना काही समस्या तर आपल्याच चुकांमुळे किंवा आनुवंशिकतेमुळे येऊ शकतात. (गलतीकर ६:७) तसेच म्हातारपण व नैसर्गिक विपत्ती यांसारख्या समस्या सर्वांवरच येतात. बायबल स्पष्टपणे सांगते की सध्याच्या काळात यहोवा आपल्या सेवकांना या सर्व संकटांतून चमत्कारिकरित्या सोडवत नाही.—उपदेशक ९:११.

८. आपल्यावर येणाऱ्‍या संकटांचा सैतान कशाप्रकारे गैरफायदा घेऊ शकतो?

प्रत्येक समस्या सैतान आणत नसला तरी, आपल्यावर येणाऱ्‍या समस्यांचा गैरफायदा घेऊन तो आपला विश्‍वास कमजोर करण्याचा प्रयत्न करू शकतो. प्रेषित पौलाने त्याच्या “शरीरात एक काटा” आहे, “म्हणजे [त्याला] ठोसे मारण्याकरिता सैतानाचा एक दूत, ठेवण्यात आला आहे” असा उल्लेख केला. (२ करिंथकर १२:७) तो एखाद्या शारीरिक दुखण्याविषयी, कदाचित क्षीण दृष्टीविषयी येथे सांगत असावा का? ही शक्यता नाकारता येत नाही. पण काहीही असो, पौलाला जाणीव होती की सैतान अशाप्रकारच्या समस्येचा व त्यामुळे येणाऱ्‍या वैफल्याचा गैरफायदा घेऊन त्याचा आनंद हिरावून घेऊ शकतो व त्याची सत्त्वनिष्ठाही भंग करू शकतो. (नीतिसूत्रे २४:१०) आजच्या काळात, सैतान कुटुंबातल्या सदस्यांना, शाळासोबत्यांना किंवा जुलमी सरकारांनाही देवाच्या सेवकांचा छळ करण्यास उद्युक्‍त करू शकतो.

९. छळ किंवा संकटे येतात तेव्हा आपल्याला नवल का वाटू नये?

या समस्यांना आपण यशस्वीरित्या कसे तोंड देऊ शकतो? आपल्यावर संकट येते तेव्हा, यहोवावर आपले प्रेम आणि त्याच्या सार्वभौमत्त्वाला आपली अधीनता ही मनापासूनची असून संकट येताच डगमगणारी नाही, हे दाखवण्याची संधी आहे असा आपण विचार केला पाहिजे. (याकोब १:२-४) आपल्या दुःखाचे कारण काहीही असो पण देवाला एकनिष्ठ राहणे किती महत्त्वाचे आहे याची जर आपण सतत जाणीव बाळगली तर, कठीण परिस्थितीतही आपण आध्यात्मिकरित्या स्थिर राहू शकतो. प्रेषित पेत्राने ख्रिस्ती बांधवांना असे लिहिले: “प्रियजनहो, तुमची पारख होण्यासाठी जी अग्निपरीक्षा तुम्हांवर आली आहे तिच्यामुळे आपणांस काही अपूर्व झाले असे वाटून त्याचे नवल मानू नका.” (१ पेत्र ४:१२) आणि पौलानेही स्पष्ट सांगितले होते, की “ख्रिस्त येशूमध्ये सुभक्‍तीने आयुष्यक्रमण करावयास जे पाहतात त्या सर्वांचा छळ होईल.” (२ तीमथ्य ३:१२) ईयोबावर सैतानाने ज्याप्रकारे आरोप लावले होते, त्याचप्रकारे तो आजही यहोवाच्या साक्षीदारांच्या सत्त्वनिष्ठेविषयी शंका व्यक्‍त करतो. बायबल तर सांगते की या शेवटल्या काळात सैतान देवाच्या लोकांचा आणखीनच छळ करत आहे.—प्रकटीकरण १२:९, १७.

एक गैरसमज आणि अयोग्य सल्ला

१०. ईयोबाच्या बाबतीत कोणती अडचण होती?

१० ईयोबाच्या बाबतीत एक अडचण होती जी आपल्याला असण्याची गरज नाही. त्याच्यावर ही सगळी संकटे का आली होती हे त्याला माहीत नव्हते. ईयोबाने असा चुकीचा निष्कर्ष काढला की, “परमेश्‍वराने दिले, आणि परमेश्‍वराने नेले.” (ईयोब १:२१) कदाचित सैतानानेच मुद्दामहून ईयोबाला असे भासवले असावे की त्याच्यावर आलेल्या संकटांमागे देवाचा हात होता.

११. ईयोबावर संकटे आली तेव्हा त्याच्यावर कसा परिणाम झाला हे स्पष्ट करा.

११ ईयोबाच्या पत्नीने त्याला सांगितल्याप्रमाणे त्याने देवाला शाप देण्यास नकार दिला. पण ईयोबाचे धैर्य पार खचले. (ईयोब २:९, १०) तो म्हणाला, ‘दुष्ट लोकांची स्थिती माझ्यापेक्षा कित्येक पटीने चांगली आहे.’ (ईयोब २१:७-९) ‘देव आपल्याला का म्हणून शिक्षा देत असावा?’ असा त्याला प्रश्‍न पडला असेल. कधीकधी तर, ‘मरण आले तर बरे होईल’ असे त्याला वाटू लागले. तो देवाला म्हणाला, “तू मला अधोलोकात लपविशील, तुझा क्रोध शमेपर्यंत मला दृष्टिआड ठेविशील, माझी मुदत नियमित करून मग माझी आठवण करिशील तर किती बरे होईल!”—ईयोब १४:१३.

१२, १३. ईयोबाच्या तीन मित्रांच्या बोलण्याचा त्याच्यावर कसा परिणाम झाला?

१२ ‘ईयोबाच्या संकटाबद्दल खेद प्रदर्शित करून त्याचे समाधान करण्याच्या’ नावाखाली त्याचे तीन मित्र त्याला भेटायला आले. (ईयोब २:११) पण ते “शिणवून टाकणारे सांत्वनकर्ते” ठरले. (ईयोब १६:२, पं.र.भा.) ईयोबाला आपल्या संकटांबद्दल सांगून कोणाजवळ मन हलके करता आले असते तर त्याला नक्कीच सांत्वन मिळाले असते पण या तिघांनी मात्र त्याला आणखीनच गोंधळात टाकले. त्यांचे बोलणे ऐकून तो आणखीनच निराशेच्या गर्तेत गेला.—ईयोब १९:२; २६:२.

१३ साहजिकच ईयोबाने मनोमन विचार केला असेल, की ‘शेवटी हे सर्व मलाच का सोसावे लागत आहे? मी असे काय वाईट केले?’ त्याच्या तिघा मित्रांनी त्याला अतिशय चुकीची उत्तरे देऊन त्याची दिशाभूल केली. त्यांनी असे गृहीत धरले की ईयोबाने काहीतरी गंभीर पाप केल्यामुळेच त्याच्यावर ही सगळी संकटे ओढवली असणार. अलीफजने ईयोबाला म्हटले, “कोणी निरपराध असून कधी नाश पावला आहे काय? . . . माझ्या पाहण्यात तर असे आहे की जे अधर्माची नांगरणी करितात व दुःखाची पेरणी करतात ते तशीच कापणी करितात.”—ईयोब ४:७, ८.

१४. संकटे ही एखाद्याच्या वाईट वर्तनामुळेच येतात असा आपण लगेच निष्कर्ष का काढू नये?

१४ अर्थात, आपण आत्म्याच्या ऐवजी देहाची कर्मे केली तर आपल्याला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागू शकतात. (गलतीकर ६:७, ८) पण सध्याच्या या जगात आपले वर्तन चांगले असले तरीही आपल्यावर संकटे येऊ शकतात. जे निर्दोष आहेत त्यांच्यावर कोणतीही संकटे येत नाहीत असे तर मुळीच म्हणता येत नाही. येशू ख्रिस्त हा ‘निर्मळ व पापी जनांपासून वेगळा’ होता, तरीपण त्याला वधस्तंभावर यातनादायी मृत्यू आला. तसेच प्रेषित याकोब याला ख्रिस्ताचा अनुयायी असल्यामुळे तरवारीने जिवे मारण्यात आले. (इब्री लोकांस ७:२६; प्रेषितांची कृत्ये १२:१, २) अलीफज व त्याच्या दोन सोबत्यांनी केलेल्या चुकीच्या तर्कवादामुळे ईयोब आपल्या चारित्र्याचे समर्थन करण्यास व आपण निर्दोष आहोत हे सिद्ध करून दाखवण्यास प्रवृत्त झाला. पण ईयोबावर आलेले संकट हे त्याच्याच दुष्कृत्यांमुळे होते असा त्या तिघांनी तगादा लावल्यामुळे, ईयोब देवाच्या न्यायाविषयी चुकीच्या दृष्टिकोनाने विचार करू लागला.—ईयोब ३४:५; ३५:२.

संकटांना तोंड देण्याकरता साहाय्य

१५. दुःखद परिस्थितीला तोंड देताना कशाप्रकारे विचार केल्याने आपल्याला साहाय्य मिळू शकेल?

१५ यात आपल्याकरता काही धडा आहे का? दुःखद घटना, आजारपण, किंवा छळ सहन करावा लागतो तेव्हा हा घोर अन्याय आहे असे आपल्याला वाटू शकते. इतर लोक जणू सर्व समस्यांपासून मुक्‍त असतात असा विचार आपल्या मनात येतो. (स्तोत्र ७३:३-१२) कधीकधी आपल्याला हे महत्त्वाचे प्रश्‍न स्वतःला विचारावे लागू शकतात: “देवावर मला असलेल्या प्रेमापोटी, मी कोणत्याही प्रकारच्या परिस्थितीत त्याची सेवा करण्यास तयार आहे का? यहोवाला ‘त्याची निंदा करणाऱ्‍यास प्रत्युत्तर’ देता यावे अशी माझी मनस्वी इच्छा आहे का?” (नीतिसूत्रे २७:११; मत्तय २२:३७) इतरांच्या अविचारी बोलण्याने आपण कधीही आपल्या स्वर्गीय पित्यावरचा भरवसा कमी होऊ देता कामा नये. एक विश्‍वासू ख्रिस्ती भगिनी, जी अनेक वर्षांपासून एका जुनाट रोगाने ग्रस्त होती ती म्हणाली: “यहोवाने एखादी गोष्ट घडू दिली, त्याअर्थी मी नक्कीच तिला तोंड देऊ शकते. मला खात्री आहे की त्या परिस्थितीला तोंड देण्याकरता लागणारे सामर्थ्य तो मला देईल. आजवर त्याने कधीही मला निराश केलेले नाही.”

१६. कठीण परिस्थितीला तोंड देताना देवाचे वचन कशाप्रकारे साहाय्य पुरवते?

१६ सैतानाच्या डावपेचांबद्दल ईयोबाजवळ नव्हते ते ज्ञान आज आपल्याजवळ आहे. त्याच्या कुयुक्‍त्‌या, “त्याचे विचार आपल्याला कळत नाहीत असे नाही.” (२ करिंथकर २:११) शिवाय, अत्यंत कठीण परिस्थितीतही विश्‍वासू राहिलेल्या स्त्रीपुरुषांविषयी बायबलमध्ये जे अनेक अहवाल आहेत त्यांतून आपल्याला व्यवहारिक सुज्ञानाचा जणू खजिनाच सापडतो. बहुतेक जणांच्या तुलनेत ज्याने अतिशय कठीण परीक्षांना तोंड दिले, त्या प्रेषित पौलाने असे लिहिले: “धीराच्या व शास्त्रापासून मिळणाऱ्‍या उत्तेजनाच्या योगे आपण आशा धरावी म्हणून जे काही शास्त्रात पूर्वी लिहिले ते सर्व आपल्या शिक्षणाकरिता लिहिले.” (रोमकर १५:४) दुसऱ्‍या महायुद्धादरम्यान युरोपातील एका साक्षीदाराला त्याच्या धार्मिक विश्‍वासामुळे तुरुंगात टाकण्यात आले होते. हा बांधव, तीन दिवसांच्या जेवणाच्या मोबदल्यात एक बायबल घेण्यास कबूल झाला. तो म्हणतो, “ते बायबल माझ्याकरता किती मोलवान ठरले! मला भूक लागली नाही असे नाही, पण त्या कठीण समयांतून पार होण्याकरता मला व इतरांनाही आवश्‍यक असलेले आध्यात्मिक अन्‍न त्या बायबलच्या रूपात मिळाले. आजवर मी ते बायबल जपून ठेवले आहे.”

१७. देवाने पुरवलेल्या कोणकोणत्या तरतुदी आपल्याला धीर धरण्यास मदत करू शकतात?

१७ बायबलमधून तर आपल्याला सांत्वन मिळतेच. पण आपल्याजवळ बायबल अभ्यासाची अनेक साधनेही आहेत, जी निरनिराळ्या समस्यांना तोंड देण्याकरता आवश्‍यक मार्गदर्शन पुरवतात. जर तुम्ही टेहळणी बुरूज प्रकाशन सूची (इंग्रजी) यात शोधले तर तुम्हाला तुमच्याचसारख्या परिस्थितीला तोंड दिलेल्या एखाद्या सहख्रिस्ती बांधवाचा अनुभव सापडू शकेल. (१ पेत्र ५:९) तसेच, मंडळीतल्या वडिलांसोबत किंवा इतर प्रौढ ख्रिस्ती बांधवांसोबत तुमच्या समस्यांविषयी चर्चा केल्यानेही तुम्हाला साहाय्य मिळू शकेल. पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रार्थना करण्याद्वारे तुम्ही यहोवाची व त्याच्या पवित्र आत्म्याची मदत मिळवू शकता. पौलाने सैतानाच्या ‘ठोशांचा’ प्रतिकार कसा केला? देवाच्या सामर्थ्यावर विसंबून राहण्यास शिकण्याद्वारे. (२ करिंथकर १२:९, १०) त्याने लिहिले: “मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही करावयास शक्‍तिमान आहे.”—फिलिप्पैकर ४:१३.

१८. सह ख्रिस्ती बांधव कशाप्रकारे मोलवान साहाय्य पुरवू शकतात?

१८ तर आतापर्यंत आपण पाहिल्याप्रमाणे, देवाने मदत पुरवली आहे, आणि ती मिळवण्याचा प्रयत्न करण्यापासून आपण कधीही कचरू नये. नीतिसूत्रात म्हटले आहे: “संकटकाली तुझे धैर्य खचले तर तुझी शक्‍ति अल्प होय.” (नीतिसूत्रे २४:१०) लाकडी घराला वाळवी लागल्यास ज्याप्रमाणे ते कोसळू शकते, त्याचप्रमाणे निराशेच्या भावना आपल्या एकनिष्ठ राहण्याच्या निर्धाराला दुर्बळ करू शकतात. हा धोका टाळण्याकरता यहोवा आपल्याला आपल्या सहउपासकांची मदत पुरवतो. येशूला अटक झाली होती त्या रात्री एका देवदूताने येऊन त्याला प्रोत्साहन दिले होते. (लूक २२:४३) पौल बंदिवासात असताना रोमकडे प्रवास करत होता तेव्हा अप्पियाची पेठ व तीन उतारशाळा येथे त्याला सहख्रिस्ती बांधवांची भेट घडली तेव्हा त्याने “देवाची उपकारस्तुति करून धैर्य धरले.” (प्रेषितांची कृत्ये २८:१५) एका जर्मन साक्षीदार बहिणीला, ती किशोरवयीन असताना रावेन्सब्रुक छळ छावणीत पाठवण्यात आले होते. ती या छळछावणीत आली तेव्हा तिच्या मनात भीती होती, पण येथे आल्यानंतर तिला कशाप्रकारे साहाय्य मिळाले हे तिला अजूनही आठवते. ती सांगते: “एक ख्रिस्ती बहीण मला शोधत आली आणि तिने माझे प्रेमाने स्वागत केले. दुसऱ्‍या एका विश्‍वासू बहिणीने माझी काळजी घेण्याची जबाबदारी जणू स्वतःवरच घेतली आणि ती माझी आध्यात्मिक आई झाली.”

“विश्‍वासू राहा”

१९. सैतानाचा प्रतिकार करण्यास ईयोबाला कशामुळे साहाय्य मिळाले?

१९ यहोवाने ईयोबाविषयी म्हटले की “तो आपल्या सत्वाला दृढ धरून राहिला आहे.” (ईयोब २:३) ईयोब निराश झाला आणि आपल्यावर ही सगळी संकटे का येत आहेत हे त्याला समजले नाही, पण तरीसुद्धा त्याने आपली निष्ठा कधीही सोडली नाही. यहोवाला विश्‍वासू राहणे हे त्याच्या जीवनाचे उद्दिष्ट होते आणि याबाबतीत तडजोड करण्यास तो कोणत्याही परिस्थितीत तयार झाला नाही. शेवटपर्यंत तो हेच म्हणाला, की “माझा प्राण जाईतोवर मी आपले सत्वसमर्थन सोडणार नाही.”—ईयोब २७:५.

२०. शेवटपर्यंत विश्‍वासू राहिल्यामुळे काय निष्पन्‍न होईल?

२० आपणही जर ईयोबाप्रमाणे शेवटपर्यंत यहोवाला विश्‍वासू राहण्याचा निर्धार केला तर मग आपल्यासमोर मोह, विरोध किंवा संकटे काहीही येवोत—हा निर्धार आपल्याला सर्व परिस्थितीत एकनिष्ठ राहण्यास मदत करेल. येशूने स्मुर्णा येथील मंडळीला सांगितले, “तुला जे काही सोसावे लागणार आहे त्याचे भय धरू नको; पाहा, तुमची परीक्षा व्हावी म्हणून सैतान तुम्हापैकी कित्येकांस तुरूंगात टाकणार आहे; आणि तुमचे दहा दिवस हालअपेष्टांत [विपत्ती, दुःख किंवा छळ] जातील. मरेपर्यंत तू विश्‍वासू राहा, म्हणजे मी तुला जीवनाचा मुगूट देईन.”—प्रकटीकरण २:१०.

२१, २२. संकटांना तोंड देताना कोणती गोष्ट आठवणीत ठेवल्यास आपल्याला सांत्वन मिळू शकते?

२१ सैतानाच्या कह्‍यात असणाऱ्‍या या जगात आपल्या सहनशक्‍तीची व एकनिष्ठतेची परीक्षा होईल. पण येशू आपल्याला आश्‍वासन देतो की भविष्याकडे पाहता, आपल्याला भिण्याचे कोणतेही कारण नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेवटपर्यंत विश्‍वासू राहणे. पौलाने म्हटले की ‘आम्हावर येणारे संकट हे तात्कालिक व हलके’ आहे पण यहोवाने अभिवचन दिलेले ‘गौरव’ हे ‘अत्यंत मोठे’ व “सार्वकालिक” आहे. (२ करिंथकर ४:१७, १८) ईयोबावर संकट येण्याआधी व त्याची परीक्षा झाल्यानंतर त्याने जी अनेक वर्षे आनंदात घालवली त्यांच्या तुलनेत त्याचेही संकट हे तात्कालिकच होते.—ईयोब ४२:१६.

२२ हे सर्व असूनही, काही क्षण आपल्या जीवनात असे येऊ शकतात की जेव्हा आपल्यासमोर असणाऱ्‍या समस्या कधी न संपणाऱ्‍या, आणि आपले दुःख अगदीच असहनीय वाटते. पुढील लेखात आपण पाहणार आहोत की ईयोबाचा अनुभव आपल्याला धीर धरण्यासंबंधी आणखी कोणते धडे देतो. तसेच इतरांना दुःखे सोसावी लागतात तेव्हा आपण त्यांना कसे साहाय्य करू शकतो हे ही पाहूया. (w०६ ८/१५)

तुम्ही कसे उत्तर द्याल?

• ईयोबाच्या सत्त्वनिष्ठेविषयी सैतानाने कोणता वाद उपस्थित केला?

• आपल्यावर संकटे येतात तेव्हा आपल्याला त्यांचे आश्‍चर्य का वाटू नये?

• यहोवा आपल्याला धीर धरण्यास कशाप्रकारे मदत करतो?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[११ पानांवरील चित्रे]

संशोधन, प्रौढ ख्रिस्ती बांधवांशी हितगुज आणि प्रार्थनेत यहोवाजवळ आपल्या भावना व्यक्‍त केल्याने आपल्याला धीर धरण्यास मदत मिळेल