व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

‘प्रार्थना ऐकणाऱ्‍याकडे’ कसे याल?

‘प्रार्थना ऐकणाऱ्‍याकडे’ कसे याल?

‘प्रार्थना ऐकणाऱ्‍याकडे’ कसे याल?

“तू जो प्रार्थना ऐकतोस त्या तुझ्याकडे सर्व मानवजाति येते.”—स्तोत्र ६५:२.

१. पृथ्वीवर राहणाऱ्‍या इतर प्राण्यांपेक्षा मानव वेगळे का आहेत आणि यामुळे आपल्याला कोणती संधी मिळाली आहे?

 पृथ्वीवर राहणाऱ्‍या हजारो प्रकारच्या सजीव प्राण्यांपैकी फक्‍त मानवांमध्ये सृष्टिकर्त्याची उपासना करण्याची क्षमता आहे. फक्‍त मानवांना देवाची उपासना करण्याची गरज जाणवते आणि ही गरज भागवण्याची इच्छा असते. ही क्षमता असल्यामुळेच आपल्याजवळ एक विलक्षण संधी आहे—आपल्या स्वर्गीय पित्यासोबत वैयक्‍तिक नातेसंबंध जोडण्याची.

२. पापामुळे मानवजातीचा त्याच्या सृष्टिकर्त्यासोबत असलेल्या नातेसंबंधावर कोणता परिणाम झाला?

देवाने मानवाला आपल्या सृष्टिकर्त्यासोबत संवाद साधण्याच्या क्षमतेसह निर्माण केले. आदाम व हव्वा यांना परिपूर्ण असे निर्माण करण्यात आले होते. ते पापरहित होते. या कारणामुळे, लहान मूल ज्याप्रमाणे आपल्या पित्याजवळ येते त्याचप्रमाणे, व तितक्याच मोकळेपणाने आदाम व हव्वा देवाजवळ त्याच्यासोबत संवाद साधण्याकरता येऊ शकत होते. पण पाप केल्यामुळे हा अद्‌भुत विशेषाधिकार त्यांच्याकडून काढून घेण्यात आला. आदाम व हव्वा यांनी देवाच्या आज्ञेचे उल्लंघन करून त्याच्यासोबत असलेला घनिष्ट नातेसंबंध गमावला. (उत्पत्ति ३:८-१३, १७-२४) याचा अर्थ, आदामाच्या अपरिपूर्ण संततीपैकी कोणालाही आता देवासोबत संवाद साधणे शक्य नव्हते का? नाही, यहोवा अजूनही मानवांना आपल्याकडे येऊ देतो. पण याकरता त्यांनी काही अटी पूर्ण केल्या पाहिजेत. या अटी कोणत्या?

देवाकडे येण्याकरता कोणत्या अटी पूर्ण केल्या पाहिजेत?

३. पापी मानवांनी देवाकडे येण्याकरता काय केले पाहिजे व हे कोणत्या उदाहरणावरून दिसून येते?

आदामाच्या दोन पुत्रांच्या संदर्भात घडलेल्या एका घटनेवरून आपल्याला हे समजण्यास मदत मिळते, की देवाकडे येऊ इच्छिणाऱ्‍या अपरिपूर्ण मनुष्याकडून तो कोणत्या अपेक्षा करतो. काईन व हाबेल हे दोघेही, देवाला बलिदान अर्पण करण्याद्वारे त्याची उपासना करण्याच्या इच्छेने त्याच्याजवळ आले. हाबेलचे बलिदान स्वीकारण्यात आले, पण काईनाचे बलिदान स्वीकारण्यात आले नाही. (उत्पत्ति ४:३-५) हा फरक का? इब्री लोकांस ११:४ आपल्याला सांगते: “विश्‍वासाने हाबेलाने काइनापेक्षा अधिक चांगला यज्ञ देवाला केला, तेणेकरून तो नितिमान्‌ आहे अशी त्याच्याविषयी साक्ष देण्यात आली.” यावरून हे स्पष्ट होते, की देवाजवळ येण्याकरता सर्वात पहिली अट म्हणजे आपल्याला विश्‍वास असला पाहिजे. दुसरी अट कोणती, हे यहोवाने काईनाला जे म्हटले त्यावरून आपल्याला कळते: “तू बरे केले तर तुझी मुद्रा प्रसन्‍न होणार नाही काय?” काईनाने जर वाईट मार्गातून फिरून चांगले केले असते तर त्याची उपासना देवाने स्वीकारली असती. पण काईनाने देवाचा सल्ला धुडकावून लावला. त्याने हाबेलचा वध केला आणि शेवटी तो परागंदा व भटकणारा झाला. (उत्पत्ति ४:७-१२) अशारितीने, मानव इतिहासाच्या सुरुवातीलाच, देवाकडे येणाऱ्‍याने विश्‍वास बाळगणे व चांगली कृत्ये करणे किती महत्त्वाचे आहे यावर भर देण्यात आला.

४. देवाकडे येण्यासंबंधाने आपण काय ओळखले पाहिजे?

देवाकडे येण्याकरता, आपल्याला आपल्या पापपूर्ण स्वभावाची जाणीव असणेही महत्त्वाचे आहे. सगळेच मानव पापी आहेत आणि पाप हे देवाकडे येण्याच्या मार्गात एक अडथळा आहे. संदेष्टा यिर्मया याने इस्राएल राष्ट्राच्या संबंधाने असे लिहिले: “आम्ही अपराध केला. . . . तू आपणा स्वतःस अभ्राने आच्छादिले, प्रार्थनेचा त्यामधून प्रवेश होत नाही.” (विलापगीत ३:४२, ४४) पण तरीसुद्धा सबंध मानव इतिहासात, ज्यांनी विश्‍वासाने, योग्य मनोवृत्तीने व देवाच्या आज्ञांचे पालन करण्याद्वारे त्याची उपासना करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या प्रार्थना देवाने स्वीकारल्या. (स्तोत्र ११९:१४५) कोण होते हे लोक, आणि त्यांच्या प्रार्थनांवरून आपण काय शिकू शकतो?

५, ६. अब्राहाम ज्याप्रकारे यहोवाजवळ गेला त्यावरून आपण काय शिकू शकतो?

यांपैकी एक अब्राहाम हा होता. तो उपासना करण्याच्या इच्छेने देवाकडे आला तेव्हा देवाने त्याला स्वीकारले कारण देवाने अब्राहामला “माझा मित्र” म्हटले. (यशया ४१:८) अब्राहामच्या उदाहरणावरून आपण काय शिकू शकतो? या विश्‍वासू कुलप्रमुखाने यहोवाकडे एका वारसासंबंधी विचारणा केली: “हे प्रभू परमेश्‍वरा, तू मला काय देणार? मी तर निसंतान जाणार.” (उत्पत्ति १५:२, ३; १७:१८) दुसऱ्‍या एका प्रसंगी, सदोम व गमोरा या शहरांतील दुष्टांविरुद्ध देवाचा न्यायदंड बजावला जाईल तेव्हा कोण बचावले जातील यासंबंधाने त्याने देवाजवळ चिंता व्यक्‍त केली. (उत्पत्ति १८:२३-३३) अब्राहामने इतरांच्या वतीनेही प्रार्थना केली. (उत्पत्ति २०:७, १७) आणि हाबेलप्रमाणे काहीवेळा अब्राहाम बलिदान घेऊन देवाकडे आला.—उत्पत्ति २२:९-१४.

या सर्व प्रसंगांत अब्राहाम मोकळेपणाने, निःसंकोचपणे यहोवाशी बोलला. पण हा मोकळेपणा असूनसुद्धा, आपण आपल्या निर्माणकर्त्यासमोर किती क्षुद्र आहोत याची अब्राहामने नम्रपणे आठवण ठेवली. उत्पत्ति १८:२७ यात त्याचे आदरपूर्वक उद्‌गार लक्षात घ्या: “पाहा, मी केवळ धूळ व राख असून प्रभूशी बोलण्याचे मी धाडस करीत आहे.” अब्राहामची ही मनोवृत्ती खरोखर अनुकरण करण्याजोगी नाही का?

७. अनेक कुलप्रमुखांनी कोणकोणत्या विषयांसंबंधी यहोवाला प्रार्थना केली?

कुलप्रमुखांनी निरनिराळ्या गोष्टींविषयी प्रार्थना केल्या आणि त्यांच्या प्रार्थना यहोवाने स्वीकारल्या. याकोबाने प्रार्थनेद्वारे एक शपथ वाहिली. देवाच्या आशीर्वादाची विनंती करून त्याने अशी शपथ वाहिली की “जे अवघे तू मला देशील त्याचा दशमांश मी तुला अवश्‍य अर्पण करीन.” (उत्पत्ति २८:२०-२२) नंतर, जेव्हा तो आपल्या भावाला भेटायला चालला होता तेव्हा त्याने यहोवाला आपले संरक्षण करण्याची याचना केली. त्याने म्हटले: “मला माझा भाऊ एसाव याच्या हातातून सोडीव अशी मी प्रार्थना करितो; मला [त्याची] भीति वाटते.” (उत्पत्ति ३२:९-१२) ईयोबानेही आपल्या कुटुंबाच्या वतीने यहोवाला प्रार्थना केली व बलिदाने अर्पण केली. ईयोबाच्या तीन मित्रांनी अयोग्य भाषण करण्याद्वारे पाप केले, तेव्हा ईयोबाने त्यांच्या वतीने यहोवाला प्रार्थना केली आणि “परमेश्‍वराने ईयोबावर अनुग्रह केला.” (ईयोब १:५; ४२:७-९) या अहवालांवरून, आपण कोणकोणत्या विषयांसंबंधी यहोवाला प्रार्थना करू शकतो हे आपल्याला कळते. तसेच, आपल्याला हेही समजते की जे योग्य पद्धतीने यहोवाकडे येतात त्यांच्या प्रार्थना ऐकण्यास तो सदैव तयार असतो.

नियमशास्त्राच्या कराराधीन

८. नियमशास्त्राच्या कराराधीन, राष्ट्रीय हिताचे प्रश्‍न लोकांच्या वतीने यहोवासमोर कशाप्रकारे मांडले जात होते?

यहोवाने इस्राएल राष्ट्राला ईजिप्तमधून सोडवल्यानंतर त्याने त्यांना नियमशास्त्र दिले. या नियमशास्त्रात, नियुक्‍त केलेल्या याजकगणाद्वारे देवाकडे येण्याच्या तरतुदीविषयी सांगण्यात आले. काही लेव्यांना लोकांच्या वतीने याजक म्हणून कार्य करण्याकरता नियुक्‍त करण्यात आले. राष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने महत्त्वाचे प्रश्‍न उद्‌भवल्यास—कधीकधी राजा किंवा संदेष्टा याविषयी देवाकडे प्रार्थना करत असे. (१ शमुवेल ८:२१, २२; १४:३६-४१; यिर्मया ४२:१-३) उदाहरणार्थ, मंदिराच्या उद्‌घाटनाच्या प्रसंगी शलमोन राजाने यहोवाला मनःपूर्वक प्रार्थना केली. आपण शलमोनाची प्रार्थना स्वीकारली आहे याचा संकेत म्हणून यहोवाने मंदिर आपल्या तेजाने भरले व तो म्हणाला: “जी प्रार्थना या स्थानी करण्यात येईल तिच्याकडे . . . माझे कान लागतील.”—२ इतिहास ६:१२-७:३, १५.

९. पवित्रस्थानी केलेल्या प्रार्थना यहोवाने स्वीकाराव्यात म्हणून काय करणे आवश्‍यक होते?

इस्राएल राष्ट्राला देण्यात आलेल्या नियमशास्त्रात यहोवाने त्याच्या पवित्रस्थानी केलेल्या प्रार्थना स्वीकारल्या जाण्याकरता एक आज्ञा दिली होती. ती कोणती होती? दररोज सकाळी व संध्याकाळी पशूबलिदाने अर्पण करण्यासोबतच मुख्य याजकाने यहोवासमोर सुगंधित धूप जाळावा अशी ती आज्ञा होती. कालांतराने इतर याजकही ही सेवा करू लागले. पण प्रायश्‍चित्ताच्या दिनी फक्‍त प्रमुख याजक हे करू शकत होता. याजकांनी ही सन्मानदर्शक उपासना न केल्यास यहोवा त्यांच्या सेवेवर संतुष्ट झाला नसता.—निर्गम ३०:७, ८; २ इतिहास १३:११.

१०, ११. यहोवा वैयक्‍तिक प्रार्थनाही स्वीकारतो याकरता आपल्याकडे कोणता पुरावा आहे?

१० प्राचीन इस्राएल राष्ट्रात केवळ नियुक्‍त प्रतिनिधींच्या माध्यमानेच देवाकडे येणे शक्य होते का? नाही. बायबल सांगते की यहोवा वैयक्‍तिकरित्या केलेल्या प्रार्थना देखील स्वीकारण्यास तयार होता. मंदिराच्या उद्‌घाटनप्रसंगी शलमोनाने यहोवाला अशी विनवणी केली: “एखादा इस्राएल किंवा तुझे सगळे इस्राएल लोक . . . जी प्रार्थना किंवा विनवणी आपले हात या मंदिराकडे पसरून करितील, ती तू स्वर्गांतील आपल्या निवासस्थानातून ऐक.” (२ इतिहास ६:२९, ३०) लूकच्या अहवालातून आपल्याला समजते की बाप्तिस्मा देणाऱ्‍या योहानाचा पिता जखऱ्‍या हा पवित्रस्थानात धूप जाळत असताना लोकांचा समुदाय “बाहेर प्रार्थना करीत होता.” सोनेरी वेदीवर यहोवाला धूप अर्पण केले जात असताना लोकांनी बाहेर प्रार्थना करण्यासाठी जमणे ही काळाच्या ओघात एक प्रथाच बनली होती असे दिसते.—लूक १:८-१०.

११ अशारितीने, सबंध राष्ट्राच्या वतीने राष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणारे, अथवा वैयक्‍तिकरित्या यहोवाकडे येऊ इच्छिणाऱ्‍या व्यक्‍ती, योग्य पद्धतीने त्याच्याकडे आल्यास तो त्यांच्या प्रार्थना ऐकण्यास तयार होता. आज आपण नियमशास्त्राच्या कराराधीन नाही. तरीपण, प्राचीन काळात इस्राएल लोक ज्याप्रकारे देवाला प्रार्थना करण्याकरता त्याच्याकडे येत होते त्यावरून आपण प्रार्थनेसंबंधी काही महत्त्वाच्या गोष्टी शिकू शकतो.

ख्रिस्ती व्यवस्थेखाली

१२. यहोवाकडे येण्याकरता ख्रिश्‍चनांकरता कोणती तरतूद आहे?

१२ आज आपण ख्रिस्ती व्यवस्थेखाली आहोत. प्राचीन काळाप्रमाणे आज खरोखरच्या मंदिरात याजक देवाच्या लोकांचे प्रतिनिधीत्व करत नाहीत; तसेच देवाला प्रार्थना करताना आपण कोणत्याही मंदिराकडे पाहून प्रार्थना करत नाही. पण आजसुद्धा यहोवाकडे येण्याकरता त्याने एक विशिष्ट तरतूद केलेली आहे. ती तरतूद कोणती? सा.यु. २९ साली ख्रिस्ताला अभिषिक्‍त करण्यात आले आणि मुख्य याजक म्हणून नेमण्यात आले तेव्हा एक आत्मिक मंदिर अस्तित्वात आले. * हे आत्मिक मंदिर म्हणजेच प्रायश्‍चित्तादाखल दिलेल्या येशू ख्रिस्ताच्या बलिदानाच्या आधारावर, यहोवाची उपासना करण्याकरता त्याच्याकडे येण्याची नवीन तरतूद होती.—इब्री लोकांस ९:११, १२.

१३. प्रार्थनेच्या संदर्भात, जेरुसलेममधील मंदिर व आत्मिक मंदिर यांत कोणते एक साम्य आहे?

१३ जेरुसलेममधील मंदिराची अनेक वैशिष्ट्ये आत्मिक मंदिराच्या, तसेच प्रार्थनेशी संबंधित असलेल्या विविध पैलूंना अचूकरित्या चित्रित करतात. (इब्री लोकांस ९:१-१०) उदाहरणार्थ, मंदिराच्या पवित्रस्थानी धूपवेदीवर सकाळी व संध्याकाळी अर्पण केला जाणारा धूप कशास सूचित करत होता? प्रकटीकरणाच्या पुस्तकानुसार, धूप म्हणजे “पवित्र जनांच्या प्रार्थना” होत्या. (प्रकटीकरण ५:८; ८:३, ४) दाविदाने देवाच्या प्रेरणेने असे लिहिले: “माझी प्रार्थना, तुझ्यासमोर धुपाप्रमाणे . . . सादर होवो.” (स्तोत्र १४१:२) अशारितीने, ख्रिस्ती व्यवस्थेखाली सुगंधित धूप हा स्वीकारयोग्य प्रार्थनांस व यहोवाच्या स्तुतीस सूचित करतो.—१ थेस्सलनीकाकर ३:१०.

१४, १५. (क) अभिषिक्‍त ख्रिस्ती? व (ख)“दुसरी मेंढरे” कशाप्रकारे यहोवाकडे येतात?

१४ या आत्मिक मंदिरात कोण देवाला प्रार्थना करू शकतात? इस्राएल राष्ट्रातील मंदिरात याजक व लेवी आतील अंगणात येऊ शकत होते, पण पवित्रस्थानात मात्र केवळ याजकांना प्रवेश होता. स्वर्गीय जीवनाची आशा असणारे अभिषिक्‍त ख्रिस्ती एका विशेष आध्यात्मिक स्थितीचा उपभोग घेतात, जिच्याकरवी ते देवाला प्रार्थना व त्याची स्तुती करू शकतात. प्राचीन काळातील मंदिरातील आतले अंगण व पवित्रस्थान या विशेष आध्यात्मिक स्थितीला सूचित करतात.

१५ पृथ्वीवरील जीवनाची आशा बाळगणाऱ्‍या ‘दुसऱ्‍या मेंढरांविषयी’ काय? (योहान १०:१६) संदेष्टा यशयाने भाकीत केले की “शेवटल्या दिवसात” यहोवाची उपासना करण्याकरता अनेक राष्ट्रांतील लोक येतील. (यशया २:२, ३) त्याने असेही लिहिले की “विदेशी” यहोवाची सेवा करण्याकरता येतील. आपण या लोकांना स्वीकारू हे दाखवण्याकरता देवाने म्हटले: “[मी] माझ्या प्रार्थनामंदिरात त्यास हर्षित करीन.” (यशया ५६:६, ७) यासंदर्भात, प्रकटीकरण ७:९-१५ यात आणखी तपशीलांचा उल्लेख आढळतो. तेथे सांगितल्याप्रमाणे, ‘सर्व राष्ट्रांतून’ आलेला एक “मोठा लोकसमुदाय” आत्मिक मंदिराच्या बाहेरील अंगणात उभा राहून देवाची “अहोरात्र” उपासना व प्रार्थना करेल. आज देवाचे सर्व सेवक मोकळेपणाने देवाकडे येऊन त्याची प्रार्थना करू शकतात व तो अवश्‍य त्यांच्या प्रार्थना ऐकेल ही खात्री बाळगू शकतात हे खरोखरच किती सांत्वनदायक आहे!

कोणत्या प्रार्थना स्वीकारल्या जातात?

१६. प्रार्थनेच्या विषयात आपण आरंभीच्या ख्रिश्‍चनांकडून काय शिकू शकतो?

१६ आरंभीचे ख्रिस्ती प्रार्थनाशील मनोवृत्ती असलेले लोक होते. ते कोणकोणत्या बाबींसंबंधी प्रार्थना करत होते? त्याकाळातील ख्रिस्ती वडिलांनी संघटनेतील जबाबदाऱ्‍या हाताळण्याकरता योग्य पुरुषांना निवडताना मार्गदर्शनाची विनंती केली. (प्रेषितांची कृत्ये १:२४, २५; ६:५, ६) एपफ्रासने सह विश्‍वासू बांधवांच्या वतीने प्रार्थना केली. (कलस्सैकर ४:१२) पेत्राला तुरुंगात टाकण्यात आले होते तेव्हा, जेरूसलेम मंडळीतील सदस्यांनी त्याच्याकरता प्रार्थना केली. (प्रेषितांची कृत्ये १२:५) आरंभीच्या ख्रिश्‍चनांनी विरोधाला तोंड देताना धैर्य द्यावे अशी देवाला विनंती केली: “हे प्रभो, आता तू त्यांच्या धमकावण्याकडे पाहा; आणि आपल्या दासांनी पूर्ण धैर्याने तुझे वचन सांगावे असे कर.” (प्रेषितांची कृत्ये ४:२३-३०) शिष्य याकोबाने ख्रिश्‍चनांना, परीक्षांना तोंड देत असताना बुद्धी देण्याकरता देवाकडे प्रार्थना करण्यास आर्जवले. (याकोब १:५) तुम्ही आपल्या प्रार्थनांत या विषयांचा समावेश करता का?

१७. यहोवा कोणाच्या प्रार्थना ऐकतो?

१७ देव सर्वच प्रार्थना स्वीकारत नाही. तर मग, आपल्या प्रार्थना ऐकल्या जातील या भरवशासह आपण कशाप्रकारे प्रार्थना करू शकतो? पूर्वीच्या काळी ज्या विश्‍वासू लोकांच्या प्रार्थना देवाने ऐकल्या ते प्रामाणिक अंतःकरणाने आणि योग्य मनोवृत्तीने यहोवाकडे आले होते. त्यांनी चांगली कृत्ये करण्याद्वारे आपला विश्‍वास प्रकट केला होता. जे आज याच पद्धतीने यहोवाकडे येतात त्यांच्या प्रार्थना तो अवश्‍य ऐकेल अशी खात्री आपण बाळगू शकतो.

१८. ख्रिश्‍चनांनी आपल्या प्रार्थना ऐकल्या जाव्यात म्हणून कोणती अट पूर्ण केली पाहिजे?

१८ आणखी एक अट पूर्ण करणे गरजेचे आहे. प्रेषित पौलाने याविषयी खुलासा करताना लिहिले: “त्याच्याद्वारे आत्म्याच्या योगे आपणा उभयतांचा पित्याजवळ प्रवेश होतो.” “त्याच्याद्वारे” असे म्हणताना पौल कोणाविषयी बोलत होता? येशू ख्रिस्ताविषयी. (इफिसकर २:१३, १८) होय, केवळ येशूच्याद्वारेच आपण मोकळेपणाने पित्याकडे येऊ शकतो.—योहान १४:६; १५:१६; १६:२३, २४.

१९. (क) इस्राएली लोकांनी अर्पण केलेला धूप यहोवाला घृणास्पद केव्हा वाटला? (ख) आपल्या प्रार्थना सदैव यहोवाला सुगंधित धूपाप्रमाणे वाटाव्यात म्हणून आपण काय केले पाहिजे?

१९ याआधीच उल्लेख केल्याप्रमाणे, इस्राएली याजक जो धूप अर्पण करत असत, तो देवाच्या विश्‍वासू सेवकांच्या स्वीकारयोग्य प्रार्थनांना सूचित करतो. पण असेही प्रसंग आले, जेव्हा इस्राएलांनी अर्पण केलेला धूप यहोवाच्या नजरेत घृणास्पद ठरला. हे केव्हा घडले? जेव्हा इस्राएल लोक एकीकडे मंदिरात धूप अर्पण करत होते तर दुसरीकडे मूर्तींना नमन करत होते. (यहेज्केल ८:१०, ११) त्याचप्रकारे, आज जे यहोवाची सेवा करण्याचा दावा करतात पण त्याचवेळी त्याच्या नियमांच्या विरोधात असणारी कार्ये करतात, त्यांच्या प्रार्थना यहोवाला दुर्गंधीसारख्या वाटतात. (नीतिसूत्रे १५:८) तर मग, आपण सर्व प्रकारे आपले जीवन शुद्ध ठेवण्याचा सदोदीत प्रयत्न करू या जेणेकरून आपल्या प्रार्थना, देवाला सुगंधी धुपाप्रमाणे वाटतील. जे यहोवाच्या नीतिमान मार्गांनी चालतात त्यांच्या प्रार्थना त्याला आनंददायक वाटतात. (योहान ९:३१) पण प्रार्थनेसंबंधी आणखीही काही प्रश्‍न आहेत. आपण कशाप्रकारे प्रार्थना केली पाहिजे? कोणकोणत्या गोष्टींसाठी आपण प्रार्थना करू शकतो? आणि देव आपल्या प्रार्थनांचे उत्तर कसे देतो? पुढील लेखात या व इतर प्रश्‍नांची चर्चा केली जाईल. (w०६ ९/१)

[तळटीप]

^ परि. 12 टेहळणी बुरूज मे १५, २००१ अंकातील पृष्ठ २७ पाहावे.

तुम्ही कसे स्पष्ट कराल?

• अपरिपूर्ण मानव स्वीकारयोग्य पद्धतीने देवाकडे कसे येऊ शकतात?

• प्रार्थनांच्या संदर्भात आपण कुलप्रमुखांचे अनुकरण कसे करू शकतो?

• आरंभीच्या ख्रिश्‍चनांच्या प्रार्थनांवरून आपण काय शिकतो?

• आपल्या प्रार्थना देवाला सुगंधित धूपाप्रमाणे केव्हा वाटतील?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२३ पानांवरील चित्र]

देवाने हाबेलचे अर्पण स्वीकारले पण काईनाचे स्वीकारले नाही, असे का?

[२४ पानांवरील चित्र]

‘मी केवळ धूळ व राख आहे’

[२५ पानांवरील चित्र]

“त्याचा दशमांश मी तुला अवश्‍य अर्पण करीन”

[२६ पानांवरील चित्र]

तुमच्या प्रार्थना यहोवाला सुगंधित धूपासारख्या वाटतात का?