व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

स्तोत्रसंहितेच्या पाचव्या पुस्तकातील ठळक मुद्दे

स्तोत्रसंहितेच्या पाचव्या पुस्तकातील ठळक मुद्दे

यहोवाचे वचन सजीव आहे

स्तोत्रसंहितेच्या पाचव्या पुस्तकातील ठळक मुद्दे

“आमचे पुत्र आपल्या तारुण्याच्या भरात उंच वाढलेल्या रोपासारखे असावेत; आमच्या कन्या राजवाड्यांच्या कोपऱ्‍यांच्या कोरिलेल्या खांबांसारख्या असाव्यात; आमची भांडारे भरलेली असावीत; . . . आमच्या कुरणात आमची मेंढरे सहस्त्रपट . . . वाढावीत,” असे श्रीमंत म्हणतील. जे धनाढ्य आहेत ते म्हणतील: “ज्या लोकांची स्थिति अशी आहे ते सुखी आहेत.” पण, स्तोत्रकर्ता याच्या उलट म्हणतो: “ज्या लोकांचा देव यहोवा आहे तेच सुखी आहेत.” (स्तोत्र १४४:१२-१५, पं.र.भा.) यात आश्‍चर्य करण्यासारखे काही नाही कारण यहोवा आनंदी देव आहे आणि जे त्याची उपासना करतात ते देखील आनंदी आहेत. ईश्‍वरप्रेरणेने लिहिण्यात आलेल्या गीतांच्या शेवटल्या संग्रहात अर्थात १०७ ते १५० स्तोत्रांत हे सत्य स्पष्ट दिसून येते.

स्तोत्रसंहितेच्या पाचव्या पुस्तकात यहोवाचे उत्कृष्ट गुण तसेच त्याची प्रेमळ-दया, खरेपणा आणि चांगुलपणा यांवरही जोर देण्यात आला आहे. आपण देवाच्या व्यक्‍तिमत्त्वाविषयी जितकी सखोल माहिती मिळवू तितके अधिक आपण त्याच्यावर प्रेम करण्यास व त्याचे भय बाळगण्यास प्रवृत्त होऊ. परिणामतः, आपण आनंदी होऊ. स्तोत्रसंहितेच्या पाचव्या पुस्तकात आपल्याला किती मौल्यवान संदेश मिळतो!—इब्री लोकांस ४:१२.

यहोवाच्या प्रेमळ दयेमुळे आनंदी

(स्तोत्र १०७:१–११९:१७६)

“परमेश्‍वराच्या दयेबद्दल व त्याने मनुष्यांसाठी केलेल्या अद्‌भुत कृत्याबद्दल लोक त्याचे उपकारस्मरण करोत,” असे बॅबिलोनच्या दास्यत्वातून सुटून आलेले यहुदी गातात. (स्तोत्र १०७:८, १५, २१, ३१) देवाची स्तुती करत दावीद असे गातो: “तुझी दया आकाशाहून उंच आहे.” (स्तोत्र १०८:४) त्यानंतरच्या गीतात तो अशी प्रार्थना करतो: “हे परमेश्‍वरा, माझ्या देवा, मला साहाय्य कर; तू आपल्या दयेस अनुसरून मला तार.” (स्तोत्र १०९:१८, १९, २६) स्तोत्र ११० मशिहाच्या राज्याचे भविष्यसूचक वर्णन करते. “परमेश्‍वराचे भय ज्ञानाचा आरंभ होय” असे स्तोत्र १११:१० म्हणते. “जो मनुष्य परमेश्‍वराचे भय धरितो . . . तो धन्य” अर्थात आनंदी आहे, असे पुढच्या स्तोत्रात म्हटले आहे.—स्तोत्र ११२:१.

एकशे तेरा ते एकशे अठरा स्तोत्रांना हालेल स्तोत्रे म्हटले आहे कारण त्यांत वारंवार, “हललुयाह” किंवा “याहची स्तुती असो” हा वाक्यांश वापरण्यात आला आहे. मिश्‍नाह हा तिसऱ्‍या शतकातील एक संदर्भग्रंथ आहे ज्यात त्याकाळच्या मौखिक परंपरा लिहून ठेवण्यात आल्या होत्या. तर या मिश्‍नाहानुसार, हालेल स्तोत्रे वल्हांडणाच्या वेळी आणि वर्षातून तीन वेळा येणाऱ्‍या यहुद्यांच्या सणांच्या वेळी गायिली जायची. सर्व स्तोत्रांतील सर्वात लांब स्तोत्र आणि बायबलमधील सर्वात मोठा अध्याय स्तोत्र ११९ हा आहे. यात, यहोवाच्या प्रकट वचनाच्या किंवा संदेशाच्या महिमेचे वर्णन करण्यात आले आहे.

शास्त्रवचनीय प्रश्‍नांची उत्तरे:

१०९:२३—“वाढल्या सावलीप्रमाणे मी चाललो आहे,” या दाविदाच्या बोलण्याचा काय अर्थ होतो? आपला मृत्यू खूप जवळ आला आहे, असे आपल्याला वाटते, असे दाविदाने काव्यरूपात म्हटले.—स्तोत्र १०२:११.

११०:१, २—‘दाविदाच्या प्रभूने’ अर्थात येशू ख्रिस्ताने देवाच्या उजव्या बाजूला बसून काय केले? आपल्या पुनरुत्थानानंतर येशू स्वर्गात गेला आणि १९१४ मध्ये राजा म्हणून राज्य करण्यास सुरू करण्यासाठी देवाच्या उजव्या बाजूला बसला. या कालावधीत त्याने आपल्या अभिषिक्‍त अनुयायांवर राज्य केले, त्यांच्या प्रचार व शिष्य बनवण्याच्या कामात त्यांना मार्गदर्शन पुरवले आणि त्याच्या राज्यात त्याच्याबरोबर राज्य करण्यासाठी त्यांना तयार केले.—मत्तय २४:१४; २८:१८-२०; लूक २२:२८-३०.

११०:४—यहोवाने कोणती शपथ वाहिली जी “तो बदलणार नाही”? ही शपथ म्हणजे, यहोवाने येशू ख्रिस्ताबरोबर राजा आणि याजक म्हणून सेवा करण्याकरता केलेली वाचा होय.—लूक २२:२९.

११३:३—कोणत्या अर्थाने “सूर्याच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत” यहोवाचे नाव स्तवनीय आहे? यहोवाच्या नावाची स्तुती करण्यात, देवाची उपासना दररोज करणाऱ्‍या लोकांचा केवळ एकच समूह समाविष्ट नाही. पूर्वेला सूर्य उगवल्यापासून पश्‍चिमेला तो मावळेपर्यंत सूर्याची किरणे संपूर्ण पृथ्वीला तेजोमय करतात. तसेच, संपूर्ण पृथ्वीवर यहोवाची स्तुती होते. सुसंघटित प्रयत्नांविना हे शक्य नाही. यहोवाचे साक्षीदार या नात्याने आपल्याला देवाची स्तुती करण्याचा आणि राज्याच्या घोषणेच्या कार्यात आवेशाने भाग घेण्याचा सुहक्क मिळाला आहे.

११६:१५—कोणत्या अर्थाने यहोवाच्या दृष्टीत “त्याच्या भक्‍तांचे मरण अमोल आहे”? यहोवाचे उपासक त्याच्या दृष्टीत इतके अमोल आहेत, की समूह यानात्याने तो त्यांचा कधीही नाश होऊ देणार नाही. यहोवाने असे होऊ दिले तर मग, त्याचे शत्रू त्याच्यापेक्षा प्रबल आहेत, असा अर्थ होईल. शिवाय, नव्या जगाचा पाया म्हणून या पृथ्वीवर कोणी राहणार नाही.

११९:७१—पीडित झाल्यामुळे बरे होते, हे कसे? आपल्यावर क्लेश येतात तेव्हा आपण यहोवावर अधिक भरवसा ठेवायला, त्याला कळकळीने प्रार्थना करायला आणि बायबलचा अधिक तत्परतेने अभ्यास करून त्यातील सल्ल्याचे अनुकरण करायला शिकतो. शिवाय, आपल्यावर पीडा येतात तेव्हा आपल्यातले अवगुण दिसून येतील ज्यांत आपण सुधारणा केली पाहिजे. पीडांना जर आपण स्वतःला शुद्ध करू दिले, तर पीडांमुळे आपण नाराज होणार नाही.

११९:९६—“सर्व पूर्णतेला मर्यादा असते” याचा काय अर्थ होतो? स्तोत्रकर्ता एका मानवी दृष्टिकोनातून परिपूर्णतेविषयी बोलतो. कदाचित त्याला असे वाटत असावे, की परिपूर्णतेविषयी मानवाची कल्पना मर्यादित आहे. परंतु, देवाच्या आज्ञांना सीमा नाहीत. या आज्ञांतील मार्गदर्शन जीवनांतील प्रत्येक क्षेत्राला लागू होते. “सर्व पूर्णतेला मर्यादा असते हे मी पाहिले आहे, पण तुझी आज्ञा अत्यंत व्यापक आहे.”

११९:१६४—“दिवसातून सात वेळा” देवाची स्तुती करण्याचे महत्त्व काय आहे? सात हा आकडा पूर्णता सूचित करतो. यास्तव, स्तोत्रकर्ता असे म्हणत आहे, की यहोवा सर्व स्तुतीस पात्र आहे.

आपल्याकरता धडे:

१०७:२७-३१. हर्मगिदोन येईल तेव्हा जगातील बुद्धिमान लोकांची ‘मती कुंठित’ होईल. (प्रकटीकरण १६:१४, १६) त्यांच्या शहाणपणामुळे कोणीही या नाशातून वाचणार नाही. फक्‍त जे लोक यहोवावर भिस्त ठेवतात ते “परमेश्‍वराच्या दयेबद्दल . . . त्याचे उपकारस्मरण” करण्यासाठी जिवंत वाचतील.

१०९:३०, ३१; ११०:५. सैनिकाच्या उजव्या हाताला ढालीचा तसा फायदा होत नाही, कारण उजव्या हातात तलवार असल्यामुळे तो हात उघडा असतो. परंतु त्याचा डावा हात ढालीमागे सुरक्षित असतो. त्यामुळे लाक्षणिक अर्थाने यहोवा आपल्या सेवकांचा बचाव करण्यासाठी त्यांच्या “उजव्या हाताकडे” असतो. अशाप्रकारे तो त्यांचे संरक्षण करतो व त्यांना मदत करतो. हे, त्याचे “पुष्कळ उपकारस्मरण” करण्याकरता उत्तम कारण आहे.

११३:४-९. परमेश्‍वर इतका उच्च आहे की ‘आकाशाचे अवलोकन’ करण्यासही त्याला खाली वाकावे लागते. तरीपण तो कंगाल, दरिद्री व वांझ स्त्रियांना दया दाखवतो. सार्वभौम प्रभू यहोवा नम्र आहे आणि आपल्या उपासकांनी देखील नम्र असावे, अशी इच्छा बाळगतो.—याकोब ४:६.

११४:३-७. तांबडा समुद्र, यार्देन नदी आणि सीनाय पर्वत याठिकाणी यहोवाने आपल्या लोकांसाठी केलेल्या महत्कृत्यांविषयी शिकल्यानंतर आपल्या मनावर त्यांचा खोल परिणाम झाला पाहिजे. मानवजातीला चित्रित करणारी “पृथ्वी” प्रभूमुळे लाक्षणिक अर्थाने ‘थरथर कापली पाहिजे.’

११९:९७-१०१. देवाच्या वचनातून बुद्धी, सूक्ष्मदृष्टी आणि समज प्राप्त केल्यामुळे आध्यात्मिक हानीपासून आपले संरक्षण होते.

११९:१०५. देवाचे वचन आपल्या पावलांकरिता दिवा आहे म्हणजे ते आपल्याला सध्याच्या समस्यांशी झगडण्यास मदत करू शकते. तसेच ते आपल्या मार्गावर प्रकाशही टाकते; म्हणजे, भवितव्याबद्दल असलेल्या देवाच्या उद्देशाविषयी भाकीत करते.

संकटांतही आनंदी

(स्तोत्र १२०:१–१४५:२१)

आपण परीक्षामय प्रसंगांचा व संकटांचा सामना कसा करू शकतो? १२० ते १३४ स्तोत्रांत आपल्याला या प्रश्‍नाचे स्पष्ट उत्तर सापडते. मदतीसाठी यहोवाकडे पाहण्याद्वारे आपण अडचणींचा सामना करीत आपला आनंद टिकवून ठेवतो. आरोहणस्तोत्रे म्हटली जाणारी ही स्तोत्रे, इस्राएल लोकांनी, ते त्यांच्या वार्षिकोत्सवासाठी जेरुसमेलला प्रवास करत असताना गायिली असावीत.

स्तोत्रे १३५ आणि १३६ मध्ये यहोवा आणि असाहाय्य मूर्तींमधला फरक दाखवला आहे. यहोवा, त्याला वाटेल ते तो करतो; पण मूर्ती काहीच करू शकत नाहीत. १३६ व्या स्तोत्राची रचना अशाप्रकारे करण्यात आली आहे, की प्रत्येक वचनाचा शेवटला भाग, पहिल्या भागाच्या उत्तराच्या रुपात गायिला जात असे. त्यानंतरचे स्तोत्र बॅबिलोनमध्ये असलेल्या यहुद्यांच्या दयनीय अवस्थेचे वर्णन करते ज्यांना सीयोनात यहोवाची उपासना करायची इच्छा होती. स्तोत्रे १३८ ते १४५ पर्यंतची सर्व स्तोत्रे दावीदाची स्तोत्रे आहेत. तो ‘मनापासून यहोवाचे उपकारस्मरण करू’ इच्छितो. का? कारण, “भयप्रद व अद्‌भुत रीतीने माझी घडण झाली आहे,” असे तो म्हणतो. (स्तोत्र १३८:१; १३९:१४) पुढील पाच स्तोत्रांत, दावीद दुष्ट लोकांपासून आपले संरक्षण करावे, आपली धार्मिक सुधारणा करावी, छळकर्त्यांपासून आपली सुटका करावी आणि वर्तनाच्या संबंधाने आपल्याला मार्गदर्शन द्यावे म्हणून प्रार्थना करतो. यहोवाचे लोक कशाप्रकारे आनंदी आहेत, हे तो सांगतो. (स्तोत्र १४४:१५) देवाची महती आणि त्याचा चांगुलपणा यांवर मनन केल्यावर दावीद म्हणतो: “माझे मुख परमेश्‍वराचे स्तवन करील; प्राणिमात्र त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद युगानयुग करो.”—स्तोत्र १४५:२१.

शास्त्रवचनीय प्रश्‍नांची उत्तरे:

१२२:३—जेरुसलेम ‘एकत्र जोडलेल्या नगरीसारखे’ होते, ते कसे? प्राचीन काळातल्या शहरांप्रमाणे जेरुसलेममध्येही घरे एकमेकांच्या जवळ जवळ बांधण्यात आली होती. जेरुसलेम शहरात अशी दाटीवाटी असल्यामुळे ते सुरक्षितही होते. शिवाय, लोकांची घरे जवळजवळ असल्यामुळे शहरात राहणारे लोक, साहाय्यासाठी व सुरक्षेसाठी एकमेकांवर अवलंबून राहू शकत होते. यावरून, इस्राएलचे १२ गोत्र उपासनेसाठी एकत्र येत तेव्हा त्यांच्यातील आध्यात्मिक ऐक्य सूचित होते.

१२३:२—दासांच्या डोळ्यांच्या दृष्टांताचा काय अर्थ आहे? दास आणि दासी आपल्या धन्याच्या किंवा धनिणीच्या हाताकडे दोन कारणांसाठी पाहतात: त्याची किंवा तिची मर्जी काय आहे याचा वेध घेण्यासाठी आणि संरक्षण व जीवनावश्‍यक गोष्टी मिळण्यासाठी. तसेच, आपण यहोवाकडे त्याची इच्छा काय आहे याचा वेध घेण्यासाठी आणि त्याची मर्जी प्राप्त करण्यासाठी पाहतो.

१३१:१-३—दावीदाने ‘दूध तुटलेल्या बाळकासारखा आपला जीव स्वस्थ व शांत’ कसा ठेवला? दूध तुटलेले बाळ आपल्या आईच्या कुशीत स्वस्थ आणि समाधानी राहण्यास शिकते. तसेच दावीदही आपला ‘जीव स्वस्थ व शांत ठेवण्यास शिकला.’ ते कसे? तो कधीही घमंडी बनला नाही किंवा ज्या मोठमोठ्या गोष्टी त्याला प्राप्त करता येत नव्हत्या त्या मिळवण्यासाठी तो त्यांच्यामागे धावला नाही. मोठेपणा मिळवण्याऐवजी त्याने आपल्या मर्यादा ओळखल्या व नम्रता प्रदर्शित केली. आपणही त्याच्या मनोवृत्तीचे अनुकरण करून सुज्ञता दाखवू शकतो; विशेषतः मंडळीत आपण विशेषाधिकार मिळवू पाहत असू तर.

आपल्याकरता धडे:

१२०:१, २, ६, ७. खोटी आणि जहाल भाषाशैली इतरांना असहनीय मनःस्ताप देते. आपण “शांतताप्रिय” आहोत हे दाखवण्याचा एक मार्ग आहे आपल्या जीभेवर ताबा ठेवणे.

१२०:३, ४. ‘कपटी जीभ’ असणाऱ्‍या व्यक्‍तीचे वर्तन आपल्याला सहन करावे लागत असेल तर यहोवा आपल्या नियुक्‍त समयी सर्वकाही व्यवस्थित करेल यात आपण समाधान मानू शकतो. जे खोटे बोलतात त्यांना ‘वीरांच्या’ हातून पीडा भोगाव्या लागतील. त्यांना यहोवाचा जळजळता न्यायदंड भोगावा लागेल हे, “रतम लाकडाचे निखारे” यावरून सूचित होते.

१२७:१, २. आपण करत असलेल्या सर्व प्रयत्नांत यहोवाचे मार्गदर्शन घेतले पाहिजे.

१३३:१-३. यहोवाच्या लोकांतील ऐक्य, शांतीदायक, हितकारक आणि तजेला देणारे आहे. एकमेकांच्या चुका शोधून, भांडण-तंटा करून किंवा कुरकुर करून आपण या ऐक्याचा भंग करू नये.

१३७:१, ५, ६. यहोवाच्या बंदिवान उपासकांना सीयोनेची आठवण येत होती. सीयोन त्या काळी यहोवाच्या संघटनेचा दृश्‍य भाग होते. आपल्याबाबतीत काय? आज यहोवा ज्या संघटनेचा उपयोग करत आहे तिच्याशी आपण एकनिष्ठपणे जोडलेलो आहोत का?

१३८:२. यहोवा ‘आपल्या संपूर्ण नावाहून आपल्या वचनाची थोरवी वाढवेल’ म्हणजे आपल्या नावाद्वारे त्याने जे काही करण्याचे वचन दिले आहे त्या सर्व पूर्णता, आपल्या अपेक्षांच्या कितीतरी पटीने जास्त असतील. होय, भविष्यात आपल्यासाठी पुष्कळ अद्‌भुत गोष्टी वाढून ठेवल्या आहेत.

१३९:१-६, १५, १६. यहोवाला आपली कार्ये, आपले विचार, आणि आपले शब्द अर्थात आपण काय बोलू हेही माहीत आहे. आपण आपल्या आईच्या उदरात पिंडरूपात होतो, आपल्या शरीराचा प्रत्येक अवयव तयार व्हायच्या आधीपासून तो आपल्याला जाणतो. प्रत्येक व्यक्‍तीबद्दल देवाला असलेले ज्ञान “अगम्य,” अगाध आहे. आपला अंत पाहणाऱ्‍या एखाद्या परिस्थितीचा आपण सामना करत आहोत हे यहोवा केवळ पाहतच नाही तर त्या परिस्थितीचा आपल्यावर कसा परिणाम होत आहे हे देखील तो समजू शकतो.

१३९:७-१२. जगात असे कोणतेही ठिकाण नाही जेथून यहोवा आपल्याला बळकटी देऊ शकत नाही.

१३९:१७, १८. यहोवाचे ज्ञान आपल्याला रम्य वाटते का? (नीतिसूत्रे २:१०) यहोवाचे ज्ञान आपल्या जिवाला रम्य वाटत असेल तर आपल्याला आनंदाचा कधीही न आटणारा झरा सापडला आहे. यहोवाचे विचार “वाळूच्या कणांपेक्षा अधिक” आहेत. त्याच्याविषयी आपले शिकणे कधीही संपणार नाही.

१३९:२३, २४. आपल्या अंतर्मनात काही ‘दुष्टपणा’—अयोग्य विचार, इच्छा, प्रवृत्ती तर नाहीत हे पाहण्यासाठी आपल्या मनाची झडती घ्यावी, अशी आपण यहोवाला विनंती करू शकतो जेणेकरून आपण या गोष्टी आपल्या मनातून काढून टाकू शकू.

१४३:४-७. आपण कठीण संकटांचा देखील सामना कसा करू शकतो? स्तोत्रकर्ता आपल्याला एक कानमंत्र देतो: यहोवाच्या कार्यांवर मनन करा, त्याच्या कामात स्वतःला झोकून द्या आणि मदतीसाठी त्याला प्रार्थना करा.

“परमेशाचे स्तवन करा”

पहिल्या चार स्तोत्रांच्या संग्रहांच्या शेवटी, यहोवाचे स्तवन करा ही अभिव्यक्‍ती आहे. (स्तोत्र ४१:१३; ७२:१९, २०; ८९:५२; १०६:४८) शेवटल्या संग्रहाच्या शेवटी देखील ही अभिव्यक्‍ती आहे. स्तोत्र १५०:६ म्हणते: “प्रत्येक प्राणी परमेशाचे स्तवन करो. परमेशाचे स्तवन करा.” देवाच्या नव्या जगात हे खरोखरच होणार आहे.

पण तो आशीर्वादित काळ येईपर्यंत आपल्याजवळ खऱ्‍या देवाचे गौरव करण्यासाठी आणि त्याच्या नावाची स्तुती करण्यासाठी भरपूर कारणे आहेत. यहोवाशी ओळख घडल्यामुळे आणि त्याच्याबरोबर नातेसंबंध जोडण्याची संधी मिळाल्यामुळे आपण किती आनंदी झालो आहोत, यावर जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपले अंतःकरण कृतज्ञतेने ओसंडून वाहत नाही का? (w०६ ९/१)

[१९ पानांवरील चित्र]

यहोवाची अद्‌भुत कार्ये भयप्रेरक आहेत

[२० पानांवरील चित्र]

यहोवाचे विचार “वाळूच्या कणांपेक्षा अधिक” आहेत