व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आशेने यहोवाची प्रतीक्षा करा व धैर्यवान व्हा

आशेने यहोवाची प्रतीक्षा करा व धैर्यवान व्हा

आशेने यहोवाची प्रतीक्षा करा व धैर्यवान व्हा

“तू यहोवाची प्रतीक्षा कर, दृढ ऐस, व तुझे हृदय धीर धरो; होय तू यहोवाची प्रतीक्षा कर.”—स्तोत्र २७:१४, पं.र.भा.

१. आशा महत्त्वपूर्ण का आहे आणि शास्त्रवचनांमध्ये आशा हा शब्द कोणकोणत्या संदर्भात वापरण्यात आला आहे?

 खरी आशा तेजोमय प्रकाशासारखी असते. ही आशा आपल्याला सध्या सहन कराव्या लागणाऱ्‍या परीक्षांच्या पलिकडे पाहण्यास आणि धैर्याने व आनंदाने भविष्याचा सामना करण्यास मदत करते. केवळ यहोवा आपल्या प्रेरित वचनाकरवी आपल्याला पक्की आशा देऊ शकतो. (२ तीमथ्य ३:१६) वास्तविक पाहता, “आशा,” “आशा बाळगणे,” “आशा धरणे,” हे शब्द बायबलमध्ये अनेकदा आलेले आहेत व यांचे दोन अर्थ होतात. एक अर्थ, आतुरतेने व पूर्ण खात्रीनिशी चांगल्याची अपेक्षा करणे आणि दुसरा अर्थ, ज्याची आपण अपेक्षा करता त्याला देखील आशा म्हटले जाऊ शकते. * अशाप्रकारची आशा ही केवळ इच्छा नसते जिला पूर्ण होण्याचा कसलाही आधार नसतो.

२. येशूच्या जीवनात आशेची काय भूमिका होती?

येशूला जेव्हा परीक्षा आणि कठीण परिस्थितींना तोंड द्यावे लागले तेव्हा त्याने सध्याच्या परिस्थितीच्या पलिकडे पाहिले आणि यहोवावर आशा ठेवली. “जो आनंद त्याच्यापुढे होता त्याकरिता त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला, आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला आहे.” (इब्री लोकांस १२:२) येशूचे लक्ष यहोवाच्या सार्वभौमत्वाचे समर्थन व देवाचे नाव पवित्र करण्यावर असल्यामुळे, त्याने कधीही देवाची आज्ञा मोडली नाही; यासाठी त्याला बऱ्‍याच अडचणींना तोंड द्यावे लागले.

३. आशा या गुणाची देवाच्या सेवकांच्या जीवनात काय भूमिका आहे?

आशा आणि धैर्य यात काय संबंध आहे हे दाखवताना राजा दावीद म्हणाला: “देवाची प्रतीक्षा कर, . . . शूर हो, हिम्मत बांध, धैर्य धर; होय, देवाची प्रतीक्षा कर.” (स्तोत्र २७:१४, सुबोध भाषांतर) आपले हृदय घट्ट बनवण्याची आपली इच्छा असेल तर आपण आपली आशा अंधूक होऊ देऊ नये तर ती सतत आपल्या मनात ताजी ठेवली पाहिजे आणि आपल्या हृदयात असली पाहिजे. असे केल्याने आपल्याला, येशूने आपल्या शिष्यांना जी कामगिरी पूर्ण करण्यास दिली ती करताना त्याच्यासारखे धैर्य व आवेश दाखवण्यास मदत मिळू शकेल. (मत्तय २४:१४; २८:१९, २०) होय, देवाचे सेवक आपल्या जीवनात प्रदर्शित करत असलेल्या विश्‍वास आणि प्रेम या सर्वात महत्त्वपूर्ण व टिकाऊ गुणांबरोबर आशा देखील बाळगतात, असा बायबलमध्ये उल्लेख करण्यात आला आहे.—१ करिंथकर १३:१३.

तुम्ही “विपुल आशा” बाळगता का?

४. अभिषिक्‍त ख्रिस्ती आणि त्यांचे सोबती अर्थात ‘दुसरी मेंढरे’ कशाची आतुरतेने वाट पाहत आहेत?

देवाच्या लोकांसमोर उज्ज्वल भवितव्य आहे. अभिषिक्‍त ख्रिस्ती, स्वर्गामध्ये ख्रिस्ताबरोबर सेवा करण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत तर ‘दुसरी मेंढरे’ “नश्‍वरतेच्या दास्यातून मुक्‍त होऊन . . . [पृथ्वीवर] देवाच्या मुलांची गौरवयुक्‍त मुक्‍तता मिळावी ह्‍या आशेने वाट” पाहत आहेत. (योहान १०:१६; रोमकर ८:१९-२१; फिलिप्पैकर ३:२०) ‘गौरवयुक्‍त मुक्‍ततेचा’ अर्थ, पाप आणि पापाच्या भीषण परिणामांपासून मुक्‍तता. होय, “प्रत्येक उत्तम देणगी व प्रत्येक पूर्ण दान” देणारा यहोवा देव आपल्या एकनिष्ठ जनांना ही सर्वात मोठी देणगी देणार आहे.—याकोब १:१७; यशया २५:८.

५. आपण “विपुल आशा” कशी बाळगू शकतो?

आपण किती प्रमाणात ख्रिस्ती आशा बाळगली पाहिजे? रोमकर १५:१३ मध्ये आपण असे वाचतो: “आता आशेचा देव विश्‍वास ठेवण्यामुळे तुम्हाला संपूर्ण आनंदाने व शांतीने भरो, अशाकरिता की, तुम्हाला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने विपुल आशा प्राप्त व्हावी.” आशेची तुलना, अंधारात जळणाऱ्‍या मेणबत्तीशी नव्हे तर सकाळच्या सूर्याच्या लखलखीत किरणांशी करता येते जी आपले जीवन शांती, आनंद, उद्देश आणि धैर्य यांनी भरून टाकते. आपण देवाच्या लिखित वचनावर विश्‍वास ठेवतो आणि आपल्याला देवाचा पवित्र आत्मा मिळतो तेव्हा आपल्याला “विपुल आशा” मिळते, याची नोंद घ्या. रोमकर १५:४ मध्ये म्हटले आहे: “धीराच्या व शास्त्रापासून मिळणाऱ्‍या उत्तेजनाच्या योगे आपण आशा धरावी म्हणून जे काही शास्त्रात पूर्वी लिहिले ते सर्व आपल्या शिक्षणाकरिता लिहिले.” यास्तव आपण स्वतःला विचारू शकतो: ‘देवाच्या वचनाचे दररोज वाचन करण्याद्वारे उत्तम विद्यार्थी बनून मी माझी आशा ताजी ठेवतो का? मी नियमितरीत्या देवाचा पवित्र आत्मा मिळावा म्हणून प्रार्थना करतो का?’—लूक ११:१३.

६. आपली आशा तेजोमय ठेवण्याकरता आपण कोणत्या गोष्टींपासून सावधगिरी बाळगली पाहिजे?

आपला आदर्श येशू ख्रिस्त याने देवाच्या वचनातून शक्‍ती मिळवली. त्याच्या पावलांवर पाऊल ठेवण्याद्वारे आपली ‘मने खचून थकून जात नाहीत.’ (इब्री लोकांस १२:३) साहजिकच, जर देवाने आपल्याला दिलेली आशा, आपल्या मनात किंवा हृदयात निस्तेज झाली किंवा आध्यात्मिक गोष्टींवरून आपले लक्ष भौतिक अथवा जगिक ध्येयांकडे वळाले तर आपण लवकरच आध्यात्मिक अर्थाने मलूल होऊ. परिणामस्वरूप, आपले नैतिक बळ व धैर्य खचून जाईल. अशा मनःस्थितीत आपले ‘विश्‍वासरूपी तारू फुटूही’ शकते. (१ तीमथ्य १:१९) दुसरीकडे पाहता, खऱ्‍या आशेमुळे आपला विश्‍वास भक्कम होतो.

विश्‍वासाकरता आवश्‍यक असलेली आशा

७. कोणत्या अर्थाने विश्‍वास दाखवण्यासाठी आशेची गरज आहे?

“विश्‍वास हा आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरवसा आणि न दिसणाऱ्‍या गोष्टींबद्दलची खातरी आहे,” असे बायबल म्हणते. (इब्री लोकांस ११:१) यास्तव, आशा हा विश्‍वासाचा दुय्यम गुण नव्हे तर विश्‍वासाचा अविभाज्य अंग आहे. अब्राहामाच्या उदाहरणाचा विचार करा. यहोवाने त्यांना संतान होण्याचे वचन दिले तेव्हा मानवी दृष्टीतून पाहिल्यास, त्याचे आणि त्याची पत्नी सारा हिचे मुले प्रसवण्याचे वय टळून गेले होते. (उत्पत्ति १७:१५-१७) अब्राहामाने यावर कशी प्रतिक्रिया दाखवली? “बहुत राष्ट्रांचा बाप व्हावे म्हणून आशेला जागा नसताहि त्याने आशेने विश्‍वास ठेवला.” (रोमकर ४:१८) होय, अब्राहामाला देवाने वचन दिले की तुला एक संतान होईल. आणि या आशेमुळे त्याच्या विश्‍वासाला भक्कम आधार मिळाला. परिणामस्वरूप या विश्‍वासामुळे त्याची आशा आणखी मजबूत झाली व त्याला आपल्या आशेची खात्री मिळाली. यामुळेच तर अब्राहाम आणि साराने, आपले घर, आपले नातेवाईक सोडून उर्वरित आयुष्य एका परकीय देशात छावण्यांमध्ये घालवण्याचे पाऊल धैर्याने उचलले!

८. विश्‍वासूपणे धीर धरल्यास आपली आशा मजबूत कशी होते?

देवाच्या आज्ञा मानणे अब्राहामासाठी सर्वच वेळी सोपे नव्हते. तरीसुद्धा, अब्राहामाने संपूर्ण मनाने यहोवाच्या आज्ञा मानून आपली आशा जिवंत ठेवली. (उत्पत्ति २२:२, १२) आपणही यहोवाची सेवा आज्ञाधारकपणे व सहनशीलतेने करण्याद्वारे प्रतिफळाची खात्री बाळगू शकतो. पौलाने लिहिले: “धीराने शील व शीलाने आशा निर्माण होते; आणि आशा लाजवीत नाही.” (रोमकर ५:४, ५) म्हणूनच पौलाने असेही लिहिले: “आमची अशी इच्छा आहे की, तुम्हापैकी प्रत्येकाने आशेविषयीची पूर्ण खातरी करून घेण्याच्या हेतूने तशीच आस्था शेवटपर्यंत व्यक्‍त करावी.” (इब्री लोकांस ६:११) यहोवाबरोबर घनिष्ठ नातेसंबंधावर आधारित असलेली अशी सकारात्मक मनोवृत्ती आपल्याला कोणत्याही प्रकारच्या कठीण परिस्थितीचा धैर्याने व आनंदाने सामना करण्यास मदत करू शकते.

“आशेने हर्षित व्हा”

९. कोणती गोष्ट नियमितरीत्या केल्याने आपल्याला “आशेने हर्षित” होण्यास मदत मिळू शकेल?

देवाने आपल्याला दिलेली आशा, हे जग जे काही देऊ शकते त्याच्या कितीतरी पटीने श्रेष्ठ आहे. स्तोत्र ३७:३४ म्हणते: “परमेश्‍वराची प्रतीक्षा कर व त्याच्या मार्गाचे अवलंबन कर, म्हणजे तो तुझी उन्‍नति करून तुला पृथ्वीचे वतन देईल; दुर्जनांचा उच्छेद झालेला तू आपल्या डोळ्यांनी पाहशील.” होय, “आशेने हर्षित” होण्याकरता आपल्याजवळ भरपूर कारणे आहेत. (रोमकर १२:१२) परंतु, त्यासाठी आपण सतत आपल्या आशेचा विचार करत राहिले पाहिजे. देवाने दिलेल्या आशेवर तुम्ही नियमितरीत्या मनन करता का? तुम्ही नंदनवनात, निरोगी, चिंतापासून मुक्‍त, अवती-भोवती तुमचे मित्र व आप्तजन असलेले, मनपसंत काम करत असल्याची कल्पना तुम्ही कधी करता का? आपल्या प्रकाशनांमध्ये नंदनवनाची जी चित्रे दाखवली जातात त्यावर तुम्ही मनन करता का? अशाप्रकारे नियमितरीत्या मनन करण्याची तुलना, मन हरखून टाकणारे दृश्‍य पाहण्याकरता खिडकीची काच पुसण्याशी करू शकता. तुम्ही जर काच पुसली नाही तर त्यावर धूळ साचेल आणि समोरचे विलोभनीय दृश्‍य आपल्याला धूसर दिसेल. त्यामुळे आपले लक्ष इतर गोष्टींकडे आकर्षित होण्याची शक्यता आहे. पण आपल्या बाबतीत असे कधीही घडू देऊ नका!

१०. प्रतिफळावर लक्ष ठेवल्यामुळे यहोवाबरोबर आपला नातेसंबंध चांगला का राहतो?

१० अर्थात, यहोवाची सेवा करण्याचा आपला मुख्य हेतू, हा आहे, की आपले यहोवावर प्रेम आहे. (मार्क १२:३०) पण आपले लक्ष प्रतिफळावर देखील असले पाहिजे. आणि खरे तर आपण असे करावे अशी यहोवा आपल्याकडून अपेक्षा करतो! इब्री लोकांस ११:६ मध्ये म्हटले आहे: “विश्‍वासावाचून त्याला संतोषविणे अशक्य आहे; कारण देवाजवळ जाणाऱ्‍याने असा विश्‍वास ठेवला पाहिजे की, तो आहे, आणि त्याचा शोध झटून करणाऱ्‍यांना तो प्रतिफळ देणारा आहे.” यहोवा प्रतिफळ देणारा म्हणून आपण त्याच्याकडे पाहावे, असे त्याला का वाटते? कारण, आपण जेव्हा असे करतो तेव्हा दाखवून देत असतो, की आपण आपल्या स्वर्गीय पित्याला चांगल्याप्रकारे ओळखतो. आपल्याला माहीत आहे, की तो उदार आहे आणि त्याचे आपल्या मुलांवर प्रेम आहे. आपल्याला “भावी सुस्थितीची आशा” नसती तर आपण किती निराश आणि सहजपणे निरुत्साहित झालो असतो याची कल्पना करा.—यिर्मया २९:११.

११. देवाने दिलेल्या आशेमुळे मोशे सुज्ञ निर्णय कसा घेऊ शकला?

११ एक उल्लेखनीय उदाहरण मोशेचे आहे ज्याने देवाने दिलेल्या आशेवर आपले लक्ष केंद्रित ठेवले होते. मोशेला “फारोच्या कन्येचा पुत्र” म्हटले जात होते. त्याच्याजवळ ईजिप्तमध्ये सत्ता, प्रतिष्ठा, संपत्ती होती. मग तो याच गोष्टींमध्ये गुरफटून राहणार होता की यहोवाची सेवा करणार होता? मोशेने यहोवाची सेवा करण्याची निवड केली. का? कारण, “त्याची दृष्टी प्रतिफळावर [खिळून] होती.” (इब्री लोकांस ११:२४-२६) होय, यहोवाने मोशेपुढे जी आशा ठेवली होती ती त्याने निश्‍चितच क्षुल्लक लेखली नाही.

१२. ख्रिस्ती आशा शिरस्राणासारखी का आहे?

१२ प्रेषित पौलाने आशेची तुलना शिरस्राणाशी केली. आपल्या लाक्षणिक शिरस्राणामुळे आपले विचार सुरक्षित राहतात. आपले विचार सुरक्षित राहिल्यामुळे आपण सुज्ञ निर्णय घेऊ शकतो, योग्य गोष्टींना प्राधान्य देऊ शकतो आणि देवाशी एकनिष्ठ राहू शकतो. (१ थेस्सलनीकाकर ५:८) तुम्ही सतत आपले लाक्षणिक शिरस्राण परिधान करता का? असल्यास, मग मोशे व पौल यांच्याप्रमाणे तुमची आशा देखील “चंचल धनावर” नव्हे तर जो “जिवंत देव आपल्या उपभोगासाठी सर्व काही विपुल देतो त्याच्यावर” ठेवाल. स्वार्थी ध्येयांचा पाठलाग करण्याचे सोडून जगाच्या रहाटणीच्या उलट दिशेने जाण्याकरता धैर्य लागते खरे, परंतु तुम्ही करत असलेले प्रयत्न वाया जाणार नाहीत. तेव्हा, जे यहोवावर आशा ठेवतात व त्याच्यावर प्रेम करतात अशांसाठी जे “खरे जीवन” राखून ठेवण्यात आले ते धुडकावून नाशवान गोष्टींच्या मागे का म्हणून लागायचे?—१ तीमथ्य ६:१७, १९.

“मी तुला सोडून जाणार नाही”

१३. यहोवा आपल्या एकनिष्ठ जनांना कोणते आश्‍वासन देतो?

१३ सद्य व्यवस्थीकरणावर आशा ठेवणाऱ्‍या लोकांनी, भविष्यात घडणार असलेल्या भयानक गोष्टींचा गंभीरपणे विचार केला पाहिजे कारण या जगाला एकावर एक “वेदनांचा” अनुभव घ्यावा लागत आहे. (मत्तय २४:८) परंतु जे यहोवावर आशा ठेवून आहेत त्यांना कसलीही भीती नाही. ते ‘सुरक्षित राहतील, आणि त्यांना अरिष्टाची भीति नसल्यामुळे ते स्वस्थ असतील.’ (नीतिसूत्रे १:३३) सद्य व्यवस्थीकरणावर त्यांची आशा नसल्यामुळे ते पौलाने दिलेल्या या सल्ल्याचे आनंदाने पालन करतात: “तुमची वागणूक द्रव्यलोभावाचून असावी; जवळ आहे तेवढ्यात तुम्ही तृप्त असावे; कारण त्याने स्वतः म्हटले आहे, ‘मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही.’”—इब्री लोकांस १३:५.

१४. आपल्या भौतिक गरजांची ख्रिश्‍चनांनी फाजील काळजी का करू नये?

१४ या वचनावरून आपल्याला शंभर टक्के खात्री मिळते, की देव आपली काळजी घेईल. देवाला आपल्याबद्दल काळजी आहे याची येशूने देखील खात्री दिली. तो म्हणाला: “तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्त्व मिळविण्यास झटा म्हणजे त्यांच्याबरोबर ह्‍याहि सर्व गोष्टी [जीवनास उपयोगी असलेल्या भौतिक गोष्टी] तुम्हाला मिळतील. ह्‍यास्तव उद्याची चिंता करू नका, कारण उद्याची चिंता उद्याला.” (मत्तय ६:३३, ३४) राज्यासाठी आवेशी असण्याबरोबर, आपल्याला आपल्या शारीरिक गरजा पूर्ण करण्याची भारी जबाबदारी देखील पार पाडावी लागते; या दोन्ही गोष्टी सांभाळताना आपल्याला जी तारेवरची कसरत करावी लागते, त्याची जाणीव यहोवाला आहे. तेव्हा, आपल्या गरजा पूर्ण करण्याच्या त्याच्या क्षमतेवर आणि त्याच्या इच्छेवर आपण संपूर्ण भरवसा ठेवू या.—मत्तय ६:२५-३२; ११:२८-३०.

१५. ख्रिस्ती आपला डोळा निर्दोष कसा ठेवतात?

१५ आपला डोळा “निर्दोष” ठेवून, आपण यहोवावर विसंबून आहोत हे दाखवून देतो. (मत्तय ६:२२, २३) डोळा निर्दोष ठेवण्याचा अर्थ, आपले हेतू प्रामाणिक व शुद्ध असतात; आपल्या इच्छा आकांक्षा लोभी व स्वार्थी नसतात. परंतु याचा अर्थ, अगदीच हलाखीत दिवस काढणे किंवा आपल्या शारीरिक गरजा पूर्ण करण्याच्या बाबतीत असलेल्या आपल्या ख्रिस्ती जबाबदाऱ्‍यांकडे दुर्लक्ष करणे, असा होत नाही. तर, आपल्या जीवनात यहोवाच्या सेवेला प्रथम स्थान देऊन “संयमनाचा आत्मा” दाखवणे, असा होतो.—२ तीमथ्य १:७.

१६. डोळा निर्दोष ठेवण्याकरता विश्‍वास आणि धैर्य का लागते?

१६ डोळा निर्दोष ठेवण्याकरता विश्‍वास आणि धैर्य लागते. उदाहरणार्थ, समजा तुमच्या कंपनीचे मालक तुम्हाला, ख्रिस्ती सभांची वेळ असते तेव्हा ओव्हरटाईम करायला सांगतात तेव्हा तुम्ही धैर्याने आध्यात्मिक गोष्टींना प्राधान्य द्याल का? यहोवा आपल्या सेवकांची काळजी घेण्याचे जे वचन देतो त्यावर एखादा ख्रिस्ती जर शंका घेत असेल तर सैतान या अशा व्यक्‍तीवर आणखी दबाव आणून त्याला सर्वच सभांना उपस्थित राहण्यापासून थांबवेल. आपल्यातच जर विश्‍वासाची कमरता असेल तर यहोवापेक्षा सैतानच आपल्याला त्याच्या कह्‍यात घेऊन, आपण कोणत्या गोष्टींना प्राधान्य दिले पाहिजे हे तोच ठरवेल. असे जर झाले तर ते किती दुःखद ठरेल!—२ करिंथकर १३:५.

आशेने “परमेश्‍वराची प्रतीक्षा कर”

१७. यहोवावर भरवसा ठेवणाऱ्‍यांना आजही कशाप्रकारे प्रतिफळ मिळते?

१७ जे यहोवावर आशा व भरवसा ठेवतात ते कधीच निराश होत नाहीत, असे शास्त्रवचनांमध्ये वारंवार सांगण्यात आले आहे. (नीतिसूत्रे ३:५, ६; यिर्मया १७:७) हे खरे आहे, की कधीकधी त्यांना थोड्यातच आनंद मानावा लागतो. तरीपण त्यांना, भविष्यात त्यांच्यासाठी जे आशीर्वाद राखून ठेवले आहेत त्यांच्या तुलनेत त्यांना आज करावे लागत असलेले त्याग क्षुल्लक वाटतात. त्यामुळे ते आशेने यहोवाची “प्रतीक्षा” करतात आणि त्यांना ही खात्री आहे, की तो आपल्या एकनिष्ठ सेवकांच्या सर्व योग्य इच्छा जरूर पूर्ण करेल. (स्तोत्र ३७:४, ३४) त्यामुळेच ते आजही आनंदी आहेत. “धार्मिकांची आशा आनंदप्रद होईल, पण दुर्जनांची अपेक्षा नष्ट होईल.”—नीतिसूत्रे १०:२८.

१८, १९. (क) यहोवा आपल्याला कोणते प्रेमळ आश्‍वासन देतो? (ख) कोणत्या दोन मार्गांद्वारे आपण यहोवाला आपल्या “उजवीकडे” ठेवतो?

१८ एक लहान मुलगा आपल्या वडिलांच्या हातात हात घालून चालत असते तेव्हा त्याला सुरक्षित वाटते. आपल्या स्वर्गीय पित्यासोबत चालताना आपल्याला देखील असेच वाटते. यहोवाने इस्राएलांना म्हटले: “तू भिऊ नको, कारण मी तुझ्याबरोबर आहे; . . . मी तुझे साहाय्यहि करितो; . . . मी परमेश्‍वर तुझा देव तुझा उजवा हात धरून म्हणत आहे की, भिऊ नको, मी तुला साहाय्य करितो.”—यशया ४१:१०, १३.

१९ यहोवाचे किती हे प्रेमळ वर्णन आहे—तो आपला हात धरतो! दाविदाने लिहिले: “मी आपल्यापुढे परमेश्‍वराला नित्य ठेविले आहे; तो माझ्या उजवीकडे आहे, म्हणून मी ढळणार नाही.” (स्तोत्र १६:८) आपण यहोवाला आपल्या “उजवीकडे” कसे ठेवतो? असे करण्याचे निदान दोन मार्ग आहेत. एक मार्ग आहे, आपण आपल्या जीवनाच्या प्रत्येक पैलूत त्याच्या वचनाचे मार्गदर्शन स्वीकारतो; आणि दुसरा मार्ग आहे, आपण यहोवाने आपल्यापुढे ठेवलेल्या वैभवी बक्षिसावर आपली नजर खिळवून ठेवतो. स्तोत्रकर्ता आसाफाने असे गायिले: “मी नेहमी तुझ्याजवळ आहे; तू माझा उजवा हात धरिला आहे. तू बोध करून मला मार्ग दाखविशील आणि त्यानंतर गौरवाने माझा स्वीकार करिशील.” (स्तोत्र ७३:२३, २४) इतके मोठे आश्‍वासन असताना आपण भवितव्याचा सामना पूर्ण आत्मविश्‍वासाने करू शकतो.

“तुमचा मुक्‍तिसमय जवळ आला आहे”

२०, २१. यहोवावर आशा ठेवणाऱ्‍यांना भविष्यात काय मिळेल?

२० एकेक दिवस उलटतो तसतसे, आपण यहोवाला आपल्या उजवीकडे ठेवणे आणखी निकडीचे होते. लवकरच, खोट्या धर्माच्या नाशाने सुरुवात होऊन सैतानाच्या जगाला एका अशा मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागणार आहे की ज्याचा अनुभव त्याने पूर्वी कधीही केला नव्हता. (मत्तय २४:२१) विश्‍वासहीन मानवजात गर्भगळीत होईल. पण या गोंधळमय काळात, यहोवाचे निर्भयी सेवक आशेने हर्षित होतील! येशूने म्हटले होते: “ह्‍या गोष्टींस आरंभ होऊ लागेल तेव्हा सरळ उभे राहा आणि आपली डोकी वर करा; कारण तुमचा मुक्‍तिसमय जवळ आला आहे.”—लूक २१:२८.

२१ यास्तव, देवाने दिलेल्या आशेत आपण हर्ष करूया आणि सैतानाच्या चतुर विकर्षणांमुळे आपण स्वतःची फसगत करून घेऊ नये किंवा मोहांत पडू नये. त्याचबरोबर आपण विश्‍वास, प्रेम आणि देवाबद्दलचे भय आणखी वाढवण्याचा कसोशीने प्रयत्न करू या. असे केल्याने आपल्याला सर्व परिस्थितींमध्ये देवाची आज्ञा मानण्याचे आणि दियाबलाला अडवण्याचे धैर्य मिळेल. (याकोब ४:७, ८) होय, ‘परमेश्‍वराची आशा धरणारे आपण सर्व हिम्मत बांधूया आणि धीर धरूया.’—स्तोत्र ३१:२४. (w०६ १०/१)

[तळटीप]

^ परि. 1 ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांमध्ये “आशा” हा शब्द वारंवार अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना मिळणाऱ्‍या स्वर्गीय प्रतिफळाच्या संबंधाने वापरण्यात आलेला असला तरी, या लेखात सर्वसामान्य वापरातला आशा या शब्दाची चर्चा करण्यात आली आहे.

तुम्ही उत्तर देऊ शकाल?

• येशूने आशा बाळगल्यामुळे त्याला धैर्य दाखवण्यास मदत कशी झाली?

• विश्‍वास आणि आशा या दोन्ही गुणांत एकमेकांशी संबंध कसा आहे?

• विश्‍वास आणि आशा, एखाद्या ख्रिश्‍चन व्यक्‍तीला आपल्या जीवनात योग्य गोष्टींना प्राधान्य देण्याचा आत्मविश्‍वास कसा देऊ शकतात?

• जे आशेने “परमेश्‍वराची प्रतीक्षा” करतात ते धैर्याने भवितव्याची वाट का पाहू शकतात?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२९ पानांवरील चित्र]

तुम्ही तरुण असो वा वृद्ध, तुम्ही स्वतःला नंदनवनात पाहता का?