व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“तरुणपणी केलेल्या स्त्रीसह संतुष्ट ऐस”

“तरुणपणी केलेल्या स्त्रीसह संतुष्ट ऐस”

“तरुणपणी केलेल्या स्त्रीसह संतुष्ट ऐस”

“तरुणपणी केलेल्या स्त्रीसह संतुष्ट ऐस. माझ्या मुला, परस्त्रीने तुझे चित्त का मोहित व्हावे?”—नीतिसूत्रे ५:१८, २०.

१, २. पतीपत्नीतील प्रेमभावना पवित्र किंवा आशीर्वादित आहे असे का म्हणता येते?

 बायबलमध्ये, लैंगिक संबंधांविषयी उघडपणे सांगितले आहे. नीतिसूत्रे ५:१८, १९ मध्ये आपण असे वाचतो: “तुझ्या झऱ्‍याला आशीर्वाद प्राप्त होवो; तरुणपणी केलेल्या स्त्रीसह संतुष्ट ऐस. रमणीय हरिणी, सुंदर रानशेळी यांप्रमाणे तिचे स्तन तुला सर्वदा तृप्त राखोत. तिच्या प्रेमाने तुझे चित्त मोहित होवो.”

येथे, ‘झरा’ हा जो शब्द वापरला आहे तो लैंगिक तृप्ती देणाऱ्‍या स्रोताला सूचित करतो. हे पवित्र किंवा आशीर्वादित आहे कारण विवाहित जोडीदारांमधील प्रेमभावना व आनंद हे देवाकडील दान आहे. परंतु ही जवळीक केवळ विवाहाच्या चाकोरीतच उपभोगली पाहिजे. त्यामुळे, ज्याने नीतिसूत्रे पुस्तकाचे लेखन केले त्या प्राचीन इस्राएलच्या राजा शलमोनाने उत्तर अभिप्रेत असणारा असा प्रश्‍न विचारला: “माझ्या मुला, परस्त्रीने तुझे चित्त का मोहित व्हावे? परक्या स्त्रीला तू का आलिंगन द्यावे?”—नीतिसूत्रे ५:२०.

३. (क) कोणती दुःखद गोष्ट आज अनेक विवाहांत घडत आहे? (ख) व्यभिचाराबद्दल देवाचा काय दृष्टिकोन आहे?

आपल्या विवाहाच्या दिवशी, पुरुष व स्त्री एकमेकांवर प्रेम करण्याचे आणि एकमेकाशी विश्‍वासू राहण्याची शपथ घेतात. तरीपण पुष्कळ विवाह, व्यभिचारामुळे उद्ध्‌वस्त होतात. पंचवीस सर्व्हेंचे परीक्षण केल्यावर एका संशोधकाने असा निष्कर्ष काढला, की “२५ टक्के पत्नींचे व ४४ टक्के पतींचे विवाहबाह्‍य संबंध आहेत.” प्रेषित पौलाने म्हटले: “फसू नका; जारकर्मी, मूर्तिपूजक, व्यभिचारी, स्त्रीसारखा संभोग देणारे, पुरूषसंभोग घेणारे . . . ह्‍यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही.” (१ करिंथकर ६:९, १०) यात काहीच शंका नाही. व्यभिचार हे देवाच्या दृष्टीत गंभीर पाप आहे आणि खऱ्‍या उपासकांनी आपल्या विवाह जोडीदाराशी अविश्‍वासू होण्यापासून सावधान राहिले पाहिजे. “लग्न सर्वस्वी आदरणीय . . . व अंथरूण निर्दोष” ठेवण्यास कोणती गोष्टी आपल्याला मदत करू शकते?—इब्री लोकांस १३:४.

कपटी हृदयापासून सावधान

४. एक विवाहित ख्रिस्ती व्यक्‍ती विवाहबाह्‍य प्रेमसंबंधात कोणत्या काही मार्गांद्वारे नकळत गुरफटू शकते?

आजच्या हीन नैतिक वातावरणात पुष्कळ लोकांच्या “डोळ्यात व्यभिचारिणी सदाची भरली आहे; आणि पाप केल्यावाचून त्यांना राहवत नाही.” (२ पेत्र २:१४) विवाहबाह्‍य प्रेमसंबंध ठेवणे चूक आहे हे माहीत असूनही पुष्कळ लोक अशाप्रकारचे नातेसंबंध ठेवतात. काही देशांत, पुष्कळ स्त्रिया पुरुषांबरोबर काम करू लागल्या आहेत. यामुळे, कार्यालयांमध्ये स्त्रीपुरुषांत अयोग्य प्रेमसंबंध निर्माण होण्यासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. मग, इंटरनेट चॅट रुम्समुळे सर्वात लाजऱ्‍या स्वभावाच्या व्यक्‍तींनाही इंटरनेटवर एखाद्या विरुद्धलिंगी व्यक्‍तीबरोबर जवळची मैत्री जोडता येते. पुष्कळ विवाहित लोक, काही कळायच्या आत या पाशात सहजपणे अडकतात.

५, ६. एक ख्रिस्ती भगिनी एका घातक परिस्थितीत कशाप्रकारे गुरफटत गेली व यावरून आपण कोणता धडा शिकू शकतो?

आपण एका भगिनीच्या उदाहरणाचा विचार करू या, जी लैंगिक अनैतिकतेत पडता पडता वाचली. तिला आपण मेरी म्हणू या. मेरीचा पती यहोवाचा साक्षीदार नव्हता. तो आपल्या कुटुंबाला कमी प्रेम दाखवत असे. अशातच काही वर्षांपूर्वी तिची ओळख तिच्या नवऱ्‍याच्या एका मित्राबरोबर झाल्याचे मेरी आठवून सांगते. हा मनुष्य सभ्य होता आणि काही काळानंतर त्याने मेरीच्या धार्मिक विश्‍वासांत आवड असल्याचेही व्यक्‍त केले. ती म्हणते: “तो मनाने खूप चांगला होता; माझ्या नवऱ्‍यापेक्षा खूप वेगळा होता.” मेरी आणि या मनुष्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. मेरीने तर्क केला: “मी काही व्यभिचार केलेला नाही. शिवाय, त्याला बायबलबद्दल आवड आहे. कोण जाणे, कदाचित मी त्याला सत्य शिकण्यास मदत करू शकेन.”

पण तिच्या प्रेमसंबंधांमुळे तिच्या हातून व्यभिचार व्हायच्या आत ती शुद्धीवर आली. (गलतीकर ५:१९-२१; इफिसकर ४:१९) तिचा विवेक तिला बोचू लागल्यामुळे तिने आवश्‍यक ती पावले उचलली. मेरीच्या उदाहरणावरून दिसून येते, की “हृदय सर्वात कपटी आहे; ते असाध्य रोगाने ग्रस्त आहे.” (यिर्मया १७:९) बायबल आपल्याला असे आर्जवते: “सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर.” (नीतिसूत्रे ४:२३) हे आपण कसे करू शकतो?

“चतुर मनुष्य अरिष्ट येता पाहून लपतो”

७. वैवाहिक समस्या असलेल्या व्यक्‍तीला मदत करताना कोणत्या शास्त्रवचनीय सल्ल्याचे पालन केल्यास आपले संरक्षण होऊ शकेल?

“आपण उभे आहो असे ज्याला वाटते त्याने पडू नये म्हणून संभाळावे,” असे प्रेषित पौलाने लिहिले. (१ करिंथकर १०:१२) आणि नीतिसूत्रे २२:३ मध्ये म्हटले आहे: “चतुर मनुष्य अरिष्ट येता पाहून लपतो.” फाजील आत्मविश्‍वास बाळगून, ‘मला काही होणार नाही,’ असा विचार करण्याऐवजी, विशिष्ट परिस्थितीमुळे कोणत्या समस्या येऊ शकतात यावर विचार करण्यात सुज्ञपणा आहे. उदाहरणार्थ, जिच्या वैवाहिक जीवनात खूप समस्या आहेत अशा एखाद्या विरूद्धलिंगी व्यक्‍तीला तिच्या सर्व समस्या केवळ तुम्हालाच सांगू देऊ नका. (नीतिसूत्रे ११:१४) बहिणींनी एखाद्या प्रौढ बहिणीशी आणि भावांनी एखाद्या प्रौढ भावाशी अथवा मंडळीतील वडिलांबरोबर चर्चा करण्यास तुम्ही सांगू शकता. (तीत २:३, ४) याबाबतीत यहोवाच्या साक्षीदारांच्या मंडळ्यांतील वडील उत्तम उदाहरण मांडतात. वडिलांना जेव्हा एखाद्या ख्रिस्ती भगिनीशी खासगीत बोलायचे असते तेव्हा ते सार्वजनिक ठिकाणी, जसे की राज्य सभागृहातच बसून बोलतात.

८. कामाच्या ठिकाणी कोणती खबरदारी घेणे आवश्‍यक आहे?

कामाच्या ठिकाणी आणि इतरत्र, जवळीक निर्माण होईल अशा प्रसंगांपासून सावधान राहा. उदाहरणार्थ, विरुद्धलिंगी व्यक्‍तीबरोबर जास्त वेळ घालवल्यास मोहात पाडणारा प्रसंग निर्माण होऊ शकतो. विवाहित स्त्री अथवा पुरुष या नात्याने तुम्ही तुमच्या बोलण्यावरून आणि वागण्यावरून दाखवले पाहिजे, की तुम्ही तुमच्या वैवाहिक जोडीदाराशिवाय इतर कोणाशीही जवळीक करू इच्छित नाही. ईश्‍वरी भक्‍तीचे आचरण करणारी व्यक्‍ती यानात्याने तुम्ही, विरुद्धलिंगी व्यक्‍तीबरोबर प्रणयचेष्टा करण्याद्वारे किंवा आपल्या असभ्य पेहरावाद्वारे इतरांचे लक्ष विनाकारण आपल्याकडे आकर्षित करणार नाही. (१ तीमथ्य ४:८; ६:११; १ पेत्र ३:३, ४) कामाच्या ठिकाणी आपल्या विवाहसोबत्याचे आणि आपल्या मुलांचे फोटो लावण्याद्वारे तुम्ही स्वतःला आणि इतरांनाही याची आठवण करून देता, की तुमचे कुटुंब तुम्हाला प्रिय आहे. इतरांच्या प्रणयी हालचालींना प्रोत्साहन किंवा त्या सहनही न करण्याचा दृढनिश्‍चय करा.—ईयोब ३१:१.

‘तुझे दिवस आपल्या प्रिय स्त्रीबरोबर सुखाने घालीव’

९. कोणत्या घटनांमुळे, एक नवीन प्रेमसंबंध हवाहवासा वाटू लागतो?

हृदयाचे रक्षण करताना, केवळ घातक परिस्थिती टाळणे इतकेच पुरेसे नाही. विवाहाच्या बाहेर प्रेमसंबंध निर्माण होणे, पती अथवा पत्नी आपल्या सोबत्याच्या गरजांकडे लक्ष देत नसल्याचे चिन्ह असू शकेल. कदाचित पती आपल्या पत्नीकडे सतत दुर्लक्ष करत असेल अथवा पत्नी सतत आपल्या पतीची टीका करत असेल. अशावेळी अचानक, तिऱ्‍हाईत व्यक्‍तीत—मग ते कामाच्या ठिकाणी असो अथवा ख्रिस्ती मंडळीत असो—आपल्या विवाह सोबत्यात नसलेले गुण दिसू लागतात. तेव्हा त्यांच्यात मैत्री जुळून नवीन भावनिक नातेसंबंध निर्माण होतो व आता त्यांना एकमेकांशिवाय करमेनासे होते. चटकन्‌ ध्यानात येणार नाहीत अशा या घटना, बायबलमधील विधान किती खरे आहे याला पुष्टी देतात: “प्रत्येक माणूस आपल्या वासनेने ओढला जातो व भुलविला जातो तेव्हा मोहांत पडतो.”—याकोब १:१४.

१०. पती व पत्नी आपल्या विवाहसोबत्याबरोबरचा आपला नातेसंबंध मजबूत कसा करू शकतात?

१० विवाहाच्या चाकोरीबाहेर प्रेम, मैत्री किंवा आव्हानात्मक परिस्थितीत पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा पतीपत्नींनी आपल्या विवाहातील प्रेमळ नातेसंबंध आणखी दृढ बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यांनी होता होईल तितका एकमेकांबरोबर वेळ घालवला पाहिजे, एकमेकांच्या जवळ आले पाहिजे. तुम्ही कोणत्या कारणामुळे एकमेकांच्या प्रेमात पडला होता त्याची आठवण करा. तुमचा विवाह सोबती झालेल्या व्यक्‍तीबद्दल सुरुवातीला तुमच्या मनात जे उबदार प्रेम उत्पन्‍न झाले होते तसे प्रेम पुन्हा जागृत करायचा प्रयत्न करा. तुम्ही एकमेकांबरोबर घालवलेल्या सुखाच्या क्षणांची आठवण करा. याविषयी देवाला प्रार्थना करा. स्तोत्रकर्ता दाविदाने यहोवाला अशी विनंती केली: “हे देवा, माझ्या ठायी शुद्ध हृदय उत्पन्‍न कर; माझ्या ठायी स्थिर असा आत्मा पुन्हा घाल.” (स्तोत्र ५१:१०) ‘देवाने ह्‍या भूतलावर . . . [तुम्हाला] जे दिवस नेमिले आहेत ते . . . आपल्या प्रिय स्त्रीबरोबर सुखाने घालवण्याचा’ निश्‍चय करा.—उपदेशक ९:९.

११. विवाह बंधन मजबूत करण्याकरता, ज्ञान, बुद्धी आणि समंजसपणा हे गुण किती महत्त्वपूर्ण आहेत?

११ विवाहबंधन मजबूत करताना ज्ञान, बुद्धी आणि समंजसपणा या गुणांच्या मूल्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. नीतिसूत्रे २४:३, ४ म्हणते: “सुज्ञानाच्या योगे घर बांधिता येते; समंजसपणाने ते मजबूत राहते; ज्ञानाच्या योगे त्याच्या खोल्या सर्व प्रकारच्या मोलवान व मनोरम वस्तूंनी भरून जातात.” सुखाने नांदणाऱ्‍या घरातील सदस्यांमधील प्रेम, एकनिष्ठा, देवाबद्दलचे भय आणि विश्‍वास यासारख्या गुणांची तुलना घरातील मौल्यवान वस्तूंशी करता येते. हे गुण साध्य करण्यासाठी देवाचे ज्ञान घेणे अत्यावश्‍यक आहे. तेव्हा, पतीपत्नीने बायबलचा गांभिर्याने अभ्यास केला पाहिजे. पण मग बुद्धी व समंजसपणा हे गुणही महत्त्वपूर्ण आहेत का? दैनंदिन समस्यांना यशस्वीरीत्या तोंड देण्याकरता, शास्त्रवचनांतील ज्ञानाचा अवलंब करण्याच्या क्षमतेची अर्थात बुद्धीची आवश्‍यकता असते. समंजस व्यक्‍तीला, आपल्या जोडीदाराचे विचार आणि भावना समजतात. (नीतिसूत्रे २०:५) यहोवा शलमोनाद्वारे असे म्हणतो: “माझ्या मुला, तू विवेक राखावा व तुझ्या वाणीने ज्ञान जपून ठेवावे.”—नीतिसूत्रे ५:१.

“हालअपेष्टा”

१२. विवाहित दांपत्यांना समस्यांना तोंड द्यावे लागते यात आश्‍चर्य करण्यासारखे काही का नाही?

१२ कोणताही विवाह परिपूर्ण नाही. बायबल असेही म्हणते, की पतीपत्नीला त्यांच्या “संसारात हालअपेष्टा भोगाव्या लागतील.” (१ करिंथकर ७:२८) चिंता, आजारपण, छळ आणि इतर कारणांमुळे विवाहावर ताण येऊ शकतो. परंतु समस्या येतात तेव्हा यहोवाला संतुष्ट करू पाहणारे एकनिष्ठ विवाहसोबती या नात्याने तुम्ही एकत्र मिळून त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

१३. कोणकोणत्या क्षेत्रात, पती व पत्नी आत्मपरीक्षण करू शकतात?

१३ समजा, विवाह सोबती एकमेकांना ज्याप्रकारे वागवतात त्यामुळे विवाह तणावाखाली असेल तर काय? यावर उपाय शोधण्याकरता प्रयत्न करावे लागतील. जसे की, पतीपत्नी एकमेकांना टोचून बोलू लागले असतील व हळूहळू आता त्यांची ती बोलण्याची पद्धतच बनली असेल. (नीतिसूत्रे १२:१८) मागच्या लेखात चर्चा केल्याप्रमाणे या अशाप्रकारच्या बोलण्यामुळे विवाहावर हानीकारक परिणाम घडू शकतात. एका बायबल नीतिसूत्रात असे म्हटले आहे: “भांडखोर बायकोजवळ राहून संताप करून घ्यावा त्यापेक्षा अरण्यवास पुरवला.” (नीतिसूत्रे २१:१९) तुम्ही पत्नी असाल तर स्वतःला विचारा: ‘माझ्या वागण्यामुळे तर माझ्या नवऱ्‍याला माझ्याबरोबर वेळ घालवायला आवडत नसेल?’ बायबल पतींना असा सल्ला देते: “पतींनो, तुम्ही आपआपल्या पत्नीवर प्रीति करा, व तिच्याशी निष्ठुरतेने वागू नका.” (कलस्सैकर ३:१९) तुम्ही पती असाल तर स्वतःला विचारा: ‘माझी वागणूक इतकी भावनारहित आहे की ज्यामुळे माझ्या पत्नीला इतरत्र जाऊन सांत्वन मिळवावे लागते?’ अर्थात ही, लैंगिक अनैतिकतेसाठी एक सबब नाही. तरीपण, विवाहात अशी शोकांतिका घडू शकते. त्यामुळे तुम्ही तुमच्या समस्या एकमेकांसमोर मनमोकळेपणाने बोलून दाखवल्या पाहिजेत.

१४, १५. विवाह जोडीदार नसलेल्या व्यक्‍तीबरोबर प्रेमसंबंध निर्माण करून मानसिक शांती मिळवणे, हा वैवाहिक समस्यांवरील उपाय का नाही?

१४ विवाहाबाहेर प्रेमसंबंध निर्माण करून मानसिक शांती मिळवणे, हा वैवाहिक समस्यांवरील उपाय नाही. अशाप्रकारच्या विवाहबाह्‍य नातेसंबंधाचे फलित काय असू शकते? नवीन आणि उत्तम विवाह? काहींना असे वाटेल. कदाचित ते असा तर्क करतील, ‘नाही तरी, विवाह सोबत्यात जे गुण हवे आहेत ते सर्व या व्यक्‍तीत नाहीत का?’ पण अशाप्रकारचा तर्क खोटा आहे कारण, जो कोणी आपल्या विवाह जोडीदाराला सोडतो—किंवा सोडून देण्यास उत्तेजन देतो तो विवाहाच्या पावित्र्याचा अनादर करतो. या नवीन नातेसंबंधामुळे सुखी विवाह लाभेल, अशी अपेक्षा करणे तर्कशुद्ध नाही.

१५ लेखाच्या सुरुवातीला जिचा उल्लेख करण्यात आला होता त्या मेरीने, आपल्या मार्गाक्रमणाच्या परिणामांचा गंभीरपणे विचार केला. आपल्या या अशा वागण्यामुळे आपल्याला किंवा दुसऱ्‍याला देवाची मर्जी गमवावी लागेल, या शक्यतेवरही तिने गंभीरपणे विचार केला. (गलतीकर ६:७) ती म्हणते: “माझ्या नवऱ्‍याच्या मित्राविषयी माझ्या मनात असलेल्या भावनांवर मी जसजसा विचार करू लागले तसतसे मला जाणवले, की हा मनुष्य जर खरोखरच सत्य स्वीकारत असेल तर मी त्याला सत्यात येण्यापासून वास्तविक पाहता अडवत होते. माझ्या पापामुळे, इतर सर्वांवर वाईट परिणाम होऊ शकतो आणि त्यांना अडखळण होऊ शकते!”—२ करिंथकर ६:३.

सर्वात जोरदार प्रेरणा

१६. लैंगिक अशुद्धतेचे काही दुष्परिणाम कोणते आहेत?

१६ बायबल आपल्याला अशी चेतावनी देते: “परस्त्रीच्या ओठांतून मध स्रवतो, तिचे तोंड तेलापेक्षा तुळतुळीत असते; तरी ती अखेरीस दवण्यासारखी कडू व दुधारी तरवारीसारखी तीक्ष्ण होते.” (नीतिसूत्रे ५:३, ४) लैंगिक अनैतिकतेचे परिणाम वेदनादायी व घातक ठरू शकतात. याशिवाय, लैंगिक अनैतिकतेत गुरफटलेल्यांचा विवेक त्यांना जन्मभर बोचत राहू शकतो, त्यांना लैंगिक संक्रमित आजार होऊ शकतात आणि त्यांचा विवाह जोडीदार जो त्यांच्याशी विश्‍वासू होता तो मानसिकरीत्या उद्ध्‌वस्त होऊ शकतो. तेव्हा, या कारणांमुळे आपण, विवाहात अविश्‍वासू राहण्यास कारणीभूत ठरणाऱ्‍या मार्गावर वाटचाल करण्यापासून मागे फिरले पाहिजे.

१७. विवाह सोबत्यांनी एकमेकांना विश्‍वासू राहण्याची सर्वात जोरदार प्रेरणा काय आहे?

१७ विवाह सोबत्यांनी एकमेकांना अविश्‍वासू राहणे चूक का आहे याचे प्रमुख कारण म्हणजे, ज्याने विवाहाची स्थापना केली आणि ज्याने पुरुष व स्त्रीला लैंगिक संबंध ठेवण्याची क्षमता दिली तो निर्माणकर्ता यहोवा देव याचा निषेध करतो हे आहे. संदेष्टा मलाखी याच्याद्वारे तो म्हणतो: “मी न्याय करावयाला तुम्हाकडे येईन, आणि . . . व्यभिचारी, . . . यांच्याविरुद्ध साक्ष देण्याची त्वरा करीन.” (मलाखी ३:५) यहोवाला काय काय दिसते त्याविषयी नीतिसूत्रे ५:२१ म्हणते: “मनुष्याचे मार्ग परमेश्‍वराच्या दृष्टीसमोर आहेत, आणि तोच त्याच्या सर्व वाटा नीट करितो.” होय, “त्याच्या दृष्टीला अदृश्‍य अशी कोणतीहि निर्मिति नाही, तर ज्याच्याबरोबर आपला संबंध आहे त्याच्या दृष्टीला सर्व उघडे व प्रगट केलेले आहे.” (इब्री लोकांस ४:१३) तेव्हा, पतीपत्नी कितीही गुप्तपणे एकमेकांशी अविश्‍वासू राहत असले आणि त्याचा शारीरिक अथवा सामाजिक परिणाम कितीही थोडा वाटत असला तरी, कोणत्याही प्रकारची लैंगिक अशुद्धता, यहोवाबरोबरचा आपला नातेसंबंध बिघडवते ही जाणीव, विवाह जोडीदारांनी एकमेकांना विश्‍वासू राहण्यामागची सर्वात जोरदार प्रेरणा आहे.

१८, १९. पोटीफरच्या बायकोबरोबर योसेफ ज्याप्रकारे वागला त्यावरून आपण काय शिकतो?

१८ देवाबरोबर शांतिमय नातेसंबंध टिकवून ठेवण्याची इच्छा, ही जोरदार प्रेरणा आहे हे कुलपिता याकोब याचा पुत्र योसेफ याच्या उदाहरणावरून दिसून येते. फारोच्या दरबारात सरदार असलेल्या पोटीफरची मर्जी प्राप्त झाल्यामुळे योसेफाला पोटीफरच्या घराण्यात मोठे पद मिळाले. योसेफ “बांधेसूद व देखणा” असल्यामुळे, पोटीफरच्या बायकोचे त्याच्यावर मन बसले. ती त्याला फुसलावण्याचा रोज प्रयत्न करीत असे, पण तो काही केल्या तिच्या तावडीत सापडत नव्हता. तिच्या अनैतिक प्रस्तावांना योसेफ धुडकावून का लावत होता? बायबल म्हणते: ‘तो राजी होत नसे. तो आपल्या धन्याच्या पत्नीस म्हणत असे: हे पाहा, . . . तुम्ही त्यांची पत्नी केवळ म्हणून तुमच्याखेरीज त्यांनी माझ्यापासून काही दूर ठेवलेले नाही, असे असता एवढी मोठी वाईट गोष्ट करून मी देवाच्या विरुद्ध पाप कसे करू?’—उत्पत्ति ३९:१-१२.

१९ अविवाहित योसेफाने दुसऱ्‍या मनुष्याच्या पत्नीबरोबर प्रेमसंबंधात गुरफटण्यास नकार देऊन आपले नैतिक शुद्धाचरण टिकवून ठेवले. विवाहित पुरुषांना नीतिसूत्रे ५:१५ मध्ये असे म्हटले आहे: “तू आपल्याच टाक्यांतले पाणी पी. आपल्या विहिरीतले वाहते पाणी पी.” तेव्हा, नकळतसुद्धा विवाहाच्या बाहेर कोणत्याही प्रकारचे प्रेमसंबंध जोडण्यापासून सावध राहा. आपल्या विवाहातील प्रेमाचे बंधन आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न करा आणि पतीपत्नीत कोणतीही समस्या येते तेव्हा ती लगेच सोडवण्याचा कसोशीने प्रयत्न करा. आणि सदासर्वकाळ “तरुणपणी केलेल्या स्त्रीसह संतुष्ट” राहा!—नीतिसूत्रे ५:१८. (w०६ ९/१५)

तुम्हाला काय शिकायला मिळाले?

• एक ख्रिस्ती नकळत विवाहबाह्‍य प्रेमसंबंधात कसा गुरफटू शकतो?

• कोणती सावधगिरी बाळगल्यास एक ख्रिस्ती विवाहबाह्‍य प्रेमसंबंधात गुरफटण्याचे टाळू शकतो?

• आपल्या विवाहात समस्या येतात तेव्हा पतीपत्नीने काय केले पाहिजे?

• विवाहात विश्‍वासू राहण्याची सर्वात जोरदार प्रेरणा काय आहे?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१४ पानांवरील चित्र]

कार्यालयांमध्ये स्त्रीपुरुषांत अयोग्य प्रेमसंबंध निर्माण होण्यासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे, ही दुःखाची गोष्ट आहे

[१५ पानांवरील चित्र]

‘ज्ञानाच्या योगे त्याच्या खोल्या मनोरम वस्तूंनी भरून जातात’