“आपण इथे का आहोत?”
“आपण इथे का आहोत?”
मानवजातीने सर्वात महत्वाच्या प्रश्नावर विचार करायला हवा.” असे नोबल पारितोषिक विजेते आणि नात्सींच्या छळछावण्यातून वाचलेले एली विसेल एकदा म्हणाले. कोणता प्रश्न? प्रश्न आहे, “आपण इथे का आहोत?”
तुम्ही या प्रश्नावर कधी विचार केला आहे का? अनेकांनी केला आहे, परंतु त्यांना याचे उत्तर मिळालेले नाही. जीवनाचा अर्थ समजण्याचा प्रयत्न करणारे ब्रिटीश इतिहासकार आर्नल्ड टॉयनबी लिहितात: “मानवाच्या जीवनाचा खरा उद्देश म्हणजे देवाचे गौरव करणे आणि त्यापासून कायमचा आनंद मिळवणे.”
तीन हजार वर्षांपूर्वी आणखी एक मनुष्य, राजा शलमोन ज्याला जीवनाचे विशेष निरीक्षण करण्याकरता प्रसिद्धी मिळाली, त्याला आधीच वरील प्रश्नाचे मूलभूत उत्तर मिळाले होते. तो म्हणतो: “आता सर्व काही तुम्ही ऐकले; सर्वांचे सार हे की देवाचे भय धर व त्याच्या आज्ञा पाळ; मनुष्यकर्तव्य काय ते एवढेच आहे.”—उपदेशक १२:१३.
देवाचा पुत्र येशू ख्रिस्त यानेही या मूलभूत तत्वाला दुजोरा दिला. पृथ्वीवर असताना येशूने आपल्या स्वर्गीय पित्याचे गौरव करण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली. निर्माणकर्त्याची सेवा केल्याने त्याच्या जीवनाला खरा अर्थ लाभला. या सेवेनेच त्याचे पोषण केले आणि यामुळेच तो असे म्हणू शकला: “ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे हेच माझे अन्न आहे.”—योहान ४:३४.
तर मग, आपण इथे का आहोत? येशू, शलमोन, आणि देवाच्या इतर सेवकांप्रमाणे आपणही देवाच्या इच्छेप्रमाणे कार्य करण्याद्वारे जीवनाचा खरा अर्थ आणि कायमचा आनंद मिळवू शकतो. देवाची सेवा “आत्म्याने व खरेपणाने” कशी करावी याविषयी तुम्हाला आणखी जाणून घेण्याची इच्छा आहे का? (योहान ४:२४) “आपण इथे का आहोत?” या प्रश्नाचे उत्तर मिळवण्याकरता तुम्हाला साहाय्य करण्यास तुमच्या भागात राहणाऱ्या यहोवाच्या साक्षीदारांना आनंद वाटेल. (w०६ १०/१५)