व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

उपदेशक पुस्तकातील ठळक मुद्दे

उपदेशक पुस्तकातील ठळक मुद्दे

यहोवाचे वचन सजीव आहे

उपदेशक पुस्तकातील ठळक मुद्दे

“स्त्रीपासून जन्मलेला मानवप्राणी अल्पायु व क्लेशभरित असतो,” असे कुलपिता ईयोबाने निरीक्षण केले. (ईयोब १४:१) तेव्हा, आपले क्षणभंगुर जीवन आपण निरर्थक चिंता व वायफळ प्रयत्न करण्यात वाया न घालवणे किती महत्त्वाचे आहे! पण मग, आपण आपला वेळ, आपली शक्‍ती आणि आपली साधनसंपत्ती कोणत्या ध्येयांचा पाठलाग करण्यात खर्च करू शकतो? आणि कोणती ध्येये आपण टाळली पाहिजे? बायबलमधील उपदेशक पुस्तकातील बुद्धिमान बोध याबाबतीत आपल्याला विश्‍वसनीय मार्गदर्शन देतो. या पुस्तकाद्वारे मिळणारा संदेश “मनातील विचार व हेतु ह्‍यांचे परीक्षक” आहे; शिवाय तो आपल्याला अर्थपूर्ण जीवन जगण्यास मदत करू शकतो.—इब्री लोकांस ४:१२.

प्राचीन इस्राएलच्या राजा शलमोनाने हे पुस्तक लिहिले. तो सर्वात बुद्धिमान व्यक्‍ती म्हणून नावाजलेला होता. तर उपदेशक पुस्तकात, जीवनात खरोखर अर्थपूर्ण काय आहे आणि निरर्थक काय आहे याबाबतीत व्यावहारिक सल्ला आहे. या पुस्तकात शलमोनाने हाती घेतलेल्या काही बांधकाम प्रकल्पांविषयीचा उल्लेख केला असल्यामुळे त्याने कदाचित उपदेशकाचे पुस्तक हे बांधकाम पूर्ण केल्यानंतर व तो खरी उपासना सोडून देण्याआधी ते लिहिले असावे. (नहेम्या १३:२६) याचा अर्थ या पुस्तकाचे लिखाण सा.यु.पू. १०००  च्या आधी झाले असावे; हे शलमोनाच्या ४० वर्षांच्या कारकीर्दीच्या शेवटास असावे.

काय व्यर्थ नाही?

(उपदेशक १:१–६:१२)

“सर्व काही व्यर्थ” असे उपदेशक म्हणतो. तोच पुढे विचारतो: “या भूतलावर मनुष्य जे सर्व परिश्रम करितो त्यांत त्याला काय लाभ?” (उपदेशक १:२, ३) “व्यर्थ” आणि “भूतलावर” हे शब्द उपदेशक पुस्तकात वारंवार आले आहेत. “व्यर्थ” या शब्दासाठी असलेल्या इब्री शब्दाचा अक्षरशः अर्थ “श्‍वास” किंवा “बाष्प” असा होतो. या शब्दांवरून, व्यावहारिक महत्त्व, शाश्‍वतता, किंवा टिकाऊ मूल्य यांची उणीव सूचित होते. यास्तव, सर्व काही अर्थात देवाच्या इच्छेकडे दुर्लक्ष करून केले जाणारे सर्व मानवी प्रयत्न हे व्यर्थ आहेत.

शलमोन म्हणतो: “तू देवाच्या मंदिरी जातोस तेव्हा संभाळून पाऊल टाक; बोध श्रवण करण्यास समीप जाणे . . . बरे.” (उपदेशक ५:१) यहोवा देवाची खरी उपासना करणे व्यर्थ नाही. उलट, यहोवा देवाबरोबरचा नातेसंबंध कायम ठेवणे ही अर्थभरीत जीवनाची गुरुकिल्ली आहे.

शास्त्रवचनीय प्रश्‍नांची उत्तरे:

१:४-१०—कोणत्या अर्थाने नैसर्गिक चक्रे “कष्टमय” आहेत? उपदेशक केवळ तीन मूलभूत कार्यांचा उल्लेख करतो ज्यामुळे पृथ्वीवर जीवन शक्य होते. ती आहेत: सूर्य, हवेची हालचाल आणि पाण्याचे चक्र. वास्तविक पाहता, अनेक नैसर्गिक चक्रे आहेत व ती अतिशय जटील आहेत. माणूस यांचा अभ्यास करण्यात आपले संपूर्ण आयुष्य घालवू शकतो आणि तरीसुद्धा या चक्रांचे पूर्ण आकलन होऊ शकत नाही. हे “कष्टमय” असू शकते. शिवाय, या कधीही समाप्त न होणाऱ्‍या चक्रांची तुलना आपण आपल्या मर्यादित जीवनकालाशी केली तर आपण निराश होऊ. नवनवीन शोध लावण्याचे प्रयत्न देखील कष्टमय आहेत. कारण, नवीन शोध लावणे म्हणजे खऱ्‍या देवाने घालून दिलेल्या व सृष्टीत आधीपासून उपयोगात आणल्या जात असलेल्या नियमांचे केवळ उपयोजन करणे.

२:१, २—हास्यास “वेडे” का म्हटले आहे? हसण्यामुळे आपण काही वेळापुरते तरी आपल्या चिंता विसरून जातो आणि आनंदोत्सव केल्यास आपल्या समस्या हलक्या वाटू शकतात. परंतु, हसण्यामुळे आपल्या अडचणी नाहीशा होत नाहीत. त्यामुळे मौजमजा करून हसण्याला “वेडे” म्हटले आहे.

३:११—कोणती गोष्ट देवाने ‘आपआपल्या समयी सुंदर बनवली आहे’? यहोवा देवाने उचित समयी ज्या “सुंदर” अर्थात योग्य व चांगल्या गोष्टी बनवल्या आहेत त्यांच्यामध्ये, आदाम हव्वेची सृष्टी, मेघधनुष्य करार, अब्राहामासोबत केलेला करार, दावीदासोबत केलेला करार, मशिहाचे येणे आणि येशू ख्रिस्ताला देवाच्या राज्याचा राजा बनवणे यांचा समावेश होतो. परंतु आणखी एक गोष्ट आहे जी यहोवा लवकरच “सुंदर” बनवणार आहे. फार लवकर उचित समयी एक धार्मिक नवे जग स्थापन होणार आहे, अशी आपण खात्री बाळगू शकतो.—२ पेत्र ३:१३.

५:९, पं.र.भा.—कोणत्या अर्थाने “पृथ्वीचे फळ सर्वांसाठी आहे”? पृथ्वीचे सर्व रहिवाशी मग तो राजा असला तरी, ‘पृथ्वीच्या फळावर’ अर्थात भूमीतून निघणाऱ्‍या उपजेवर अवलंबून आहे. राजासुद्धा यातून सुटलेला नाही. आपल्या शेतातले उपज मिळण्याकरता त्याला आपल्या चाकरांकरवी जमीनीची मशागत करवून घ्यावी लागते; तेव्हाच कुठे त्याला त्याच्या शेतातले फळ मिळते.

आपल्याकरता धडे:

१:१५. आज आपण, चहुकडे दिसणारा जुलूम आणि अन्याय सुधारण्यात आपला वेळ आणि शक्‍ती खर्ची करणे व्यर्थ आहे. केवळ देवाचे राज्यच सर्व दुष्टाईचा अंत करू शकते.—दानीएल २:४४.

२:४-११. वास्तुशिल्प, बागकाम, संगीत यासारखी सांस्कृतिक कार्ये तसेच ऐषोआरामाची जीवनशैली, या सर्व गोष्टी “वायफळ उद्योग” आहेत कारण या गोष्टींनी जीवन खरोखरच अर्थपूर्ण होत नाही किंवा चिरकाल आनंद देखील मिळत नाही.

२:१२-१६. ज्ञान मूर्खतेपेक्षा श्रेष्ठ आहे कारण त्यामुळे विशिष्ट समस्या सोडवण्यास मदत होते. परंतु, मृत्यूच्या बाबतीत कोणतेही मानवी ज्ञान श्रेष्ठ नाही. अशा बुद्धीमुळे जरी कोणाला नावलौकिक मिळालाच तरी ती व्यक्‍ती इतरांच्या स्मरणात जास्त काळ टिकत नाही, तिचा लवकरच विसर पडतो.

२:२४; ३:१२, १३, २२. आपल्या परिश्रमाचे फळ सुखाने खाण्यात काही वावगे नाही.

२:२६. देवाच्या बुद्धीमुळे आनंद मिळतो आणि हा आनंद “देवाच्या दृष्टीने जो चांगला त्यास” दिला जातो. देवाबरोबर चांगला संबंध नसेल तर ही बुद्धी मिळणे शक्य नाही.

३:१६, १७. सर्व बाबतीत न्याय मिळण्याची अपेक्षा करणे योग्य नाही. आजच्या जगात जे घडत आहे त्यावर चिंता करत बसण्यापेक्षा आपण सर्व गोष्टी यहोवाच्या हाती सोपवून दिल्या पाहिजेत कारण तोच त्या सुधारणार आहे.

४:४. कुशलतेने केलेल्या कष्टामुळे समाधान मिळते. पण, इतरांपेक्षा वरचढ दिसण्याकरता कष्ट केल्याने स्पर्धात्मक भावना मनात येते जिचा परिणाम द्वेष आणि मत्सर हा होऊ शकतो. ख्रिस्ती सेवेत आपण करत असलेले काम, मनात योग्य हेतू ठेवून केले पाहिजे.

४:७-१२. भौतिक संपत्तीपेक्षा मानवी नातेसंबंध जास्त महत्त्वाचे असल्यामुळे धनसंपत्ती मिळवण्याकरता आपण नाती तोडू नयेत.

४:१३. हुद्दा आणि वय यांमुळे आपोआप आदर येत नाही. जबाबदार पदांवर असलेल्यांनी सुज्ञपणे वागले पाहिजे.

४:१५, १६. “दुसरा तरुण” अर्थात राजाचा उत्तराधिकारी याला सुरुवातीला ‘भूतलावरील सगळे लोक त्याच्या पक्षाचे’ असतील, पण नंतर ‘त्याजविषयी आनंद पावत नाहीत.’ होय, लोकप्रियता जास्त काळ टिकत नाही.

५:२. आपल्या प्रार्थना विचारपूर्वक आणि आदरणीय असाव्यात. पाल्हाळीक असू नयेत.

५:३-७. भौतिक संपत्तीच्या मागे लागलेली व्यक्‍ती दिवसाढवळ्या स्वतःच्या हिताची दिवास्वप्ने पाहू लागेल. ती रात्री देखील अस्वस्थ, स्वप्नाळू स्थितीत असेल व तिची रात्रीची सुखाची गोड झोप उडून जाऊ शकते. बाष्कळ बडबड करणारी व्यक्‍ती इतरांसमोर मूर्ख ठरते; बडबड करण्याच्या नादात ती अविचारीपणे देवासमोर एखाद्या गोष्टीची शपथही घेईल. आपल्या मनात खऱ्‍या “देवाचे भय” असेल तर आपण अशा गोष्टींपासून दूर राहतो.

६:१-९. आपली परिस्थिती जर आपल्याला, धनसंपत्ती, वैभव, दीर्घायुष्य, मोठे कुटुंब यांचा उपभोग घेऊ देत नसेल तर या सर्व गोष्टी असून काही फायदा आहे का? आणि ‘इकडेतिकडे धावण्यापेक्षा’ अर्थात ज्या अभिलाषा तृप्त करता येत नाहीत त्या पूर्ण करण्यास झटण्यापेक्षा “दृष्टीसमोर असलेल्या गोष्टीत सुख मानणे बरे” म्हणजे वास्तविकतेला तोंड देणे जास्त उत्तम. यास्तव, ‘अन्‍नवस्त्र’ यांत तृप्त राहून जीवनातील हितकारक गोष्टींचा आनंद घेण्यात व यहोवाबरोबर जोडलेल्या जवळच्या नातेसंबंधावर आपले लक्ष केंद्रित ठेवणे हाच जगण्याचा सर्वात उत्तम मार्ग आहे.—१ तीमथ्य ६:८.

सुज्ञांसाठी सल्ला

(उपदेशक ७:१–१२:८)

आपण आपला नावलौकिक कसा टिकवून ठेवू शकतो? मानवी शासक आणि आपण डोळ्यांनी पाहत असलेला अन्याय यांबद्दल आपली मनोवृत्ती काय असली पाहिजे? मृतांना कशाचे भान नाही, तेव्हा आपण आता आपल्या जीवनाचा चांगला उपयोग कसा करू शकतो? तरुण आपल्या वेळेचा आणि आपल्या शक्‍तीचा सुज्ञ वापर कसा करू शकतात? या आणि इतर गोष्टींबाबत उपदेशकाने दिलेला सल्ला उपदेशक पुस्तकाच्या अध्याय ७ ते १२ मध्ये लिहून ठेवण्यात आला आहे.

शास्त्रवचनीय प्रश्‍नांची उत्तरे:

७:१९—बुद्धी अथवा शहाणपण “दहा अधिपतींपेक्षा” शक्‍तिशाली कसे आहे? बायबलमध्ये जेव्हा दहा ही संख्या लाक्षणिक अर्थाने वापरली जाते तेव्हा तिचा अर्थ पूर्णता असा होतो. शलमोन म्हणतो, की बुद्धीचे संरक्षणात्मक मूल्य, शहराची राखण करणाऱ्‍या पूर्ण संख्येच्या योद्ध्‌यांपेक्षा श्रेष्ठ असते.

१०:२. एखाद्याचे मन “उजवीकडे” अथवा “डावीकडे” असणे म्हणजे काय? उजवा हात सहसा कृपापसंतीचे स्थान दर्शवत असल्यामुळे एका व्यक्‍तीचे मन तिच्या उजव्या हाताला असणे म्हणजे तिचे हृदय तिला चांगल्या गोष्टी करण्यास प्रेरित करते. पण, तिचे हृदय तिला चूक करण्यास प्रेरित करत असले तर त्याचा अर्थ तिचे मन तिच्या डावीकडे आहे.

१०:१५.—“मूर्ख श्रम करूनकरून थकतो,” ते कसे? एखादी व्यक्‍ती अविचारी असेल तर तिने कितीही कष्ट केले तरी त्यातून काहीही निष्पन्‍न होत नाही. तिला त्यातून समाधान मिळत नाही. अशाप्रकारच्या निरर्थक श्रमांमुळे ती थकून जाते.

११:७, ८—“प्रकाश खरोखर मनोहर असतो; सूर्यदर्शन नेत्रांस रम्य असते” या वाक्याचा काय अर्थ होतो? प्रकाश आणि सूर्य यांच्यामुळे जीवसृष्टीला आनंद मिळतो. शलमोनाला असे म्हणायचे आहे, की आपण जिवंत आहोत यात आनंद मानला पाहिजे आणि अंधकारमय दिवस येण्याआधी किंवा उतार वय येऊन आपली सगळी शक्‍ती नाहीशी होण्याआधी आपण आपले जीवन ‘आनंदाने घालवावे.’

११:१०—“तारुण्य व भरज्वानी” ही व्यर्थ का आहेत? तारुण्याचा व ज्वानीचा चांगल्याप्रकारे उपयोग केला नाही तर ती व्यर्थ ठरतात कारण, जोम आणि उत्साहाचे दिवस असलेले तारुण्य वाफेसारखे क्षणार्धात नाहीसे होते.

आपल्याकरता धडे:

७:६. अयोग्य वेळचे हास्य हंड्याखाली जळणाऱ्‍या काट्याकुट्यांच्या कडकडण्यासारखे वैताग आणणारे व निरर्थक आहे. त्यामुळे अशाप्रकारचे हास्य आपण टाळतो.

७:२१, २२. इतरजण आपल्याबद्दल काय बोलतात यावर आपण जास्त काळजी करू नये.

८:२, ३; १०:४. मुकादम किंवा मालक आपली टीका करतात किंवा आपली चूक सुधारतात तेव्हा आपण शांत राहण्यात सुज्ञता आहे. लगेच राजीनामा देऊन “त्याला सोडून जाण्याची घाई” करण्यापेक्षा शांत राहणे उचित आहे.

८:८; ९:५-१०, १२. मासा जसा जाळ्यात आणि पक्षी जसा पाशांत अकस्मात अडकतो तसे आपले जीवन अकस्मात संपुष्टात येऊ शकते. शिवाय, मृत्यू जेव्हा जीवन हिरावून घेत असतो तेव्हा कोणी त्याला अडवू शकत नाही किंवा मृत्यू जेव्हा मानवजातीविरुद्ध लढा देत असतो तेव्हा कोणीही मृत्यूच्या तावडीतून वाचू शकत नाही. त्यामुळे आपण आपले जीवन फुकट घालवू नये, तर त्याचा सदुपयोग केला पाहिजे. आपण जीवनाची किंमत करून हितकारक मार्गाने त्याचा उपयोग करावा, अशी यहोवा आपल्याकडून अपेक्षा करतो. असे करण्यासाठी आपण यहोवाच्या सेवेला आपल्या जीवनात प्रथम स्थान दिले पाहिजे.

८:१६, १७. देवाने मानवजातीसाठी आतापर्यंत जे काही केले आहे आणि जे काही होऊ दिले आहे त्याचे प्रमाण मानवजात समजू शकणार नाही; आपण कितीही रात्री जागून ते समजण्याचा प्रयत्न केला तरी आपण ते उमगू शकत नाही. आपण केलेल्या चुकांची चिंता करीत बसल्याने आपल्या जीवनातला आनंद निघून जाईल.

९:१६-१८. बहुतेक लोकांना बुद्धीचे मोल नसले तरी आपण तिची किंमत केली पाहिजे. मूर्ख व्यक्‍तीच्या फुशारकीपेक्षा सुज्ञ व्यक्‍तीचे शांत शब्द बरे.

१०:१. आपल्या बोलण्याच्या व कार्याच्या बाबतीत आपण सावधगिरी बाळगली पाहिजे. एकच अविचारी कार्य, जसे की, रागाच्या भरात बोलल्याचा, किंवा मद्याचा गैरवापर केल्याचा किंवा लैंगिक दुर्वर्तनाचा एकच असभ्य प्रसंग एखाद्या प्रतिष्ठित व्यक्‍तीचे नाव खराब करू शकतो.

१०:५-११. उच्च पदावर असलेल्या अक्षम व्यक्‍तीचा हेवा करणे चुकीचे आहे. . . . साधीसुधी कामे करण्यातही अक्षम असल्याने वाईट परिणाम घडू शकतात. त्यापेक्षा ‘कार्यसिद्धीकरता’ ज्ञानाचा उपयोग करण्यासाठी आपली क्षमता वाढवल्याने फायदा होतो. आपण राज्य प्रचार कार्यात व शिष्य बनवण्याच्या कार्यात सक्षम बनणे किती महत्त्वाचे आहे!

११:१, २. आपण मोठ्या मनाने उदारता दाखवण्याची स्वतःला सवय लावून घेतली पाहिजे. यामुळे इतरांमध्येही उदारतेचा आत्मा निर्माण होतो.—लूक ६:३८.

११:३-६. आपले जीवन किती अनिश्‍चित आहे त्यामुळे आपण जीवनात चंचल बनू नये.

११:९; १२:१-७. तरुणांना यहोवाला जाब द्यायचा आहे. यास्तव म्हातारपण येऊन त्यांचा जोम नाहीसा होण्याआधी त्यांनी आपला वेळ आणि आपली शक्‍ती देवाच्या सेवेत उपयोगात आणली पाहिजे.

आपल्याला मार्गदर्शन देणारी “ज्ञान्यांची वचने”

(उपदेशक १२:९-१४)

उपदेशकाने जी “मनोहर वचने” शोधण्याचा व ती लिहून ठेवण्याचा प्रयत्न केला त्यांच्याबद्दल आपला दृष्टिकोन कसा असला पाहिजे? मानवी बुद्धीच्या ‘बहुत ग्रंथांपेक्षा’ “ज्ञान्यांची वचने पराण्यासारखी असतात; सभापतीचे बोल घट्ट ठोकलेल्या खिळ्याप्रमाणे असतात; एकाच मेंढपाळांपासून ती प्राप्त झाली आहेत.” (उपदेशक १२:१०-१२) “एकाच मेंढपाळापासून” प्राप्त झालेल्या बुद्धीच्या शब्दांमुळे आपली मनःस्थिती शांत व स्थिर होते.

उपदेशक पुस्तकातील सुज्ञ सल्ल्याचे पालन केल्याने आपल्याला अर्थपूर्ण व आनंदी जीवन जगण्यास मदत होईल. शिवाय, आपण ही खात्री बाळगू शकतो: “देवाचे भय बाळगणारे जे त्यास भिऊन वागतात त्यांचे कल्याणच होईल.” तेव्हा आपण ‘देवाचे भय धरून त्याच्या आज्ञा पाळण्याचा’ जो निर्धार केला आहे तो असाच पक्का ठेवूया.—उपदेशक ८:१२; १२:१३. (w०६ ११/०१)

[१० पानांवरील चित्र]

देवाने दिलेल्या भेटींमध्ये, अन्‍न, पाणी आणि आपल्या श्रमाचे फळ पाहून आनंदी होणे, यांचा समावेश होतो

[११ पानांवरील चित्र]

देवाच्या हस्तकृतींपैकी एक सुंदर गोष्ट उचित समयी वास्तविकतेत उतरणार आहे