व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुमचा विश्‍वास तुमच्या जीवनशैलीतून दिसू द्या

तुमचा विश्‍वास तुमच्या जीवनशैलीतून दिसू द्या

तुमचा विश्‍वास तुमच्या जीवनशैलीतून दिसू द्या

“विश्‍वासाबरोबर जर क्रिया नाहीत तर तो जात्या निर्जीव आहे.”—याकोब २:१७.

१. आरंभीच्या ख्रिश्‍चनांनी विश्‍वास व कार्ये या दोन्ही गोष्टींकडे लक्ष का दिले?

 सुरुवातीच्या बहुतेक ख्रिश्‍चनांनी आपला विश्‍वास आपल्या जीवनशैलीतून प्रकट केला. शिष्य याकोबाने सर्व ख्रिश्‍चनांना असा आग्रह केला की “वचनाप्रमाणे आचरण करणारे असा, केवळ ऐकणारे असू नका.” त्याने पुढे म्हटले: “जसे शरीर आत्म्यावाचून निर्जीव आहे तसा विश्‍वासहि क्रियांवाचून निर्जीव आहे.” (याकोब १:२२; २:२६) हे शब्द लिहिल्यावर जवळजवळ ३५ वर्षांनंतर त्याने असे लिहिले की बहुतेक ख्रिस्ती योग्य कार्यांद्वारे आपल्या विश्‍वासाची प्रतिती देत आहेत. पण दुःखाची गोष्ट म्हणजे काहीजण असे करत नव्हते. येशूने स्मुर्णा येथील मंडळीची प्रशंसा केली; पण सार्दीस येथील मंडळीला त्याने म्हटले: ‘तुझी कृत्ये मला ठाऊक आहेत; तू जिवंत आहेस असे तुझ्याविषयी म्हणतात, पण तू मेलेली आहेस.’—प्रकटीकरण २:८-११; ३:१.

२. ख्रिश्‍चनांनी आपल्या विश्‍वासासंबंधी स्वतःला कोणते प्रश्‍न विचारावेत?

त्याचप्रकारे, येशूने सार्दीस मंडळीच्या बांधवांना आणि त्याचे हे शब्द जे कोणी वाचतील त्या सर्वांना असे प्रोत्साहन दिले की त्यांनी ख्रिस्ती सत्याबद्दल त्यांना सुरुवातीला जे प्रेम होते ते आपल्या कार्यांद्वारे दाखवून आध्यात्मिकरित्या जागरूक राहावे. (प्रकटीकरण ३:२, ३) त्याअर्थी आपण सर्वजण स्वतःला असे विचारू शकतो, की ‘माझी कार्ये काय दाखवतात? प्रचार कार्य किंवा मंडळीच्या सभा यांव्यतिरिक्‍त जीवनातल्या इतर गोष्टींतही मी आपल्या कृत्यांवरून हे दाखवतो का, की मी आध्यात्मिकरित्या जागरूक आहे? माझ्या सर्व कार्यांवरून मी आपल्या विश्‍वासाची प्रतिती देण्याचा मनापासून प्रयत्न करतो का?’ (लूक १६:१०) जीवनाच्या अशा अनेक क्षेत्रांविषयी आपण येथे चर्चा करू शकतो, पण सध्या आपण केवळ एकाच क्षेत्राकडे लक्ष देऊ या: स्नेहसमारंभ, उदाहरणार्थ, ख्रिस्ती लग्नसोहळ्यानंतर होणारे स्वागतसमारंभ.

छोटे सामाजिक समारंभ

३. आनंदी प्रसंगांत सहभागी होण्यासंबंधी बायबलचा काय दृष्टिकोन आहे?

ख्रिस्ती बांधवांचा आनंदी सहवास उपभोगण्याकरता आपल्याला निमंत्रण दिले जाते तेव्हा साहजिकच आपल्याला आनंद होतो. यहोवा आनंदी देव आहे आणि त्याची इच्छा आहे की त्याच्या सेवकांनीही आनंदी असावे. (१ तीमथ्य १:११, NW) त्याने शलमोनाला बायबलमध्ये असे लिहून ठेवण्यास प्रेरित केले की: “मी हास्यविनोदाची प्रशंसा करून म्हणालो, ह्‍या भूतलावर मनुष्याने खावे, प्यावे व चैन करावी यापेक्षा इष्ट त्याला काही नाही; देवाने त्याला या भूतलावर जो आयुष्यकाल दिला आहे त्यांत श्रम करीत असता एवढेच त्याच्याबरोबर राहणार.” (उपदेशक ३:१, ४, १३; ८:१५) अशाप्रकारचे आनंदी प्रसंग कौटुंबिक सहभोजनाच्या किंवा ख्रिस्ती बांधवांच्या स्नेहसमारंभांच्या रूपात असू शकतात.—ईयोब १:४, ५, १८; लूक १०:३८-४२; १४:१२-१४.

४. समारंभ आयोजित करणाऱ्‍याने कशाचा विचार केला पाहिजे?

जर तुम्ही अशाप्रकारचा छोटासा समारंभ आयोजित करणार असाल किंवा जर तुमच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली असेल, तर या समारंभाच्या संबंधाने कोणकोणत्या योजना आहेत याविषयी तुम्ही पूर्वविचार केला पाहिजे. समारंभ छोटासाच असेल आणि फक्‍त दोन चार बांधवांना तुम्ही जेवायला व सहज गप्पागोष्टी करायला बोलावले असेल तरीसुद्धा हा पूर्वविचार करणे महत्त्वाचे आहे. (रोमकर १२:१३) “सर्व काही शिस्तवार व व्यवस्थितपणे” तसेच ‘वरून येणाऱ्‍या ज्ञानाच्या’ अनुरूप घडेल याची तुम्ही खात्री केली पाहिजे. (१ करिंथकर १४:४०; याकोब ३:१७) प्रेषित पौलाने लिहिले: “तुम्ही खाता, पिता किंवा जे काही करिता ते सर्व देवाच्या गौरवासाठी करा. . . . कोणालाहि अडखळविणारे होऊ नका.” (१ करिंथकर १०:३१, ३२) कोणत्या काही गोष्टींकडे विशेष लक्ष देणे महत्त्वाचे आहे? या गोष्टींचा आधीपासूनच विचार केल्यामुळे तुमच्या व तुम्ही ज्यांना आमंत्रित केले आहे त्यांच्याही कृत्यांवरून हे दिसून येईल की तुम्ही जो विश्‍वास करता त्याप्रमाणे वागता देखील.—रोमकर १२:२.

समारंभ कशाप्रकारचा असणार?

५. समारंभ आयोजित करणाऱ्‍या व्यक्‍तीने मद्य द्यावे किंवा नाही आणि संगीत वाजवावे किंवा नाही याविषयी विचार का करावा?

स्नेहसमारंभ आयोजित करणाऱ्‍या बऱ्‍याच जणांना प्रश्‍न पडतो की पार्टीच्या मेनूत मद्याचा समावेश करावा की नाही. कोणताही समारंभ आनंददायक होण्याकरता मद्याची खरे तर आवश्‍यकता नाही. तुम्हाला आठवत असेल, जेव्हा येशूने एका लोकसमुदायाकरता अन्‍न पुरवले होते तेव्हा त्याने भाकरी आणि मासे पुरवले होते. त्याने चमत्कार करून द्राक्षारसही पुरवला असे या अहवालात सांगितलेले नाही. अर्थात येशूजवळ असे करण्याची शक्‍ती होती हे आपल्याला माहीत आहे. (मत्तय १४:१४-२१) जर तुम्ही एखाद्या समारंभात मद्य द्यायचे ठरवले तर ते माफक प्रमाणात पुरवा आणि ज्यांना मद्य नको असेल त्यांच्याकरता दुसरी पेये ठेवायला विसरू नका. (१ तीमथ्य ३:२, ३, ८; ५:२३; १ पेत्र ४:३) मद्य पिण्याची कोणालाही जबरदस्ती करू नका. बायबल सांगते की द्राक्षारस “सर्पासारखा दंश करितो.” (नीतिसूत्रे २३:२९-३२) संगीत, गाणी यांविषयी काय? जर तुम्ही संगीत वाजवणार असाल तर नक्कीच तुम्ही सर्व गाणी विचारपूर्वक निवडाल आणि ती निवडताना गाण्यांचा ठेका आणि बोल या दोन्ही गोष्टी लक्षात घ्याल. (कलस्सैकर ३:८; याकोब १:२१) बऱ्‍याच ख्रिश्‍चनांचा हा अनुभव आहे की किंग्डम मेलडीज वाजवल्याने किंवा सोबत मिळून राज्य गीते गायिल्याने समारंभात आनंददायक वातावरण टिकवून ठेवण्यास हातभार लागतो. (इफिसकर ५:१९, २०) आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे, वेळोवेळी संगिताच्या आवाजाकडे लक्ष द्या. मोठ्याने संगीत वाजवल्यामुळे लोकांना एकमेकांचे बोलणे ऐकू येणार नाही अशी परिस्थिती येऊ नये किंवा यामुळे शेजारपाजारच्या लोकांना त्रास व्हायला नको.—मत्तय ७:१२.

६. संभाषणाच्या व इतर गोष्टींच्या बाबतीत, आपला विश्‍वास हा एक जिवंत विश्‍वास आहे हे आपल्या घरी समारंभ आयोजित करणारी व्यक्‍ती कसे दाखवू शकते?

ख्रिस्ती बांधव एकत्र येतात तेव्हा ते निरनिराळ्या विषयांवर चर्चा करू शकतात, काही साहित्याचे मोठ्याने वाचन करू शकतात किंवा मनोवेधक अनुभव एकमेकांना सांगू शकतात. जर संभाषण नको त्या विषयांकडे वळाले तर ज्याने निमंत्रित केले आहे त्याने चलाखीने विषय बदलावा. तसेच एकच व्यक्‍ती बोलते आहे आणि बाकीचे गप्प बसले आहेत असे घडू नये याचीही त्याने खबरदारी घ्यावी. जर असे घडलेच तर त्याने समजदारीने हे त्यांच्या लक्षात आणून द्यावे आणि सर्वांना संभाषणात सहभाग घेण्याचे प्रोत्साहन द्यावे. उदाहरणार्थ, लहान मुलांना आपले विचार व्यक्‍त करता येतील अशाप्रकारचे प्रश्‍न विचारून किंवा सर्वजण आपापले मत व्यक्‍त करू शकतील असा एखादा विषय छेडून तो असे करू शकतो. असे केल्यामुळे सर्व वयांच्या व्यक्‍तींना हा प्रसंग आनंददायक वाटेल. जर समारंभाचा आयोजक या नात्याने, तुम्ही सुज्ञतेने व इतरांच्या भावनांचा विचार करून सर्व गोष्टी हाताळल्यात तर तुमचा ‘समंजसपणा सर्वांना कळून येईल.’ (फिलिप्पैकर ४:५, NW) त्यांना जाणीव होईल की तुमचा विश्‍वास हा एक जिवंत विश्‍वास असून तो तुमच्या जीवनाच्या सर्व पैलूंवर प्रभाव टाकतो.

लग्नाचा विधी व त्यानंतर होणारा स्वागतसमारंभ

७. लग्न व त्यासोबतच्या स्वागतसमारंभांचे आयोजन करताना विचारपूर्वक सर्व योजना करणे का महत्त्वाचे आहे?

ख्रिस्ती लग्न हा एक विशेष आनंददायक प्रसंग असतो. येशू, त्याचे शिष्य व देवाच्या अनेक प्राचीन सेवकांनी अशा आनंदी प्रसंगांत, तसेच त्यासोबत होणाऱ्‍या मेजवानीत सहभाग घेतला. (उत्पत्ति २९:२१, २२; योहान २:१, २) पण अलीकडच्या काळात, अनुभवांवरून हे स्पष्टपणे दिसून आले आहे की लग्न व त्यासोबत होणाऱ्‍या स्वागतसमारंभांचे आयोजन करताना, सर्व गोष्टींत योग्य तारतम्य व ख्रिस्ती संतुलन राहावे याकरता अतिशय विचारपूर्वक योजना आखणे महत्त्वाचे आहे. लग्न समारंभ हे जीवनातील अविभाज्य अंग असून अशा प्रसंगी आपला विश्‍वास हा एक जिवंत विश्‍वास आहे हे आपल्या कार्यांवरून दाखवण्याची प्रत्येक ख्रिश्‍चनाला संधी असते.

८, ९. बऱ्‍याच लग्नसमारंभांत पाळल्या जाणाऱ्‍या रितीरिवाजांवरून १ योहान २:१६, १७ यातील शब्दांची कशाप्रकारे प्रचिती येते?

ज्यांना देवाच्या तत्त्वांचे ज्ञान नाही किंवा ज्यांना त्यांची पर्वा नाही अशा बऱ्‍याच लोकांना असे वाटते की लग्न म्हणजे सर्व गोष्टींच्या बाबतीत अतिरेक करण्याचा प्रसंग असतो. त्यांना वाटते की लग्नाच्या निमित्ताने असा अतिरेक करण्याची सूट मिळते. एका युरोपियन मसिकानुसार, एका नववधूने आपल्या “शाही” लग्नसोहळ्याबद्दल असे सांगितले: ‘आम्ही वधूवर चार घोड्यांच्या सुंदर बग्गीत बसून आलो, आमच्या मागोमाग आणखी १२ छोट्या बग्ग्या आणि आणखी एक घोडागाडी होती ज्यात संगीताचा बॅण्ड होता. जेवणाच्या मेनूत उत्कृष्ट प्रकारचे खाण्याचे पदार्थ होते आणि संगीतही अतिशय उत्कृष्ट होते. मी हरखून गेले, सारे काही अगदी माझ्या मनासारखे झाले होते. त्या एका दिवसापुरती मी राणी झाले होते.’

प्रत्येक देशात रितीरिवाज वेगवेगळे असले तरीसुद्धा, या नववधूच्या शब्दांवरून प्रेषित योहानाने लिहिलेल्या शब्दांची प्रचिती येते: “जगात जे सर्व आहे ते, म्हणजे देहाची वासना, डोळ्यांची वासना व संसाराविषयीची फुशारकी, ही पित्यापासून नाहीत, तर जगापासून आहेत.” एखादे प्रौढ ख्रिस्ती जोडपे अमाप पैसा उधळून अशाप्रकारचे “शाही” लग्न आणि परिकथेसारखा स्वागतसमारंभ आयोजित करतील अशी तुम्ही कल्पना करू शकता का? उलट त्यांनी हे लक्षात घ्यावे, की “देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्वकाळ राहतो.”—१ योहान २:१६, १७.

१०. (क) लग्नसमारंभाचे वाजवीपणे आयोजन करताना आधीपासून विचार करणे का महत्त्वाचे आहे? (ख) कोणाकोणाला निमंत्रण द्यावे यासंबंधात कशाप्रकारे निर्णय घेतले जावेत?

१० ख्रिस्ती जोडप्यांनी वास्तववादी आणि वाजवी दृष्टिकोन बाळगला पाहिजे आणि बायबल याकरता त्यांना मदत करू शकते. लग्नाचा दिवस अतिशय खास असतो यात शंका नाही. पण ख्रिस्ती जोडपी हे आठवणीत ठेवतात की लग्नाचा दिवस ही दोन ख्रिस्ती व्यक्‍तींच्या सहजीवनाची केवळ एक सुरुवात आहे कारण त्यांच्यापुढे सार्वकालिक जीवन आहे. त्यांनी लग्नानंतर अतिशय मोठी मेजवानी दिलीच पाहिजे असे मुळीच नाही. जर त्यांनी स्वागतसमारंभ ठेवण्याचे ठरवलेच, तर या समारंभाला लागणारा खर्च आणि तो कशाप्रकारचा समारंभ राहील याविषयी त्यांनी निवांत बसून विचार केला पाहिजे. (लूक १४:२८) त्यांच्या ख्रिस्ती जीवनात शास्त्रवचनांनुसार पती हा कुटुंबाचा प्रमुख असेल. (१ करिंथकर ११:३; इफिसकर ५:२२, २३) तेव्हा लग्नाचा स्वागतसमारंभ आयोजित करण्यासाठीही मुख्यतः तोच जबाबदार असतो. अर्थात, या कार्यक्रमाला आपण कोणाकोणाला निमंत्रित करू शकतो याविषयी तो निश्‍चितच प्रेमळपणे आपल्या होणाऱ्‍या पत्नीशीही विचारविनिमय करेल. सगळ्याच स्नेह्‍यांना व नातेवाईकांना बोलावणे कदाचित त्यांना शक्य होणार नाही; त्यामुळे त्यांनी वाजवीपणे विचार करून निर्णय घ्यावेत. ख्रिस्ती बांधवांपैकी जर त्यांना काहीजणांना निमंत्रण देता आले नाही तरी हे बांधव समजून घेतील आणि आपल्यावर रागावणार नाहीत याची त्यांना खात्री बाळगता आली पाहिजे.—उपदेशक ७:९.

“भोजनकारभारी”

११. “भोजनकारभारी” लग्नसमारंभात कोणती भूमिका बजावतो?

११ जर एखाद्या जोडप्याने आपल्या लग्नानंतर स्वागतसमारंभाचे आयोजन केले, तर हा समारंभ आदरणीयरित्या पार पडेल याची ते कशी खात्री करू शकतात? येशू काना येथील ज्या लग्नसोहळ्याला उपस्थित राहिला होता त्याविषयीच्या अहवालात, या मेजवानीत एक “भोजनकारभारी” होता असा उल्लेख केला आहे. अर्थातच हा एक जबाबदार सहउपासक असावा. लग्नसमारंभाचे आयोजन करताना एखाद्या प्रौढ बांधवावर ही जबाबदारी सोपवण्यात किती सुज्ञता आहे हे यहोवाच्या साक्षीदारांनी अनेक वर्षांपासून अनुभवले आहे. (योहान २:९, १०) तेव्हा आपल्या लग्नाचे आयोजन करणारा सुज्ञ ख्रिस्ती नवरामुलगा ही महत्त्वाची जबाबदारी एखाद्या आध्यात्मिकरित्या प्रौढ ख्रिस्ती बांधवावर सोपवेल. नवऱ्‍यामुलाच्या इच्छा व आवडीनिवडी लक्षात घेऊन हा भोजनकाभारी समारंभाच्या आधी व प्रत्यक्ष समारंभातही बारीकसारीक गोष्टींकडे लक्ष देऊ शकतो.

१२. मद्यपानाच्या संदर्भात नवऱ्‍यामुलाने काय विचारात घेतले पाहिजे?

१२ मद्यपान अनियंत्रित होऊन स्वागतसमारंभाच्या आनंदी प्रसंगाला गालबोट लागू नये म्हणून काही जोडपी ५ व्या परिच्छेदातील माहितीच्या अनुषंगाने, मद्य द्यायचेच नाही असे ठरवतात. (रोमकर १३:१३; १ करिंथकर ५:११) अर्थात जर त्यांनी मद्य द्यायचे ठरवलेच तर ते प्रत्येकाला माफक प्रमाणातच दिले जाईल याची नवऱ्‍यामुलाने खात्री करावी. काना येथे येशू ज्या लग्नाच्या मेजवानीला उपस्थित होता तेथे त्याने उत्तम प्रतीचा द्राक्षारस पुरवला. विशेष म्हणजे, त्याप्रसंगी भोजनकारभाऱ्‍याने असे म्हटले: “लोक नेहमी उत्तम द्राक्षारस पहिल्यांदा वाढतात. नंतर पाहुणे भरपूर प्याले म्हणजे मग लोक हलक्या प्रतीचा वाढतात. परंतु तू तर उत्तम द्राक्षारस अजून राखून ठेवला आहेस.” (योहान २:१०, ईजी टू रीड व्हर्शन) निश्‍चितच येशूने लोकांना भरपूर पिण्याचे, अथवा पिऊन झिंगण्याचे प्रोत्साहन दिले नाही कारण हे चुकीचे आहे असे त्याने स्वतःच सांगितले होते. (लूक १२:४५, ४६) उत्तम प्रतीचा द्राक्षारस चाखल्यावर भोजनकारभाऱ्‍याने आश्‍चर्य व्यक्‍त केले यावरून हे स्पष्ट दिसून येते, की काही लग्नसोहळ्यांत पाहुणे द्राक्षारस पिऊन झिंगतात हे त्याने पाहिले होते. (प्रेषितांची कृत्ये २:१५; १ थेस्सलनीकाकर ५:७) तेव्हा, नवरामुलगा आणि भोजनकारभारी म्हणून त्याने ज्या भरवशालायक ख्रिस्ती बांधवाला नेमले आहे त्या दोघांनी याकडे जातीने लक्ष द्यावे की समारंभाला उपस्थित असणारे सर्वजण पुढील स्पष्ट आज्ञेचे पालन करतील: “द्राक्षारसाने मस्त होऊ नका, द्राक्षरसात बेतालपणा आहे.”—इफिसकर ५:१८; नीतिसूत्रे २०:१; होशेय ४:११.

१३. जोडप्याने जर आपल्या लग्नाच्या स्वागतसमारंभात संगीत वाजवायचे ठरवले तर त्यांनी कोणती गोष्ट विचारात घेतली पाहिजे आणि का?

१३ लग्नाच्या स्वागतसमारंभात संगीत वाजवले जाणार असेल तर इतर समारंभांप्रमाणेच येथेही संगीत किती मोठ्याने वाजवले जात आहे याकडे लक्ष दिले पाहिजे. त्याचा आवाज इतका मोठा असू नये की ज्यामुळे लोकांना एकमेकांचे बोलणे ऐकायला त्रास होईल. एका ख्रिस्ती वडिलांनी असे निरीक्षण केले की: “समारंभांत कधीकधी असे पाहायला मिळते की जेवणं वगैरे आटोपल्यानंतर जेव्हा लोकांच्या गप्पागोष्टी रंगत येतात आणि नाचणे वगैरे सुरू होते तेव्हा संगिताचा आवाज वाढवला जातो. सुरुवातीला हळू आवाजात वाजवले जाणारे संगीत आता इतक्या मोठ्याने वाजू लागते की समोरचा माणूस काय बोलतोय हे ऐकू येत नाही. खरे तर लग्नाच्या स्वागतसमारंभात सर्वांशी भेटण्याबोलण्याची चांगली संधी असते. पण जर मोठ्याने संगीत वाजवल्यामुळे लोकांशी बोलताच आले नाही तर ती किती दुःखाची गोष्ट ठरेल!” याबाबतीतही नवरामुलगा व भोजनकारभारी याने जबाबदारपणे वागले पाहिजे. कोणत्या प्रकारचे संगीत वाजवले जाईल आणि ते किती मोठ्याने वाजवले जाईल हे ठरवण्याची जबाबदारी त्यांनी बॅण्डवाल्यांवर टाकू नये. पौलाने लिहिले: “बोलणे किंवा करणे जे काही तुम्ही कराल, ते सर्व प्रभु येशूच्या नावाने करा.” (कलस्सैकर ३:१७) लग्नाच्या स्वागतसमारंभानंतर पाहुणे आपापल्या घरी जातील तेव्हा त्यांना या समारंभात वाजवलेले संगीत या गोष्टीची आठवण करून देईल का, की लग्न झालेल्या जोडप्याने सर्वकाही येशूच्या नावाने केले? असेच घडणे महत्त्वाचे आहे.

१४. लग्नसमारंभाच्या बऱ्‍याच काळानंतरही कोणती गोष्ट सर्वांच्या लक्षात राहिली पाहिजे?

१४ उत्तमरित्या आयोजित करण्यात आलेल्या लग्नसमारंभाची बऱ्‍याच काळानंतरही आठवण काढल्यावर आनंद वाटतो. तीस वर्षांपासून विवाहित असणारे एक जोडपे, ॲडम व एडीटा हे अशाच एका लग्नसमारंभाची आठवण सांगतात: ‘त्या समारंभाचे एकंदर वातावरणच असे होते, की हे यहोवाच्या साक्षीदारांचे लग्न आहे हे स्पष्टपणे जाणवत होते. यहोवाच्या स्तुतीची काही गीते तर होतीच पण त्यासोबतच इतरही चांगल्या प्रकारची करमणूक होती. डान्स व संगीत या गोष्टी त्या लग्नात दुय्यम होत्या. सर्वकाही अतिशय सुरेखपणे आयोजित केलेले, उत्तेजनदायक होते आणि सर्वकाही बायबलच्या तत्त्वांच्या सामंजस्यात होते.’ अर्थातच, वधूवर दोघेही त्यांच्या कार्यांवरून त्यांच्या विश्‍वासाची प्रतिती देऊ शकतात.

लग्नात देण्याच्या भेटवस्तू

१५. लग्नात भेटवस्तू देण्याच्या बाबतीत बायबलमधील कोणता सल्ला समर्पक ठरू शकतो?

१५ बऱ्‍याच देशांत मित्रांनी व नातेवाईकांनी लग्नात वधूवरास भेटवस्तू देण्याची प्रथा आहे. जर तुम्हालाही एखाद्या लग्नात वधूवरास भेटवस्तू द्यायची इच्छा असेल, तर तुम्ही कोणती गोष्ट आठवणीत ठेवली पाहिजे? प्रेषित योहानाने, ‘संसाराविषयीच्या फुशारकीचा’ उल्लेख केलेला तुम्हाला आठवत असेल. त्याने अशा दिखाव्याचा संबंध, कार्यांतून आपला विश्‍वास प्रकट करणाऱ्‍या ख्रिश्‍चनांशी नव्हे तर ‘नाहीशा होणाऱ्‍या जगाशी’ लावला. (१ योहान २:१६, १७) योहानाने देवाच्या प्रेरणेने केलेले हे निरीक्षण विचारात घेता, वधूवरांनी प्रत्येक भेटवस्तू देणाऱ्‍या व्यक्‍तीचे नाव सर्वांसमोर जाहीर करणे योग्य ठरेल का? मासेदोनिया व अखया येथील ख्रिस्ती बांधवांनी जेरूसलेमेतील बांधवांसाठी आर्थिक साहाय्य केले पण त्यांची नावे जाहीर करण्यात आल्याचा कोठेही उल्लेख सापडत नाही. (रोमकर १५:२६) वधूवरास भेटवस्तू देणाऱ्‍या बऱ्‍याच जणांना सर्वांचे आपल्याकडे लक्ष जाण्यापेक्षा आपले नाव न सांगितलेलेच बरे वाटेल. याबाबतीत मत्तय ६:१-४ येथे येशूने दिलेल्या मार्गदर्शनाकडे लक्ष द्या.

१६. नवविवाहित जोडपी भेटवस्तूंच्या संबंधाने इतरांच्या भावना दुखवण्याचे कसे टाळू शकतात?

१६ भेटवस्तू देणाऱ्‍या व्यक्‍तींची नावे जाहीर केल्यामुळे, कोणाची भेटवस्तू सर्वात चांगली किंवा महागडी होती यावरून ‘हेवेदावे’ उत्पन्‍न होण्याची शक्यता आहे. तेव्हा सुज्ञ ख्रिस्ती जोडप्यांनी भेटवस्तू देणाऱ्‍यांची नावे जाहीर करू नयेत. नावे जाहीर केल्यामुळे, ज्यांची भेटवस्तू देण्याची ऐपत नाही अशा व्यक्‍तींना इतरांसमोर लाजल्यासारखे वाटू शकते. (गलतीकर ५:२६; ६:१०) अर्थात एखादी भेटवस्तू कोणी दिली हे वधूवरास जाणून घ्यावेसे वाटत असेल तर त्यात गैर काही नाही. भेटवस्तूसोबत दिलेल्या लहानशा कार्डावरून हे त्यांना समजू शकते. पण हे कार्ड सर्वांसमोर वाचून दाखवण्याची गरज नाही. भेटवस्तू विकत घेताना, ती देताना आणि ती स्वीकारताना आपल्यापैकी सर्वांनाच हे दाखवण्याची संधी असते की अशा खासगी गोष्टींतही आपला विश्‍वास आपल्या कार्यांवर प्रभाव टाकत आहे. *

१७. विश्‍वास व कार्यांच्या संबंधाने ख्रिश्‍चनांनी कोणते ध्येय बाळगावे?

१७ आपल्या विश्‍वासाची प्रतिती देण्याकरता, केवळ नैतिकरित्या शुद्ध असणे, सर्व ख्रिस्ती सभांना उपस्थित राहणे आणि प्रचार कार्यात सहभाग घेणे पुरेसे नाही. आपल्यापैकी प्रत्येकाने अशाप्रकारचा विश्‍वास उत्पन्‍न करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, की ज्याचा आपल्या प्रत्येक कृतीवर परिणाम पडेल. होय, ज्यांविषयी आपण येथे चर्चा केली त्या व जीवनाच्या इतर क्षेत्रांतही आपली सर्व कृत्ये आपल्या विश्‍वासाच्या अनुरूप असावीत आणि देवाच्या दृष्टीने “पूर्ण अशी” असावीत.—प्रकटीकरण ३:२.

१८. योहान १३:१७ यातील शब्द ख्रिस्ती लग्न व समारंभांच्या बाबतीत कशाप्रकारे खरे ठरतात?

१८ येशूने आपल्या शिष्यांचे पाय धुण्याचे विनम्र व अनुकरणीय कृत्य केल्यानंतर त्याने त्यांना म्हटले: “जर ह्‍या गोष्टी तुम्हाला समजतात तर त्या केल्याने तुम्ही धन्य आहा.” (योहान १३:४-१७) आज आपण जेथे राहतो तेथे कदाचित दुसऱ्‍या एखाद्या व्यक्‍तीचे, उदाहरणार्थ घरी आलेल्या पाहुण्याचे पाय धुण्याची अपेक्षा केली जात नसेल. पण या लेखात आपण पाहिल्याप्रमाणे, जीवनाचे इतर काही क्षेत्र आहेत ज्यांत आपण आपल्या प्रेमळ व विचारशील कृत्यांद्वारे आपला विश्‍वास प्रकट करू शकतो. उदाहरणार्थ, सामाजिक समारंभ व ख्रिस्ती लग्नसमारंभ. मग ते आपले स्वतःचे लग्न असो, किंवा आपण पाहुणे म्हणून त्या लग्नाला अथवा लग्नानंतरच्या आनंदी समारंभाला उपस्थित राहणारे असोत, आपण सर्वांनी आपल्या कार्यांवरून आपल्या विश्‍वासाची प्रतिती दिली पाहिजे. (w०६ १०/१५)

[तळटीप]

^ परि. 16 लग्नसमारंभ आणि स्वागतसमारंभ यांविषयी आणखी माहिती, “विवाह सोहळ्याचा आनंद आणि प्रतिष्ठा द्विगुणीत करा” असे शीर्षक असलेल्या पुढच्या लेखात विचारात घेतली आहे.

तुम्ही कसे उत्तर द्याल?

तुम्ही खालील परिस्थितीत आपल्या विश्‍वासाची प्रतिती कशाप्रकारे देऊ शकता?

• एखाद्या समारंभाचे आयोजन करताना?

• लग्न अथवा स्वागतसमारंभाचे आयोजन करताना?

• लग्नात भेटवस्तू देताना किंवा स्वीकारताना?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१७ पानांवरील चित्र]

केवळ दोनचारच व्यक्‍तींना निमंत्रित करतानाही, ‘वरून येणाऱ्‍या ज्ञानाच्या’ मार्गदर्शनाचे पालन करा