व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पवित्र गोष्टींसंबंधी तुमचाही यहोवासारखा दृष्टिकोन आहे का?

पवित्र गोष्टींसंबंधी तुमचाही यहोवासारखा दृष्टिकोन आहे का?

पवित्र गोष्टींसंबंधी तुमचाही यहोवासारखा दृष्टिकोन आहे का?

“कोणीही लैंगिक पापात गोवला जात नाही अथवा . . . कोणी देवाविषयी [पवित्र गोष्टींविषयी] बेपर्वा होणार नाही, म्हणून जागरूक राहा.”—इब्री लोकांस १२:१५, १६, सुबोध भाषांतर.

१. यहोवाचे सेवक सध्या दिसून येणारी कोणती प्रवृत्ती टाळतात?

 जगातले एकंदर वातावरण पाहिल्यास, बहुतेक लोक दिवसेंदिवस पवित्र गोष्टींविषयी बेपर्वा होत चालले आहेत. फ्रेंच समाजशास्त्रज्ञ एड्‌गर मोराँ यांनी म्हटले: “देव, निसर्ग, मातृभूमी, इतिहास, तर्कशक्‍ती या गोष्टींवरच समाजातले नीतिनियम आधारित असतात. या गोष्टींविषयी पूर्वी कोणीही वाद घालत नसे. पण आता परिस्थिती बदलली आहे. . . . आता लोक फक्‍त त्यांना आवडतील आणि सोयीचे वाटतील तेच नीतिनियम निवडून घेऊ लागले आहेत.” या प्रवृत्तीतून “जगाचा आत्मा” किंवा ‘आज्ञा मोडणाऱ्‍या लोकांत आता कार्य करणारा आत्मा’ दिसून येतो. (१ करिंथकर २:१२; इफिसकर २:२) पण ज्यांनी स्वतःचे जीवन यहोवाला समर्पित केले आहे आणि जे त्याच्या न्याय्य सार्वभौमत्त्वाला स्वेच्छेने अधीन होतात त्यांच्यामध्ये अशी बेपर्वा प्रवृत्ती दिसून येत नाही. (रोमकर १२:१, २) उलट, यहोवाच्या उपासनेत पवित्रतेला कोणते स्थान आहे याची त्याच्या सेवकांना जाणीव आहे. आपल्या जीवनात कोणत्या गोष्टी पवित्र असल्या पाहिजेत? या लेखात अशा पाच गोष्टींविषयी सांगितले आहे, ज्या देवाच्या सर्व सेवकांकरता पवित्र आहेत. पुढच्या लेखात आपल्या ख्रिस्ती सभांच्या पावित्र्याविषयी चर्चा केली जाईल. पण “पवित्र” या शब्दाचा अर्थ काय आहे?

२, ३. (क) बायबलमध्ये यहोवाच्या पवित्रतेकडे कशाप्रकारे लक्ष वेधण्यात आले आहे? (ख) आपण कशाप्रकारे यहोवाचे नाव पवित्र मानतो?

बायबल लिहिताना वापरण्यात आलेल्या इब्री भाषेत “पवित्र” या शब्दातून वेगळेपणाचा अर्थ सूचित होतो. उपासनेच्या संदर्भात, “पवित्र” म्हणजे जे सर्वसाधारण उपयोगासाठी नसून वेगळे करण्यात आले आहे. यहोवा पूर्णार्थाने पवित्र आहे. त्याला ‘परमपवित्र’ म्हणण्यात आले आहे. (नीतिसूत्रे ९:१०; ३०:३) प्राचीन इस्राएलात मुख्य याजकाच्या मंदिलावर किंवा पागोट्यावर, “परमेश्‍वरासाठी पवित्र” ही अक्षरे कोरलेली सोन्याची पट्टी लावलेली असे. (निर्गम २८:३६, ३७) स्वर्गात यहोवाच्या राजासनाच्या भोवताली असणारे करूब व सराफीम “पवित्र! पवित्र! पवित्र!” असे म्हणत असल्याचे त्यांच्याविषयी वर्णन करण्यात आले आहे. (यशया ६:२, ३; प्रकटीकरण ४:६-८) तीन वेळा पवित्र असे म्हणणे या गोष्टीवर जोर देते की यहोवाचे पावित्र्य, निर्मलता व शुद्धता ही उच्चतम कोटीची आहे. खरे तर यहोवाच पावित्र्याचा स्रोत आहे.

यहोवाचे नाव पवित्र आहे. स्तोत्रकर्त्याने म्हटले: “त्याचे नाव पवित्र व भययोग्य आहे.” (स्तोत्र १११:९) येशूने आपल्याला अशी प्रार्थना करण्यास शिकवले: “हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानिले जावो.” (मत्तय ६:९) येशूची पृथ्वीवरील आई मरीया हिने असे म्हटले: “माझा जीव प्रभूला थोर मानितो . . . जो समर्थ आहे त्याने माझ्याकरिता महत्कृत्ये केली आहेत; आणि त्याचे नाव पवित्र आहे.” (लूक १:४६, ४९) यहोवाचे सेवक या नात्याने आपण त्याचे नाव पवित्र मानतो आणि त्याच्या पवित्र नावाला कलंक लागेल असे काहीही करण्याचे आपण टाळतो. शिवाय, पवित्र गोष्टींविषयी आपणही यहोवासारखाच दृष्टिकोन बाळगण्याचा प्रयत्न करतो, म्हणजेच तो ज्या गोष्टींना पवित्र समजतो त्यांना आपणही पवित्र समजतो.—आमोस ५:१४, १५.

आपण येशूबद्दल मनःपूर्वक आदर का बाळगतो?

४. बायबलमध्ये येशूला “पवित्र” का म्हणण्यात आले आहे?

पवित्र देव यहोवा याचा ‘एकुलता एक’ पुत्र या नात्याने येशूला पवित्र असे निर्माण करण्यात आले. (योहान १:१४; कलस्सैकर १:१५; इब्री लोकांस १:१-३) म्हणूनच त्याला “देवाचा पवित्र” असे म्हणण्यात आले आहे. (योहान ६:६९) त्याचे जीवन स्वर्गातून पृथ्वीवर स्थानांतरीत करण्यात आले तेव्हा त्याचे पावित्र्य भंग पावले नाही कारण मरीयेने पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने येशूला जन्म दिला. एका देवदूताने तिला सांगितले होते: “पवित्र आत्मा तुझ्यावर येईल . . . ह्‍या कारणाने ज्याचा जन्म होईल त्याला पवित्र, देवाचा पुत्र, असे म्हणतील.” (लूक १:३५) यहोवाला प्रार्थना करताना, जेरूसलेममधील ख्रिश्‍चनांनी देवाच्या पुत्राचा उल्लेख, “तुझा पवित्र सेवक येशू” असे म्हणून केला.—प्रेषितांची कृत्ये ४:२७, ३०.

५. येशूने पृथ्वीवर त्याच्यावर सोपवण्यात आलेले कोणते पवित्र कार्य पार पाडले आणि त्याचे रक्‍त मूल्यवान का आहे?

येशूला या पृथ्वीवर एक पवित्र कार्य पार पाडण्याकरता पाठवण्यात आले होते. सा.यु. २९ साली त्याचा बाप्तिस्मा झाला तेव्हा येशूला यहोवाच्या महान आत्मिक मंदिराचा मुख्य याजक म्हणून अभिषिक्‍त करण्यात आले. (लूक ३:२१, २२; इब्री लोकांस ७:२६; ८:१, २) शिवाय, त्याला आपल्या जीवनाचे बलिदान द्यायचे होते. त्याने वाहिलेले रक्‍त हे पापी मानवांना जीवनदान देणारी खंडणी ठरणार होते. (मत्तय २०:२८; इब्री लोकांस ९:१४) म्हणूनच आपण येशूच्या रक्‍ताला पवित्र व “मूल्यवान” मानतो.—१ पेत्र १:१९.

६. ख्रिस्त येशूविषयी आपण कशी मनोवृत्ती बाळगतो व का?

आपला राजा आणि मुख्य याजक ख्रिस्त येशू याचा आपण मनापासून आदर करतो हे प्रेषित पौलाने त्याच्या पुढील शब्दांतून व्यक्‍त केले: “देवाने त्याला अत्युच्च केले, आणि सर्व नावांपेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले; ह्‍यात हेतु हा की, स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा, आणि देवपित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त हा प्रभु आहे असे कबूल करावे.” (फिलिप्पैकर २:९-११) आपला स्वामी व राजा, तसेच ख्रिस्ती मंडळीचे मस्तक असणारा येशू ख्रिस्त याला आनंदाने आज्ञांकित होण्याद्वारे आपण दाखवतो की पवित्र गोष्टींविषयी आपलाही दृष्टिकोन यहोवा देवासारखाच आहे.—मत्तय २३:१०; कलस्सैकर १:८.

७. आपण ख्रिस्ताला आज्ञांकित आहोत हे कसे दाखवतो?

पृथ्वीवर आज ज्या कार्यास येशू निर्देशित करत आहे त्या कार्यात पुढाकार घेण्याकरता त्याने नियुक्‍त केलेल्या पुरुषांना आदर दाखवणे हे देखील येशूला आज्ञांकित होण्यात समाविष्ट आहे. नियमन मंडळातील अभिषिक्‍त जन तसेच त्यांच्याद्वारे शाखा दप्तरांत, निरनिराळ्या प्रांतांत, विभागांत व मंडळ्यांत नियुक्‍त करण्यात आलेले पर्यवेक्षक जे कार्य करतात त्यालाही आपण एक पवित्र जबाबदारी म्हणून लेखले पाहिजे. आणि याच कारणास्तव आपण या व्यवस्थेचा मनापासून आदर केला पाहिजे व तिला सहकार्य दिले पाहिजे.—इब्री १३:७, १७.

पवित्र राष्ट्र

८, ९. (क) इस्राएल लोक कोणत्या अर्थाने पवित्र राष्ट्र होते? (ख) यहोवाने इस्राएलांना पावित्र्याचे महत्त्व कशाप्रकारे पटवून दिले?

यहोवाने इस्राएल राष्ट्रासोबत करार बांधला होता. या नात्याने, त्या नव्या राष्ट्राला एक विशेष प्रतिष्ठा लाभली. त्यांना पवित्र करण्यात आले, अर्थात इतर राष्ट्रांपासून वेगळे करण्यात आले. स्वतः यहोवा त्यांना म्हणाला: “तुम्ही माझ्या प्रीत्यर्थ पवित्र व्हावे; कारण मी परमेश्‍वर पवित्र आहे; तुम्ही माझेच असावे म्हणून मी तुम्हाला इतर राष्ट्रांपासून वेगळे केले आहे.”—लेवीय १९:२; २०:२६.

इस्राएल राष्ट्राची स्थापना झाली तेव्हापासूनच यहोवाने इस्राएली लोकांना पावित्र्याच्या महत्त्वाची जाणीव करून दिली. दहा आज्ञा जेथे देण्यात आल्या होत्या त्या पर्वताला स्पर्शही करू नये, स्पर्श केल्यास मृत्यू होईल असे त्यांना सांगण्यात आले होते. त्याअर्थी, सिनाय पर्वत हा त्यांच्याकरता पवित्र होता. (निर्गम १९:१२, २३) याजकगण, निवासमंडप आणि त्यातील सर्व सामानही पवित्र मानायचे होते. (निर्गम ३०:२६-३०) आजच्या ख्रिस्ती मंडळीबद्दल काय?

१०, ११. अभिषिक्‍त जनांची ख्रिस्ती मंडळी पवित्र आहे असे आपण का म्हणू शकतो आणि ‘दुसरी मेंढरे’ यांच्यावर याचा कसा परिणाम होतो?

१० अभिषिक्‍त जनांची ख्रिस्ती मंडळी यहोवाच्या नजरेत पवित्र आहे. (१ करिंथकर १:२) किंबहुना, कोणत्याही विशिष्ट काळात पृथ्वीवरील अभिषिक्‍त जनांच्या सबंध समूहाची तुलना पवित्र मंदिराशी करण्यात आली आहे. अर्थात, यहोवाच्या महान आत्मिक मंदिराशी याची गल्लत केली जाऊ नये. या मंदिरात यहोवा आपल्या पवित्र आत्म्याच्या माध्यमाने वस्ती करतो. प्रेषित पौलाने लिहिले: “त्याच्यामध्ये सबंध इमारत जोडून रचली असता प्रभूच्या ठायी वाढत वाढत पवित्र मंदिर होते; प्रभूच्या ठायी तुम्हीहि आत्म्याच्या द्वारे देवाच्या वस्तीसाठी एकत्र रचले जात आहा.”—इफिसकर २:२१, २२; १ पेत्र २:५,.

११ पौलाने पुढे अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना उद्देशून असे लिहिले: “तुम्ही देवाचे मंदिर आहा आणि तुम्हामध्ये देवाचा आत्मा वास करितो हे तुम्हास ठाऊक नाही काय? . . . देवाचे मंदिर पवित्र आहे, तेच तुम्ही आहा.” (१ करिंथकर ३:१६, १७) आपल्या आत्म्याद्वारे यहोवा अभिषिक्‍तांमध्ये ‘वास करतो’ व ‘चालतो.’ (२ करिंथकर ६:१६) तो सदोदीत आपल्या या विश्‍वासू ‘दासाला’ मार्गदर्शन पुरवतो. (मत्तय २४:४५-४७) ‘दुसरी मेंढरे’ या ‘मंदिर’ वर्गासोबत मिळून कार्य करण्यास एक बहुमान समजतात.—योहान १०:१६; मत्तय २५:३७-४०.

आपल्या ख्रिस्ती जीवनातील पवित्र गोष्टी

१२. आपल्या जीवनात कोणत्या गोष्टींना आपण पवित्र मानतो आणि का?

१२ साहजिकच, ख्रिस्ती मंडळीत अभिषिक्‍त जनांच्या व त्यांच्या सहकाऱ्‍यांच्या जीवनाशी संबंधित असलेल्या बऱ्‍याच गोष्टी पवित्र मानल्या जातात. यहोवासोबतचा आपला नातेसंबंध पवित्र आहे. (१ इतिहास २८:९; स्तोत्र ३६:७) तो इतका मूल्यवान आहे की आपण कशालाही व कोणालाही यहोवा देवासोबतच्या आपल्या नातेसंबंधाच्या आड येऊ देत नाही. (२ इतिहास १५:२; याकोब ४:७, ८) यहोवासोबत जवळचा नातेसंबंध टिकवून ठेवण्याकरता प्रार्थनेची महत्त्वाची भूमिका आहे. संदेष्टा दानीएलाच्या दृष्टीत प्रार्थना इतकी पवित्र होती की त्याला जिवे मारण्याची धमकी देण्यात आली तेव्हासुद्धा त्याने यहोवाला प्रार्थना करण्याची आपली सवय सोडली नाही. (दानीएल ६:७-११) अभिषिक्‍त जनांच्या अर्थात, ‘पवित्र जनांच्या प्रार्थनांची’ तुलना मंदिराच्या उपासनेत वापरल्या जाणाऱ्‍या धूपाशी करण्यात आली आहे. (प्रकटीकरण ५:८; ८:३, ४; लेवीय १६:१२, १३) या तुलनेवरून आपण प्रार्थनांचे पावित्र्य समजू शकतो. सबंध विश्‍वाच्या सार्वभौम प्रभूशी बोलण्याचा बहुमान खरोखरच अतुलनीय आहे! म्हणूनच तर आपण प्रार्थनांना पवित्र समजतो!

१३. कोणती शक्‍ती पवित्र आहे आणि तिचा प्रभाव आपल्या जीवनात होत राहावा म्हणून आपण काय केले पाहिजे?

१३ अभिषिक्‍त जनांच्या व त्यांच्या सहकाऱ्‍यांच्या जीवनात कार्य करणारी एक शक्‍ती आहे जिला ते पवित्र मानतात, अर्थात पवित्र आत्मा. हा आत्मा म्हणजे यहोवाची कार्यकारी शक्‍ती आहे, आणि तिचा उपयोग नेहमी पवित्र देवाच्या इच्छेनुसारच होत असल्यामुळे तिला “पवित्र आत्मा” किंवा ‘पवित्रतेचा आत्मा’ म्हणणे योग्यच आहे. (योहान १४:२६; रोमकर १:४) पवित्र आत्म्याद्वारे यहोवा आपल्या सेवकांना सुवार्तेची घोषणा करत राहण्याचे सामर्थ्य देतो. (प्रेषितांची कृत्ये १:८; ४:३१) यहोवा ‘आपल्या आज्ञा पाळणाऱ्‍यांना’ जे दैहिक वासनांनुसार नव्हे तर ‘आत्म्याच्या प्रेरणेने चालतात’ अशांना आपला आत्मा देतो. (प्रेषितांची कृत्ये ५:३२; गलतीकर ५:१६, २५; रोमकर ८:५-८) ही प्रभावशाली शक्‍ती ख्रिश्‍चनांना “आत्म्याच्याद्वारे निष्पन्‍न होणारे फळ” अर्थात उत्तम गुण उत्पन्‍न करण्यास व ‘पवित्र वर्तणुकीत व सुभक्‍तीत राहण्यास’ मदत करते. (गलतीकर ५:२२, २३; २ पेत्र ३:११) ही शक्‍ती अत्यंत पवित्र आहे असे जर आपण मानत असू तर साहजिकच आपण असे काहीही करण्याचे टाळू की जे या आत्म्याला खिन्‍न करेल किंवा आपल्या जीवनात या आत्म्याच्या कार्यात बाधा आणेल.—इफिसकर ४:३०.

१४. अभिषिक्‍त जन कोणत्या बहुमानास पवित्र लेखतात आणि दुसरी मेंढरे यांनाही हा बहुमान कशाप्रकारे मिळतो?

१४ यहोवाचे साक्षीदार यानात्याने पवित्र देव यहोवा याचे नाव धारण करण्याचा जो बहुमान आपल्याला लाभला आहे त्यास आपण अत्यंत पवित्र समजतो. (यशया ४३:१०-१२, १५) अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना यहोवाने “नव्या कराराचे सेवक” होण्यास समर्थ केले आहे. (२ करिंथकर ३:५, ६) नव्या कराराचे सेवक या नात्याने त्यांच्यावर ‘राज्याची सुवार्ता’ घोषित करण्याची आणि ‘सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करण्याची’ आज्ञा देण्यात आली आहे. (मत्तय २४:१४; २८:१९, २०) या आज्ञेचे ते विश्‍वासूपणे पालन करत आहेत आणि मेंढरांसमान असणारे लाखो लोक त्यांच्या या कार्याला प्रतिसाद देऊन लाक्षणिक अर्थाने असे म्हणत आहेत: “आम्ही तुम्हाबरोबर येतो, कारण देव तुम्हाबरोबर आहे असे आम्ही ऐकले आहे.” (जखऱ्‍या ८:२३) ते ‘आमच्या देवाच्या [अभिषिक्‍त] सेवकांकरता’ आध्यात्मिक अर्थाने “नांगऱ्‍ये” आणि “द्राक्षाचे मळे लावणारे” म्हणून आनंदाने कार्य करतात. अशारितीने ही दुसरी मेंढरे अभिषिक्‍त जनांना जागतिक पातळीवर त्यांची सेवा पूर्ण करण्यासाठी मोठा हातभार लावतात.—यशया ६१:५, ६.

१५. प्रेषित पौलाने कोणत्या कार्याला पवित्र लेखले आणि आपणही हाच दृष्टिकोन का बाळगतो?

१५ आपल्या सार्वजनिक सेवाकार्याला पवित्र मानणाऱ्‍यांपैकी एक होता प्रेषित पौल. त्याने स्वतःला “परराष्ट्रीयांसाठी येशू ख्रिस्ताचा सेवक होऊन देवाच्या सुवार्तेचा याजक” म्हणवले. (रोमकर १५:१६) करिंथ येथील ख्रिस्ती बांधवांना लिहिताना पौलाने आपल्या सेवेला “संपत्ति” म्हटले. (२ करिंथकर ४:१, ७) आपल्या पवित्र सेवाकार्याद्वारे आपण “देवाची वचने” जाहीर करतो. (१ पेत्र ४:११) तेव्हा, आपण अभिषिक्‍तांपैकी असोत अथवा दुसऱ्‍या मेंढरांपैकी असोत, आपण साक्ष देण्याच्या कार्यात सहभाग घेणे यास एक पवित्र बहुमान समजतो.

“देवाचे भय बाळगून पावित्र्याला पूर्णता आणणे”

१६. पवित्र गोष्टींविषयी “बेपर्वा” न होण्याकरता आपल्याला कोणती गोष्ट मदत करेल?

१६ प्रेषित पौलाने आपल्या सहख्रिस्ती बांधवांना पवित्र गोष्टींविषयी, किंवा ‘देवाविषयी बेपर्वा’ असणाऱ्‍या लोकांसारखे न होण्याची ताकीद दिली. त्याऐवजी “पवित्रिकरण मिळविण्याचा झटून प्रयत्न करा” आणि “ज्यामुळे पुष्कळ जण बिघडून जातील असे कोणतेहि कडूपणाचे मूळ अंकुरित होऊन उपद्रव देणारे होऊ नये . . . ह्‍याकडे लक्ष द्या” असा सल्ला दिला. (इब्री लोकांस १२:१४-१६) “कडूपणाचे मूळ” ही संज्ञा ख्रिस्ती मंडळीतल्या अशा तुरळक व्यक्‍तींना संबोधित करते की ज्यांना मंडळीतल्या कारभाराविषयी टीका करण्याची सवय आहे. उदाहरणार्थ, विवाहाचे पावित्र्य किंवा नैतिक शुद्धतेचे महत्त्व यांबद्दल यहोवाच्या दृष्टिकोनाविषयी ते असहमती दर्शवू शकतात. (१ थेस्सलनीकाकर ४:३-७; इब्री लोकांस १३:४) किंवा ते ‘सत्याविषयी चुकलेल्यांच्या’ प्रोत्साहानाने, पावित्र्य भंग करणाऱ्‍या ‘अनीतिच्या रिकाम्या वटवटींद्वारे’ धर्मत्यागी कल्पनांचा प्रसार करत असतील.—२ तीमथ्य २:१६-१८.

१७. पावित्र्यासंबंधी यहोवाचा दृष्टिकोन प्रकट करण्याकरता अभिषिक्‍त जनांनी सातत्याने प्रयत्न का केला पाहिजे?

१७ पौलाने आपल्या अभिषिक्‍त बांधवांना असे लिहिले: “प्रियजनहो, . . . देहाच्या व आत्म्याच्या सर्व अशुद्धतेपासून आपण स्वतःला शुद्ध करू आणि देवाचे भय बाळगून पावित्र्याला पूर्णता आणू.” (२ करिंथकर ७:१) या विधानावरून असे दिसून येते की ‘स्वर्गीय पाचारणाचे भागीदार’ असणाऱ्‍या अभिषिक्‍त जनांनी आपल्या जीवनातल्या सर्व बाबतीत पावित्र्यासंबंधी यहोवाचा दृष्टिकोन प्रकट करण्याचा सातत्याने प्रयत्न केला पाहिजे. (इब्री लोकांस ३:१) त्याचप्रकारे, प्रेषित पेत्रानेही आत्म्याने अभिषिक्‍त बांधवांना असा आग्रह केला की, “आज्ञांकित मुले व्हा आणि अज्ञानावस्थेतील आपल्या पूर्वीच्या वासनांनुसार वागूवर्तू नका; तर तुम्हांस पाचारण करणारा जसा पवित्र आहे तसे तुम्हीहि सर्व प्रकारच्या आचरणांत पवित्र व्हा.”—१ पेत्र १:१४, १५.

१८, १९. (क) ‘मोठ्या लोकसमुदायाचे’ सदस्य कसे दाखवतात की पवित्र गोष्टींसंबंधी त्यांचा यहोवासारखाच दृष्टिकोन आहे? (ख) आपल्या ख्रिस्ती जीवनातील कोणत्या एका पवित्र गोष्टीबद्दल पुढील लेखात चर्चा करण्यात येईल?

१८ ‘मोठ्या संकटातून’ जिवंत बचावण्याची आशा असलेल्या ‘मोठ्या लोकसमुदायाच्या’ सदस्यांविषयी काय? त्यांनी देखील हे दाखवून दिले पाहिजे की पवित्र गोष्टींसंबंधी त्यांचा दृष्टिकोन यहोवासारखाच आहे. प्रकटीकरणाच्या पुस्तकात, ते यहोवाच्या आत्मिक मंदिराच्या पृथ्वीरूपी अंगणात त्याची पवित्र “सेवा” करत आहेत असे वर्णन केले आहे. त्यांनी ख्रिस्ताच्या खंडणी बलिदानावर विश्‍वास ठेवला आहे, अर्थात लाक्षणिक अर्थाने “आपले झगे कोकऱ्‍याच्या रक्‍तात धुऊन शुभ्र केले आहेत.” (प्रकटीकरण ७:९, १४, १५) यामुळे त्यांना यहोवासमोर शुद्ध स्थिती प्राप्त होते आणि त्यांच्यावरही ‘देहाच्या व आत्म्याच्या सर्व अशुद्धतेपासून स्वतःला शुद्ध करण्याची आणि देवाचे भय बाळगून पावित्र्याला पूर्णता आणण्याची’ जबाबदारी येते.

१९ अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांच्या आणि त्यांच्या सहकाऱ्‍यांच्या जीवनातील एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यहोवाची उपासना करण्याकरता व त्याच्या वचनाचा अभ्यास करण्याकरता एकत्र येणे. यहोवा आपल्या लोकांच्या सभांना पवित्र समजतो. या महत्त्वाच्या गोष्टीसंबंधी आपणही यहोवासारखाच आपला दृष्टिकोन असल्याचे कसे दाखवू शकतो याविषयी पुढील लेखात चर्चा करण्यात येईल. (w०६ ११/०१)

उजळणी

• यहोवाचे सेवक कोणता दैहिक दृष्टिकोन बाळगत नाहीत?

• यहोवा सर्व पवित्र गोष्टींचा स्रोत का आहे?

• ख्रिस्ताच्या पावित्र्याचा आपण आदर करतो हे आपण कसे दाखवतो?

• आपण आपल्या जीवनात कोणत्या गोष्टींना पवित्र मानले पाहिजे?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२५ पानांवरील चित्र]

प्राचीन इस्राएलात, याजकांची सेवा, निवासमंडप, आणि त्यातले सामान पवित्र समजले जात होते

[२७ पानांवरील चित्रे]

प्रार्थना आणि आपले सार्वजनिक सेवाकार्य हे पवित्र विशेषाधिकार आहेत