मुलांच्या संगोपनाकरता विश्वसनीय सल्ला
मुलांच्या संगोपनाकरता विश्वसनीय सल्ला
“मला दिवस गेले तेव्हा मी माझ्या घरच्यांपासून खूप दूर होते; शिवाय मी यासाठी तयारही नव्हते. मी तेव्हा फक्त १९ वर्षांची होते,” असे रूथ आपल्या पहिल्या गरोदरपणाविषयी सांगते. रूथ स्वतः आपल्या आईवडिलांची एकुलती एक लेक होती. तिने पालक बनण्याच्या जबाबदारीचा इतका विचार केला नव्हता. मग, तिला विश्वसनीय सल्ला कोठे मिळू शकला असता?
दुसरीकडे पाहता, दोन मोठ्या मुलांचे वडील असलेले जॅन आठवून सांगतात: “सुरुवातीला मला फार आत्मविश्वास होता. पण थोड्याच दिवसांत मला जाणवलं, की माझ्याकडे व्यावहारिक ज्ञान नाही.” मुलांचे संगोपन करण्यास आपण तयार नाही किंवा आपण ज्या मार्गाने मुलांचे संगोपन करत आहोत तो मार्ग उचित आहे का, याबाबतीत पालकांच्या मनात प्रश्न येतात तेव्हा त्यांना मदत कोठे मिळू शकेल?
आज पुष्कळ लोक इंटरनेटकडे धाव घेतात. पण तुमच्या मनात कदाचित असा प्रश्न येईल, की इंटरनेटवरील सल्ला किती भरवसालायक असेल? याबाबतीत तुम्ही खबरदारी बाळगली पाहिजे. इंटरनेटवर तुम्हाला कोण सल्ला देतात, हे तुम्हाला नक्की माहीत आहे का? जे कोणी सल्ला देतात त्यांना आपल्या मुलांचे संगोपन करण्यात कितपत यश आले आहे? तुमच्या कुटुंबावर ज्याचा प्रभाव पडू शकतो अशा गोष्टीबाबत तुम्ही निश्चितच खबरदारी घ्याल. मागच्या लेखात उल्लेख केल्याप्रमाणे कधीकधी तज्ज्ञांकडचा सल्ला देखील आपल्याला निराश करू शकतो. मग तुम्ही मार्गदर्शन कोठून मिळवू शकाल?
मुलांचे संगोपन कसे करायचे याबाबतीत, कुटुंबाचा जनक अर्थात यहोवा देव आपल्याला सल्ला देऊ शकतो, कारण त्याच्याकडे ज्ञानाचे भांडार आहे. (इफिसकर ३:१४) केवळ तोच खरा तज्ज्ञ आहे. आपले वचन बायबल यात त्याने विश्वसनीय व व्यवहारात उपयोगी पडतील अशा सूचना दिल्या आहेत ज्या खरोखरच प्रभावी आहेत. (स्तोत्र ३२:८; यशया ४८:१७, १८) पण या सूचनांचे पालन करायचे की नाही हे सर्वस्वी आपल्यावर आहे.
आपल्या मुलांना संतुलित आणि देव-भीरू प्रौढ बनण्यास मदत करताना त्यांना कोणकोणत्या गोष्टी शिकायला मिळाल्या ते सांगण्यास अनेक पालकांना विचारण्यात आले. बायबल तत्त्वांचे पालन हे प्रामुख्याने त्यांच्या यशाचे कारण होते, असे ते म्हणाले. बायबलचे पहिल्यांदा लिखाण झाले तेव्हा जितके ते विश्वसनीय होते तितकेच आजही आहे, हे त्यांच्या पाहण्यात आले.
मुलांबरोबर वेळ घालवणे
दोन मुलांची आई असलेल्या कॅथरिनला कोणत्या सल्ल्याचा जास्त फायदा झाला असे विचारले असता तिने लगेच अनुवाद ६:७ चा उल्लेख केला. त्या वचनात म्हटले आहे: “[बायबल तत्त्वे] तू आपल्या मुलाबाळांच्या मनावर बिंबव; आणि घरी बसलेले असता, मार्गाने चालत असता, निजता, उठता त्यांविषयी बोलत जा.” कॅथरिनला जाणवले की हा सल्ला लागू करण्याकरता तिला आपल्या मुलांबरोबर वेळ घालवावा लागेल.
‘हे बोलायला सोपे आहे, करायला नव्हे,’ असा कदाचित तुम्ही विचार कराल. पुष्कळ कुटुंबांत आईवडील दोघांना घर चालवण्यासाठी काम करावे लागत असल्यामुळे, ते आपल्या मुलांबरोबर कसा आणि केव्हा वेळ घालवू शकतील? अनुवादातील सल्ल्याचे पालन करणे हे सर्वात महत्त्वाचे कारण आहे, असे टॉरलिफ म्हणतात. टॉरलिफ यांचा मुलगा स्वतः आता आपल्या मुलांचे संगोपन करत आहे. तेव्हा, तुम्ही जेथे जेथे जाता तेथे तेथे आपल्या मुलांना सोबत न्या. आणि त्यांच्याबरोबर बोलण्याच्या संधी आपोआप तुम्हाला मिळू लागतील. टॉरलिफ म्हणतात: “घरात एखादं काम काढल्यावर आम्ही बापलेक सोबत काम करायचो. शिवाय, संपूर्ण कुटुंब मिळून बाहेर जायचो. सोबत जेवायचो. यामुळे आमच्या मुलाला, तो आमच्याबरोबर अगदी मनमोकळेपणाने बोलू शकतो, असे वाटायचे.”
पण समजा तुमच्या कुटुंबात मनमोकळी चर्चा होत नसेल व संभाषण करणे कठीण असेल तर काय? मुले जसजशी मोठी होऊ लागतात तसतसे कदाचित असे कधीकधी होऊ शकते. तरीसुद्धा त्यांच्याबरोबर वेळ घालवल्यास फायदा होऊ शकतो. कॅथरिनचे पती, केन आठवून सांगतात, की त्यांची मुलगी किशोरवयात होती तेव्हा ती, तुमचे माझ्या बोलण्याकडे लक्ष नसते, अशी तक्रार करायची. अशी तक्रार तर अनेक किशोरवयीन करत असतात. मग केन यांनी काय केले? ते म्हणतात: नीतिसूत्रे २०:५) ते पुढे म्हणतात: “पण ही पद्धत चालली कारण आमच्या घरात आम्ही सर्व मनमोकळेपणाने एकमेकांबरोबर संवाद साधतो. आम्हा बापलेकीत पहिल्यापासून हितगुज चालायचे, त्यामुळे ती माझ्याबरोबर अगदी निसंकोचपणे बोलू शकली.”
“मी फक्त तिच्याबरोबर जास्त वेळ घालवण्याचे, ती काय विचार करते, तिला अमूक गोष्टींबद्दल काय वाटते, कोणत्या गोष्टींमुळे तिला चिडचिड होते यावर चर्चा करण्याचे ठरवले. आणि याचा खरोखरच फायदा झाला.” (एका अलिकडील अभ्यासात असे दिसून आले, की पालक आणि मुले एकमेकांबरोबर पुरेसा वेळ घालवत नाहीत, असे जे पालकांनी म्हटले पाहिजे ते खरे तर किशोरवयीन म्हणत असण्याची तीनपट शक्यता आहे. तेव्हा बायबलच्या सल्ल्याचे पालन करण्यात सुज्ञपणा आहे, नाही का? निवांत बसलेले असताना, काम करताना, घरी, प्रवास करताना, सकाळी उठता तेव्हा, रात्री झोपायच्या आधी होता होईल तितका आपल्या मुलांबरोबर वेळ घालवा. शक्य असेल तर तुम्ही जाल तेथे आपल्या मुलांना सोबत न्या. अनुवाद ६:७ सुचवते त्याप्रमाणे आपल्या मुलांबरोबर वेळ घालवणे याला दुसरा पर्याय नाही.
त्यांना योग्य नीतिमूल्ये शिकवा
पिता असलेले मार्यो अशीच शिफारस करतात: “आपल्या मुलांवर भरपूर प्रेम करा, त्यांच्याबरोबर वाचन करा.” यामुळे तुम्ही तुमच्या मुलांच्या मानसिक क्षमतांनाच चालना देत नाही तर तुम्ही त्यांना बरोबर आणि चूक यांतला फरक कसा ओळखायचा हे शिकवत असता. “त्यांच्याबरोबर बायबलचा अभ्यास करा,” असे मार्यो म्हणतात.
म्हणूनच बायबल पालकांना असा सल्ला देते: “बापांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिरडीस आणू नका, तर प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात त्यांना वाढवा.” (इफिसकर ६:४) आज अनेक घरांत मुलांना नैतिक शिक्षण दिले जात नाही. काही पालकांना असे वाटते, की मुले मोठी झाल्यावर कोणती मूल्ये घ्यायची हे त्यांचे तेच ठरवतील. हे तुमच्या तर्काला पटते का? कोवळे शरीर मजबूत आणि निरोगी वाढण्याकरता जसे योग्य पोषणाची गरज असते तसेच कोवळ्या मनाला व हृदयाला योग्य प्रशिक्षणाची गरज आहे. तुमची मुले घरी तुमच्याकडून योग्य नीतिमूल्ये शिकली नाहीत तर ते कदाचित आपल्या शाळा सोबत्यांचे आणि शिक्षकांचे दृष्टिकोन किंवा प्रसारमाध्यमात दाखवले जाणारे दृष्टिकोन स्वीकारतील.
आपल्या मुलांना बरोबर आणि चूक यांतला फरक कसा समजायचा हे शिकवण्यास बायबल पालकांना मदत करते. (२ तीमथ्य ३:१६, १७) जेफ, ज्यांनी आपल्या मुलांना यशस्वीरीत्या वाढवले आहे, ते मुलांमध्ये योग्य नीतिमूल्ये बिंबवण्यासाठी बायबलचा उपयोग करण्याची शिफारस देतात. ते ख्रिस्ती मंडळीत एक अनुभवी वडील आहेत. ते म्हणतात: “बायबलचा उपयोग केल्यास मुलांना, फक्त आई-बाबांना नव्हे तर निर्माणकर्त्याला एखाद्या गोष्टीबद्दल कसे वाटते याची जाणीव होते. बायबलचा मुलांच्या मनावर आणि हृदयावर किती अद्भुत प्रभाव पडू शकतो, हे आम्ही पाहिले आहे. चुकीचे वर्तन किंवा विचार यांविषयी सांगण्यासाठी आम्ही बायबलमधून त्या संदर्भातले वचन शोधण्यासाठी वेळ काढायचो. आणि मग, आम्ही एकांतात ते वचन आमच्या मुलीला/मुलाला वाचायला सांगायचो. तेव्हा बहुतेकदा त्यांच्या डोळ्यांतून पाणी आल्याचं आम्ही पाहिलं आहे. आम्हाला खूप आश्चर्य वाटायचं. बायबलच्या वचनांमुळे त्यांच्या मनावर जितका खोलवर परिणाम झाला तितका, आम्ही स्वतःच्या विचारांनुसार त्यांना काही सांगितले असते किंवा विशिष्ट प्रकारे ती समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला असता तर झाला नसता.”
इब्री लोकांस ४:१२ मध्ये म्हटले आहे: “देवाचे वचन सजीव, सक्रिय . . . मनातील विचार व हेतु ह्यांचे परीक्षक असे आहे.” बायबलमधील संदेश हा, देवाने तो लिहिण्यासाठी ज्यांचा उपयोग केला त्या लोकांचे व्यक्तिगत दृष्टिकोन किंवा अनुभव नाही. तर, तो नैतिक गोष्टींबाबत देवाचा काय विचार आहे ते कळवतो. त्यामुळेच तो इतर सर्व सल्ल्यांपेक्षा श्रेष्ठ आहे. आपल्या मुलांना शिकवण्याकरता बायबलचा उपयोग करण्याद्वारे तुम्ही त्यांना सर्व गोष्टींमध्ये देवासारखा विचार करण्यास मदत करत असता. तुम्ही देत असलेल्या शिक्षणात तथ्य असते आणि तुम्ही तुमच्या मुलाच्या हृदयापर्यंत पोहंचू शकता.
आधी जिचा उल्लेख केला ती कॅथरिन याजशी सहमत आहे. ती म्हणते: “आमच्यासमोर जितकी मोठी समस्या येत असे तितके अधिक आम्ही देवाच्या वचनातून मार्गदर्शन शोधायचा प्रयत्न करत असू. आणि हा सल्ला उपयोगी पडायचा!” बरोबर आणि चूक यांतील फरक कसा ओळखायचा हे आपल्या मुलांना शिकवताना तुम्ही बायबलचा होता होईल तितका उपयोग करू शकता का?
समंजसपणा दाखवा
प्रेषित पौलाने, मुलांचे संगोपन करताना आणखी एका महत्त्वाच्या तत्त्वाकडे लक्ष वेधले ज्याचा फायदा पालकांना होऊ शकतो. त्याने सहख्रिश्चनांना असे आर्जवले: “तुमची सहनशीलता [समंजसपणा] सर्वांना कळून येवो.” (फिलिप्पैकर ४:५) सर्वांना म्हणजे निश्चितच आपल्या मुलांना देखील. आणि समंजसपणा “वरून येणारे ज्ञान” प्रतिबिंबित करतो, हे लक्षात असू द्या.—याकोब ३:१७.
पण, समंजसपणाचा मुलांच्या संगोपनाशी काय संबंध? आपल्या परीने आपण मुलांना हवी ती मदत देऊ शकतो, परंतु आपण त्यांच्या प्रत्येक हालचालीवर नियंत्रण करू शकत नाही. जसे की, वर उल्लेख केलेले मार्यो जे यहोवाचे साक्षीदार आहेत ते आठवून सांगतात: “आम्ही आमच्या मुलांना, बाप्तिस्मा घेण्याचे, पूर्ण वेळेच्या सेवेत उतरण्याचे व इतर आध्यात्मिक ध्येये ठेवण्याचे नेहमी उत्तेजन देत राहिलो. पण आम्ही त्यांना स्पष्ट सांगितले, की योग्य वेळ येईल तेव्हा त्यांनी हे ठरवायचे, की या गोष्टी करायच्या की नाहीत, आम्ही त्यांना बळजबरी केली नाही.” याचा परिणाम? त्यांची दोन्ही मुले आज पूर्ण वेळेचे सुवार्तिक म्हणून सेवा करत आहेत.
कलस्सैकर ३:२१ मध्ये बायबल वडिलांना अशी ताकीद देते: “बापांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिरडीस आणू नका; आणाल तर ती खिन्न होतील.” कॅथरिनला हे वचन अतिशय आवडते. आईची किंवा वडिलांची सहनशीलता संपत येते तेव्हा ते सहजरीत्या क्रोधीत होतील किंवा मुलांवर जोर करू लागतील. पण, “तुम्ही स्वतःकडून जितकी अपेक्षा करता तितकी तुमच्या मुलांकडून करू नका,” असे कॅथरिन म्हणते. ती देखील यहोवाची साक्षीदार आहे. ती पुढे म्हणते: “यहोवाची सेवा करणे किती आनंददायक अनुभव आहे, याची त्यांना जाणीव करून द्या.”
आधी उल्लेख केलेल्या जेफने ही एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सुचवली: “आमची मुलं मोठी होत होती, तेव्हा आमच्या एका जवळच्या मित्रानं आम्हाला सांगितलं, की त्याला कधीकधी त्याच्या मुलांच्या मागण्यांना नाही म्हणावे लागायचे तेव्हा ती नाराज व्हायचीत, आपण काही मागितलं तर आपल्याला कधीच दिलं जात नाही, असं त्यांना वाटायचं. त्यामुळे माझ्या बाबतीत असं काही होऊ नये म्हणून त्यानं मला सुचवलं, की मी आपल्या मुलांच्या मागण्या पूर्ण करण्याकरता मार्ग शोधू शकतो.”
जेफ पुढे म्हणतो: “आमच्या मित्रानं दिलेला सल्ला आम्हाला आवडला. आमच्या मुलांना आम्ही आमच्या देखरेखीत इतरांबरोबर काही गोष्टी करू देण्याच्या संधी पाहू लागलो. आम्ही त्यांना असे म्हणायचो, ‘तो/ती असं करतेय, माहीत आहे का? तू पण कर.’ किंवा जर मुलांनी आम्हाला, अमूक ठिकाणी न्या असं म्हटलं, की आम्ही थकलेलो असलो तरी त्यांना तिथं न्यायचो. नाही म्हणायचं टाळण्यासाठी आम्ही असं करत होतो.” यालाच तर समंजसपणा म्हणतात. समंजस असण्यात, अपक्षपाती, विचारशील आणि बायबल तत्त्वांचे उल्लंघन न करता गोष्टी करणे समाविष्ट आहे.
विश्वसनीय सल्ल्याचा फायदा
वर उल्लेख केलेल्या बहुतेक दांपत्यांना आता नातवंडे आहेत. ज्या बायबल तत्त्वांचा त्यांना फायदा झाला होता आज तीच बायबल तत्त्वे आपल्या मुलांनाही त्यांच्या मुलांचे संगोपन करताना उपयोगी पडत आहे हे पाहून त्यांना आनंद होतो. तुम्हालाही बायबल सल्ल्याचा फायदा होऊ शकतो का?
लेखाच्या सुरुवातीला उल्लेख केलेली रूथ जेव्हा पालक बनली तेव्हा तिला आणि तिच्या पतीला, आपल्याला काही मार्गदर्शन नाही, असे वाटले. पण तसे नव्हते. त्यांच्याजवळ देवाचे वचन बायबल यांतला श्रेष्ठ सल्ला होता. यहोवाच्या साक्षीदारांनी अनेक उत्कृष्ट बायबल आधारित प्रकाशने छापली आहेत ज्यांचा पालकांना उपयोग होऊ शकतो. यांत, थोर शिक्षकाकडून शिका (इंग्रजी), बायबल कथांचं माझं पुस्तक, तरुणांचे प्रश्न—उपयुक्त उत्तरे, आणि सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य या पुस्तकांचा समावेश होतो. रूथचे पती टॉरलिफ म्हणतात: “आज, बायबल आधारित सल्ल्याचा ज्ञानभंडार पालकांसाठी अगदी सुलभ आहे. फक्त त्यांनी त्याचा उपयोग केला पाहिजे. आपली मुले जसजशी मोठी होतात तसतसे ते जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात या माहितीचा उपयोग करू शकतात.” (w०६ ११/०१)
[५ पानांवरील चौकट/चित्र]
तज्ज्ञ काय म्हणतात . . . बायबल काय म्हणते
प्रेम दाखवण्याच्या बाबतीत:
द सायकोलॉजिकल केअर ऑफ इन्फंट ॲण्ड चाईल्ड (१९२८) या पुस्तकात, डॉ. जॉन ब्रोडस वॉटसन पालकांना आर्जवतात: “आपल्या मुलांना कधीच मिठीत घेऊन त्यांचे चुंबन घेऊ नका.” “त्यांना आपल्या मांडीवर बसू देऊ नका.” परंतु अलिकडे डॉ. व्हिरा लेन आणि डॉ. डॉर्थी मॉलिनो यांनी आर चिल्ड्रन या मासिकात (मार्च १९९९) म्हटले: “ज्या लहान मुलांना पालकांच्या स्पर्शापासून वंचित ठेवले जाते व त्यांना प्रेम दाखवले जात नाही अशा मुलांची वाढ सहसा चांगल्याप्रकारे होत नाही.”
परंतु, यशया ६६:१२ मध्ये, देव आपल्या लोकांबद्दल कशाप्रकारे प्रेम व्यक्त करतो हे पालक आपल्या मुलांना प्रेम कसे व्यक्त करतात त्याद्वारे सूचित केले आहे. तसेच लोक जेव्हा आपल्या मुलांना घेऊन येशूकडे येत होते तेव्हा त्याच्या शिष्यांनी या लोकांना अडवले, पण येशूने आपल्या शिष्यांनाच रोखून म्हटले: “बाळकांस माझ्याजवळ येऊ द्या; त्यांना मनाई करू नका.” आणि मग, “त्याने त्यांना कवटाळून व त्यांच्यावर हात ठेवून त्यांना आशीर्वाद दिला.”—मार्क १०:१४, १६
उचित नीतिमूल्ये शिकवण्याच्या बाबतीत:
१९६९ च्या एका न्यू यॉर्क टाईम्स मासिकाच्या लेखात, डॉ. ब्रूनो बिटलहाईम यांनी अगदी असे ठासून सांगितले, की मुलाला, “स्वतःचे आंतरिक मत तयार करण्याचा हक्क आहे. हे मत तो, [पालकांच्या] अधिकारवाणीने केलेल्या [भाषणामुळे] करणार नाही तर स्वतःच्या जीवनाच्या अनुभवावरून करेल.” परंतु, जवळजवळ ३० वर्षांनंतर, द मॉरल इंटेलिजन्स ऑफ चिल्ड्रन (१९९७) या पुस्तकाचे लेखक डॉ. रॉबर्ट कोल्स यांनी असे कबूल केले: ‘आपल्या जीवनाला उद्देश आहे आणि आपल्याला मार्गदर्शनाची गरज आहे ही जाणीव मुलांना असली पाहिजे. पालकांनी व इतर प्रौढांनी मान्य केलेल्या नीतिमूल्यांची त्यांना अत्यंत गरज आहे.’
नीतिसूत्रे २२:६ मध्ये पालकांना असे आर्जवण्यात आले आहे: “मुलाच्या स्थितीस अनुरुप असे शिक्षण त्याला दे, म्हणजे वृद्धपणीहि तो त्यापासून परावृत्त होणार नाही.” “शिक्षण” असे भाषांतरीत केलेल्या इब्री शब्दाचा अर्थ ‘सुरुवात करून देणे’ असाही होतो. व या वचनात तान्ह्या बाळाला त्याच्या पहिल्या धड्याचा परिचय करून देण्याचा अर्थ सूचित होतो. तेव्हा पालकांना असे उत्तेजन देण्यात येते, की त्यांनी मुले जेव्हा तान्ही असतात तेव्हापासून त्यांच्यामध्ये नीतिमूल्ये बिंबवण्यास सुरुवात केली पाहिजे. (२ तीमथ्य ३:१४, १५) या लहान वयात त्यांना आकार देता येतो. या वयात त्यांना जो आकार दिला जाईल तो वृद्धापकाळापर्यंत राहण्याची शक्यता आहे.
शिक्षा देण्याच्या बाबतीत:
डॉ. जेम्स डॉबसन यांनी द स्ट्राँग-विल्ड चाईल्ड (१९७८) या पुस्तकात असे लिहिले: “प्रेमळ पालकाकडून मुलाला मिळणारी शारीरिक शिक्षा ही शिकवण्याचे एक साधन आहे जी हानीकारक वर्तनास बांध घालते.” दुसरीकडे पाहता, बेबी ॲण्ड चाईल्ड केअर (१९९८) या प्रसिद्ध पुस्तकाच्या सातव्या आवृत्तीतून घेतलेल्या एका लेखात डॉ. बेंजमीन स्पोक म्हणतात: “मुलांना छडी मारणे त्यांना असे शिकवण्यासारखे आहे की मोठी व शक्तिशाली माणसं, त्यांचे बरोबर असो अथवा नसो, तरीपण ते काहीही करू शकतात.”
शिक्षेच्या बाबतीत बायबलमध्ये असे म्हटले आहे: “छडी व वाग्दंड ज्ञान देतात.” (नीतिसूत्रे २९:१५) परंतु सर्वच मुलांना शिक्षा द्यावी लागते असे नाही. नीतिसूत्रे १७:१० आपल्याला सांगते: “वाग्दंड समंजसाच्या मनावर ठसतो, तसे शंभर फटके मूर्खाच्या मनावर ठसत नाहीत.”
[चित्र]
मुलांच्या हृदयापर्यंत पोहंचण्यासाठी बायबलचा उपयोग करा
[७ पानांवरील चित्र]
सुज्ञ पालक आपल्या मुलांसाठी मनोरंजनाची व्यवस्था करतात